मंगळवार, २४ एप्रिल, २०१८

मनोगत

नमस्कार,


‘सहज सोपं जगणं’ मी जो लेख लिहिला तो माझ्याआरसाया लेख मालिकेतील आहे.
हाआरसाकोणता?
याबद्दल तुम्हाला काही सांगायचंय..
यात गोष्टी आहेत तुमच्या, माझ्यासारख्या माणसांच्या!
त्यांना पडलेल्या प्रश्नांच्या,त्यांनी त्यातून शोधलेल्या उत्तरांच्या.
माझा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्ती चांगली असते. संपूर्ण वाईट, आणि  संपूर्ण चांगली असे वर्णन आपल्याला कोणत्याही व्यक्तीचे करता येणार नाही. वाईटातल्या वाईट वागणाऱ्या व्यक्तीत देखील काही चांगले गुण असू शकतात आणि चांगल्यातलं चांगलं वागणारी व्यक्ती देखील इतर कोणाच्या दृष्टीकोनातून वाईट वागलेली असू शकते.
म्हणून माणसांच्या वागण्याकडे फक्त काळ्या, पांढऱ्या रंगाच्या चष्म्यातून बघता त्यांना वेगळ्या दृष्टीकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा,असे मला वाटते.  
आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या परीने चांगले आयुष्य जगत असतो. तरी प्रत्येकाला जगतांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते..सगळ्यांच्या आयुष्यात खूप मोठे जगण्याचे आव्हान उभे राहील असे प्रसंग असतात असे नाही.
पण रोजच्या साध्या वाटणाऱ्या प्रसंगांमधून असे काही आव्हान उभे राहते की कधी कधी त्यातून मार्ग सापडत नाही.
आणि आपल्या सुंदर जगण्यात नकार,नकोसेपण,अवघडलेपण,चिंता,नैराश्य असे छुपे शत्रू आपल्याही नकळत शिरायला सुरवात होते. मानसिक ताण निर्माण व्हायला लागतो.
या माझ्या लेख मालिकेत मला माझ्या कामानिमित्त भेटलेल्या किंवा काही काही निमित्ताने माझ्याशी संपर्क आलेल्या अशा व्यक्तींचे अनुभव आहेत की ज्यातून त्यांनी स्वतःसाठी शोधलेले मार्ग किंवा त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनातून पुन्हा सावरलेले आणि सुंदर झालेले त्यांचे आयुष्य..यातले काही क्षण मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


हा आहेआरसा’                         


त्याचा एक गुणधर्म आहे..तो आपल्याला आपण जसे आहोत तसे आपले चित्र दाखवतो.
फक्त इतकेच नाही तर तो आपल्याला वर्तमानात असलेल्या फक्त त्या क्षणाचे आपले चित्र दाखवतो.
आरशात आपल्याला फक्त वर्तमान दिसू शकतो..भूतकाळ आणि भविष्यकाळ कधीही नाही.
आणि दुसरे असे की त्यापासून बाजूला गेले की तो पुन्हा स्वच्छ कोरा असतो..पुन्हा नवीन प्रतिबिंबासाठी तयार!

तसे आहेत या लेखातील अनुभव..फक्त त्या त्या प्रसंगातल्या व्यक्तींच्या त्या वेळच्या वागण्यापुरते मर्यादित.

अनुभवांचे हे प्रतिबिंब जसे घडले तसे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

हे सगळं लिहिण्याचा उद्देश हा की दुसऱ्यांच्या जीवन अनुभवांच्या प्रकाशात आपल्याला आपल्या आयुष्याची वाट चालत असतांना स्वच्छ दिसावी. समोर खड्डा असेल तर तो आधी दिसावा. खड्ड्यात पडून मग त्यातून वर येण्याचा अनुभव प्रत्येकाने वेगळा घ्यायची गरज नाही.
हे लेख तुमच्या आमच्या लोकांच्या आयुष्यातील अनुभवांचा संग्रह आहे. मी लिहिले असले तरी त्यात केवळ माझे शब्द आणि रचना आहे!

लोकांकडून पुन्हा लोकांकडे हा समजुतीचा प्रवास आहे. सगळ्यांच्या परवानगीने ते मला इथे द्यायला आवडतील.
तुमच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत आणि अनुभव सुद्धा..

माझा मेल मुद्दाम इथे देत आहे. गेल्या काही वर्षात सकारात्मक मानसिक आरोग्य या विषयावर काम करते आहे. प्रत्येकाला फार मोठ्या  समस्या असतील असे नाही. कधी कधी लहान प्रसंग पण अडचणी निर्माण करतात,मार्ग सापडत नाहीत. आणि कधी आपल्या सहवासात,कुटुंबात मानसिक दृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तींना सांभाळत असतांना आपलेही मन तणावाखाली असू शकते. अशावेळी ज्याच्याजवळ मन मोकळे करावे असे कोणीही नसते आणि कोणी असले तरी ती व्यक्ती काहीही लेबल लावता आपले म्हणणे ऐकून घेईलच याचीही कधी कधी खात्री वाटत नाही. त्यांच्यासाठी हे व्यासपीठ आहे. कोणाला आपल्या काहीही अडचणीबद्दल सांगायचे असेल तर व्यक्तिगत संपर्क करता यावा म्हणून.

अर्थात दखल फक्त प्रामाणिक हेतूंची घेतली जाईल.

तुम्हाला अनुभवांचे हे संकलन वाचायला आवडेल का?

मनापासून धन्यवाद!

डॉ.अंजली/अनन्या 
# आरसा 
 mindmatteraa@gmail.com