Saturday, 28 September 2013

शोध

स्वतःचा शोध घेत
रुळलेल्या वाटांनी
सहज सोप्या सगळ्या वाटा
काही वळणं अवघड, अनवट
शोध घेत तरीही तसाच           
अनोळखी वाटांचाही प्रवास 
चुकार वळणं वाटेवरची 
अंतर्यामी ओळख पटवत

जाणवले काही नसानसांतून
नको, नको हा निग्रह वरवर
उसळून येते अथांगतेतून
अबोध रसायन सावध, उत्कट

जाणीवेतून साकारलेली
अतीव मोहक मोहफुले ती
अज्ञाताच्या प्रवासातली

सुखद हवीशी, अबोल सोबत.

-अनन्या.

Thursday, 26 September 2013

अर्थ

जगण्याचा अर्थ विचारला        
एकट्या रानफुलाला    
त्याने हलकेच गिरकी घेतली    
त्याची निरागसताच
मनाला खूप भावली.  
पानोपानी उमलून
सर्वांगानं फुलून
सुगंधाचं रानभर
अनोखं दान लुटून
अबोल हळव्या ओठांनी
ते स्वतःतच गेलं मिटून
वाऱ्यावर झुलतांना
पाकळी पाकळी गळून गेली
श्वासापार्यंत शेवटच्या
वेदना त्यालाही नाही कळाली
वेड्या खोडातून
खोल हुंदका उमटला
जगण्याचा उमाळा
पुन्हा देठातून दाटला
हिरव्या हिरव्या कोंबामधून
फुल नव्याने हसले
निखळ नव्या सृजनाचे
जीवन अर्थपूर्ण भासले.


-अनन्या

Sunday, 15 September 2013

नाते

जुळतात सूर जेथे
जन्मास येते नाते
नि:शब्द सोबतीने  

साकार रूप घेते
नाते असे बिलोरी
माझ्यात पूर्ण होते
रंगात रंगलेले
माझेच रूप होते
पाऊस वादळाची
निश्चिंत रात्र येथे
उबदार पापणीत
उन्ह कोवळे
कवडसे
साक्षी बनून येते
अव्यक्त आस येथे
मनमुक्त भावनांना
आकार रूप देते
वेगळे कसे म्हणावे?
इतके समीप येते
नात्यात आपल्या या
माझी न मीच उरते!
 

 -अनन्या

Wednesday, 11 September 2013

बोन्साय

मी एक बोन्साय,
तू घरात आणलेलं                
नकळतच त्याच्यात तुझं
आयुष्य गुंफलं गेलेलं.
त्याला माहीतच नव्हतं
आपण एक बोन्साय आहोत,
त्याच्या मनात मोकळ्या आभाळाचं
स्वप्न होतं रुजलेलं!
पूर्वी कधी उखडलेली मुळं
आपले दुखरे सल विसरून
अनोळखी उबदार मातीत, सहज गेली मिसळून.
म्हणतात ना असं, उखडलेल्या रोपट्याचं 
पुन्हा रुजणं अवघड असतं
पण हे रोपंच वेडं, मुळात अगदीच चिवट होतं.
तू स्तब्ध. ते प्रतीक्षेत.
तुझ्या प्रत्येक नकारात त्याने आपले रंग ओतले
तुझ्या मनातल्या वेदनेचे तणही त्याने अलगद खुडले.
पण तुला तर हवं होतं, फक्त एक बोन्साय..
मग हे फुलण्याचं भलतंच वेड कुठलं?
सगळं बदललं.
काचणाऱ्या तारांनी वाढ होऊ द्यायचंच नाकारलं
हे काप, ते काप
शरीरावर सुबक होण्यासाठी घाव
हवा तो आकार देऊन एक सुबक मांडणी
सुंदर दिसण्यासाठीच केवळ सजण्याची सक्ती.
एक स्वयंपूर्ण झाड नव्याने सजलं,
          आपल्यालाही एक मन होतं गाणारं
विसरूनच गेलं!
                                                                                                       
                                                                                                                                                 -अनन्या