रविवार, १६ जून, २०२४

'नीट'नेटक्याचेच वावडे



समाजातल्या एखाद्या प्रश्नाची थेट झळ बसत नाही तोपर्यंत अनेकांची भूमिका फक्त बघ्याची असते. त्यामध्ये आपले किंवा जवळच्या कोणाचे अहित असेल तर मात्र त्या प्रश्नाची तीव्रता जोरदार जाणवते. यावर्षी  'नीट' या मेडिकल प्रवेशपरीक्षेच्या निकालातल्या गोंधळाने  विद्यार्थी,पालक वर्गात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ही भारतातील प्रथितयश संस्था संपूर्ण भारतातील विविध शाखांच्या, उच्चशिक्षणिक संस्थांच्या, प्रोफेशनल कोर्सेसच्या प्रवेशपरीक्षा दरवर्षी घेते. 

या परिक्षेच्या निकालावर देशातील लाखो तरुणांचे भवितव्य अवलंबून असते. 

अत्यंत शिस्तबद्ध आणि काटेकोर निकषांवर NTA चे काम चालते तरीही दरवर्षी या परीक्षा, त्यांचे निकाल यावरून NTA वर एखाद-दुसरी कोर्टकेस दाखल होतेच. पण त्याशिवाय इतर बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या बाबतीत भारताच्या विविध कॉलेजातील प्रवेशाचे मार्ग सुकर झालेले असतात. 

यावर्षी 'नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट' 'नीट' परीक्षेच्या निकालात झालेल्या गोंधळाचा परिणाम या परीक्षेला बसलेल्या 24 लाख 

विद्यार्थ्यांवर झाला. 

या निकालात एक नाही तर अनेक गोंधळ आहेत. इतकी मोठी सरकारी यंत्रणा पण इतक्या चुका? नेमके कोणाचे काय इंटरेस्ट्स आहेत यात? ज्यांच्या आयुष्याची सुरवात आहे त्या निष्पाप जीवांच्या करिअरशी असा खेळ? आयुष्यभरासाठी काय मूल्य घ्यायचं विद्यार्थ्यांनी यातून ? 

जे घडलं त्यामागच्या अज्ञात कारणांचा शोध सगळ्यांच्याच मनात अनेक प्रश्न आणि अस्वस्थता निर्माण करणारा आहे.


जे घडलं त्यातून समोर आलेलं तथ्य असं-


1) एकूण 720 मार्कंची निगेटिव्ह मार्किंग पद्धती असलेली ही परीक्षापद्धती असते. त्यात पूर्ण 720 पैकी 720 मार्क मिळाले असे विद्यार्थी याआधीच्या इतिहासात दरवर्षी अगदीच एखाद दुसराच असतो.

परंतु यावर्षी एकूण 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स आहेत आणि विशेष म्हणजे ते एकाच सेंटरचे आहेत.


2 )विद्यार्थी आणि पालकांनी घेतलेल्या आक्षेपाला NTA ने ज्या विद्यार्थ्यांना पेपर उशिरा मिळाला त्यांना ग्रेस मार्क्स दिले असल्यामुळे असे घडले हे स्पष्टीकरण दिले. विशिष्ट परिस्थितीत ग्रेस मार्क देण्याचा असा कोणताच नियम NTA नियमावलीमध्ये नाही. याआधी असे मार्क्स कोणालाही देण्यात आलेले नाहीत.


3 ) Negative Marking पद्धतीमुळे 718 किंवा 719 असे मार्क्स विद्यार्थ्यांना मिळण्याची अजिबात शक्यता नसते. परंतु यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना तसे मार्क्स आहेत. ते बघूनच या प्रकाराकडे लक्ष वेधले.


4) परिक्षेतल्या एका प्रश्नाचे उत्तर जुन्या आणि नवीन NCERT नुसार वेगवेगळे होते आणि हे दोन्ही option उत्तरात असल्यामुळे (हे याआधी या परीक्षेत कधीही घडलेले नव्हते)

ज्यांनी यापैकी एक पर्याय निवडला त्यांना म्हणजे एकूण 44 मुलांना 4 मार्क्स extra मिळाले. 

NTA ने जाहीर केलेली अपेक्षित उत्तरांच्या  OMR sheets मध्ये याचा उल्लेख नव्हता. प्रत्यक्ष मार्कलिस्ट, मेरिटलिस्टमध्ये मात्र थेट असा बदल केला गेला.


5) कोणतीही पूर्वकल्पना नसतांना रिझल्ट 10 दिवस आधी आणि नेमक्या देशातील निवडणुकांच्या निकालाच्या दिवशीच अचानक जाहीर झाला.


6) एकसारखे मार्क्स असलेल्या मुलांची रँक ठरवताना ज्या मुलांनी परीक्षेचा फॉर्म आधी भरला त्या मुलांची रँक आधी असा नवीनच फॉर्म्युला NTA ने यावर्षी वापरला, जो उघडउघड प्रश्न निर्माण करणारा आहे.


7) दरवर्षी  नीट परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी दोन महिन्यांची ठराविक मुदत असते. ह्यावर्षी पहिल्यांदा त्यानंतर अजून दीड महिन्यांची वाढीव मुदत देण्यात आली होती. त्यामुळे परीक्षा देणाऱ्यांची संख्या साधारण चार लाखांनी वाढली.


8) परीक्षा झाल्यावर काही सेंटर्सना पेपर फुटल्याचे व्हिडीओ प्रसारमाध्यमांनी दाखवले. 

एकूणच हा सगळा घडलेला प्रकार अत्यंत संदिग्ध आहे. 650 च्या वर मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या रँक 35 ते 40 हजारांच्यावर गेल्या आहेत. वर्षानुवर्षे इतकी मेहनत करून ज्या ध्येयाचे स्वप्न बघितले ते ध्येय मिळेलच याची खात्री आज मुलांना नाही. आर्थिकदृष्ट्या प्रायव्हेट कॉलेजेसची फी न परवडणाऱ्या मुलांचा जीव काळजीने दडपून गेलाय.

विद्यार्थ्यांच्या सात्विक संतापाला, हतबलतेला, निराशेला अनाठायी कसं म्हणायचं? त्यांच्या मनातल्या अनिश्चिततेला, प्रश्नांना काय उत्तरं आहेत? त्यात एका मुलीने या कारणासाठी आत्महत्या केल्याची दुर्दैवी बातमी आली. या मृत्यूला जबाबदार कोण?

या जगभरात नावाजलेल्या, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अखिल भारतीय संस्था-कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थी अगदी आठवीपासून तयारी,मेहनत करत असतात. 

परीक्षेतल्या विषयांच्या सखोल तयारीसाठी लागणारे सातत्य,कष्ट यातून त्यांच्या ज्ञानाचा आवाका वाढत असतो. अकरावी,बारावी या महत्त्वाच्या वर्षात विषयांबरोबरच या प्रवेशपरीक्षेचे तंत्र समजून घेणेही महत्त्वाचे असते. कारण त्यांचा अभ्यास आणि ज्ञान यांची कसोटी या परीक्षेतील प्रश्नांद्वारे ठरून त्यांना हव्या असलेल्या जगाचे दार उघडणार असते. 

परीक्षेतल्या प्रश्नांच्या उत्तराचे दिलेले चारीही पर्याय उत्तराच्या जवळ जाणारेच भासतात. पण विद्यार्थ्यांची विषयाची समज जितकी परिपक्व तितकी विद्यार्थी अचूक पर्याय कमीत कमी वेळेत निवडण्याची शक्यता जास्त. वेळ आणि ज्ञान यांची जुगलबंदी असते. असे कौशल्य आत्मसात करण्यासाठीदेखील अखंड सराव लागतो. 

भारतीय शिक्षणपद्धतीतून बाहेर पडलेले असे गुणवंत आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून ज्ञान-विज्ञानाच्या नवनवीन क्षितिजांचा वेध घेत आहेत. तरीही अनेकदा या प्रवेशपरीक्षांच्या बहूपर्यायी स्वरूपावर टीका केली जाते. या परीक्षा म्हणजे केवळ ठराविक मार्गाने यश मिळवण्याचे तांत्रिक कौशल्य अशी हेटाळणीही होते. असा समज व्हायला खरेतर अनियंत्रित फोफावलेले खाजगी शैक्षणिक कारखाने आणि पालकांच्या आपल्या पाल्यांकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा कारणीभूत आहेत. कारण सगळ्याच मुलांची आवड,कल, इतके कष्ट करण्याची तयारी, इच्छा,असेलच असे नाही. बहुसंख्य मुलं अकरावी,बारावी या दोन वर्षात या परीक्षेची तयारी करतात तेव्हा ज्ञान आणि कौशल्य या दोन्ही पातळ्यांवर आपले 100 टक्के देण्यात त्यांची दमछाक होणे स्वाभाविक आहे. तयारीसाठी लागणारा पूर्ण वेळ आणि योग्य रिसोर्सेस त्यांना उपलब्ध असतीलच असे नाही. यात विद्यार्थ्यांचा दोष नसतो. विद्यार्थ्यांना आपापल्या तयारीप्रमाणे यश मिळते. 

पण कोणासाठीच हा प्रवास अजिबात सोपा नाही. 

अशा सगळ्याच विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी हजारो खाजगी कॉलेजेस,संस्थाही भारतात आहेत.

सहज लक्षात येईल की प्रचंड अर्थकारण आणि राजकीय इच्छाशक्ती यांचा मिलाफ असलेले हे क्षेत्र आहे. अनेकांचे संस्था आणि व्यक्तिगत पातळीवर हितसंबंध गुंतलेले असतात. गुणवंतांचे भविष्य ठरवणाऱ्या अशा परीक्षापद्धती वेठीला धरून कोणाचे व्यक्तिगत स्वार्थ पुरवले जात असतील, संपूर्ण व्यवस्था आपल्या सोयीप्रमाणे वाकवली किंवा बदलवली जात असेल तर तो दोष आपल्याच समाजातल्या काही आपमतलबी वृत्तींचा नाही का?

शेवटी सर्वांच्या केंद्रस्थानी आहे ती आपल्याच देशाचे भविष्य असलेली पुढची तरुण पिढी, म्हणजेच लाखो विद्यार्थी.

NTA सारख्या मोठ्या सरकारी व्यवस्थेत पारदर्शकता नसावी यात विद्यार्थ्यांचा काय दोष? 

कोणतीही संस्था म्हणजे शेवटी काय असते? प्रक्रिया राबवणारी माणसेच ना? 

प्रत्यक्ष संबंध नसला तरी समाज म्हणून आपणही या घटनेचा निषेध करायलाच हवा कारण उद्याच्या संपूर्ण समाजाचे आरोग्य ज्यांच्यावर अवलंबून असणार आहे त्या भावी डॉक्टरांना आपण हे काय देतोय?

भविष्य ज्यावर अवलंबून आहे त्या सगळ्या व्यवस्था,संस्था ‘पारदर्शक’ असाव्यात ही मागणी अवास्तव नक्कीच नाही.

IIT/JEE दुहेरी स्तरातल्या

परीक्षांचे नियोजन  NTA दरवर्षी यशस्वीपणे करतेच. या परीक्षेपेक्षा मेडिकल नीट परीक्षेला तिप्पट संख्येने दरवर्षी विद्यार्थी बसतात. असे असूनही वैद्यकीय शाखांच्या प्रवेशांसाठी अशी एकमेव 'नीट' परीक्षा का?

IIT/JEE सारखी नीट परीक्षाही दुहेरी स्तरात घेतली तर अधिक सोपी प्रक्रिया होऊ शकणार नाही का?

पहिल्या स्तरात अलोपॅथी शिवाय इतर वैद्यकीय शाखांचे प्रवेश होऊ शकतील. 

आणि Advance Neet Exam या दुसऱ्या स्तरातील काठिण्य पातळीद्वारे अलोपॅथी कॉलेजेसचे प्रवेश होतील. यासारखेच इतरही अनेक पर्याय, बदल प्रक्रिया राबविणाऱ्या कोणाला सुचलेच नसतील असे कसे होईल?

पण वर्षानुवर्षे राबवत असलेल्या प्रक्रियेतल्या त्रुटी लक्षात आल्या किंवा अगदी कोर्टानेही लक्षात आणून दिल्या तरी प्रत्यक्षात बदल मात्र घडत नाही, कोर्टाच्या दुसऱ्याच केसमधल्या निकालातली एखादी सोयीची जागा पळवाट म्हणून मात्र अचूक निवडली जाते. प्रश्नांवर तात्पुरती उत्तरे शोधली जातात.

यावेळी गोंधळ मोठा झाला म्हणून गाजावाजाही झाला.

आता पुन्हा पळवाटा शोधल्या जातील, की यातून मार्ग निघेल 

माहीत नाही. पण जो निघेल त्यात विद्यार्थ्यांचा विचार आधी केला जावा आणि पुढच्या वर्षी पुन्हा असे काही घडणार नाही याची खात्री त्यांना मिळावी.

लक्षात ठेवा, आपल्या जगण्यातून उद्याच्या भविष्यावर कोणता ठसा

उमटतो आहे त्यावरून

उद्याच्या इतिहासात आपलीही नोंद असेल. ती ‘विध्वंसक’ असेल की ‘विधायक’ काय असायला आवडेल आपल्याला?

(इंडियन मेडिकल असोसिएशन,नाशिकच्या सहकार्याने)

डॉ अंजली औटी

mindmatteraa@gmail.com




रविवार, २७ मार्च, २०२२

गरज आहे 'सुरक्षित' राहण्याची..

गरज आहे 'सुरक्षित' राहण्याची..


फेसबुकवरच्या विषयांना,लोकांना कंटाळून तरुण पिढी इंस्टाग्रामकडे वळली याबद्दल अनभिज्ञ असलेल्या अनेकांना कसेही असले तरी इथेच करमते कारण त्यांच्यासाठी तोच कम्फर्ट झोन आहे. लोक म्हटले की करमणूक आली तशी भांडणे,वादविवाद देखील आले. अलिकडेच एका परंपरावादी पोस्टवर केलेल्या मुक्त, वैचारिक कॉमेंटसाठी एका स्त्रीला अनेकांनी कॉर्नर केले. आपला मुद्दा लोकांना पटवण्याच्या नादात ती त्या वादात निष्कारण गुंतत गेली. तिला दूषणे देण्यात,नावे ठेवण्यात काही स्त्रियाही सहभागी होत्या. तिच्या वॉलवरच्या इतर पोस्ट्स,फोटोज 'उथळ' ठरवून त्या स्त्रीच्या चारित्र्यापर्यंतही मंडळी पोहोचली. विषय भांडणांपर्यंत वाढल्याचा संबंधित महिलेला प्रचंड मनस्ताप झाला. 

अनेकांच्या मनोव्यापरांवर,जगण्यावर विपरित परिणाम करणारा सर्वात मोठा घटक आज सोशलमीडियाच आहे. लोकांच्या विचार,भावनांना चालना देणारा,अभिव्यक्तीची प्रेरणा देणारा. असमान्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारा. शाळकरी मुलामुलींपासून कोणत्याही वयाच्या आणि चरितार्थासाठी कोणतेही काम करणाऱ्या व्यक्तींना एकमेकांशी जोडणारा. विषयांचे ज्ञान आणि व्यासंग वाढवणारा. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला त्याची सोबत आहेच. 



कित्येक सामाजिक,राजकीय,पारंपरिक,

कौटुंबिक आणि अनेकदा वैयक्तिक अगदी "आज भाजी काय करू" पासून अनेक सांसारिक,खाजगी प्रॉब्लेमची चर्चाही यावर लोक बिनधास्त करतात. यामुळे प्रत्यक्ष जगणे सोपे होणार असेल तर हरकत नाही. पण कित्येकदा इतरांच्या प्रतिक्रियांमुळे मूळ प्रश्नाला फाटे फुटलेले दिसतात. विषय सोडून लोक टीका आणि टिंगलटवाळीकडे झुकतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या चढाओढीत विषयांचे गांभीर्य निसटून जाते. परखड,प्रतिकूल प्रतिक्रिया केवळ विषयापुरती मर्यादित असू शकते, हा मोकळेपणा उरत नाही. लोक व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपात अडकतात. 

मनातला एकटेपणा,अनिश्चितता यासाठी विरंगुळा म्हणून माध्यमे सहज उपलब्ध असतात. घराच्या सुरक्षित भितींमधून ऑनलाइन फेरफटक्याचे थ्रिल अनेकींना खुणावते. इतरांच्या खोट्या बोलण्याला,भूल-थापांना बळी पडून स्वतःच्या खाजगी गोष्टी,फोटो अनोळखी व्यक्तींशी शेअर करणाऱ्या आणि त्यानंतर आत्यंतिक मानसिक ताण,भीती,नैराश्येच्या चक्रात अडकणाऱ्या शालेय,कॉलेजवयीन मुली आणि महिलांची संख्या खरोखरच जास्त आहे.

एका संशोधनानुसार रोज जवळपास 40 टक्के लोक ऑनलाइन माध्यमांमधील हिंसेची शिकार होत असतात. यात महिला,मुलं आणि तृतीयपंथी मोठ्या प्रमाणात आहेत.

मानसिक ताण असह्य होऊन आपल्या आयुष्याचा शेवट करणारेही यात आहेत. 

माध्यमांचा वापर करणारे 73 टक्के लोक अशी हिंसा घडत असलेली बघणारे केवळ 'बघे' असतात. त्यांचा एक लाईकही अत्यंत धोकादायक ठरू शकतो.

फेसबुक,इन्स्टाग्राम,ट्विटर यावरच्या इन्स्टंट ज्ञानामुळे  "सगळ्याच विषयातले सगळेच कळते" असे अनेकांना वाटते. कोणताही विषय खोलवर जाऊन समजून घेण्यासाठी लागणारी कष्ट करण्याची तयारी आणि वेळ देण्याची मानसिकता नसते. सोशलमीडियाचा हा एक मोठा अडथळा सगळ्याच क्षेत्रात जाणवत असला तरी स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी अनेकांना याचाच आधार वाटतो. मग बहुतेकवेळा माहिती अनेक विषयांची पण परिपूर्ण ज्ञान मात्र एकाचेही नाही असे चित्र दिसते. 'पेशन्स कमी असणे' वृत्तीही सर्वत्र वाढतांना दिसते आहे. आक्रमकपणे व्यक्त झालं तरच आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचतं हा अनुभव आज सगळीकडे येतो आहे.

सोशलमीडियाचा वापर योग्य पद्धतीने, जबाबदारीने करणे कोणाला माहीत नाही?

खरं सांगायचं तर बहुतेकांना नाही!

केवळ सवय म्हणून,नोटिफिकेशनचा रेडडॉट अस्वस्थ करतो म्हणून लोकांचे स्टेटसचेक करणाऱ्यांना आपल्याला इंटरनेटचे व्यसन लागलेय मान्य नसते.

समाजकारण,राजकारण,अर्थकारण,देश-विदेशातील घडामोडी,वातावरण प्रत्येक  विषयावर आपले मत मांडायला हवेच याचा अट्टाहास कशाला? लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यातील प्रसंगही सार्वजनिक होतांना दिसतात. व्यक्तिस्वातंत्र्य संपून समूहात 'आपले','परके' गट तयार होतात. त्यातून प्रवास करणारा विशिष्ट समाजगट वैचारिकदृष्ट्या समृद्ध होण्याकडे नाही तर दिवसेंदिवस अधिकाधिक संकुचित होण्याकडे निघाला आहे.

यातल्या पुरुष आणि महिलांच्या प्रतिक्रिया वेगवेगळी मानसिकता दाखवतात.

धार्मिक,जातीय,राजकीय प्राधान्यक्रम घडवले जातात.

निकोप,निरीगी संवादाचे अनुभव मोजके असतात पण शाब्दिक चिमटे,बोचकारे पासून फटकारे आणि ताळतंत्र,भान सोडलेली भांडणे,मान-अपमान,रुसवे-फुगवे,तावातावाने अकाउंटच डिलिट करणे,पुन्हा परत येऊन त्याच चक्रात अडकणे यांचे नाट्य कमालीचे रंगलेले दिसते.

त्यात टार्गेट झालेल्या आणि केल्या गेलेल्या व्यक्ती कधीकधी आपल्या मानसिक सुरक्षिततेसाठी एखाद्या कंपूत,गटात असणे स्वीकारतात. कारण इथे मैत्रीबरोबर शत्रूत्त्वही सांभाळले,फुलवले,जोपासले जाते. 

विशिष्ट गटातील स्त्रियांचा सांभाळ, खास दखल,अवाजवी स्तुतीच्या प्रतिक्रिया लक्षात येण्यासारख्या असतात. त्यातून स्पर्धा, एकमेकांत कुरघोडी निर्माण होतात. गटातील सुमारदेखील विचारवंत बनतात ते याच लोकांच्या मदतीने. इतरांना मदतीचा हात देणे हे कौतुकास्पद नक्कीच पण त्याचवेळी गटाबाहेरचा सकस विचारही जाणीवपूर्वक दुर्लक्षिला जातो. टीका करून, नाहक वाद घालून नाकारला जातो. समविचारी एकत्र येतात. काहींना घरबसल्या भावभावनांचा असा तीव्र रोलरकॉस्टर किक देतो. कोणाच्या अवास्तव मानसिक गरजा त्यातून भागतही असतील पण अनेकांच्या मनोशारीरिक आजारांचे कारणही हेच असते. 

इथे एक गोष्ट आठवतेय,

मांजराची दहशत वाटणाऱ्या उंदराची दया येऊन एक जादूगार उंदराला मांजर बनवतो. पण काही दिवसांनी त्याच्या लक्षात येते की मांजराला कुत्र्याची भीती वाटतेय मग त्या उंदराचा कुत्रा होतो. आता कुत्र्याला बिबट्याची भीती वाटते, मग जादूगार उंदरालाच बिबट्या बनवतो. 'उंदीर आता सगळ्यात शक्तिमान' असं जादूगाराला वाटतंय तोवरच त्याच्या लक्षात येतं बिबट्या शिकऱ्याला,माणसांना घाबरतोय. शेवटी जादूगाराला समजतं की आपण उंदराला कोणीही बनवलं तरी त्याचं हृदय तर अखेर उंदराचंच असणार आहे! 

अशी भल्याभल्यांचं रूपांतर कशाकशात करणारी जादू सोशलमीडियाकडेही आहे. 

मग काय करायचं? ही माध्यमेच नाकारायची का? ते तर अशक्य आहे. पण मग निदान 'सुरक्षित वापर' करणे तर शक्य आहे?

आपलं मूळ म्हणजे हृदय,मेंदू माणसाचा आहे,हे कायम लक्षात ठेवायला हवं! 

माणूस का श्रेष्ठ तर त्याच्याकडेच स्वतःसाठी 'योग्य निवड' करण्याची क्षमता आहे. 

ती कशी समजेल? तर इतरांचे फोटो,पोस्ट्स बघतांना कळतनकळत त्यांच्या जगण्याशी आपण तुलना तर करत नाही ना यासाठी सतत जागरूक राहायला हवं. मनात येणारे विचार, सेल्फटॉक जाणीवपूर्वक तपासून बघायला हवा. 

इतरांना मिळणारी लोकप्रियता आणि लाईक्स आपली गुणवत्ता कमी किंवा जास्त करू शकत नाहीत. हे त्यासाठी असणाऱ्या 'अस्वस्थ' मनाला कधीतरी सांगायला हवं. 

एखाद्या पोस्टवरून किंवा प्रतिक्रियेवरून संपूर्ण व्यक्तीला महान बनवणे किंवा तिचा तिरस्कार करणे जितके आततायी तितकेच स्वतःला त्याबद्दल ग्रेट समजणेही धोकादायक आहे. आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातल्या कोणत्याही समस्येला जगातील दुसरा कोणीही कधीही तयार,रेडिमेड उत्तर देऊ शकणार नाही. कारण आपल्यापुढचे प्रश्नच वेगळे आहेत आणि त्यांची उत्तरेही आपली आपल्याच शोधावी लागणार आहेत. 

पोलिसाने पकडू नये म्हणून हेल्मेट घालायचे,बेल्ट लावायचा की आपल्या सुरक्षेसाठी? याचे प्रामाणिक उत्तर ज्यांना माहीत आहे त्यांना समाजमाध्यमांचा वापर सुरक्षितपणे का करायचा हेही नक्की समजेल.

© डॉ अंजली औटी.






मंगळवार, ८ जून, २०२१

#मानसआरोग्य डायरी 8

एकदा मनाने स्वीकारलं ना की काही दिवस,महिने, कदाचित अजून वर्षही हे असंच चालणार आहे की मग अचानक चष्म्यावरची धूळ पुसली गेल्यासारखं सगळं स्पष्ट दिसायला लागतं. 
जगण्याचा पुन्हा नव्याने विचार करायला हवा.
स्वतःच्या टिकून राहण्याच्या क्षमता वाढवण्यात सगळी जीवनऊर्जा वापरायला हवी.
रोजचा दिवस जसा उगवेल तसे आपण जगत जातो. आपल्यासाठी जगणं असतं फक्त पुढे पुढे जाणं. 
ध्यानी मनी नसतांना आपली अनेक माणसं निघून गेली अचानक, विचारही नसेल आला त्यांच्या मनात  की पुढचा पावसाळा,हिवाळा बघण्यासाठी असू आपण?

हे नुसतंच बघतोय आज आपल्या आजूबाजूला. मनातलं शहाणपण अजूनही डोळस होऊ नये?
भरभरून जगण्याचे क्षण जाणिवेतून पूर्ण निसटण्याआधीच जागं व्हायला हवंय.
जगण्याची मूल्य पुन्हा पुन्हा तपासायला हवीत.
कधीतरी आपणच संकुचित केलेल्या जाणिवेच्या कक्षा ओलांडून जगण्याकडे पुन्हा नव्याने बघायला हवं.  

माझीतरी पूर्ण ओळख आहे मला? जग जाऊदे पण माझ्या माणसांची तरी किमान?
जगात कुठे काय चाललंय हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे,असेलही.. पण माझ्याच माणसांची प्रेमाची भाषा अनोळखी,अपरिचित राहून?
माहीत आहे का मला, काय आवडतं 'तिला' मनापासून आणि 'त्याला' दिलखुलास आनंद कशात मिळतो हे?
इतर सगळ्यांची भाषा समजते आणि तिच्या स्वरातली केवळ कटकटच का कानावर पडावी?
त्याच्या हाकांसाठी मनाची कवाडे बंद का असावीत?

मनातल्या असमाधानाचे रस्ते बाहेरच्या दिशेने वळत जातात आणि 'हे हवं','ते हवं' यांच्या शोधात स्वतःला विसरायला होतं.
आयुष्याचे क्षण तेवढे भुरुभुरु निसटून जातायेत. 
निसटून जातं त्यातलं काहीच तर पुन्हा परत येत नाही.
अपयश,अवहेलना,असमाधान,दुःख हे समोर आलं की मनात नकोसेपण दाटून येतं.
'नकार'च जर मनभर घुमत असेल तर अजून काय होणार?
या भावना जाणवल्या की नाकारायच्या,आणखी त्यांचं काय करायचं हे कोणीच कसं कधी शिकवत नाही?
मला खूप राग येतो तो दुसरं कोणी आपल्याशी वाईट वागल्यावर.
वाईट वाटतं, ते दुसरा कोणी काही बोलला त्याचं.
जे काही आवडत नाही ते सगळं कायम दुसऱ्याच कोणामुळे.
ही दुसरी लोकं माझ्याशी प्रेमाने,आपुलकीने वागली तरच मला आवडेल, मग मी एकदम आनंदी. कोणी प्रश्न विचारायचे नाहीत,कोणी विरोध करायचा नाही,कोणी तक्रार करायची नाही. यापैकी काही केलं की माझं सगळंच बिघडणार. मला वैताग,राग,चिडचिड होणार.
का? याला मी नाही,दुसरे जबाबदार.

माझं वाटणं, माझ्या भावना माझ्या ताब्यात नाहीत? न आवडणारी परिस्थिती समोर आली तर तिला जीव तोडून विरोध करण्यात माझी सगळी शक्ती एकवटते. 
लहानपणापासूनच मनाला काही आवडलं नाही तर त्याचा सामना कसा करायचा हे का नाही सांगत कोणी आपल्याला?
त्यांनाच माहीत नसेल का ते?

आजूबाजूला असलेला निसर्ग निःशब्दपणे सांगत असतो अनेक गोष्टी. 
झाडांना,पक्षांना, प्राण्यांना तक्रारी करतांना, आरोप करतांना बघितलंय कोणी?
तुम्ही राहू दिलं तर ते तुमच्या आजूबाजूला आनंदात राहतात,नाही राहू दिलं तर निमूट बाजूला होतात. 
"अपेक्षा नाही" हे जगण्यातलं साधं,सोपं तत्त्वज्ञान त्यांना कोण समजावतं?
त्यांना जो परिस्थितीचा स्वीकार आपसूक जमतो, समजतो,तो आपल्याला कसा नाही?
आपल्या आनंदासाठी आपण इतरांवर अवलंबून का? 
परिस्थिती,संधी नेहमीच माझ्या मनाप्रमाणे,मला अनुकूल कशी असेल?
तशी ती नसेल तेव्हा संयमाने ती चांगली होण्याची वाट बघण्याचं आणि वाट बघतांना स्वतःची मानसिकता संभाळण्याचं,टिकून राहण्याचं कौशल्य माझं मला शिकायला हवं.
त्यासाठी माणसं वाचावी लागतील,निसर्ग समजून घ्यावा लागेल. प्रयत्नांनी दृष्टिकोन बदलावे लागतील. 
समोर दिसणारी प्रत्येक गोष्ट माणसं, परिस्थिती हे तिचं फक्त वरवरचं स्वरूप आहे.
माणसांच्या वागण्यामागे असलेलं त्यांचं मन आणि परिस्थितीच्या आत दडलेल्या कारणांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी विचार,भावना आणि कृतीत समतोल येईल इतका माझ्याच मनाचा शोध मला घ्यावा लागेल. 
आज कडक,न सोसवणारे,चटके देणारे ऊन असेल तर हेदेखील टिकणारे नाही..बदलणार आहे हा माझ्या मनातला विश्वास मला टिकवून ठेवायला हवा.
© डॉ अंजली औटी.
# मानसआरोग्य डायरी 8

रविवार, ६ जून, २०२१

चौकटीबाहेरची ऑनलाईन नाती...

चौकटीबाहेरची ऑनलाईन नाती...

फेसबुकवरच्या ओळखीतून सुरवात होऊन आता आम्हाला एकमेकांविषयी इतकी ओढ वाटतेय की गेल्या दोन महिन्यांपासून त्याने अचानक माझ्याशी बोलणं थांबवलंय याचा मला आता प्रचंड त्रास होतोय. तो ऑनलाईन इतरांशी बोलतोय हे जाणवते मग माझ्याशीच का नाही? माझं सगळंच बिघडलंय,खूप दडपण,भीती वाटतेय. या अस्वस्थतेचं उत्तर त्याच्याकडे नाही, तुझ्याचकडे आहे हे लक्षात येण्यासाठी तिच्या अस्वस्थ मनाला किती वेळ लागेल?
तिच्यासारखीच अजून एक, प्रत्यक्ष एकदाही न भेटलेल्या आपल्या व्हर्चुअल मित्राला त्याने पाठवलेल्या व्यक्तीजवळ एक लाख रुपये कॅश सहजतेने देते आणि यात तिला रिस्क नाही तर निरपेक्ष प्रेमाची खात्री वाटते.
यासारख्या समस्यांमधल्या स्त्रिया भाबड्या,अनुनभवी,अशिक्षित असतात का? अजिबातच नाहीत. पण तरीही जाणता-अजाणता अनेकींच्या आयुष्यात डोकावणारी व्हर्चुअल नात्यांमुळे त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यातला ताण वाढतांना दिसतोय.
भरपूर वेळ,श्रम आणि परीक्षा बघणाऱ्या खऱ्या नात्यांना न्याय देतांना मनात साचत गेलेले नकोसेपण,हतबलता,नकार,अवहेलना, भावनिक- मानसिक पोकळी या व्हर्चुअल नात्यांनी भरून निघते.
कधी केवळ वेळ चांगला जावा,विरंगुळा,चेंज मिळावा असेही अनेकींना वाटते.
वैचारिक देवाणघेवाण,मैत्रीचा हा ऑनलाईन अनुभव हवासा वाटतो. खऱ्या जगण्याला समांतर चालणारे आभासी जग आणि इतरांसोबत असलेले नातेसंबंध याचा मानसिक आधार वाटतो.
संवादाची सुरवात वैचारिक पातळीवर झाली तरी अनेकींच्या बाबतीत अशी नातीही आदिम शारीर प्रेरणांपर्यंतच येऊन पोहोचलेली दिसतात. 
आभासी जगातल्या स्त्री-पुरुषांच्या मनातल्या मूळ गरजा, इच्छा,आकांक्षा,वासना स्वप्नं,प्रेरणा खऱ्या असतात. सामाजिक दडपणातून किंवा हिंमत नसल्यामुळे लपवलेल्या,दाबून ठेवलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली की हमखास वर येतात. एकमेकांचे खाजगीपण जपण्याची हमी मिळाली की अत्यंत उत्कटतेने,मोकळेपणाने व्यक्त होणाऱ्या या भावनांमध्ये गैर काय? असाही युक्तिवाद लोक करतात. 
अनेकदा असे जाणवते की बहुतेक स्त्रियांची गरज मुख्यत्त्वे मोकळ्या मैत्रीची,सोबतीची असते. मैत्रिणींपेक्षा एखादा छानसा मित्रच तिला अधिक भावतो. कारण तो तिला उगीचच जज करत नाही, पावलोपावली टोकत, लेबल्स लावत नाही, तुलना,स्पर्धा यापलीकडे जाऊन तिला समजून घेऊ शकतो. स्त्रिया मनमोकळेपणाने असे नाते स्वीकारतांना दिसतात.
मनाचा ताबा घेणारी प्रेमासारखी प्रभावी भावना व्हर्चुअल जगात अधिक मोकळेपणाने व्यक्त केली जाते. जगण्याच्या संघर्षात 'प्रेम'अनुभवण्याचे निसटून गेलेल्या अनेकांना
आयुष्यात स्थैर्य आलं की एरवी लक्षातही न येणाऱ्या पोकळ्या जाणवायला लागतात. प्रेम ही मानवी मनाची अत्यंत मूलभूत गरज. आपल्यावर कोणीतरी प्रेम करावे किंवा आपण कोणावरतरी प्रेम करावे असे वाटण्यात वय हा मुद्दाच गौण ठरतो.
कोणत्याही वयात प्रेमात पडल्यावर व्यक्तीला सोळाव्या वर्षात आहोत असेच वाटते. प्रेमात फसण्यासाठी, अविवेकी वागण्यासाठीही वयाची अट नाही. एरवी अनुभवी, परिपक्व वाटणाऱ्या व्यक्तीही स्वतःच्या मनातल्या भावना ओळखण्यात,हाताळण्यात फसू,चुकू शकतात.
"दमलीस?" या एकाच शब्दावर अनेकींची सपशेल विकेट पडते. अजूनही आपण सुंदर,आकर्षक दिसतो, या सुखवणाऱ्या भावनेतही अडकायला होते. मनावर फिरलेले प्रेमाचे मोरपीस जगणे सुंदर,रंगीबेरंगी करून टाकते. त्यासाठी आभासी माध्यमांचा अत्यंत कल्पक वापर अनेकांकडून केला जातो. वयाच्या पस्तिशीनंतर काही कारणांनी मनातून एकट्या पडलेल्या स्त्रिया या भूल-भुलैय्यात जोरदार अडकतात. 
नवख्या,अनुनभवी स्त्रियांना तर हे संपूर्ण जगच मोहात पाडते. यातली मजा आणि थ्रिल अनुभवण्यासाठी पुढे जाण्याचा निर्णय मात्र त्यांचाच असतो.
सोशलमाध्यमांपासून सुरू झालेली मैत्री खाजगी होऊन आपली माहिती,नंबर,फोटो,व्हिडीओ यांचीही देवाणघेवाण होते. एरवी शारीरिक गरजेचा उच्चार, स्वीकार आणि उघड अपेक्षा करणे यासाठी समाज आणि परंपरांची बंधने व्यक्तींवर असतात. समाज म्हणून ती गरजेचीही आहेत परंतु बंधने, नियम जितके कठोर तितक्याच पळवाटाही मग शोधल्या जातात. आपल्या सामाजिक धारणेनुसार पकडला गेलेलाच गुन्हेगार ठरतो,आणि काही उघडकीस येत नाहीत तोपर्यंत सगळेच साव असतात,सगळीच कृत्ये नैतिक असतात.
एकमेकांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न केले जातात. अनेक दावे, छातीठोक विधाने केली जातात. मग या नाही तर त्या निमित्ताने बोलण्यातले वैचारिक विषय वैषयिक होत जातात. सेक्सविषयीच्या व्यक्तिगत आवडीनिवडींबद्दलही बोलले जाते.
सेक्सटिंगचा अनुभवही एकदम वेगळा,उत्तेजक वाटतो.
एकमेकांवरच्या विश्वासाची हमी कायम टिकली तर गुपचूप आणि स्वखुशीने इथे अनेक ऑनलाईन मनोव्यापार चालतात. 
प्रत्यक्षात काही करत नसल्यामुळे यात कोणाची फसवणूक,प्रतारणा नाही,असा मनाचा समज असतो.
कोणी आनंद कशातून मिळवावा, ही प्रत्येकाची अत्यंत वैयक्तिक गोष्ट. जोपर्यंत मर्यादा ओलांडली जाऊन कोणाला त्रास झाला नाही तर तो टिकतो सुद्धा. पण अनेक केसेसमध्ये ही मर्यादा ओलांडली जाते आणि व्हर्चुअल नात्यांमुळे प्रत्यक्ष आयुष्यात गोंधळ,
भांडणे,गुंतागुंत,समस्या निर्माण होतात. 
आभासी जगातील दुःख,वेदना तर काही आभासी नसतात, खऱ्याखुऱ्या असतात. तोंड दाबून सहन कराव्या लागतात. प्रत्यक्ष आणि आभासी मधला तोल सावरण्यापलिकडे गेला की मनाचा बांध वेडावाकडा फुटतो. त्यामुळे आत्यंतिक मानसिक,शारीरिक ताणाला सामोरे जावे लागून अनेकांना त्यातून सावरण्यासाठी वैद्यकीय मदत घ्यावी लागते. 
अनुभवी, शहाणी माणसे मोठ्या वयातही का फसतात? याची कारणेही वेगवेगळी असतात. 
एकच कारण मात्र सगळ्यांमध्ये समान दिसते ते म्हणजे करतांना सगळे कळत असले तरी वेळेवर ते वळत अजिबात नाही. म्हणून आपण फसलो असे कितीही म्हटले तरी तीदेखील स्वतःच स्वतःसाठी केलेली निवड होती,याचा विसर पडतो.
एखाद्याच्या मैत्रीआड असलेले छुपे हेतू अनेकींच्या लक्षात फसल्यावरच येतात. 
असे फसणे केवळ शारीरिकच नसते तर अनेक प्रकरणांमध्ये स्त्रिया स्वतःचे फार मानसिक अवमूल्यन करून घेतात. 
यातल्या प्रत्येक टप्प्यावर सावध राहणे आणि मागे फिरणे शक्य असते पण 'आभासी'मधली जबरदस्त किक मोहात पाडते. माणूस आपल्याच सवयींच्या जाळ्यात अडकतो,आवड व्यसनात बदलते.
प्रत्येकवेळी समोरच्या व्यक्तीचे हेतू वाईट,फसवण्याचेच असतात असेही नसते. 
मन भरल्यांनंतर त्यांनी फक्त सहजतेने गीअर चेंज केलेला असू शकतो. मूळ गरजच नात्यांचे वैविध्य असू शकते. कोणी आपल्याशी सतत बोलायलाच हवे यात अवास्तव मागणी आहे,हट्ट आहे.
अनेकांच्या आयुष्यात अनेक संघर्ष,वेदना असू शकतात. त्यांच्या गरजा त्याप्रमाणे बदलत जातात. म्हणून अमूक एक 'चांगले म्हणून नैतिक आणि अमूक एक 'वाईट' म्हणून अनैतिक असा ठोकळेबंद विचार ना लोकांच्या बाबतीत करता येत ना त्यांच्या वागण्याच्या बाबतीत करता येत. 
सगळे वाईट अनुभव फक्त स्त्रियांनाच येतात, असेही अजिबातच नाही. पण स्त्रिया यासारख्या अनुभवांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त भरडल्या जातात. स्त्रियांसाठी असलेली पारंपरिक सामाजिक चौकट अजूनही आखीव, पुरुषधार्जिणी आहे.
काही घडले तर पुरुष सहज सुटका करून घेतात आणि त्यातला दोष बऱ्याचदा स्त्रियांकडे येतो. स्त्रियांचे वागणे,बोलणे, दिसणे,कपडे घालणे यावर लगेचच टीकात्मक बोलले जाते. स्त्रियांचा अपमान,नुकसान झाले अशा प्रसंगातही दोष,वाभाडे अनेकदा तिचेच काढले जातात. 
खरंतर मुद्दा स्त्री आणि पुरुष किंवा स्त्री विरुद्ध पुरुष असा नसतोच,नाहीही.
मुद्दा आहे आपल्याच मनातल्या भावनांचे आणि विचारांचे योग्य नियोजन करू न शकण्याचा. विचार आणि कृती यांचे भान येण्यासाठी मनातला विवेक जागा हवा. 
स्वतःच्याच भावनांची योग्य जाण आणि भानही हवे. त्यांची पूर्तता करण्याचे रास्त पर्याय ओळखायला हवेत.
कारण आपली समज, बुद्धी वाढवणारे आणि अनुभवांच्या कक्षा विस्तारणारे अनुभव येथेही येऊ शकतात. आभासी जगही खऱ्या माणसांच्याच भावभावनांवर स्पंदणारे आहे. कधी इथे जीवलग मित्र-मैत्रिणी मिळतात तर कधी कोणतेही नाव नसलेले पण मैत्रीपलीकडचे भाव मनात उमलवणारे सुंदर,उस्फुर्त नातेही जोडले जाते. एकमेकांची स्पेस सांभाळून आधार,आनंद देण्याइतके ते समंजस आणि शहाणेही असू शकते. वैचारिक,भावनिक आणि मानसिक पोषण करण्याइतकी निरोगी, एकमेकांची वाढ करणाऱ्या चर्चा,संवाद त्यात घडू शकतो. मनाची माती सुदृढ,सुपीक, सक्षम बनत जाते. 
अशा नात्यांना मुद्दाम इतरांपासून लपून राहण्याची,खाजगीपण सांभाळण्याची गरज नसते आणि मुद्दाम स्वतःची जाहिरात करत मिरवण्याचीही गरज नसते. असं मैत्र,प्रेम असलेलं कोणी असणं आणि मिळणं हा आयुष्याकडून मिळालेला सगळ्यात अनमोल खजिना असू शकतो, पण तो मिळाला नाही तरी आपल्या आजूबाजूचे प्रत्यक्ष किंवा आभासी जग आणि त्यातली वेगवेगळ्या चेहऱ्या-मुखवट्यांनी वावरणारी माणसे ओळखण्याइतकी आधी आपण आपल्या स्वतःशीच मैत्री तरी नक्कीच करू शकतो?
© डॉ अंजली औटी.

मनःपूर्वक आभार दैनिक म.टा.'मैफल पुरवणी'

सोमवार, ३ मे, २०२१

# मानसआरोग्य डायरी 7

आपले शरीर काहीतरी बिनसले आहे याची सूचना अचूक देते.
करोनाची लक्षणे दिसल्यावर पाहिले 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे. लक्षण वेळेत ओळखणे हे लवकर बरे होण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.  
आपली लक्षणे नाकारणे,दुसऱ्याच कशाचे आहे असे समजणे,त्यावर स्वतःच घरगुती औषध घेणे,इतरांपासून लपवणे हे सगळं करून आपण स्वतःला खूप मोठ्या धोक्यात टाकतोय 
आणि आपल्यापासून इतरांना लागण होण्याची शक्यता याच दिवसांमध्ये सगळ्यात जास्त असते.
"एखादी क्रोसीन घेतली की बरं वाटेल" असं स्वतःच ठरवू नये.आजार वाढल्याशिवाय डॉक्टरांची गरज नाही, हा अनेकांचा समज असतो. नैसर्गिकपणे बरे होण्यासाठी शरीराला अवधी दिला पाहिजे हा विचार करोनाबाबतीत केला तर लक्षात ठेवा हा आजार दिवसागणिक उग्र रूप धारण करतो. थेट जीवाशी गाठ आहे.
मायनर लक्षणे आहेत म्हणून घरीच बसू नका.
लहानात लहान लक्षणेही दुर्लक्षित करू नये.

करोना इतर शारीरिक आजारांपेक्षा वेगळा आहे. पाहिले लक्षण दिसल्यावर लगेच त्यावर  उपचारांना सुरुवात नाही झाली तर ते विषाणू शरीरात दुप्पट वेगाने वाढत जातात. 
सुरवातीला पहिल्या दिवशी नाक,तोंड,घसा यांच्या आतल्या भागात असलेले विषाणू तिसऱ्या दिवशी श्वासनलिकेमार्गे फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकतात. 
करोनाचे पाहिले 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे.
डॉक्टरांचा ताबडतोब सल्ला घेणे महत्त्वाचे.
त्यांनी सांगितलेल्या टेस्ट करणे गरजेचे.
करोनावर उपचार करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांशिवाय इतर कोणतीही औषधे, सल्ला शक्यतो मनाने घेऊ नये. काही औषधे सोबत चालू शकतील.
केवळ घरगुती उपचारांनी करोना बरा होत नाही.
प्रत्येकाची immunity वेगळी असते आणि शरीराचा response ही वेगळा असतो. 
लक्षणेही वेगळी असू शकतात किंवा 
काहीही लक्षण नसतांना दुसऱ्या कारणासाठी केलेली टेस्ट कधी positive येऊ शकते.
तरीही डॉक्टरांच्या संपर्कात असावे. 
टेस्ट्स खोट्या positive आणल्या जातात. यात डॉक्टर आणि इतर यंत्रणा सामील आहेत हे सगळे पैसे मिळवण्यासाठी कोणी करतंय या भ्रमात मुळीच राहू नये,अंगाशी येईल.

डॉक्टरांना आता करोनाच्या लक्षणांचा चांगला अंदाज आल्यामुळे लक्षणं दिसल्यावर लगेच,कधी तर टेस्टचा रिझल्ट येण्यापूर्वीच डॉक्टर औषधे सुरू करतात ते पुढचे सगळे धोके टाळण्यासाठी.
तुमच्या भल्यासाठी.

 "डॉक्टर रिपोर्ट काय येतो बघू ना,मग ठरवू" हे म्हणणे म्हणजे आपणच आपल्या हाताने पायावर धोंडा पाडून घेणे आहे. त्यांचं न ऐकण्यात आपले भरून न येणारे नुकसान आहे.
जास्तीतजास्त काय होईल?
समजा तुमचा रिपोर्ट 'करोना नाही' असा आला तर तुमच्या पोटात तोपर्यंत औषधांचे एक किंवा दोन डोस गेलेले असतील. एकवेळ ते परवडले पण करोना लक्षणे वाढायला नको. 
कारण जर 'करोना आहे' म्हणून रिपोर्ट आला तर तोपर्यंत या औषधांची मदत विषाणूंची वाढ खूप मोठ्या प्रमाणात रोखते. ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आपल्याच निष्काळजीपणाने किंवा अज्ञाना मुळे चुकल्यामुळे अनेकांना आत्तापर्यंत त्याचा खूप जास्त त्रास भोगावा लागला आहे.

पाचव्या दिवशी ठरते आपला आजार वाढणार की आपल्याला बरे वाटणार.
पहिल्या 3 दिवसात काहीही कारणांनी आपण उपचार सुरू करायला उशीर केला तर साधारण 3,4 व 5 या दिवसांमध्ये करोना विषाणूंचा प्रवास फुफ्फुसापर्यंत होऊन न्यूमोनियाची लक्षणे म्हणजे खोकल्यात वाढ ,ढास, धाप लागणे, ताप 101पेक्षा जास्त वाढायला लागणे आणि रक्तातील CRP चे प्रमाण अचानक वाढणे असे काही झाले तर मात्र आपल्याला हॉस्पिटलला admit होऊनच उपचार घ्यावे लागतात. असे करणे टाळू नये. ज्यांना हे उपचार वेळेत मिळाले त्यांचा जीव वाचण्याची शक्यता पण खूप जास्त आहे. अनेकांनी हा अनुभव घेतलेला आहे.
ज्यांनी याला देखील उशीर केला किंवा इतर काही कारणांनी उदा.पूर्वीचे गंभीर आजार त्या लोकांचा या लढाईत दुर्दैवी अंत झाला.
योग्य आणि वेळेत उपचार घेतले तर अनेक पेशंटमध्ये 5 ते 7 दिवसानंतर लक्षणे कमी व्हायला सुरुवात होते.  काही कारणांनी Complications वाढायला लागली तरी याच दिवसानंतर वाढतात. म्हणून लक्षणांच्या बाबतीत सावध असावे.
करोना झाल्यावर पहिला,तिसरा आणि पाचवा आणि सातवा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत.
अशा कितीतरी घटना आपण आजपर्यंय अनुभवलेल्या आहेत. अनेक जवळच्या मित्रमंडळींनी, नातेवाईकांनी,ओळखीच्या अगदी तरुण लोकांनीही काही कारणांनी  treatment घ्यायला उशीर केल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये भर पडलेली आपण बघितलंय.
आपण आपल्या हाताने त्रासात भर घालतो, असे होऊ देऊ नये. आजार होणे आपल्या हातात नसते पण घाबरून न जाता योग्य उपचार करणे हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात असते.
वेळेत उपचार झाले तर हा आजार वेळेत आटोक्यात येतो हे मी स्वतः माझ्या मुलाच्या अनुभवातून सांगते आहे. त्याचे पाहिले लक्षण ताप हे होते. रात्री अडीच वाजता त्याला ताप आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच आमच्या सगळ्यांच्या टेस्टस केल्या आणि त्याचे रिपोर्ट्स मिळण्याआधीच सगळी औषधं तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू केलेली होती. रिपोर्ट दुसऱ्या दिवशी positive आला त्यावेळी त्याच्या पोटात औषधांचा तिसरा डोस गेलेला होता. 
त्यानंतर त्याला पुन्हा फारसा ताप आला नाही पण तिसऱ्या दिवशी थोडा खोकला यायला लागला, औषधे,Isolation आणि योग्य काळजी यामुळे तो खोकलाही फार वाढला नाही. मात्र  औषधांमुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढला आणि दोन्ही डोळे लाल झाले पण डोळ्यांच्या डॉक्टरांना व्यवस्थित फोटो काढून पाठवल्यावर त्यांनी दिलेल्या औषधांनी 2 दिवसात ती लक्षणे कमी झाली. 
दहा दिवसात करोनाची सगळी लक्षणं हळूहळू संपली. 14 व्या दिवशी तर सगळे काही नॉर्मल होते आणि isolation ही संपले.
त्यांनतर आलेला थोडा अशक्तपणा आता महिन्याभरात भरून येईल. 
आजार नीट समजून घेणे आणि वेळेवर अचूक निर्णय घेणे या गोष्टी आपल्या नक्की हातात आहेत. नुसतेच घाबरण्यापेक्षा आपण हे समजून घ्यायला हवे.
आजाराचं स्वरूप न समजता आपल्या मनाप्रमाणे वागणाऱ्या,निर्णय घेणाऱ्या लोकांचं कोणीही काहीही करू शकत नाही.
अजून सगळ्या लोकसंख्येचे लसीकरण झालेली नाही. त्यांनतर कदाचित आपल्याला करोना झाला तरी त्रास कमी होईल,निदान जीव जाणार नाही. पण तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी.
करोना झाल्यांनातर प्रत्येक क्षण आणि दिवस महत्त्वाचा आहे. 
वेळेत निदान,सकारात्मक मानसिकता आणि योग्य उपचार ही करोनातून वाचण्याची त्रिसूत्री आहे. लक्षात ठेवा, सावध तो सुखी.
© डॉ अंजली औटी.


शनिवार, १ मे, २०२१

आभासी दुनियेतल्या वास्तव भावना



आभासी दुनियेतल्या वास्तव भावना

फेसबुकवर तावातावाने एकमेकींशी भांडणाऱ्या त्या दोन स्त्रियांच्या भांडणात हळूहळू इतर अनेकांची गर्दी वाढली. काही हिचे समर्थक,काही तिचे. विषय काही फार मोठा नव्हता. कोणीतरी लिहिलेला मूळ लेख तर बाजूलाच राहिला आणि त्यावरच्या प्रतिक्रियांमध्ये भलत्या दोघींचीच जुंपली. बरं दोघीही आपापल्या क्षेत्रातल्या चांगल्या हुशार बायका. कोणीतरी मध्यस्थी करून शेवटी तो वाद मिटवला पण त्यानंतर दोघींमध्ये शीतयुद्ध सुरू झालं. सतत एकमेकींच्या विचारांवर, मतांवर केलेली कुरघोडी. काहींनी दुर्लक्ष केले,काहींनी मजा घेतली,काहींनी खिल्लीपण उडवली. पण त्या दोघी? त्यांची खुमखुमी कशानेच कमी झाली नाही. आता तर लोकांना सवय झाल्यासारखं झालंय.
हे सगळं आठवायचं कारण परवा एका श्रध्दांजलीच्या कॉमेंटमध्ये वाचलेली एक कॉमेंट.
या बाईंनी म्हणे जी स्त्री गेली तिला काही वर्षांपूर्वी झालेल्या भांडणांमुळे फेसबुकवर ब्लॉक केलं होतं. आज तिला त्याचा पश्चाताप होत होता जो ती जाहीरपणे सांगून स्वतःला तिची अपराधी वगैरे समजत होती. तिला श्रद्धांजली वाहता वाहता आता पब्लिक हिचीही खऱ्या खऱ्या आपुलकीने समजूत काढत होतं.
अंतरजालावरचं हे जग मायावी,भासमान आणि खोटं आहे असं कोणी कितीही म्हणो, इथे वावरणाऱ्या अनेकांच्या मनात दाटून येणाऱ्या वेगवेगळ्या भावनाही आभासी आहेत असं मात्र मुळीच म्हणता येणार नाही. यात स्त्रियांचं प्रमाण लक्षणीय असलं तरी पुरुषही काही मागे नाहीत.
विद्वान आणि शहाणीसुरती लोकं कसं काय गुंततात यात इतकं? आभासी विश्वातला मानसिक ताण असह्य होऊन मदत घ्यावी लागल्याची उदाहरणे अनेक आहेत.
खरे आयुष्य आणि आभासी विश्वातील स्वतःची प्रयत्नांनी उभी केलेली प्रतिमा यांच्यात अनेकांच्या बाबतीत अंतर्विरोध असू शकतो. 
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या मनातला सतत चाललेला सेल्फटॉक. प्रतिक्रिया कधी उघड तर कधी दडपलेली,दबलेली.

प्रत्यक्ष जगणे जास्त आव्हानांनी भरलेले आहे. त्यासाठी कधी क्षमतेपेक्षा जास्त ऊर्जा वापरावी लागते. त्यातच दमणूक होते. कुटुंब,नातेवाईक,समाज यात एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात स्वतःसाठी काही करायचे राहून जाते.
उत्सुकता आणि विरंगुळा,विसावा म्हणून वापरायला लागलेल्या सोशल मीडियात 'आपण खरेच कसे आहोत' हे इतरांना समजण्याची गरज नसते. आपली मतं आणि आवडीनिवडी सारख्या असलेल्या लोकांशी कुठल्याही मानसिक,भावनिक अपेक्षांशिवाय संवाद साधता येतो याचाच आधी मोठा रिलीफ वाटतो.  
प्रत्यक्ष आयुष्यातल्या व्यक्तींशी समोरासमोर सुसंवाद साधण्यापेक्षा ज्यांना आपण पूर्णपणे माहीत नाही अशा व्यक्तींशी संवाद साधणे आवडायला लागते.
अनेकांना लोकांच्या जजमेंट्सची, त्यांच्या टीकेची भीती मनात असते. त्यामानाने सोशलमीडियात चांगुलपणा टिकवून राहणे आणि वेगवेगळ्या लोकांशी मैत्री करणे सोपे जाते. माहितीही खूप मिळते आणि करमणूकही भरपूर होते.
हळूहळू रोजच्या संबंधांमधून आभासी विश्वातही समविचारी लोकांचे निरनिराळे गट तयार होतात आणि यात एकमेकांना सावरून घेत,मोठे करत मोठ्या गुण्यागोविंदाने एकत्र मजेत वेळ घालवता येतो. असेही कितीतरी गट इथे वावरत असतात. 
नुसतेच 'हे वाईट', 'ते वाईट' म्हणून चालणार नाहीत,नाहीतर कोल्ह्याला द्राक्ष आंबट,असे होते.  
एकटेपणाचा सोबती म्हणून आभासी विश्वातील मित्रमैत्रिणीचा आधार वाटतो, त्यांच्याशी रोज बोलण्याने समाधान मिळते. त्यातल्या मर्यादा माहीत असूनही काहीजण मिळेल त्यात समाधान शोधतात.
खरोखरच विवेकीपणे उपयोग करून घेतला तर ही वेगवेगळी सोशलमाध्यमे जगण्यातल्या आनंदाच्या आणि सुसंवादाच्या असंख्य शक्यता माणसांपुढे उभ्या करण्याची क्षमता बाळगून आहेत.
त्यातून किती घ्यायचे,काय घ्यायचे आणि किती प्रमाणात घ्यायचे हे प्रत्येकाने आपल्या गरजेच्या सीमारेषा आखून ठरवावे. ही लक्ष्मणरेषा बुद्धीला जरी लवकर समजली तरी अनेकांकडून आखलेली सीमा कधीतरी ओलांडली जाते कारण त्यांनाही पुढे धावणारा मोहक कांचनमृग दिसत असतो.

मग या आभासी जगात जाणवणाऱ्या भावना खऱ्या कशा? 
तर कांचनमृग जरी मायावी असला तरी त्याचा वाटणारा मोह ही भूल खऱ्या मनाला पडलेली असते. 
त्याला मिळवण्यासाठी केलेली धडपड,आगपाखड खरी असते. 
लोकं विशेषतः काही स्त्रिया यात जास्त अडकतात. त्यांचे स्वतःचे जगण्यातले अपुरेपण, येणाऱ्या अनुभवांबद्दल असमाधान,खदखद,दबलेल्या उर्मी त्यांना त्या दिशेने खेचत नेतात. 
तुलनेचा राक्षस मनावर राज्य करत असतोच.
"भला तेरी सारी मेरी सारीसे सफ़ेद कैसे?"याचा भुंगा त्यांना स्वस्थ बसू देत नाही.  मग कधीतरी अशी वेळ येते की सोशल माध्यमांवरील या सख्ख्या मैत्रिणी एकमेकांच्या वॉलकडे पाठ फिरवून एकमेकींनाच ब्लॉक करतात. इतक्यावरच हे थांबत नाही घडलेल्या गोष्टींबद्दलची जखम त्यांच्या मनात सतत ठसठसत राहू शकते.
आभासी विश्वातले पाच "अ"
म्हणजे अवास्तव विचार,अतिरंजित वर्णन, अविवेकी धारणा, अपूर्ण ज्ञान आणि अंतहीन स्पर्धा आपण ओळखू शकलो तर आपल्याला सीमारेषाही ओळखू येईल. त्यासाठी सगळ्यात आधी बदलायला हवा आपला दृष्टिकोन. आपले मूळ हेतू विसरले की माणसं असमाधानाच्या चक्रात अडकतात. बरोबरी करायला जातात. माझ्या फोटोवर,लिहिलेल्या मजकूरावर कमी लाईक्स आणि मी मात्र इतर सगळ्यांची दखल घ्यायची? मनात इर्षा,स्पर्धा निर्माण होते. दुर्लक्ष केल्यासारखे दाखवून लपूनछपून पहारा ठेवणे येते, त्यातून टोमणे मारणे होते,कान भरणे, भरवणे होते. रुसवे-फुगवे होतात. आणि इथल्या मैत्रीत कधी भांडणंदेखील होतात. त्यातून ब्लॉक केले जाते. 
समोरच्याला याचा काहीच पत्ताही नसतो. कारण मुळात इतरांचा तुमच्या काहीही वाटण्याशी संबंधच नसतो. 
या दुहेरी जगण्याचा ताण असह्य होऊन लोकं प्रत्यक्ष आयुष्यात बिथरल्यासारखी वागतात. कशातच चित्त न लागणं,वारंवार मोबाईल तपासून बघणं, उगीचच दडपण जाणवणं, काय खातो-पितो,करतोय याकडे लक्ष नसणं असे त्रास झाले की संपूर्ण घर अस्वस्थ होऊन जातं. कोणत्याच जगाशी जुळवून घेण्यात अपयशी ठरलेली लोकं एकटी,एकाकी होऊन जातात,जगण्याचा आनंद गमावून बसतात.
समस्या प्रत्यक्ष आयुष्यातली असो वा आभासी आयुष्यातली त्यातून बाहेर पडण्यासाठी सतत आपण स्वतःशी बोलत असलेली वाक्ये तपासून बघायला हवीत. मनातल्या अविवेकी धारणा आणि दृष्टिकोन तपासून बघायला हवेत. 
प्रत्यक्ष आणि आभासी यांचा अनुभव घेणारे मन पुरेसे सजग असेल तर तारतम्य बाळगून स्वतःच्या आनंदासाठी कधी कशाची निवड करण्याची हे आपले आपण ठरवू शकतो.
जगण्यातल्या रिकाम्या जागा नक्कीच भरायला हव्यात पण मायावी मृगजळामागे धावण्यात नाही तर स्वतःसाठी आनंदाच्या दिशांचा शोध घेण्यासाठी.
© डॉ अंजली औटी.
# महाराष्ट्र टाईम्स 'मैफल' पुरवणी

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

# मानसआरोग्य डायरी 6

एकवेळ मला काही झालं तरी चालेल पण घरातल्या इतर कोणालाच काहीही त्रास होऊ नये,असं उगीच आपलं आपल्या मनाला वाटत असतं. यामागे लॉजिक काय?
तर त्यांना आपल्याला काही होतंय हे पटकन समजणार नाही😎
खरंतर अगदी सहज गप्पांच्या ओघात घरातल्यांच्या शारीरिक,मानसिक स्वस्थतेबद्दल आपल्याला रोजच्या रोज विचारून खात्री करून घेता येईल. 
याउलट होतं काय की अतिकाळजीपोटी अनेकदा आपल्या नकळत त्यांना नुसत्या काळजी घेण्याविषयी सूचनाच दिल्या जातात,जाब विचारले जातात आणि तेही झाडाझडती घेतल्याच्या अविर्भावात. उदा. स्वच्छतेबद्दल, कुठे जाण्या-येण्याबद्दल.
ऐकणाऱ्याला कधीकधी त्या इतक्या त्रासदायक होतात आणि वैतागल्यासारखं होतं कारण आता वर्ष झालं त्यांनाही त्या ऐकून ऐकून😊
तुम्हाला वाटेल इतकं कानीकपाळी ओरडलं तरी कोणी ऐकतंय का?😠
पण एखादी गोष्ट वारंवार सांगितली की तिचं महत्त्व ऐकणाऱ्याकडून सहजच कमी होतं आणि कधी राग म्हणून किंवा बंडखोरीने सांगितले गेलेय त्यापेक्षा एकदम विरुद्ध वागण्याची प्रवृत्ती होते. त्यांच्या मनात सूचनांचा राग असतोच वर परिस्थितीवरचाही राग असतो.
ना मनासारखे बाहेर जाऊन खेळता येत,ना कोणाला भेटता येत. 
साधारण पंधरा वर्षापर्यंतची मुलं आणि साठी-सत्तरीच्या पुढची मंडळी यांना आता घरात अक्षरशः कोंडल्यासारखं झालं आहे.
एकतर इतरवेळी जास्तीतजास्त वेळ घराबाहेर असणारे मेंबर्स आता पूर्णवेळ घरातच आहेत. 
त्यामुळे कुठेकुठे एकमेकांच्या स्वभावाशी अतिसहवासातून घर्षण तयार होतेय. 
सगळ्यांनाच शांतता हवी, प्रायव्हसी हवी, आपल्या कामाच्या वापरासाठी फोन हवेत,लॅपटॉप हवेत. जागेची मुबलक उपलब्धता सगळ्यांकडे असेल असे नाही. म्हणून
मुलांनी शाळेच्या वेळेनंतरही दंगा,मस्ती करायची नाही कारण इतरांचं ऑफिस घरून सुरू आहे.
आजी-आबांच्या बेडरूममध्ये टीव्ही असेल तर मुलांचा मोर्चा थेट त्यांच्या वेळ आणि एकांतावर येतो. त्यांना तर ना दुपारी आराम मिळतोय ना सकाळ- संध्याकाळचा व्यायाम होतोय.
एकमेकांवर आरडाओरडा आणि रोजच्या नवीन तक्रारी यांनी सगळ्यांच वैतागायला झालंय. मुलांना वेगळी रूम असेल तर त्यांच्या
वाढलेल्या स्क्रिनटाईमचीही काळजी आहेच. 
बदलांकडे संधी म्हणून बघितलेल्या कुटुंबांचे अनुभव मात्र वेगळे आहेत.
त्यांनी गेले वर्षभर मिळालेल्या एकत्र वेळेचा चांगला उपयोग करून घेतलाय. अभ्यासाच्या,कामाच्या,एकत्र खेळायच्या इतकेच काय व्यायामाच्या वेळाही एकमेकांच्या संमतीने चपखल अनुरूप करून घेतल्या आहेत.
स्वभावात पुरेशी लवचिकता असेल तर इतर लोकंही पटकन तडजोड स्वीकारतात. कुटुंबात एकमेकांमध्ये समन्वय, सुसंवाद आणि संघटितपणा प्रयत्न आणि पेशन्सने आणावा लागतो.
आज पन्नाशीमध्ये असलेल्या पिढीने त्यांच्या काळातले सुट्टीतले अनेक बैठे खेळ मुलांना शिकवले. त्यातून मुलांना खेळण्यासाठी नावीन्य मिळाले म्हणून मुलं खुश आणि मोठ्यांनाही आपले लहानपण पुन्हा अनुभवल्याचा आनंद. शिवाय यात आजी-आजोबाही सहभागी झाले. सगळ्यांच्या मनावरचा ताण हलका झाला. 
घराचे गोकुळ व्हायला अशीही फक्त इच्छाशक्तीच तर लागते😊 
आपल्यालाही असे प्रयत्न जाणीवपूर्वक करायला काय हरकत आहे?
दिवसभरातल्या वेळात आपल्याला मिळालेल्या छोट्या-मोठ्या मोकळ्या वेळेच्या संधी अनेक कल्पक उपायांनी भरता येतील. सगळ्यांच्या मनावरचा ताण त्यामुळे नक्कीच कमी होण्यास मदत होईल.
सध्याच्या परिस्थितीबद्दल, अडचणींबद्दल तुम्ही मुलांशी जाणीवपूर्वक बोलता आहात ना?
कितीही लहान वयाचे मूल असेल तरी त्यांना समजेल अशा शब्दांत त्यांच्या शंकांना,प्रश्नांना उत्तरं द्यायला हवीत. तुम्ही सुखरूप रहाल आणि त्यांच्या सोबत आहात ही जाणीव वेळोवेळी त्यांना करून द्यायला हवी. काही झालेच तर वेळेत त्यावर उपाय करता येतात, हा विश्वास त्यांना द्या. कारण तुम्हाला काही झाले तर? या दडपणाचे न पेलवणारे ओझे त्यांच्या चिमुकल्या मनावर असू शकते.
तीच खात्री वृद्धांनाही द्यायला हवी. काही झाले तर आपल्याला आपली माणसं पुन्हा दिसणार का, या कहाण्यांचा न पेलवणारा ताण त्यांच्याही मनावर असू शकतो.
एकत्र मिळालेला वेळ लहानमोठ्या गोष्टींवरून एकमेकांशी भांडण्यात,तक्रारी करण्यात घालवला तर एकमेकांशी असलेल्या नात्यात सहज प्रेमाचा,
आणि सहजाणिवेचा हळूवार धागा नव्याने गुंफण्याची आयुष्याने दिलेली सुंदर संधी तुम्ही गमवाल आणि हाती उरेल फक्त आणि फक्त एकटेपणाचा ताण.
थोड्या जाणत्या,जबाबदार वयाच्या मुलांना समाजाप्रती असलेली जबाबदारी शिकवण्याची ही सुंदर संधी आहे. 
त्यांना सोबत घेऊन आपल्या परिसरात असलेल्या वृद्ध व्यक्तींना योग्य काळजी घेऊन मदत करणे,जीवनावश्यक गोष्टी,औषधे आणून देणे, त्यांना बरे नसेल तर डबा देणे, विचारपूस करणे यासारख्या आपल्या अनेक छोट्या मोठ्या वागण्याकडे आपली मुले बारकाईने बघत आहेत.
संस्कार शिकवून कधीच येत नसतात ते मोठ्यांच्या उदाहरणातून मुलं अचूकपणे उचलतात.
मोठ्यांचं एकमेकांशी बोलणं आणि वागणं यातून त्यांच्या जाणिवा एकतर घडत आहेत किंवा बिघडत आहेत,याचं भान या परिस्थितीत अधिक बाळगायला हवंय.
कोणतेही संकट कायमस्वरूपी टिकत नाही.
आयुष्य खूप सुंदर आणि जगण्यायोग्य आहे.
कळत्या मुलांशी या गोष्टी जाणीवपूर्वक बोलण्याची गरज आहे. 
आपले कुटुंब,समाज आणि निसर्ग यांची आज काळजी घेतली तर उद्याच्या संकटांची काळजी नसते. मानसिकदृष्ट्या सक्षम आणि निरोगी राहणे ही एका दिवसात साध्य होणारी गोष्ट नाही.
ती आर्थिक बचतीसारखी जाणीवपूर्वक करावी लागते. 
ज्यावेळी सर्वकाही सुरळीत सुरू असते तो काळ स्वतःला मानसिक,भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्याही सक्षम होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा असतो. 
संकटांचा सामना कसा करायचा असतो,
त्यासाठी लागणारे शारीरिक मानसिक बळ आपल्या आतच असते फक्त ते वापरायचे की नाही,कसे वापरायचे असते हे आजच्या आपल्या वागण्यातून मुलांना समजते आहे, म्हणून सावध!
© डॉ अंजली औटी.
# मानसआरोग्य डायरी 6


बुधवार, २८ एप्रिल, २०२१

# मानसआरोग्य डायरी 5

अनेक लोकांना ज्यावेळी आपल्या घरात सुरक्षित राहायला मिळतंय त्यावेळी देशभरातील अनेक डॉक्टर्स,सिस्टर्स,इतर मेडिकल स्टाफ,औषध विक्रेते आणि संपूर्ण मेडिकल विश्वाशी निगडित असलेले सगळे लोक गेले वर्षभरापेक्षा जास्त काळापासून किती मानसिक ताणातून जात आहेत आपल्याला कल्पना नाही.
केवळ काही तासांची शारीरिक विश्रांती,अपूर्ण झोप,खाण्याच्या अनियमित वेळा आणि हात,मेंदू यांना अखंड फक्त काम आणि कामच.
हॉस्पिटल्स क्षमतेपेक्षा जास्त भरलेली आहेत. संपूर्ण यंत्रणेवर कमालीचा ताण आहे. 
त्यात ओळखीचे,नातेवाईक,मित्रमंडळी यांचे सतत फोनवर फोन. कोणाला बेड हवाय,कोणाला सल्ला हवाय,कोणाला ऑक्सिजन हवाय,कोणाला vaccine हवीय.
रोज येणारे शंभरच्या वर कॉल्स. प्रत्येकाची काहीतरी अपेक्षा,मागणी. 
ती पूर्ण करता आली तर ठीक, नाही आली तर मनाला टोचणी.
कुटुंबातल्या माणसांसाठी वेळ नाही.
त्यांना आपल्यामुळे काही होणार नाही ना याची काळजी सतत मनात. मुलांना कुठे आहे vaccine चं संरक्षण?
घरी ना कोणाशी मनमोकळ्या गप्पा,ना एकत्र जेवण. घरी जायलाच रात्रीचे 11 वाजून जातायेत. 
तोपर्यंत सगळे झोपलेले, कसेबसे दोन घास खाऊन पडत नाही तोवर कोणी सिरीयस झाल्याचा किंवा गेल्याचा फोन. 
डोळ्याला डोळा लागणार कसा? झोप पूर्ण होत नाही,पुरेशी विश्रांती नाही. थोडावेळ स्वतःसाठी हवा आहे पण फोन बंद ठेवता येत नाही.
मनावर सगळ्याचा ताण येतोय.
शेवटी माणसंच आहेत ना ही सगळी मंडळी?
हॉस्पिटलपर्यंत आलेले बरेचसे पेशंट सिरीयस होऊनच आलेले असतात. 
कधीकधी इच्छा असूनही त्यांना आत पण घेता येत नाही. खूप प्रयत्न करून,काळजी घेऊनही डोळ्यादेखत पेशंट जातो आहे, तरुण लोकांनाही वाचवता येत नाहीये. त्यांनी थोडं वेळेत यायला हवं होतं, सगळ्याचा खूप त्रास होतो, दाखवता येत नाही, त्यावेळी कितीही वेळ मारून नेली तरी नातेवाईकांचा आक्रोश बघून त्यांच्या जागी आपल्या माणसांचे चेहेरे दिसायला लागतात.
त्यांनाही हताश,निराश वाटतंय.
आजूबाजूचं मृत्यूचं थैमान बघून प्रश्न पडले आहेत. खरंच कधी थांबणार आहे हे सगळं?
की अजून एखादी लाट येणार आहे?
थांबणार आहे की नाही?
अनिश्चिततेचं भय त्यांनाही वाटतंय. 
पण सांगणार कोणाला?
बोलणार कोणाशी?
माणसांच्या भावभावना आणि मर्यादा त्यांनाही आहेत हे लक्षात आहे ना आपल्या?
त्यांच्यासाठी थाळ्या बडवून त्यांना काहीही मदत होणार नाहीये. 
नुसतीच कोरडी कृतज्ञता पण नको.
त्यांना मदत करण्यासाठी आपण फक्त तीन गोष्टी कटाक्षाने करू शकतो.
सगळ्यात पहिली योग्य पद्धतीने घातलेला मास्क. मास्क वापरण्याच्या लोकांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. पहिल्या लाटेनंतर नावाला मास्क वापरणारे,गळ्यात बांधून फिरणारे,योग्य पद्धतीने मास्क न वापरणारे, मास्कच न वापरणारे लोक आपण बघितले. 
घरात,गाडीत मास्क काढून टाकला की तो कुठे ठेवतोय,त्याला कुठे हात लावतोय मग तेच हात नाकाला,तोंडाला लावतोय या गोष्टीही लोकांकडून नकळतच होतात.
घरातली वयस्कर मंडळी आणि लहान मुलं सगळ्यांची नजर चुकवून मास्क काढतात. 
गाडीत,विमानात अंधार झाला की मास्क काढून बसलेले लोक आहेत.
याचा अर्थ मास्क लावणे का गरजेचे आहे हे अजूनही समजलेलं नाही की आपल्याला जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत, हा समज आहे? म्हणजे नेमकं अज्ञान आहे की बेपर्वाई?
Social distancing करणारेही तसेच. पूर्ण काम होइपर्यंत लांबच बसलो होतो. फक्त नंतर एकत्र चहा प्यायला,नाष्टा केला. नाहीतर खूप दिवसांनी भेटलो म्ह्णून मग सेल्फी काढले. 
फक्त तितक्याच वेळ मास्क काढला..
बाकी कधीच काढत नाही,असे म्हणणारे लोक बघितले.
करोनाची लाट वाढण्यासाठी पुन्हापुन्हा येण्यासाठी आपला तर हातभार लागत नाहीये ना?
दुखणे अंगावर काढण्याची आपल्याला जुनी सवय आहे. आपल्याला होणारा त्रास आपोआप काही वेळानंतर कमी होईल असा समज मनात बाळगून खूप लोक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.

करोनाची टेस्ट positive आल्यावर तात्काळ औषधे घेतली तर आजार वाढण्याची शक्यता कमीतकमी आहे. 
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट vaccination बद्दल.
स्वतःला जास्तीतजास्त सुरक्षित करण्याचा तो एकमेव उपाय आहे. त्याने करोना झाला तरी त्याचा होणार त्रास खूप प्रमाणात कमी होतो हे लक्षात आलेले आहे. 
अजूनही काही लोक लस घ्यायला घाबरतात आणि टाळत आहेत. सर्वांनी लस घेतली तर लवकरात लवकर हे सगळं संपू शकेल.

मेडिकलविश्वाबाबतीत काही तक्रारी आणि काही ठिकाणी आर्थिक लुटालूट हे प्रकार खूप वाढले आहेत,हे मान्य. ही सामाजिक कीड या क्षेत्रातही वाढते आहेच.
पण त्या मोजक्या लोकांसाठी प्रामाणिकपणे आणि अथकपणे आपले काम करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना सरसकट संशयाच्या नजरेने जोखणे योग्य नव्हे. 
आज ते आहेत म्हणून आपण सगळे आहोत,हे ही सत्य आहे.
आपण आपली जबाबदारी ओळखून वागावे,इतकीच त्यांची इतर समाजाकडून अपेक्षा आहे. 
खरेतर ते त्यांच्यासाठी नाही,आपल्याला आपल्याच भल्याकरता करायचे आहे. 
कृतज्ञतेची ही छोटीशी पावतीच आपल्याला संकटातून बाहेर काढणार आहे.
© डॉ अंजली औटी.
# मानसआरोग्य डायरी 5

रविवार, २५ एप्रिल, २०२१

# मानसआरोग्य डायरी 4

 बसलेले आप्पा निवेदकाच्या प्रत्येक शब्दाला घुटके गिळत होते,ओठ थरथरत होते,डोळे विस्फारलेले.
बातम्या सुरू होत्या. निवेदकाच्या आवाजाची पातळी, वेग, स्वर,त्यात भर घालणारे पार्श्वसंगीत आणि अत्यंत गंभीर,दुर्दैवी बातमी. 
नाशिकच्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू. 
नाटकीय आवाजात वारंवार उच्चरलेली तीच ती वाक्ये आणि त्यात आणखी भर चित्रांची,व्हिडीओची.
नातेवाईकांचा आक्रोश बघून आप्पांना कसंतरीच व्हायला लागलं. घरातल्या कोणाच्यातरी लक्षात त्यांची ही अवस्था आली आणि ताबडतोब टीव्ही बंद झाला. पण कदाचित तोपर्यंत उशीर झाला होता,घडायचे ते नुकसान घडून गेले होते.
दुसऱ्याच दिवशी गेले वर्षभर चार भिंतींच्या आत  स्वतःला सुरक्षित ठेवलेले आणि करोना लसींचे दोन्ही डोस पूर्ण झालेले 60 वर्षांचे आप्पा घरात चालता चालता कोसळले. 
आपल्याला माहीत नसलेले असे आणखी किती आप्पा असतील?
माणसांवर नकारात्मक,वाईट गोष्टींचा परिणाम खूप लवकर आणि जास्त प्रमाणात का होतो?
आयुष्यातल्या सकारात्मक,चांगल्या गोष्टीं घडण्याचा वेग त्यामानाने इतका कमी कसा?
संवेदनशील मनात हा प्रश्न नक्की उमटतो.
असे होते कारण नकारात्मक गोष्टींचा हल्ला माणसावर अचानक होतो. आघात झेलण्यासाठी मनाची पूर्वतयारी नसते. 
त्यावेळी जाणवणाऱ्या नकारात्मक भावनांचा वेग आणि तीव्रता खूप जास्त असते. 
घटनेनंतर अनेक दिवसांनी अनुभवांची तीव्रता कमी झाली तरी त्या प्रसंगांची आठवण मात्र माणूस कधीही विसरत नाही. पुन्हा तसा अनुभव आला की माणूस त्यांच्याशी पटकन कनेक्ट होतो.
दुःखद काही बघून,ऐकून,वाचून आपल्या मनातल्या या आठवणींची केंद्रे लगेच जागी होतात. 
त्यातल्या तीव्रतेनुसार मेंदू आपण पूर्वी अनुभवलेल्या दुःखद प्रसंगांच्या चित्रांची,आवाजांची, संवेदनांची मालिकाच मन:चक्षूंपुढे उघडून देतो. 
चित्रपट,नाटक बघूनही आपल्या डोळ्यात पाणी येते कारण भावना आपल्या ओळखीच्या असतात. 
इतरांच्या दुःखाशी,त्रासाशी आणि नकारात्मक विचारांशी माणसे सहानुभूतीने आपल्या नकळत जोडली जातात.
काही माणसे भावनांवर पटकन नियंत्रण ठेऊ  शकतात तर काही अतिसंवेदनशील असल्यामुळे पुन्हा पुन्हा त्या प्रकारच्या विचारचक्रात अडकतात. 
इथूनपुढे असे होत असेल तर मेंदूतल्या अशा files उघडल्या गेल्या आहेत त्या ओळखा. सावधपणे त्या चटकन बंद करा. 
मनावरचा ताण वाढवणाऱ्या बातम्या ऐकायच्या की नाही,किती वेळ ऐकायच्या..लक्षात असू दे की टीव्हीचा रिमोट कायम आपल्याच हातात असतो. 
युद्ध,साथीचे,सांसर्गिक आजार,नैसर्गिक आपदा, अपघात अशा संकटात एकाचवेळी अनेक लोक अशा अनुभवातून जात असतात. 
दुःख, हतबलता,निराशा,अनिश्चितता यासारख्या नकारात्मक भावनांची तीव्रता जास्त असते. 
भीती आणि सुरक्षिततेची भावना या सगळ्यावर हावी होते. 
माणसे सारासार विचार करू शकतीलच असे नाही, कशावरही पटकन विश्वास ठेवतात.
प्रत्यक्ष आजाराने जितके नुकसान होणार नाही त्याच्या कितीतरी पट जास्त नुकसान अपूर्ण माहिती,अफवा आणि भीतीमुळे होत असते. 
सतत कानावर येणाऱ्या मृत्यूच्या, जवळची लोकं, नोकरी गमावण्याच्या, हॉस्पिटल्स मध्ये इंजेक्शन्स नसण्याच्या,ऑक्सिजन नसल्याच्या,बेड नसल्याच्या बातम्या भीतीत भर घालतात.  
त्यांच्यामुळे मनोधैर्य खचलेले लोक गंभीर परिणाम अनुभवतात आणि त्यांच्या गोष्टी अनुभवून आणखी काही लोक भीतीग्रस्त होतात. 
दुष्टचक्र फिरत राहते. 
मग वस्तुस्थिती खरीखरच अशीच नाहीये का?
संकट आहे ही वस्तुस्थिती नक्कीच आहे. 
अशावेळी सावध,चौकस असल्यामुळे आपल्यापर्यंत जे पोहोचते आहे त्याची शहानिशा करण्याचा संयम, विवेक बाळगला तर माहितीचा
वापर विनाकारण फोन करून एकमेकांची भीती वाढवण्यासाठी करणार की एकमेकांना मदत करण्यासाठी करणार, हा निर्णय घेण्याचा चॉईस आपल्या हातात आहे,हे लक्षात येईल.
करोना संकट आपल्यापर्यंत आलेच तर त्याचे शरीरातले पाहिले लक्षण ओळखण्यासाठी आपण ते ज्ञान वापरू.
कारण मनाच्या सैरभैर अवस्थेत अनेकांकडून ते दुर्लक्षित होतेय,असं लक्षात आलंय. 
लवकर उपचार, लवकर मात,हे करोनातून बाहेर पडण्याचे पाहिले सूत्र आहे.
आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने नकारात्मक गोष्टींपेक्षा आपल्या दैनंदिन जीवनात एकूणच आयुष्यात सकारात्मक,चांगल्या गोष्टी घडण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. 
मनातली नकारात्मकता आगीच्या वणव्यासारखी आहे..अवचित लागणारा,धुमसणारा,निरपराध अनेकांना भक्ष बनवणारा. 
वणवा लागू नये म्हणून आधीच काळजी घ्यायची असते. चुकून लागलाच तर विझवण्याची त्वरा करायची असते.
सकारात्मकता मात्र देवघरातल्या समईच्या  ज्योतीसारखी आहे. 
नियमित साधनेने प्रज्वलित ठेवावी लागते. 
मनाच्या गाभाऱ्यात मंद मंद तेवणारी असते.
स्निग्ध तेजाने मनातला अंधार उजळवून टाकते. चैतन्याची ऊब आणि उज्ज्वल भविष्याची ग्वाही देणारी असते.
आज स्वतः मधल्याच त्याच तेजोमय ज्योतीचे स्मरण करूया.
तिच्या असण्यावर विश्वास ठेवा.
आपल्या सगळ्यांचे एकत्रित प्रयत्न आपल्याला या संकटातून बाहेर पडायला मदत करतील.
आपणही करोनायुध्दातले लढवय्ये सेनानी बनू या..🙏😊
© डॉ अंजली औटी.



# मानसआरोग्य डायरी 3



मनात भीती असते,मला करोना झाला तर? 
माझ्यामुळे माझ्या घरातल्या कोणाला झाला आणि त्यांना काही झालं तर? त्यांच्या मृत्यूचे भय. माझे आईवडील,भाऊ बहीण, मुलं जे लांब राहतात त्यांना काही झालं तर?
माझ्या नोकरी,व्यवसाय याबद्दलच्या आर्थिक चिंता. 
याबद्दलची सत्यता, वस्तुस्थिती यावर संयमाने विचार न करताच आपली स्ट्रेसलेव्हल वाढत नाहीये ना?
आपल्या ओळखीचे,शेजारी,जवळचे रोज कोणीतरी संकटात असल्याच्या बातम्या सतत समोर येत आहेत. वारंवार बोलून ताण आणखी वाढतोय.
बोलणारा कदाचित मन हलकं करत असतो पण ऐकणारा? आपण नुसते ऐकत नाही. बातम्या सांगणारा आणि ऐकणारा दोघेही आपल्या सवयीनुसार ऐकलेले amplified करतात. 
आपल्या शत्रूवरदेखील वाईट वेळ येऊ नये अशी सदिच्छा बाळगणारे आपण स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या लोकांच्या बाबतीत अशी अनेक दिवाचित्रे,शक्यता आपल्या नकळत मनातल्या मनात रंगवत असतात.
आज करोनाची भीती असेल पण करोना नव्हता तेव्हा काळजी,चिंता आणि समस्या नव्हत्याच का? 
चिंता करण्याची आपल्या मनाला सवय तर नाही? एकदा तपासायला हवंय.
घरातून कोणी बाहेर निघालं, तर त्याचा accident तर होणार नाही? पहिल्यांदा हा विचार मनात येणारे अनेकजण आहेत. 
आपल्या जवळच्या लोकांबाबाबत इतका वाईट मनात येतो याचा अपराधभाव खूप जास्त असतो.
त्यातून भानावर येणे काहींना जमते. काही त्यात अडकतात, त्यात मानसिक व्याधींचे मूळ असू शकते. विचार असह्य होतात,सतत मनात येतात त्यावर मात करण्याचे अनेक मार्ग शोधले जातात.
त्यांचा उपयोग होण्यापेक्षा आणखी त्रास होऊ शकतो. अतिविचार टाळता येणे शक्य आहे,त्यासाठी मदत उपलब्ध असते. गरज असते वेळेत आपल्याला होणारा त्रास लक्षात येण्याची.
मानसिक अस्वस्थतेबद्दल कोणाजवळ विश्वासाने बोलता येईल,त्यावर चर्चा करता येईल असे वातावरण घरात, समाजात मिळायला हवे.
आपले हसे होईल म्ह्णून या गोष्टी लपवून ठेवल्या जातात. 
लहान मुलांच्या मनात अशा असुरक्षितता,भीती खूप जास्त असतात. त्या व्यक्तदेखील होत असतात. अनेकदा घरातले मोठे" शुभ बोल रे नाऱ्या" म्ह्णून त्याला फटकरतात. 
आपल्या आजूबाजूला असलेलं कोणी असं काही व्यक्त करत असेल तर सावध असा. 
ती संवादाची संधी आहे. त्यांची कारणे ऐका, समजून घ्या. त्यांना विश्वास द्या, सांगा की
आपल्या मनात येणाऱ्या सगळ्याच विचारांवर विश्वास ठेवण्याची गरज नसते. त्यात कचरा भरपूर असतो. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावायची असते.
आपल्या मनातले असे विचार ताबडतोब खरे होतील याची शक्यता शून्य असते.
शक्यता केवळ आपल्या डोक्याचे खोबरे होण्याचीच जास्त असते. विनाकारण ताण वाढतो.
आजच्या वातावरणात नकारात्मक विचार जास्त प्रमाणात मनात येतात, असं अनेकांचं म्हणणं आहे. 
तात्पुरता विचार झटकला जातो, थोडावेळ चांगला जातो आणि पुन्हा कशावरून तरी त्याच विचारांची साखळी मनात पुढे सुरू होते. दुसऱ्या एखाद्या चांगल्या कामासाठी वापरण्याचा खूप वेळ याच विचारात जातो. 
परिणाम? 
असुरक्षितता,भीती,मूड नसणे, दडपण.
दिवसातला किती वेळ?
शरीराने काम करत असते मन चोवीस तास यात अडकू शकते. 
एक मिनिट थांबा..
जरा स्वतःला तपासा.
आजपर्यंत आयुष्यात घडलेल्या सगळ्या
वाईट घटना आठवा. 
अगदी जाणीवपूर्वक आठवा. 
यात अपयश असेल, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असेल,प्रेमभंग असेल,नोकरी जाणे असेल,अपघात असेल..

प्रत्यक्ष प्रसंग घडत असतांना असलेली आपली मनस्थिती, वागणे आठवा.

लक्षात येईल की त्यातल्या बहुतेक वेळा आपण अत्यंत धीराने आणि संयमाने वागलेलो आहोत. वेळेवर अगदी योग्य निर्णय घेतलेले आहेत. कितीही वाईट वाटलं,दुःख झालं तरीही त्यावर मात केलेली आहे. 
काही काळानंतर त्यातूनही बाहेर पडलोय ते काहीतरी शिकूनच.
हे अगदी खरंय की कोणावरच वाईट वेळ येऊ नये पण आली तर?
आजही बघा ना जरा आजूबाजूला..
प्रत्यक्षात वाईट अनुभवातून जाणाऱ्या, झगडणाऱ्या लोकांकडे बघा.
कदाचित तुमच्या जवळचं कोणी त्यात असेल.
आत्ता या क्षणी त्यांच्या आणि तुमच्या मनात फक्त आणि फक्त त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं याचाच विचार नाही?
शारीरिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी मनाची सगळी शक्ती एकवटलेली नाही?
आपण आपले अगदी 100 टक्के देतोय.

हा आपल्यापैकी बहुतेकांचा अनुभव आहे की प्रत्यक्षात ज्यावेळी आपण संकटात सापडतो त्यावेळी बाकीचं सगळं विसरून सर्वशक्तीनिशी आपण त्यावर मात करतोच करतो.
हातपाय गाळून बसत नाही आणि त्यापासून पळूनही जात नाही.
स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा.
त्याच्यात परिस्थितीवर मात करण्याच्या सगळ्या क्षमता आहेत. 
माणूस तेव्हाच विचारांनी,भावनांनी मजबूत होतो ज्यावेळी तो जास्तीतजास्त कठीण काळावर,दुःखावर मात करतो. त्यातून बाहेर पडतो.
आपल्या प्रत्येकाने आयुष्यात संकटांचा अनुभव घेतलेला आहे.
मग जर सामना करण्याची शक्ती आपल्यात असेल तर आत्ता नुसत्याच
त्रासदायक विचारांनी ताण का वाढवायचा?
प्रत्यक्षात वेळ आली तर बघू पण आता व्यर्थ चिंतेची भर खरंच नको.
मनाला खात्री देऊया?  
त्याआधी अशी वेळ आपल्या कोणावरच येऊच नये म्हणून आज अधिक जबाबदारीने वागूया?
© डॉ अंजली औटी.
# मानसआरोग्य डायरी 3


गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

# मानसआरोग्य डायरी पान 2


मनाला सतत चांगल्या मोडवर कसं ठेवायचं?
मन आहे..त्यात वाईट विचार येणं natural नाही का? उलट आधी वाईटच विचार येतात. 
सगळ्यात जास्त बिघडवून,लाडावून आपण आपल्या मनाला ठेवतो.
काय हरकत आहे विचारांना थोडी शिस्त लावायला?
आजपर्यंत नाही लावली,ठीक आहे. आज, अगदी आत्तापासून सुरवात करूया.
कसं शिकायचं?...अनुभवांकडून.
वाईट विचार सतत मनात येत असतील तर आपल्याला कसं वाटतं?
मन नाराज असतं,भीती वाटत असते, जीव घाबरा होतो,धडधडायला लागतं, मनात आणखी विचार येतात. काय करावं समजत नाही. आजूबाजूने सतत काहीतरी वाईटच कानावर येतंय,कुठेच आशा दिसत नाहीये..
विचारांचा हा रस्ता आपण पकडला आहे हे ज्या क्षणी लक्षात येईल त्या क्षणी स्वतःला थांबवायचं.
कसं? आपल्याला सवयीचं आहे ते..
प्रत्यक्षात रस्त्यावर चालतांना अचानक खड्डा दिसला तर आपण काय करतो?
आपल्याकडून तो चुकवायचा जास्तीतजास्त प्रयत्न करतोच ना? की मुद्दाम त्यातून जातो?
नाही ना? 
कारण आपण पडतो,लागतं, खरचटतं, खड्ड्यात पाणी असेल तर आपले कपडे खराब होतात, हे अनुभवलेले असते आपण. आपण तर गाडीसुद्धा त्यापासून वाचवतो.
ते शिकण्यासाठी आपल्याला किती अनुभवांची गरज लागते? 
एका अनुभवातून गेलेलं पुरतं, हो ना?
तरीही नकळत किंवा नाईलाजाने अचानक पुन्हा खड्ड्यातून गेलो की आपण काय करतो? 
सावध होतो,नीट चालतो आणि पुढचे अनेक खड्डे चुकवतो.
अगदी तसंच मनाच्या बाबतीत पण सतत येणाऱ्या अनुभवांकडून शिकायचं आहे.
मनात स्वाभाविकपणे वाईट विचार आधी आले तरी त्यात अडकायचं नाही..
सावध व्हायचं..थांबायचं..मागच्या अनुभवात आपल्याला असं करणं जमलं नाही मग त्याचा परिणाम मन उदास,अस्वस्थ होण्यात झाला होता, हे बोलायचं आहे स्वतःशी. 
हे विचारांना शिस्त लावणं आहे, सातत्याने केलं तर जमणार देखील आहे.
आजूबाजूला वाईट गोष्टी घडत आहेत हे खरं आहे. त्या घडण्यात आपण जबाबदार असू नये हे मात्र आपण अगदी कटाक्षाने पाळायचं आहे.
प्रत्येकाने आपलं घर, जवळची माणसं सुरक्षित राहतील हा विचार आधी करायचा आहे.
समाजासाठी आपला खारीचा वाटा तो आहे, असं समजा.
आजपासून प्रयत्न करूया?
विचारांना शिस्त लावूया?
© डॉ अंजली औटी.
# मानसआरोग्य डायरी 2

(Photo: Internet)

बुधवार, २१ एप्रिल, २०२१

# मानसआरोग्य डायरी 1



आपल्या आजूबाजूला असलेल्या वातावरणाचा आपण कसा विचार करतोय?
परिस्थिती गंभीर आहेच.
तुमच्या मनात त्याबद्दल काय विचार आहेत?
परिस्थिती चांगली नाही याची जाणीव आहे म्हणून मी आधी स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेईन आणि मग माझ्या कुटुंबियांची,जवळच्या नातेवाईकांची,मित्रमंडळींची आणि नंतर आपले मदतीचे हे वर्तुळ कितीही वाढू शकेल.
हा झाला एक दृष्टिकोन

आणि दिवसेंदिवस सगळं मोठं कठीण होत चाललंय,सगळंच out of control जातंय, काहीच समजेनासं झालंय, सरकार,डॉक्टर,लोकं कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नाहीये,खऱ्या केसेस किती आणि काय कसं कळणार? हे सगळं कारस्थान आहे, यात नक्कीच अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. हॉस्पिटल मध्ये गेलेले चांगले चांगले लोकं मरतायेत.. काही खरं नाही. नकोसं झालंय सगळं..
हा झाला दुसरा दृष्टिकोन.

पहिल्या दृष्टिकोनात परिस्थितीचं गांभीर्य समजलेलं आहे तरीही मनात आशा आहे. 
भीती असली तरी मार्ग निघेल याची खात्री आहे.
काळजी घेणे आहे पण अतिरेकी चिंता नाही.
लोकांच्या मृत्यूच्या बातम्या समजल्याने येणारी अस्वस्थता आहे पण या गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत याची जाणीव आहे. 
स्वतःसाठी आणि इतरांसाठी काय करता येईल याचे पर्याय शोधण्याची इच्छा आहे.
म्हणून अशा लोकांना या परिस्थितीत सुद्धा मार्ग दिसतात. आपल्या आजूबाजूच्या वाईट घटनांमध्ये यांना चांगलं काहीतरी उठून दिसतं. अगदीच काही नाही तरी स्वतःपुरते योग्य पर्याय आपोआप मनात पहिल्यांदा येतात जसे
माझ्या एका छोट्याशा प्रयत्नाने मी आणि इतर सुरक्षित राहणार यातली जबाबदारी समजलेले लोक उगीचच घराबाहेर पडणार नाहीत. योग्य पद्धतीने मास्क वापरतील, उगीचच येताजाता परिस्थिती किती वाईट आहे या चर्चेत स्वतःची भर घालणार नाहीत. आपल्याकडून होणारी योग्य मदत करण्यासाठी तत्पर असतील.
या घरातल्या सगळ्यांच्या विशेषतः मुलांच्या  मनावर तुलनेने कमी ताण असेल.
एकत्र मिळालेल्या वेळात अभ्यास,काम,करमणूक यांचं नियोजन रोजच्या रोज केलं जाईल.
काळजी घेऊनही संकट आलंच तर त्यावर योग्य ती कृती करण्याचे भान जागृत असेल.

दुसऱ्या दृष्टिकोनाच्या लोकांना वाईट बातम्या अजून जास्त घाबरवतील,स्वतःला किंवा जवळच्या लोकांना नक्की काहीतरी होईल या भीतीचे दडपण मनावर असेल. कुठेही काहीही खुट्ट वाजलेलं यांना आधी समजेल कारण बातम्या आणि चर्चा ऐकल्या तरच आपल्याला सावध राहता येईल असे त्यांना वाटेल. कोणतंही काम करतांना आधी मनात येणारा विचार हा असेल. इंजेक्शन ची कमी,ऑक्सिजन नाही,हॉस्पिटलमध्ये जागा नाही अशावेळी मला काही होऊ नये म्हणून दिवसरात्र दडपण मनावर असेल. काढे,वाफ आणि जिथून कोठून माहिती मिळेल ते सगळे उपाय न चुकता पार पाडले जात असतील आणि अतिकाळजी घेऊनही चुकून काही झालं तर अनेकांना फोनाफोनी करतील,ओळखीचे डॉक्टर्सना शक्यतो admit करण्यासाठी गळ घालतील आणि घरीच राहून बरा होईल असं सांगितलं तरी यांचा जीव थाऱ्यावर नसेल. तर काही आपल्याला हॉस्पिटलमध्ये काही होऊ नये म्हणून नेमक्या वेळेवर योग्य उपाययोजना करायचं टाळतील.

आपली मानसिकता कोणत्या प्रकारात मोडते?
आत्ताच्या काळात कोणत्या दृष्टीकोनाची मदत होणार आहे हे बघितले तर त्यादृष्टिने मदत होण्यासाठी अजून काय काय करता येईल?
मार्ग काढूया
सोबत राहूया..
© डॉ अंजली औटी.

# मानसआरोग्य डायरी 








मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

मुलांना झालंय तरी काय?

तरुण मुलांच्या समस्या सांगणारे पालक बरेचदा घायकुतीला आलेले असतात. अविर्भावांमधून,बोलण्या वागण्यातून त्यांची अस्वस्थता जाणवत असते. मित्र,परिवार, टीचर्स यापैकी जमेल त्यांच्याकडून याबाबतीत मदत मिळवण्याचा प्रयत्न याआधी करून झालेला असतो. मुलांच्या वागण्यासाठी दृश्यअदृश्य अनेक गोष्टींना जबाबदार धरून झालेलं असतं. पालकांचं म्हणणं, त्यांना होणारा त्रास आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांची चाललेली धडपड जाणवत असते. त्यांनी बळजबरीने आपल्यासोबत बसवलेल्या मुलांना समोरची व्यक्ती 'एकदाच'असे काही सांगेल की त्यामुळे अगदी जादू व्हावी तसे सगळेच त्रासातून ताबडतोब मुक्त होऊ,आपण आपले काम तर चोख केलेय असेही काहींना वाटत असते. अशावेळी मुलांआधी आपल्यालाच एकमेकांशी बोलायची गरज आहे, हे पालकांनी ऐकण्याच्या आणि संवादाच्या, समजण्याच्या पातळीवर येणं हा माझ्याही घडण्याचा प्रवास असतो.

मुलांचा साधारण वयोगट बारा ते बावीस मानला तर काय असतात पालकांच्या तक्रारी? 

आक्रमकता, उद्धटपणा, कोणतीही गोष्ट ऐकून न घेणं, स्वतःचं म्हणणं खरं करणं, खोटं बोलणं,वागणं.. कोणतीच गोष्ट शेअर न करणं, स्वतःचा अभ्यास, भविष्य करिअर याबाबतीत बेफिकिरीने वागणं, मित्र,मोबाईल  आणि मजा यातच मश्गूल असणं, घरापेक्षा घराबाहेर रमणं, बाहेरच खाणं,अस्थिरता, काही व्यसन आहे का असा संशय किंवा व्यसनांच्या आहारी जाणं. आपली मुलं आयुष्याबाबत आणि भविष्याबाबत कमालीची निष्काळजी आहेत आणि पुढे त्यांचं कसं होणार याविषयी पालक कमालीचे चिंताग्रस्त.

पालकांच्या तक्रारी नेमकं काय दाखवतात?

वर्तमानात जाणवणारा दृश्य परिणाम. 

कशाचा? 

मुलांच्या वय वर्षे एक पासून वय वर्षे बावीस,तेवीसपर्यंत येण्याच्या प्रवासात त्यांनी आपल्या आजूबाजूच्या जगाचे जे अनुभव घेतले, जे काही बघितले, ऐकले त्यातून त्यांनी स्वतःच्या अस्तित्वरक्षण आणि घडणीसाठी जे काही उचलले, घेतले, शिकले आणि स्वीकारले त्याचा. 

मग तो योग्य आहे का?

तर योग्य आणि अयोग्य असा निवडा करण्याऐवजी पालक म्हणून आपल्याला आधी काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. पालकांचं म्हणणं असतं, आम्हाला समजलंच नाही तो किंवा ती इतके कधी आणि कसे बदलले!

हो असं होऊ शकतं.. कारण मुलांना जन्म दिला की ती आपोआप वाढतील तशी वाढू द्यावीत त्यांना घडवण्यासाठी वेगळे काही प्रयत्न करण्याची काय गरज आहे? हा प्रश्न एका उच्चशिक्षित पालकाचा आहे.

अशी तर आपण आपल्या बागेतली झाडंपण नाही वाढू देत. त्यांची काळजी घेतो. जरा दुर्लक्ष केलं की झाडांच्या बरोबरीने वाढलेले तण दिसले तर आपण ते निसर्गाचे रक्षण करूया म्ह्णून तसेच ठेवतो का? कारण आपल्याला माहीत असते ते मूळ झाडाला उपद्रव देणारे आहे.

मग मुलांच्या विचारांमध्ये होणारे बदल आपल्याला आधी का जाणवत नाहीत? कारण कोणताच बदल एका रात्रीत होत नाही. ते जाणवत नाहीत कारण मुलांच्या मानसिक जडणघडणीच्या काळात पालकांच्या अतिव्यस्ततेमुळे त्यांच्यातला परस्पर संवाद कमी झालेला असतो. जिथे तो असतो तिथे वेळीच गोष्टी लक्षात येतात आणि त्यावर मार्ग, पर्याय शोधता येतात पण काही घरांमध्ये पालकांच्या लक्षात समस्या येते तोपर्यंत मुलांच्या मनातल्या तणांचे वेडेवाकडे फोफावणारे साम्राज्य झालेले असते. एकमेकांमध्ये अडकलेल्या फांद्यांचे जाळे पसरलेले असते. तिथे ना प्रकाश पोहोचू शकत ना आवाज. शिकण्याच्या टप्प्यावर कधी त्याचे त्यालाच हे उमगले तर तो हे सगळे पार करून आपला मार्ग शोधू शकतो, मात्र सगळ्यांनाच असे जमत नाही. काही त्या अंधारात हरवतात. तर काहींना बाहेर येण्यासाठी मदत लागते. मुलांची गरज वेळेत ओळखणे आणि ती स्वीकारण्याची मानसिकता तयार करणे हा त्यादृष्टीने पालकांचा पहिला प्रयत्न असू शकतो. 



मग लक्षात येते आधी स्वतःलाच बदलायला हवे आहे आणि तसे ते सोपे नाही. पालक म्ह्णून असलेला निसर्गतः मिळालेला वरचा दर्जा आता मुलं अजिबातच जुमानत नाहीत म्ह्णून होणारा आपला तिळपापड कंट्रोल करता येत नाही मग आपण जाता येता मुलाला शाब्दिक शेरेबाजी करतो,वाट्टेल ते बोलतो हे 'मान्य'करणाऱ्या पालकांनी संवादाच्या दिशेने पाहिले पाऊल तरी टाकलेले असते.

आक्रमकता,बेफिकिरी,उद्धटपणा ही समस्येची केवळ दृश्य लक्षणे आहेत. प्रत्यक्ष संवादात त्याच्या मुळाशी काय काय सापडले माहीत आहे?

कमालीची असुरक्षितता,अनिश्चित भविष्याची भीती, आपली तसेच कुटुंबातल्या लोकांची टोकाची काळजी,रोजच्या त्याच त्या आयुष्याचा कंटाळा, परिस्थितीबद्दलची हतबलता, घरातल्या लोकांच्या प्रतिक्रियांचा राग, स्वतःच्या भावना समजण्यात आणि हाताळण्यात आलेले अपयश, काहीच नको अशी टोकाची निरिच्छ उदासीनता.. 

आक्रमकतेच्या मुळाशी भीती असू शकेल, बेफिकिर वागण्यामागे घाबरणारे,कमकुवत मन आहे हे समजल्यावर पालकांना खजील वाटले पण आपली योग्य भूमिका काय असायला हवी यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा तर त्यातून मिळाली.

कुंभार मातीचे मडके मोठ्या कौशल्याने घडवतो, बाहेरून थापट्या मारल्या तरी आतला हात हळुवारपणे आधार देत असतो. त्याच्याकडे समज आहे, सजगता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी लागणारे कौशल्य त्याच्याकडे निर्विवाद आहे. एक लक्षात आलं का?

याच्या बरोब्बर उलटे आपण करतो!

मुलांच्या सर्वांगीण वाढीमध्ये त्यांच्या मनाची सुदृढ,निकोप वाढ व्हायला हवी असेल तर आपल्या वागण्या बोलण्यातून आणि प्रत्यक्ष सहवासातून त्यांची ती गरज वेळेत भागवली जावी. 

पालकांकडे शिक्षण आहे,समज आहे,कौशल्यही भरपूर आहे पण संवादाकरता लागणारा पुरेसा वेळ मात्र नाही. 

म्हणून मग आपल्या मुलांना कधीही काहीही कमी पडू नये यासाठी पालक आपल्या जीवाचे रान करतात. मुलांचे मागण्या,हट्ट त्याने न मागताच तत्परतेने पुरवले जातात. आपले असे वागणे म्हणजेच प्रेम, कर्तव्य समजणारे पालक कमी नाहीत. आपण बाह्य आधार, प्रेम पुरवतो आणि आतून मात्र थापट्या मारत बसतो. 

पालक असणे नैसर्गिक देणगी असलीतरी ती एक जबाबदारी सुद्धा आहे. एकमेकांमधल्या घट्ट नात्यांची, प्रेमाची वीण दुहेरी असेल तर कदाचित ती आयुष्यातल्या कठीण प्रसंगातही सहजी उसवणार नाही आणि त्यातून निसटणाऱ्या आनंदाला ना पालक पारखे होतील ना मुलं. 

आपण पुरेसे संवेदनशील आणि जागरूक असू तर मुलांच्या भावनिक,मानसिक विश्वाची दारे आपल्यासाठी आनंदाने उघडायला मुलंही नक्की तयार होतील.

अनुभव घेऊन बघा,अजूनही वेळ गेलेली नाही.

© डॉ अंजली औटी.


(Photo Source: Google)



शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

रुजवू नवी दृष्टी...

 



रुजवू नवी दृष्टी...


नवरात्र आलंय आणि माझी पाळी नेमकी त्याच काळात आहे. सासूबाई म्हणतायेत गोळी घे, काय करू?” आमचं बोलणं संपल्यावर तिने अचानक विचारलं. “तुला काय वाटतं?” मी विचारलं. “नाहीच घेणार,पण खरंचआली तर?” तिच्या ‘नाही घेणार’ म्हणण्यातला मानसिक दबाव मला जाणवला. आजच्या,उच्चशिक्षित मुलीला स्वत:साठी योग्य काय हे माहीत आहेच तरीही नव्या नात्यांमध्ये सुरवातीलाच ताण नको अशी स्पष्टता तिला विचारांमध्ये हवी होती. अशी अतार्किक अपेक्षा करणारी व्यक्ती बऱ्याचदा स्त्रीच असली तरी तिच्याही संपूर्ण आयुष्यावर असलेला परंपरांचा पगडाच त्यामागे असतो. त्यामुळे सगळा राग तिच्यावरच काढता येईल, इतकी ती दोषी नाही. न पटणाऱ्या परंपरा, त्रासदायक आहेत, व्यक्ती नाही. कोणत्याही परिस्थितीत उत्तरांच्या एकापेक्षा अनेक शक्यता असतात. विरोधासाठी दुराग्रह,हट्ट,भांडण हे पर्याय सगळ्यात आधी आणि नेहमीच वापरले जातात. त्याने मुद्दा साध्य झाला तरी माणसं मात्र मनाने दुरावतात. आपलं शिक्षण, शहाणपण वापरून यापेक्षा वेगळं काय करता येईल? परंपरांबद्दल आपली मते, ग्रह,पूर्वग्रह बदलण्याचा विचार लोकंही सामंजस्याने करतील,असे काही पर्याय निघू शकतील का? हा विचार करतांना परंपरा बदलायच्या की त्यामागे असलेल्या बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी बदलण्याची, आग्रही भूमिका बदलण्याची गरज आहे? आपल्याच मनाला पटलेल्या गोष्टी आपण इतरांनाही सहज पटवून देऊ शकतो. म्हणून आधी त्यामागची स्पष्टता स्वत:लाच येणे गरजेचे आहे. मग जुन्या आणि नव्याची सांगड घालणे सहज शक्य होते.   

पूर्वीपेक्षा अनेक आघाड्यांवर आज सामाजिक, सांस्कृतिक वास्तव बदलले आहे. स्त्रियांना आपली जीवनपद्धती निवडण्याचे सामाजिक,आर्थिक स्वातंत्र्य आहे. आपल्या आयुष्याच्या विकासाचे मार्ग शोधण्याची आत्मनिर्भरता,स्वत्त्वाची जाणीव तिच्यात बऱ्याच प्रमाणात आहे. पण यापाठीमागे अनेक स्त्रियांच्या आयुष्यभराचा मोठा संघर्ष आणि सातत्याचा वारसाआहे. केवळ म्हणूनच आज अनेक शहरी, ग्रामीण स्त्रिया सक्षमपणे जगू शकतात. स्वत:बरोबरच समाजबदलासाठीही हातभार लावू शकतात.
आजच्या युगाचे हे खरे आव्हान समाज,कुटुंब आणि व्यक्ती यांच्या मानसिक बदलाचे आहे. स्त्रीचे व्यक्तिगत अवकाश जितके व्यापक तितका त्या आपल्या आजूबाजूचा परिसर समृद्ध करू शकतात. म्हणून "पुरुष विरुद्ध स्त्री" असा असलेला आजवरचा समज बदलून "पुरुष आणि स्त्री”यांच्या परस्परपूरक नात्याची गरज आजच्या युगाची आव्हाने पार पडण्यासाठी कुटुंबाला आहे. त्यांनी एकमेकांचा स्वीकार समानतेच्या पातळीवर करणे अपेक्षित असेल तर त्याची सुरवातही कुटुंबातूनच होऊ शकेल. कारण मुलगी आणि मुलगा दोघेही आपल्या कुटुंबातून जे मिळवतील त्यातूनच पुढे त्यांच्या भविष्यातल्या व्यक्त होण्याच्या पद्धती तयार होणार आहेत. स्त्री आपल्यापेक्षा दुय्यम आहे हे मुलांना आपल्याच घरातला अनुभव शिकवतो. आजूबाजूला हेच बघत,जाणवत मुलं मोठे होतात. जोपर्यंत पुरुष आणि त्याच्या सर्वार्थाने बरोबर असलेली स्त्री दोन्ही माणूसच आहेत,असे शिक्षण,संस्कार त्याला घरातूनच मिळत नाही तोपर्यंत तो तिला दुय्यमच समजत राहणार. आजही अनेक सुशिक्षित घरांमध्येदेखील मुलाला आणि मुलीला जाणीवपूर्वक वेगळ्या प्रकारे वाढवले जाते. “स्त्री"ची माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून स्वतंत्र गणना, बरोबरी समाजात मान्य होईल या पातळीवरचा मानसिक बदल कुटुंबात होणे आज अपेक्षित आहे. कारण तिला ‘माणूस’ म्हणून मान्य करायला समाज अजूनही तयार नाही. तिच्यासाठी जगण्याचे निकषच वेगळे आहेत. ती ज्या कुटुंबात जन्माला येते त्यातल्या मान्यतांप्रमाणे आणि पद्धतींप्रमाणे ते आहेत. पालकांकडूनच असा फरक केला जातो. याचे कारण स्त्री निसर्गतःच वेगळी आहे असे सांगितले जाते. पण स्त्रीमधले नैसर्गिक स्त्रीत्त्व हीचतर तिची ताकद आहे. या वेगळेपणातच तिच्या  सगळ्या क्षमता आहेत. केवळ ती ‘स्त्री’ आहे म्हणून असलेल्या मर्यादा नाहीत. पुरुषही निसर्गतः वेगळाच आहे पण ‘पुरुष’ असणे ही काही त्याची ‘गुणवत्ता’,‘दर्जा’ नाही. शरीरे वेगळी आहेत म्हणून त्यांच्या केवळ शारीरिक क्षमता वेगळ्या आहेत. या कारणासाठी स्त्रीच्या सर्वांगीण वाढीच्या संधी का मर्यादित असाव्यात? मानसिक,वैचारिक, बौद्धिक, तार्किक अशा अनेक बाजूंनी तर ती पुरुषांइतकीच सक्षम आहे. तिच्या जगण्याच्या नीतीमूल्यांबाबत परंपरेने बनवलेल्या फुटपट्टीनुसार वागायची फक्त तिच्यावरच  सक्ती का? इतरांच्या अपेक्षांच्या चौकटीत,ओझ्याखाली फक्त तिनेच का राहावे? स्वतःच्या क्षमता सिद्ध करण्यासाठी,स्वतःचे अनुभव स्वतः घेण्यासाठी स्त्री पुरुषाइतकीच सक्षम आहे. पण काय योग्य काय अयोग्य हे तिच्या मनावर इतके बिंबवलेले असते की हे ओझे झटकून टाकून आपले अस्तित्व टिकवण्यासाठीच तिला संघर्ष करावा लागतो. आपल्याला भविष्यातली इमारत पक्की हवी असेल तर कुटुंबातल्या व्यक्तींच्या मनात एकमेकांच्या क्षमतांचा,कौशल्यांचा आणि एकमेकांवरच्या विश्वासाचा पायाच मजबूत हवा. कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले नाते सुसंवादी आणि एकमेकांना सांभाळून घेणारे असेल तर मग कुटुंबातील आणि समाजातील पूर्वापार चालत आलेल्या अविवेकी धारणा, समजूती यांना पुरून उरण्याचे मानसिक धैर्य स्त्रीला मिळेल. या तकलादू चौकटी ओलांडून, आपण घेतलेले निर्णय स्वत: निभावून नेले तर तिला जगण्याचे समाधान मिळेल. कोणतीही चाकोरी मोडणे तसे सोपे कधीच नसते त्यासाठी खूप मोठे आत्मिक बळ लागते. म्हणूनच पूर्वी किंवा आजही आगळेवेगळे कर्तुत्त्व गाजवलेली स्त्री इतरांसाठी लगेच पूजनीय, जणू देवीच होऊन जाते. त्यावेळी तिच्या प्रवासातला सुरवातीचा टप्पा तिच्या हेतूंवर जहरी टीका करण्याचा,शंका घेण्याचा,तिचे पाय जमतील तसे आखडून ठेवण्याचाच होता हे सगळे सोयीस्करपणे विसरले जाते. एकतर अबला म्हणून तिला दाबून ठेवा नाहीतर सबला म्हणून तिची थेट पूजाच करा,अशी सवय आजवर समाजाला लागलेलीआहे. आपल्यावरील समाज संकेतांचे दडपलेपण दूर करण्यासाठी आपल्यापरीने धडपडणाऱ्या मध्यम मनोवृत्तीच्या इतर सगळ्या स्त्रियांना मग स्वतःच स्वतःसाठी उभे रहायला हवे. त्यांना एकमेकींचे अनुकरण करून जगण्याची गरज नाही. त्यांना आपले मत आहे,आवाज आहे. मुखवट्यांशिवाय असलेला खरा चेहरा आहे. स्वतःच्या समस्या नेमक्या समजून घेण्यासाठी त्यांना आपले विचार,संवेदना,भावना आणि जाणिवा स्पष्टपणे व्यक्त करता आल्या तर आपली मानसिक उर्जा एकमेकीना जोडण्यासाठी, संवाद, मंथन घडवून आणण्यासाठी त्या वापरू शकतील. सर्वसामान्य स्त्रीला विश्वासाने जगण्यासाठी स्वातंत्र्याचे मुक्त अवकाश जेव्हा तिच्या स्वत:च्या कुटुंबात आणि समाजात मिळेल तेव्हा खऱ्याअर्थाने स्त्रीशक्तीचा उत्सव साजरे करण्याची मानसिक,सामाजिक गरज संपेल,असे वाटते.

© डॉ.अंजली औटी


--

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

प्रश्नांना उत्तरेही असतात

 

 

प्रश्नांना उत्तरेही असतात

 

तुला काय सांगू, दिवसाचे सोळा सोळा तास ड्युटी करून घरी आले तर घरातल्या लोकांची तोंडं वाकडी. तुला माहितीये ना नोकरी करण्यावरून झालेलं महाभारत? आता तर घरात कोणाला करोना झाला तर तो माझ्याचमुळे होणार आहे, कारण मीच एकटी बाहेर जाते ना.” मैत्रिणीच्या बोलण्यातला वैताग,राग पोहोचत होताच, शिवाय तिच्या घरातले वातावरण, प्रत्येकाच्या मनावर आलेला ताण तोही समजत होता. “माणसं मुळातून वाईट नाहीयेत ग, पण संधी आहे तर आत्ताच राजीनामा दे म्हणून मागे लागले आहेत, काय करू?” अर्थात काय करायला हवंय हे तिचं तिलाही समजत होतंच पण बाहेर आणि घरात परिस्थितीमुळे निर्माण झालेला ताण ह्याक्षणीतरी तिला असह्य झाला होता. सध्याच्या परिस्थितीत जुन्या प्रश्नाने उचल घेतली होती. एका जबाबदारीच्या पोस्टवर काम करणाऱ्या आपल्या जवळच्या व्यक्तीला मनात निर्माण झालेल्या भीतीचा आधार घेऊन ऐन मोक्याच्या क्षणी घरातल्या लोकांनीच कॉर्नर केल्यावर तिने काय करायचं?

आठ वर्षांपासून एका सोसायटीत राहणारे आजी-आजोबा, कोणाशी कधी बोलले नाहीत. कोणाकडे कधी गेले नाहीत. त्यांच्याकडे येणारी फक्त त्यांची मुलगी आणि जावई. अचानक चेअरमनला फोन करून रडत सांगतातआमच्याकडे बघायला कोणी नाही, आम्ही खूप जास्त आजारी आहोत, आमची मुलगी येत नाही, आता आम्हाला फक्त आत्महत्याच पर्याय दिसतोयसगळी सोसायटी हादरते. करायचं काय? आजारी आहेत म्हणजे करोना तर नाही? मुलगीही येत नाही म्हणजे तसे असण्याची शक्यता. मुलगी का येत नाही तर म्हणे जावई तिला आता येऊ देत नाही. मुलगी वारंवार केलेले फोन कट करत राहते, करोनाचा संशय आणखी वाढतो. त्यांना धीर दिला जातो, काय करता येईल यावर विचार-विनिमय होतो. शेवटी जावयाच्या फोनवर मेसेज करून निरोप ठेवला जातो कीआम्हाला आलेल्या फोनमुळे आणि तुम्ही फोन उचलत नसल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला हलवण्यापूर्वी आम्ही पोलिसांची मदत घेण्याचा विचार करतोय आणि तुमचे नंबर पोलिसांना नाईलाजाने द्यावे लागत आहेतपुढच्या पाच मिनिटात जावयाचा फोन येतो आणि पुढची सूत्र पटापट हलतात. आजोबा म्हातारपणामुळे आजारी असतात आणि आजी त्यांचं एकटीने करून दमल्यामुळे त्रासलेल्या असतात. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झालेला ताण त्यांना या टोकाकडे घेऊन आलेला असतो

                  


आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीतून निर्माण झालेले अनेक लहान-मोठे प्रश्न,समस्या,ताण आणि त्यावर मार्ग शोधण्याची प्रत्येकाची आपल्यापरीने चाललेली धडपड असे सध्याचे सामाजिक,कौटुंबिक चित्र समजण्यासाठी ही दोन उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. अनेकांच्या आयुष्यात आधीचेच अनुत्तरित प्रश्न आहेत. गेल्या पाच-सहा महिन्यांमध्ये आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनेक लहानमोठ्या घडामोडी,बदल वेगाने घडत आहेत.आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीचा सामना करतांना आपण ना तिच्यापासून पळून जाऊ शकत, ना तिचा संपूर्ण प्रतिकार करणे आपल्या हातात आहे. मग हातात काय आहे? तर परिस्थितीशी जुळवून घेऊन आपल्या कुवतीप्रमाणे, जवळ असलेल्या कौशल्यांचा योग्य वापर करून मार्ग काढणे. प्रत्येकासमोरची आव्हाने,समस्या वेगळ्या असल्या तरी त्यासाठी आपल्या प्रत्येकाकडे असलेल्या आर्थिक,सामाजिक,व्यक्तिगत क्षमताही वेगवेगळ्या आहेत, मानसिकता वेगवेगळ्या आहेत. सगळ्या बाजूंनी निर्माण झालेला परिस्थितीमुळे असलेला हा  अनिश्चिततेचा ताण हाताळण्यासाठी नेमके काय करायचे याच्या जैविक,आदिमप्रेरणा आपल्या मेंदूत नक्कीच आहेत. सुरवातीची घाबरण्याची, अतिकाळजीची, जीव एकवटून गोळा केलेल्या उत्साहाने आणि शोधलेल्या कल्पक मार्गांनी एकमेकांना धीर देण्याची आणि घेण्याची जागा आता प्रत्यक्ष जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीने घेतली आहे. तरीही काहीजण अजूनही स्तंभित आहेत काही हतबल,अगतिक,असहाय होऊन टोकाची पावलं उचलत आहेत. आपण आणि आपल्या जवळच्या नात्यांचा विचार करणे, त्यांना प्राथमिकता देणे काहीवेळा स्वार्थाकडेही झुकल्यासारखे वाटतेय. तर अनेकजण स्वतःबरोबरच इतरांना मदत करण्यासाठी धडपडत आहेत. प्रत्येक दिवसाचे नव्याने व्यवस्थापन करतांना प्रत्येकाला वेगवेळ्या आघाड्यांवर काम करावे लागते आहे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावनिक,मानसिक,शारीरिक आव्हानांचे प्रश्न आता खऱ्याअर्थाने सामोरे आलेले आहेत. ते कोणा एकट्याचे नाहीत तर आपल्या सगळ्यांचे, संपूर्ण समाजाचे आहेत.

एकाच कुटुंबातल्या व्यक्ती सोडल्या तर एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवणं,स्पेस जपणं हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे, पण सतत एकमेकांसोबत राहून त्यांच्या मानसिक स्पेसवर तर आपल्याकडून अतिक्रमण होत नाहीये ना? हेदेखील समजून घ्यायला हवंय. कोणतीही गोष्टअतिझाली की येणारं नकोसेपण, परिस्थितीबद्दलची हताशा, अपरिहार्यता शेअर करण्यासाठी सध्या एकमेकांच्या प्रत्यक्ष समोर आहेत फक्त घरातली लोकं, मग मनात साचलेल्या गोष्टींचा निचरा करतांना होणारी भांडणं, कुरबुरी,ताणली गेलेली नाती, एकूणच आलेला उबग,कंटाळा,ताण,घुसमट याचं नेमकं काय करायचं हे न समजल्यामुळे शाब्दिक,मानसिक आणि काही ठिकाणी शारीरिक तोलही सुटतो आहे. आक्रमकता,हिंसा वाढते आहे. मनात उमटणाऱ्या अशा अस्वस्थतेची योग्य ती दखल वेळीच घेतली नाही तर मनावरचा ताण असह्य होऊन वागण्यावारचे नियंत्रण गमावून स्त्रियांवर, मुलांवर,वृद्ध व्यक्तींवर, काही ठिकाणी पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांच्या अनेक घटना सध्या समोर येत आहेत. परिस्थितीवर तर राग काढता येत नाहीये मग तो व्यक्तींवर, वस्तूंवर आणि अगदी स्वतःवरदेखील काढला जातोय. हा ताण कमी करण्यासाठी नेमके काय करायला हवे, हे समजून घेता येईल.आपल्या प्रत्येकाचे मन आणि शरीर निर्माण झालेल्या परिस्थितीशी अनुकूल राहण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यासाठी मनावर काहीप्रमाणात असलेला ताण हा मदत करणाराही असतो,मार्ग काढणारा आणि आवश्यक असणारा असतो. मग अतिरिक्त असलेला आणि अनावश्यक ताण वाढतो कसा? तर तो आपणच केलेल्या अतिविचारांनी वाढत जातो. ‘अनावश्यक ताण आहे हे कसे ओळखायचे? तर त्यामुळे आपल्याला कोणताही त्रास जाणवत असेल तर. वर सांगितलेल्या मैत्रिणीच्या घरातल्या लोकांनाआपल्याला करोना होईलअशी भीती वाटली तर तो आवश्यक ताण असेल कारण त्यामुळे करोना होऊ नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली जाईल, पण त्यांनातिच्यामुळे करोना होणारच आहेअसे वाटून त्यांच्याकडून तिच्यावर काही निर्णय घेण्यासाठी दबाव आणला जात आहे तिथे तोअनावश्यकताण तयार झाला. आजी-आजोबांच्या केसमध्ये त्यांना करोना झालाय या भीतीमुळे त्यांचा जावई ऐन त्यांच्या आजारपणात त्यांच्या मुलीला स्वतःच्या घरी जायला अडवतो आहे,हे वागणे अनावश्यक ताणाच्या प्रभावाखाली आहे. तर या प्रसंगामुळे कोणालाम्हातारे झाल्यावर आपली मुलं आपल्याशी अशी तर वागणार नाहीत ना?” असा मनात सतत उगीचच येणारा विचार अनावश्यक ताण आणि समस्या वाढवणारा असतो. अशावेळी मनातले विचार आणि भावना वेळीच तपासल्या नाहीत तर आपल्या वागण्यातून त्याचे प्रतिबिंब दिसायला लागते. प्रसंगानुरूप वेगवेगळे विचार मनात येणे स्वाभाविक आहे आणि त्यांना अनुसरून वाटणाऱ्या आणि एरवी आपण ज्यांना नकारात्मक समजतो त्या भावनादेखील नैसर्गिक आहेत. पण त्यांचं अधिक काळ मनात रेंगाळणं,आणखी भर घालून आपलं त्या जास्त काळ चघळणं यातून येणारा ताण हा त्या व्यक्तीचे आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या माणसांचे नुकसान करणारा असतो, नातेसंबंध बिघडवून आयुष्यातला आनंद घालवून टाकणारा असतो. व्यक्तीच्या सवयी,स्वभाव आणि व्यक्त होण्याचे मार्ग आणि दृष्टीकोन आपल्याबाजूने ताणात भर टाकत असतात. लहानपणापासून ज्या वातावरणात आपण वाढलो त्याचे, कुटुंब,समाज,शाळा,व्यवसाय अशा घटकांमधील विविध अनुभव,व्यक्तींचे प्रभाव त्यावर असतात. ते इतके सवयीचे होतात की त्यातून घडणारा तोचआपला मूळ स्वभावअसा समज करून घेऊन आपण ते स्वीकारलेले असतात. पण आता लक्षात आलेच असेल की कोणाचाही स्वभाव,वृत्ती या जन्मजात नसतात. मनावरच्या अनावश्यक ताणाचे 'नियमन' करता येते त्यासाठी स्वतःला प्रतिप्रश्न विचारून तो त्रासदायक का आहे हे समजून घेता येते, स्वतःचे स्वतःला करणे अशक्य होत असेल तर प्रत्येक पावलावर आपल्याला मदत उपलब्ध असते. घटनांचे,प्रसंगांचे आणि व्यक्तींचे मूल्यमापन करण्याचे अनेक विवेकी पर्याय, पद्धती उपलब्ध आहेत. त्रासदायक ताणातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणं ही एकदाच करून भागेल अशी गोष्ट नाही. तो आपल्या स्वभावातील सातत्याचा आणि सरावाचा भाग बनायला हवा. तर सवयी बदलतील आणि स्वभावही बदलेल. कारण आत्ता आपल्यासमोर असलेल्या परिस्थितीत जगण्याची आव्हाने कितीही कठीण आणि प्रखर असली आणि संकटांमुळे पुढचा रस्ता कितीही अंधुक,धूसर दिसत असला तरी  आपल्याच अंतर्विश्वात स्वतःमध्ये त्यासाठी अनुकूल बदल घडवून आणण्याच्या असंख्य क्षमतादेखील आहेत, हे विसरून कसे चालेल?

© डॉ अंजली औटी 

(फोटो : गुगल)

लेख : दै. म टा 'मैफल पुरवणी'