ती कुठून आली
आहे,कोणालाही माहीत नव्हतं. त्या भागात अचानक ती दिसायला लागली. वय झालेलं.
अंगावरच्या कपड्यांची शुद्ध नाही. शनीच्या मंदिराबाहेर अनेक भिकारी बसत. ही
त्यांच्यातलीच एक होऊन गेली. आजूबाजूने जाणाऱ्या लोकांचा या रेषेपलीकडे असलेल्या लोकांबरोबर
काहीही संबंध नसतो. रस्त्यावरच्या दुर्लक्षित, बेवारस प्राण्यांप्रमाणे
त्यांच्यादृष्टीने हे जीव. मानवी आयुष्य असलेल्या काहीजणांच्या आयुष्याचा रस्ता हा
असा इतका खडतर का? या प्रश्नाला उत्तर नाही. तिथे बसणाऱ्या नेहमीच्या लोकांना ती
आपली स्पर्धक वाटली. आणि आजूबाजूने वाहणाऱ्या गर्दीला आपली नजरही वळवावीशी वाटू
नये, अशी त्यांच्या माणुसकीला अनोळखी असलेली एक अडगळ वाटली केवळ.
आपल्या सगळ्यांसारखं
घर,माणसं,नातेवाईक असलेली एक स्त्री जगण्याच्या सृरक्षित,सुशिक्षित आणि समृद्ध
परिघाबाहेर कशी काय जाऊन पोहोचली? नेमके काय घडले आणि तिच्या आयुष्याची वाट तिथे जाऊन
पोहोचली? याची उत्तरं शोधायला गेलो तर हातात येतं माणसाच्या जगण्यातलं असं प्रखर
सत्य, ज्यात स्वार्थाशिवाय कशाचेच महत्त्व नाही.
होय,ती तिथूनच आली
होती, भरल्या घराचा उंबरठा ओलांडून!
‘आपले’, ‘सख्खे’ आणि
‘परके’ हे केवळ शब्द आहेत. त्यामागचे अनुभव त्या भावनांना जन्म देतात. आपल्याला
अनुभव कसे यावेत हे आपल्या हातात नसते पण त्यातले ‘आपण काय घ्यावे’ आणि ‘कसे
वागावे’ हे मात्र नक्कीच आपल्या हातात असते. माणसांच्या आयुष्यात प्रत्येक
टप्प्यावर महत्वाची असते ती केवळ ‘वेळ.’ त्यावेळेत स्वतःसाठी योग्य निवड करणे हे मात्र फक्त आणि फक्त त्याच्याच
हातात असते. आपण केलेली निवड आकार देत असते आपल्या आयुष्याला. तिच्या परिणामांवरून
मग ठरते की ती योग्य होती की अयोग्य.
दुर्दैवाने तिच्या
आयुष्यात असलेल्या ‘सख्ख्या’ नात्यांची सोबत मागेच सुटून गेली. मात्तृत्वाचे सुख
नशिबात नव्हते आणि सर्वांसमक्ष जोडलेले जीवाचे नातेदेखील एका वळणावर अचानक तिच्यापासून
दुरावले. तिच्या सांत्वनासाठी जमलेल्या नातेवाईकांच्या घोळक्यात माणुसकीच्या
संवेदना जीवंत असलेला एकही नव्हता. कोणाला किती जवळ करायचं,विश्वास ठेवायचा, याची
तिची निवड चुकली. भोळ्या चेहऱ्यांना आणि फसव्या बोलण्यावागण्याला ती फसली. आणि एक
दिवस असा उगवला की त्ती नेसत्या वस्त्रानिशी रस्त्यावर आली. असं वागून त्या
जवळच्या म्हणवणाऱ्या लोकांनी काय मिळवलं? या प्रश्नालाही उत्तर नसते.
आता तिच्यापुढे प्रश्न
होता, जगायचं कसं? मुलभूत गरजांसाठी सुद्धा संघर्ष. तिच्यापरीने तिने तो केलाही. याआधीच्या
आयुष्यात ऐश्वर्य,श्रीमंती,पैसा आपल्यासोबत काय घेऊन येतो,याचा अनुभव तिचा घेऊन
झाला होता. आता साधेपणाचं जगणं तिने स्वीकारलं. ओळखीच्या लोक,जागा,वस्तू यांचे मानसिक पाश मागे सोडून ती मनाने दूर निघून आली.
त्याबरोबर तिथेच सोडून दिलं मनातलं वाईट वाटणं, खेद,खंत,पश्चाताप. लोकं जे वागले
ती त्यांची करणी होती, ती त्यांच्याच सोबत ठेवायला हवी. आपण त्यांचा विचार केला तर
ती आपल्याही सोबत येईल, याची सुज्ञ समज तिच्या मनात होती. निर्लेप मनाने आणि
शरीराने ती पुन्हा नव्याने जन्म झाल्यासारखी शून्यापासून परत पुढे निघाली.
पण आता आयुष्याच्या
उमेदीचा काळ नव्हता, उतरणीचा होता. तिच्याकडे शिक्षण नव्हतं पण दोन गोष्टी होत्या,
एक म्हणजे तिचा साधा आणि सरळ स्वभाव आणि दुसरा तिचा प्रामाणिकपणा. तिच्या सभ्य
दिसण्यावर विश्वास ठेऊन तिला काम मिळाले. तिला स्वतःपुरता निवाराही मिळाला,पण
आजूबाजूची वस्ती चांगली नव्हती. तिथे नको त्या लोकांना आणि त्यांच्या त्रासांना तिला
तोंड द्यावे लागले. पण त्यांच्यापासून शक्यतो अलिप्त राहायचे धोरण तिने ठेवले.
काही वर्ष सुरळीत गेली. मग आलेल्या डोळ्यांच्या आजारपणात कामही गेलं आणि पैसे
नाहीत म्हणून राहण्याची जागाही. ती पुन्हा रस्त्यावर. डोळ्यांनी अगदीच अस्पष्ट दिसायला लागले. आता एके ठिकाणी राहणे भाग होते.
एकाकी रस्त्यावर
असलेल्या तिला कोणीतरी त्या भागातल्या एका शनीच्या मंदिराबाहेर असलेल्या एका
ओट्यापर्यंत सोडले. तिथेच तिला भिकारी समजून लोकांनी पैसे द्यायला सुरवात केली. ती
निमूट राहिली. इथे एक आणखीनच वेगळे जग तिला सामोरे आले. या जगातल्या लोकांना
कोणताही विधिनिषेध नव्हता. जगण्याचे काहीही नियम नव्हते. इथे जो इतरांपेक्षा वरचढ
तो श्रेष्ठ. आलेल्या पैशांमध्ये त्यांचा वाटा आधी. तिच्यासमोर असलेल्या पैशांमधून
येत-जाता कोणीही अलगद पैसे उचलून नेई. तिला ते समजे पण कोणाला प्रतिकार करण्याचा
तिचा स्वभाव नव्हताच आणि आपल्यासाठी काही बाजूला ठेवण्याची आता तिला गरजही वाटत
नव्हती. आजूबाजूच्या लोकांना तिनेच स्वतःहून आपल्याजवळ दिवसभरात जमलेले पैसे दिले.
आपल्याजवळ आल्या-गेल्या प्रत्येकाला ती म्हणे, “ बाळा, आधी तू घे, तृप्त हो आणि मग
तुला मला द्यावंसं वाटलं तरच माझ्यासाठी ठेव.” कोणी सहजपणे तिला काही खायला आणून दिले तर ती
खात असे. अंगावरची साडी कधीच फाटून आता धुडकं झाली होती. कित्येक दिवसात अंघोळ न
केल्यामुळे धूळ आणि अस्वच्छतेचे तिच्या अंगावर थर जमा झाले होते. तिची ‘सभ्य’ओळख
कधीच संपूर्ण पुसली गेली. आता ती सुद्धा होती फक्त एक जीव. श्वास जोपर्यंत आहेत
तोपर्यंत जगणारा.
देह मळला,थकला. त्याची
तिला फिकीरही नव्हती. पण स्वतःशी असलेलं नातं मात्र ती विसरली नाही. तोंडी पाठ
असलेली एक प्रार्थना ती सतत म्हणे. काय होतं त्या प्रार्थनेत? स्वत:साठी केलेलं
एखादं मागणं? नाही, तर त्यात होती विश्वप्रार्थना..”देवा सगळ्याचं भलं कर.
सगळ्यांना सुखात ठेव.”
एके दिवशी तिची
विचारपूस करत कोणी तिच्या अगदी जवळ आलेलं तिला जाणवलं. अस्पष्ट नजरेला नुसतीच
आकृती दिसली. “आजी तुला काही त्रास आहे का? मी डॉक्टर आहे आणि तुम्हाला औषधं
द्यायला आलोय.” तिला आठवलं तिच्या शेजारी बसणाऱ्या कमलाची दाढ खूप दुखत असे, तिने त्यांना
तसं सांगितलं. डॉक्टर म्हणाले की, “कमलाला गोळ्या देतो, आजी तुलाही काही दुखत असेल
तर सांग, तुलाही फुकट गोळ्या देतो मी..”
असे म्हणणारा आणि आपल्याआधी
दुसऱ्याचा विचार करणाऱ्या आजीबद्दल कुतूहल जागं झालेला सहृदय, होता एका वेगळ्या
वाटेचा प्रवासी. काही वेडी माणसं रूढ वाटेनं जात नाहीत, अंत:प्रेरणेनं जगण्याची इतरांपेक्षा
वेगळी वाट निवडतात, जगाच्या दृष्टीने ते ‘वेड’च असतं,एकदाच मिळतो माणसाचा जन्म, जास्तीतजास्त
सुखं उपभोगायची, तर हे कुठलं खूळ? कारण सुखासुखी आपलं आयुष्य असं इतरांसाठी वाहून
घेणं,त्यांना समजत नाही.
तर ह्या माणसाला ध्यास
आहे उतारवयात भीक मागण्याची वेळ आलेल्या माणसांना पुन्हा माणुसकीच्या मुख्य
प्रवाहात घेऊन येण्याचा. पुण्यातील डॉक्टर अभिजित सोनावणे, आपली ओळखच ते ‘मी
भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर” अशी करून देतात.आयुष्यातला जास्तीत जास्त वेळ ते या कामासाठी
देतात. या लोकांवर उपचार करतांना ते हळूच त्यांच्याशी भावनिक संवाद साधून
त्यांच्या अशा जगण्यामागचं खरं कारण शोधतात. भीक मागणारे सगळेच खरे गरजू असतील असे
नाही, त्यातले केवळ १० टक्के लोक, अगदीच नाईलाजाने या मार्गाला लागलेले असतात.
काही मात्र सहज आणि विनाकष्ट उपलब्ध होणारा पैसा, म्हणूनदेखील या मार्गाला लागलेले
असतात. कसेही असो, पण उतारवयातील या लोकांचं प्रबोधन करून त्यांना भीक
मागण्यापासून डॉक्टर परावृत्त करतात आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून
घेण्यासाठी, काम मिळवून देण्याची जबाबदारी देखील ते घेतात. त्यांना करता येऊ शकतील
अशी कितीतरी लहानमोठी कामे डॉक्टरांनी आजवर त्यांना मिळवून दिलेली आहेत.
भीक मागणाऱ्या
व्यक्तीला भीक देऊ नका, कारण असे केल्याने मागण्याची वृत्ती वाढते,तुम्हाला शक्य
असेल तर त्यांना एखादे काम देऊन मग त्याचा मोबदला द्या, असे डॉक्टर सर्वाना आवर्जून
सांगतात.
अर्थात ते एकटे या
कामात नाहीत,त्यांच्यासोबत समविचारी लोकांचे एक कुटुंब आहे. या प्रवासात सगळ्यात
महत्वाची,मोलाची आणि खंबीर साथ त्यांना आहे त्यांच्या पत्नीची, डॉ.मनीषा सोनावणे
यांची.
आपल्या या आजीचा
स्वीकार त्यांनी कुटुंबाचा एक सदस्य म्हणून केला आहे. तिची कहाणी ऐकल्यानंतर
डॉक्टर तिला आपल्यासोबतच घेऊन आले. आजीचा संपूर्ण कायापालट झाल्यावर दिसणारी आजी
बघून सगळ्यांना आश्चर्य वाटले. आज आजीच्या डोळ्यांचे ऑपरेशन होऊन तिला
दिसायलादेखील लागले आहे.
अजूनही आजी तीच
विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणते. पण आता तिच्या डोक्यावर एक सुरक्षित छत आहे,
मायेने काळजी घेणारी लोकं आहेत आणि आपल्याला शक्य होईल ते काम करून सन्मानाने आपले
उरलेले दिवस घालवण्याचा विश्वास जपणारी कुटुंबाची समर्थ सोबत आहे.
तिला खात्री आहे आपला
हा ‘नातू’ आपल्याला कधीही अंतर देणार नाही. समाधानी तर ती त्या परिस्थितीत पण होती
पण आज तिच्याकडे ‘आपलं माणूस’ भेटल्याची कृतार्थ तृप्ती आहे.
तिच्या आयुष्यात
विसाव्याच्या या प्रेमळ क्षणांचा शिडकावा करणारे डॉक्टर आपल्यातलेच एक आहेत.
आपल्या हातातल्या मानवतेच्या इवल्याशा पणतीचा उजेड इतरांना देण्यासाठी अखंड
धडपडणारे. प्रकाशाचा अर्थ शोधायचा नसतो जगतांना, जाणीव ठेवायची त्याच्या
कर्तुत्वाची. कारण हे प्रकाशाचे कण आपल्याला स्पर्शून पुढे जातांना काहीही मागत
नाहीत आपल्याला,उलट खूप काही देऊन पुढे जात असतात त्यासाठी फक्त मनाचे डोळे उघडे
ठेवायचे असतात. कोणी सांगावे त्याने आपल्यासुद्धा मनाचा गाभारा कधीतरी लख्ख उजळेल
आणि त्यात आपलेही रूप स्वच्छ दिसू शकेल, आजीसारखेच! आणि आपल्या अगदी आजूबाजूला
दिसतील डॉक्टरांसारखी ‘खरी माणसे’ जी कधीच दीपस्तंभ झालेली आहेत. अज्ञात दु:खांच्या
वादळात निष्पाप माणसांचे माणूसपण हरवून जाऊ नये म्हणून!
© डॉ.
अंजली /अनन्या