रविवार, २५ एप्रिल, २०२१

# मानसआरोग्य डायरी 4

 बसलेले आप्पा निवेदकाच्या प्रत्येक शब्दाला घुटके गिळत होते,ओठ थरथरत होते,डोळे विस्फारलेले.
बातम्या सुरू होत्या. निवेदकाच्या आवाजाची पातळी, वेग, स्वर,त्यात भर घालणारे पार्श्वसंगीत आणि अत्यंत गंभीर,दुर्दैवी बातमी. 
नाशिकच्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू. 
नाटकीय आवाजात वारंवार उच्चरलेली तीच ती वाक्ये आणि त्यात आणखी भर चित्रांची,व्हिडीओची.
नातेवाईकांचा आक्रोश बघून आप्पांना कसंतरीच व्हायला लागलं. घरातल्या कोणाच्यातरी लक्षात त्यांची ही अवस्था आली आणि ताबडतोब टीव्ही बंद झाला. पण कदाचित तोपर्यंत उशीर झाला होता,घडायचे ते नुकसान घडून गेले होते.
दुसऱ्याच दिवशी गेले वर्षभर चार भिंतींच्या आत  स्वतःला सुरक्षित ठेवलेले आणि करोना लसींचे दोन्ही डोस पूर्ण झालेले 60 वर्षांचे आप्पा घरात चालता चालता कोसळले. 
आपल्याला माहीत नसलेले असे आणखी किती आप्पा असतील?
माणसांवर नकारात्मक,वाईट गोष्टींचा परिणाम खूप लवकर आणि जास्त प्रमाणात का होतो?
आयुष्यातल्या सकारात्मक,चांगल्या गोष्टीं घडण्याचा वेग त्यामानाने इतका कमी कसा?
संवेदनशील मनात हा प्रश्न नक्की उमटतो.
असे होते कारण नकारात्मक गोष्टींचा हल्ला माणसावर अचानक होतो. आघात झेलण्यासाठी मनाची पूर्वतयारी नसते. 
त्यावेळी जाणवणाऱ्या नकारात्मक भावनांचा वेग आणि तीव्रता खूप जास्त असते. 
घटनेनंतर अनेक दिवसांनी अनुभवांची तीव्रता कमी झाली तरी त्या प्रसंगांची आठवण मात्र माणूस कधीही विसरत नाही. पुन्हा तसा अनुभव आला की माणूस त्यांच्याशी पटकन कनेक्ट होतो.
दुःखद काही बघून,ऐकून,वाचून आपल्या मनातल्या या आठवणींची केंद्रे लगेच जागी होतात. 
त्यातल्या तीव्रतेनुसार मेंदू आपण पूर्वी अनुभवलेल्या दुःखद प्रसंगांच्या चित्रांची,आवाजांची, संवेदनांची मालिकाच मन:चक्षूंपुढे उघडून देतो. 
चित्रपट,नाटक बघूनही आपल्या डोळ्यात पाणी येते कारण भावना आपल्या ओळखीच्या असतात. 
इतरांच्या दुःखाशी,त्रासाशी आणि नकारात्मक विचारांशी माणसे सहानुभूतीने आपल्या नकळत जोडली जातात.
काही माणसे भावनांवर पटकन नियंत्रण ठेऊ  शकतात तर काही अतिसंवेदनशील असल्यामुळे पुन्हा पुन्हा त्या प्रकारच्या विचारचक्रात अडकतात. 
इथूनपुढे असे होत असेल तर मेंदूतल्या अशा files उघडल्या गेल्या आहेत त्या ओळखा. सावधपणे त्या चटकन बंद करा. 
मनावरचा ताण वाढवणाऱ्या बातम्या ऐकायच्या की नाही,किती वेळ ऐकायच्या..लक्षात असू दे की टीव्हीचा रिमोट कायम आपल्याच हातात असतो. 
युद्ध,साथीचे,सांसर्गिक आजार,नैसर्गिक आपदा, अपघात अशा संकटात एकाचवेळी अनेक लोक अशा अनुभवातून जात असतात. 
दुःख, हतबलता,निराशा,अनिश्चितता यासारख्या नकारात्मक भावनांची तीव्रता जास्त असते. 
भीती आणि सुरक्षिततेची भावना या सगळ्यावर हावी होते. 
माणसे सारासार विचार करू शकतीलच असे नाही, कशावरही पटकन विश्वास ठेवतात.
प्रत्यक्ष आजाराने जितके नुकसान होणार नाही त्याच्या कितीतरी पट जास्त नुकसान अपूर्ण माहिती,अफवा आणि भीतीमुळे होत असते. 
सतत कानावर येणाऱ्या मृत्यूच्या, जवळची लोकं, नोकरी गमावण्याच्या, हॉस्पिटल्स मध्ये इंजेक्शन्स नसण्याच्या,ऑक्सिजन नसल्याच्या,बेड नसल्याच्या बातम्या भीतीत भर घालतात.  
त्यांच्यामुळे मनोधैर्य खचलेले लोक गंभीर परिणाम अनुभवतात आणि त्यांच्या गोष्टी अनुभवून आणखी काही लोक भीतीग्रस्त होतात. 
दुष्टचक्र फिरत राहते. 
मग वस्तुस्थिती खरीखरच अशीच नाहीये का?
संकट आहे ही वस्तुस्थिती नक्कीच आहे. 
अशावेळी सावध,चौकस असल्यामुळे आपल्यापर्यंत जे पोहोचते आहे त्याची शहानिशा करण्याचा संयम, विवेक बाळगला तर माहितीचा
वापर विनाकारण फोन करून एकमेकांची भीती वाढवण्यासाठी करणार की एकमेकांना मदत करण्यासाठी करणार, हा निर्णय घेण्याचा चॉईस आपल्या हातात आहे,हे लक्षात येईल.
करोना संकट आपल्यापर्यंत आलेच तर त्याचे शरीरातले पाहिले लक्षण ओळखण्यासाठी आपण ते ज्ञान वापरू.
कारण मनाच्या सैरभैर अवस्थेत अनेकांकडून ते दुर्लक्षित होतेय,असं लक्षात आलंय. 
लवकर उपचार, लवकर मात,हे करोनातून बाहेर पडण्याचे पाहिले सूत्र आहे.
आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने नकारात्मक गोष्टींपेक्षा आपल्या दैनंदिन जीवनात एकूणच आयुष्यात सकारात्मक,चांगल्या गोष्टी घडण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. 
मनातली नकारात्मकता आगीच्या वणव्यासारखी आहे..अवचित लागणारा,धुमसणारा,निरपराध अनेकांना भक्ष बनवणारा. 
वणवा लागू नये म्हणून आधीच काळजी घ्यायची असते. चुकून लागलाच तर विझवण्याची त्वरा करायची असते.
सकारात्मकता मात्र देवघरातल्या समईच्या  ज्योतीसारखी आहे. 
नियमित साधनेने प्रज्वलित ठेवावी लागते. 
मनाच्या गाभाऱ्यात मंद मंद तेवणारी असते.
स्निग्ध तेजाने मनातला अंधार उजळवून टाकते. चैतन्याची ऊब आणि उज्ज्वल भविष्याची ग्वाही देणारी असते.
आज स्वतः मधल्याच त्याच तेजोमय ज्योतीचे स्मरण करूया.
तिच्या असण्यावर विश्वास ठेवा.
आपल्या सगळ्यांचे एकत्रित प्रयत्न आपल्याला या संकटातून बाहेर पडायला मदत करतील.
आपणही करोनायुध्दातले लढवय्ये सेनानी बनू या..🙏😊
© डॉ अंजली औटी.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा