शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१३

मनोगत

सुख दु:ख असे ऊन सावली
आयुष्य,एक आव्हान
पेलायचे,
ना हरायचे
कधी सुटू न देता भान,
जरी दैवाचे उलटे पडले दान.  


प्रारब्ध असे पोळणारे          
करू नकोस खंत
हो सावली तू, वाट जीवांना
मऊ गारवा अविश्रांत.

दे ऊब सुखाची
आश्रय अडलेल्याला
कळते त्यालाच वेदना
जो स्वत: होरपळलेला.

धग लागली कितीही
विचलित होऊ नको तू
मनोगत वेदनेचे 
कधी वाटेवर सांडू नको तू.

-अनन्या.

      

बुधवार, ११ डिसेंबर, २०१३

तरीही...!


अशाच धूसर  होत जातात
पावला खालच्या रुळलेल्या वाटा

आपलीच सावली वाटावी अनोळखी  
इतके बदलून जातो आपणही.                         
निसटते मुठीतून वाळू नकळत
कमी होतात श्वास तसे
जगण्याचे सगळेच बहाणे
वाटेवरच्या पावलांपुरते..

मागे वळून बघता बघता
पुन्हा पुन्हा हे जाणवते
कोणीतरी आत जागे
बोलते सतत जोडते नाते,

दूर निघून येतो तरीही
जगायचे राहूनच गेलेले असते
समोरचे क्षितीज खुणावते नव्याने
पावलांआधी मनच पुढे झेपावते…. 

-अनन्या.

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०१३

नि:शब्द अंतर

भरून आलय आभाळ अनावर
अन् वाटा अंधारलेल्या  
जवळ असूनही तू, मी एकाकी,   
अन् अस्वस्थ शांतता पांघरलेल्या

बोलायचंय कितीतरी
पण शब्द मुके मुके
वाट तुझी बघणारे
मन किती सुने, रिते

तरीही यावेस तू,
मिटल्या पापण्यांवर ओठ टेकवावेस अलगद
अन् क्षणात मिटावे, आपल्यातले नि:शब्द अंतर

...पण तू असा दूर
एकाच घरात, वेगवेगळ्या जगात
कधी रे झालो आपण दोघे
असे ओळखीचे अनोळखी?

सगळं असूनही सुबक, मुलायम
काहीतरी खुपते आहे
हळूहळू आतल्या आत जमीन
पावलाखाली खचते आहे...!  

-अनन्या

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३

माझ्या आवडत्या ‘प्रार्थना’

मनावर सतत कोणत्यातरी ताण-तणावा चे ओझे घेऊन आज आपण सगळेच जगत आहोत. त्यापासून सुटका मिळवण्याचे प्रत्येकाचे आपापले वेगळे मार्ग आहेत.
मनातल्या ताणाचे योग्य नियोजन केले नाही तर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मन शरीर आणि चित्त वृत्तींचे संतुलन, निरोगीपणा  आपण गमावून बसतो. आपली विविध व्याधींशी सामना करणारी प्रतिकार क्षमता खिळखिळी होते आणि त्यातून उद्भवणाऱ्या विविध मनोशारीरिक आजारांचे मूळ मात्र मनावर असलेल्या आणि टाळू न शकलेल्या ताणात असते.  

सततच्या चिडचिड्या स्वभावामुळे आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना दुखावतो आणि त्या आपल्यापासून दूर निघून गेल्या हे ही आपल्याला सहन करणे शक्य होत नाही. एकूण काय आपला अभिमन्यू होतो, ताणाच्या चक्रव्यूहात परत मागे फिरण्याची वाट हरवलेला.
या ताणतणावाचे नियोजन करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या मार्गाने करत असतोच.
जरा वेळ शांत,स्तब्ध बसून मन एकाग्र करून नियमित म्हटली गेलेली एखादी प्रार्थना आपल्या मन आणि शरीरावरचा ताण हलका करू शकते. 

प्रार्थना ही मनाची शक्ती आहे. मनावरचा ताण-तणाव हलका करून मनातले विचार सुसंगत करण्याची प्रेरणा आपल्याला प्रार्थनेतून मिळू शकते. 
प्रार्थना म्हणजे जीवनाच्या सुसंस्कुत बाजूंचा जाणीवपूर्वक घेतलेला वेध आणि बोध.
आपल्या मनाची हाक ऐकण्यासाठी आपण स्वतःलाच दिलेला एक छोटासा अवसर. स्वतःचे आत्मिक बळ वाढवण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न. संवेदनशील मनाची संवेदनशीलता सतत जागी असावी म्हणून मनाची केलेली जडणघडण.
आपल्यातल्या बऱ्या-वाईट वृत्ती प्रवृत्तींचे संपूर्ण समर्पण करण्यासाठी मनाला मिळालेली प्रेरणा,सकारात्मक उर्जेचा मानसिक स्त्रोत म्हणजे प्रार्थना.

आपल्या मनातल्या नकारात्मक भावनांचा निचरा करण्याची खूप मोठी शक्ती प्रार्थनेत आहे. आस्तिक असण्याशी किंवा नसण्याशी तिचा काही संबंध नाही,चांगल्या विचारांवर, चांगल्या वागणुकीवर असलेली श्रद्धाच यासाठी पुरेशी आहे. विचारांमध्ये,वागणुकीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या पूर्ण व्यक्तिमत्वातच बदल घडवून आणण्याची क्षमता प्रार्थनेत असते.

मनातल्या नाविन्यपूर्ण कल्पनाची, विचारांची, निर्मितीच्या बीजांची मशागत करण्याची शक्ती प्रार्थनेत आहे.
प्रार्थना व्यक्तिगत असू शकते किंवा सामुहिक, कशीही केली तरी तिच्यापासून मिळणारी उर्जा संक्रमित होतेच.
मना मनांना जोडण्याची, विश्वासाने, आपुलकीने दुसऱ्याच्या भावनांशी समरस होण्याची सुरवात सामुहिक प्रार्थनेतून होते.
माणसा माणसातील भेद पुसून टाकून सर्वांना मानवतेच्या सर्व समावेशक धाग्यात गुंफणारी प्रार्थना, माणुसकीची खरी ओळख आहे.

प्रार्थना माणसाचे साध्य नाही तर त्याच्या हातात असलेले असे साधन आहे की जे समग्र मानवतेच्या कल्याणासाठी हातभार लावेल.
मन आणि बुद्धीचा विवेक करण्याचे भान प्रार्थनेमुळे जागे राहते.
विवेकाच्या कसोटीवर आपले विचार तपासून घेण्याची क्षमता   
प्रार्थनेतले शब्द, आशय,भाव वाढवतात.    

प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि तिच्या मनातला कशावर तरी असलेला विश्वासही वेगळा. माझा या जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर विश्वास आहे. निसर्गातल्या अनेक गोष्टींचे कुतूहल माझ्या मनात आहे.
कुटुंब, समाज, माणसा माणसातील परस्पर संबंध, मानसिक, भावनिक, वैचारिक, बौद्धिक अशी त्यांच्यातल्या संबंधातील देवाणघेवाण, त्यातील चढ उतार, सतत बदलत असलेले दिवस, बदलत असलेली परिस्थिती, बदलत्या वेळा, यांच्यातील परस्पर अंतरक्रियांचेही मला प्रचंड कुतूहल आहे.
माझ्यासाठी प्रार्थना म्हणजे स्वतःत बदल घडवून आणण्यासाठी मला मिळालेली संधी. मला सगळ्याच प्रार्थना खूप आवडतात. पण त्यातल्या त्यातही काही आगळ्या वेगळ्या प्रार्थना माझ्या खास आवडीच्या आहेत. 

ज्ञानेश्वेरांचे पसायदान ही माझी सगळ्यात आवडती प्रार्थना.

त्या खालोखाल मला आवडलेली प्रार्थना म्हणजे गुरु रवींद्रनाथ टागोरांची...
निसर्ग प्रार्थना, ही प्रार्थना माझी प्रेरणा आहे.  

आम्ही आकाश बघू, आम्ही झाडे बघू
आम्ही पक्षी बघू, आम्ही पाऊस बघू

हे रंग, हे गंध, हे स्पर्श,आनंद
ज्याने दिले आम्ही त्याला स्मरू

जो देतो आणि तो देताच राहतो
देणारा तो अमुचा गुरु

हे नाही, ते नाही, म्हणणार नाही
दु:खावरही आम्ही प्रेमच करू..

आम्ही आकाश बघू, आम्ही झाडे बघू
आम्ही पक्षी बघू आम्ही पाऊस बघू.  


गुरु रवींद्रनाथ टागोरांचीच आणखी एक भाषांतरित प्रार्थना आहे. तिच्यातून व्यक्त होणारा भाव तर कोणाच्याही हृदयाचा ठाव घेणारा. 

विपत्तीमध्ये माझ्या मदतीला ये ही माझी प्रार्थना नाही,
विपत्तीत मी भयभीत होवू नये
इतकीच माझी इच्छा.

दु:खाने व्यथित झालेल्या माझ्या मनचं 

तू सांत्वन करावंस अशी माझी अपेक्षा नाही 

दु:खावर जय मिळवता यावा, इतकीच माझी इच्छा  



माझ्या मदतीला कोणी आलं नाही
तरी माझं बळ मोडून पडू नये
इतकीच माझी इच्छा.

जगात माझं नुकसान झालं
केवळ फसवणूकच वाट्याला आली 
तरी मन माझं खंबीर राहावं
इतकीच माझी इच्छा.

माझं तारण तू करावंस
मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही
तरुन जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं
इतकीच माझी इच्छा.

माझं ओझं हलकं करून
तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही
ते ओझं वाहायची शक्ती माझ्यात असावी
इतकीच माझी इच्छा.

सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझं चेहरा विसरू नये
दु:खाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल
तेव्हा तुझ्या अस्तित्वाविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये 
इतकीच माझी इच्छा.


राष्ट्र संत तुकडोजींची एक प्रार्थनाही अशीच सर्वसमावेशक समूह प्रार्थना.

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे
हे सर्व पंथ, संप्रदाय एक असू दे, मतभेद नसू दे
दे वर ची असा दे 

नांदोत सुखे गरीब अमीर एक मतांनी
मग हिंदू असो वा ख्रिश्चन वा असो इस्लामी
स्वातंत्र्य सुख या सकलांमाजी वसू दे 
दे वर ची असा दे 

सकलांस कळो मानवता राष्ट्र भावना
हो सर्व स्थळी मिळूनी समुदाय पार्थना
उद्योगी तरुण शीलवान येथे दिसू दे
दे वर ची असा दे 

जातिभाव विसरुनिया एक हो आम्ही
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी
खलनिंदका मनीही सत्य, न्याय वसू दे 
दे वर ची असा दे

सौंदर्य वसे घराघरात स्वर्गी ज्यापरी 
ही नष्ट होऊ दे विपत्ती, भीती बावरी
‘तुकड्यास’ सदा या सेवेमधी वसू दे
दे वर ची असा दे 

साधेपणा आणि साधे, मनात अर्थ उमटवणारे शब्द, खरच साधेपणात किती सौंदर्य सामावलेय, नाही? 

डॉ. अनिल अवचटांच्या एका भाषणात त्यांनी सांगितलेली एक प्रार्थना मला अशीच मनापासून आवडते. पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात ती दररोज म्हटली जाते.  

जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया

 मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय

माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया!  


आणखी एक प्रार्थना खूप वेगळी आणि मला प्रचंड भावलेली.
या प्रार्थनेतूनच अन्न कधीही वाया न जाऊ देण्याचे मूल्य मनात रुजते. 

वदनी कवल घेता नाम घ्या मातृभूचे
सहज स्मरण होते अपुल्या बांधवांचे
कृषीवल कृषिकर्मी राबती दिवस रात्र
स्मरण करून त्यांचे अन्न सेवा खुशाल
    उदार भरण व्हावे चित्त होण्या विशाल..   


प्रार्थना म्हणजे माझ्या मर्यादा जाणून घेऊन नम्रपणे त्यांचा केलेला स्वीकार आणि माझे जग, माझे आयुष्य सहज, सोपे करणाऱ्या व्यक्ती, वस्तू किंबहूना सर्व चराचरा विषयी बाळगलेली कृतज्ञता...! 

खरोखरच 'प्रार्थना' शब्दात न मांडता येणारा आशय, अर्थ मनात जागवणारा संस्कार आहे. 



सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१३

एक नातं सृजनाचं

एक नातं सृजनाचं,
पानाच्या देठाशी
जसं झाडाच्या मुळांचं.

एक नातं नाविन्याचं
,    
कोरेपणाच्या स्पर्शाशी  
जसं खोल श्वासाचं.

एक नातं विश्वासाचं
,
नवजात तान्हुल्याचं अन
मऊ कुशीतल्या उबेचं.

एक नातं समजुतीचं
डोळ्याच्या पापण्यांशी
जसं गाढ झोपेचं.

एक नातं सुरांचं
गाणाऱ्याच्या गळ्याशी
जसं बेभान तानांचं!

एक नातं आपल्या दोघांचं
कितीतरी स्मृतींचं अन्
विविधरंगी धाग्यांचं!

-अनन्या

शनिवार, २८ सप्टेंबर, २०१३

शोध

स्वतःचा शोध घेत
रुळलेल्या वाटांनी
सहज सोप्या सगळ्या वाटा
काही वळणं अवघड, अनवट
शोध घेत तरीही तसाच           
अनोळखी वाटांचाही प्रवास 
चुकार वळणं वाटेवरची 
अंतर्यामी ओळख पटवत

जाणवले काही नसानसांतून
नको, नको हा निग्रह वरवर
उसळून येते अथांगतेतून
अबोध रसायन सावध, उत्कट

जाणीवेतून साकारलेली
अतीव मोहक मोहफुले ती
अज्ञाताच्या प्रवासातली

सुखद हवीशी, अबोल सोबत.

-अनन्या.

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

अर्थ

जगण्याचा अर्थ विचारला        
एकट्या रानफुलाला    
त्याने हलकेच गिरकी घेतली    
त्याची निरागसताच
मनाला खूप भावली.  
पानोपानी उमलून
सर्वांगानं फुलून
सुगंधाचं रानभर
अनोखं दान लुटून
अबोल हळव्या ओठांनी
ते स्वतःतच गेलं मिटून
वाऱ्यावर झुलतांना
पाकळी पाकळी गळून गेली
श्वासापार्यंत शेवटच्या
वेदना त्यालाही नाही कळाली
वेड्या खोडातून
खोल हुंदका उमटला
जगण्याचा उमाळा
पुन्हा देठातून दाटला
हिरव्या हिरव्या कोंबामधून
फुल नव्याने हसले
निखळ नव्या सृजनाचे
जीवन अर्थपूर्ण भासले.


-अनन्या