रविवार, २७ मार्च, २०२२

गरज आहे 'सुरक्षित' राहण्याची..

गरज आहे 'सुरक्षित' राहण्याची..


फेसबुकवरच्या विषयांना,लोकांना कंटाळून तरुण पिढी इंस्टाग्रामकडे वळली याबद्दल अनभिज्ञ असलेल्या अनेकांना कसेही असले तरी इथेच करमते कारण त्यांच्यासाठी तोच कम्फर्ट झोन आहे. लोक म्हटले की करमणूक आली तशी भांडणे,वादविवाद देखील आले. अलिकडेच एका परंपरावादी पोस्टवर केलेल्या मुक्त, वैचारिक कॉमेंटसाठी एका स्त्रीला अनेकांनी कॉर्नर केले. आपला मुद्दा लोकांना पटवण्याच्या नादात ती त्या वादात निष्कारण गुंतत गेली. तिला दूषणे देण्यात,नावे ठेवण्यात काही स्त्रियाही सहभागी होत्या. तिच्या वॉलवरच्या इतर पोस्ट्स,फोटोज 'उथळ' ठरवून त्या स्त्रीच्या चारित्र्यापर्यंतही मंडळी पोहोचली. विषय भांडणांपर्यंत वाढल्याचा संबंधित महिलेला प्रचंड मनस्ताप झाला. 

अनेकांच्या मनोव्यापरांवर,जगण्यावर विपरित परिणाम करणारा सर्वात मोठा घटक आज सोशलमीडियाच आहे. लोकांच्या विचार,भावनांना चालना देणारा,अभिव्यक्तीची प्रेरणा देणारा. असमान्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारा. शाळकरी मुलामुलींपासून कोणत्याही वयाच्या आणि चरितार्थासाठी कोणतेही काम करणाऱ्या व्यक्तींना एकमेकांशी जोडणारा. विषयांचे ज्ञान आणि व्यासंग वाढवणारा. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला त्याची सोबत आहेच. कित्येक सामाजिक,राजकीय,पारंपरिक,

कौटुंबिक आणि अनेकदा वैयक्तिक अगदी "आज भाजी काय करू" पासून अनेक सांसारिक,खाजगी प्रॉब्लेमची चर्चाही यावर लोक बिनधास्त करतात. यामुळे प्रत्यक्ष जगणे सोपे होणार असेल तर हरकत नाही. पण कित्येकदा इतरांच्या प्रतिक्रियांमुळे मूळ प्रश्नाला फाटे फुटलेले दिसतात. विषय सोडून लोक टीका आणि टिंगलटवाळीकडे झुकतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या चढाओढीत विषयांचे गांभीर्य निसटून जाते. परखड,प्रतिकूल प्रतिक्रिया केवळ विषयापुरती मर्यादित असू शकते, हा मोकळेपणा उरत नाही. लोक व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपात अडकतात. 

मनातला एकटेपणा,अनिश्चितता यासाठी विरंगुळा म्हणून माध्यमे सहज उपलब्ध असतात. घराच्या सुरक्षित भितींमधून ऑनलाइन फेरफटक्याचे थ्रिल अनेकींना खुणावते. इतरांच्या खोट्या बोलण्याला,भूल-थापांना बळी पडून स्वतःच्या खाजगी गोष्टी,फोटो अनोळखी व्यक्तींशी शेअर करणाऱ्या आणि त्यानंतर आत्यंतिक मानसिक ताण,भीती,नैराश्येच्या चक्रात अडकणाऱ्या शालेय,कॉलेजवयीन मुली आणि महिलांची संख्या खरोखरच जास्त आहे.

एका संशोधनानुसार रोज जवळपास 40 टक्के लोक ऑनलाइन माध्यमांमधील हिंसेची शिकार होत असतात. यात महिला,मुलं आणि तृतीयपंथी मोठ्या प्रमाणात आहेत.

मानसिक ताण असह्य होऊन आपल्या आयुष्याचा शेवट करणारेही यात आहेत. 

माध्यमांचा वापर करणारे 73 टक्के लोक अशी हिंसा घडत असलेली बघणारे केवळ 'बघे' असतात. त्यांचा एक लाईकही अत्यंत धोकादायक ठरू शकतो.

फेसबुक,इन्स्टाग्राम,ट्विटर यावरच्या इन्स्टंट ज्ञानामुळे  "सगळ्याच विषयातले सगळेच कळते" असे अनेकांना वाटते. कोणताही विषय खोलवर जाऊन समजून घेण्यासाठी लागणारी कष्ट करण्याची तयारी आणि वेळ देण्याची मानसिकता नसते. सोशलमीडियाचा हा एक मोठा अडथळा सगळ्याच क्षेत्रात जाणवत असला तरी स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी अनेकांना याचाच आधार वाटतो. मग बहुतेकवेळा माहिती अनेक विषयांची पण परिपूर्ण ज्ञान मात्र एकाचेही नाही असे चित्र दिसते. 'पेशन्स कमी असणे' वृत्तीही सर्वत्र वाढतांना दिसते आहे. आक्रमकपणे व्यक्त झालं तरच आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचतं हा अनुभव आज सगळीकडे येतो आहे.

सोशलमीडियाचा वापर योग्य पद्धतीने, जबाबदारीने करणे कोणाला माहीत नाही?

खरं सांगायचं तर बहुतेकांना नाही!

केवळ सवय म्हणून,नोटिफिकेशनचा रेडडॉट अस्वस्थ करतो म्हणून लोकांचे स्टेटसचेक करणाऱ्यांना आपल्याला इंटरनेटचे व्यसन लागलेय मान्य नसते.

समाजकारण,राजकारण,अर्थकारण,देश-विदेशातील घडामोडी,वातावरण प्रत्येक  विषयावर आपले मत मांडायला हवेच याचा अट्टाहास कशाला? लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यातील प्रसंगही सार्वजनिक होतांना दिसतात. व्यक्तिस्वातंत्र्य संपून समूहात 'आपले','परके' गट तयार होतात. त्यातून प्रवास करणारा विशिष्ट समाजगट वैचारिकदृष्ट्या समृद्ध होण्याकडे नाही तर दिवसेंदिवस अधिकाधिक संकुचित होण्याकडे निघाला आहे.

यातल्या पुरुष आणि महिलांच्या प्रतिक्रिया वेगवेगळी मानसिकता दाखवतात.

धार्मिक,जातीय,राजकीय प्राधान्यक्रम घडवले जातात.

निकोप,निरीगी संवादाचे अनुभव मोजके असतात पण शाब्दिक चिमटे,बोचकारे पासून फटकारे आणि ताळतंत्र,भान सोडलेली भांडणे,मान-अपमान,रुसवे-फुगवे,तावातावाने अकाउंटच डिलिट करणे,पुन्हा परत येऊन त्याच चक्रात अडकणे यांचे नाट्य कमालीचे रंगलेले दिसते.

त्यात टार्गेट झालेल्या आणि केल्या गेलेल्या व्यक्ती कधीकधी आपल्या मानसिक सुरक्षिततेसाठी एखाद्या कंपूत,गटात असणे स्वीकारतात. कारण इथे मैत्रीबरोबर शत्रूत्त्वही सांभाळले,फुलवले,जोपासले जाते. 

विशिष्ट गटातील स्त्रियांचा सांभाळ, खास दखल,अवाजवी स्तुतीच्या प्रतिक्रिया लक्षात येण्यासारख्या असतात. त्यातून स्पर्धा, एकमेकांत कुरघोडी निर्माण होतात. गटातील सुमारदेखील विचारवंत बनतात ते याच लोकांच्या मदतीने. इतरांना मदतीचा हात देणे हे कौतुकास्पद नक्कीच पण त्याचवेळी गटाबाहेरचा सकस विचारही जाणीवपूर्वक दुर्लक्षिला जातो. टीका करून, नाहक वाद घालून नाकारला जातो. समविचारी एकत्र येतात. काहींना घरबसल्या भावभावनांचा असा तीव्र रोलरकॉस्टर किक देतो. कोणाच्या अवास्तव मानसिक गरजा त्यातून भागतही असतील पण अनेकांच्या मनोशारीरिक आजारांचे कारणही हेच असते. 

इथे एक गोष्ट आठवतेय,

मांजराची दहशत वाटणाऱ्या उंदराची दया येऊन एक जादूगार उंदराला मांजर बनवतो. पण काही दिवसांनी त्याच्या लक्षात येते की मांजराला कुत्र्याची भीती वाटतेय मग त्या उंदराचा कुत्रा होतो. आता कुत्र्याला बिबट्याची भीती वाटते, मग जादूगार उंदरालाच बिबट्या बनवतो. 'उंदीर आता सगळ्यात शक्तिमान' असं जादूगाराला वाटतंय तोवरच त्याच्या लक्षात येतं बिबट्या शिकऱ्याला,माणसांना घाबरतोय. शेवटी जादूगाराला समजतं की आपण उंदराला कोणीही बनवलं तरी त्याचं हृदय तर अखेर उंदराचंच असणार आहे! 

अशी भल्याभल्यांचं रूपांतर कशाकशात करणारी जादू सोशलमीडियाकडेही आहे. 

मग काय करायचं? ही माध्यमेच नाकारायची का? ते तर अशक्य आहे. पण मग निदान 'सुरक्षित वापर' करणे तर शक्य आहे?

आपलं मूळ म्हणजे हृदय,मेंदू माणसाचा आहे,हे कायम लक्षात ठेवायला हवं! 

माणूस का श्रेष्ठ तर त्याच्याकडेच स्वतःसाठी 'योग्य निवड' करण्याची क्षमता आहे. 

ती कशी समजेल? तर इतरांचे फोटो,पोस्ट्स बघतांना कळतनकळत त्यांच्या जगण्याशी आपण तुलना तर करत नाही ना यासाठी सतत जागरूक राहायला हवं. मनात येणारे विचार, सेल्फटॉक जाणीवपूर्वक तपासून बघायला हवा. 

इतरांना मिळणारी लोकप्रियता आणि लाईक्स आपली गुणवत्ता कमी किंवा जास्त करू शकत नाहीत. हे त्यासाठी असणाऱ्या 'अस्वस्थ' मनाला कधीतरी सांगायला हवं. 

एखाद्या पोस्टवरून किंवा प्रतिक्रियेवरून संपूर्ण व्यक्तीला महान बनवणे किंवा तिचा तिरस्कार करणे जितके आततायी तितकेच स्वतःला त्याबद्दल ग्रेट समजणेही धोकादायक आहे. आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातल्या कोणत्याही समस्येला जगातील दुसरा कोणीही कधीही तयार,रेडिमेड उत्तर देऊ शकणार नाही. कारण आपल्यापुढचे प्रश्नच वेगळे आहेत आणि त्यांची उत्तरेही आपली आपल्याच शोधावी लागणार आहेत. 

पोलिसाने पकडू नये म्हणून हेल्मेट घालायचे,बेल्ट लावायचा की आपल्या सुरक्षेसाठी? याचे प्रामाणिक उत्तर ज्यांना माहीत आहे त्यांना समाजमाध्यमांचा वापर सुरक्षितपणे का करायचा हेही नक्की समजेल.

© डॉ अंजली औटी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा