“आपण असतो..कधी गर्दीत,कधी एकटे स्वत:पाशीच.
कधी नेहमीच्या परिचित वातावरणात तर कधी अपरिचित
अनोळखी.
पण वातावरणातला अनोळखीपणा नजर टिपून घेत
असतांना,
मन सतत सोबत असते आपल्या,आपल्याशी बोलत.
अचानक असं काही जाणवतं बघतांना की
त्याच्याशी आपल्या मनाची नाळ जुळते.
वातावरणातला अनोळखी ताण सैलावतो.
आज अशीच अनोळखी शहरातल्या अनोळखी गर्दीत काही
क्षण मी एकटीच,स्वत:शीच.
डोळे दिपून जावेत अशा आकर्षक वस्तूंचा बाजार
भोवताली.
मी काही घेण्यासाठी नाही तर केवळ वेळ घालवण्यासाठी
निरुद्देश,सावकाश एकेक वस्तू न्याहाळत.
आपल्या घरासाठी कोण बरं या वस्तू निवडत असेल?
ते घरही असंच असावं..सुंदर, पारदर्शक..काचेसारखं
नितळ..यासारख्या वस्तूंनी सजलेलं, जराही डाग,धूळ विस्कटलेपण न चालणारं.. आठवणींचा
खजिना प्रेमानं मिरवायला अशा घरात जागा शोधावी लागेल.
आपल्यासारख्या रंगीबेरंगी चित्रविचित्र रेषांची
श्रीमंती मिरवणाऱ्या भिंती, आपली जागा सोडून भलतीकडेच अस्ताव्यस्तपणे विसावलेल्या
वस्तू सांभाळणाऱ्या घरात या दुकानातल्या वस्तू दिसतीलही चांगल्या पण मनाचा धागा
कुठल्याच वस्तूशी जुळेना!
सगळंच परकं..अस्पर्शित..
अचानकच भिंतींवरच्या अनेक घड्याळ्यांपैकी एकाकडे
लक्ष गेलं.
त्याचं साधेपण आणि वेगळेपणही क्षणात भावलं.
मनातल्या एका आठवणीशी त्याचा धागा जुळला...
‘वेळ धावतोय...पाहिलंत?’...कधीतरी कुठेतरी
वाचलेलं हे वाक्य.घड्याळ बघताक्षणी आठवलं.
शांत पाण्यावर दगड भिरकावल्यावर किती तरंग उमटावेत
तितके तरंग मनभर उमटले होते या एका वाक्याने.
या घड्याळ्याकडे बघून मनात पुन्हा ती तरंगांची
नक्षी उमटली. अवचित. अलगद.
आजूबाजूचं अनोळखी विश्व,परकेपण विसरून मी त्या
घड्याळाकडे अनिमिषपणे बघत उभी.
मनातल्या ओळींचा आवेग अनुभवत..
एकबार वक्तसे लम्हा गिरा कहीं
वहां दास्ताँ मिली..लमहा कहीं नहीं..
वेळेच्या पावलांपाशी उभी असलेली एकेक हळूवार आठवण.
झाडाच्या पानाइतक्याच अलिप्तपणे,सावकाश
अपरिहार्यपणे खाली ओघळलेला वेळ!
पाँव सूखें पत्तोंपे
अदब से रखना
क्यूं कि
धूप में माँगी थी
तुमने इनसे पनाह कभी!!
अशी त्या वेळेशी आपलीही एक बांधिलकी...
काळ असाच धावणार पुढे..
क्षणांच्या पावलांशी रुजणार भविष्याचे स्वप्न.
उमलणार..पालवणार..फुलणार..कोमेजणार आणि सहजपणे
तळाशी विसावणार.
एक एक आठवण आपल्याशी लपेटून घेत ‘वेळ
धावतोय...पाहिलंत?’
चकचकीत वस्तूंच्या त्या बाजारात माझं लक्ष वेधून
घेणारं ते एक चिमुकलं साधं घड्याळ,
मला मनापासून आवडलं!
अनोळखी गर्दीतही ओळखीच्या जीवलग छटा अशा खुणावतात
कधी कधी!”