भिंती आपण उभ्या करतो स्वत:भोवती आणि नाकारतोच कधी कधी वर्तमानचं
अस्तित्व.
अशी कुठलीही भिंत
थोपवून धरू शकणार नाही आतून उसळणारी उर्मी, हे माहीत असूनही?
भिंती माझ्याभोवतीच्या
काचतात मला, अडवतात निर्दयपणे
अवकाश माझ्याभोवतीचं
पावतं आकुंचन आत आत
घट्ट मिटून जाते मी...
हे माझंच जग असतं
सृजनाचं बीज खोल आत जागं असतं!
पण आज ठरवलंय मी की नवीन वाटेवरून जायचं
जुन्या वाटेची सवय मोडून, ओळखीची सोबत नाकारून.
म्हटलं काय हरकत आहे?
कशाला हवी आहे ती सोबत, जी चालणाऱ्या प्रत्येक पावलावर पहारा ठेवेल.
आणि अशी सुरक्षितता, जी असुरक्षिततेचं भय मनात जागंच ठेवेल.
या नवीन वाटेवर जातांना काय वाटेल मला?.......भीती?
माझं एक मन अगदीच भित्रं...कशाच्या चाहुलीनेही अस्वस्थ होणारं..
जे कधी घडणार नाहीही कदाचित ते ही सगळं मनातल्या मनात आधीच अनुभवणारं
हेच ते भिंती बांधणारं मन; स्वत:च भिंती बांधतं.. कधी कधी एक पुरेशी
नसते म्हणून मग कितीतरी...
आणि मग कितीही जीव गुदमरला तरी स्वत:ला मात्र सुरक्षित ठेवतं!
किंमत तर या सुरक्षिततेचीही चुकवावी लागते मला!
दुसरं मन, मला आवडणारं...क्षणात आकाशात भरारी घेणारं....पाखरासारखी..उंच
उंच.
कुठल्याही भिंतीची मिजास चालवून न घेणारं.
ते त्याला हवं तिथे जातं, नवे नवे अनुभव घेतांना बिनधास्त झोकून देतं.
ते मन मग हळूच कानात कुजबुजतं..तुला प्रत्यक्षात चालून बघायचीय ती वाट
?
बघूया या वाटेवर आहे का आपली वाट अडवणारी ती भिंत?
बघ दिसतेय का? तू नाहीस भिडली वास्तवाला प्रत्यक्षपणे तर
शब्द तुझे उरतील अर्थाविना केवळ पोकळ सगळे!
माझ्या बरोबर ये आणि आलेल्या ताज्या अनुभवातून जे मिळेल तुला
त्यासाठी शब्द शोधावे लागणार नाहीत तर आपोआप बहरतील ते तुझ्या अंगणात
मनातल्या उत्कट भावनांची अनुभूती तुझी सोबत करणार असेल आणि दरवळणाऱ्या
स्नेह फुलांनी
काठोकाठ भरून वाहणार असेल तुझ्या आयुष्याची ओंजळ
तर...तर नेमक्या त्याच क्षणाला बांध घालण्याचं करंटेपण का?
तू कुठल्याही शंके शिवाय ये..
इथून बघ दिसेल तुला स्वच्छ मोकळं निळं निळं आभाळ आणि एक वाट.
मी ही निश्चिंत मनानं जाते मग त्याच्यावर स्वत:ला सोपवून
शेवटी या वाटेवरून चालत जातांनाच मला कळणार आहे ती सरळ आहे की वळणा
वळणाची..
आणि मला तर सरळ जाण्याऱ्या एकसूरी वाटेपेक्षा वाकडं वळणच अधिक मोहात
पाडतं,
त्यातलं आव्हान आणि क्षमता मला भुरळ घालते.
असूच दे तिथे एखादं मान पूर्ण कलती करून उभं असलेलं वळण.
मला तिथे उभं राहून खालच्या दरीत खोल खोल डोकावून बघायचंय..
आणि बघायचंय उंच उंच निरभ्र आकाश
आभाळात डोळे हरवेपर्यंत
या आभाळाला कुठली भिंत कशी अडवेल?
हे आहे माझं अवकाश!
माझ्या ओळखीचं
माझ्याभोवती संवेदनांनी आकार घेणारं
नाहीतरी हातात रसरशीत निखारे येवोत की चांदण्यांची फुले
मला दोन्हीही तितकीच प्रिय आहेत.
-अनन्या.