सोमवार, ७ सप्टेंबर, २०१५

‘अहल्या’

रामायणातल्या अहिल्येची कथा मला कायम विचार करायला भाग पाडते. जाणत्या वयात जेव्हा ही कथा प्रथम ऐकली तेव्हाच अहिल्येबद्दल मनात फार कुतूहल दाटून आले. या कथेचा आशय फक्त ‘अहिल्या’ या एकाच व्यक्तीभोवती मर्यादित नाही तर तो आपल्याला तिच्या काळातील समाजापर्यंत नेऊन पोहोचवतो. आपण जसा विचार करत जाऊ तसे तसे या गोष्टीचे अनेक पैलू उलगडत जातात. रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचे असे विशेष आहे की ती प्रत्येक व्यक्तीला आपापल्या व्यक्तिगत कुवतीनुसार अथवा आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर असलेल्या त्या व्यक्तीच्या क्षमतेनुसार समजतात. त्यांचे संदर्भ वेगवेगळे अर्थ घेऊन सामोरे येतात आणि दर वेळी वाटतं की, अरेच्चा हे असे आहे होय!

या गोष्टीचा सगळ्यात पहिला अर्थ आहे तो गौतमऋषींची पत्नी अहिल्येला ते आश्रमात उपस्थित नसताना गौतमाचेच रूप घेऊन आलेला इंद्र फसवतो. आणि त्या दोघांना एकांतात बघून परत घरी परतलेले गौतम ॠषी इंद्राला आणि अहिल्येला शाप देतात. अहिल्येचे रुपांतर एका जड अशा शिळेत होते. त्यानंतर पुढे अनेक वर्षांनी श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्या पुन्हा जिवंत होते आणि तिचा उद्धार होतो.


न कळत्या वयात ही गोष्ट ऐकली तेव्हा अहिल्येचे असे दगड होऊन जाणे याबद्दल मनात एकदम भीतीच वाटलेली..म्हणजे कोणीतरी फक्त शाप देते आणि माणसाचा दगड होऊन जाऊ शकतो तर! इंद्राने फसवले म्हणजे नेमके काय केले हे समजले नाही तरी इंद्र आणि गौतम ॠषी दोघांचाही आलेला राग आणि अहिल्येबद्दल वाटलेली कणव,भीती,सहानुभूती यातून ती एकदम लक्षातच राहून गेली.



शापामुळे एखाद्या व्यक्तीचे रुपांतर असे दगडात होऊन जाणे मुळीच शक्य नाही याची खात्री ज्या वयात पटली त्यावेळी ही कथा अर्थाचा आणखी एक संदर्भ समजावून गेली.

गौतम ॠषीची पत्नी अहिल्या अत्यंत रूपवान होती. तिच्या सौंदर्याचा मोह देवांच्या राजाला, इंद्रला पडला. आपल्या मनातली अभिलाषा त्याने चंद्राला सांगितली, चंद्राने कोंबड्याचे रूप घेऊन पहाट होण्यापूर्वीच बांग दिली. ती ऐकून नित्य नियमाप्रमाणे गौतम ॠषी गंगेवर स्नानसंध्येसाठी निघून गेले. ते गेल्यानंतर इंद्र गौतमांचे रूप घेऊन अहिल्येच्या पर्णकुटीत ला. तो गौतम नसून देवराज इंद्र आहे, हे अहिल्येला कळले नाही. स्वामी, आज आपण लवकर परतलात?’ असे तिने गौतम असलेल्या इंद्राला विचारले देखील. पर्णकुटीत अंधार असल्यामुळे अहिल्येला ते समजले नसावे कदाचित पण तरी त्यानंतरदेखील तिला गौतम आणि इंद्र यांच्यातील फरक कळला नसेल, हे काही पटले नाही मनाला.

पण तिनेही कुठे इंद्राला अडवलेले दिसत नाही. गौतम ॠषी परतल्यानंतर आणि सगळा प्रसंग लक्षात आल्यावर त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी अहिल्येचा त्याग करणे हे समजू शकते..आणि नवऱ्याने त्याग केल्यानंतर त्या काळातल्या सामाजिक परीस्थितीनुसार एखाद्या स्त्रीची अवस्था अत्यंत हलाखीची,दैन्यवाणी होऊ शकते हे ही समजण्यासारखे.

मग मनाला या गोष्टीचा नवा अर्थ जाणवला. की शीळा हे एक त्या अवस्थेचे आणि सामाजिक, मानसिक,शारीरिक हलाखीचे रूपक आहे तर. दगडासारखे कठीण आयुष्य तिच्या वाट्याला आले. तिच्यावर अनेक संकटे ओढवली आणि सगळ्यांमध्ये असून समाजातल्या कोणीही तिला थारा दिला नाही. ती एकटी, एकाकी परिस्थितीचा सामना करत जीवंत राहिली.

पण तरीही अहिल्येबद्दल इतकाच विचार करून मनाचे समाधान होईना. मोहाचा एकच क्षण तिच्या आयुष्यात आला आणि तिचे आयुष्य होत्याचे नव्हते झाले?

रामाने तिचा उद्धार केला. एक पुरुष असूनदेखील त्यालाही गौतम ऋषींसारखेच या प्रसंगात तिचीच चूक आहे असे का नाही वाटले? याउलट त्याने तर तिचा उद्धार केला, म्हणजे रामाने नेमके काय केले असावे? तर  रामासारख्या सम्यक् दृष्टीने विचार करणाऱ्या व्यक्तीने तिचे दु:ख समजून घेतले तिच्यावर झालेला अन्याय दूर करून त्याने तिला पुन्हा समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. रामाला प्रतिप्रश्न विचारण्याची हिंमत अहिल्येला दुर्लक्षित केलेल्या समाजात नव्हती. इतके दिवस दगडासारखे शून्य अस्तित्व असलेली तिची स्थिती त्या दिवसानंतर बदलली. इतकेच नव्हे तर त्या दिवसानंतर आपल्या दिवसाची सुरुवात करतांना ज्या पंचकन्यांचे आजही नित्यस्मरण सर्वांकडून केले जाते त्या पाच कन्यांमध्ये तिचे नाव पहिल्यांदा घेतले जाते.
श्लोक असा आहे

अहल्या, द्रौपदी, कुंती, तारा, मंदोदरी तथा I
पंचकन्या
स्मरे नित्यं, महापातक नाशनम् II

किंवा काही जण

अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा I
पंचकन्या
स्मरे नित्यं, महापातक नाशनम् II असेही म्हणतात.

‘कन्या’ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे परम पवित्र असलेली स्त्री. मग एकदा मोहाला शरण गेलेली स्त्री रामाने उद्धार केल्यानंतर लगेच परम पवित्र कशी काय झाली? असे काय घडले असावे नेमके? आता मात्र अहिल्येबद्दलचे कुतूहल स्वस्थ बसू देईना.

कोणत्याही लेखकाच्या किंवा कवीच्या लिहिण्यात ते जगत असलेल्या काळाचे सामाजिक संदर्भ असतातच,अर्थात ते काही साध्या,सरळ भाषेत लिहिलेले असतील असे नाही. लेखक,कवी प्रत्येकाची आपली अशी एक शैली असते. कवीची प्रतिभा आणि त्याच्या समोर असलेले वास्तव यातून त्याची कलाकृती जन्म घेते.

मग अहिल्येची कथासुद्धा आपल्या काळाचा संदर्भ जतन केलेली एखादी रूपक कथाच तर नाही?

अहिल्या या नावाचा काय अर्थ आहे? तर मूळ शब्द आहे, अहल्या..हल्य म्हणजे निंद्य..जी निंद्य नाही अशी ती अहल्या म्हणजे दोषरहित असलेली आणि अहिल्याचा अर्थ ‘कधीही न नांगरलेली गेलेली जमीनअसादेखील आहे. ब्रह्मा जवळ अशी दोषरहित असलेली अशी अहल्या (जमीन) होती. त्या काळातल्या वैदिक देवतांमध्ये सर्वात प्रमुख देव होता तो इंद्र! 

इंद्राला ती जमीन देण्याचे ब्रह्माने कबूल केले होते परंतु त्यानंतर त्याने ती गौतम ऋषींना सुरक्षित राखण्यासाठी, सांभाळ करण्यास म्हणून दिली. त्यांनी ती अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळली आणि ठरलेल्या योग्य वेळी ब्रह्माला परत केली. गौतम ऋषींनी तिचा अत्यंत मेहनतीने सांभाळ केला म्हणून ती लागवडीसाठी योग्य, उपजाऊ अशी झाली. ब्रह्माने खूष होऊन ती त्यांना दान केली. इंद्राला ज्या वेळी हे समजले त्यावेळी ही अत्यंत सुपीक अशी असलेली अहल्या गौतमा सारख्या ऋषींना काय उपयोगाची,असे वाटून ती आपल्यालाच मिळावी या प्रयत्नांना तो लागला. आणि त्याने ती चतूरपणे मिळवली देखील.
ण गौतमांना या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी ती जमीन इंद्रालाही तिचा उपभोग घेता येऊ नये, म्हणून नापीक करून टाकली. पुढे ती जमीन राम त्या भागात येईपर्यंत नापीक आणि म्हणून दुर्लक्षित अशीच राहिली.
या गोष्टीचा असा अर्थ बुद्धीला पटला.

रामाचा कालखंड हा शेती करणाऱ्या कृषिप्रधान आर्य संस्कृतीचा होता. आर्य लोकसमूह स्वत:जवळ पशूधन सुद्धा बाळगून होते. नापीक असलेल्या जमिनी सुजलाम सुफलाम करण्याचे तंत्र त्यांना माहीत होते. राम येईपर्यंत कितीतरी काळ अहल्या नापीक जमिनीचे प्राक्तन भोगत होती.  

रामासारखी सामर्थ्यवान व्यक्ती ज्या प्रदेशातून जाते, तो प्रदेश पुन्हा लागवडीखाली येणार, हे सहज शक्य आहे. प्राचीन काळात लोकवस्ती अशीच वाढली. पुरूष जंगलात दुर्गम भागात गेले त्यांनी तिथल्या भटक्या अनार्य लोकांवर,प्रदेशांवर वर्चस्व स्थापन केले मग तेथे वस्ती झाली आणि मग जमिनी लागवडीखाली आल्याया अर्थानेही रामाचे पाय जेथे लागले त्या त्या सगळ्या प्रदेशांचा उद्धार झाला.

मग अहिल्येची जी गोष्ट सांगितली जाते ती तशी का रूढ झाली असावी?
अहल्या ही जमीन असो किंवा स्त्री. तिला शापरुपी वेदना का भोगावी लागली?

तर त्या वेळेसच्या समाज व्यवस्थेत धर्म आणि त्याचे नियम यांनी समाज बांधला गेलेला होता. त्याचे नियम धर्मग्रंथात सांगितलेले होतेच पण त्यानंतर सर्वसामान्य जनतेला ते समजण्यासाठी वेगवेगळ्या कथा, मिथके यांचा आधार घेऊन नियमांचे महत्त्व पिढ्यानुपिढ्या ठसवले गेले. त्यात समाजरचना पुरुषप्रधान. या समाज चौकटीत स्त्रीवर जास्त बंधने असणे स्वाभाविक होते. त्यांच्या वागण्यावर चाकोरीचा प्रभाव ठसला पाहिजे याकरता अनेक कथा त्या काळात प्रचलित होत्या. पुरुषाने मर्यादा तोडली तरी त्याला मिळणारी शिक्षा आणि स्त्री ला मिळणारी शिक्षा यात फार तफावत होती. म्हणूनच इंद्राला मिळालेला शाप आणि अहिल्येला मिळालेला शाप यात अहिल्येची मानहानी जास्त झाली, तिला जास्त वेदना भोगाव्या लागल्या. अर्थात आता काळ कितीही बदलला तरी या कथा आणि अशी मानसिकता दोन्ही टिकून आहेत.

रूढ असलेल्या परंपरा मोडून..घालून दिलेली चौकट तोडून तुम्ही काहीही नियमबाह्य वागलात तर समाज कसे मान्य करणार? कारण अशा परंपरांचा संबंध पाप पुण्याशी जोडला गेलेला होता आणि आजही आहे. या पंचकन्या प्रसंगी समाजाच्या पाप पुण्याची चौकट सुद्धा ओलांडतात आणि त्या वागण्यासाठी परंपरेने दिलेली शिक्षा ही भोगतात.

ज्या पंचकन्या स्मरणीय आहेत त्यातल्या सगळ्या जणींनी रूढ असलेल्या परंपरांना प्रश्न विचारण्याचे आणि प्रसंगी त्या तोडण्याचे धाडस केले आहे. इतर स्त्रियांसारखे धोपट मार्गावरून जाण्याचे नाकारले आहे. त्या धाडसी होत्या. बंडखोर होत्या. परंपरा मोडून आपल्या मनाप्रमाणे वेगळा मार्ग निवडतांना त्या संकटांसमोर कणखरपणे उभ्या राहिल्या. आपली वेगळी वाट निवडल्याचे परिणाम त्या सहजपणे सहन करून गेल्या. आणि म्हणूनच आजही त्या स्मरणीय आहेत!

आता अहिल्येबद्दल नुसताच आदर नाही तर मनात ममत्वदेखील वाटते आहे!