सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

नुसतं प्रेम कर!


बाल्कनीत काही झाडं आहेत आमच्याकडे..बरीच आवडती झाडे खाली सोसायटीच्या कॉमन जागेत लावली आहेत.
गुलाबाची आहेत आणि एक पामचं पण आहे.

खास मला आवडतं म्हणून एक जाईचं रोप आम्ही आणलं.
छानशा मोठ्या कुंडीत ते लावलं. हळूहळू ते मोठं झालं..पूर्वी नाजूक वाटणारा वेल इतका विस्तारला की आमच्या बाल्कनीतून तो शेजारच्या घराच्या बाल्कनीत विसावला.
वेळच्या वेळी त्याला पाणी घालणं आणि घरीच तयार केलेलं खत त्याच्या मुळांशी मशागत करून घालणं हे फार मनापासून करायचे मी.

बाल्कनीतल्या त्या कोपऱ्यापासून आमच्या दिशेने वळवलं तरी त्याच्या फांद्या शेजारच्या बाल्कनीकडेच वळायच्या..त्याचा नैसर्गिक कल तो असावा कदाचित..हळूहळू त्याला फुलं यायला लागली..अर्थातच त्याचा सगळा विस्तार शेजारच्या बाल्कनीत असल्यामुळे हात जिथपर्यंत पोहोचेल तितकीच फुले मला काढता येत असत..शेजारच्या घरात मात्र फुलंच फुलं..जाईच्या फुलांचा घमघमाट असायचा शेजारच्या बाल्कनीत!
कधीतरी पूजेला जास्त फुलं हवी असतील तर ती आम्हाला आमच्या शेजारच्यांना मागावी लागत..
त्यांच्या बायकोच्या केसात जाईचाहातभार लांब गजरा असे!!
आणि गजऱ्यासाठी फुलं हवी असतील तर मला मात्र त्यांना ती मागावी लागत..
एकूण काय तर बहर त्यांच्या घरात आणि "काय हा तुमच्या वेला चा कचरा" म्हणून गाऱ्हाणी आमच्या दारात..
शिवाय अधून मधून वेड्यावाकड्या पद्धतीने त्यांनी वेलाची कटिंग केली तरी मला त्याच्या किती वेदना होतात..
त्याची फुलं दुरुनही मला आनंद देत..रोज आठवणीनं पाणी घालणं हे ही माझ्याकडून सहजपणे होत असे.
हळूहळू फुलांसाठी तो वेल शेजाऱ्यांचा आणि पाणी, खत..देखभाल यासाठी आमचा असं एक रुटीन ठरून गेलं..

कधीतरी कातर संध्याकाळी टपोऱ्या कळ्यांनी भरलेल्या त्याच्या रुपाकडे नजर जायची..अर्धवट उमललेल्या त्या फुलांचा मोहक गंध वातावरणात भरून राहिलेला असायचा..असं वाटे की त्या कळ्यांना हळुवार स्पर्श करावा..तो गंध डोळे मिटून अनुभवावा..
पण मध्ये एक भिंत..
काही केल्या मला ती पार करता येणे शक्य नव्हते.
केवळ बघून समाधान मानणं कधी कधी शक्य होत नाही.
तू अपेक्षा करू नकोस..तू फक्त देत रहा..
करत रहा..
म्हणणं किती सोपं आहे नाही?
त्याचं अस्तित्व..माझ्या इतक्या जवळ आहे आणि त्याचा बहर.. उमलणं..फूलणं मात्र लांब..
मी एक आयुष्यावर भरभरून प्रेम करणारी साधी व्यक्ती..

माझा आनंद दुसऱ्या कोणी मला ओंजळभर देईल यासाठी मी वाट का बघायची? आणि किती?
कारण आहे या परिस्थितीत बदल तर घडून येण्याची शक्यता तर नाहीच.
आता कधी या गोष्टीचा त्रास पण होतो..
मला आता हा नकोच म्हणून त्याला मुळापासून उपटून काढून टाकता येत..ना त्याची जागा बदलता येत..

आता मला हवाच म्हणून मोठ्या प्रेमानं वाढवलेल्या, जोपासलेल्या या वेलानं मला आयुष्याच्या मूलभूत प्रश्नापाशी आणून सोडलंय..

प्रेम कर पण अपेक्षा मात्र करू नकोस...अध्यात्मिक मार्गावरची साधक असते तर सोपं झालं असतं, नाही? 


          असंच होतं..
आयुष्यातले अगदी साधे वाटणारे आनंद देखील इतके प्रश्न निर्माण करतात मनात.
काय म्हणणं असतं तसं बघायला गेलो तर आपलं?
अगदी साधं.. शिवाय आपल्या हक्काचं असलेलंच हवं असतं की आपल्याला.
लोकांचं काही तर त्यांनी स्वतः हून दिलं तरी आपण पटकन घेणार नाही.
असे असतांना अगदी सध्या वाटणाऱ्या गोष्टी देखील विचार करायला लावणारे प्रश्न घेऊन सामोऱ्या येतात.
आणि गंमत म्हणजे 'साधू' वर्गातल्या अपेक्षा अपल्याकडूनच व्यक्त केल्या जातात.
कसला वैताग येतो माहितीये?
चिडचीड होते अगदी.
अशी परिस्थिती समोर उभी राहते..वारंवार..
पण प्रत्येकवेळी एकाच पद्धतीने react होतो आपण..सवयीने!
पण आजकाल ना एक मजेशीर खेळ खेळते मी मनातल्या मनात.
त्याला नाव पण दिलंय मी!

कॅलिडोस्कोप.

आठवतोय?
...हो तोच!
जरा दिशा बदलली हाताची की आत दिसणारी नक्षी वेगळी!
जरा दिशा बदलली मनातल्या विचारांची की वेगळी शक्यता आपल्या वागण्याची.
लहानपणाचा खेळ पण आता वेगळ्या स्वरूपात खेळायला काय हरकत आहे?
याने होतं काय माहितीये?
आपण कसे वागू शकतो याचे वेगवेगळे पर्याय आपल्या लक्षात यायला लागतात हळूहळू.
आणि वेगळा पर्याय म्हणजे वेगळा परिणाम.
असे केल्याने चिडचिडीच्या जागेवर विचार केला जातो आणि जगण्यातली गम्मत लक्षात यायला लागते.
मग मला माझ्या आणि शेजाऱ्यांमध्ये भिंत दिसते पण माझ्याकाडून जाईच्या वेलाच्या रूपात मैत्रीचा हात पुढे केलाय मी हे पण जाणवतं!

माझ्या या प्रयत्नांमुळे मग मलाच छान वाटतं आणि मी नव्या उत्साहाने वेलाच्या मुळाशी असलेल्या मातीत हलक्या हाताने खत मिसळते!