गुरुवार, ८ मार्च, २०१८

देऊ अंधाराला हजार डोळे.




आईला पुण्याच्या डॉक्टरांना दाखवायचं होतं..
तिकडे पोहोचता पोहोचता दुपार झाली.
भाड्याची गाडी ठरवून गेलो आम्ही. सोबत आजी पण होती.
आई-बाबा,मी, आजी आणि छोटा भाऊ माझा.
दवाखान्यात पोहोचलो तर प्रचंड गर्दी तिथे.
जागा मिळेल तिकडे बसलो आम्ही.
नंबर लावलेला होता तरी लवकर नंबर लागेल तिचा, असं चिन्ह नव्हतं.
बसून बसून कंटाळा आला आम्हाला. पण नाईलाज होता.
आईला त्रास होत होता. आजी बाळाला घेऊन बसली होती.
संध्याकाळचे सात वाजत आले तरी आईचा नंबर काही लागेना.
बसून अंग दुखायला लागले.मला खूप झोप यायला लागली.
पाच-सहा वर्षाची होते मी त्यावेळी. शेजारी बसलेल्या काकांच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपी गेले.
त्यांना आवडलं नाही बहुतेक. मग आईने हळूच मला नीट बसवलं.
मी झोप आवरण्याचा खूप प्रयत्न करत होते पण शक्य होईना..
शेवटी वैतागून बाबा म्हणाले जा खाली पार्किंगमध्ये गाडी आहे तिच्यात जाऊन झोप.
बाबा माझ्याबरोबर खाली आले मला सोडायला. ड्रायव्हरकाका म्हणाले, मी आहे इथेच. झोपू द्या मागच्या सीटवर.
कशानेतरी मला जाग आली. माझ्या लक्षात यायला वेळ लागला. ड्रायव्हरकाका मला नको तिकडे स्पर्श करत होते.
मी कमालीची घाबरले. उठून बसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला धमकी दिली की खबरदार कोणाला सांगशील तर.
त्यावेळी ते इतके भयानक दिसले मला..भीतीने माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.
तितक्यात वरचं दवाखान्यातलं काम संपवून सगळे खाली आले.
आम्ही परत घरी जाण्यासाठी म्हणून निघालो. तो माणूस आरशातून माझ्याकडे बघत होता आणि मला मनात धडकी भरत होती.
पोहोचल्यावरपुन्हा कधी लागलं तर मला नक्की बोलवा..”असं माझ्याकडे बघत तो म्हणाला.
त्या वेळेसचा त्याचा चेहरा माझ्या अजून लक्षात आहे.
रात्री किती वेळा मला तो स्वप्नात दिसतो. आणि मी दचकून उठते.
घामाने पूर्ण न्हाहून निघालेली असते मी.
मी तो प्रसंग दुसऱ्या दिवशी आईला सांगितला तर तिने माझ्याच पाठीत जोरात धपाटा घातला आणि म्हणाली की खबरदार  जर का हे कोणाला सांगितलं तर ..अगदी आजी आणि बाबांना पण नाही सांगायचं. आणि तिनेही मी काय सांगतेय ते संपूर्ण ऐकलं नाही.
आईचा रुद्रावतार बघून मला आणखीनच भीती वाटली. मी गप्प बसले.
इतकी की त्यानंतर मी कोणाशीच मैत्री करू शकलेले नाही.
मला मैत्रिणी नाहीत असं नाही पण मी त्यांच्याशी मनातलं काहीही कधीच बोलत नाही.
मी एकटी राहते आणि शक्य असेल त्या वेळी माणसांमध्ये जाण्याचं टाळते.
त्या दिवसापासून मला काहीही करण्याची आणि कुठेही एकटीने जाण्याची खूप भीती वाटते.
आज मी कॉलेज मध्ये शिकते आहे पण कोणात मिसळू शकत नाही.
सगळे मला घुमी,कुढी म्हणून टाळतात.
आणि मलाही कोणी माझ्याशी बोललेलं नकोच असतं.
मला माझं शरीर,माझं दिसणं आवडत नाही.
अंगभर ओढणी पांघरून घेतली तरी मला माझं काहीतरी उघडं राहिलंय आणि लोकांना दिसतंय असं वाटतं.
घरातले सगळे मला समजावत असतात आणि बऱ्याच वेळा रागवत असतात. त्यांना माझं वागणं आवडत नाही.
हिचं कसं होणार पुढेअसं येत-जाता म्हणत राहते आई.
आता अधून मधून माझ्या मनात विचार येतो की कशासाठी जगायचं?




त्या माणसाचा चेहरा मी अजूनही विसरलेली नाहीये.
त्यानंतर तो प्रत्यक्ष जरी दिसला नाही तरी रोज मी तो बघतेच.
आणि तो मला तितकाच भयानक वाटतो.
त्यावेळी मला त्याने नेमकं काय केलं ते समजलं नाही.
पण आज ते समजतं आणि आणखी राग येतो.
माझ्या आईचा पण मला खूप राग येतो. मला आवडत नाही ती.
जगात चांगली माणसं पण असतात असं म्हणतात सगळे पण कसं ओळखता येतं कोण चांगलं आहे आणि कोण वाईट?
चेहऱ्यावर थोडी ना लिहिलेलं असतं कोणाच्या!
मनात असे विचार आले की माझं कशातच लक्ष लागत नाही.
हे सगळे प्रश्न आहेत एका घटनेमुळे संपूर्ण आयुष्याचा अर्थ हरवून गेलेल्या एका मुलीचे..जी आजच्या तरुणाईचा एक भाग आहे.

तिच्यावर उपचार आणि समुपदेशन याद्वारे तिच्या मनावर झालेल्या परिणामांमधून ती पुन्हा निरोगी मानसिकतेकडे येऊ शकेल.
पण या विषयाचे गांभीर्य लक्षात येऊन मन अस्वस्थ झाले आहे.
एक घटना माणसाचं आयुष्य किती बदलवून टाकू शकते हे वास्तव किती भयानक आहे.
आपल्याच समाजातली आहेत असा गुन्हा करणारी माणसं.

हा एक असा भाग आहे आपल्याच आजूबाजूला, जो अंधारात आहे. एरवी नॉर्मल वागणाऱ्या व्यक्तींच्या
 मनात हे असे अंधारलेले कोपरे असतील.
कोणी त्यांना जाणीवपूर्वक विस्मृतीमध्ये ढकलून देण्यात यशस्वी झाले असेल आणि आपले आयुष्य नॉर्मल जगत असेल.

तर कोणी ही काही समस्या आहे असे समजून घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असेल.
आणि कोणी संधी मिळेल त्या वेळी असे प्रकार करून स्वतःचे विकृत समाधान करून घेत असेल.
आयुष्याचा अर्थही समजलेल्या अजाण  बालिकेला आलेला हा अनुभव आणि त्यानंतर आपल्याच घरातल्या व्यक्तींच्या दडपणाखाली आईने त्यावर टाकलेला कठोर,बेपर्वा पडदा..
तिचं संपूर्ण आयुष्य व्यापून उरला.

या विषयावर समाजात आज जनजागृती होते आहे.
अनेकजण आपले अनुभव मोकळेपणाने सांगून मदत मिळवत आहेत.
आणि अजूनही कितीतरी कोणत्याही मदतीशिवाय प्रत्येक दिवस जगत आहेत.

लहानपणीच अपघातात आपले कुटुंब गमावलेला निशू..हे नाव पण त्याचे स्वतःचे नाही..तो एक शब्दही बोलत नाही म्हणून त्याला दुसऱ्याच कोणी दिलेले.
डॉक्टरांच्या दृष्टीने त्याच्या स्वरयंत्रात काहीही बिघाड नाही. कधीतरी कोणाशीतरी तो एखादा शब्द बोलतो, इतकेच.
त्याच्या मुक्या ओठांआड अशीच एक कहाणी आहे.
आज तेरा वर्षांचा आहे तो आणि तरी त्याच्यावर लहान-सहान अनेक गुन्हे दाखल आहेत.
त्याला कधीही कोणी हसतांना बघितलेलं नाही.
आयुष्याचा असा कोणता अनुभव त्याच्या इवल्याशा मनात आहे माहीत नाही..
त्याच्या डोळ्यात वेदना नाही पण एक प्रकारची तटस्थ मग्रुरी आहे.
कोणावर आहे त्याचा हा राग?
कोण आहे त्यासाठी जबाबदार?

आयुष्याची चांगली बाजू अनुभवाला येण्याआधीच जर कोणी आयुष्याची ही नकारात्मक बाजू अनुभवली आणि त्यावर
कोणाशीही बोलण्याची संधी त्या व्यक्तीपासून हिरावून घेतली गेली तर का नाही एखाद्याची मानसिकता, विचारचक्र नैराश्याकडे जाणार?
आपल्या आजूबाजूला असलेल्या एकही व्यक्तीबद्दल विश्वास वाटणं..भीती वाटत राहणं..या दहशतीखाली एखादं लहान मूल लहानाचं मोठं झालं तर आता समाजाने त्याच्याकडून कोणत्या चांगल्या मूल्यांची अपेक्षा करावी?

लहानपण झाकोळलेल्या बंद मनाआड आणि कोरड्या डोळ्यांच्या आड असलेल्या  व्यक्तीचा संपूर्ण समाज गुन्हेगार नाही?
संपूर्ण निराधार झालेल्या चांगल्या कुटुंबातल्या मुलाला आधाराश्रम हा एकच पर्याय उरावा?
आणि त्यातून विस्कटत, घरंगळत गेलेले त्याचे बालपण त्याला ज्या भविष्याकडे नेते आहे त्याला काय म्हणणार?
त्याचे भोग? की मागच्या जन्मी केलेल्या पापाची फळं?
आणि मग अशाच एका मध्यमवर्गीय घरातल्या मुलीला आलेल्या या अनुभवाचं काय?
समाज म्हणून कधी बदलणार आपला लैंगिकतेकडे बघण्याचा दृष्टीकोन?
सोशल समाज माध्यमांमधून बेजबाबदारपणे फिरणाऱ्या व्हिडीओ क्लिप्स अशाच कोणा अर्धवट व्यक्तीच्या वासना चाळवून
त्यांना असे वागण्यासाठी उद्युक्त करतात त्याचा विचार कोणी करायचा?
ज्या माणसाने हे नीच कृत्य केलं तो तर दोषी आहेच पण मग ज्या ठिकाणी तिने विश्वासाने आपल्यावर घडलेला प्रसंग सांगावा ते कुटुंब?
त्या आईची मानसिकता अशी का?
तिच्यावर कोणाचे दडपण असावे?
लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल..मुलीची जात...??
आणि या सगळ्यात त्या लहानग्या मनाचं काय?
याच समाजात त्याला कोणतीही सुरक्षितता नाही त्याचं काय?

आज महिलादिन!

सगळ्याच महिला साक्षर नसणार..सगळ्याच बंडखोर नसणार..सगळ्याच यशस्वी नसणार..आणि सगळ्याच सक्षम नसणार..
कितीतरी अशा मुली आणि महिला आहेत, लहान मुलं आहेत आपल्या कुटुंबात, समाजात की ज्यांच्या समोरच्या वाटेवर अजूनही अंधार आहे.
आपण बघितलं नाही..आपल्यातच मश्गुल राहिलो तर दिसणारपण नाही आपल्याला.
त्यांना गरज आहे आपली.

महिलाप्रधान..पुरुषप्रधान...खूप झालं असं आता..
माणूसप्रधानहोण्याच्या दिशेने वाटचाल करूया?