मंगळवार, ८ जून, २०२१

#मानसआरोग्य डायरी 8

एकदा मनाने स्वीकारलं ना की काही दिवस,महिने, कदाचित अजून वर्षही हे असंच चालणार आहे की मग अचानक चष्म्यावरची धूळ पुसली गेल्यासारखं सगळं स्पष्ट दिसायला लागतं. 
जगण्याचा पुन्हा नव्याने विचार करायला हवा.
स्वतःच्या टिकून राहण्याच्या क्षमता वाढवण्यात सगळी जीवनऊर्जा वापरायला हवी.
रोजचा दिवस जसा उगवेल तसे आपण जगत जातो. आपल्यासाठी जगणं असतं फक्त पुढे पुढे जाणं. 
ध्यानी मनी नसतांना आपली अनेक माणसं निघून गेली अचानक, विचारही नसेल आला त्यांच्या मनात  की पुढचा पावसाळा,हिवाळा बघण्यासाठी असू आपण?

हे नुसतंच बघतोय आज आपल्या आजूबाजूला. मनातलं शहाणपण अजूनही डोळस होऊ नये?
भरभरून जगण्याचे क्षण जाणिवेतून पूर्ण निसटण्याआधीच जागं व्हायला हवंय.
जगण्याची मूल्य पुन्हा पुन्हा तपासायला हवीत.
कधीतरी आपणच संकुचित केलेल्या जाणिवेच्या कक्षा ओलांडून जगण्याकडे पुन्हा नव्याने बघायला हवं.  

माझीतरी पूर्ण ओळख आहे मला? जग जाऊदे पण माझ्या माणसांची तरी किमान?
जगात कुठे काय चाललंय हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे,असेलही.. पण माझ्याच माणसांची प्रेमाची भाषा अनोळखी,अपरिचित राहून?
माहीत आहे का मला, काय आवडतं 'तिला' मनापासून आणि 'त्याला' दिलखुलास आनंद कशात मिळतो हे?
इतर सगळ्यांची भाषा समजते आणि तिच्या स्वरातली केवळ कटकटच का कानावर पडावी?
त्याच्या हाकांसाठी मनाची कवाडे बंद का असावीत?

मनातल्या असमाधानाचे रस्ते बाहेरच्या दिशेने वळत जातात आणि 'हे हवं','ते हवं' यांच्या शोधात स्वतःला विसरायला होतं.
आयुष्याचे क्षण तेवढे भुरुभुरु निसटून जातायेत. 
निसटून जातं त्यातलं काहीच तर पुन्हा परत येत नाही.
अपयश,अवहेलना,असमाधान,दुःख हे समोर आलं की मनात नकोसेपण दाटून येतं.
'नकार'च जर मनभर घुमत असेल तर अजून काय होणार?
या भावना जाणवल्या की नाकारायच्या,आणखी त्यांचं काय करायचं हे कोणीच कसं कधी शिकवत नाही?
मला खूप राग येतो तो दुसरं कोणी आपल्याशी वाईट वागल्यावर.
वाईट वाटतं, ते दुसरा कोणी काही बोलला त्याचं.
जे काही आवडत नाही ते सगळं कायम दुसऱ्याच कोणामुळे.
ही दुसरी लोकं माझ्याशी प्रेमाने,आपुलकीने वागली तरच मला आवडेल, मग मी एकदम आनंदी. कोणी प्रश्न विचारायचे नाहीत,कोणी विरोध करायचा नाही,कोणी तक्रार करायची नाही. यापैकी काही केलं की माझं सगळंच बिघडणार. मला वैताग,राग,चिडचिड होणार.
का? याला मी नाही,दुसरे जबाबदार.

माझं वाटणं, माझ्या भावना माझ्या ताब्यात नाहीत? न आवडणारी परिस्थिती समोर आली तर तिला जीव तोडून विरोध करण्यात माझी सगळी शक्ती एकवटते. 
लहानपणापासूनच मनाला काही आवडलं नाही तर त्याचा सामना कसा करायचा हे का नाही सांगत कोणी आपल्याला?
त्यांनाच माहीत नसेल का ते?

आजूबाजूला असलेला निसर्ग निःशब्दपणे सांगत असतो अनेक गोष्टी. 
झाडांना,पक्षांना, प्राण्यांना तक्रारी करतांना, आरोप करतांना बघितलंय कोणी?
तुम्ही राहू दिलं तर ते तुमच्या आजूबाजूला आनंदात राहतात,नाही राहू दिलं तर निमूट बाजूला होतात. 
"अपेक्षा नाही" हे जगण्यातलं साधं,सोपं तत्त्वज्ञान त्यांना कोण समजावतं?
त्यांना जो परिस्थितीचा स्वीकार आपसूक जमतो, समजतो,तो आपल्याला कसा नाही?
आपल्या आनंदासाठी आपण इतरांवर अवलंबून का? 
परिस्थिती,संधी नेहमीच माझ्या मनाप्रमाणे,मला अनुकूल कशी असेल?
तशी ती नसेल तेव्हा संयमाने ती चांगली होण्याची वाट बघण्याचं आणि वाट बघतांना स्वतःची मानसिकता संभाळण्याचं,टिकून राहण्याचं कौशल्य माझं मला शिकायला हवं.
त्यासाठी माणसं वाचावी लागतील,निसर्ग समजून घ्यावा लागेल. प्रयत्नांनी दृष्टिकोन बदलावे लागतील. 
समोर दिसणारी प्रत्येक गोष्ट माणसं, परिस्थिती हे तिचं फक्त वरवरचं स्वरूप आहे.
माणसांच्या वागण्यामागे असलेलं त्यांचं मन आणि परिस्थितीच्या आत दडलेल्या कारणांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी विचार,भावना आणि कृतीत समतोल येईल इतका माझ्याच मनाचा शोध मला घ्यावा लागेल. 
आज कडक,न सोसवणारे,चटके देणारे ऊन असेल तर हेदेखील टिकणारे नाही..बदलणार आहे हा माझ्या मनातला विश्वास मला टिकवून ठेवायला हवा.
© डॉ अंजली औटी.
# मानसआरोग्य डायरी 8

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा