बुधवार, ३० जुलै, २०१४

एक संवाद बाबांशी!



खरंतर फक्त तुमच्यासाठी
मनातले सगळे प्रश्न बाजूला सारून
का करायचं बाबा ‘लग्न’ मी
सगळ्याच मुलींना करावं लागतं, फक्त म्हणून?
 
लग्न म्हणजे सहजीवन असं तुम्ही म्हणता ना?
‘सह’ काय आहे यात मला जरा सांगा तर
माझी माणसं, माझं जग
सगळंच काही मला दुरावणार असेल जर?

युगानुयुगे असंच होतंय, म्हणून का ते योग्य?
‘जे करशील ते मनापासून’ ही तुमचीच ना शिकवण
या बाबतीत का मग अयोग्य?


माझं नाव बदलायचं मी,
आडनावही बदलायचं,
घर बदलायचं एका दिवसात...
माझ्या माणसांनाही सहज सोडून जायचं?

‘आई’,’बाबा’, नवीन नाती मिळणार असं म्हणता?
नव्या नात्यात आपलेपणही मीच आणायचं म्हणता!

पण मग माझ्यासाठीच काय म्हणून असा न्याय बाबा?
बदल सारे माझ्यासाठी.. केवळ लग्नाकरता?
त्यालाही येऊन बघू दे ना माझ्यासारखा सासरी
आपली सारी पाळंमूळं तोडून नव्या नात्यांकरता!

प्रेम विश्वासाच्या पायावरच ना, खरं नातं रुजतं?
समान असेल संधी, या मूल्यावर एका बंधनात टिकतं!

माझ्या क्षमता, माझी बुद्धी आहेच यांची मला खात्री
रुपापेक्षाही देखणी वाटते मला माझ्यातली
निर्णयक्षम निर्भय वृत्ती,
समजेल हे ज्याला बाबा, ते घर माझे
नात्यांचे धागे गुंफण्यासाठी
सर्वांचेच मन असावे, स्वच्छ मोकळे.

लग्न म्हणजे नव्हे ना,
आखून दिलेल्या चौकटीतला घुसमटता श्वास
स्वतंत्र आहे मी,
मलाही हवा मुक्त, आनंदी अवकाश.

दोघांच्याही निर्णयाची असेल जिथे किंमत
विचार भिन्न असू दे आमचे
दोघांतही हवी ते आहेत तसे स्वीकारायची हिंमत.
दृष्टीकोन,कर्तव्ये यांची जाण असावी
त्याच्यासाठी,माझ्यासाठी यात वेगळी सीमा नसावी.

साध्याच आहेत अपेक्षा माझ्या
स्पष्ट असल्या तरी
आचरणात विवेक हवा बाबा
तरच चढेन सहजीवनाची पायरी.

आयुष्य म्हणजे जर प्रवास असेल ना बाबा,
साथीदार माझा मला माझ्या मनासारखा हवा!

-अनन्या
     

बुधवार, २३ जुलै, २०१४

मनसंमोहन



तेज व्यापले घन निळे
गडद कुठे तर कुठे फिके
दशदिशांतून धावत आले
मनसंमोहन गूढ असे

वेग भरारा अल्लड वारा
छेड काढतो उगीच अवखळ
रेशीम रेशीम तळस्पर्शाला
वेल बिलगली तरूस अलगद  


रंग मंजिरी हिरवी जादू
गर्द केशरी उन्हात झिलमील
पानोपानी गार शहारा
नुपूर नाजूक रुणझुण किलबिल


आर्त असोशी झुकली खाली
अवनीने उंचावले मस्तक
क्षितिजतळाशी लाल गुलाबी
देहबावरी लाजरी कुजबूज.

-अनन्या

बुधवार, १६ जुलै, २०१४

माझे असलेपण




भासले वरवर शांत तरीही
आतून उसळून येते काहीसे
फसवे मायाजाल भोवती
वाटते परि खरेच सगळे

खरीच नाती, स्पर्श, शब्दही,
आभासाचा भासच केवळ?
गोड वागणे, शब्द तळाशी,
अर्थ वाटतो का मग पोकळ?

जपते तरीही जीवापाड मी,
वीण उसवली कुठे जराशी
बेमालूम जोडते काठही,
फाटले जरी वस्त्र तळाशी

दखल जरी ना कोणी घेतली,
जाते तरीही पुढेच केवळ 
क्षणा पाठल्या क्षणात उरते
कल्पांता इतके कठीण अंतर

फसवे तरीही अखंड सनातन,
व्यापून आहे सर्व चराचर
शोधत राहते अंतर्यामी
खरे का ते तरी माझे असलेपण?    



-अनन्या