आपले शरीर काहीतरी बिनसले आहे याची सूचना अचूक देते.
करोनाची लक्षणे दिसल्यावर पाहिले 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे. लक्षण वेळेत ओळखणे हे लवकर बरे होण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.
आपली लक्षणे नाकारणे,दुसऱ्याच कशाचे आहे असे समजणे,त्यावर स्वतःच घरगुती औषध घेणे,इतरांपासून लपवणे हे सगळं करून आपण स्वतःला खूप मोठ्या धोक्यात टाकतोय
आणि आपल्यापासून इतरांना लागण होण्याची शक्यता याच दिवसांमध्ये सगळ्यात जास्त असते.
"एखादी क्रोसीन घेतली की बरं वाटेल" असं स्वतःच ठरवू नये.आजार वाढल्याशिवाय डॉक्टरांची गरज नाही, हा अनेकांचा समज असतो. नैसर्गिकपणे बरे होण्यासाठी शरीराला अवधी दिला पाहिजे हा विचार करोनाबाबतीत केला तर लक्षात ठेवा हा आजार दिवसागणिक उग्र रूप धारण करतो. थेट जीवाशी गाठ आहे.
मायनर लक्षणे आहेत म्हणून घरीच बसू नका.
लहानात लहान लक्षणेही दुर्लक्षित करू नये.
करोना इतर शारीरिक आजारांपेक्षा वेगळा आहे. पाहिले लक्षण दिसल्यावर लगेच त्यावर उपचारांना सुरुवात नाही झाली तर ते विषाणू शरीरात दुप्पट वेगाने वाढत जातात.
सुरवातीला पहिल्या दिवशी नाक,तोंड,घसा यांच्या आतल्या भागात असलेले विषाणू तिसऱ्या दिवशी श्वासनलिकेमार्गे फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकतात.
करोनाचे पाहिले 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे.
डॉक्टरांचा ताबडतोब सल्ला घेणे महत्त्वाचे.
त्यांनी सांगितलेल्या टेस्ट करणे गरजेचे.
करोनावर उपचार करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांशिवाय इतर कोणतीही औषधे, सल्ला शक्यतो मनाने घेऊ नये. काही औषधे सोबत चालू शकतील.
केवळ घरगुती उपचारांनी करोना बरा होत नाही.
प्रत्येकाची immunity वेगळी असते आणि शरीराचा response ही वेगळा असतो.
लक्षणेही वेगळी असू शकतात किंवा
काहीही लक्षण नसतांना दुसऱ्या कारणासाठी केलेली टेस्ट कधी positive येऊ शकते.
तरीही डॉक्टरांच्या संपर्कात असावे.
टेस्ट्स खोट्या positive आणल्या जातात. यात डॉक्टर आणि इतर यंत्रणा सामील आहेत हे सगळे पैसे मिळवण्यासाठी कोणी करतंय या भ्रमात मुळीच राहू नये,अंगाशी येईल.
डॉक्टरांना आता करोनाच्या लक्षणांचा चांगला अंदाज आल्यामुळे लक्षणं दिसल्यावर लगेच,कधी तर टेस्टचा रिझल्ट येण्यापूर्वीच डॉक्टर औषधे सुरू करतात ते पुढचे सगळे धोके टाळण्यासाठी.
तुमच्या भल्यासाठी.
"डॉक्टर रिपोर्ट काय येतो बघू ना,मग ठरवू" हे म्हणणे म्हणजे आपणच आपल्या हाताने पायावर धोंडा पाडून घेणे आहे. त्यांचं न ऐकण्यात आपले भरून न येणारे नुकसान आहे.
जास्तीतजास्त काय होईल?
समजा तुमचा रिपोर्ट 'करोना नाही' असा आला तर तुमच्या पोटात तोपर्यंत औषधांचे एक किंवा दोन डोस गेलेले असतील. एकवेळ ते परवडले पण करोना लक्षणे वाढायला नको.
कारण जर 'करोना आहे' म्हणून रिपोर्ट आला तर तोपर्यंत या औषधांची मदत विषाणूंची वाढ खूप मोठ्या प्रमाणात रोखते. ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आपल्याच निष्काळजीपणाने किंवा अज्ञाना मुळे चुकल्यामुळे अनेकांना आत्तापर्यंत त्याचा खूप जास्त त्रास भोगावा लागला आहे.
पाचव्या दिवशी ठरते आपला आजार वाढणार की आपल्याला बरे वाटणार.
पहिल्या 3 दिवसात काहीही कारणांनी आपण उपचार सुरू करायला उशीर केला तर साधारण 3,4 व 5 या दिवसांमध्ये करोना विषाणूंचा प्रवास फुफ्फुसापर्यंत होऊन न्यूमोनियाची लक्षणे म्हणजे खोकल्यात वाढ ,ढास, धाप लागणे, ताप 101पेक्षा जास्त वाढायला लागणे आणि रक्तातील CRP चे प्रमाण अचानक वाढणे असे काही झाले तर मात्र आपल्याला हॉस्पिटलला admit होऊनच उपचार घ्यावे लागतात. असे करणे टाळू नये. ज्यांना हे उपचार वेळेत मिळाले त्यांचा जीव वाचण्याची शक्यता पण खूप जास्त आहे. अनेकांनी हा अनुभव घेतलेला आहे.
ज्यांनी याला देखील उशीर केला किंवा इतर काही कारणांनी उदा.पूर्वीचे गंभीर आजार त्या लोकांचा या लढाईत दुर्दैवी अंत झाला.
योग्य आणि वेळेत उपचार घेतले तर अनेक पेशंटमध्ये 5 ते 7 दिवसानंतर लक्षणे कमी व्हायला सुरुवात होते. काही कारणांनी Complications वाढायला लागली तरी याच दिवसानंतर वाढतात. म्हणून लक्षणांच्या बाबतीत सावध असावे.
करोना झाल्यावर पहिला,तिसरा आणि पाचवा आणि सातवा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत.
अशा कितीतरी घटना आपण आजपर्यंय अनुभवलेल्या आहेत. अनेक जवळच्या मित्रमंडळींनी, नातेवाईकांनी,ओळखीच्या अगदी तरुण लोकांनीही काही कारणांनी treatment घ्यायला उशीर केल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये भर पडलेली आपण बघितलंय.
आपण आपल्या हाताने त्रासात भर घालतो, असे होऊ देऊ नये. आजार होणे आपल्या हातात नसते पण घाबरून न जाता योग्य उपचार करणे हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात असते.
वेळेत उपचार झाले तर हा आजार वेळेत आटोक्यात येतो हे मी स्वतः माझ्या मुलाच्या अनुभवातून सांगते आहे. त्याचे पाहिले लक्षण ताप हे होते. रात्री अडीच वाजता त्याला ताप आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच आमच्या सगळ्यांच्या टेस्टस केल्या आणि त्याचे रिपोर्ट्स मिळण्याआधीच सगळी औषधं तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू केलेली होती. रिपोर्ट दुसऱ्या दिवशी positive आला त्यावेळी त्याच्या पोटात औषधांचा तिसरा डोस गेलेला होता.
त्यानंतर त्याला पुन्हा फारसा ताप आला नाही पण तिसऱ्या दिवशी थोडा खोकला यायला लागला, औषधे,Isolation आणि योग्य काळजी यामुळे तो खोकलाही फार वाढला नाही. मात्र औषधांमुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढला आणि दोन्ही डोळे लाल झाले पण डोळ्यांच्या डॉक्टरांना व्यवस्थित फोटो काढून पाठवल्यावर त्यांनी दिलेल्या औषधांनी 2 दिवसात ती लक्षणे कमी झाली.
दहा दिवसात करोनाची सगळी लक्षणं हळूहळू संपली. 14 व्या दिवशी तर सगळे काही नॉर्मल होते आणि isolation ही संपले.
त्यांनतर आलेला थोडा अशक्तपणा आता महिन्याभरात भरून येईल.
आजार नीट समजून घेणे आणि वेळेवर अचूक निर्णय घेणे या गोष्टी आपल्या नक्की हातात आहेत. नुसतेच घाबरण्यापेक्षा आपण हे समजून घ्यायला हवे.
आजाराचं स्वरूप न समजता आपल्या मनाप्रमाणे वागणाऱ्या,निर्णय घेणाऱ्या लोकांचं कोणीही काहीही करू शकत नाही.
अजून सगळ्या लोकसंख्येचे लसीकरण झालेली नाही. त्यांनतर कदाचित आपल्याला करोना झाला तरी त्रास कमी होईल,निदान जीव जाणार नाही. पण तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी.
करोना झाल्यांनातर प्रत्येक क्षण आणि दिवस महत्त्वाचा आहे.
वेळेत निदान,सकारात्मक मानसिकता आणि योग्य उपचार ही करोनातून वाचण्याची त्रिसूत्री आहे. लक्षात ठेवा, सावध तो सुखी.
© डॉ अंजली औटी.