शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

रुजवू नवी दृष्टी...

 रुजवू नवी दृष्टी...


नवरात्र आलंय आणि माझी पाळी नेमकी त्याच काळात आहे. सासूबाई म्हणतायेत गोळी घे, काय करू?” आमचं बोलणं संपल्यावर तिने अचानक विचारलं. “तुला काय वाटतं?” मी विचारलं. “नाहीच घेणार,पण खरंचआली तर?” तिच्या ‘नाही घेणार’ म्हणण्यातला मानसिक दबाव मला जाणवला. आजच्या,उच्चशिक्षित मुलीला स्वत:साठी योग्य काय हे माहीत आहेच तरीही नव्या नात्यांमध्ये सुरवातीलाच ताण नको अशी स्पष्टता तिला विचारांमध्ये हवी होती. अशी अतार्किक अपेक्षा करणारी व्यक्ती बऱ्याचदा स्त्रीच असली तरी तिच्याही संपूर्ण आयुष्यावर असलेला परंपरांचा पगडाच त्यामागे असतो. त्यामुळे सगळा राग तिच्यावरच काढता येईल, इतकी ती दोषी नाही. न पटणाऱ्या परंपरा, त्रासदायक आहेत, व्यक्ती नाही. कोणत्याही परिस्थितीत उत्तरांच्या एकापेक्षा अनेक शक्यता असतात. विरोधासाठी दुराग्रह,हट्ट,भांडण हे पर्याय सगळ्यात आधी आणि नेहमीच वापरले जातात. त्याने मुद्दा साध्य झाला तरी माणसं मात्र मनाने दुरावतात. आपलं शिक्षण, शहाणपण वापरून यापेक्षा वेगळं काय करता येईल? परंपरांबद्दल आपली मते, ग्रह,पूर्वग्रह बदलण्याचा विचार लोकंही सामंजस्याने करतील,असे काही पर्याय निघू शकतील का? हा विचार करतांना परंपरा बदलायच्या की त्यामागे असलेल्या बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी बदलण्याची, आग्रही भूमिका बदलण्याची गरज आहे? आपल्याच मनाला पटलेल्या गोष्टी आपण इतरांनाही सहज पटवून देऊ शकतो. म्हणून आधी त्यामागची स्पष्टता स्वत:लाच येणे गरजेचे आहे. मग जुन्या आणि नव्याची सांगड घालणे सहज शक्य होते.   

पूर्वीपेक्षा अनेक आघाड्यांवर आज सामाजिक, सांस्कृतिक वास्तव बदलले आहे. स्त्रियांना आपली जीवनपद्धती निवडण्याचे सामाजिक,आर्थिक स्वातंत्र्य आहे. आपल्या आयुष्याच्या विकासाचे मार्ग शोधण्याची आत्मनिर्भरता,स्वत्त्वाची जाणीव तिच्यात बऱ्याच प्रमाणात आहे. पण यापाठीमागे अनेक स्त्रियांच्या आयुष्यभराचा मोठा संघर्ष आणि सातत्याचा वारसाआहे. केवळ म्हणूनच आज अनेक शहरी, ग्रामीण स्त्रिया सक्षमपणे जगू शकतात. स्वत:बरोबरच समाजबदलासाठीही हातभार लावू शकतात.
आजच्या युगाचे हे खरे आव्हान समाज,कुटुंब आणि व्यक्ती यांच्या मानसिक बदलाचे आहे. स्त्रीचे व्यक्तिगत अवकाश जितके व्यापक तितका त्या आपल्या आजूबाजूचा परिसर समृद्ध करू शकतात. म्हणून "पुरुष विरुद्ध स्त्री" असा असलेला आजवरचा समज बदलून "पुरुष आणि स्त्री”यांच्या परस्परपूरक नात्याची गरज आजच्या युगाची आव्हाने पार पडण्यासाठी कुटुंबाला आहे. त्यांनी एकमेकांचा स्वीकार समानतेच्या पातळीवर करणे अपेक्षित असेल तर त्याची सुरवातही कुटुंबातूनच होऊ शकेल. कारण मुलगी आणि मुलगा दोघेही आपल्या कुटुंबातून जे मिळवतील त्यातूनच पुढे त्यांच्या भविष्यातल्या व्यक्त होण्याच्या पद्धती तयार होणार आहेत. स्त्री आपल्यापेक्षा दुय्यम आहे हे मुलांना आपल्याच घरातला अनुभव शिकवतो. आजूबाजूला हेच बघत,जाणवत मुलं मोठे होतात. जोपर्यंत पुरुष आणि त्याच्या सर्वार्थाने बरोबर असलेली स्त्री दोन्ही माणूसच आहेत,असे शिक्षण,संस्कार त्याला घरातूनच मिळत नाही तोपर्यंत तो तिला दुय्यमच समजत राहणार. आजही अनेक सुशिक्षित घरांमध्येदेखील मुलाला आणि मुलीला जाणीवपूर्वक वेगळ्या प्रकारे वाढवले जाते. “स्त्री"ची माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून स्वतंत्र गणना, बरोबरी समाजात मान्य होईल या पातळीवरचा मानसिक बदल कुटुंबात होणे आज अपेक्षित आहे. कारण तिला ‘माणूस’ म्हणून मान्य करायला समाज अजूनही तयार नाही. तिच्यासाठी जगण्याचे निकषच वेगळे आहेत. ती ज्या कुटुंबात जन्माला येते त्यातल्या मान्यतांप्रमाणे आणि पद्धतींप्रमाणे ते आहेत. पालकांकडूनच असा फरक केला जातो. याचे कारण स्त्री निसर्गतःच वेगळी आहे असे सांगितले जाते. पण स्त्रीमधले नैसर्गिक स्त्रीत्त्व हीचतर तिची ताकद आहे. या वेगळेपणातच तिच्या  सगळ्या क्षमता आहेत. केवळ ती ‘स्त्री’ आहे म्हणून असलेल्या मर्यादा नाहीत. पुरुषही निसर्गतः वेगळाच आहे पण ‘पुरुष’ असणे ही काही त्याची ‘गुणवत्ता’,‘दर्जा’ नाही. शरीरे वेगळी आहेत म्हणून त्यांच्या केवळ शारीरिक क्षमता वेगळ्या आहेत. या कारणासाठी स्त्रीच्या सर्वांगीण वाढीच्या संधी का मर्यादित असाव्यात? मानसिक,वैचारिक, बौद्धिक, तार्किक अशा अनेक बाजूंनी तर ती पुरुषांइतकीच सक्षम आहे. तिच्या जगण्याच्या नीतीमूल्यांबाबत परंपरेने बनवलेल्या फुटपट्टीनुसार वागायची फक्त तिच्यावरच  सक्ती का? इतरांच्या अपेक्षांच्या चौकटीत,ओझ्याखाली फक्त तिनेच का राहावे? स्वतःच्या क्षमता सिद्ध करण्यासाठी,स्वतःचे अनुभव स्वतः घेण्यासाठी स्त्री पुरुषाइतकीच सक्षम आहे. पण काय योग्य काय अयोग्य हे तिच्या मनावर इतके बिंबवलेले असते की हे ओझे झटकून टाकून आपले अस्तित्व टिकवण्यासाठीच तिला संघर्ष करावा लागतो. आपल्याला भविष्यातली इमारत पक्की हवी असेल तर कुटुंबातल्या व्यक्तींच्या मनात एकमेकांच्या क्षमतांचा,कौशल्यांचा आणि एकमेकांवरच्या विश्वासाचा पायाच मजबूत हवा. कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले नाते सुसंवादी आणि एकमेकांना सांभाळून घेणारे असेल तर मग कुटुंबातील आणि समाजातील पूर्वापार चालत आलेल्या अविवेकी धारणा, समजूती यांना पुरून उरण्याचे मानसिक धैर्य स्त्रीला मिळेल. या तकलादू चौकटी ओलांडून, आपण घेतलेले निर्णय स्वत: निभावून नेले तर तिला जगण्याचे समाधान मिळेल. कोणतीही चाकोरी मोडणे तसे सोपे कधीच नसते त्यासाठी खूप मोठे आत्मिक बळ लागते. म्हणूनच पूर्वी किंवा आजही आगळेवेगळे कर्तुत्त्व गाजवलेली स्त्री इतरांसाठी लगेच पूजनीय, जणू देवीच होऊन जाते. त्यावेळी तिच्या प्रवासातला सुरवातीचा टप्पा तिच्या हेतूंवर जहरी टीका करण्याचा,शंका घेण्याचा,तिचे पाय जमतील तसे आखडून ठेवण्याचाच होता हे सगळे सोयीस्करपणे विसरले जाते. एकतर अबला म्हणून तिला दाबून ठेवा नाहीतर सबला म्हणून तिची थेट पूजाच करा,अशी सवय आजवर समाजाला लागलेलीआहे. आपल्यावरील समाज संकेतांचे दडपलेपण दूर करण्यासाठी आपल्यापरीने धडपडणाऱ्या मध्यम मनोवृत्तीच्या इतर सगळ्या स्त्रियांना मग स्वतःच स्वतःसाठी उभे रहायला हवे. त्यांना एकमेकींचे अनुकरण करून जगण्याची गरज नाही. त्यांना आपले मत आहे,आवाज आहे. मुखवट्यांशिवाय असलेला खरा चेहरा आहे. स्वतःच्या समस्या नेमक्या समजून घेण्यासाठी त्यांना आपले विचार,संवेदना,भावना आणि जाणिवा स्पष्टपणे व्यक्त करता आल्या तर आपली मानसिक उर्जा एकमेकीना जोडण्यासाठी, संवाद, मंथन घडवून आणण्यासाठी त्या वापरू शकतील. सर्वसामान्य स्त्रीला विश्वासाने जगण्यासाठी स्वातंत्र्याचे मुक्त अवकाश जेव्हा तिच्या स्वत:च्या कुटुंबात आणि समाजात मिळेल तेव्हा खऱ्याअर्थाने स्त्रीशक्तीचा उत्सव साजरे करण्याची मानसिक,सामाजिक गरज संपेल,असे वाटते.

© डॉ.अंजली औटी


--

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

प्रश्नांना उत्तरेही असतात

 

 

प्रश्नांना उत्तरेही असतात

 

तुला काय सांगू, दिवसाचे सोळा सोळा तास ड्युटी करून घरी आले तर घरातल्या लोकांची तोंडं वाकडी. तुला माहितीये ना नोकरी करण्यावरून झालेलं महाभारत? आता तर घरात कोणाला करोना झाला तर तो माझ्याचमुळे होणार आहे, कारण मीच एकटी बाहेर जाते ना.” मैत्रिणीच्या बोलण्यातला वैताग,राग पोहोचत होताच, शिवाय तिच्या घरातले वातावरण, प्रत्येकाच्या मनावर आलेला ताण तोही समजत होता. “माणसं मुळातून वाईट नाहीयेत ग, पण संधी आहे तर आत्ताच राजीनामा दे म्हणून मागे लागले आहेत, काय करू?” अर्थात काय करायला हवंय हे तिचं तिलाही समजत होतंच पण बाहेर आणि घरात परिस्थितीमुळे निर्माण झालेला ताण ह्याक्षणीतरी तिला असह्य झाला होता. सध्याच्या परिस्थितीत जुन्या प्रश्नाने उचल घेतली होती. एका जबाबदारीच्या पोस्टवर काम करणाऱ्या आपल्या जवळच्या व्यक्तीला मनात निर्माण झालेल्या भीतीचा आधार घेऊन ऐन मोक्याच्या क्षणी घरातल्या लोकांनीच कॉर्नर केल्यावर तिने काय करायचं?

आठ वर्षांपासून एका सोसायटीत राहणारे आजी-आजोबा, कोणाशी कधी बोलले नाहीत. कोणाकडे कधी गेले नाहीत. त्यांच्याकडे येणारी फक्त त्यांची मुलगी आणि जावई. अचानक चेअरमनला फोन करून रडत सांगतातआमच्याकडे बघायला कोणी नाही, आम्ही खूप जास्त आजारी आहोत, आमची मुलगी येत नाही, आता आम्हाला फक्त आत्महत्याच पर्याय दिसतोयसगळी सोसायटी हादरते. करायचं काय? आजारी आहेत म्हणजे करोना तर नाही? मुलगीही येत नाही म्हणजे तसे असण्याची शक्यता. मुलगी का येत नाही तर म्हणे जावई तिला आता येऊ देत नाही. मुलगी वारंवार केलेले फोन कट करत राहते, करोनाचा संशय आणखी वाढतो. त्यांना धीर दिला जातो, काय करता येईल यावर विचार-विनिमय होतो. शेवटी जावयाच्या फोनवर मेसेज करून निरोप ठेवला जातो कीआम्हाला आलेल्या फोनमुळे आणि तुम्ही फोन उचलत नसल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला हलवण्यापूर्वी आम्ही पोलिसांची मदत घेण्याचा विचार करतोय आणि तुमचे नंबर पोलिसांना नाईलाजाने द्यावे लागत आहेतपुढच्या पाच मिनिटात जावयाचा फोन येतो आणि पुढची सूत्र पटापट हलतात. आजोबा म्हातारपणामुळे आजारी असतात आणि आजी त्यांचं एकटीने करून दमल्यामुळे त्रासलेल्या असतात. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झालेला ताण त्यांना या टोकाकडे घेऊन आलेला असतो

                  


आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीतून निर्माण झालेले अनेक लहान-मोठे प्रश्न,समस्या,ताण आणि त्यावर मार्ग शोधण्याची प्रत्येकाची आपल्यापरीने चाललेली धडपड असे सध्याचे सामाजिक,कौटुंबिक चित्र समजण्यासाठी ही दोन उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. अनेकांच्या आयुष्यात आधीचेच अनुत्तरित प्रश्न आहेत. गेल्या पाच-सहा महिन्यांमध्ये आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनेक लहानमोठ्या घडामोडी,बदल वेगाने घडत आहेत.आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीचा सामना करतांना आपण ना तिच्यापासून पळून जाऊ शकत, ना तिचा संपूर्ण प्रतिकार करणे आपल्या हातात आहे. मग हातात काय आहे? तर परिस्थितीशी जुळवून घेऊन आपल्या कुवतीप्रमाणे, जवळ असलेल्या कौशल्यांचा योग्य वापर करून मार्ग काढणे. प्रत्येकासमोरची आव्हाने,समस्या वेगळ्या असल्या तरी त्यासाठी आपल्या प्रत्येकाकडे असलेल्या आर्थिक,सामाजिक,व्यक्तिगत क्षमताही वेगवेगळ्या आहेत, मानसिकता वेगवेगळ्या आहेत. सगळ्या बाजूंनी निर्माण झालेला परिस्थितीमुळे असलेला हा  अनिश्चिततेचा ताण हाताळण्यासाठी नेमके काय करायचे याच्या जैविक,आदिमप्रेरणा आपल्या मेंदूत नक्कीच आहेत. सुरवातीची घाबरण्याची, अतिकाळजीची, जीव एकवटून गोळा केलेल्या उत्साहाने आणि शोधलेल्या कल्पक मार्गांनी एकमेकांना धीर देण्याची आणि घेण्याची जागा आता प्रत्यक्ष जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीने घेतली आहे. तरीही काहीजण अजूनही स्तंभित आहेत काही हतबल,अगतिक,असहाय होऊन टोकाची पावलं उचलत आहेत. आपण आणि आपल्या जवळच्या नात्यांचा विचार करणे, त्यांना प्राथमिकता देणे काहीवेळा स्वार्थाकडेही झुकल्यासारखे वाटतेय. तर अनेकजण स्वतःबरोबरच इतरांना मदत करण्यासाठी धडपडत आहेत. प्रत्येक दिवसाचे नव्याने व्यवस्थापन करतांना प्रत्येकाला वेगवेळ्या आघाड्यांवर काम करावे लागते आहे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावनिक,मानसिक,शारीरिक आव्हानांचे प्रश्न आता खऱ्याअर्थाने सामोरे आलेले आहेत. ते कोणा एकट्याचे नाहीत तर आपल्या सगळ्यांचे, संपूर्ण समाजाचे आहेत.

एकाच कुटुंबातल्या व्यक्ती सोडल्या तर एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवणं,स्पेस जपणं हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे, पण सतत एकमेकांसोबत राहून त्यांच्या मानसिक स्पेसवर तर आपल्याकडून अतिक्रमण होत नाहीये ना? हेदेखील समजून घ्यायला हवंय. कोणतीही गोष्टअतिझाली की येणारं नकोसेपण, परिस्थितीबद्दलची हताशा, अपरिहार्यता शेअर करण्यासाठी सध्या एकमेकांच्या प्रत्यक्ष समोर आहेत फक्त घरातली लोकं, मग मनात साचलेल्या गोष्टींचा निचरा करतांना होणारी भांडणं, कुरबुरी,ताणली गेलेली नाती, एकूणच आलेला उबग,कंटाळा,ताण,घुसमट याचं नेमकं काय करायचं हे न समजल्यामुळे शाब्दिक,मानसिक आणि काही ठिकाणी शारीरिक तोलही सुटतो आहे. आक्रमकता,हिंसा वाढते आहे. मनात उमटणाऱ्या अशा अस्वस्थतेची योग्य ती दखल वेळीच घेतली नाही तर मनावरचा ताण असह्य होऊन वागण्यावारचे नियंत्रण गमावून स्त्रियांवर, मुलांवर,वृद्ध व्यक्तींवर, काही ठिकाणी पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांच्या अनेक घटना सध्या समोर येत आहेत. परिस्थितीवर तर राग काढता येत नाहीये मग तो व्यक्तींवर, वस्तूंवर आणि अगदी स्वतःवरदेखील काढला जातोय. हा ताण कमी करण्यासाठी नेमके काय करायला हवे, हे समजून घेता येईल.आपल्या प्रत्येकाचे मन आणि शरीर निर्माण झालेल्या परिस्थितीशी अनुकूल राहण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यासाठी मनावर काहीप्रमाणात असलेला ताण हा मदत करणाराही असतो,मार्ग काढणारा आणि आवश्यक असणारा असतो. मग अतिरिक्त असलेला आणि अनावश्यक ताण वाढतो कसा? तर तो आपणच केलेल्या अतिविचारांनी वाढत जातो. ‘अनावश्यक ताण आहे हे कसे ओळखायचे? तर त्यामुळे आपल्याला कोणताही त्रास जाणवत असेल तर. वर सांगितलेल्या मैत्रिणीच्या घरातल्या लोकांनाआपल्याला करोना होईलअशी भीती वाटली तर तो आवश्यक ताण असेल कारण त्यामुळे करोना होऊ नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली जाईल, पण त्यांनातिच्यामुळे करोना होणारच आहेअसे वाटून त्यांच्याकडून तिच्यावर काही निर्णय घेण्यासाठी दबाव आणला जात आहे तिथे तोअनावश्यकताण तयार झाला. आजी-आजोबांच्या केसमध्ये त्यांना करोना झालाय या भीतीमुळे त्यांचा जावई ऐन त्यांच्या आजारपणात त्यांच्या मुलीला स्वतःच्या घरी जायला अडवतो आहे,हे वागणे अनावश्यक ताणाच्या प्रभावाखाली आहे. तर या प्रसंगामुळे कोणालाम्हातारे झाल्यावर आपली मुलं आपल्याशी अशी तर वागणार नाहीत ना?” असा मनात सतत उगीचच येणारा विचार अनावश्यक ताण आणि समस्या वाढवणारा असतो. अशावेळी मनातले विचार आणि भावना वेळीच तपासल्या नाहीत तर आपल्या वागण्यातून त्याचे प्रतिबिंब दिसायला लागते. प्रसंगानुरूप वेगवेगळे विचार मनात येणे स्वाभाविक आहे आणि त्यांना अनुसरून वाटणाऱ्या आणि एरवी आपण ज्यांना नकारात्मक समजतो त्या भावनादेखील नैसर्गिक आहेत. पण त्यांचं अधिक काळ मनात रेंगाळणं,आणखी भर घालून आपलं त्या जास्त काळ चघळणं यातून येणारा ताण हा त्या व्यक्तीचे आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या माणसांचे नुकसान करणारा असतो, नातेसंबंध बिघडवून आयुष्यातला आनंद घालवून टाकणारा असतो. व्यक्तीच्या सवयी,स्वभाव आणि व्यक्त होण्याचे मार्ग आणि दृष्टीकोन आपल्याबाजूने ताणात भर टाकत असतात. लहानपणापासून ज्या वातावरणात आपण वाढलो त्याचे, कुटुंब,समाज,शाळा,व्यवसाय अशा घटकांमधील विविध अनुभव,व्यक्तींचे प्रभाव त्यावर असतात. ते इतके सवयीचे होतात की त्यातून घडणारा तोचआपला मूळ स्वभावअसा समज करून घेऊन आपण ते स्वीकारलेले असतात. पण आता लक्षात आलेच असेल की कोणाचाही स्वभाव,वृत्ती या जन्मजात नसतात. मनावरच्या अनावश्यक ताणाचे 'नियमन' करता येते त्यासाठी स्वतःला प्रतिप्रश्न विचारून तो त्रासदायक का आहे हे समजून घेता येते, स्वतःचे स्वतःला करणे अशक्य होत असेल तर प्रत्येक पावलावर आपल्याला मदत उपलब्ध असते. घटनांचे,प्रसंगांचे आणि व्यक्तींचे मूल्यमापन करण्याचे अनेक विवेकी पर्याय, पद्धती उपलब्ध आहेत. त्रासदायक ताणातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणं ही एकदाच करून भागेल अशी गोष्ट नाही. तो आपल्या स्वभावातील सातत्याचा आणि सरावाचा भाग बनायला हवा. तर सवयी बदलतील आणि स्वभावही बदलेल. कारण आत्ता आपल्यासमोर असलेल्या परिस्थितीत जगण्याची आव्हाने कितीही कठीण आणि प्रखर असली आणि संकटांमुळे पुढचा रस्ता कितीही अंधुक,धूसर दिसत असला तरी  आपल्याच अंतर्विश्वात स्वतःमध्ये त्यासाठी अनुकूल बदल घडवून आणण्याच्या असंख्य क्षमतादेखील आहेत, हे विसरून कसे चालेल?

© डॉ अंजली औटी 

(फोटो : गुगल)

लेख : दै. म टा 'मैफल पुरवणी'

   

   

 

 

 

 

          

रविवार, २९ मार्च, २०२०

एक क्षण स्वतःसाठी...


माणसांना सगळ्यात जास्त भीती वाटत असते ती अनिश्चित गोष्टींची. अंधार नकोस वाटतो. उजेडाचा हलकासा किरणही आधार देणारा,उबदार वाटतो.
त्या प्रकाशात अनिश्चिततेवर मात करता येण्याच्या शक्यता दिसतात आणि माणसं मार्ग काढतातही.
कोणतेही संकट माणसाच्या इच्छाशक्तीपेक्षा मोठे नसते. उलट संकट जितके व्यापक तितकी त्यावर मात करण्याची आश्वासक ऊर्जा मनात निर्माण होते. ज्योतीने ज्योत उजळत जा
ते आणि ती माणसांच्या मनामनातला कानाकोपऱ्यातला अंधार निपटून टाकते.
अशावेळी कितीही आत्मकेंद्री असलेली व्यक्ती तिने ठरवलं तर आपल्या सवयींच्या कोषातून बाहेर पडू शकते. स्वमग्नतेच्या, स्वार्थाच्या भिंतींना तडे जातात. माणूस आपल्या व्यक्तिगत मर्यादा ओलांडून पुढे जाऊ शकतो. ही वेळ असते आयुष्याचे खरे सौंदर्य मी, माझं करण्यात नाही तर एकमेकांच्या सोबतीत आणि सहचर्यात आहे याची नव्याने ओळख करून घेण्याची. कारण संकट व्यक्तीवर येऊ दे किंवा समूहावर किंवा अखिल मानवजातीवर त्या संकटातले आव्हान जसे तीव्र असते तसे त्यावर मात करण्याच्या शक्यताही अनेक असतात. त्यातूनच माणसातील माणूसकी पुन्हा एकदा कात टाकून रसरशीत होण्याची सुरवात होते.
येणारा अनुभव खुल्या मनाने घेण्याचे आव्हान प्रत्येक संकटात असते. इतिहास साक्ष आहे अशी माणसांच्या जगण्याला आव्हान देणारी, माणुसकीची परीक्षा घेणारी अनेक संकटे आपण आजपर्यंत परतवून लावली आहेत. कोणतेही संकट काळाच्या ओघात कधीही टिकलेले नाही. पण त्याच इतिहासकडून आपल्याला विवेकी आणि अविवेकी निवडीचे परिणामही शिकायला हवेत. म्हणजे मग लक्षात येईल की आपल्या प्रत्येकाला या संकटकाळात स्वतःसाठी एक "निवड" करायची आहे. म्हटलं तर ही एक संधी आहे, म्हटलं तर एक आव्हान आहे, आपण त्याकडे कसं बघतो, हे मात्र आपल्या प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.
हीच संकटांची ताकद आहे.
कारण संकटं स्वत:पलीकडे जायला शिकवतात, नव्हे कसं जायचं याचे वेगवेगळे पर्याय शोधायला आणि निवडायला शिकवतात. संकटं संकुचितपणाच्या मानवनिर्मित मर्यादा ओलांडून पुढे जाण्याची प्रेरणा देतात. आपल्या आधी इतरांचा विचार करण्याची बुद्धी अशावेळी आपोआप सुचते. इतरांच्या काळजी घेण्यातच आपलेही भले सामावलेले आहे याचा साक्षात्कार होतो. माणसांची जीवनमूल्ये बदलतात आणि जगण्यावरची अम्लान श्रद्धा दृढ होते.

                                        माझ्या मते आज ती संधी आपल्याला आहे स्वतःसाठी एक पॉज, एक उसंत घेण्याची. तो घ्यायचा आहे आत्मपरीक्षण करण्यासाठी. आज आजूबाजूचं जग थांबल्यासारखं वाटतंय कारण आपण थोडे स्थीर झालो आहोत. विश्वाची गती अशी कासवासारखी होईल, कधी स्वप्नातही आलं नव्हतं नाही? सतत बाहेर धावणाऱ्या आपल्या शरीराचा वेग अचानक कमी झालाय, पण आपलं मन? त्याने आपला वेग कमी केलाय का? की ते दुप्पट वेगाने कामाला लागलंय? हेदेखील तपासायला हवंय.
ही संधी आहे, धावणाऱ्या मनाला ब्रेक लावून हे शोधण्याची की आयुष्यात जो मार्ग आपण निवडलाय तो आपल्यासाठी आणि आपल्या जीवलगांसाठी योग्य दिशेने जाणारा आहे?
आजपर्यंत निसर्गातल्या पाच तत्त्वांकडून आपण सतत आणि अविरत फक्त "घेत" आलेले आहोत,
निसर्गाला आपण कधी काय दिलंय?
'घेण्यातला' आनंद आपण नेहमीच हक्काने अनुभवतो पण 'देण्यात'ला आनंद अनुभवण्यासाठी आपल्या मनात पुरेशी जागा आहे?
त्यासाठी स्वतःपुरते प्रत्येकाला काय करता येणे शक्य आहे? हे शोधण्याची ही वेळ आहे.
निसर्गतले केवळ सौन्दर्य टिपणारे आणि त्याबद्दल वरकरणी उमाळा वाटणारे आपण प्रत्यक्षात जगण्यातल्या गरजांपायी निसर्गाला किती अपरिमित हानी पोहोचवतो आहोत, हे कधीतरी जाणवले आहे का आपल्याला?
आपल्या गरजा आपण तपासून बघितलेल्या आहेत? आज ती संधी आपल्याला आहे.
कारण जर याबद्दल आजही पुरेसे जागरूक झालो नाही तर आपली इच्छा असो वा नसो त्याच निसर्गतला एक यत्किंचित विषाणू आपल्या अस्तित्त्वालाच कसे आणि किती आव्हान देऊ शकतो, हे आपण सगळेच अनुभवतो आहोत ना?  ही संधी आहे, निसर्गातल्या सौंदर्याबरोबर आपल्या जगण्याशी निगडित असलेले "सत्य" जाणून घेण्याची. त्या सत्याचा आपल्यापुरता स्वीकार करण्याची. मी स्वतःत बदल केला नाही तर माझ्यासमोरच्या परिस्थितीत बदल होईल हे वास्तव समजून घेऊन माझ्या पातळीवर लहान-मोठे बदल आत्मसात करण्याची. आता तरी आपण सगळेच ते मनःपूर्वक करूया?
पाणी,कागद वाचवणे, कमीतकमी कचरा निर्माण करणे यासारख्या आपल्या हातात असलेल्या गोष्टी तरी आपण नक्कीच करू शकतो? इतकी साधी गोष्ट सांगतेय कारण आपल्यापैकी अनेकजण अजूनही याबद्दल जागरूक नाहीत. कचऱ्याचे व्यवस्थापन,पाणी जपून वापरणे, आजूबाजूच्या परिसराचे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून भान ठेवणे हेदेखील आपल्याकडून कोणीतरी करवून घ्यावे लागते?
आज आपल्याला ज्याच्याबद्दल काहीच माहीत नाही अशा एका विषाणूची भीती वाटते आहे,पण अजूनही अनेकांना
त्याबद्दल काहीच न वाटण्याइतपत बेपर्वाई वाटते आहे. परिस्थितीचे गांभीर्य न समजणारे लोक सगळ्यांचा त्रास मात्र वाढवत आहेत. काही लोकं इतकी घाबरलेली आहेत की त्यांना कुठूनही मिळालेली, कोणतीही माहिती अगदी खरी वाटते आहे. काहींना आमचं कोणीही काही वाकडं करू शकणार नाही, असा आत्मविश्वास वाटतोय, काहींना अजूनही आपला दिनक्रम जराही बदललेला नाहीये, हे दाखवण्यात भूषण वाटतेय. दृकश्राव्य माध्यमांना याही परिस्थितीत बातमी चटकदार होण्याचा सोस दिसतो आहे. आपण वापरलेले भडक रंग, आवाज आणि ट्यून कित्येकांच्या हृदयात धडधड वाढवतो आहे,की यासाठीच ‘बातम्या’ तयार होतायेत? दुकानदार मंडळी लोकांना मदत करायची की आपण नफा कमवायचा या गोंधळात स्वतःला सांभाळत आपल्या सेवेचा रास्त मोबदला मिळवण्याचा प्रयत्न करतायेत, रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष परिस्थितीशी सामना करणारे आणि स्वतःची काळजी घेत दुसऱ्यांना सर्वतोपरी मदत करणारे लोकही आजूबाजूला नक्कीच आहेत. यात मेडिकल क्षेत्राशी संबंधित, सुरक्षा आणि इतर महात्त्वांच्या व्यवस्थेशी संबंधित लोकं तर आहेतच पण घरात राहूनही इतरांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे,मार्ग सुचवणारे आणि प्रत्यक्ष मदतीला तत्पर असलेली लोकंही आहेत. एकूणच एकाचवेळी अनेक गोष्टी घडतांना दिसतायेत. माणसांच्याच एकमेकांशी वागण्याची वेगवेगळी रूपं दिसतायेत.
एक यत्किंचित विषाणू दिवसेंदिवस
माणसाच्या जवळ येऊ बघतोय तर त्याला सामोरं जाण्यासाठी आपण संपूर्णपणे तयार तरी आहोत का? या प्रश्नाचा शोध सगळ्या पातळ्यांवर घेतला जातोय. सगळेच सजग झाले आहेत,ही चांगलीच गोष्ट पण हा शोध प्रत्येकजण स्वतःला वगळून घेतोय का, ते आपल्यालाच बघायला हवंय. जगण्यातली जबाबदारी नाकारून कसे चालेल?   
तो शोध आपल्या सगळ्यांना आधी आपल्या रोजच्या जगण्यातच घ्यावा लागेल. आपले जगण्याचे मार्ग आणि पद्धती बघव्या लागतील. त्यामागचे मनातले विचार,समाज,ग्रह,पूर्वग्रह आणि दृष्टिकोन शोधावे लागतील. मग लक्षात येईल या सगळ्याचं मूळ आपल्या आत तर आहे!
या संकटाचा सामना कसा करायचा अगदी याचंही
बळ आपल्यातच आहे. वर हे कसले थर आहेत मग? गरज आहे,त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची.
ही संधी आहे विवेकाच्या काडीने मनातल्या ज्योतीची काजळी काढून टाकण्याची. म्हणजे मनातले अंधारे कोपरे उजळतील, असं करतांना ज्योत विझणार नाही याची काळजी घेण्याची नजाकत आपल्या बोटांमध्ये आहे आणि मनातही.
 स्वतःच्या मनातल्या चांगुलपणावर इतका विश्वास मला वाटतं आपल्या सगळ्यांचाच आहे!
आत्ता आपल्याला शक्य असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू
या, स्वतःला आणि इतरांना होणारा त्रास कमीतकमी कसा होईल हे तर नक्कीच बघूया. माझ्याकडून निसर्गावर एकही ओरखडा उमटणार नाही याची काळजी आपण नक्कीच घेऊ शकतो. हे संकट आले तसे निघूनही जाणार आहे, त्याची तीव्रता कमी होणार आहे आणि त्यानंतर मागे उरणार आहे या संकटाची गोष्ट.
त्या गोष्टीत मला स्वतःबद्दल अभिमान वाटावा असं काहीतरी मागे उरेल आणि त्याचा प्रकाश माझ्याबरोबर इतरांचंही आयुष्य उजळवून टाकेल ही संधी मात्र आज, आत्ता,आपल्यासमोर असलेल्या
आजच्या क्षणात आहे!
© डॉ. अंजली औटी 

(महारष्ट्र टाइम्स 'मैफल पुरवणी ) 28 मार्च 2020

फोटो स्त्रोत  : गुगलशनिवार, २८ मार्च, २०२०

लैंगिक भूमिकेचा स्वीकार


त्यापेक्षा धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरं..काय पाप केलं म्हणून हे सगळं आपल्या वाट्याला. आता कसं तोंड दाखवायचं कोणाला? आणि सांगायचं काय?” ही होती शुभदाची पहिली प्रतिक्रिया ज्यावेळी तिला नीराविषयी समजलं. बसलेल्या मानसिक धक्क्याने आत्तापर्यंत जपलेलं,सावरलेलं तिचं त्रिकोणी जग कोलमडून पडलं होतं. हातापायातलं त्राणच निघून गेलं.
झालं असं की त्यांच्या मुलीने नीराने, जी परदेशातील शिक्षण संपवून तिथेच एका मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करत होती. तिने आपल्या बाबांना अगदी स्पष्टपणे कसलीही सारवासारव न करता आपण सेक्शुअली इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत आणि गेल्या सहा महिन्यांपासून सुझानसोबत एकत्र रहात आहोत हे फोनवर सांगितलं. तिच्या या सांगण्याचा त्यांना धक्का बसलाच नाही, असे नाही. पण त्यांनी त्यावेळी आलेली सगळी अस्वस्थता अत्यंत संयमाने हाताळली. आपल्या आधी कसं काहीच लक्षात आलं नाही याचा त्यांना खेद वाटला. त्यांचे सगळे कुटुंब,नातेवाईक आणि मित्रपरिवार अत्यंत सुशिक्षीत, सुसंस्कृत, पुरोगामी, मोकळ्या विचारसरणीचे होते. पण असे एखादे जगावेगळे पाऊल प्रत्यक्ष उचलण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्याही मनावर विलक्षण ताण आलाच. शुभदापासून हे लपवणं शक्यच नव्हतं. नाहीतर नीरा स्वतः आईशी बोलायला तयार होती. पण तिला सांगण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःहून स्वीकारली. त्याआधी नीराचं म्हणणं हे परदेशातलं केवळ एक फॅडतर नाहीये ना, आपल्या भावनिक-मानसिक गरजा भागवण्याचा तिने शोधलेला केवळ एक मार्ग तर नाहीये ना याची त्यांनी खात्री करून घेतली.
                                        


मोठं होतांना समज येऊ लागल्यापासून आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, याची नीराला होत गेलेली जाणीव, त्यानंतर घेतलेला डॉक्टरांचा सल्ला आणि मागच्या पाच वर्षात सुझानसोबत आपल्या विचारांमध्ये आणि समजूतींमध्ये आलेली स्पष्टता,त्यातून झालेले बदल,स्वीकाराची प्रक्रिया, असा सगळा प्रवास नीराने बाबांना विनासंकोच,अगदी मोकळेपणानं सांगितला. एकमेकींसोबत आयुष्य सुखाने घालवू शकतो ही खात्री झाल्यावर आता दोघीही आपल्या नात्याचा कायदेशीर स्वीकार करायला तयार होत्या. सुझानच्या घरच्यांची याला परवानगी होती. आता प्रश्न होता नीराच्या घरी सगळं सांगण्याचा.   
शुभदाचा अंदाज घेऊन बाबांनी तिला याबद्दल सांगितले तर खरे पण त्यानंतर तिची जी काही प्रतिक्रिया झाली त्यातून गेल्या तीन महिन्यांपासून दोघेही वेगवेगळ्या मानसिक दबावाखाली जगत होते.     कासावीस मनाने शुभदाने स्वतः ही गोष्ट आपल्या जीवलग मैत्रिणींना आणि जवळच्या नातेवाईकांना सांगितली. कोणीतरी तर आपल्या मुलीला त्यापासून परावृत्त करण्याचा उपाय सांगेल. पण त्यांच्यासाठीही हे काहीतरी अघटितच होतं. तोपर्यंत असं वाटत होतं की असं काही फक्त सिनेमात दाखवतात. आणि प्रत्यक्ष आयुष्यातही घडत असेल कोणाच्या तरी ते जग काही आपलं नाही. अतिश्रीमंतांचे असतात हे सगळे चोचले. आपल्यासारख्यांच्या घरांमध्ये आजपर्यंततरी ऐकलं नाही असं काही. त्यांनाही शुभदासारखाच धक्का बसला,पण या क्षणी मात्र स्वतःला सावरून सगळ्यांनी शुभादाचेच सांत्वन करायला सुरवात केली. कितीही हुशार असली म्हणून काय झालं, नीराला बारावीनंतर लगेच परदेशात शिकायला पाठवलं तेच चुकलं. त्याचाच हा परिणाम.उच्च शिक्षणाचे फायदे असतात तसे तोटेसुद्धा. ताबडतोब भारतात बोलावून तिचं लग्न लावून द्यायला पाहिजे, मदत राहिली बाजूला पण असल्या  बडबडीचा उबग येऊन शुभदा एकदम जी गप्प झाली ती आपल्या रूममधून बाहेरदेखील पडेनाशी झाली. एरवी शांत आणि संयमी असणाऱ्या शुभदाची आता बाबांना काळजी वाटायला लागली. मनातला गोंधळ आणि कालवाकालव थोडी शांत झाली की ती आपोआप सुसंगत विचार करायला लागेल आणि मग हळूहळू तिला बोलतं करता येईल असा विश्वास आणि अनुभवही त्यांना होता.झालंही तसंच. काही दिवसांनी शुभदा थोडी स्थीर झाल्यासारखी वाटली आणि मग बाबांनी मदत घेतली. मित्र आणि नातेवाईक सोडून त्रयस्थ दृष्टीकोनातून विचार करू शकणाऱ्या मानसतज्ञांची.
आपलं मूल हे कितीही आपलं असलं तरी त्याचं आयुष्य आपल्याला नाही तर त्याचं त्यांनाच जगायचं असतं हे आपल्या आयुष्यात पालकांना कधीतरी मान्य करावंच लागतं. त्यांचा रस्ताही वेगळा असतो आणि त्यावरचा प्रवासही. आपल्यापैकी प्रत्येकजण जसा वेगळा असतो तशाच प्रत्येकाच्या गरजादेखील वेगळ्या असतात. त्या गरजा भागवण्याचे पर्याय,मार्ग माणसे शोधतात. माणसांच्या आर्थिक,सामाजिक गरजा जशा एकमेकांपासून वेगवेगळ्या असतात तशाच वैचारिक,भावनिक आणि शारीरिक गरजादेखील. समाज पातळीवर सर्वांना सुस्थितीत राहण्यासाठी सोय म्हणून आपणच काही नियम बनवतो. काही परिस्थितींमध्ये त्यात बदलदेखील केला जातो.  कोणाशी लग्न करायचं,करायचं की नाही? असे निर्णय पूर्णपणे व्यक्तिगत असले तरी त्याला सामाजिक पैलूही असतो. कारण आपला समाज आपल्याच आजूबाजूला असलेले लोक असतात आणि आपल्या निर्णयांचा त्यांच्यावर परिणाम होत असतो. असे असले तरी प्रत्येकाचे आयुष्य हा त्याचा खूपच व्यक्तिगत प्रश्न आहे. जगतांना आपण इतरांना त्रास होणार नाही अशी कोणती जीवनशैली स्वीकारायची हे ठरवण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला आहे. कारण आपण लोकशाही एक मूल्य म्हणून स्वीकारलेले आहे. कोणत्या व्यक्तीशी शरीरसंबंध ठेवायचे हा निर्णय दोन सज्ञान व्यक्तींमध्ये परस्पर सहमतीने आणि स्वीकाराने असेल तर त्याला इतर कोणाच्याही मान्यतेची गरज नसते.
समलिंगीसंबंध भारतासह जगभरातील अनेक देशांनी कायदेशीर मानलेले आहेत. यामागे लोकशाहीतले व्यक्तिस्वातंत्र्य हेच मूल्य प्रामुख्याने जपलेले आहे. म्हणजे ‘समाजमान्यता’ हा मुद्दा तसा गौण आहे. शुभदासारखी व्यक्ती घाबरते कशाला तर शक्यतो परंपरांनी घालून दिलेले नियम आणि चौकटी मोडायला. कारण त्यामागे असुरक्षितता येते. कधी ती थेट सामाजिक स्वीकाराची असते तर कधी इतर चारचौघींसारखे आपल्या मुलीचे जग का नाही,याबद्दल असते. त्यात अनिश्चित भविष्याची अकारण चिंता सामावलेली असते. माणसांना चाकोरीत जगणे का आवडते? कारण ते सगळ्यात जास्त सुरक्षित असते म्हणून. त्यात संघर्ष नसतो. चाकोरी तोडण्यातून निर्माण झालेली जगण्याची आव्हाने,संघर्ष आपल्या मुलीला झेपतील का याचीही काळजी आईला वाटू शकते.
पुरुष म्हणून किंवा स्त्री म्हणून आजपर्यंत निभावत आणि मान्य असलेल्या भूमिकांच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाचा एक माणूस म्हणून विचार करणे आपल्या सगळ्यांसाठीसुद्धा महत्त्वाचे आहे. त्यापलीकडेही माणसात काही क्षमता असतात त्यांचा स्वीकार व्हायला हवा. शुभादालाही आपल्या वाटण्याचा खोलवर विचार हळूहळू करावा लागला. त्यानंतर स्वीकाराच्या दिशेने प्रवास सुरु झाला. निर्माण झालेली परिस्थिती काही आपल्या हातात नाही. नीराच्या या निर्णयामुळे ‘आई’म्हणून तिच्यावर संस्कार करायला ‘मी कुठे चुकले का’ हा विचार संपूर्णपणे वेगळ्या ट्रॅकवर घेऊन जाणारा आणि नुकसान करणारही आहे, हे तिच्या लक्षात आले. त्यापेक्षा तिला असे आकर्षण नैसर्गिकपणे असू शकते हे मान्य करून  केवळ ‘समाज काय म्हणेल’ आणि ‘लोक काय म्हणतील’ याचा विचार करणे आणि तिच्या मनातल्या इच्छा दडपून,तिच्यावर भावनिक दबाव टाकणे हा तर तिच्यावर अन्याय आहे. आपला नैसर्गिक कल समजण्याइतकी आणि आयुष्याचे निर्णय घेण्याइतकी ती सक्षम,स्वतंत्र आहे, हे तिनेही मान्य केले.
समलैंगिकतेच्या संदर्भात हेदेखील वास्तव आहे की आपला नैसर्गिक कल नीट समजण्याआधीच काही कारणांमुळे अनेकांच्या लैंगिक जाणीवांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. त्यात समवयीन लोकांच्या सवयी,माध्यमांमधून दाखवलेल्या अतिरंजित गोष्टी, यौनशोषणासारख्या अपप्रवृत्तीचा लहान वयात आलेला अनुभव असे अनेक घटक असू शकतात. गोंधळलेल्या अशा तरुण-तरुणींना योग्य मार्गदर्शनातून आपल्या लैंगिक गरजांची ओळख करून घेता येऊ शकते. म्हणजे त्यांना दुहेरी लैंगीकता स्वीकारण्याची गरज उरणार नाही. त्यातून जर ते खरोखरच समलिंगी आहेत हे लक्षात आले तर संपूर्ण कुटुंबाचे या प्रश्नावर गंभीरपणे वैचारिक मंथन गरजेचे आहे. कारण त्यावर भलतेच उपाय केले गेले तर होणारे दुष्परिणाम फक्त त्या एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण कुटुंबावर आणि पर्यायाने समाजावर होऊ शकतात. शिवाय बळजबरीने त्यांचे इतर कोणाशी लग्न लावून देणे म्हणजे तर ते अनेक संभाव्य संकटाना आमंत्रण असते.
समलिंगीसंबंधाना कायद्याची मान्यता असली तरी तशी समाजाची संपूर्ण मान्यता अजूनही नाही. म्हणून यासंदर्भात निर्माण झालेले पेच शिक्षण,समजूतदारपणा आणि सहकाराच्या मार्गे विवेकाच्या प्रकाशात सोडवायला हवेत. भिन्नता स्वीकारात जशी आहे तशी नकारातसुद्धा आहेच. ज्यांच्या लोकांपासून,घरांपासून हा मार्ग दूर आहे त्यांनी या मार्गाचा संपूर्णपणे निषेध करण्याची एकांगी भूमिका घेण्याचीही गरज नाही.
समलिंगी लोकांनीही आपली लैंगिक गरज नीट समजून घेऊन, आपल्या भूमिका आग्रही,आक्रमकपणे न मांडता ही गोष्ट खाजगी,संपूर्णपणे वैयक्तिक आहे हे लक्षात घेतले तर कदाचित संघर्षाशिवाय त्यांच्या  वेगळेपणाचा स्वीकार करणे इतरांना शक्य होईल, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
समाज म्हणून जगण्याच्या अशा वेगळ्या वाटांच्या शक्यता असू शकतात, हे आता आपल्याही लक्षात येत आहे. आपल्या आजूबाजूला असलेली नवीन पिढी अनेक पातळ्यांवर बदलणारे वास्तव जगते आहे, जशी शुभदाची नीरा जगाच्या पातळीवर आपली स्वतंत्र ओळख रुजवते आहे. हा होणारा बदल फक्त त्यांचा नाही तर आपल्या सगळ्यांचा आहे असा समंजस विचार करणे हा आपल्याही प्रगल्भ होण्याचा प्रवास आहे.            
© डॉ अंजली औटी
  
(महारष्ट्र टाइम्स, 'मैफल पुरवणी")


  


                

शनिवार, २१ मार्च, २०२०

पैशाची जादू...

"सोड ना, तुला कधीच कळणार नाही" अचानक तो म्हणाला आणि त्या दोघांनी विषय बदलला. मैत्रिणीच्या नवीन जॉबबद्दल बोलत होते दोघं. कधीकधी भाषा,बोलणं,आवाज,टोन सगळं योग्य असूनही संवाद अशक्य होतो,जणू त्यासाठी ऐकणाऱ्याचे कान बंदच झालेले असतात.
"मस्तपैकी रोज नवीन हॉटेल्स, फूडजॉइन्ट्समध्ये जायचं, पदार्थ टेस्ट करायचे आणि त्यावर रिव्ह्यू देणारा व्हिडीओ शूट करून कंपनीमार्फत तो यूट्यूबवर अपलोड करायचा" यावर दुसऱ्याचं म्हणणं होतं, "पण यात पैसे कितीसे मिळणार? इतकं शिकल्यावर हा कसला जॉब?"
"अरे पण ती किती एन्जॉय करतेय"
"माझ्यामते टाईमपास आहे नुसता, पैसे कमवायचे दिवस वाया कशीकाय घालवतेय?"
"अरे,शेवटी पैसे कशासाठी मिळवायचे? काम करण्यातला आनंद महत्त्वाचा की पैसे?"
दुसऱ्याला मात्र त्याचं बोलणं पटत नव्हतं, शेवटी विषय थांबला.
पैसे कमावणं महत्त्वाचंच पण त्याशिवायही पहिल्यासाठी जगण्याचा केंद्रबिंदू आनंद,समाधान. तर दुसऱ्यासाठी केंद्रबिंदूच पैसा, आर्थिक समृद्धी. मग आनंद आपोआपच मिळतो.
यातल्या कोणाचं बरोबर? हा प्रश्नच इथे गैरलागू. कारण दोघेही आपापल्या दृष्टीने बरोबर. दोघेही आपापल्या भूमिकांमधून एकाच परिस्थितीचा विचार करतायेत. आयुष्यातली आपली निवड करतायेत.

यात समस्या तेव्हा तयार होते ज्यावेळी स्वतःला किंवा दुसऱ्याला आपली निवड त्रासदायक व्हायला लागते. अर्णवला पैसे चोरायची सवय लागली होती. मागितले तर घरातून त्याला मिळणार होते, मग तो चोरतो का? काही मानसिक आजार तर नाही ना याची खात्री करून झाली. असे काहीही नव्हते,मग काय कारण, ते शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. लक्षात आले की त्याच्यासाठी ते केवळ एक थ्रील होते! न मागता मिळणाऱ्या गोष्टींनी त्याला आयुष्य मिळमिळीत वाटत होते. मग कधीतरी गंमत म्हणून केलेली गोष्टच नंतर सवयीत बदलली. पैशांपेक्षाही ते मिळवण्याचा मार्ग मनाला झिंग देई. म्हणून दरवेळी मोठे धाडस. हे दुष्टचक्र त्याला कुठल्या दिशेने नेत होतं त्याला समजतही नव्हतं.
मनोहरकडे वडिलोपार्जित श्रीमंती. तिचा गर्व वागण्या-बोलण्यात. त्यापुढे सगळं तुच्छ. पैसे फेकले की वाट्टेल ते मिळतं या विश्वासावर जगत राहिले आणि जवळच्या नात्यांचा वेळोवेळी अपमान,पाणउतारा करत गेले. जवळची लोकंही आपोआप पांगली. अंगात रग होती तोपर्यंत ऐश केली पण हातपाय थकत गेले तसं एकटेपण आलं. शेवटीशेवटी तर विस्मृतीची व्याधी जडली आणि स्वतःची ओळखही विसरले. आपल्याकडे किती पैसे,कुठे ठेवले आहेत कशाचाच पत्ता नाही. एकट्यानेच मरण आलं तेही आजूबाजूच्या लोकांना आठ दिवसांनी समजलं. जवळ पैसे तर उरले पण माणसं?

आपला मुलगा अत्यंत आक्रमक,उद्धट आहे,घरीदारी भांडणं,मारामाऱ्या करतो म्हणून त्याला घेऊन आलेल्या तरुणाचे वडील सांगत होते, “आजवर मी त्याला काहीही कमी पडू दिलेलं नाही. चांगल्या इंग्रजी शाळेतील शिक्षण, मॅनेजमेंट कोट्यातून इंजिनिअरिंगची अॅडमिशन. मोटारसायकल,पॉकेटमनी. मी एकवेळ कर्ज काढेन,शेती विकेल पण मला वाटतं “मी जशा अभावात जगलो तसं आयुष्य माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये” ही वडिलांची प्रेमाची भाषा. आपल्याला न मिळालेलं मुलाला मिळावे. पण त्यांना अपेक्षित ते न घडता मुलागा वेगळेच वागतोय, कारण त्याला खात्री आहे, आपण कसेही वागलो तरी पैशाने आपल्याला सांभाळून घेणारे वडील खंबीर आहेत. त्यांचे काबाडकष्ट,तडजोडी याकडे दुर्लक्ष करून तो स्वतःचा आनंद शोधतोय. त्यांची ‘समस्या’ त्यांच्या  ‘विचारांमध्ये’ तर नाही?
                                           


वर उल्लेखलेल्या सगळ्यांची कौटुंबिक,सामाजिक परिस्थिती वेगवेगळी आहे. वय,विचारसरणी आणि निर्णयप्रक्रिया वेगवेगळी आहे. पण संघर्ष तोच आहे, पैशांमधून मिळणारा आनंद? की त्यापलीकडे असलेला आनंद? कोणत्या दिशेने शोध घ्यायचा,याचा निर्णय प्रत्येकाचा वेगळा. कुटुंबासहित आनंदाने जगण्यासाठी लागणारं पैसा हे एक साधन आहे आणि आयुष्याचे साध्य असलेला खरा ‘आनंद’ उपभोगायला काहीच लागत नाही, हे समजण्यासाठी आधी आपल्याला जाणीवेने जगणं तर शक्य आहे?
एकदा पालकत्त्वावरच्या एका कार्यशाळेत कुटुंब, एकमेकांमधली नाती या मुद्द्यावर चर्चा सुरू असतांना "माणूस म्हणून आपल्या जगण्याचा आधार काय असतो? तुम्हाला काय वाटतं?"
या प्रश्नाला अनेकांनी ‘पैसे’किंवा ‘आर्थिक स्थैर्य’असं उत्तर दिलं. आजच्या  काळाचा विचार केला तर मला हे प्रातिनिधिक वाटतं. पैसे हे केवळ आपण स्वयंपूर्ण असण्याशीच निगडित नाहीत तर समाजात आत्मविश्वासाने जगण्यासाठी लागणारी अत्यंत महत्त्वाची बाब आहे हे सर्वमान्य आहे पण जगण्याचा आधार तोच एकमेव वाटावा इतपत?  माणूस म्हणून आपल्या एकमेकांशी असलेल्या नात्यात याचं स्थान कुठे आहे? जवळच्या नात्यांवरदेखील या दृष्टिकोनाचा प्रभाव असावा इतकं प्रभावी ते आहे का? नात्यांमध्ये एकमेकांबद्दल जाणवणारी भावना सगळ्यात प्रभावी असते की व्यवहार?
आपल्या आजूबाजूला असलेल्या वातावरणातून काय पोहोचतंय आपल्याला? आपण काय घेतो? अजून संस्कारक्षम असलेली आपली मुलं काय घेत आहेत? सजग, सावध असायला नको?
आजूबाजूला असलेल्या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे इतरांचे वागणे, बोलणे, सवयींमधल्या वेगळ्या गोष्टीं, विरोधाभास याकडे मुलांचं कुतूहल वळतं. येणाऱ्या कोणत्याही अनुभवाचा अर्थ त्यावेळी जरी पूर्णपणे समजला नाही तरी त्या अनुभवात जाणवणारी भावना मुलांच्या मनात घर करते, त्यातून त्यांची स्वतःची, इतरांबद्दलची समज,वेगवेगळ्या धारणा तयार व्हायला लागतात.
आजूबाजूला असलेल्या लोकांचं एकमेकांशी, पैशांशी असलेलं नातं विश्वासाचं आहे की अभावाचं आहे,असुरक्षिततेचं आहे की भीतीचं आहे, तिरस्काराचं आहे की उदासीनतेचं आहे यातून त्यांचाही पैशांकडे बघण्याचा दृष्टीकोन घडत जातो. ही एक चौकट असते,अनुभवांनी दृढ होत जाणारी. विचार,भावना आणि वागण्यावर प्रभाव टाकणारी. निर्णयप्रक्रियेला आकार देणारी. याच टप्प्यावर कधीतरी पैशांशी प्रत्यक्ष पहिली ओळख होते.आईच्या कडेवर बसलेल्या लहान मुलांच्या हातात पाहुण्यांनी पैसे दिले तर तुम्ही कधी बघितलंय त्यांनी ते फाडून टाकले आहेत? ते महत्त्वाचे आहेत हे त्यांच्या डोळ्यातली चमकच सांगते. पैसे जमा करणं,मोजणं आणि मन:पूर्वक जपणं यातून त्याचंही पैशांशी नातं जुळायला सुरवात होते. घरात पुरेसे पैसे असतील आणि नसतील तर त्यातून येणारे अनुभव त्यांना शिकवत जातात. पैसे वापरून आनंद मिळतो, अनेक गोष्टी सोप्या होतात यातून पैशांची सांगड आनंदाशी,सुखाशी आहे यासारखे समज तयार व्हायला लागतात. कुटुंबातल्या वातावरणातून मिळालेली मूल एकतर स्वीकारणार किंवा नाकारणार. जास्तीतजास्त पैसा मिळवणे म्हणजेच आयुष्यात यशस्वी होणे हे जसे एखाद्याच्या मनावर बिंबते तशी त्याबाबतीतली तटस्थता,उदासीनताही मनात रुजू शकते.
मोठ्यांच्या वागण्याच्या प्रकाशात मूल स्वतःच्या मनाशी नकळत अंदाज,आडाखे बांधत जाते. कुटुंबाचा उंबरठा ओलांडून मुलं ज्यावेळी परिसराशी आणि समाजाशी जोडली जातात त्यावेळी हा परीघ आपोआप विस्तारत जातो कारण जवळ भरपूर पैसा असूनही गरजेसाठीसुद्धा खर्च करायला राजी नसलेली माणसे आजूबाजूला असतात  तशी जवळ पैसे नसतांनाही कर्ज काढून मौजमजा करणारेही अनेक असतात. स्वतःकडे जे असेल ते  मन:पूर्वक देऊन दुसऱ्यांच्या अडीअडचणींना धावून जाणारे लोक असतात तर केवळ स्वतःपुरतं बघणारेही असतात. श्रीमंतीचे प्रदर्शन करणारीही, सगळं असूनही माझ्याकडे काहीही नाही,दाखवणारी, एकमेकांना फसवणारी, हिसकावून घेणारी,उधळी,काटकसरी, कद्रू,कंजूस, हिशेबी,व्यवहारी,दानशूर अशा अनेक शब्दांनी ज्यांचे वर्णन केले जाते अशी सगळी माणसे आपल्या आजूबाजूला असतात. भावना बाजूला ठेऊन निर्ममपणे व्यवहार बघणारी, आई-वडिलांना निराधार सोडून पैशांअभावी हाल सोसायला लावणारी, वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्ती विचारांची माणसे असतात. विचारांच्यामागे असलेल्या त्यांच्या मनातल्या धारणा त्यांना विशिष्ट भूमिका घ्यायला भाग पडतात. एकमेकांशी असलेल्या संबंधांवर प्रभाव असलेला घटक आहे पैसा. एकमेकांमधला ‘विश्वास’ आणि ‘प्रेम’ठरवणारा घटक आहे ‘पैसा’.
केवळ योग्य, अयोग्य या साच्यात न बसवता आपलं त्याच्याशी जोडलं गेलेलं नातं शोधायला हवं. कारण पैसा तटस्थ आहे, त्याचे मूल्य आपल्या ठरवण्यावर अवलंबून आहे. त्याआधी माझं इतरांशी आणि खुद्द माझ्याशीही असलेलं नातं काय आहे, हेदेखील त्या प्रकाशात तपासून बघायला हवंय. शोधायचंय? मग छातीवर हात ठेऊन सांगा, गूगलपे वरून १० रुपये कॅशबॅक आली की खुश व्हायला होतं? आणि ‘बेटर लक नेक्स्ट टाईम’ आल्यावरहसू नका, फक्त सांगा आपण त्याच्या ताब्यात आहोत? की तो आपल्यापैसा आपली पकड घेतो,जगण्याची दिशा ठरवतो की आपले जगणे सुसह्य व्हावे यासाठी आपल्या इच्छेप्रमाणे आपण तो वापरू शकतो? या प्रश्नाच्या उत्तरात आहे तुमच्या मनातलं खरं उत्तर. 
कारण सगळ्यात शेवटी हेच खरंय की आपण पैशांसाठी नाही तर पैसा आपल्यासाठी आहे. पैशांबरोबरच्या व्यवहारातून माणसाचं मन दिसतं. पारदर्शक, स्वच्छ, आर्थिक, मानसिक, वैचारिक  व्यवहार असलेल्या माणसांचे जगणेदेखील तसेच असल्याची उदाहरणे आपण आजूबाजूला अनुभवतो. विवेकी विचारांनी श्रीमंत असलेली कुटुंबे आपल्या आयुष्यातील या महत्त्वाच्या घटकाचा योग्यविचार आणि संतुलित विनियोग करून स्वतःचे आणि इतरांचेही आयुष्य सुंदर,आनंदी बनवू शकतात.
आपल्यालाही बघायला हवे, आयुष्य सहज, सुंदर करणारी ही जादू आपल्याला जमलीये का ते?

© डॉ अंजली औटी

   (फोटो आंतरजालावरून साभार )
( मन:पूर्वक आभार दै. महाराष्ट्र टाइम्स "मैफल पुरवणी")