शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९

कधी 'नाही' सुद्धा म्हण..




सकाळी सकाळीच मैत्रिणीचा फोन. तिच्या आवाजात वैतागापेक्षा हतबलता जास्त होती. तिच्याकडे येणाऱ्या कामवाल्या बाईच्या मुलाला त्याचा चुणचुणीतपणा बघून तिने लहान असल्यापासून मदत केलेली होती. त्याच्या शिक्षणासाठी,दुखण्याखुपण्यासाठी,सणासुदीला असं प्रसंगाप्रसंगाने ती मदतीचा हात पुढे करे. आपल्या मुलांसारखाच हा एक,अशी भावना मनात.
त्यानिमित्ताने आपल्याकडून एक चांगलं काम होतंय अशी श्रद्धाही. तो अनेकवेळा तिच्याकडे येई आणि तिथेच रमे. तो घरातल्या माणसांना इतका सरावला की हा 'माझा मानस मुलगा' अशीच त्याची ओळख ती इतरांना मजेने सांगे.
तो शाळेत होता तोपर्यंत सगळं सुरळीत होतं तो अभ्यासपण चांगला करे पण जसा तो कॉलेजला गेला तसं त्याचं वागणं बदललं.
सगळ्यात आधी बदलला तो त्याचा हेअरकट..अशीच फॅशन आहे,म्हणून तिने छेडल्यावर त्याने ठसक्यात उत्तर दिलं. पण मग हळूहळू त्याचं वागणं,बोलणं बदललं,अभ्यासातलं लक्ष उडालं. आत्तापर्यंत चांगले मार्क मिळवणारा तो अनेक विषयात नापास व्हायला लागला, असं होतंय याचं कारण आपण स्वतः कसे नाही हे तिला पटवून देण्यासाठी तो नाना सबबी सांगून सगळं खापर इतरांवर फोडायला लागला. घरात भांडून घरातून निघून गेला. समाजकल्याणच्या विद्यार्थी वसतिगृहात आपली राहण्याची सोय त्याने करून घेतली. याच काळात तो मित्राची चारचाकी गाडी चालवायला शिकला आणि त्याने लायसन्सही काढून घेतले. आता लोकांच्या गाडीवर बदली ड्रायव्हर म्हणून तो जात असे, त्याचे मिळणारे पैसे तो स्वतःवर खर्च करायला लागला. आता अभ्यास आणखीनच मागे पडला आणि वयाच्या विशीच्या आत पैसे कामावण्यातली आणि खर्च करण्यातली नवी झिंग त्याला चढली.
तू हुशार आहेस, आधी आपले शिक्षण पूर्ण कर, असं त्याला मैत्रिणीने खूप सांगून बघितलं पण तो काही बधला नाही. कॉलेजची फी,परीक्षा फी आणि कधी काही महत्वाचं समान आणायचं या कारणाने तो सतत तिला पैसे मागे आणि मैत्रीणही त्याला आज नाही तर उद्या समजेल, म्हणून वेळोवेळी मदत करत राहिली. चालू असलेले शिक्षण अर्धवट सोडून मग दुसरेच काही मी शिकतो,माझं डोकं त्यात चालेल असं सांगून तो एकही गोष्ट धड शिकला नाही. त्याचं गाडी चालवणं मात्र चांगलं होतं,लोकं त्याला आवर्जून घेऊन जात,व्यवस्थित पैसे देत असत. मग निदान ते काम तरी तू प्रामाणिकपणे कर आणि एकीकडे शिक्षण चालूच ठेव, असं ती त्याला सांगत राही. पण मिळालेले पैसे उडवायला त्याला अनेक मार्ग मिळत.
महागडा मोबाईल, ब्रँडेड शूज आणि कोणाचीतरी घेतलेली सेकंडहॅन्ड गाडी यावर तो खुश होता.
मैत्रिणीच्या मुलांना, नवऱ्याला तो गावात भटकताना दिसे. ते तिच्यावरच चिडत. एकदा त्याला कोणा मुलीबरोबर बघून खबरदार त्याला पुन्हा मदत करशील तर या शब्दात नवऱ्याने तिला सुनावलं.
तिचा जीव थोडा थोडा होई. हिच्याकडे काम करणारी त्याची आई तर कधीच तिचं काम सोडून गेली होती. तिला बोलावणं पाठवून तिने तिला त्याच्याकडे लक्ष देण्याबद्दल सांगितलं. पण तिने आता तो कोणाच्या बापाचं ऐकत नाही, स्वतःला पाहिजे तेच करतो,घरात पैसे देत नाही म्हणून त्याला आम्ही घरातून काढून दिल्याचं सांगितलं.
                        


तिला वाटे, लहानपणी चांगलं असलेलं मूल वाईट मार्गाला जात असतांना हातावर हात धरून कसं बसायचं?
पुन्हा मदत मागायला आला की तीच संधी समजून ती जीव तोडून त्याला समजावत असे. तो ऐकूनही घेई आणि आता मी तुम्ही सांगताय तसं वागतो,असं वचन पण देई, कधी रडे, आणि निघतांना त्याला हवे असलेले पैसे देऊन, ही शेवटची मदत बरंका, असं ती त्याला आणि स्वतःलाही बजावे.
पण पुन्हा पाहिले पाढे पंचावन्न.
आता या चक्रातून बाहेर कसं पडू? तिला समजेना.
मी तर चांगलंच करायला गेले ना ग. माझी मुलं काय शिकली यातून? कोणाला मदत केली तर हे असं होतं, म्हणून? बोलून दाखवतात मला ते. एखाद्याचं भलं करायला गेले तर माझ्याच मुलांना हे काय जीवनमूल्य देऊन बसले मी?
मलाही आता कोणाला मदत करायची इच्छा होत नाही..या अनुभवाचा कडवटपणा तिच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. तिची मदत वाया गेल्याचं शल्य तिला त्रास देत होतं.
तो लहान असतांना त्याला अभ्यासात,मोठं होण्यात मदत करण्याबद्दल तिच्या मनातला भाव स्वाभाविक होता,कोणाला मदत करणे यात वावगे काही नाही. पण त्यानंतर तो आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीसाहित घडत असतांना त्याच्यात होत गेलेले बदल दिसत असूनही त्याच्या अवाजवी मागण्या मान्य करत राहणं आणि त्याची गरज भागवण्यासाठी तयार असणं, हे सगळं घडलं ते तिच्या स्वभावातल्या भीडस्तपणामुळे.
तिच्या या स्वभावाचा त्याच्यासारख्या चाणाक्ष मुलाने फायदा करून घेतला हे तर दिसतच होतं.
'मानस मुलगा' असं कितीही म्हटलं तरी ते वाटणं तिच्या एकटीचं होतं. त्यादृष्टीने त्याची गुंतवणूक कधी नव्हतीच. कुठे थांबायचं, हे तिला समजलं नाही. म्हणून तिने देऊ केलेली मदत नंतर त्याची सवय झाली. त्यापेक्षा ठामपणे मदत नाकारून त्याला योग्य शब्दात समज देण्यातून तिच्या मुलांनादेखील या अनुभवातून काय शिकायचे हे समजले असते आणि तिला होणारा मनस्तापही वाचला असता.
शिवाय त्याने चांगलं शिकावं आणि मोठा व्हावं हे फक्त तिलाच वाटून काय उपयोग?
त्याला स्वतःबद्दल काय वाटतंय यातून त्याचं सगळं वागणं घडत होतं. आजूबाजूच्या वातावरणात असलेल्या चकाचौंधमध्ये या वयाच्या मुलांना भुरळ घालणारी कितीतरी आमिषे आहेतच की. सुस्थितीतल्या घरातले पालक जसे आपल्या मुलांसाठीच जगतात तसे हे कष्टकरी पालकही. हातावरच्या पोटाला चार घास मिळवण्याची कसरत करतांना आपल्या मुलांनी शिकावे आणि मोठे व्हावे अशी स्वप्न बघणारे पालक यांचेही नक्की आहेत. सगळीच मुले मोहमय जागाच्या आहारी जातात असे नाही. आजूबाजूच्या वातावरणातून स्वतःसाठी काय निवडायचे याचे पर्याय त्यांच्यापैकीच अनेकजण किती वेगळे निवडतात,याची उदाहरणे आपण नेहमी बघतो. आपल्याला मिळालेल्या संधीचे बोट धरून स्वतःच्या आयुष्याचे सोने करून घ्यायचे की त्याच संधीचे संधीसाधू वृत्तीने मातीमोल करायचे ही निवड प्रत्येकजण आपापल्या वृत्तींनुसार करतो.
लोकांना मदत करण्याची प्रेरणा तुझ्यात नैसर्गिक आहे शिवाय या अनुभवाने तुला योग्यवेळी ठामपणे नाही कधी म्हणायचे, हे नाही का शिकवले?
स्वभावात असलेला चांगुलपणा हा दुर्मीळ गुण आहे, तो नक्की जपायचा मात्र त्याचे रूपांतर दोषात होणार नाही,याची काळजी घेऊनच.
आता तिच्या आवाजात तिचा नेहमीचा सौम्य गोडवा परत आला आणि माझी सकाळ सत्कारणी लागली.
© डॉ अंजली अनन्या