बुधवार, ३० मे, २०१८

मुखवटा






कधी नकळत तर 
कधी समजून उमजून
जाणीवपूर्वक
ती चेहऱ्यावर चढवते अनेक चेहरे
स्वतःचं आयुष्य जगतांना..
कधी कोणासाठी तर
कधी कोणासाठी
बदलत राहते क्षणोक्षणी स्वतःला
अनेकांच्या इच्छांचे मुखवटे
आपल्या चेहऱ्यावर वागवतांना
ती खूप मागे सोडून येते
आपल्याच अस्तित्वाच्या पाऊलखुणा
कधीच नसते तिची तक्रार काही
ना खंत असते तिला कसली
आपल्यापुढच्या रिंगणातच
तिची सामावते अवघी सृष्टी
कधीच विस्तारत नाही तिचा परीघ
बदलत नाही क्षेत्रफळ
तिच्या आयुष्यातल्या सगळ्या दिवसांवर
कुठेच उमटत नाही खास तिची मोहर
आयुष्य संपूनही जाते..
वाटते तिला, असेच तर असते जगायचे
जगात येणे आणि निघून जाणे
चारचौघींसारखेच आपलेही व्हायचे..
कुठे असतात स्वप्नं तिची?
कुठे ध्येय, आकांक्षा
स्त्रीत्व ओलांडून बाहेर झेपावेल
अशी उत्कट एखादी मनीषा
कस लागावा जगण्याचाच इतके
'माणूस' होऊन जगावे
सुख-दुःखाच्या पलिकडे जाऊन
एकटेच आयुष्याला भिडावे
शंभरात एखादीच
चालू शकते अशी वाट
बाकी सगळ्या मेंढ्या चालतात
एकामागोमाग नाकासमोरची वाट

© डॉ अंजली अनन्या
# स्रीसूक्त: एक शोध
(फोटो स्केच : गुंजन )





गुरुवार, १७ मे, २०१८

मन मनास उमगत नाही!



                                                              मन मनास उमगत नाही!

आज मानसीचा वाढदिवस होता.. दिवसभर ती वाट बघत होती आणि तन्मय साफ विसरून गेला तिचा वाढदिवस!
सकाळपासून अनेक लोकांनी लक्षात ठेऊन तिला मेसेज,फोन केले पण तिचं सगळं लक्ष होतं तन्मयकडे.
संध्याकाळपर्यंत तिला वाटत होतं की तिच्यासाठी त्याने काही सरप्राईज प्लॅन केलं असावं..
पण त्याचं रुटीनतर नेहमीसारखंच सुरु, मग तिनेच काहीतरी निमित्त काढून तीनवेळा त्याला फोन केले.
शेवटी विचार केला आता आपणच त्याला संध्याकाळी सरप्राईझ देऊया..तिने संध्याकाळ दोघांसाठीच प्लॅन केली.
तसा तो ऑफिसमधून आल्यावर फार उत्सुक नव्हता घराबाहेर पडायला पण तिचा उत्साह बघितला आणि  तयार झाला येण्यासाठी. दोघांची संध्याकाळ एकत्र छान गेली.
तिनेही आज तिचा वाढदिवस आहे असे त्याला सांगता त्याच्याबरोबर मस्त गप्पा मारल्या.
रात्री ती छान तयार होऊन येईपर्यंत तन्मय बेडवर आडवा झाला, तो गाढ झोपूनच गेला.
“खूप थकतो का आजकाल तन्मय..?” मानसीला काळजी वाटली.
त्याच्या अंगावर पांघरूण नीट टाकत ती पण आडवी झाली.
मनात जाणवणारी नाराजी तिथल्यातिथे पुसून टाकत ती शांत झोपून गेली.

त्यानंतर पुढच्या आठवड्यात तन्मय सकाळचा चहा पीत बसला होता आणि मानसी सकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीत होती.
अचानक तन्मय तिला म्हणाला, अगं..आज गौरीचा वाढदिवस आहे!
गौरी,तन्मयची मैत्रीण.तन्मयने तिला फोनही लावला,..” बघ गौरी,मीच केला ना तुला पहिला फोन..? असं म्हणून तिची चेष्टा करत तन्मय म्हणाला ..सांग संध्याकाळी कुठे भेटूया सगळे?...” हसत-खेळत बोलणं सुरु होतं..
धर मानसीशीपण  बोल ग..तिलाही तुला शुभेच्छा द्यायच्या आहेत!” असे म्हणून तन्मयने मानसीच्या हातात अचानक त्याचा मोबाईल दिला..
मग मानसीने पण तिला शुभेच्छा देऊन,थोड्यावेळ तिच्याशी बोलून पुन्हा फोन तन्मयकडे दिला. गौरीशी बोलताबोलता तन्मय बाहेर हॉलमध्ये जाऊन बसला.
त्यानंतर त्यादिवशी दिवसभर मानसीचे लक्ष कशातही लागेना.
लगेच एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देईल,असा तिचा स्वभाव नव्हता पण मनातले विचार काही केल्या आज तिला थांबवता येईनात.
एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलं,काही आवडलं नाही तरी त्यात आधी दुसऱ्या व्यक्तीच्या बाजूने विचार करण्याचा तिचा स्वभाव होता.
घडलेल्या घटनेतून लगेच विपरीत अर्थ काढता त्यावर सारासार विचार करून आपल्या पद्धतीने मार्ग काढायचा अशी तिची आवडलेल्या गोष्टींवर विचार करण्याची खास पद्धत होती.
कदाचित म्हणूनच सगळ्या नातेवाईकांमध्ये आणि मित्र-मैत्रिणींमध्ये ती समजूतदार,लाघवी म्हणूनच लोकप्रिय होती.
उगीचच एखाद्याबद्दल गैरसमज करून घेईल, राग मनात ठेवेल असे ती वागत नसे.

तन्मयशी तिचं लग्न होऊन आता दोन वर्ष पूर्ण झाली होती.
पण इतर सगळ्या नात्यात सहजसाध्य होणारी शांतता तिच्या आणि तन्मयच्या नात्यात मात्र तिला सहजपणे आणता येत नव्हती. मन नाराज करणारे अनेक छोटे छोटे प्रसंग त्यांच्यात घडत असत.
मानसी तिथल्यातिथे विषय सोडून देई, फार मनावर घेत नसे आणि त्याला त्याबद्दल बोलून तर मुळीच काही दाखवत नसे.
पण आज मात्र तिला पहिल्यांदा अस्वस्थ वाटत होते.

वरवर बघता प्रसंग किती साधा होता..कोणाच्याही घरात घडू शकतो..नव्हे कित्येकदा घडतो सुद्धा..
बायकोचा वाढदिवस नवरा विसरतो? आणि विसरतो तर विसरतो..पण सगळा दिवस निघून जातो तरी त्याच्या लक्षात येत नाही..?
आणि तिचा वाढदिवस विसरलेला नवरा स्वतःच्या मैत्रिणीचा वाढदिवस मात्र लक्षात ठेवतो आणि सकाळीच तिला त्यासाठी फोन पण करतो..या पार्श्वभूमीवर हा प्रसंग तिच्या मनात ताण निर्माण करत होता. नाराज झालं मन.
आणि ज्याच्यामुळे ताण निर्माण होत होता त्या तन्मयला  तर याची काहीच कल्पनादेखील नव्हती.
मानसी तिच्या स्वभावाप्रमाणे विचारात आणखी खोल बुडाली.

या दोन्ही प्रसंगात दोघांचं वागणं आणि बोलणं, विचार करणं यातून दोघांचेही मूळ स्वभाव तिच्या लक्षात आले
यात ‘चांगले’ किंवा ‘वाईट’ असे लेबल लगेच कशाला लावायचे? तिने थोडा अलिप्तपणे विचार केला.
तन्मयने आपला वाढदिवस स्वतःहून लक्षात ठेवावा म्हणून त्याबद्दल त्याला जराही कल्पना न देता मी दिवसभर वाट बघितली.
त्याच्या मैत्रिणीशी फोनवर त्याला अपेक्षित असलेला संवाद साधून अचानक समोर आलेला क्षण तत्परतेने सावरून घेतला आणि माझ्या मनातल्या नकारात्मक विचारांवर माझं नीट लक्ष आहे ..ही झाली माझी बाजू.
आणि आपल्या व्यस्त दिनक्रमात वाढदिवस साफ विसरून गेलेला काहीसा प्लॅनिंग बाबतीत बेफिकीर तन्मय..
केवळ माझ्यासाठी दमलेला असूनही पटकन बाहेर जाण्यासाठी तयार झाला..
त्याचा  बिनधास्तपणा मला बिलकूल आवडला नाही, न विचारताच पटकन गौरीशी बोलायला माझ्या हातात फोन दिला!
दोन टोकाचे स्वभाव असलेल्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहोत आम्ही.
एकमेकांबरोबर एकत्र राहतांना आणि वागतांना आपल्यासारखाच दुसऱ्याचा विचार करणं याला ‘संवेदनशीलता’ म्हणतात.
अशी संवेदनशीलता तन्मयला आपल्या स्वभावातून दाखवता येत नाहीये याचा अर्थ असा नाही की ती त्याच्यात मुळातच नाहीये.
मनाच्या या स्थितीत मानसी असतांनाच आणखी एक प्रसंग घडला....
एका संध्याकाळी तन्मयच्या मित्राकडे, अनिकेतकडे सगळेजण जमले होते.
एकत्र बोलता बोलता त्यांची गप्पांची गाडी घसरली एखाद्या गोष्टीवर आपलं मत मांडण्यासाठी बायका कशी आणि किती घाई करतात यावर!

घरापासून ऑफिसपर्यंत आणि राजकारणातल्या स्त्रियांपासून ते जागतिक पातळीवर यशस्वी असलेल्या उद्योजिकांपर्यंत तावातावाने सगळ्यांची चर्चा सुरु होती..
मग हळूहळू आपण बोलतांना, विचार करताना कसं अनेक गोष्टी गृहीत धरतो..त्याचं एकदम सामान्यीकरण (generalization) करून टाकतो याकडे लक्ष वेधलं कुणालने.
सगळ्याच बायका अशा असतात, असं म्हणणं वस्तुस्थितीला अजिबात धरून नव्हतं.
मग या गृहीत धरण्यावरून गप्पांची गाडी आपण आपल्या जवळच्या लोकांना देखील आपण किती आणि कसे गृहीत धरतो याकडे वळली.
“साधे आपल्या जवळच्या लोकांचे वाढदिवस तरी आपल्या लक्षात असतात का?” कुणाल म्हणाला.
मानसीचा वाढदिवस तारखेने तर तन्मयच्या लक्षात होता पण ती तारीख होऊन गेली आहे हे त्याच्या पटकन लक्षात आले.
कमालीचा खजील झाला तो..आणि त्या पुढच्या आठवड्यातला गौरीच्या फोनचा सगळा प्रसंग देखील त्याला आठवला. पुढच्या गप्पांमध्ये मग त्याचे लक्षच लागेना..कधी एकदा घरी जातोय असे होऊन गेले त्याला.
जेवण झाल्यावर कुल्फी खायला जायचा बेत होता सगळ्यांचा पण तन्मय आणि मानसी उशीर झालाय म्हणून तिथून निघालेच.

“मानसी,काय ग, आठवण तरी करून द्यायचीस न मला..रागावली आहेस ना माझ्यावर?..घरी गेल्यावर शंभर उठाबश्या  काढतो आता ..चुकलं ग माझं..चुकलंच...” त्याला खूप खूप वाईट वाटत होते.
मानसीच्या देखील लक्षात आले होते जे काही घडले ते केवळ अनावधानाने..गौरीचा वाढदिवस लक्षात राहिला ते फेसबुक वर समजलं म्हणून..आपण तर फेसबुकवर नाही म्हणून त्याला समजलं पण नाही..हे ही लक्षात आले.
तिला वाटलं की बरं झालं, की त्याचवेळी वाईट वाटलं तरी मी शांत राहिले ..बोलून काहीही दाखवलं नाही..नाहीतर मनातला राग क्षणात व्यक्त करणं काय एका सेकंदाचं काम!   

एखाद्या प्रसंगात शांतपणे आणि संयमाने व्यक्त होण्याची माझी वृत्ती ही माझ्या स्वभावातली ताकद आहे,कमजोरी नाही काही..मानसीला स्वतःबद्दलच छान वाटायला लागले.
तन्मयच्या आणि माझ्या नात्याची सुरुवात आहे, एकमेकांबरोबर छान चाललंय आमचं अनेक बाबतीत,प्रत्येक वेळी माझ्याच मनासारखं गाणं लागलं पाहिजे असं काही नाही..काही विसंवादी सूरपण येतीलच की मध्ये मध्ये.. पण दिवसातल्या जगण्याची लय तुटू द्यायची नाही.. एकमेकांच्या विचारांची, स्वभावाची आणि सोबतीची लय...मग बघताबघता सूर एकमेकांशी संवादी व्हायला लागतात,जुळतात आणि एक सुंदर मैफिल बहरू शकते..कोणत्याही नात्यात..

आमच्या दोघांच्याही नात्यात ती शक्यता नक्की आहे!        

             


नात्यातला एकमेकांवरच्या विश्वासाचा आणि समजूतीचा पदर एकमेकांत अडकून गाठ तयार होण्याआधीच केवळ संयमाने आणि समजूतीने थोडासा गुंता हलक्या हाताने मोकळा झाला होता..पुन्हा रेशमी धागे मऊ आणि हळूवार झाले होते..आता मात्र मानसीचे मन संपूर्णपणे शांत झाले होते..आता एका सुंदर मैफिलीचे आवडते चित्र तिच्या डोळ्यासमोर होते!

©डॉ. अंजली/अनन्या 
# कॅलिडोस्कोप