शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९

कधी 'नाही' सुद्धा म्हण..




सकाळी सकाळीच मैत्रिणीचा फोन. तिच्या आवाजात वैतागापेक्षा हतबलता जास्त होती. तिच्याकडे येणाऱ्या कामवाल्या बाईच्या मुलाला त्याचा चुणचुणीतपणा बघून तिने लहान असल्यापासून मदत केलेली होती. त्याच्या शिक्षणासाठी,दुखण्याखुपण्यासाठी,सणासुदीला असं प्रसंगाप्रसंगाने ती मदतीचा हात पुढे करे. आपल्या मुलांसारखाच हा एक,अशी भावना मनात.
त्यानिमित्ताने आपल्याकडून एक चांगलं काम होतंय अशी श्रद्धाही. तो अनेकवेळा तिच्याकडे येई आणि तिथेच रमे. तो घरातल्या माणसांना इतका सरावला की हा 'माझा मानस मुलगा' अशीच त्याची ओळख ती इतरांना मजेने सांगे.
तो शाळेत होता तोपर्यंत सगळं सुरळीत होतं तो अभ्यासपण चांगला करे पण जसा तो कॉलेजला गेला तसं त्याचं वागणं बदललं.
सगळ्यात आधी बदलला तो त्याचा हेअरकट..अशीच फॅशन आहे,म्हणून तिने छेडल्यावर त्याने ठसक्यात उत्तर दिलं. पण मग हळूहळू त्याचं वागणं,बोलणं बदललं,अभ्यासातलं लक्ष उडालं. आत्तापर्यंत चांगले मार्क मिळवणारा तो अनेक विषयात नापास व्हायला लागला, असं होतंय याचं कारण आपण स्वतः कसे नाही हे तिला पटवून देण्यासाठी तो नाना सबबी सांगून सगळं खापर इतरांवर फोडायला लागला. घरात भांडून घरातून निघून गेला. समाजकल्याणच्या विद्यार्थी वसतिगृहात आपली राहण्याची सोय त्याने करून घेतली. याच काळात तो मित्राची चारचाकी गाडी चालवायला शिकला आणि त्याने लायसन्सही काढून घेतले. आता लोकांच्या गाडीवर बदली ड्रायव्हर म्हणून तो जात असे, त्याचे मिळणारे पैसे तो स्वतःवर खर्च करायला लागला. आता अभ्यास आणखीनच मागे पडला आणि वयाच्या विशीच्या आत पैसे कामावण्यातली आणि खर्च करण्यातली नवी झिंग त्याला चढली.
तू हुशार आहेस, आधी आपले शिक्षण पूर्ण कर, असं त्याला मैत्रिणीने खूप सांगून बघितलं पण तो काही बधला नाही. कॉलेजची फी,परीक्षा फी आणि कधी काही महत्वाचं समान आणायचं या कारणाने तो सतत तिला पैसे मागे आणि मैत्रीणही त्याला आज नाही तर उद्या समजेल, म्हणून वेळोवेळी मदत करत राहिली. चालू असलेले शिक्षण अर्धवट सोडून मग दुसरेच काही मी शिकतो,माझं डोकं त्यात चालेल असं सांगून तो एकही गोष्ट धड शिकला नाही. त्याचं गाडी चालवणं मात्र चांगलं होतं,लोकं त्याला आवर्जून घेऊन जात,व्यवस्थित पैसे देत असत. मग निदान ते काम तरी तू प्रामाणिकपणे कर आणि एकीकडे शिक्षण चालूच ठेव, असं ती त्याला सांगत राही. पण मिळालेले पैसे उडवायला त्याला अनेक मार्ग मिळत.
महागडा मोबाईल, ब्रँडेड शूज आणि कोणाचीतरी घेतलेली सेकंडहॅन्ड गाडी यावर तो खुश होता.
मैत्रिणीच्या मुलांना, नवऱ्याला तो गावात भटकताना दिसे. ते तिच्यावरच चिडत. एकदा त्याला कोणा मुलीबरोबर बघून खबरदार त्याला पुन्हा मदत करशील तर या शब्दात नवऱ्याने तिला सुनावलं.
तिचा जीव थोडा थोडा होई. हिच्याकडे काम करणारी त्याची आई तर कधीच तिचं काम सोडून गेली होती. तिला बोलावणं पाठवून तिने तिला त्याच्याकडे लक्ष देण्याबद्दल सांगितलं. पण तिने आता तो कोणाच्या बापाचं ऐकत नाही, स्वतःला पाहिजे तेच करतो,घरात पैसे देत नाही म्हणून त्याला आम्ही घरातून काढून दिल्याचं सांगितलं.
                        


तिला वाटे, लहानपणी चांगलं असलेलं मूल वाईट मार्गाला जात असतांना हातावर हात धरून कसं बसायचं?
पुन्हा मदत मागायला आला की तीच संधी समजून ती जीव तोडून त्याला समजावत असे. तो ऐकूनही घेई आणि आता मी तुम्ही सांगताय तसं वागतो,असं वचन पण देई, कधी रडे, आणि निघतांना त्याला हवे असलेले पैसे देऊन, ही शेवटची मदत बरंका, असं ती त्याला आणि स्वतःलाही बजावे.
पण पुन्हा पाहिले पाढे पंचावन्न.
आता या चक्रातून बाहेर कसं पडू? तिला समजेना.
मी तर चांगलंच करायला गेले ना ग. माझी मुलं काय शिकली यातून? कोणाला मदत केली तर हे असं होतं, म्हणून? बोलून दाखवतात मला ते. एखाद्याचं भलं करायला गेले तर माझ्याच मुलांना हे काय जीवनमूल्य देऊन बसले मी?
मलाही आता कोणाला मदत करायची इच्छा होत नाही..या अनुभवाचा कडवटपणा तिच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. तिची मदत वाया गेल्याचं शल्य तिला त्रास देत होतं.
तो लहान असतांना त्याला अभ्यासात,मोठं होण्यात मदत करण्याबद्दल तिच्या मनातला भाव स्वाभाविक होता,कोणाला मदत करणे यात वावगे काही नाही. पण त्यानंतर तो आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीसाहित घडत असतांना त्याच्यात होत गेलेले बदल दिसत असूनही त्याच्या अवाजवी मागण्या मान्य करत राहणं आणि त्याची गरज भागवण्यासाठी तयार असणं, हे सगळं घडलं ते तिच्या स्वभावातल्या भीडस्तपणामुळे.
तिच्या या स्वभावाचा त्याच्यासारख्या चाणाक्ष मुलाने फायदा करून घेतला हे तर दिसतच होतं.
'मानस मुलगा' असं कितीही म्हटलं तरी ते वाटणं तिच्या एकटीचं होतं. त्यादृष्टीने त्याची गुंतवणूक कधी नव्हतीच. कुठे थांबायचं, हे तिला समजलं नाही. म्हणून तिने देऊ केलेली मदत नंतर त्याची सवय झाली. त्यापेक्षा ठामपणे मदत नाकारून त्याला योग्य शब्दात समज देण्यातून तिच्या मुलांनादेखील या अनुभवातून काय शिकायचे हे समजले असते आणि तिला होणारा मनस्तापही वाचला असता.
शिवाय त्याने चांगलं शिकावं आणि मोठा व्हावं हे फक्त तिलाच वाटून काय उपयोग?
त्याला स्वतःबद्दल काय वाटतंय यातून त्याचं सगळं वागणं घडत होतं. आजूबाजूच्या वातावरणात असलेल्या चकाचौंधमध्ये या वयाच्या मुलांना भुरळ घालणारी कितीतरी आमिषे आहेतच की. सुस्थितीतल्या घरातले पालक जसे आपल्या मुलांसाठीच जगतात तसे हे कष्टकरी पालकही. हातावरच्या पोटाला चार घास मिळवण्याची कसरत करतांना आपल्या मुलांनी शिकावे आणि मोठे व्हावे अशी स्वप्न बघणारे पालक यांचेही नक्की आहेत. सगळीच मुले मोहमय जागाच्या आहारी जातात असे नाही. आजूबाजूच्या वातावरणातून स्वतःसाठी काय निवडायचे याचे पर्याय त्यांच्यापैकीच अनेकजण किती वेगळे निवडतात,याची उदाहरणे आपण नेहमी बघतो. आपल्याला मिळालेल्या संधीचे बोट धरून स्वतःच्या आयुष्याचे सोने करून घ्यायचे की त्याच संधीचे संधीसाधू वृत्तीने मातीमोल करायचे ही निवड प्रत्येकजण आपापल्या वृत्तींनुसार करतो.
लोकांना मदत करण्याची प्रेरणा तुझ्यात नैसर्गिक आहे शिवाय या अनुभवाने तुला योग्यवेळी ठामपणे नाही कधी म्हणायचे, हे नाही का शिकवले?
स्वभावात असलेला चांगुलपणा हा दुर्मीळ गुण आहे, तो नक्की जपायचा मात्र त्याचे रूपांतर दोषात होणार नाही,याची काळजी घेऊनच.
आता तिच्या आवाजात तिचा नेहमीचा सौम्य गोडवा परत आला आणि माझी सकाळ सत्कारणी लागली.
© डॉ अंजली अनन्या  


सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

हे जीवन सुंदर आहे!




परवा एका आईने आपल्या तीन मुलींसह आत्महत्या केली. माध्यमांमधून अनेकदा अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात. असं कसं वागू शकतं कोणी? इतक्या टोकाचा निर्णय? थोड्याफार चर्चा,तर्क-वितर्क होतात आणि आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला नक्कीच काहीतरी त्रास असणार किंवा डोक्यावर काहीतरी परिणाम झालेला असणार,असा विचार करून यामुळे आलेली मानसिक अस्वस्थता आपण काहीवेळातच झटकून टाकतो. नकारात्मक गोष्टींचा विचार फारवेळ करायचा नसतो,हे खरे पण जेव्हा आपल्या माहितीतले कोणी आत्महत्येचे पाऊल उचलते तेव्हा त्यातल्या भयानकपणा लख्ख जाणवतो. या व्यक्ती भेटणाऱ्या, ओळखीच्या,आजूबाजूला वावरणाऱ्या असल्या तरी त्यांच्या कोणत्याच वागण्यावरून आपल्याला त्यांच्या मानसिक अस्वस्थतेचा आधी पत्ता लागलेला नसतो. आत्महत्या करणारी व्यक्ती तर जगातून निघून जाते पण तिच्या जवळच्या लोकांना त्यानंतर अनेक दिवस,वर्ष मानसिक दडपणाखाली काढावी लागतात. कदाचित त्यानंतर आयुष्यभर ‘आपण समजून घ्यायला नेमके कुठे कमी पडलो’हा सल टोचत राहतो.
भारतात पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे कारण स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाणही अधिक आहे, मग स्त्री शहरातली असो वा खेड्यातली.  ग्रामीण स्त्रियांसाठी जगण्याच्या लढाईत टिकून राहण्यासाठी करावा लागणारा संघर्ष अजूनही खूप मोठा आहे,त्यातुलनेत शहरी स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत तरीही केवळ ‘स्त्री’ म्हणून असलेल्या तिच्या समस्या ग्रामीण स्त्रीपेक्षा काही फार वेगळ्या नाहीत. म्हणून लौकिकअर्थाने शिक्षण,नोकरी,पैसे,यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या स्त्रियाही अचानक स्वतःचे आयुष्य अवेळी संपवतात त्यावेळी ती घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित रहात नाही तर त्यामुळे संपूर्ण समाजमन ढवळून निघते.
स्त्रिया इतक्या हतबल,निराश आणि टोकाच्या निर्णयापर्यंत का जात असाव्यात? याचे कारण शोधत गेलो तर कितीतरी स्त्रियांच्याबाबतीत पारंपारिक पुरुषी वर्चस्वाच्या अन्यायाची कारणे आजही समोर येतात. सामाजिक परिस्थिती काही सगळ्यांसाठीच बदललेली नाही,घरांमधून मुलींनी शक्यतो सामंजस्य दाखवावे,तडजोड करावी म्हणून दबाव असतो. ‘कोणताही अन्याय कधीच सहन करायचा नाही’ याचेही काहींकडून इतके टोक गाठले जाते की मुली दुराग्रही,हट्टी आणि आक्रमक वागून आपल्याच पायावर धोंडा पडून घेतात.
घरी,दारी नोकरीच्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे स्त्रियांची अडवणूक होते. जवळच्या नात्यांमधला विसंवाद,फसवणूक अशा सतत कसल्यातरी तणावाखाली आयुष्य जगल्यामुळे नैराश्य लवकर येते. काहींचा स्वभावच त्यांचा शत्रू होऊन जातो. अनेकींना छोट्या छोट्या गोष्टी मनात धरून बसण्याची, घडलेल्या अप्रिय घटनांची वर्षानुवर्ष उजळणी करण्याची सवय असते. अपयश,नकार,अपमान,प्रेमभंग,मानहानी या गोष्टी वारंवार मनात चघळल्या जातात. व्यक्ती,परिस्थितीबद्दलचा राग,हतबलता,नाराजी अनेक वर्ष मनात सांभाळली जाऊन प्रसंगाप्रसंगाने उगाळली जाते. तुलना,स्पर्धा यांनी मन सतत अस्थीर असते. मोठ्यांनी लहानांना काहीही म्हटले तर चालते पण लहानांना जर मोठ्यांचा राग आला तर काय करायचे, याबद्दल कोणी मार्गदर्शन करत नाही. मुळात लहानपणापासून एखाद्या न आवडणाऱ्या प्रसंगी भावना कशा हाताळायच्या,विचार कसा करायला हवा, हे न शिकवता कायम फक्त ‘कसे वागले पाहिजे’ ‘कसे बोलले पाहिजे’ हेच मुलांना शिकवले जाते. म्हणून मनात अनेक गोष्टी अनैसर्गिकपणे साचत जातात. लोक आतल्याआत कुढत  राहतात. जगाच्या मागे राहतात. आत्मविश्वास गमावतात. वेगवेगळ्या आव्हानात्मक परिस्थितीपुढे बऱ्याचशा स्वतःच्या आणि काही इतरांच्याही स्वभावमर्यादेमुळे निराश होत जातात.
जसे शरीराला ताप येणं हा आजार नाही तर केवळ एक लक्षण आहे तसं नैराश्य हा
देखील आजार नाही तर अनेक मानसिक आजारांचे ते केवळ एक लक्षण आहे. म्हणून सतत नाराज, निराश असलेली आपली किंवा आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीची मनस्थिती दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. आपण प्रत्येकजण आयुष्यात कधीतरी नैराश्य अनुभवतो. त्यावर आपापल्या पद्धतीने मात करण्याचे उपायसुद्धा शोधतो. पण सगळ्यांनाच त्यातून लवकर बाहेर पडता येत नाही.  
निराश मनस्थितीचा कालावधी आणि तीव्रता इतर अनेक मानसिक आजारांसाठी आमंत्रण ठरते.
कोणी आपल्या मनासारखे वागले नाही तर राग येतो किंवा वाईट वाटते, कारण आपण तसा विचार करण्याची सवय लावून घेतली आहे. सगळे आपल्या मनासारखे झाले पाहिजे याचा आग्रह, अट्टाहास,हट्ट आणि मागण्या,आक्रमकता आणि इच्छा पूर्ण झाली नाही की निराशा या पायऱ्या माणूस कधी चढतो समजत नाही. मग नेहमी सगळे माझ्याशी असे वागतात, कोणालाच माझ्याबद्दल प्रेम वाटत नाही, मी नकोसा/नकोशी झालेय सगळ्यांना, सगळे स्वार्थी आहेत, जग स्वार्थी आहे,जगण्यातच काही अर्थ नाही, इथपर्यंत विचारांची गाडी पोहोचते.
विचारांच्या गाडीला
प्रयत्नपूर्वक ब्रेक लावायचा असतो हे लक्षात येत नाही. मग घडणाऱ्या लहानसहान घटनाही मनाला त्रास देतात. मनाची जखम वारंवार चिघळते. ती बरी करणे इतर कोणाच्या नाही,तर आपल्याच हातात आहे हे समजून न घेता इतरांना दोष दिला जातो. मन वाहवत जाते. बुद्धी,तर्क काम करत नाही. मनात द्विधा नाट्य रंगते.
सगळं जग आपल्याविरुद्ध गेलेय,आपल्याला कोणीही नाही, आपण एकटे आहोत या कोशात माणूस स्वतःला गुरफटून घेतो. वरवर दैनंदिन कामे यं
त्रासारखी पार पडली जातात. आजूबाजूचे लोक चार-सहा दिवस सहानुभूती दाखवतात,विचारपूस करतात पण ते यांना अपेक्षित असल्याप्रमाणे नसल्याने ही लोकं मनाची दारे घट्ट बंद करून आतल्या आत घूसमटत राहतात. आनंदाचे,उत्साहाचे रंग अनुभवणं थांबवून टाकतात. नात्यांच्या भावनिक चढउतारात स्वतःचं जगणं विसरून जातात.  
आपल्याच विचारांच्या तुरुंगात कैद होतात आणि अक्षरशः सश्रम
भावनिक कारावास भोगतात. आत्महत्येशिवाय परिस्थितीतून सुटका होण्याचा दुसरा कोणताही मार्ग आपल्यासाठी आता उरलेला  नाही याची खात्री होण्यामागे अनेक दिवसांचे विचारांचे, वृत्तींचे, पूर्वग्रहांचे, आणि अनुभवांचे साचलेपण असते. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त एकट्या पडतात म्हणून आत्महत्या करण्याचे त्यांचे प्रमाण जास्त आहे.
                           


आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अशा मनस्थितीबद्दल वेळीच सावध होणे शक्य आहे का? तर शक्य आहे कारण अशा व्यक्ती काही त्यांच्या वागण्या-बोलण्यातून किंवा गप्प बसण्यातूनही त्यांच्या मनस्थितीची पूर्वसूचना देत असतात. आपल्या मरणाचा विचार कोणत्यातरी स्वरुपात व्यक्त करतात, हे वारंवार दिसून आलंय. ते वेळ गेल्यावर समजून घेण्यापेक्षा वेळेत समजणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात नुकसानकारक निर्णय घेतलेले प्रसंग त्यांनी आपल्या याआधीच्या आयुष्यात घेतलेले असतात. त्यासाठी गरज आहे, थोडे डोळे,पुष्कळ कान आणि किंचित मन उघडे ठेवण्याची. या लोकांनी आपल्यापर्यंत कोणी पोहोचू नये,असं कुंपण बनवण्याआधी सावध होण्याची गरज आहे. आपल्याही मनात कुठेतरी खोलवर असे द्वंद्व नाही ना, हे तपासून घेण्याची आणि त्याचा वेळीच योग्य निचरा होण्याची गरज आहे. हो,कारण याबाबतीत आधी मदत स्वतःची आणि मगच दुसऱ्यांची. प्रत्येकाला डोळसपणे आपल्या स्वतःकडे बघणं जमलं की स्वभावातले नुकसान करणारे टोकदार भाग ओळखता येतात. मनातले विचार कोणत्या भावनांच्या प्रभावाखाली आहेत हे समजून घेणं शक्य होतं. त्या हितकारक आहेत की अहितकारक हे नीट कळते.  
आपलं आयुष्य निर्माण करण्यात आपल्या स्वतःचं कर्तुत्त्व काहीच नसेल तर मग ते संपवण्याचा अधिकारही आपला नाही. भावनेच्या भरात कोणाही व्यक्तीला आपल्यापुढचा प्रश्न अवघड वाटतो, त्या भावना ओळखण्याचा आणि हाताळण्याचा संयम,सहनशीलता अंगात असेल तर कितीही मोठ्या संकटातून बाहेर पडण्याची वाट सापडू शकते. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्तीच्या मनातला भावनांचा गोंधळ शांत करायचा असेल तर त्यांच्या मनामधल्या विचारांचे स्वरूप ओळखता यायला हवे, भावना समजून घेता यायला हव्यात. यासाठी आपल्या मित्र-मैत्रिणींची,नातेवाईकांची आणि तज्ञ डॉक्टरांची मदत घेणे यात कोणताही कमीपणा नाही. योग्यवेळी मागितलेली आणि केलेली मदत एक अनमोल आयुष्य अवेळी संपवण्यापासून वाचवू शकते.
आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांकडे बघितले की सहज लक्षात येईल,अनेक लोक आपल्या आयुष्यातील अपूर्णता स्वीकारून आनंदाने जगत असतात. पावलोपावली होणाऱ्या अपेक्षाभंगातून समाधानाचे चार क्षण मिळवत असतात. कोणतीही गोष्ट संपवायला एक क्षणही पुरेसा आहे त्यासाठी हिंमत लागत नाही ती लागते टिकवायला, सांभाळायला,जपायला आणि वाढवायला. आणि ती हिंमत जगण्याचे बोट सोडणाऱ्याकडे कधीच नसते. ती असते मदत मागणाऱ्याकडे आणि देणाऱ्याकडेही. त्या मदतीच्या एका क्षणात अनिश्चिततेच्या वादळात फडफडणारी एखाद्या आयुष्याची क्षीण ज्योत सांभाळून ठेवण्याचे बळ नक्की असते. अशी ज्योत जपणारे बळकट मन आणि सहृदय हात होऊया!  
© डॉ अंजली अनन्या  
फोटो सौजन्य गुगल


रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

देणे समाजाचे!



“कठीण परिस्थितीशी सामना कसा करायचा याचा निर्णय नेहमीच आपल्या हातात असतो.” हे कितीही खरे असले तरी आव्हानात्मक परिस्थिती अचानक समोर आली की त्यावेळी मनात प्रभावी असलेल्या भावनांच्या आहारी आपण जातो. आपल्यापैकी काही जण मात्र याच भावनांची उर्जा वापरून स्वतःसाठी आणि इतरांसाठी आश्वासक पर्याय शोधू शकतात. आयुष्यातल्या संकटकाळात स्वतःला सावरून इतरांचा विचार करणे सगळ्यांनाच कुठे जमते?  पण ज्यांना जमते ते सगळे लोक मुळातच असामान्य असतात का? तेही आपल्यासारखेच असतात. त्यांनाही भावना असतात. मग नेमक्या कोणत्या क्षणी ते दु:खाच्या क्षणांवर मात करून पुढे जातात? असे काय घडते की ते इतर सगळ्यांसारखे न वागता काहीतरी वेगळे वागून असामान्य ठरतात?
यासाठी एक गोष्ट सांगते, वीणाची. एक साधी मुलगी. सर्वसामान्य लहानपण आणि तरुणपण अनुभवलेली. एक साधी गृहिणी आपल्या घरावर,संसारावर आणि माणसांवर मनापासून प्रेम करणारी. दिलीपने सुरु करून दिलेला ‘गिरीसागर टूर्स’चा पर्यटनव्यवसाय सक्षमतेने सांभाळणारी प्रेमळ पत्नी. बाळ होण्याची वाट बघणं, हाच काय तो त्यांच्या आयुष्याचा संघर्ष. वयाच्या तिसाव्या वर्षी वीणाला दोन जुळ्या मुली झाल्या. पूरवी आणि सावनी. कौतुकाचे आणि आईपणाच्या नव्या नवलाईचे आठच दिवस संपत नाही तोच या कुटुंबावर एक संकट कोसळले. पूरवीला फणफणून ताप आला. बघताबघता तो मेंदूपर्यंत पोहोचला. ‘मेनिंजायटिस’ निदान होऊन त्या छोट्याशा बाळाला कायमचं मानसिक आणि  शारिरीक मतिमंदत्व आलं.
बाळाला जराही काही झालं की आईचा जीव अगदी कासावीस होऊन जातो पण ती काही ते दुखणं आणि आजार वाटून घेऊ शकत नाही. पूरवीला सतत फिट्स येत असत. एकेका दिवसात सत्तर ते ऐंशीवेळादेखील फिट्स येत. ते नुसतं बघणंही कठीण होई. इथूनपुढच्या प्रवासाच्या,बाळाच्या काळजीने वीणा हबकून गेली. बाळ काहीच दिवसांचे सोबती आहे,असे डॉक्टरांनी सांगितल्यावर तर तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला. मानसोपचारांची मदत घ्यावी लागली.  पण ती लवकरच सावरली. मुलींना सांभाळण्यासाठी त्यांची सगळी शक्ती पणाला लागली. पूरवीसाठी योग्य मार्गदर्शन घेण्याची आणि सावनीच्या जगण्यावर, वाढण्यावर घरातल्या वातावरणाचा कोणताही प्रभाव न पडता तिच्यातल्या नैसर्गिक हुशारीला आपल्याला पूर्ण न्याय देता येण्याची गरज त्यांच्या लक्षात आली. रोजचा दिवस एक वेगळे आव्हान होते. कोणाची मदत मिळेल? शोध सुरु झाला.
त्यादृष्टीने काम करणाऱ्या सामाजिक संस्था आहेत का म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातातल्या अनेक सामाजिक संस्थाना भेटी दिल्या गेल्या. वेगवेगळ्या संस्थांच्या भेटींमधून अनेक अनुभव त्यांना आले.काही चांगली लोकं,संस्था भेटल्या त्यांची मदतही झाली. तर कधीकधी पैसा, वेळ वाया गेला आणि वर मनस्ताप वाट्याला आला. त्यातल्याच काही संस्था अशा होत्या की कोणत्याही बाह्य मदतीशिवाय त्यांचे खरोखरच चांगले काम स्वनिर्मित फंड॒सच्या तुटपुंज्या मिळकतीवर कासवाच्या गतीने का होईना पुढे नेत होत्या. त्यांचे प्रामाणिक काम समाजासमोर येण्याची गरज दिलीपना जाणवली. कारण समाजातील अनेकांना चांगले काम करणाऱ्या लोकांना,संस्थांना मदत करण्याची प्रामाणिक इच्छा असते, पण मग असे दाते आणि खरे गरजू यांची सांगड,भेट योग्यवेळी व्हायला हवी, त्याचा अनेकांना खरंच उपयोग होईल. प्रत्यक्ष अनुभव घेऊन दिलीपचे मन स्वस्थ बसेना,त्यांना याबद्दल खूप कळकळ वाटू लागली.
                                 

               
                              
दिलीप आणि वीणा दोघांच्याही सामाजिक जाणिवा प्रगल्भ होत्या. समाजातील अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याच दरम्यान दिलीप एक प्रदर्शन बघण्यासाठी गेले आणि त्यांच्या मनात अशा संस्थांचे कार्य समाजासमोर येण्याचा ‘प्रदर्शन’ हा सगळ्यात चांगला मार्ग असू शकतो, हा विचार आला. त्यांनी मांडलेली ही कल्पना वीणालादेखील खूप आवडली. दोघांचे त्यावर विचारमंथन झाले. निर्णय घेतले गेले आणि मग दोघांनी आपली ही कल्पना अनेकांना ऐकवली. ओळखीच्या लोकांनी,मित्र-मंडळींनी ती उचलून धरली. अनेकांनी जमतील तसे पैसेही देऊ केले त्यात काही पदरचे पैसे घालून 2005 साली असे अनोखे प्रदर्शन पुण्यात भरवले गेले. संस्थांनी त्यांची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे लोकांना सांगायची, कार्याचे फोटो आणि माहिती यांचे प्रदर्शन असे केवळ त्याचे स्वरूप होते. लोकांचे,लोकांसाठी असलेले काम लोकांपर्यंत केवळ पोहोचवायचे. कोणतीही मागणी नाही. खरेदी-विक्री नाही. ज्यांना मदत करावीशी वाटेल त्यांनी थेट त्या संस्थेला संपर्क करायचा. असे आगळेवेगळे प्रदर्शन लोकांनी पहिल्यांदा बघितले. उस्फुर्तपणे मदत केली. यात अनाथ,अपंग मुलांसाठी,वंचीत समाजघटकांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था होत्या.   
या प्रदर्शनाचे नाव ठेवले “देणे समाजाचे” यात खरोखरच समाजाचे ऋण त्याला परत करण्याचा सच्चा हेतू होता. असे प्रदर्शन एकदाच भरावून त्याचा फायदा नाही तर दरवर्षी हे घडून यायला हवे याची प्रेरणा मिळाली. उत्साह वाढला. दोघांनी प्रत्यक्ष फिरून अशा गरजू संस्था वर्षभरात शोधून काढून प्रदर्शनासाठी त्यांची निवड करण्याचे काही निकष ठरवले गेले.       
पूरवीसाठी त्यातील काही संस्थांमुळे खरंच मदत झाली. वेगळी समज,दृष्टीकोन विकसित होत गेले. निर्णयांमध्ये सुलभपणा आला. पण अनेक गोष्टींची घडी नीट बसतेय तोच अचानक वीणाला अंतर्बाह्य हलवून टाकणारा एक मोठा धक्का बसला. 2008 सालच्या प्रदर्शनाची दोघेही जोरात तयारी करत होते, केवळ पंधरा दिवस बाकी होते आणि ऐके दिवशी रात्री झोपेतच दिलीप अचानक हे जग सोडून गेले. नियतीचा हा घाव निश्चितच मोठा होता. छोटेसे घर या वादळात उन्मळून पडले. वीणाच्या दु:खावर कोणी काय समजूत घालावी?
दु:खाने सैरभैर झालेल्या वीणाने ठामपणे यावर्षीचे प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला. हाच तो क्षण ज्या क्षणी इतर कोणीही हातपाय गाळून दु:खात बुडून जाईल त्या क्षणी आपल्या भावनांवर मात करून वीणा वेगळं वागली. निर्णय भावनांनी नाही तर बुद्धीने घेतला आणि त्यानंतर तिचे आयुष्यच बदलून गेले. दोघांनी एकत्र बघितलेले स्वप्न पुढे नेण्याच्या निश्चयाने तिने उभारी धरली,कुटुंबातील इतर सदस्यही मदतीसाठी पुढे आले आणि त्यावर्षीचे प्रदर्शन ठरल्याप्रमाणे पार पडले.
सगळ्या जबाबदाऱ्या वीणाने संपूर्ण ताकदीने सांभाळायला सुरवात केली. यात शरीरापेक्षा मनाची ताकद जास्त मोलाची ठरली. एकीकडे पूरवी आणि सावनी मोठ्या होत होत्या. महाराष्ट्रभर दौरे करून संस्थांना भेटी देणं,लोकांच्या संपर्कात राहणं हा सगळा वाढलेला व्याप सांभाळणं तसं कठीण होतं पण इथेही तिने आपल्या बुद्धीचा कौल मानला. खऱ्या सामाजिक कामाचा आव आणता येत नाही, त्यासाठी दिवसरात्र एक करावे लागतात. अनेक व्यक्तिगत गोष्टी दूर साराव्या लागतात. इथे तर घर आणि व्यवसाय दोन्ही तारेवरची कसरत होती. दोन्ही पातळ्यांवर ती प्रत्यक्ष हजर असण्याची गरज होती. तरीही “देणे समाजाचे” कार्यक्रम पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेणे खूप जास्त आव्हानात्मक होते. ‘झेपेल तितकेच कर’, ‘आधी घर सांभाळ,लष्कराच्या भाकऱ्या आता नको” यासारखे सल्ले मिळाले नसतील तिला, असे कसे होईल? अडचणी येत गेल्या आणि मार्गही निघत गेले. संकटं येत गेली पण निश्चयाचे बळ कमी पडले नाही. अनेक लोकं या चळवळीला जोडली जात होती. 2010मध्ये या सगळ्या कामामागची प्रेरणा असलेली पूरवी हे जग सोडून गेली. पण आता वीणाचं ‘आईपण’ अधिक व्यापक झालं होतं. सामाजिक मातृत्व स्वीकारलं होतं, थांबणं शक्य नव्हतं आणि तिला थांबायचं नव्हतंही. काम सुरूच राहिलं.
ह्यावर्षी पंधरावे वर्ष आहे ‘देणे समाजाचे’प्रदर्शन पुण्यात येत्या २० तारखेला भरते आहे. आता ते केवळ प्रदर्शन नाही तर एक  ‘चळवळ’ झाली आहे. यावर्षीपासून हे प्रदर्शन मुंबईतसुद्धा आयोजित केले गेले. यातून आजपर्यंत एकशेपासष्ठपेक्षा जास्त सामाजिक संस्थाचे कार्य समाजासमोर आले आहे. अनेक दात्यांनी यथाशक्ती त्यांना मदत केली आहे. काहींनी श्रमदानसुद्धा केले आहे. करोडो रुपयांची मदत आजपर्यंत थेट उपलब्ध झाली आहे. वीणा गोखले आजही सामाजिक संस्था आणि समाज यांच्यातील केवळ एक दुवा म्हणून काम करतात. आजही ती आपल्या सगळ्यांसारखीच एक साधी स्त्री आहे. एक प्रेमळ आई आहे, एक कर्तबगार व्यावसाईक आहे आणि समाजभान असलेली अत्यंत पारदर्शी,प्रामाणिक व्यक्तीदेखील आहे.  “देणे समाजाचे” असले तरी आपणही याच समाजाचा एक भाग आहोत, म्हणून आपलेही आहेच की!
वीणाचे प्रेरणादायी आयुष्य आपल्याला इतकी प्रेरणा तर नक्कीच देतेय!
  © डॉ. अंजली अनन्या 
   
         

रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

जगायचं कशासाठी?




घरात जाण्यासाठी वळले तर पायापाशी एक छोटंसं मनीप्लॅन्टचं पान, थोड्या देठावर,कसंबसं तग धरून. हिरवा रंग पण थोडसं मलूल. तिथे कधीपासून होतं,माहीत नाही. तसा त्याचा वेल होता,आजूबाजूला जिकडेतिकडे पसरलेला. हे मात्र सगळ्यांपासून तुटून जमिनीवर..नशीब अजून कोणी त्याच्यावर पाय नव्हता दिलेला. पटकन उचललं. घरात एका ग्लासभर पाण्यात ठेवलं. किचनच्या खिडकीत, मला दिसेल असं. दोन दिवस जगेल की नाही, वाटत होतं. पण हळूहळू ते तरारलं. त्याला स्पर्श केला की कळायचं,आतून जगण्याची जिद्द होती त्याच्यात. काही दिवसातच त्याच्या तुटलेल्या भागाला पांढरट मुळं फुटलेली दिसली. कमाल वाटली मला त्याची. छोटासा जीव किती चिवट इच्छाशक्ती धरून होता! शब्दही न बोलता मला त्याची जगण्याची धडपड समजत होती. त्याच्या विश्वात मी होते की नाही,माहीत नाही पण माझ्या विश्वात मात्र त्याचं असणं होतं! अवघ्या काही दिवसांत देठाशी नव्या पानाचा उगम दिसायला लागला आणि मला जग जिंकल्यासारखा आनंद झाला. आता मला त्याची काळजी नव्हती. ग्लासमधलं पाणी बदलतांना त्याचा हळूवार स्पर्श मला होई. “आता उद्यापासून तू मातीत राहायचं हं..तुझं खरं घर तेच आहे. तुला आवडेल तिकडे..” मी सांगितलेलं समजलं असेल का त्याला?  दुसऱ्या दिवशी माझ्या हाताने कुंडी तयार केली. मातीत थोडे नैसर्गिक खतदेखील मिसळले. आणि अलगद बोटांनी त्याला मातीच्या कुशीत ठेवले. मातीला आणि पाण्याला त्याची काळजी घ्यायला सांगितले. तरी मला वाटत होते, नीट येईल ना मातीत? आवडेल ना त्याला हे नवीन घर? लगेच कसं समजेल? मला वाट बघायला हवी.

                                           

 हा बदलदेखील त्याला मानवला. ते कोमेजले नाही. किती वेळ लागला त्याला तिथे जुळवून घ्यायला. पाणी जास्त व्हायला नको,कमी पडायला नको. ऊन कडक नको, उजेड मात्र भरपूर हवा, हवा खेळती असावी. माझं बारीक लक्ष होतं. “बस,मरना नहीं..” मनावर उमटलेलं मूव्हीतलं हे वाक्य त्यालाच किती वेळा म्हटलं मी. ऐकलं असेल का त्याने?  ऐके दिवशी त्याच्या देठावर हिरवट पिवळा उंचवटा दिसला..इथून कोंब फुटणार..आता मला खात्री झाली आणि अगदी हळूहळू त्यातून नवे पान उगवले.. ..किती सावकाश झाले सगळे. त्याला कसलीही घाई नव्हती. मात्र घाई होती माझ्याच मनात. त्याने त्याचा वेळ घेतला. मग मला अपोआप समजलं, सगळ्या गोष्टींची वेळ ठरलेली आहे! त्याच्या त्या वेगाशी जुळवून घेणं मग एकदम जमूनच गेलं मला. आणि आवडलंही. पटापट एका विचारावरून दुसऱ्यावर धावणारं माझं मन आपोआप सैलावलं..घाई करून एखादं काम लवकर होईल फारतर. त्याने असा काय फरक पडतो? मला “स्लो डाऊन” होण्यातली मजा समजली. आता त्याच्याकडे अनेकदा  बघूनही प्रत्येकवेळी नवेच काहीतरी दिसत होते. दिवसागणिक वाढणारा त्याचा ताजेपणा लक्षात येत होता. ऐकाका पानाचा प्रवास उमगत होता. सावकाश एका पानाची पाच-सहा पाने झाली होती.  त्याच्याशी माझी जवळिक वाढली होती, खरंतर जवळिक वाढली होती माझी माझ्याशीही.       
इतक्यादिवस मला वाटे की मी त्याच्या सोबत आहे! पण मग लक्षात आलं की अरे, हे तर नेमकं याच्या उलट आहे की! त्याला माझी नाही तर मला त्याची सोबत आहे! मी असले नसले तरी त्याच्या असण्यात फरक पडणार नाहीये काही..पण माझ्यात मात्र हळूहळू खूप काही बदलतेय.  माझ्या जगण्याच्या चौकटीतून मी त्याच्या जगण्याचा अर्थ शोधत होते, कसं शक्य आहे हे? माझ्या चौकटीत असलेले अनुभवांचे अर्थ अपूरे,माझ्या नजरेतून असू शकतील. त्यापलीकडे असलेलं त्याचं जग समजायचं असेल तर आधी मला माझ्या चौकटीतून बाहेर पडलं पाहिजे. अर्थ शोधायला न जाता त्याचं फक्त जगणं समजून घ्यावं लागेल. आणि मग मला समजलं,कशाला हवा आहे,प्रत्येक गोष्टीला अर्थ? नुसतं जगणं, नुसतंच असणंदेखील पुरेसं असतं. अनुभवतेय की मी ते त्याच्या सोबतीने. त्याच्याकडे बघतांना माझ्या मनात आपोआप जे उमटेल तेच आहेत त्याचे जगण्याचे बोल. ते पोहोचण्यासाठी कोणतेच शब्द लागत नाही. त्याशिवायच भाव पोहोचतो.  आपल्या मरणासन्न अवस्थेबद्दल तरी त्याची तक्रार कुठे होती? त्याने कधी कोणाची तक्रार केली की गाऱ्हाणे मांडले? मी उचलले नसते तर ते तितक्याच शांतपणे नाहीसेही झाले असते जगातून. त्याने अपेक्षा केली नव्हतीच,नंतर मात्र मी दिलेला मदतीचा हात घेऊन मन:पूर्वक जगण्याचा प्रयत्न केला. त्याने फक्त जे घडेल त्याची वास्तविकता स्वीकारली. त्या त्या प्रत्येक क्षणी. पाण्यातून मातीत आणून ठेवलं तरी. त्याची सगळी शक्ती फक्त टिकून राहण्यात एकवटली. त्याला माहीत होतं, जगणं महत्त्वाचं आहे,वाढ तर आपोआपच होणार आहे. 
                                     

शून्यापासून सुरवात करून पुन्हा शून्यापर्यंत जाण्याचं नाव आहे नाही का, आयुष्य म्हणजे! या दोन शून्यांच्या दरम्यान जे काही आहे, तेच तर आहे प्रत्येकाचं जगणं..मग हेच करतांना आपण माणसं किती घाई करतो..? एकमेकांशी स्पर्धा करतो. पण खरंतर प्रवास किती वेगवेगळा आहे आपल्या प्रत्येकाचाच शून्यापर्यंत जाण्याचा. त्यात कितीतरी वेगवेगळे अनुभव आहेत. मग तुम्ही कोणीही असा, तुम्हाला आयुष्याचे काय अनुभव येतात, कोणत्या परिस्थितीत येतात आणि त्यातून नेमके काय घेऊन तुम्ही वाढत असता..हे प्रत्येकासाठी वेगळेच आहे ना..?  कोणतेही झाड असे कुठे म्हणते कधी की, मला ना..त्या दुसऱ्या झाडासारखं जगायचं आहे, मला का नाही त्याच्यासारखं उंच होता येत? मला का नाही अमूक रंगाची फुलं येत? माझ्या फुलांना दुसऱ्या फुलांसारखा वास का नाही? इतरांसारख्या माझ्याकडे प्राणी-पक्षी, मधमाश्या का नाही येत? ते ना कधी कोणाशी तुलना करत,ना स्पर्धा करत. ते स्वतः जगते आणि दुसऱ्यांना जगायला मदत करते. आजूबाजूच्या सगळ्याशी स्वतःला जोडून घेते. आपल्या आजूबाजूला असलेल्या जगाशी असलेलं नातं प्रत्येक झाडाला अंतर्यामी माहीत असतं. “माझ्या जगण्याचा हेतू काय?” असले प्रश्न त्याला कधीच पडत नसावेत. आपला प्रवास तन्मयतेने करणे, हेच असतं त्याचं जगणं. तो प्रवास करतांना मातीशी, तिच्यातल्या वेगवेगळ्या घटकांशी, कृमी-किटकांशी, हवेशी, वातावरणाशी, या प्रत्येकाशी जोडले गेलेले त्याचे जगण्याचे हेतू. म्हणजे झाडांचा प्रवास आतून बाहेर आहे आणि माणूस म्हणून आपला प्रवास बाहेरून स्वतःकडे जाणारा,स्व-केंद्रित! प्रत्येकाचे वेगळेपण स्वीकारत,सामावून घेत,जोडून घेत, देवाण-घेवाण करत एकमेकांशी पूरक होत जाणारं आहे यांचं आयुष्य आणि आपण मात्र ‘मी’,’माझं’,’माझ्यापुरतं’ बघून स्वतःला मर्यादित करत,चौकटीत बांधत जगत रहातो. आणि म्हणूनच याच निसर्गात राहूनही आपण त्याचाच एक भाग होऊ शकत नाही. सगळ्यांमध्ये असूनही ‘वेगळे’ आहोत. ते वेगळेपण मिरवणं आवडतं आपल्याला. कधीकधी तर ते सर्वश्रेष्ठही वाटतं!   ही आपली वाटचाल नैसर्गिक नाही, निसर्गाशी पूरक नाही, जोडून घेणारी तर नाहीच नाही. विचार करायला हवा,नाही का? निसर्गापासून दूर जातांनाच आपण आपल्या विचार,भावना आणि वागण्यातला समतोल गमावून बसलो. निसर्गावर अतिक्रमण करून आपण यश,प्रसिद्धी,पैसा आणि लोकप्रियता तर मिळवली आणि आता मनस्वास्थ्य बिघडले आणि शरीरस्वास्थ्य बिघडले म्हणून आपण अस्वस्थ आहोत.  मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या निरोगी, निरामय आणि सशक्त आयुष्य जगणे आणि इतरांना त्यासाठी मदत करणे, हे माझे ध्येय आहे असे  असे आता मनापासून वाटते आहे. माझ्या विचारांमधला हा बदल काही माझी स्वतःची समज आहे? सर्वांगाने मनापासून वाढणाऱ्या या माझ्या लाडक्या छोट्याशा रोपट्याने सहज, कसलाही आव न आणता समजावलेले हे जगण्याचे गुपित आहे!

© डॉ अंजली अनन्या
 # कॅलिडोस्कोप   

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९

एकरूप





पावसाच्या थेंबानी अतोनात उमललेली, फुललेली सृष्टी आजूबाजूला. सवयीच्या 'मी','माझं' या अस्तित्वखुणा मग हलकेच विरघळतात. मन स्वच्छ,निरभ्र होत जातं. विचार,भावना हळूहळू निवायला लागतात. हिरव्या रंगाची जादू मनावर गारुड करते. हलके हलके वाहणाऱ्या वाऱ्यात शरीराचे भान कधी विसरते, कळत नाही. त्याचाच एक भाग झालो की उलगडते एक अनोखे विश्व..विविध आकारांचे, नादांचे, रंगांचे,वासांचे आणि स्पर्शाचे. जाणिवेचा अनोखा प्रवास सुरु होतो.

परस्परांत मिसळणारे, एकमेकांना पूरक असणारे जग...डोंगर,नद्या,झरे,दगड,माती, कितीतरी वनस्पती,फुलं,झाडं,पक्षी आणि या सगळ्यांना कवेत घेणारी असते आभाळाची सोबत.. चिमुकल्या रान फुलापानांचे, कृमीकीटकांचे,प्राण्यांचे जगणे समजू लागते. बरोबर असलेलं कोणी त्यांची नावं सांगत असतात..माझ्या काही ती फारशी लक्षात रहात नाहीत. त्यांच्या जगण्यातली उर्जा मात्र मला स्पर्श करते. त्याचं असणं मला आश्वासक वाटतं. अंतर्मुख व्हायला होते. दृष्टी विस्तारते. मातीच्या रंगाने आणि गंधाने मला वेढून घेतलेले असते.मातीच्या कणाकणात फुलणारे जीवन बघितले की माती मला नदीसारखी ‘प्रवाही’ वाटते. जीवन उमलण्यातले आणि विलीन होण्यातले सातत्य. या प्रवाहाशी आपलंही नातं आहे ना?

   डोंगरकड्यावरून आवेगाने झेपावणारे पाणी अवनीच्या कुशीत शिरते आणि ती नखशिखांत बहरून जाते. कणाकणात प्रेम रुजतं. हिरव्यागार गवताची मृदू,मुलायम लोभस थरथर मातीच्या रोमरोमात उमटते. जगण्याचा नुसता उत्सव सुरु असतो अवघ्या आसमंतात! निसर्गाचे आर्जव मनात उमटणार नाही असे कसे होईल? जंगलवाटांची अतोनात ओढ लागते. आवेगाने वाहणाऱ्या शुभ्र पाण्याच्या गारव्याची, ओल्या वाऱ्याच्या मनमोकळ्या स्पर्शाची आस लागते. मग पाय शोधत जातात कितीतरी अस्पर्शित निसर्गवाटा आणि मी समर्पित..त्या क्षणांना संपूर्ण शरण जाते.   

   निसर्गातला प्रत्येक क्षण एक वेगळा अनुभव असतो. आपण केवळ साक्षी असतो. इथे काहीही आपण बघण्यासाठी घडत नसतं. उघड्या डोळ्यांनी आणि मनाने आपण त्याचा भाग झालो की आजूबाजूला असलेल्या कितीतरी गोष्टी दिसतात,जाणवतात. साद,प्रतिसादांची सृष्टीची भाषा समजत जाते. आपल्या दृष्टीचा,मनाचा,जाणीवेचा परीघ आपोआप विशाल होतो..सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आनंद घ्यायला शिकतो, अनपेक्षित क्षणाचा अनुभव असा याचक होऊन घेतल्यावर मग समजतं ‘घेणं’ किती सुंदर असू शकतं ना?

सौंदर्याचं माप आपल्या ओंजळीत पडतांना त्यातल्या चैतन्याचा असा काही लखलखीत स्पर्श आपल्याला होतो की त्यातल्या उर्जेने आपण अंतर्बाह्य बदलून जातो. मनाचा डोह शांत, तृप्त, समृद्ध होत जातो. जे माझ्यात आहे तेच या चराचरात सामावलंय या अनुभूतीचा सहजभाव मनोमन उमगतो आणि मग जाणवते निसर्गाची लय माझ्याही अंतरंगात आहे. माझ्या श्वासात आहे,रक्तातून वाहते आहे, या श्वासाने तर मी आजूबाजूच्या अनंताशी जोडलेली आहे हे जाणवून कमालीचं मुक्त वाटतं आणि निसर्गनियमांशी असलेली जगण्याची बांधिलकी उमजत जाते. विलक्षण आहे हे वाटणं! तृप्त,कृतार्थ..आयुष्याबद्दल,प्रवाहाबद्दल आणि सहज वाहण्याबद्दल कमालीचा आपलेपणा वाटतो.

परवा अशाच एका वाटेवर कसलीतरी अनामिक ओढ वाटून पावलं रेंगाळली.  पक्षांची नादमधुर किलबिल, झाडांच्या पानांचा वाहणाऱ्या वाऱ्यामुळे होणारा आवाज यातूनही अगदी जवळ असलेल्या झाडीत हलचाल जाणवली. एक देखणा मोर समोर. आपल्याच नादात मग्न. त्याच्यापासून थोड्या अंतरावर जराशा मोकळ्या जागेत गेलो. आता आम्ही त्याच्यापासून दहा बारा पावलं दूर. निसर्गाने कसली किमया केलीये ना त्याला बनवून? मानेवरचा निळा रंग, डोक्यावरचा सुंदर तुरा आणि काळेभोर डोळे. असं वाटलं तो आणखी पुढे येणार नाही, पण तो आमच्या दिशेने हळूहळू चालत पुढे आला आणि तिथेच असलेल्या एका उंच खडकावर बसला. आता त्याचा पिसारापण दिसत होता. त्याने आम्हाला नक्कीच बघितलं. प्राणी,पक्षी धोका लगेच ओळखतात. शक्यतो माणसांपासून दूर राहतात. त्याला आम्ही काही करणार नाही हा विश्वास वाटला असावा. किती विलक्षण सुंदर होता तो! क्षणभरच त्याचा उमललेला पिसारा बघण्याची इच्छा मनात उमटली. आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणात आम्हाला तो अद्भुत क्षण अनुभवता आला. आपला लावण्यपिसारा फुलवून तो त्याचा तो मोहक नाच! प्रियेची आराधना,तिला घातलेली साद..पापणीही न हलवता ते सुंदर क्षण आम्ही वेचत होतो. निसर्गाचा तो चमत्कार नजरेसमोर साक्षात साकार होत होता.
                               


निसर्गातला प्रत्येक क्षण वेगळा आणि काहीतरी देणारा असतो. आमचं त्या नेमक्या क्षणाला तिथे असणं त्याने सहजतेने स्वीकारलं आणि त्या सुंदर क्षणांचं दान घेऊन मन नतमस्तक झालं. पाच-सहा मिनटात पिसारा मिटवून तो नुसताच इकडे-तिकडे फिरत होता. त्याला तसं बघणंही विलोभनीय होतं. ते जग त्याचं होतं, त्याच्या विविध अदा बघतांना आमचं मन भरणार नव्हतंच. आम्ही तिघे ओल्या जमिनीवर सरळ मांडी घालून बसलो होतो. 
        


आता निघूया असं एकमेकांना खुणावलं तितक्यात त्याने पुन्हा एकवार प्रियेला साद घातली आणि निमिषार्धात पुन्हा एकदा पिसारा संपूर्ण फुलवून त्याची पावलं थिरकायला लागली. हा क्षण अगदीच अनपेक्षित होता. ते अप्रतिम दृश्य, ती वेळ..निसर्ग मुक्तहस्ते सुंदर क्षण देत होता! लांडोर नक्की झाडीत असणार आणि त्याचा नाच बघत असणार. तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याचं असं रोमरोम  फुलूवून नाचणं,खरंच कमाल वाटली. डोळे भरून त्याला मनात साठवलं आणि त्याची प्रणयसाधना परिपूर्ण होऊ दे,अशी मनात इच्छा करून त्याचा निरोप घेतला.
मन भावविभोर झालं होतं. ही भावसमाधी मोडूच नये,असं वाटत होतं. आज मिळालेलं निसर्गाचं हे दान इतकं परिपूर्ण होतं की चराचराबद्दल,आयुष्याबद्दल कृतज्ञतेने मन भरून आलं..आंतरिक आनंदाची लय निसर्गाशी जोडलेली असण्यातल्या अनुभवात ‘माणूस’ असण्यातला अहंकार कधीच विलीन होऊन गेला.
© डॉ अंजली अनन्या 
# कॅलिडोस्कोप
(फोटो सौजन्य :सतीश कुलकर्णी )




        






मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

समतोल




“मला जराही मोकळा श्वास घ्यायला वेळ नाही मिळालाय ग! सतत काहीतरी मानेवर असतंच. एक पूर्ण होत नाही तोवर दुसरं काहीतरी तातडीने करायलाच हवं असं समोर असतं..असं वाटतंय मी कुठल्या रेसमध्ये आहे आणि जीवाच्या आकांताने नाही पळाले तर सगळं जग माझ्या पुढे निघून जाईल आणि मी मागेच..सगळ्यांच्या मागे! जगाच्या मागे! मला तर कल्पनाही नाही सहन होतेय..”
धरित्री कसनुसा चेहरा करत म्हणाली. एकीकडे आईच्या हातचा गरम गरम पराठा ती उभ्यानेच भराभरा खात होती. अद्वैतला आजीकडे नीट राहण्याबद्दल आणि शाळेतल्या कुठल्याशा स्पर्धेबद्दल ती काहीबाही सांगत होती. अरुणा तिच्याकडे बघत राहिली. एका कॉफरन्ससाठी ती निघाली होती. आपल्या कर्तुत्ववान मुलीचा अभिमान वाटायला हवा की तिला क्षणाचीही उसंत नाही म्हणून खंत,याची चुटपूट नेहमीप्रमाणे अरुणाच्या मनात उमटली. आपल्या विश्वात ती खुश आहे,अशी स्वतःच्या मनाची समजूत घालणारी अरुणा आपल्या मुलीचं बोलणं ऐकून,चेहरा बघून आतून हलून गेली. तिच्याशी काही बोलण्याचे,काही नाही तर तिला नुसतेच जवळ घेण्याचेही घाईघाईत राहून गेले,अर्धवट खाऊन आणि बोलून धरित्री निघूनही गेली होती.

अभ्यासात, वागण्या-बोलण्यात हुशार असलेल्या धरित्रीकडून नेहमी सगळ्या गोष्टी परफेक्ट असण्याचीच अपेक्षा होती. अनेक विषयात तिचं नैपुण्य वाखाणण्याजोगे होते, जी गोष्ट आत्मसात करायला इतर कोणाला सहा महिने लागतील ती गोष्ट धरित्री अगदी लीलया करे. लहान वयापासून मिळालेल्या अशा कौतुकाने, अपेक्षांनी तिचाही स्वभाव तसाच बनत गेला,जणू काही एकाचवेळी अनेक गोष्टी तिने नाही साध्य केल्या तर त्यात तिचा कमीपणा आहे. बाबांनीही धरित्रीला सतत प्रोत्साहन दिले. तिला लागणारी प्रत्येक गोष्ट जागच्याजागी देण्यासाठी ते तत्पर असत. अभ्यास असो नाहीतर इतर गोष्टी,कोणत्यावेळी काय करायचं याचं दोघांचं वेळापत्रक तयार असे. बाकी घरातल्या सगळ्यांनी त्यांचा विचार करूनच आपपले कार्यक्रम आखायचे. घरातले सणवार, नातेवाईक, लग्नकार्ये या कशातच तिला फार रमता येत नसे,तितका वेळच नसे. सात वर्षांनी तिच्यापेक्षा लहान असलेल्या धनंजयबरोबर काय खेळायचे हा तिला प्रश्न पडे. समवयस्क सोबत तिला नव्हती,मित्र-मैत्रिणी शाळेपुरत्या, मोजक्याच होत्या.
हौस,मजा,हट्ट,वेड्यासारखं वागणं,भांडणं,रडणं,रुसून बसणं..हे तिच्या गावीही नव्हतं. तिच्या गरजा निर्माण होण्यापूर्वीच त्या तत्परतेने पुरवल्या जात असत. घरात बाबा तिच्यासाठी आणि आई धनंजयसाठी हे जणू अलिखितपणे ठरूनच गेलेले होते. तिचं संपूर्ण शिक्षण,उच्चपदस्थ नोकरी,लग्न, नवरा आणि तिला झालेला मुलगा सगळं आयुष्यच आखीवरेखीव, ठरवल्यासारखं.
सगळं असं असूनही माझी मुलगी ‘सुखी’ आहे का ? असे आपले अरुणालाच सतत वाटत राही त्यात धरित्रीच्या बोलण्यामुळे अरुणा आणखीनच काळजीत पडली.
पण त्यानंतर तीन दिवसांनी धरित्री घरी परतली, ती जणू कोणी दुसरीच व्यक्ती आहे,अशी. पहिल्यांदा तिने स्वतःच्या घरी परतायची कसलीही घाई केली नाही. अरुणाला म्हणाली, “अगं जातांना आमच्या विमानाने टेक ऑफ केलं आणि जरा वेळ होतोय तोवर विमानात एकदम गडबड सुरु झाली. प्रवाशांपैकी एका बाईच्या लक्षात आलं की तिचं बाळ खालीच एअरपोर्टवर राहून गेलंय..तिने जी रडारड सुरु केली..खूप गोंधळ झाला. नेमकं काय झालंय समजल्यावर कोणालाच काही सुचेना. एअरहोस्टेसने तिला धीर दिला,बाकीच्या प्रवाशांनीपण. पायलटने खूप फोनाफोनी करून मग  शेवटी विमान पुन्हा माघारी वळवलं. बाळापर्यंत पोहोचेपर्यंत आणि विमान पुन्हा निघेपर्यंत तासभर वेळ गेला,सगळ्यांचाच. पण कोणीही काही म्हणालं नाही. एका आईला आपलं बाळ सुखरूप परत मिळालं,यातच सगळ्यांनी समाधान मानलं.
“काय आई म्हणावं की काय म्हणावं या बाईला? असं कसं आई आपलं बाळ घ्यायचं साफ विसरू शकते?” अरुणाच्याच छातीतच धस्स झालं सगळं ऐकून...
“हो ना, अगं अगदी हाच प्रश्न तिथे असलेल्या प्रत्येकाच्या मनात आला असेल पण कोणीही तिला असं काही म्हणून आणखी खजील केलं नाही. ती विसरली इतकंच खरं..का? कशी? या प्रश्नांना त्या क्षणी महत्त्व नव्हतंच. सिक्यूरिटी चेक झाल्यावर तिने गाढ झोपलेल्या बाळाला बेबीसीटरमध्ये ठेवलं आणि लॅपटॉपवर काम करण्यात गढून गेली आणि त्याच नादात विमानात बसली असावी..आणि अगं, ते गोडुलं बाळ.. नंतर त्याला विमानात घेऊन आले,तरीही झोपलेलंच होतं,तितकंच गाढ..आपली आई आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही या विश्वासाने..

                                           
आम्ही नाही का आदिला शाळेतून आणायचं एकदा विसरून गेलो होतो..शाळा लवकर सुटणार आहे,हे ना माझ्या लक्षात राहिलं,ना अनीलच्या..तोच प्रसंग आठवला मला.. आदि सात वर्षांचा होता, शाळा सुटून सगळे घरी गेले तरी आपल्याला घ्यायला कोणी कसं आलं नाही, म्हणून रडवेला झाला होता. तुला माहितीये? त्यानंतर त्याला ती सवय लागली, झोपतांना माझा गाऊन जवळ घेऊन झोपायची. मी जवळ असो किंवा नसो,त्याला तो लागायचाच,अजूनही लागतो. या प्रसंगाचं त्यावेळी इतकं काही मला वाटलं नव्हतं पण विमानातल्या या अनुभवाने मीच हादरून गेले. माझं नंतर कशातच लक्ष नाही लागलं. कधी परत येते असं झालं मला. 
आई, ‘जगण्यासाठी काम’ की ‘कामासाठी जगणं’ या प्रश्नाचं उत्तरच मिळालं बघ मला. गेले काही दिवस ना, मन अस्वस्थ होतं माझं, आपलं काहीतरी चुकतंय असं वाटत रहायचं. इतरांनी हेवा करावा असं आयुष्य आहे माझं. माझ्यासमोर एकापेक्षा अनेक चांगल्या संधी आल्या सतत. त्यातलं एक स्वतःसाठी निवडून मी शांत नसायचे,मला सगळंच हवं असायचं. आणि मग ते मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा. माझा ‘वेळ’ कायम माझ्यापुढे धावायचा. आणि मी सगळं जमवण्यासाठी सगळ्यात आधी तडजोड करायचे ते स्वतःशीच. वेळ नाही ना,मग झोप कमी. वेळ जातो म्हणून कोणी मैत्रिणी नाहीत. इतक्या आवडीने बंगला बांधला, सजवला..पण त्यात राहण्याचं सुख अनुभवण्यासाठी मीच घरी नाही. आदिचं बाळपण तर माझ्या हातून निसटलंच आहे..आणि इतकं करून मी जे मिळवलं, त्यातलं सुख अनुभवण्यासाठीसुद्धा थोड्यावेळपण थांबायची तयारी नाही माझी. आपलं बाळ विसारणाऱ्या त्या आईमध्ये आणि माझ्यात काय फरक आहे मग? तिला काहीही म्हणण्याचा आणि नावं ठेवण्याचा मला काही अधिकार नाही. अगं, समोर असलेल्या क्षणात मी जागेवर नसतेच,माझं मन कायम भविष्यकाळात. असं धावून मला समजलं की आपण कुठेच पोहोचत नाही. यश मिळवण्याची आणि पुढे जाण्याची मर्यादा नाही समजून घेतली तर तेसुद्धा एक व्यसनच आहे, आपलं विश्व पोखरण्याची क्षमता असलेलं. जगाच्या मागे राहण्याची मला भीती वाटायची.. आता वाटतंय ‘मी’ आहे म्हणून ‘माझं जग’ आहे. जगाच्या पुढे जाण्यात माझी जिवलग माणसं दिसेनाशी झाली,त्याचं काय?

त्या निरागस बाळाचा आश्वस्त चेहरा माझ्या मनावर कायमचा कोरला गेला..अगदी लख्ख समजलं मला काय नेमकं हवंय ते! आईला वेळ नाही म्हणून तिच्या गाऊनकडून ऊब,सुरक्षितता,आश्वासन मिळवणारा माझ्या आदिला आज,आत्ता,या क्षणातली ‘आई’ हवी आहे..आणि मला हवा आहे समतोल. जगण्यची लय सांभाळणारा. मी एकाचवेळी अनेक नाही मिळवलं तरी चालेल पण एकातला आनंद पुरेपूर उपभोगायला शिकवणारा..मला स्थैर्य देणारा. मला थोडं थांबायची,उसंत घेण्याची गरज आहे. माझी कोणाशीच स्पर्धा नाही, हे शहाणपण ज्या क्षणांनी दिलं ते क्षण नीट समजून घेण्याची गरज आहे. हा अनुभव आपल्या लेकीला ‘माणूस’म्हणून समृद्ध करून गेलाय, हे अरुणाच्या लक्षात आलं. पंखात बळ आहे म्हणून आकाशात भरारी घेणाऱ्या तिच्या पिल्लाला उडण्यासाठी आता निश्चित दिशा सापडली होती.
© डॉ अनन्या अंजली 
# कॅलिडोस्कोप
फोटो सौजन्य गुगल  


गुरुवार, ११ जुलै, २०१९

काही लिहावे स्वतःसाठी



काही लिहावे स्वतःसाठी!

कित्येकदा मनात असंख्य विचार असतात. काय करावं,सुचत नाही. नेमकं काय वाटतंय स्वतःलाही उलगडत नाही. जे घडायला नको आहे असे वाटते,तेच आपल्याबाबतीत घडते, त्याचे वाईट वाटत असते,राग आलेला असतो. एकूणच नकोसेपण मन व्यापून टाकते. आपण नेमके काय करायला हवे, समजत नाही. परिस्थितीवर आपला काहीही कंट्रोल नाही,हे कधीतरी लक्षात येते. अगतिक,अस्वस्थ,अस्थीर वाटत असते. कोणाशी काहीही बोलावेसे वाटत नाही. एकटे रहावेसे वाटते आणि एकटेपणा मिळाला की तो असह्यही होतो. अनुभवतो ना असे काहीतरी आपणही?
मनात खोलवर जाणवणारी भावना नेमकी काय आहे, हे आपल्या लक्षात येईलच असे नाही. अशा वेळी मनात येणाऱ्या विचारांची फक्त दखल घ्या. ते विचार मनात येण्यासाठी काही कारण घडलेय का,आठवा. बरं प्रत्येकवेळी काही घडलेलेच असते,असे काही नाही, कधी ‘काही वाईट घडेल का’ या मनातल्या आशंकेमुळेसुद्धा मन अस्वस्थ झालेले असू शकते. यावेळी एका गोष्टीची नक्की मदत होऊ शकते, ती म्हणजे एकांतात मनातले सगळे विचार एका कागदावर लिहून काढण्याची. जे काही आणि ज्या स्वरूपात मनात येते आहे,ते सगळे सरळ लिहून काढा. हे आपण इतर कोणासाठीही नाही फक्त स्वतःसाठीच लिहितो आहोत,म्हणून भाषा,अक्षर,शैली, कोणी बघेल का,वाचेल का, यापैकी कशाचाच विचार न करता फक्त लिहायला सुरवात करा. कोणताही आडपडदा नाही,कोणाची रोकठोक नाही. लक्षात घ्या, हे स्वतःच स्वत:शी मोकळेपणानं बोलणं आहे. असे केल्याने आपले विचार नेमके काय आहेत याची आपल्यालाच कल्पना येते. मनाला कशाचं वाईट वाटलंय,त्रास होतोय,काय नकोय, काय हवंय यापाठीमागे नेमकी कोणती भावना जाणवते आहे,याचा उलगडा होण्याची शक्यता जास्त असते. अनेकवेळा स्वतःला वाटणाऱ्या खऱ्या भावना वेगळ्याच असतात आणि त्या लपवून ठेऊन आपण वरवर दुसरंच काहीतरी ओढूनताणून वागत असतो. आपले खरे वाटणे इतर कोणाला समजले,तर ते आपल्याला काय म्हणतील? याची भीती वाटत असते. म्हणून अनेकवेळा आपण प्रत्यक्ष जसे आहोत तसे न वागता खोटं खोटं वागत असतो आणि सगळं काही कसं चांगलं चाललं आहे,असं इतरांना,स्वतःलाही भासवत असतो. यातली ओढाताण,ताण अस्वस्थता निर्माण करतो.
मनातले विचार लिहिण्याची मदत आपल्याला अनेक प्रकारे होऊ शकते. ज्या कोणत्या प्रसंगांबद्दल,त्यातल्या व्यक्ती आणि समस्यांबद्दल,स्वतःच्या भावनांबद्दल आपण विचार करत असतो,लिहिण्याने ती परिस्थिती अधिक नेमकेपणाने समजण्याची शक्यता असते.
नैराश्य आणि भीतीच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांच्या केलेल्या मानसशात्रीय अभ्यासानुसार त्यांनी त्यांच्या विचार आणि भावना लिहून व्यक्त करणे हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते. लिहिण्यामुळे अव्यक्त नकारात्मक भावनांना व्यक्त करण्याची संधी मिळते.मनातली खळबळ कागदावर लिहून झाल्यावर तो कागद फाडून,अगदी बारीक बारीक तुकडे करून टाकून द्या,असे रुग्णांना सुचवले जाते. यातून त्यांच्या मनातली नकारात्मकता कमी होते,असा अनुभव आहे.      
मनात येणारे विचार आणि त्यापाठीमागे जाणवणारी भावना समजल्यानंतर आपल्यासमोर असलेली परिस्थिती, प्रश्न सोडवण्यासाठी, त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांचा काही उपयोग होणार आहे की त्यामुळे त्रास आणखी वाढतो आहे, हे समजते. स्वतःच्या विचारांची, मतांची अधिक स्पष्टता येते. आपले किंवा आपल्याबाबतीत इतरांचे काही गैरसमज झालेले असतील तर लिहिण्याने ते लक्षात येऊ शकतात. त्यामागचे आपले,इतरांचे दृष्टीकोन काय आहेत, हे समजते.
                                    


आपल्याप्रमाणे इतरांनादेखील काय वाटत असेल,त्यांचे काय म्हणणे आहे,याचा अंदाज येऊ शकतो आणि आपण शांतपणे प्रसंगाचा विचार करण्याची शक्यता वाढते. आपले विचार तपासून बघू शकतो, त्यातल्या भावनेचा स्वीकार करून ती व्यक्त करण्याचा दुसरा काही पर्याय असू शकतो का याचाही विचार करू शकतो. लिहितांना नकारात्मक विचारांचा,भावनांचा पहिला प्रवाह जोरात व्यक्त होऊन गेला की मनावरचा ताण कमी होतो आणि आपण ‘वाटण्यापासून’ सावरतो. मग बुद्धीतला विवेक,समज  जागा होऊन मेंदूला अधिक तर्कसंगत, नवीन आणि वेगवेगळे पर्याय सुचण्याची शक्यता असते. कारण लिहितांना आपले मन, बुद्धी आणि शरीर लिहिण्याच्या कृतीतून एकमेकांशी जोडले जाते. मनाला,शरीराला जाणवणाऱ्या भावनांची दखल आपली बुद्धी घेऊ शकते. हेच आहे स्वतःला समजून घेणे,स्वतःशी जोडले जाणे. आपल्या विचारांशी आणि भावनांशी असे जोडले जाणे म्हणजेच आलेल्या प्रसंगामाधल्या अनुभवांमधून स्वतःची मानसिक,भावनिक आणि वैचारिक वाढ करत माणूस म्हणून समृद्ध होत जाण्याचा प्रवास आहे.
लिहिण्यातून आपली स्वप्नं, आकांक्षा, अपेक्षा आणि महत्वाकांक्षा नेमक्या काय आहेत,हे लक्षात येते. त्यासाठी बाह्य परिस्थितीत काही अडथळे, आव्हाने आहेत का? असतील तर ते काय आहेत, याची स्पष्टता येते. त्यावर मात करण्यासाठी माझ्याकडे काय आहे? याचा शोध घेण्यासाठी मन तयार होते. माझ्या क्षमता आणि माझ्यात असलेल्या कमतरता, उणिवा काय आहेत, हेही लक्षात येते. आपल्या आपल्याला त्या अगदी नीट माहीत असतात. योग्य प्रयत्नांनी आणि इच्छाशक्तीने आपण त्या बदलवूसुद्धा शकतो. पण हे मान्य करण्याऐवजी त्या टाळण्याकडे,नाकारण्याकडे, बहुतेकांची शक्ती खर्च होते. स्वतःला आपण आहोत तसे स्वीकारणे, भल्याभल्यांनादेखील जमत नाही. मग आपल्यात जे नाही ते दाखवण्याकडे,उगीचच आव आणण्याकडे आणि ज्ञानाचे,परिस्थितीचे,शहाणपणाचे ढोंग इतरांना दाखवण्यात आयुष्यातला वेळ निघून जातो. काहींच्या मनात असुरक्षितता,भीती असते म्हणून आत्मविश्वास कमी पडतो. त्या भीतीवर मात करण्याचे पर्याय आपल्याजवळ असतात. आपल्याकडे जे कमी असेल ते मिळवण्याचे मार्ग शोधले तर सापडतात. हाच असतो आपण स्वतःचा आपण जसे असू, तसा केलेला स्वीकार.( स्वतःचा आहे तसा स्वीकार करायचा,म्हणजे नेमके काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर)
तो एकदा जमला की स्वतःकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळते.स्वप्नांकडे जातांना काय टाळायचे आणि कशाकडे लक्ष केंद्रित करायचे हेही समजते.आपली उर्जा योग्य दिशेने वळवता येते. आत्मविश्वास हळूहळू वाढतो. नातेसंबंध, परिस्थिती यांच्याकडे स्वीकाराच्या जाणत्या कोनातून बघता येते.
स्वतःसाठी लिहिण्यातून भूतकाळातील अनुभावांकडून आपण काय शिकलो, काय शिकायला हवे होते,हे समजते. वारंवार त्याच त्या चुका मग शक्यतो होत नाहीत. वर्तमानात येणाऱ्या अनुभवांकडे आपली दृष्टी शहाणी,समंजस होते. मानसिक,शारीरिक अभिव्यक्ती मोकळी,व्यापक आणि आरोग्यपूर्ण होऊ शकते.
त्रासदायक अनुभवांबद्दल लिहावे, हे जितके खरे तितकेच आपल्या आनंददायक अनुभवांबद्दलसुद्धा आपण लिहायला हवे. असे केल्याने सकारात्मक भावनांचासुद्धा योग्य आदर आणि स्वीकार आपल्या पूर्ण क्षमतेनुसार आपण करू शकतो.
                              

अनुभव असा आहे की आपल्याला आयुष्यात येणाऱ्या त्रासदायक,दु:खदायक अनुभवांचा आपल्यावर होणारा मानसिक,भावनिक परिणाम हा जास्त तीव्र असतो. कोणाचे जिव्हारी लागलेले शब्द, केलेला अपमान, त्यातून झालेला मनस्ताप कितीही वर्षांपूवी आयुष्यात या गोष्टी घडलेल्या असतील तरी त्या अगदी काल घडल्या आहेत असे आपल्याला वाटावे,इतक्या ताज्या असतात मनात.कारण असे प्रसंग एकदाच घडले तरी त्यानंतर ते आठवणींमधून सतत चघळत राहून आपणच ते वारंवार जगतो आणि त्यांची तीव्रता आणखी वाढवतो.
आयुष्यातले आनंदाचे,सुखाचे, सकारात्मक भावनेचा अनुभव देणारे क्षण कितीतरी असतात पण ते मात्र आपण गृहीत धरतो आणि किती सहजपणे विसरून जातो. खरंतर त्या सुंदर आठवणींना वारंवार उजाळा द्यायला काय हरकत आहे? आपल्या प्रत्येकाकडे अशा जपून ठेवलेल्या सुखद अनमोल आठवणींचा खजिना नक्कीच आहे, तो जाणीवपूर्वक उघडला की आजही आपले मन प्रसन्नतेने न्हाऊन निघते. डोळ्यात वेगळीच चमक येते. मनात,शरीरात असलेली आनंदाची उर्जा आपल्याला जगण्याचे बळ देते. आयुष्य सुंदर आहे,असे नक्की वाटते.
कोणी दुसरा आपल्यासाठी काही चांगले करेल, याची वाट आपण का बघायची? आपल्याचकडे असलेल्या या सुंदर क्षणांकडे दुर्लक्ष करायचे आणि वेदनांचे,पराभवाचे,अपमानाचे,नकोश्या क्षणाचे दु:ख मात्र वारंवार ‘इंधन’ पुरवून मनात जागते ठेवायचे? आणखी दु:खी होत राहायचे? असे स्वतःच स्वतःचे शत्रू होऊन का जगतो आपण? लक्षात येतंय का तुमच्या? कोणी दुसरा काय वाईट करेल आपले? आपणच आपले वाईट करण्याचा चॉइस वेळोवेळी निवडतोय, त्याचे काय?
इथूनपुढे अशी शेखचिल्ली मानसिकता नकोच आपल्याला. आपण चांगल्या आठवणीना उजाळा देऊ, सुखाचे,समाधानाचे क्षण वेचू, आयुष्याबद्दल कृतज्ञ असू तर जगण्यातली अशी संजीवक शक्ती आपल्याला नक्की आनंदी, समाधानी बनवेल.    


©डॉ.अनन्या अंजली
# मनोविकास

mindmattersaa@gmail.com