मंगळवार, ८ जून, २०२१

#मानसआरोग्य डायरी 8

एकदा मनाने स्वीकारलं ना की काही दिवस,महिने, कदाचित अजून वर्षही हे असंच चालणार आहे की मग अचानक चष्म्यावरची धूळ पुसली गेल्यासारखं सगळं स्पष्ट दिसायला लागतं. 
जगण्याचा पुन्हा नव्याने विचार करायला हवा.
स्वतःच्या टिकून राहण्याच्या क्षमता वाढवण्यात सगळी जीवनऊर्जा वापरायला हवी.
रोजचा दिवस जसा उगवेल तसे आपण जगत जातो. आपल्यासाठी जगणं असतं फक्त पुढे पुढे जाणं. 
ध्यानी मनी नसतांना आपली अनेक माणसं निघून गेली अचानक, विचारही नसेल आला त्यांच्या मनात  की पुढचा पावसाळा,हिवाळा बघण्यासाठी असू आपण?

हे नुसतंच बघतोय आज आपल्या आजूबाजूला. मनातलं शहाणपण अजूनही डोळस होऊ नये?
भरभरून जगण्याचे क्षण जाणिवेतून पूर्ण निसटण्याआधीच जागं व्हायला हवंय.
जगण्याची मूल्य पुन्हा पुन्हा तपासायला हवीत.
कधीतरी आपणच संकुचित केलेल्या जाणिवेच्या कक्षा ओलांडून जगण्याकडे पुन्हा नव्याने बघायला हवं.  

माझीतरी पूर्ण ओळख आहे मला? जग जाऊदे पण माझ्या माणसांची तरी किमान?
जगात कुठे काय चाललंय हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे,असेलही.. पण माझ्याच माणसांची प्रेमाची भाषा अनोळखी,अपरिचित राहून?
माहीत आहे का मला, काय आवडतं 'तिला' मनापासून आणि 'त्याला' दिलखुलास आनंद कशात मिळतो हे?
इतर सगळ्यांची भाषा समजते आणि तिच्या स्वरातली केवळ कटकटच का कानावर पडावी?
त्याच्या हाकांसाठी मनाची कवाडे बंद का असावीत?

मनातल्या असमाधानाचे रस्ते बाहेरच्या दिशेने वळत जातात आणि 'हे हवं','ते हवं' यांच्या शोधात स्वतःला विसरायला होतं.
आयुष्याचे क्षण तेवढे भुरुभुरु निसटून जातायेत. 
निसटून जातं त्यातलं काहीच तर पुन्हा परत येत नाही.
अपयश,अवहेलना,असमाधान,दुःख हे समोर आलं की मनात नकोसेपण दाटून येतं.
'नकार'च जर मनभर घुमत असेल तर अजून काय होणार?
या भावना जाणवल्या की नाकारायच्या,आणखी त्यांचं काय करायचं हे कोणीच कसं कधी शिकवत नाही?
मला खूप राग येतो तो दुसरं कोणी आपल्याशी वाईट वागल्यावर.
वाईट वाटतं, ते दुसरा कोणी काही बोलला त्याचं.
जे काही आवडत नाही ते सगळं कायम दुसऱ्याच कोणामुळे.
ही दुसरी लोकं माझ्याशी प्रेमाने,आपुलकीने वागली तरच मला आवडेल, मग मी एकदम आनंदी. कोणी प्रश्न विचारायचे नाहीत,कोणी विरोध करायचा नाही,कोणी तक्रार करायची नाही. यापैकी काही केलं की माझं सगळंच बिघडणार. मला वैताग,राग,चिडचिड होणार.
का? याला मी नाही,दुसरे जबाबदार.

माझं वाटणं, माझ्या भावना माझ्या ताब्यात नाहीत? न आवडणारी परिस्थिती समोर आली तर तिला जीव तोडून विरोध करण्यात माझी सगळी शक्ती एकवटते. 
लहानपणापासूनच मनाला काही आवडलं नाही तर त्याचा सामना कसा करायचा हे का नाही सांगत कोणी आपल्याला?
त्यांनाच माहीत नसेल का ते?

आजूबाजूला असलेला निसर्ग निःशब्दपणे सांगत असतो अनेक गोष्टी. 
झाडांना,पक्षांना, प्राण्यांना तक्रारी करतांना, आरोप करतांना बघितलंय कोणी?
तुम्ही राहू दिलं तर ते तुमच्या आजूबाजूला आनंदात राहतात,नाही राहू दिलं तर निमूट बाजूला होतात. 
"अपेक्षा नाही" हे जगण्यातलं साधं,सोपं तत्त्वज्ञान त्यांना कोण समजावतं?
त्यांना जो परिस्थितीचा स्वीकार आपसूक जमतो, समजतो,तो आपल्याला कसा नाही?
आपल्या आनंदासाठी आपण इतरांवर अवलंबून का? 
परिस्थिती,संधी नेहमीच माझ्या मनाप्रमाणे,मला अनुकूल कशी असेल?
तशी ती नसेल तेव्हा संयमाने ती चांगली होण्याची वाट बघण्याचं आणि वाट बघतांना स्वतःची मानसिकता संभाळण्याचं,टिकून राहण्याचं कौशल्य माझं मला शिकायला हवं.
त्यासाठी माणसं वाचावी लागतील,निसर्ग समजून घ्यावा लागेल. प्रयत्नांनी दृष्टिकोन बदलावे लागतील. 
समोर दिसणारी प्रत्येक गोष्ट माणसं, परिस्थिती हे तिचं फक्त वरवरचं स्वरूप आहे.
माणसांच्या वागण्यामागे असलेलं त्यांचं मन आणि परिस्थितीच्या आत दडलेल्या कारणांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी विचार,भावना आणि कृतीत समतोल येईल इतका माझ्याच मनाचा शोध मला घ्यावा लागेल. 
आज कडक,न सोसवणारे,चटके देणारे ऊन असेल तर हेदेखील टिकणारे नाही..बदलणार आहे हा माझ्या मनातला विश्वास मला टिकवून ठेवायला हवा.
© डॉ अंजली औटी.
# मानसआरोग्य डायरी 8

रविवार, ६ जून, २०२१

चौकटीबाहेरची ऑनलाईन नाती...

चौकटीबाहेरची ऑनलाईन नाती...

फेसबुकवरच्या ओळखीतून सुरवात होऊन आता आम्हाला एकमेकांविषयी इतकी ओढ वाटतेय की गेल्या दोन महिन्यांपासून त्याने अचानक माझ्याशी बोलणं थांबवलंय याचा मला आता प्रचंड त्रास होतोय. तो ऑनलाईन इतरांशी बोलतोय हे जाणवते मग माझ्याशीच का नाही? माझं सगळंच बिघडलंय,खूप दडपण,भीती वाटतेय. या अस्वस्थतेचं उत्तर त्याच्याकडे नाही, तुझ्याचकडे आहे हे लक्षात येण्यासाठी तिच्या अस्वस्थ मनाला किती वेळ लागेल?
तिच्यासारखीच अजून एक, प्रत्यक्ष एकदाही न भेटलेल्या आपल्या व्हर्चुअल मित्राला त्याने पाठवलेल्या व्यक्तीजवळ एक लाख रुपये कॅश सहजतेने देते आणि यात तिला रिस्क नाही तर निरपेक्ष प्रेमाची खात्री वाटते.
यासारख्या समस्यांमधल्या स्त्रिया भाबड्या,अनुनभवी,अशिक्षित असतात का? अजिबातच नाहीत. पण तरीही जाणता-अजाणता अनेकींच्या आयुष्यात डोकावणारी व्हर्चुअल नात्यांमुळे त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यातला ताण वाढतांना दिसतोय.
भरपूर वेळ,श्रम आणि परीक्षा बघणाऱ्या खऱ्या नात्यांना न्याय देतांना मनात साचत गेलेले नकोसेपण,हतबलता,नकार,अवहेलना, भावनिक- मानसिक पोकळी या व्हर्चुअल नात्यांनी भरून निघते.
कधी केवळ वेळ चांगला जावा,विरंगुळा,चेंज मिळावा असेही अनेकींना वाटते.
वैचारिक देवाणघेवाण,मैत्रीचा हा ऑनलाईन अनुभव हवासा वाटतो. खऱ्या जगण्याला समांतर चालणारे आभासी जग आणि इतरांसोबत असलेले नातेसंबंध याचा मानसिक आधार वाटतो.
संवादाची सुरवात वैचारिक पातळीवर झाली तरी अनेकींच्या बाबतीत अशी नातीही आदिम शारीर प्रेरणांपर्यंतच येऊन पोहोचलेली दिसतात. 
आभासी जगातल्या स्त्री-पुरुषांच्या मनातल्या मूळ गरजा, इच्छा,आकांक्षा,वासना स्वप्नं,प्रेरणा खऱ्या असतात. सामाजिक दडपणातून किंवा हिंमत नसल्यामुळे लपवलेल्या,दाबून ठेवलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली की हमखास वर येतात. एकमेकांचे खाजगीपण जपण्याची हमी मिळाली की अत्यंत उत्कटतेने,मोकळेपणाने व्यक्त होणाऱ्या या भावनांमध्ये गैर काय? असाही युक्तिवाद लोक करतात. 
अनेकदा असे जाणवते की बहुतेक स्त्रियांची गरज मुख्यत्त्वे मोकळ्या मैत्रीची,सोबतीची असते. मैत्रिणींपेक्षा एखादा छानसा मित्रच तिला अधिक भावतो. कारण तो तिला उगीचच जज करत नाही, पावलोपावली टोकत, लेबल्स लावत नाही, तुलना,स्पर्धा यापलीकडे जाऊन तिला समजून घेऊ शकतो. स्त्रिया मनमोकळेपणाने असे नाते स्वीकारतांना दिसतात.
मनाचा ताबा घेणारी प्रेमासारखी प्रभावी भावना व्हर्चुअल जगात अधिक मोकळेपणाने व्यक्त केली जाते. जगण्याच्या संघर्षात 'प्रेम'अनुभवण्याचे निसटून गेलेल्या अनेकांना
आयुष्यात स्थैर्य आलं की एरवी लक्षातही न येणाऱ्या पोकळ्या जाणवायला लागतात. प्रेम ही मानवी मनाची अत्यंत मूलभूत गरज. आपल्यावर कोणीतरी प्रेम करावे किंवा आपण कोणावरतरी प्रेम करावे असे वाटण्यात वय हा मुद्दाच गौण ठरतो.
कोणत्याही वयात प्रेमात पडल्यावर व्यक्तीला सोळाव्या वर्षात आहोत असेच वाटते. प्रेमात फसण्यासाठी, अविवेकी वागण्यासाठीही वयाची अट नाही. एरवी अनुभवी, परिपक्व वाटणाऱ्या व्यक्तीही स्वतःच्या मनातल्या भावना ओळखण्यात,हाताळण्यात फसू,चुकू शकतात.
"दमलीस?" या एकाच शब्दावर अनेकींची सपशेल विकेट पडते. अजूनही आपण सुंदर,आकर्षक दिसतो, या सुखवणाऱ्या भावनेतही अडकायला होते. मनावर फिरलेले प्रेमाचे मोरपीस जगणे सुंदर,रंगीबेरंगी करून टाकते. त्यासाठी आभासी माध्यमांचा अत्यंत कल्पक वापर अनेकांकडून केला जातो. वयाच्या पस्तिशीनंतर काही कारणांनी मनातून एकट्या पडलेल्या स्त्रिया या भूल-भुलैय्यात जोरदार अडकतात. 
नवख्या,अनुनभवी स्त्रियांना तर हे संपूर्ण जगच मोहात पाडते. यातली मजा आणि थ्रिल अनुभवण्यासाठी पुढे जाण्याचा निर्णय मात्र त्यांचाच असतो.
सोशलमाध्यमांपासून सुरू झालेली मैत्री खाजगी होऊन आपली माहिती,नंबर,फोटो,व्हिडीओ यांचीही देवाणघेवाण होते. एरवी शारीरिक गरजेचा उच्चार, स्वीकार आणि उघड अपेक्षा करणे यासाठी समाज आणि परंपरांची बंधने व्यक्तींवर असतात. समाज म्हणून ती गरजेचीही आहेत परंतु बंधने, नियम जितके कठोर तितक्याच पळवाटाही मग शोधल्या जातात. आपल्या सामाजिक धारणेनुसार पकडला गेलेलाच गुन्हेगार ठरतो,आणि काही उघडकीस येत नाहीत तोपर्यंत सगळेच साव असतात,सगळीच कृत्ये नैतिक असतात.
एकमेकांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न केले जातात. अनेक दावे, छातीठोक विधाने केली जातात. मग या नाही तर त्या निमित्ताने बोलण्यातले वैचारिक विषय वैषयिक होत जातात. सेक्सविषयीच्या व्यक्तिगत आवडीनिवडींबद्दलही बोलले जाते.
सेक्सटिंगचा अनुभवही एकदम वेगळा,उत्तेजक वाटतो.
एकमेकांवरच्या विश्वासाची हमी कायम टिकली तर गुपचूप आणि स्वखुशीने इथे अनेक ऑनलाईन मनोव्यापार चालतात. 
प्रत्यक्षात काही करत नसल्यामुळे यात कोणाची फसवणूक,प्रतारणा नाही,असा मनाचा समज असतो.
कोणी आनंद कशातून मिळवावा, ही प्रत्येकाची अत्यंत वैयक्तिक गोष्ट. जोपर्यंत मर्यादा ओलांडली जाऊन कोणाला त्रास झाला नाही तर तो टिकतो सुद्धा. पण अनेक केसेसमध्ये ही मर्यादा ओलांडली जाते आणि व्हर्चुअल नात्यांमुळे प्रत्यक्ष आयुष्यात गोंधळ,
भांडणे,गुंतागुंत,समस्या निर्माण होतात. 
आभासी जगातील दुःख,वेदना तर काही आभासी नसतात, खऱ्याखुऱ्या असतात. तोंड दाबून सहन कराव्या लागतात. प्रत्यक्ष आणि आभासी मधला तोल सावरण्यापलिकडे गेला की मनाचा बांध वेडावाकडा फुटतो. त्यामुळे आत्यंतिक मानसिक,शारीरिक ताणाला सामोरे जावे लागून अनेकांना त्यातून सावरण्यासाठी वैद्यकीय मदत घ्यावी लागते. 
अनुभवी, शहाणी माणसे मोठ्या वयातही का फसतात? याची कारणेही वेगवेगळी असतात. 
एकच कारण मात्र सगळ्यांमध्ये समान दिसते ते म्हणजे करतांना सगळे कळत असले तरी वेळेवर ते वळत अजिबात नाही. म्हणून आपण फसलो असे कितीही म्हटले तरी तीदेखील स्वतःच स्वतःसाठी केलेली निवड होती,याचा विसर पडतो.
एखाद्याच्या मैत्रीआड असलेले छुपे हेतू अनेकींच्या लक्षात फसल्यावरच येतात. 
असे फसणे केवळ शारीरिकच नसते तर अनेक प्रकरणांमध्ये स्त्रिया स्वतःचे फार मानसिक अवमूल्यन करून घेतात. 
यातल्या प्रत्येक टप्प्यावर सावध राहणे आणि मागे फिरणे शक्य असते पण 'आभासी'मधली जबरदस्त किक मोहात पाडते. माणूस आपल्याच सवयींच्या जाळ्यात अडकतो,आवड व्यसनात बदलते.
प्रत्येकवेळी समोरच्या व्यक्तीचे हेतू वाईट,फसवण्याचेच असतात असेही नसते. 
मन भरल्यांनंतर त्यांनी फक्त सहजतेने गीअर चेंज केलेला असू शकतो. मूळ गरजच नात्यांचे वैविध्य असू शकते. कोणी आपल्याशी सतत बोलायलाच हवे यात अवास्तव मागणी आहे,हट्ट आहे.
अनेकांच्या आयुष्यात अनेक संघर्ष,वेदना असू शकतात. त्यांच्या गरजा त्याप्रमाणे बदलत जातात. म्हणून अमूक एक 'चांगले म्हणून नैतिक आणि अमूक एक 'वाईट' म्हणून अनैतिक असा ठोकळेबंद विचार ना लोकांच्या बाबतीत करता येत ना त्यांच्या वागण्याच्या बाबतीत करता येत. 
सगळे वाईट अनुभव फक्त स्त्रियांनाच येतात, असेही अजिबातच नाही. पण स्त्रिया यासारख्या अनुभवांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त भरडल्या जातात. स्त्रियांसाठी असलेली पारंपरिक सामाजिक चौकट अजूनही आखीव, पुरुषधार्जिणी आहे.
काही घडले तर पुरुष सहज सुटका करून घेतात आणि त्यातला दोष बऱ्याचदा स्त्रियांकडे येतो. स्त्रियांचे वागणे,बोलणे, दिसणे,कपडे घालणे यावर लगेचच टीकात्मक बोलले जाते. स्त्रियांचा अपमान,नुकसान झाले अशा प्रसंगातही दोष,वाभाडे अनेकदा तिचेच काढले जातात. 
खरंतर मुद्दा स्त्री आणि पुरुष किंवा स्त्री विरुद्ध पुरुष असा नसतोच,नाहीही.
मुद्दा आहे आपल्याच मनातल्या भावनांचे आणि विचारांचे योग्य नियोजन करू न शकण्याचा. विचार आणि कृती यांचे भान येण्यासाठी मनातला विवेक जागा हवा. 
स्वतःच्याच भावनांची योग्य जाण आणि भानही हवे. त्यांची पूर्तता करण्याचे रास्त पर्याय ओळखायला हवेत.
कारण आपली समज, बुद्धी वाढवणारे आणि अनुभवांच्या कक्षा विस्तारणारे अनुभव येथेही येऊ शकतात. आभासी जगही खऱ्या माणसांच्याच भावभावनांवर स्पंदणारे आहे. कधी इथे जीवलग मित्र-मैत्रिणी मिळतात तर कधी कोणतेही नाव नसलेले पण मैत्रीपलीकडचे भाव मनात उमलवणारे सुंदर,उस्फुर्त नातेही जोडले जाते. एकमेकांची स्पेस सांभाळून आधार,आनंद देण्याइतके ते समंजस आणि शहाणेही असू शकते. वैचारिक,भावनिक आणि मानसिक पोषण करण्याइतकी निरोगी, एकमेकांची वाढ करणाऱ्या चर्चा,संवाद त्यात घडू शकतो. मनाची माती सुदृढ,सुपीक, सक्षम बनत जाते. 
अशा नात्यांना मुद्दाम इतरांपासून लपून राहण्याची,खाजगीपण सांभाळण्याची गरज नसते आणि मुद्दाम स्वतःची जाहिरात करत मिरवण्याचीही गरज नसते. असं मैत्र,प्रेम असलेलं कोणी असणं आणि मिळणं हा आयुष्याकडून मिळालेला सगळ्यात अनमोल खजिना असू शकतो, पण तो मिळाला नाही तरी आपल्या आजूबाजूचे प्रत्यक्ष किंवा आभासी जग आणि त्यातली वेगवेगळ्या चेहऱ्या-मुखवट्यांनी वावरणारी माणसे ओळखण्याइतकी आधी आपण आपल्या स्वतःशीच मैत्री तरी नक्कीच करू शकतो?
© डॉ अंजली औटी.

मनःपूर्वक आभार दैनिक म.टा.'मैफल पुरवणी'

सोमवार, ३ मे, २०२१

# मानसआरोग्य डायरी 7

आपले शरीर काहीतरी बिनसले आहे याची सूचना अचूक देते.
करोनाची लक्षणे दिसल्यावर पाहिले 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे. लक्षण वेळेत ओळखणे हे लवकर बरे होण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.  
आपली लक्षणे नाकारणे,दुसऱ्याच कशाचे आहे असे समजणे,त्यावर स्वतःच घरगुती औषध घेणे,इतरांपासून लपवणे हे सगळं करून आपण स्वतःला खूप मोठ्या धोक्यात टाकतोय 
आणि आपल्यापासून इतरांना लागण होण्याची शक्यता याच दिवसांमध्ये सगळ्यात जास्त असते.
"एखादी क्रोसीन घेतली की बरं वाटेल" असं स्वतःच ठरवू नये.आजार वाढल्याशिवाय डॉक्टरांची गरज नाही, हा अनेकांचा समज असतो. नैसर्गिकपणे बरे होण्यासाठी शरीराला अवधी दिला पाहिजे हा विचार करोनाबाबतीत केला तर लक्षात ठेवा हा आजार दिवसागणिक उग्र रूप धारण करतो. थेट जीवाशी गाठ आहे.
मायनर लक्षणे आहेत म्हणून घरीच बसू नका.
लहानात लहान लक्षणेही दुर्लक्षित करू नये.

करोना इतर शारीरिक आजारांपेक्षा वेगळा आहे. पाहिले लक्षण दिसल्यावर लगेच त्यावर  उपचारांना सुरुवात नाही झाली तर ते विषाणू शरीरात दुप्पट वेगाने वाढत जातात. 
सुरवातीला पहिल्या दिवशी नाक,तोंड,घसा यांच्या आतल्या भागात असलेले विषाणू तिसऱ्या दिवशी श्वासनलिकेमार्गे फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकतात. 
करोनाचे पाहिले 3 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे.
डॉक्टरांचा ताबडतोब सल्ला घेणे महत्त्वाचे.
त्यांनी सांगितलेल्या टेस्ट करणे गरजेचे.
करोनावर उपचार करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांशिवाय इतर कोणतीही औषधे, सल्ला शक्यतो मनाने घेऊ नये. काही औषधे सोबत चालू शकतील.
केवळ घरगुती उपचारांनी करोना बरा होत नाही.
प्रत्येकाची immunity वेगळी असते आणि शरीराचा response ही वेगळा असतो. 
लक्षणेही वेगळी असू शकतात किंवा 
काहीही लक्षण नसतांना दुसऱ्या कारणासाठी केलेली टेस्ट कधी positive येऊ शकते.
तरीही डॉक्टरांच्या संपर्कात असावे. 
टेस्ट्स खोट्या positive आणल्या जातात. यात डॉक्टर आणि इतर यंत्रणा सामील आहेत हे सगळे पैसे मिळवण्यासाठी कोणी करतंय या भ्रमात मुळीच राहू नये,अंगाशी येईल.

डॉक्टरांना आता करोनाच्या लक्षणांचा चांगला अंदाज आल्यामुळे लक्षणं दिसल्यावर लगेच,कधी तर टेस्टचा रिझल्ट येण्यापूर्वीच डॉक्टर औषधे सुरू करतात ते पुढचे सगळे धोके टाळण्यासाठी.
तुमच्या भल्यासाठी.

 "डॉक्टर रिपोर्ट काय येतो बघू ना,मग ठरवू" हे म्हणणे म्हणजे आपणच आपल्या हाताने पायावर धोंडा पाडून घेणे आहे. त्यांचं न ऐकण्यात आपले भरून न येणारे नुकसान आहे.
जास्तीतजास्त काय होईल?
समजा तुमचा रिपोर्ट 'करोना नाही' असा आला तर तुमच्या पोटात तोपर्यंत औषधांचे एक किंवा दोन डोस गेलेले असतील. एकवेळ ते परवडले पण करोना लक्षणे वाढायला नको. 
कारण जर 'करोना आहे' म्हणून रिपोर्ट आला तर तोपर्यंत या औषधांची मदत विषाणूंची वाढ खूप मोठ्या प्रमाणात रोखते. ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आपल्याच निष्काळजीपणाने किंवा अज्ञाना मुळे चुकल्यामुळे अनेकांना आत्तापर्यंत त्याचा खूप जास्त त्रास भोगावा लागला आहे.

पाचव्या दिवशी ठरते आपला आजार वाढणार की आपल्याला बरे वाटणार.
पहिल्या 3 दिवसात काहीही कारणांनी आपण उपचार सुरू करायला उशीर केला तर साधारण 3,4 व 5 या दिवसांमध्ये करोना विषाणूंचा प्रवास फुफ्फुसापर्यंत होऊन न्यूमोनियाची लक्षणे म्हणजे खोकल्यात वाढ ,ढास, धाप लागणे, ताप 101पेक्षा जास्त वाढायला लागणे आणि रक्तातील CRP चे प्रमाण अचानक वाढणे असे काही झाले तर मात्र आपल्याला हॉस्पिटलला admit होऊनच उपचार घ्यावे लागतात. असे करणे टाळू नये. ज्यांना हे उपचार वेळेत मिळाले त्यांचा जीव वाचण्याची शक्यता पण खूप जास्त आहे. अनेकांनी हा अनुभव घेतलेला आहे.
ज्यांनी याला देखील उशीर केला किंवा इतर काही कारणांनी उदा.पूर्वीचे गंभीर आजार त्या लोकांचा या लढाईत दुर्दैवी अंत झाला.
योग्य आणि वेळेत उपचार घेतले तर अनेक पेशंटमध्ये 5 ते 7 दिवसानंतर लक्षणे कमी व्हायला सुरुवात होते.  काही कारणांनी Complications वाढायला लागली तरी याच दिवसानंतर वाढतात. म्हणून लक्षणांच्या बाबतीत सावध असावे.
करोना झाल्यावर पहिला,तिसरा आणि पाचवा आणि सातवा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत.
अशा कितीतरी घटना आपण आजपर्यंय अनुभवलेल्या आहेत. अनेक जवळच्या मित्रमंडळींनी, नातेवाईकांनी,ओळखीच्या अगदी तरुण लोकांनीही काही कारणांनी  treatment घ्यायला उशीर केल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये भर पडलेली आपण बघितलंय.
आपण आपल्या हाताने त्रासात भर घालतो, असे होऊ देऊ नये. आजार होणे आपल्या हातात नसते पण घाबरून न जाता योग्य उपचार करणे हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात असते.
वेळेत उपचार झाले तर हा आजार वेळेत आटोक्यात येतो हे मी स्वतः माझ्या मुलाच्या अनुभवातून सांगते आहे. त्याचे पाहिले लक्षण ताप हे होते. रात्री अडीच वाजता त्याला ताप आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच आमच्या सगळ्यांच्या टेस्टस केल्या आणि त्याचे रिपोर्ट्स मिळण्याआधीच सगळी औषधं तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू केलेली होती. रिपोर्ट दुसऱ्या दिवशी positive आला त्यावेळी त्याच्या पोटात औषधांचा तिसरा डोस गेलेला होता. 
त्यानंतर त्याला पुन्हा फारसा ताप आला नाही पण तिसऱ्या दिवशी थोडा खोकला यायला लागला, औषधे,Isolation आणि योग्य काळजी यामुळे तो खोकलाही फार वाढला नाही. मात्र  औषधांमुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढला आणि दोन्ही डोळे लाल झाले पण डोळ्यांच्या डॉक्टरांना व्यवस्थित फोटो काढून पाठवल्यावर त्यांनी दिलेल्या औषधांनी 2 दिवसात ती लक्षणे कमी झाली. 
दहा दिवसात करोनाची सगळी लक्षणं हळूहळू संपली. 14 व्या दिवशी तर सगळे काही नॉर्मल होते आणि isolation ही संपले.
त्यांनतर आलेला थोडा अशक्तपणा आता महिन्याभरात भरून येईल. 
आजार नीट समजून घेणे आणि वेळेवर अचूक निर्णय घेणे या गोष्टी आपल्या नक्की हातात आहेत. नुसतेच घाबरण्यापेक्षा आपण हे समजून घ्यायला हवे.
आजाराचं स्वरूप न समजता आपल्या मनाप्रमाणे वागणाऱ्या,निर्णय घेणाऱ्या लोकांचं कोणीही काहीही करू शकत नाही.
अजून सगळ्या लोकसंख्येचे लसीकरण झालेली नाही. त्यांनतर कदाचित आपल्याला करोना झाला तरी त्रास कमी होईल,निदान जीव जाणार नाही. पण तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी.
करोना झाल्यांनातर प्रत्येक क्षण आणि दिवस महत्त्वाचा आहे. 
वेळेत निदान,सकारात्मक मानसिकता आणि योग्य उपचार ही करोनातून वाचण्याची त्रिसूत्री आहे. लक्षात ठेवा, सावध तो सुखी.
© डॉ अंजली औटी.


शनिवार, १ मे, २०२१

आभासी दुनियेतल्या वास्तव भावना



आभासी दुनियेतल्या वास्तव भावना

फेसबुकवर तावातावाने एकमेकींशी भांडणाऱ्या त्या दोन स्त्रियांच्या भांडणात हळूहळू इतर अनेकांची गर्दी वाढली. काही हिचे समर्थक,काही तिचे. विषय काही फार मोठा नव्हता. कोणीतरी लिहिलेला मूळ लेख तर बाजूलाच राहिला आणि त्यावरच्या प्रतिक्रियांमध्ये भलत्या दोघींचीच जुंपली. बरं दोघीही आपापल्या क्षेत्रातल्या चांगल्या हुशार बायका. कोणीतरी मध्यस्थी करून शेवटी तो वाद मिटवला पण त्यानंतर दोघींमध्ये शीतयुद्ध सुरू झालं. सतत एकमेकींच्या विचारांवर, मतांवर केलेली कुरघोडी. काहींनी दुर्लक्ष केले,काहींनी मजा घेतली,काहींनी खिल्लीपण उडवली. पण त्या दोघी? त्यांची खुमखुमी कशानेच कमी झाली नाही. आता तर लोकांना सवय झाल्यासारखं झालंय.
हे सगळं आठवायचं कारण परवा एका श्रध्दांजलीच्या कॉमेंटमध्ये वाचलेली एक कॉमेंट.
या बाईंनी म्हणे जी स्त्री गेली तिला काही वर्षांपूर्वी झालेल्या भांडणांमुळे फेसबुकवर ब्लॉक केलं होतं. आज तिला त्याचा पश्चाताप होत होता जो ती जाहीरपणे सांगून स्वतःला तिची अपराधी वगैरे समजत होती. तिला श्रद्धांजली वाहता वाहता आता पब्लिक हिचीही खऱ्या खऱ्या आपुलकीने समजूत काढत होतं.
अंतरजालावरचं हे जग मायावी,भासमान आणि खोटं आहे असं कोणी कितीही म्हणो, इथे वावरणाऱ्या अनेकांच्या मनात दाटून येणाऱ्या वेगवेगळ्या भावनाही आभासी आहेत असं मात्र मुळीच म्हणता येणार नाही. यात स्त्रियांचं प्रमाण लक्षणीय असलं तरी पुरुषही काही मागे नाहीत.
विद्वान आणि शहाणीसुरती लोकं कसं काय गुंततात यात इतकं? आभासी विश्वातला मानसिक ताण असह्य होऊन मदत घ्यावी लागल्याची उदाहरणे अनेक आहेत.
खरे आयुष्य आणि आभासी विश्वातील स्वतःची प्रयत्नांनी उभी केलेली प्रतिमा यांच्यात अनेकांच्या बाबतीत अंतर्विरोध असू शकतो. 
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या मनातला सतत चाललेला सेल्फटॉक. प्रतिक्रिया कधी उघड तर कधी दडपलेली,दबलेली.

प्रत्यक्ष जगणे जास्त आव्हानांनी भरलेले आहे. त्यासाठी कधी क्षमतेपेक्षा जास्त ऊर्जा वापरावी लागते. त्यातच दमणूक होते. कुटुंब,नातेवाईक,समाज यात एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात स्वतःसाठी काही करायचे राहून जाते.
उत्सुकता आणि विरंगुळा,विसावा म्हणून वापरायला लागलेल्या सोशल मीडियात 'आपण खरेच कसे आहोत' हे इतरांना समजण्याची गरज नसते. आपली मतं आणि आवडीनिवडी सारख्या असलेल्या लोकांशी कुठल्याही मानसिक,भावनिक अपेक्षांशिवाय संवाद साधता येतो याचाच आधी मोठा रिलीफ वाटतो.  
प्रत्यक्ष आयुष्यातल्या व्यक्तींशी समोरासमोर सुसंवाद साधण्यापेक्षा ज्यांना आपण पूर्णपणे माहीत नाही अशा व्यक्तींशी संवाद साधणे आवडायला लागते.
अनेकांना लोकांच्या जजमेंट्सची, त्यांच्या टीकेची भीती मनात असते. त्यामानाने सोशलमीडियात चांगुलपणा टिकवून राहणे आणि वेगवेगळ्या लोकांशी मैत्री करणे सोपे जाते. माहितीही खूप मिळते आणि करमणूकही भरपूर होते.
हळूहळू रोजच्या संबंधांमधून आभासी विश्वातही समविचारी लोकांचे निरनिराळे गट तयार होतात आणि यात एकमेकांना सावरून घेत,मोठे करत मोठ्या गुण्यागोविंदाने एकत्र मजेत वेळ घालवता येतो. असेही कितीतरी गट इथे वावरत असतात. 
नुसतेच 'हे वाईट', 'ते वाईट' म्हणून चालणार नाहीत,नाहीतर कोल्ह्याला द्राक्ष आंबट,असे होते.  
एकटेपणाचा सोबती म्हणून आभासी विश्वातील मित्रमैत्रिणीचा आधार वाटतो, त्यांच्याशी रोज बोलण्याने समाधान मिळते. त्यातल्या मर्यादा माहीत असूनही काहीजण मिळेल त्यात समाधान शोधतात.
खरोखरच विवेकीपणे उपयोग करून घेतला तर ही वेगवेगळी सोशलमाध्यमे जगण्यातल्या आनंदाच्या आणि सुसंवादाच्या असंख्य शक्यता माणसांपुढे उभ्या करण्याची क्षमता बाळगून आहेत.
त्यातून किती घ्यायचे,काय घ्यायचे आणि किती प्रमाणात घ्यायचे हे प्रत्येकाने आपल्या गरजेच्या सीमारेषा आखून ठरवावे. ही लक्ष्मणरेषा बुद्धीला जरी लवकर समजली तरी अनेकांकडून आखलेली सीमा कधीतरी ओलांडली जाते कारण त्यांनाही पुढे धावणारा मोहक कांचनमृग दिसत असतो.

मग या आभासी जगात जाणवणाऱ्या भावना खऱ्या कशा? 
तर कांचनमृग जरी मायावी असला तरी त्याचा वाटणारा मोह ही भूल खऱ्या मनाला पडलेली असते. 
त्याला मिळवण्यासाठी केलेली धडपड,आगपाखड खरी असते. 
लोकं विशेषतः काही स्त्रिया यात जास्त अडकतात. त्यांचे स्वतःचे जगण्यातले अपुरेपण, येणाऱ्या अनुभवांबद्दल असमाधान,खदखद,दबलेल्या उर्मी त्यांना त्या दिशेने खेचत नेतात. 
तुलनेचा राक्षस मनावर राज्य करत असतोच.
"भला तेरी सारी मेरी सारीसे सफ़ेद कैसे?"याचा भुंगा त्यांना स्वस्थ बसू देत नाही.  मग कधीतरी अशी वेळ येते की सोशल माध्यमांवरील या सख्ख्या मैत्रिणी एकमेकांच्या वॉलकडे पाठ फिरवून एकमेकींनाच ब्लॉक करतात. इतक्यावरच हे थांबत नाही घडलेल्या गोष्टींबद्दलची जखम त्यांच्या मनात सतत ठसठसत राहू शकते.
आभासी विश्वातले पाच "अ"
म्हणजे अवास्तव विचार,अतिरंजित वर्णन, अविवेकी धारणा, अपूर्ण ज्ञान आणि अंतहीन स्पर्धा आपण ओळखू शकलो तर आपल्याला सीमारेषाही ओळखू येईल. त्यासाठी सगळ्यात आधी बदलायला हवा आपला दृष्टिकोन. आपले मूळ हेतू विसरले की माणसं असमाधानाच्या चक्रात अडकतात. बरोबरी करायला जातात. माझ्या फोटोवर,लिहिलेल्या मजकूरावर कमी लाईक्स आणि मी मात्र इतर सगळ्यांची दखल घ्यायची? मनात इर्षा,स्पर्धा निर्माण होते. दुर्लक्ष केल्यासारखे दाखवून लपूनछपून पहारा ठेवणे येते, त्यातून टोमणे मारणे होते,कान भरणे, भरवणे होते. रुसवे-फुगवे होतात. आणि इथल्या मैत्रीत कधी भांडणंदेखील होतात. त्यातून ब्लॉक केले जाते. 
समोरच्याला याचा काहीच पत्ताही नसतो. कारण मुळात इतरांचा तुमच्या काहीही वाटण्याशी संबंधच नसतो. 
या दुहेरी जगण्याचा ताण असह्य होऊन लोकं प्रत्यक्ष आयुष्यात बिथरल्यासारखी वागतात. कशातच चित्त न लागणं,वारंवार मोबाईल तपासून बघणं, उगीचच दडपण जाणवणं, काय खातो-पितो,करतोय याकडे लक्ष नसणं असे त्रास झाले की संपूर्ण घर अस्वस्थ होऊन जातं. कोणत्याच जगाशी जुळवून घेण्यात अपयशी ठरलेली लोकं एकटी,एकाकी होऊन जातात,जगण्याचा आनंद गमावून बसतात.
समस्या प्रत्यक्ष आयुष्यातली असो वा आभासी आयुष्यातली त्यातून बाहेर पडण्यासाठी सतत आपण स्वतःशी बोलत असलेली वाक्ये तपासून बघायला हवीत. मनातल्या अविवेकी धारणा आणि दृष्टिकोन तपासून बघायला हवेत. 
प्रत्यक्ष आणि आभासी यांचा अनुभव घेणारे मन पुरेसे सजग असेल तर तारतम्य बाळगून स्वतःच्या आनंदासाठी कधी कशाची निवड करण्याची हे आपले आपण ठरवू शकतो.
जगण्यातल्या रिकाम्या जागा नक्कीच भरायला हव्यात पण मायावी मृगजळामागे धावण्यात नाही तर स्वतःसाठी आनंदाच्या दिशांचा शोध घेण्यासाठी.
© डॉ अंजली औटी.
# महाराष्ट्र टाईम्स 'मैफल' पुरवणी

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

# मानसआरोग्य डायरी 6

एकवेळ मला काही झालं तरी चालेल पण घरातल्या इतर कोणालाच काहीही त्रास होऊ नये,असं उगीच आपलं आपल्या मनाला वाटत असतं. यामागे लॉजिक काय?
तर त्यांना आपल्याला काही होतंय हे पटकन समजणार नाही😎
खरंतर अगदी सहज गप्पांच्या ओघात घरातल्यांच्या शारीरिक,मानसिक स्वस्थतेबद्दल आपल्याला रोजच्या रोज विचारून खात्री करून घेता येईल. 
याउलट होतं काय की अतिकाळजीपोटी अनेकदा आपल्या नकळत त्यांना नुसत्या काळजी घेण्याविषयी सूचनाच दिल्या जातात,जाब विचारले जातात आणि तेही झाडाझडती घेतल्याच्या अविर्भावात. उदा. स्वच्छतेबद्दल, कुठे जाण्या-येण्याबद्दल.
ऐकणाऱ्याला कधीकधी त्या इतक्या त्रासदायक होतात आणि वैतागल्यासारखं होतं कारण आता वर्ष झालं त्यांनाही त्या ऐकून ऐकून😊
तुम्हाला वाटेल इतकं कानीकपाळी ओरडलं तरी कोणी ऐकतंय का?😠
पण एखादी गोष्ट वारंवार सांगितली की तिचं महत्त्व ऐकणाऱ्याकडून सहजच कमी होतं आणि कधी राग म्हणून किंवा बंडखोरीने सांगितले गेलेय त्यापेक्षा एकदम विरुद्ध वागण्याची प्रवृत्ती होते. त्यांच्या मनात सूचनांचा राग असतोच वर परिस्थितीवरचाही राग असतो.
ना मनासारखे बाहेर जाऊन खेळता येत,ना कोणाला भेटता येत. 
साधारण पंधरा वर्षापर्यंतची मुलं आणि साठी-सत्तरीच्या पुढची मंडळी यांना आता घरात अक्षरशः कोंडल्यासारखं झालं आहे.
एकतर इतरवेळी जास्तीतजास्त वेळ घराबाहेर असणारे मेंबर्स आता पूर्णवेळ घरातच आहेत. 
त्यामुळे कुठेकुठे एकमेकांच्या स्वभावाशी अतिसहवासातून घर्षण तयार होतेय. 
सगळ्यांनाच शांतता हवी, प्रायव्हसी हवी, आपल्या कामाच्या वापरासाठी फोन हवेत,लॅपटॉप हवेत. जागेची मुबलक उपलब्धता सगळ्यांकडे असेल असे नाही. म्हणून
मुलांनी शाळेच्या वेळेनंतरही दंगा,मस्ती करायची नाही कारण इतरांचं ऑफिस घरून सुरू आहे.
आजी-आबांच्या बेडरूममध्ये टीव्ही असेल तर मुलांचा मोर्चा थेट त्यांच्या वेळ आणि एकांतावर येतो. त्यांना तर ना दुपारी आराम मिळतोय ना सकाळ- संध्याकाळचा व्यायाम होतोय.
एकमेकांवर आरडाओरडा आणि रोजच्या नवीन तक्रारी यांनी सगळ्यांच वैतागायला झालंय. मुलांना वेगळी रूम असेल तर त्यांच्या
वाढलेल्या स्क्रिनटाईमचीही काळजी आहेच. 
बदलांकडे संधी म्हणून बघितलेल्या कुटुंबांचे अनुभव मात्र वेगळे आहेत.
त्यांनी गेले वर्षभर मिळालेल्या एकत्र वेळेचा चांगला उपयोग करून घेतलाय. अभ्यासाच्या,कामाच्या,एकत्र खेळायच्या इतकेच काय व्यायामाच्या वेळाही एकमेकांच्या संमतीने चपखल अनुरूप करून घेतल्या आहेत.
स्वभावात पुरेशी लवचिकता असेल तर इतर लोकंही पटकन तडजोड स्वीकारतात. कुटुंबात एकमेकांमध्ये समन्वय, सुसंवाद आणि संघटितपणा प्रयत्न आणि पेशन्सने आणावा लागतो.
आज पन्नाशीमध्ये असलेल्या पिढीने त्यांच्या काळातले सुट्टीतले अनेक बैठे खेळ मुलांना शिकवले. त्यातून मुलांना खेळण्यासाठी नावीन्य मिळाले म्हणून मुलं खुश आणि मोठ्यांनाही आपले लहानपण पुन्हा अनुभवल्याचा आनंद. शिवाय यात आजी-आजोबाही सहभागी झाले. सगळ्यांच्या मनावरचा ताण हलका झाला. 
घराचे गोकुळ व्हायला अशीही फक्त इच्छाशक्तीच तर लागते😊 
आपल्यालाही असे प्रयत्न जाणीवपूर्वक करायला काय हरकत आहे?
दिवसभरातल्या वेळात आपल्याला मिळालेल्या छोट्या-मोठ्या मोकळ्या वेळेच्या संधी अनेक कल्पक उपायांनी भरता येतील. सगळ्यांच्या मनावरचा ताण त्यामुळे नक्कीच कमी होण्यास मदत होईल.
सध्याच्या परिस्थितीबद्दल, अडचणींबद्दल तुम्ही मुलांशी जाणीवपूर्वक बोलता आहात ना?
कितीही लहान वयाचे मूल असेल तरी त्यांना समजेल अशा शब्दांत त्यांच्या शंकांना,प्रश्नांना उत्तरं द्यायला हवीत. तुम्ही सुखरूप रहाल आणि त्यांच्या सोबत आहात ही जाणीव वेळोवेळी त्यांना करून द्यायला हवी. काही झालेच तर वेळेत त्यावर उपाय करता येतात, हा विश्वास त्यांना द्या. कारण तुम्हाला काही झाले तर? या दडपणाचे न पेलवणारे ओझे त्यांच्या चिमुकल्या मनावर असू शकते.
तीच खात्री वृद्धांनाही द्यायला हवी. काही झाले तर आपल्याला आपली माणसं पुन्हा दिसणार का, या कहाण्यांचा न पेलवणारा ताण त्यांच्याही मनावर असू शकतो.
एकत्र मिळालेला वेळ लहानमोठ्या गोष्टींवरून एकमेकांशी भांडण्यात,तक्रारी करण्यात घालवला तर एकमेकांशी असलेल्या नात्यात सहज प्रेमाचा,
आणि सहजाणिवेचा हळूवार धागा नव्याने गुंफण्याची आयुष्याने दिलेली सुंदर संधी तुम्ही गमवाल आणि हाती उरेल फक्त आणि फक्त एकटेपणाचा ताण.
थोड्या जाणत्या,जबाबदार वयाच्या मुलांना समाजाप्रती असलेली जबाबदारी शिकवण्याची ही सुंदर संधी आहे. 
त्यांना सोबत घेऊन आपल्या परिसरात असलेल्या वृद्ध व्यक्तींना योग्य काळजी घेऊन मदत करणे,जीवनावश्यक गोष्टी,औषधे आणून देणे, त्यांना बरे नसेल तर डबा देणे, विचारपूस करणे यासारख्या आपल्या अनेक छोट्या मोठ्या वागण्याकडे आपली मुले बारकाईने बघत आहेत.
संस्कार शिकवून कधीच येत नसतात ते मोठ्यांच्या उदाहरणातून मुलं अचूकपणे उचलतात.
मोठ्यांचं एकमेकांशी बोलणं आणि वागणं यातून त्यांच्या जाणिवा एकतर घडत आहेत किंवा बिघडत आहेत,याचं भान या परिस्थितीत अधिक बाळगायला हवंय.
कोणतेही संकट कायमस्वरूपी टिकत नाही.
आयुष्य खूप सुंदर आणि जगण्यायोग्य आहे.
कळत्या मुलांशी या गोष्टी जाणीवपूर्वक बोलण्याची गरज आहे. 
आपले कुटुंब,समाज आणि निसर्ग यांची आज काळजी घेतली तर उद्याच्या संकटांची काळजी नसते. मानसिकदृष्ट्या सक्षम आणि निरोगी राहणे ही एका दिवसात साध्य होणारी गोष्ट नाही.
ती आर्थिक बचतीसारखी जाणीवपूर्वक करावी लागते. 
ज्यावेळी सर्वकाही सुरळीत सुरू असते तो काळ स्वतःला मानसिक,भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्याही सक्षम होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा असतो. 
संकटांचा सामना कसा करायचा असतो,
त्यासाठी लागणारे शारीरिक मानसिक बळ आपल्या आतच असते फक्त ते वापरायचे की नाही,कसे वापरायचे असते हे आजच्या आपल्या वागण्यातून मुलांना समजते आहे, म्हणून सावध!
© डॉ अंजली औटी.
# मानसआरोग्य डायरी 6


बुधवार, २८ एप्रिल, २०२१

# मानसआरोग्य डायरी 5

अनेक लोकांना ज्यावेळी आपल्या घरात सुरक्षित राहायला मिळतंय त्यावेळी देशभरातील अनेक डॉक्टर्स,सिस्टर्स,इतर मेडिकल स्टाफ,औषध विक्रेते आणि संपूर्ण मेडिकल विश्वाशी निगडित असलेले सगळे लोक गेले वर्षभरापेक्षा जास्त काळापासून किती मानसिक ताणातून जात आहेत आपल्याला कल्पना नाही.
केवळ काही तासांची शारीरिक विश्रांती,अपूर्ण झोप,खाण्याच्या अनियमित वेळा आणि हात,मेंदू यांना अखंड फक्त काम आणि कामच.
हॉस्पिटल्स क्षमतेपेक्षा जास्त भरलेली आहेत. संपूर्ण यंत्रणेवर कमालीचा ताण आहे. 
त्यात ओळखीचे,नातेवाईक,मित्रमंडळी यांचे सतत फोनवर फोन. कोणाला बेड हवाय,कोणाला सल्ला हवाय,कोणाला ऑक्सिजन हवाय,कोणाला vaccine हवीय.
रोज येणारे शंभरच्या वर कॉल्स. प्रत्येकाची काहीतरी अपेक्षा,मागणी. 
ती पूर्ण करता आली तर ठीक, नाही आली तर मनाला टोचणी.
कुटुंबातल्या माणसांसाठी वेळ नाही.
त्यांना आपल्यामुळे काही होणार नाही ना याची काळजी सतत मनात. मुलांना कुठे आहे vaccine चं संरक्षण?
घरी ना कोणाशी मनमोकळ्या गप्पा,ना एकत्र जेवण. घरी जायलाच रात्रीचे 11 वाजून जातायेत. 
तोपर्यंत सगळे झोपलेले, कसेबसे दोन घास खाऊन पडत नाही तोवर कोणी सिरीयस झाल्याचा किंवा गेल्याचा फोन. 
डोळ्याला डोळा लागणार कसा? झोप पूर्ण होत नाही,पुरेशी विश्रांती नाही. थोडावेळ स्वतःसाठी हवा आहे पण फोन बंद ठेवता येत नाही.
मनावर सगळ्याचा ताण येतोय.
शेवटी माणसंच आहेत ना ही सगळी मंडळी?
हॉस्पिटलपर्यंत आलेले बरेचसे पेशंट सिरीयस होऊनच आलेले असतात. 
कधीकधी इच्छा असूनही त्यांना आत पण घेता येत नाही. खूप प्रयत्न करून,काळजी घेऊनही डोळ्यादेखत पेशंट जातो आहे, तरुण लोकांनाही वाचवता येत नाहीये. त्यांनी थोडं वेळेत यायला हवं होतं, सगळ्याचा खूप त्रास होतो, दाखवता येत नाही, त्यावेळी कितीही वेळ मारून नेली तरी नातेवाईकांचा आक्रोश बघून त्यांच्या जागी आपल्या माणसांचे चेहेरे दिसायला लागतात.
त्यांनाही हताश,निराश वाटतंय.
आजूबाजूचं मृत्यूचं थैमान बघून प्रश्न पडले आहेत. खरंच कधी थांबणार आहे हे सगळं?
की अजून एखादी लाट येणार आहे?
थांबणार आहे की नाही?
अनिश्चिततेचं भय त्यांनाही वाटतंय. 
पण सांगणार कोणाला?
बोलणार कोणाशी?
माणसांच्या भावभावना आणि मर्यादा त्यांनाही आहेत हे लक्षात आहे ना आपल्या?
त्यांच्यासाठी थाळ्या बडवून त्यांना काहीही मदत होणार नाहीये. 
नुसतीच कोरडी कृतज्ञता पण नको.
त्यांना मदत करण्यासाठी आपण फक्त तीन गोष्टी कटाक्षाने करू शकतो.
सगळ्यात पहिली योग्य पद्धतीने घातलेला मास्क. मास्क वापरण्याच्या लोकांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. पहिल्या लाटेनंतर नावाला मास्क वापरणारे,गळ्यात बांधून फिरणारे,योग्य पद्धतीने मास्क न वापरणारे, मास्कच न वापरणारे लोक आपण बघितले. 
घरात,गाडीत मास्क काढून टाकला की तो कुठे ठेवतोय,त्याला कुठे हात लावतोय मग तेच हात नाकाला,तोंडाला लावतोय या गोष्टीही लोकांकडून नकळतच होतात.
घरातली वयस्कर मंडळी आणि लहान मुलं सगळ्यांची नजर चुकवून मास्क काढतात. 
गाडीत,विमानात अंधार झाला की मास्क काढून बसलेले लोक आहेत.
याचा अर्थ मास्क लावणे का गरजेचे आहे हे अजूनही समजलेलं नाही की आपल्याला जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत, हा समज आहे? म्हणजे नेमकं अज्ञान आहे की बेपर्वाई?
Social distancing करणारेही तसेच. पूर्ण काम होइपर्यंत लांबच बसलो होतो. फक्त नंतर एकत्र चहा प्यायला,नाष्टा केला. नाहीतर खूप दिवसांनी भेटलो म्ह्णून मग सेल्फी काढले. 
फक्त तितक्याच वेळ मास्क काढला..
बाकी कधीच काढत नाही,असे म्हणणारे लोक बघितले.
करोनाची लाट वाढण्यासाठी पुन्हापुन्हा येण्यासाठी आपला तर हातभार लागत नाहीये ना?
दुखणे अंगावर काढण्याची आपल्याला जुनी सवय आहे. आपल्याला होणारा त्रास आपोआप काही वेळानंतर कमी होईल असा समज मनात बाळगून खूप लोक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात.

करोनाची टेस्ट positive आल्यावर तात्काळ औषधे घेतली तर आजार वाढण्याची शक्यता कमीतकमी आहे. 
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट vaccination बद्दल.
स्वतःला जास्तीतजास्त सुरक्षित करण्याचा तो एकमेव उपाय आहे. त्याने करोना झाला तरी त्याचा होणार त्रास खूप प्रमाणात कमी होतो हे लक्षात आलेले आहे. 
अजूनही काही लोक लस घ्यायला घाबरतात आणि टाळत आहेत. सर्वांनी लस घेतली तर लवकरात लवकर हे सगळं संपू शकेल.

मेडिकलविश्वाबाबतीत काही तक्रारी आणि काही ठिकाणी आर्थिक लुटालूट हे प्रकार खूप वाढले आहेत,हे मान्य. ही सामाजिक कीड या क्षेत्रातही वाढते आहेच.
पण त्या मोजक्या लोकांसाठी प्रामाणिकपणे आणि अथकपणे आपले काम करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना सरसकट संशयाच्या नजरेने जोखणे योग्य नव्हे. 
आज ते आहेत म्हणून आपण सगळे आहोत,हे ही सत्य आहे.
आपण आपली जबाबदारी ओळखून वागावे,इतकीच त्यांची इतर समाजाकडून अपेक्षा आहे. 
खरेतर ते त्यांच्यासाठी नाही,आपल्याला आपल्याच भल्याकरता करायचे आहे. 
कृतज्ञतेची ही छोटीशी पावतीच आपल्याला संकटातून बाहेर काढणार आहे.
© डॉ अंजली औटी.
# मानसआरोग्य डायरी 5

रविवार, २५ एप्रिल, २०२१

# मानसआरोग्य डायरी 4

 बसलेले आप्पा निवेदकाच्या प्रत्येक शब्दाला घुटके गिळत होते,ओठ थरथरत होते,डोळे विस्फारलेले.
बातम्या सुरू होत्या. निवेदकाच्या आवाजाची पातळी, वेग, स्वर,त्यात भर घालणारे पार्श्वसंगीत आणि अत्यंत गंभीर,दुर्दैवी बातमी. 
नाशिकच्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू. 
नाटकीय आवाजात वारंवार उच्चरलेली तीच ती वाक्ये आणि त्यात आणखी भर चित्रांची,व्हिडीओची.
नातेवाईकांचा आक्रोश बघून आप्पांना कसंतरीच व्हायला लागलं. घरातल्या कोणाच्यातरी लक्षात त्यांची ही अवस्था आली आणि ताबडतोब टीव्ही बंद झाला. पण कदाचित तोपर्यंत उशीर झाला होता,घडायचे ते नुकसान घडून गेले होते.
दुसऱ्याच दिवशी गेले वर्षभर चार भिंतींच्या आत  स्वतःला सुरक्षित ठेवलेले आणि करोना लसींचे दोन्ही डोस पूर्ण झालेले 60 वर्षांचे आप्पा घरात चालता चालता कोसळले. 
आपल्याला माहीत नसलेले असे आणखी किती आप्पा असतील?
माणसांवर नकारात्मक,वाईट गोष्टींचा परिणाम खूप लवकर आणि जास्त प्रमाणात का होतो?
आयुष्यातल्या सकारात्मक,चांगल्या गोष्टीं घडण्याचा वेग त्यामानाने इतका कमी कसा?
संवेदनशील मनात हा प्रश्न नक्की उमटतो.
असे होते कारण नकारात्मक गोष्टींचा हल्ला माणसावर अचानक होतो. आघात झेलण्यासाठी मनाची पूर्वतयारी नसते. 
त्यावेळी जाणवणाऱ्या नकारात्मक भावनांचा वेग आणि तीव्रता खूप जास्त असते. 
घटनेनंतर अनेक दिवसांनी अनुभवांची तीव्रता कमी झाली तरी त्या प्रसंगांची आठवण मात्र माणूस कधीही विसरत नाही. पुन्हा तसा अनुभव आला की माणूस त्यांच्याशी पटकन कनेक्ट होतो.
दुःखद काही बघून,ऐकून,वाचून आपल्या मनातल्या या आठवणींची केंद्रे लगेच जागी होतात. 
त्यातल्या तीव्रतेनुसार मेंदू आपण पूर्वी अनुभवलेल्या दुःखद प्रसंगांच्या चित्रांची,आवाजांची, संवेदनांची मालिकाच मन:चक्षूंपुढे उघडून देतो. 
चित्रपट,नाटक बघूनही आपल्या डोळ्यात पाणी येते कारण भावना आपल्या ओळखीच्या असतात. 
इतरांच्या दुःखाशी,त्रासाशी आणि नकारात्मक विचारांशी माणसे सहानुभूतीने आपल्या नकळत जोडली जातात.
काही माणसे भावनांवर पटकन नियंत्रण ठेऊ  शकतात तर काही अतिसंवेदनशील असल्यामुळे पुन्हा पुन्हा त्या प्रकारच्या विचारचक्रात अडकतात. 
इथूनपुढे असे होत असेल तर मेंदूतल्या अशा files उघडल्या गेल्या आहेत त्या ओळखा. सावधपणे त्या चटकन बंद करा. 
मनावरचा ताण वाढवणाऱ्या बातम्या ऐकायच्या की नाही,किती वेळ ऐकायच्या..लक्षात असू दे की टीव्हीचा रिमोट कायम आपल्याच हातात असतो. 
युद्ध,साथीचे,सांसर्गिक आजार,नैसर्गिक आपदा, अपघात अशा संकटात एकाचवेळी अनेक लोक अशा अनुभवातून जात असतात. 
दुःख, हतबलता,निराशा,अनिश्चितता यासारख्या नकारात्मक भावनांची तीव्रता जास्त असते. 
भीती आणि सुरक्षिततेची भावना या सगळ्यावर हावी होते. 
माणसे सारासार विचार करू शकतीलच असे नाही, कशावरही पटकन विश्वास ठेवतात.
प्रत्यक्ष आजाराने जितके नुकसान होणार नाही त्याच्या कितीतरी पट जास्त नुकसान अपूर्ण माहिती,अफवा आणि भीतीमुळे होत असते. 
सतत कानावर येणाऱ्या मृत्यूच्या, जवळची लोकं, नोकरी गमावण्याच्या, हॉस्पिटल्स मध्ये इंजेक्शन्स नसण्याच्या,ऑक्सिजन नसल्याच्या,बेड नसल्याच्या बातम्या भीतीत भर घालतात.  
त्यांच्यामुळे मनोधैर्य खचलेले लोक गंभीर परिणाम अनुभवतात आणि त्यांच्या गोष्टी अनुभवून आणखी काही लोक भीतीग्रस्त होतात. 
दुष्टचक्र फिरत राहते. 
मग वस्तुस्थिती खरीखरच अशीच नाहीये का?
संकट आहे ही वस्तुस्थिती नक्कीच आहे. 
अशावेळी सावध,चौकस असल्यामुळे आपल्यापर्यंत जे पोहोचते आहे त्याची शहानिशा करण्याचा संयम, विवेक बाळगला तर माहितीचा
वापर विनाकारण फोन करून एकमेकांची भीती वाढवण्यासाठी करणार की एकमेकांना मदत करण्यासाठी करणार, हा निर्णय घेण्याचा चॉईस आपल्या हातात आहे,हे लक्षात येईल.
करोना संकट आपल्यापर्यंत आलेच तर त्याचे शरीरातले पाहिले लक्षण ओळखण्यासाठी आपण ते ज्ञान वापरू.
कारण मनाच्या सैरभैर अवस्थेत अनेकांकडून ते दुर्लक्षित होतेय,असं लक्षात आलंय. 
लवकर उपचार, लवकर मात,हे करोनातून बाहेर पडण्याचे पाहिले सूत्र आहे.
आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने नकारात्मक गोष्टींपेक्षा आपल्या दैनंदिन जीवनात एकूणच आयुष्यात सकारात्मक,चांगल्या गोष्टी घडण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. 
मनातली नकारात्मकता आगीच्या वणव्यासारखी आहे..अवचित लागणारा,धुमसणारा,निरपराध अनेकांना भक्ष बनवणारा. 
वणवा लागू नये म्हणून आधीच काळजी घ्यायची असते. चुकून लागलाच तर विझवण्याची त्वरा करायची असते.
सकारात्मकता मात्र देवघरातल्या समईच्या  ज्योतीसारखी आहे. 
नियमित साधनेने प्रज्वलित ठेवावी लागते. 
मनाच्या गाभाऱ्यात मंद मंद तेवणारी असते.
स्निग्ध तेजाने मनातला अंधार उजळवून टाकते. चैतन्याची ऊब आणि उज्ज्वल भविष्याची ग्वाही देणारी असते.
आज स्वतः मधल्याच त्याच तेजोमय ज्योतीचे स्मरण करूया.
तिच्या असण्यावर विश्वास ठेवा.
आपल्या सगळ्यांचे एकत्रित प्रयत्न आपल्याला या संकटातून बाहेर पडायला मदत करतील.
आपणही करोनायुध्दातले लढवय्ये सेनानी बनू या..🙏😊
© डॉ अंजली औटी.



# मानसआरोग्य डायरी 3



मनात भीती असते,मला करोना झाला तर? 
माझ्यामुळे माझ्या घरातल्या कोणाला झाला आणि त्यांना काही झालं तर? त्यांच्या मृत्यूचे भय. माझे आईवडील,भाऊ बहीण, मुलं जे लांब राहतात त्यांना काही झालं तर?
माझ्या नोकरी,व्यवसाय याबद्दलच्या आर्थिक चिंता. 
याबद्दलची सत्यता, वस्तुस्थिती यावर संयमाने विचार न करताच आपली स्ट्रेसलेव्हल वाढत नाहीये ना?
आपल्या ओळखीचे,शेजारी,जवळचे रोज कोणीतरी संकटात असल्याच्या बातम्या सतत समोर येत आहेत. वारंवार बोलून ताण आणखी वाढतोय.
बोलणारा कदाचित मन हलकं करत असतो पण ऐकणारा? आपण नुसते ऐकत नाही. बातम्या सांगणारा आणि ऐकणारा दोघेही आपल्या सवयीनुसार ऐकलेले amplified करतात. 
आपल्या शत्रूवरदेखील वाईट वेळ येऊ नये अशी सदिच्छा बाळगणारे आपण स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या लोकांच्या बाबतीत अशी अनेक दिवाचित्रे,शक्यता आपल्या नकळत मनातल्या मनात रंगवत असतात.
आज करोनाची भीती असेल पण करोना नव्हता तेव्हा काळजी,चिंता आणि समस्या नव्हत्याच का? 
चिंता करण्याची आपल्या मनाला सवय तर नाही? एकदा तपासायला हवंय.
घरातून कोणी बाहेर निघालं, तर त्याचा accident तर होणार नाही? पहिल्यांदा हा विचार मनात येणारे अनेकजण आहेत. 
आपल्या जवळच्या लोकांबाबाबत इतका वाईट मनात येतो याचा अपराधभाव खूप जास्त असतो.
त्यातून भानावर येणे काहींना जमते. काही त्यात अडकतात, त्यात मानसिक व्याधींचे मूळ असू शकते. विचार असह्य होतात,सतत मनात येतात त्यावर मात करण्याचे अनेक मार्ग शोधले जातात.
त्यांचा उपयोग होण्यापेक्षा आणखी त्रास होऊ शकतो. अतिविचार टाळता येणे शक्य आहे,त्यासाठी मदत उपलब्ध असते. गरज असते वेळेत आपल्याला होणारा त्रास लक्षात येण्याची.
मानसिक अस्वस्थतेबद्दल कोणाजवळ विश्वासाने बोलता येईल,त्यावर चर्चा करता येईल असे वातावरण घरात, समाजात मिळायला हवे.
आपले हसे होईल म्ह्णून या गोष्टी लपवून ठेवल्या जातात. 
लहान मुलांच्या मनात अशा असुरक्षितता,भीती खूप जास्त असतात. त्या व्यक्तदेखील होत असतात. अनेकदा घरातले मोठे" शुभ बोल रे नाऱ्या" म्ह्णून त्याला फटकरतात. 
आपल्या आजूबाजूला असलेलं कोणी असं काही व्यक्त करत असेल तर सावध असा. 
ती संवादाची संधी आहे. त्यांची कारणे ऐका, समजून घ्या. त्यांना विश्वास द्या, सांगा की
आपल्या मनात येणाऱ्या सगळ्याच विचारांवर विश्वास ठेवण्याची गरज नसते. त्यात कचरा भरपूर असतो. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावायची असते.
आपल्या मनातले असे विचार ताबडतोब खरे होतील याची शक्यता शून्य असते.
शक्यता केवळ आपल्या डोक्याचे खोबरे होण्याचीच जास्त असते. विनाकारण ताण वाढतो.
आजच्या वातावरणात नकारात्मक विचार जास्त प्रमाणात मनात येतात, असं अनेकांचं म्हणणं आहे. 
तात्पुरता विचार झटकला जातो, थोडावेळ चांगला जातो आणि पुन्हा कशावरून तरी त्याच विचारांची साखळी मनात पुढे सुरू होते. दुसऱ्या एखाद्या चांगल्या कामासाठी वापरण्याचा खूप वेळ याच विचारात जातो. 
परिणाम? 
असुरक्षितता,भीती,मूड नसणे, दडपण.
दिवसातला किती वेळ?
शरीराने काम करत असते मन चोवीस तास यात अडकू शकते. 
एक मिनिट थांबा..
जरा स्वतःला तपासा.
आजपर्यंत आयुष्यात घडलेल्या सगळ्या
वाईट घटना आठवा. 
अगदी जाणीवपूर्वक आठवा. 
यात अपयश असेल, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असेल,प्रेमभंग असेल,नोकरी जाणे असेल,अपघात असेल..

प्रत्यक्ष प्रसंग घडत असतांना असलेली आपली मनस्थिती, वागणे आठवा.

लक्षात येईल की त्यातल्या बहुतेक वेळा आपण अत्यंत धीराने आणि संयमाने वागलेलो आहोत. वेळेवर अगदी योग्य निर्णय घेतलेले आहेत. कितीही वाईट वाटलं,दुःख झालं तरीही त्यावर मात केलेली आहे. 
काही काळानंतर त्यातूनही बाहेर पडलोय ते काहीतरी शिकूनच.
हे अगदी खरंय की कोणावरच वाईट वेळ येऊ नये पण आली तर?
आजही बघा ना जरा आजूबाजूला..
प्रत्यक्षात वाईट अनुभवातून जाणाऱ्या, झगडणाऱ्या लोकांकडे बघा.
कदाचित तुमच्या जवळचं कोणी त्यात असेल.
आत्ता या क्षणी त्यांच्या आणि तुमच्या मनात फक्त आणि फक्त त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं याचाच विचार नाही?
शारीरिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी मनाची सगळी शक्ती एकवटलेली नाही?
आपण आपले अगदी 100 टक्के देतोय.

हा आपल्यापैकी बहुतेकांचा अनुभव आहे की प्रत्यक्षात ज्यावेळी आपण संकटात सापडतो त्यावेळी बाकीचं सगळं विसरून सर्वशक्तीनिशी आपण त्यावर मात करतोच करतो.
हातपाय गाळून बसत नाही आणि त्यापासून पळूनही जात नाही.
स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा.
त्याच्यात परिस्थितीवर मात करण्याच्या सगळ्या क्षमता आहेत. 
माणूस तेव्हाच विचारांनी,भावनांनी मजबूत होतो ज्यावेळी तो जास्तीतजास्त कठीण काळावर,दुःखावर मात करतो. त्यातून बाहेर पडतो.
आपल्या प्रत्येकाने आयुष्यात संकटांचा अनुभव घेतलेला आहे.
मग जर सामना करण्याची शक्ती आपल्यात असेल तर आत्ता नुसत्याच
त्रासदायक विचारांनी ताण का वाढवायचा?
प्रत्यक्षात वेळ आली तर बघू पण आता व्यर्थ चिंतेची भर खरंच नको.
मनाला खात्री देऊया?  
त्याआधी अशी वेळ आपल्या कोणावरच येऊच नये म्हणून आज अधिक जबाबदारीने वागूया?
© डॉ अंजली औटी.
# मानसआरोग्य डायरी 3


गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

# मानसआरोग्य डायरी पान 2


मनाला सतत चांगल्या मोडवर कसं ठेवायचं?
मन आहे..त्यात वाईट विचार येणं natural नाही का? उलट आधी वाईटच विचार येतात. 
सगळ्यात जास्त बिघडवून,लाडावून आपण आपल्या मनाला ठेवतो.
काय हरकत आहे विचारांना थोडी शिस्त लावायला?
आजपर्यंत नाही लावली,ठीक आहे. आज, अगदी आत्तापासून सुरवात करूया.
कसं शिकायचं?...अनुभवांकडून.
वाईट विचार सतत मनात येत असतील तर आपल्याला कसं वाटतं?
मन नाराज असतं,भीती वाटत असते, जीव घाबरा होतो,धडधडायला लागतं, मनात आणखी विचार येतात. काय करावं समजत नाही. आजूबाजूने सतत काहीतरी वाईटच कानावर येतंय,कुठेच आशा दिसत नाहीये..
विचारांचा हा रस्ता आपण पकडला आहे हे ज्या क्षणी लक्षात येईल त्या क्षणी स्वतःला थांबवायचं.
कसं? आपल्याला सवयीचं आहे ते..
प्रत्यक्षात रस्त्यावर चालतांना अचानक खड्डा दिसला तर आपण काय करतो?
आपल्याकडून तो चुकवायचा जास्तीतजास्त प्रयत्न करतोच ना? की मुद्दाम त्यातून जातो?
नाही ना? 
कारण आपण पडतो,लागतं, खरचटतं, खड्ड्यात पाणी असेल तर आपले कपडे खराब होतात, हे अनुभवलेले असते आपण. आपण तर गाडीसुद्धा त्यापासून वाचवतो.
ते शिकण्यासाठी आपल्याला किती अनुभवांची गरज लागते? 
एका अनुभवातून गेलेलं पुरतं, हो ना?
तरीही नकळत किंवा नाईलाजाने अचानक पुन्हा खड्ड्यातून गेलो की आपण काय करतो? 
सावध होतो,नीट चालतो आणि पुढचे अनेक खड्डे चुकवतो.
अगदी तसंच मनाच्या बाबतीत पण सतत येणाऱ्या अनुभवांकडून शिकायचं आहे.
मनात स्वाभाविकपणे वाईट विचार आधी आले तरी त्यात अडकायचं नाही..
सावध व्हायचं..थांबायचं..मागच्या अनुभवात आपल्याला असं करणं जमलं नाही मग त्याचा परिणाम मन उदास,अस्वस्थ होण्यात झाला होता, हे बोलायचं आहे स्वतःशी. 
हे विचारांना शिस्त लावणं आहे, सातत्याने केलं तर जमणार देखील आहे.
आजूबाजूला वाईट गोष्टी घडत आहेत हे खरं आहे. त्या घडण्यात आपण जबाबदार असू नये हे मात्र आपण अगदी कटाक्षाने पाळायचं आहे.
प्रत्येकाने आपलं घर, जवळची माणसं सुरक्षित राहतील हा विचार आधी करायचा आहे.
समाजासाठी आपला खारीचा वाटा तो आहे, असं समजा.
आजपासून प्रयत्न करूया?
विचारांना शिस्त लावूया?
© डॉ अंजली औटी.
# मानसआरोग्य डायरी 2

(Photo: Internet)

बुधवार, २१ एप्रिल, २०२१

# मानसआरोग्य डायरी 1



आपल्या आजूबाजूला असलेल्या वातावरणाचा आपण कसा विचार करतोय?
परिस्थिती गंभीर आहेच.
तुमच्या मनात त्याबद्दल काय विचार आहेत?
परिस्थिती चांगली नाही याची जाणीव आहे म्हणून मी आधी स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेईन आणि मग माझ्या कुटुंबियांची,जवळच्या नातेवाईकांची,मित्रमंडळींची आणि नंतर आपले मदतीचे हे वर्तुळ कितीही वाढू शकेल.
हा झाला एक दृष्टिकोन

आणि दिवसेंदिवस सगळं मोठं कठीण होत चाललंय,सगळंच out of control जातंय, काहीच समजेनासं झालंय, सरकार,डॉक्टर,लोकं कोणाचाच पायपोस कोणाच्या पायात नाहीये,खऱ्या केसेस किती आणि काय कसं कळणार? हे सगळं कारस्थान आहे, यात नक्कीच अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. हॉस्पिटल मध्ये गेलेले चांगले चांगले लोकं मरतायेत.. काही खरं नाही. नकोसं झालंय सगळं..
हा झाला दुसरा दृष्टिकोन.

पहिल्या दृष्टिकोनात परिस्थितीचं गांभीर्य समजलेलं आहे तरीही मनात आशा आहे. 
भीती असली तरी मार्ग निघेल याची खात्री आहे.
काळजी घेणे आहे पण अतिरेकी चिंता नाही.
लोकांच्या मृत्यूच्या बातम्या समजल्याने येणारी अस्वस्थता आहे पण या गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत याची जाणीव आहे. 
स्वतःसाठी आणि इतरांसाठी काय करता येईल याचे पर्याय शोधण्याची इच्छा आहे.
म्हणून अशा लोकांना या परिस्थितीत सुद्धा मार्ग दिसतात. आपल्या आजूबाजूच्या वाईट घटनांमध्ये यांना चांगलं काहीतरी उठून दिसतं. अगदीच काही नाही तरी स्वतःपुरते योग्य पर्याय आपोआप मनात पहिल्यांदा येतात जसे
माझ्या एका छोट्याशा प्रयत्नाने मी आणि इतर सुरक्षित राहणार यातली जबाबदारी समजलेले लोक उगीचच घराबाहेर पडणार नाहीत. योग्य पद्धतीने मास्क वापरतील, उगीचच येताजाता परिस्थिती किती वाईट आहे या चर्चेत स्वतःची भर घालणार नाहीत. आपल्याकडून होणारी योग्य मदत करण्यासाठी तत्पर असतील.
या घरातल्या सगळ्यांच्या विशेषतः मुलांच्या  मनावर तुलनेने कमी ताण असेल.
एकत्र मिळालेल्या वेळात अभ्यास,काम,करमणूक यांचं नियोजन रोजच्या रोज केलं जाईल.
काळजी घेऊनही संकट आलंच तर त्यावर योग्य ती कृती करण्याचे भान जागृत असेल.

दुसऱ्या दृष्टिकोनाच्या लोकांना वाईट बातम्या अजून जास्त घाबरवतील,स्वतःला किंवा जवळच्या लोकांना नक्की काहीतरी होईल या भीतीचे दडपण मनावर असेल. कुठेही काहीही खुट्ट वाजलेलं यांना आधी समजेल कारण बातम्या आणि चर्चा ऐकल्या तरच आपल्याला सावध राहता येईल असे त्यांना वाटेल. कोणतंही काम करतांना आधी मनात येणारा विचार हा असेल. इंजेक्शन ची कमी,ऑक्सिजन नाही,हॉस्पिटलमध्ये जागा नाही अशावेळी मला काही होऊ नये म्हणून दिवसरात्र दडपण मनावर असेल. काढे,वाफ आणि जिथून कोठून माहिती मिळेल ते सगळे उपाय न चुकता पार पाडले जात असतील आणि अतिकाळजी घेऊनही चुकून काही झालं तर अनेकांना फोनाफोनी करतील,ओळखीचे डॉक्टर्सना शक्यतो admit करण्यासाठी गळ घालतील आणि घरीच राहून बरा होईल असं सांगितलं तरी यांचा जीव थाऱ्यावर नसेल. तर काही आपल्याला हॉस्पिटलमध्ये काही होऊ नये म्हणून नेमक्या वेळेवर योग्य उपाययोजना करायचं टाळतील.

आपली मानसिकता कोणत्या प्रकारात मोडते?
आत्ताच्या काळात कोणत्या दृष्टीकोनाची मदत होणार आहे हे बघितले तर त्यादृष्टिने मदत होण्यासाठी अजून काय काय करता येईल?
मार्ग काढूया
सोबत राहूया..
© डॉ अंजली औटी.

# मानसआरोग्य डायरी 








मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

मुलांना झालंय तरी काय?

तरुण मुलांच्या समस्या सांगणारे पालक बरेचदा घायकुतीला आलेले असतात. अविर्भावांमधून,बोलण्या वागण्यातून त्यांची अस्वस्थता जाणवत असते. मित्र,परिवार, टीचर्स यापैकी जमेल त्यांच्याकडून याबाबतीत मदत मिळवण्याचा प्रयत्न याआधी करून झालेला असतो. मुलांच्या वागण्यासाठी दृश्यअदृश्य अनेक गोष्टींना जबाबदार धरून झालेलं असतं. पालकांचं म्हणणं, त्यांना होणारा त्रास आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांची चाललेली धडपड जाणवत असते. त्यांनी बळजबरीने आपल्यासोबत बसवलेल्या मुलांना समोरची व्यक्ती 'एकदाच'असे काही सांगेल की त्यामुळे अगदी जादू व्हावी तसे सगळेच त्रासातून ताबडतोब मुक्त होऊ,आपण आपले काम तर चोख केलेय असेही काहींना वाटत असते. अशावेळी मुलांआधी आपल्यालाच एकमेकांशी बोलायची गरज आहे, हे पालकांनी ऐकण्याच्या आणि संवादाच्या, समजण्याच्या पातळीवर येणं हा माझ्याही घडण्याचा प्रवास असतो.

मुलांचा साधारण वयोगट बारा ते बावीस मानला तर काय असतात पालकांच्या तक्रारी? 

आक्रमकता, उद्धटपणा, कोणतीही गोष्ट ऐकून न घेणं, स्वतःचं म्हणणं खरं करणं, खोटं बोलणं,वागणं.. कोणतीच गोष्ट शेअर न करणं, स्वतःचा अभ्यास, भविष्य करिअर याबाबतीत बेफिकिरीने वागणं, मित्र,मोबाईल  आणि मजा यातच मश्गूल असणं, घरापेक्षा घराबाहेर रमणं, बाहेरच खाणं,अस्थिरता, काही व्यसन आहे का असा संशय किंवा व्यसनांच्या आहारी जाणं. आपली मुलं आयुष्याबाबत आणि भविष्याबाबत कमालीची निष्काळजी आहेत आणि पुढे त्यांचं कसं होणार याविषयी पालक कमालीचे चिंताग्रस्त.

पालकांच्या तक्रारी नेमकं काय दाखवतात?

वर्तमानात जाणवणारा दृश्य परिणाम. 

कशाचा? 

मुलांच्या वय वर्षे एक पासून वय वर्षे बावीस,तेवीसपर्यंत येण्याच्या प्रवासात त्यांनी आपल्या आजूबाजूच्या जगाचे जे अनुभव घेतले, जे काही बघितले, ऐकले त्यातून त्यांनी स्वतःच्या अस्तित्वरक्षण आणि घडणीसाठी जे काही उचलले, घेतले, शिकले आणि स्वीकारले त्याचा. 

मग तो योग्य आहे का?

तर योग्य आणि अयोग्य असा निवडा करण्याऐवजी पालक म्हणून आपल्याला आधी काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. पालकांचं म्हणणं असतं, आम्हाला समजलंच नाही तो किंवा ती इतके कधी आणि कसे बदलले!

हो असं होऊ शकतं.. कारण मुलांना जन्म दिला की ती आपोआप वाढतील तशी वाढू द्यावीत त्यांना घडवण्यासाठी वेगळे काही प्रयत्न करण्याची काय गरज आहे? हा प्रश्न एका उच्चशिक्षित पालकाचा आहे.

अशी तर आपण आपल्या बागेतली झाडंपण नाही वाढू देत. त्यांची काळजी घेतो. जरा दुर्लक्ष केलं की झाडांच्या बरोबरीने वाढलेले तण दिसले तर आपण ते निसर्गाचे रक्षण करूया म्ह्णून तसेच ठेवतो का? कारण आपल्याला माहीत असते ते मूळ झाडाला उपद्रव देणारे आहे.

मग मुलांच्या विचारांमध्ये होणारे बदल आपल्याला आधी का जाणवत नाहीत? कारण कोणताच बदल एका रात्रीत होत नाही. ते जाणवत नाहीत कारण मुलांच्या मानसिक जडणघडणीच्या काळात पालकांच्या अतिव्यस्ततेमुळे त्यांच्यातला परस्पर संवाद कमी झालेला असतो. जिथे तो असतो तिथे वेळीच गोष्टी लक्षात येतात आणि त्यावर मार्ग, पर्याय शोधता येतात पण काही घरांमध्ये पालकांच्या लक्षात समस्या येते तोपर्यंत मुलांच्या मनातल्या तणांचे वेडेवाकडे फोफावणारे साम्राज्य झालेले असते. एकमेकांमध्ये अडकलेल्या फांद्यांचे जाळे पसरलेले असते. तिथे ना प्रकाश पोहोचू शकत ना आवाज. शिकण्याच्या टप्प्यावर कधी त्याचे त्यालाच हे उमगले तर तो हे सगळे पार करून आपला मार्ग शोधू शकतो, मात्र सगळ्यांनाच असे जमत नाही. काही त्या अंधारात हरवतात. तर काहींना बाहेर येण्यासाठी मदत लागते. मुलांची गरज वेळेत ओळखणे आणि ती स्वीकारण्याची मानसिकता तयार करणे हा त्यादृष्टीने पालकांचा पहिला प्रयत्न असू शकतो. 



मग लक्षात येते आधी स्वतःलाच बदलायला हवे आहे आणि तसे ते सोपे नाही. पालक म्ह्णून असलेला निसर्गतः मिळालेला वरचा दर्जा आता मुलं अजिबातच जुमानत नाहीत म्ह्णून होणारा आपला तिळपापड कंट्रोल करता येत नाही मग आपण जाता येता मुलाला शाब्दिक शेरेबाजी करतो,वाट्टेल ते बोलतो हे 'मान्य'करणाऱ्या पालकांनी संवादाच्या दिशेने पाहिले पाऊल तरी टाकलेले असते.

आक्रमकता,बेफिकिरी,उद्धटपणा ही समस्येची केवळ दृश्य लक्षणे आहेत. प्रत्यक्ष संवादात त्याच्या मुळाशी काय काय सापडले माहीत आहे?

कमालीची असुरक्षितता,अनिश्चित भविष्याची भीती, आपली तसेच कुटुंबातल्या लोकांची टोकाची काळजी,रोजच्या त्याच त्या आयुष्याचा कंटाळा, परिस्थितीबद्दलची हतबलता, घरातल्या लोकांच्या प्रतिक्रियांचा राग, स्वतःच्या भावना समजण्यात आणि हाताळण्यात आलेले अपयश, काहीच नको अशी टोकाची निरिच्छ उदासीनता.. 

आक्रमकतेच्या मुळाशी भीती असू शकेल, बेफिकिर वागण्यामागे घाबरणारे,कमकुवत मन आहे हे समजल्यावर पालकांना खजील वाटले पण आपली योग्य भूमिका काय असायला हवी यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा तर त्यातून मिळाली.

कुंभार मातीचे मडके मोठ्या कौशल्याने घडवतो, बाहेरून थापट्या मारल्या तरी आतला हात हळुवारपणे आधार देत असतो. त्याच्याकडे समज आहे, सजगता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी लागणारे कौशल्य त्याच्याकडे निर्विवाद आहे. एक लक्षात आलं का?

याच्या बरोब्बर उलटे आपण करतो!

मुलांच्या सर्वांगीण वाढीमध्ये त्यांच्या मनाची सुदृढ,निकोप वाढ व्हायला हवी असेल तर आपल्या वागण्या बोलण्यातून आणि प्रत्यक्ष सहवासातून त्यांची ती गरज वेळेत भागवली जावी. 

पालकांकडे शिक्षण आहे,समज आहे,कौशल्यही भरपूर आहे पण संवादाकरता लागणारा पुरेसा वेळ मात्र नाही. 

म्हणून मग आपल्या मुलांना कधीही काहीही कमी पडू नये यासाठी पालक आपल्या जीवाचे रान करतात. मुलांचे मागण्या,हट्ट त्याने न मागताच तत्परतेने पुरवले जातात. आपले असे वागणे म्हणजेच प्रेम, कर्तव्य समजणारे पालक कमी नाहीत. आपण बाह्य आधार, प्रेम पुरवतो आणि आतून मात्र थापट्या मारत बसतो. 

पालक असणे नैसर्गिक देणगी असलीतरी ती एक जबाबदारी सुद्धा आहे. एकमेकांमधल्या घट्ट नात्यांची, प्रेमाची वीण दुहेरी असेल तर कदाचित ती आयुष्यातल्या कठीण प्रसंगातही सहजी उसवणार नाही आणि त्यातून निसटणाऱ्या आनंदाला ना पालक पारखे होतील ना मुलं. 

आपण पुरेसे संवेदनशील आणि जागरूक असू तर मुलांच्या भावनिक,मानसिक विश्वाची दारे आपल्यासाठी आनंदाने उघडायला मुलंही नक्की तयार होतील.

अनुभव घेऊन बघा,अजूनही वेळ गेलेली नाही.

© डॉ अंजली औटी.


(Photo Source: Google)