गंधकोशी फुलांच्या
गर्भ होऊन रुजावे
लहरत हवेच्या पावलांनी
निघून दूर दूर जावे
ऊन पांघरून मातीखाली
ठाव अज्ञाताचा घ्यावा
मातीकडून सोसण्याचा
वसा हलकेच घ्यावा
उद्यासाठी आज धीराने
दाह उन्हाचा पांघरावा
वेदनेचा स्वर कणातून
झिरपत झिरपत आत मुरावा
जलधारांनी भिजून चिंब
आसक्तीचे दान ल्यावे
मृद्गंधाच्या घमघमत्या
तृप्ततेने बेभान व्हावे
रुजावे, अंकुरावे,
लवलव कोंब व्हावे,
बहरावे,
रंग सुगंधाच्या कुपीतून
अंतरंग हळू उलगडावे
फुलावे, फळावे सहज,
सहज तसे मातीमोल व्हावे!
-अनन्या