गुरुवार, २७ ऑगस्ट, २०१५

रानाची लक्ष्मी

माझ्या आजोळी घराच्या मागच्या अंगणात आजोबांनी आवर्जून लावलेलं कलमी आंब्याचं झाड होतं.बेताच्याच उंचीचं. अतीव काळजीपूर्वक जोपासना केलेलं. त्याच्या वाढीवर परिणाम होऊ नये म्हणून त्याच्याजवळच्या केळीच्या आणि जास्वंदीच्या झाडाची मुळासकट दुसरीकडे रवानगी झालेली. आजोबा रोज सकाळी न चुकता त्याच्यापाशी जात. का कोणास ठाऊक पण त्यांचा फार जीव त्या झाडावर. त्याला सतत जैवीक खत आणि कसल्याशा औषधी फवारणीची देखभाल करण्याची माळ्याला सक्त ताकीद असे.
माळीकाका बागेला पाणी घालत असतांना त्यांच्या मागेमागे फिरण्यात आणि त्यांनी केलेल्या झाडांभोवतीच्या ळ्यांमधून पाण्याचा प्रवाह एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत पोहोचताना बघण्यात माझा कितीतरी वेळ निघून जात असे. पण आजोबांचं बागेत येणं म्हणजे फक्त त्यांच्या लाडक्या झाडाशी त्यांची भेट. त्याची इतकी काळजी घेऊनही ते मात्र सतत नव्या नव्या संकटांनी ग्रासलेलं! बेताच्याच उंचीपर्यंत ते वाढलं. दरवर्षी बेताच्याच मोहोराने बहरलं..त्याला कैऱ्याही काही फार भरगच्च लागत नसत. तरीही आजोबा अट्टाहासाने त्याची निगराणी करीत. त्या झाडाला जरा काही झालं की अस्वस्थ होत. चिडचिडे देखील होत. माळीकाकांवर उगीचच डाफरत. 

त्यांच्या या वागण्याचं मला फार नवल वाटे. असं काय आहे त्या आंब्याच्या झाडात की त्याच्या कौतुकापुढे आजोबांना इतर कुठलंही झाड दिसू नये? आजीला देखील त्यांचा हा स्वभाव माहीत होता. ती त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नसे. ते झाड म्हणजे त्यांच्या बाबांची, अप्पांची आठवण आहे, असं तिने एकदा कोणालातरी सांगितलेलं मी ऐकलं होतं. 

त्या आंब्याच्या झाडाच्या मागच्या बाजूला पण कंपाऊंडपलीकडे एक बाभूळचं झाड होतं. चांगलं जाडजूड आणि भक्कम खोड असलेलं ते झाड अस्ताव्यस्त फांद्यांनी विस्तारलेलं होतं. मला आठवतंय सुरवातीला अनेक वेळा आजोबांनी ते माळ्याकडून तोडून घेतलं होतं. एकदा तर त्यांनी त्याला  ते झाड मुळासहित तोडून टाकायला सांगितलं, त्याने तसं ते तोडलंही पण जाडसर खोडाचं लाकूड जमिनीला इतकं घट्ट धरून बसलेलं की त्याच्याचाने ते काही जमिनीतून निघेना, शेवटी त्याने प्रयत्न सोडून दिले. त्या दिशेने आलेला लख्ख उजेड आणि वाऱ्याने आजोबा खुश होऊन गेले होते.








मला मात्र फार वाईट वाटले. आजोबांना काही म्हणण्याची हिंमत नव्हती पण मला त्यांचा फार राग आलेला होता. कारण मला ते झाड फार आवडे. 

दर सकाळी आणि संध्याकाळी त्यावर चिमण्यांची शाळा भरे. त्यांच्या अखंड चिवचीवीने वातावरण भरून जाई. रोज असंख्य चिमण्या थव्याने झाडावर बसायला येत आणि उडतानाही थव्यानेच उडत. मागच्या अंगणातल्या ओट्यावर बसून त्यांची गम्मत बघणे मला खूप आवडे. त्या चिमण्यांशी, त्या झाडाशी माझं एक वेगळंच नातं होतं. तशी बागेतली सगळीच झाडे माझ्या आवडीची होती, अगदी आजोबांचा आंबाही. पण हे बाभळीचं झाड मला माझ्या एकटीचं आहे असे वाटे. आजोबांकडे गेलेल्या प्रत्येक सुट्टीत त्याचं आणि माझं नातं वाढत, घट्ट होत गेलेलं होतं. 

ते झाड तोडू नये म्हणून मी हट्ट धरून बसले, रडले देखील. पण माझ्या रडण्याकडे त्यावेळी कोणीही लक्ष दिले नव्हते.  माझ्या मनातला आजोबांबद्दलचा राग मात्र पुढे बरेच दिवस टिकला होता. 

त्यानंतर पुढच्या सुट्टीत आजोबांकडे गेलो आणि पाय धुण्यासाठी म्हणून मागच्या अंगणात गेले. बघते तर काय माझे बाभळीचे झाड पुन्हा माझ्या स्वागताला हजर! इतर कशानेही झाला नाही इतका आनंद मला त्या लहानखुऱ्या झाडाकडे बघून झाला.

आजी देखील खुद्कन हसली आणि म्हणाली, “अगं हे लाख तोडतील पण ती कसली चिवट..अर्ध्या तुटक्या खोडातून पुन्हा उभी राहिली. ना कोणीss तिला पाणी घातलंss, ना खत घातलंs..रानची लक्ष्मी ग ही! सगळ्या पाखरांची आई. अग यांच्या वडिलांनाही झाडांचा फार सोस. मग ह्यांना मी सांगितलं की तुमच्या आंब्याच्या झाडानेच जमिनीखालून पोषण पुरवलं असेल तिला,तुमच्या अप्पानीं सांगितलं म्हणून! हो, मी आपली पुढच्या अनेक वर्षांची तुझ्या झाडाच्या सुरक्षेची सोय केलीये बरका!” 

आजीला तर गळामिठी घातलीच मी. पण ह्यावेळी सगळ्यात आधी भेटले ते आंब्याच्या झाडाला! त्याच्या पुढ्यात उभं राहून बाभळीकडे बघितलं तर नेमक्या त्याच वेळी चिमण्यांचा थवा भुर्रकन झेपावला आभाळात आणि हिरवीगार बाभळ नखशिखांत थरथरली होती!

आपल्या धमन्यांमधून रक्ताबरोबरच वाहत असलेले हे असे कितीतरी प्रवाह आपली जीवनेच्छा बळकट करत असतात. आज जेव्हा मागे वळून बघते तेव्हा जाणवते आंब्याच्या झाडाने जमिनीखालून बाभळीच्या मुळांना आधार दिला असेल..नसेल..
पण जमिनीवर असलेल्या आणि आभाळाच्या दिशेने पुन्हा नव्याने झेपावलेल्या रानातल्या त्या लक्ष्मीचं हिरवंगार विजीगिषु रोपटं माझ्या मनाच्या अंगणात कायमचं रुजलं ते त्याक्षणी! 



रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

अखंड चालणारा प्रवास!

ईश्वर असतो निसर्गात! आपल्या जगण्यातल्या प्रत्येक क्षणात.
आपल्या आजूबाजूच्या कणाकणात. आपल्या माणसांच्या निर्हेतूक आपलेपणात.
हे ‘आपलं’ वाटणं असतं ना ते स्थळ, काळ आणि सीमेच्याही पलीकडे असतं.
अशा या खूप साऱ्या आपल्या वाटणाऱ्या माणसांनी माझं विश्व समृद्ध आहे!
असंच आज एक आनंदाचं देणं कबिराचं..!

साधंसुधं माणूसपण शोधणारं तत्वज्ञान शोधणारा कवी. काय आहे कबीराचं म्हणणं? जगण्याच्या प्रवाहात आपल्याला झालेल्या साक्षात्कारासह जगाला सामावून घेणं आहे हे काव्य म्हणजे. शब्दांचे बोट धरून आपण अलगद उतरतो  त्याच्या अनुभवांच्या प्रदेशात..मनाला उमगतो..त्याच्या जगण्यातून उलगडत गेलेला त्याचा काळ, त्याच्या जगण्याचा परिसर, त्यावेळेस असलेली माणसं, त्यांचं जगणं, आचार, विचार,जाणिवा,संघर्ष..इतिहासाच्या पानावर असलेलं ते जग थेट जागं होतं आपल्या मनाच्या कॅनव्हासवर!

ईश्वरप्राप्तीचा कबिराचा शोध.. त्या मार्गावरून जात असतांना साक्षीभावाने त्याने घेतलेले जीवन अनुभव, त्या अनुभवांकडे सजगपणे बघणारे, त्यांचा अर्थ लावणारे त्याचे सुजाण मन आणि त्या जगण्यातून शब्दबद्ध झालेलं त्याचं काव्य. स्वत:चं आयुष्य जगता जगता आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीची किती नेमकी जाणीव त्याला होती.सर्वसामान्य लोकांच्या मर्यादा, कुवत ओळखून त्यांच्याही आयुष्यात बदल घडून यावा यासाठी आपली कळकळ व्यक्त करणारा कबीर जे जे उत्कटपणे सांगावेसे वाटतेय ते ते सगळे स्पष्टपणे सांगत जातो. मनाला जे काही पटले, रुचले ते स्वीकारत आणि न पटलेले परखडपणे नाकारत. समाजातल्या सगळ्यांना सोबत घेऊन. निर्गुण ईश्वराचा शोध घेतांना आलेल्या जगण्यातल्या अनेक अनुभवांचे वेगळेपण त्याच्या काव्यात आहे.
खरंच, आपल्यालाही प्रत्यक्ष जगण्यातूनच तर उलगडत जातात ना आपल्याही आयुष्याचे अनेक अर्थ..कबीर वाचायचा यासाठी. इतिहास आणि वर्तमानाचा धागा जोडतांना जाणवते की सगळं काही बदललं तरी माणसांच्या जगण्या वागण्याच्या पद्धतींमध्ये एक अंतर्गत सुसंगती आहे. प्रत्येक अनुभव स्वत:च घेऊन बघावा लागतो असे नाही. दुसऱ्यांचा अनुभव आणि त्यांची जगण्याची शहाणी नजर समजून घेता आली तर त्यात वाईट काहीच नाही. अनुभव हे अनुभव असतात.परिस्थिती आणि दृष्टी वेगवेगळी असली तरी त्यामुळे त्या अनुभवाची प्रत कोणाला ठरवता येत नाही. त्या अनुभवांच्या प्रकाशात आपल्या दृष्टीचा परीघ वाढवायचा की नाही हे मात्र आपल्यालाच ठरवावे लागते.

दुसऱ्या कोणाचं जाऊदे, प्रत्यक्ष आपल्या स्वत:च्या जगण्याला तरी भिडतो का आपण सच्चेपणाने?
आपल्या समोर आलेली परिस्थिती आहे तशी स्वीकारून आपण आपलं जगणं आपल्यासाहित सगळ्यांसाठी सोपं करू शकतो. मला वाटतं,जगता जगता आपलं आणि इतरांचं आयुष्य सुंदर बनवणं म्हणजेच तर ना अध्यात्म?

ईश्वराचा शोध! हा प्रत्येकाचा वेगळा आणि स्वत:साठीचा असतो. प्रत्यक्षात आपण काय करतो? तर इतर कोणाच्यातरी निष्कर्षावर आधारलेल्या खुळचट कल्पना कुठलीही चीकित्सा न करता मनाशी घट्ट धरून ठेवतो. ‘संसार’ ही ईश्वर शोधातल्या रस्त्यावरची सगळ्यात मोठी अडचण,असे कोणीतरी सांगितलेले अंतीम सत्य आहे असे मानून चालतो.
‘संसार’,‘माया’,’मोह’,’मोक्ष’ या शब्दाचेही असेच काहीसे ओझे आपल्यापैकी अनेकांच्या मनावर असते. असे काही शब्द ऐकून मनावर आलेले दडपण ना पेलवते,ना फेकून देता येते.
आपल्याला जगणे आवडते..आनंदी राहायचे असते. रोजचा उगवणारा दिवस अनेक आनंद,चिंता,काळज्या,व्यथा वेदना,लोभ,मोह,मत्सर,स्पर्धा सगळा तोचतोचपणा घेऊन येतच असतो की आपल्या पुढे..तो काही ‘माया’ म्हणून उगवायचा थांबत नाही. आणि ही सारी ‘माया’ आहे असे कितीही समजले तरी आपल्याला आतून आनंदी राहायचे असते..सुखी व्हायचे असते..सुखी होण्यासाठी या कशातही न अडकता जगता यायला हवे असेही सांगितले जाते..
असे निर्लेप होऊन जगायचे? खरंच असे ता येते? मनाला तर किती आणि काय काय हवे असते! सकारात्मक आणि नकारात्मक भावनांच्या विविध छटा आणि रंग सर्वसामान्य माणसांच्या जगण्याला व्यापून असतात. त्यानुसार लोक अभिव्यक्त होत असतात. खरेतर हा अगदी रोजच्याच जगण्याचा भाग असतो पण सो कॉल्ड लोक यालाही मायाच म्हणतात. पण ही जी काही माया आहे तिच्यामुळे आमचं जगणं सुंदर आहे ना! ती आवडतेय ना आम्हाला! प्रत्यक्ष जगतांना एखादी भावना अनुभवणे हेच मुळी जिवंत असल्याचे लक्षण नाही का?

पण मला वाटतं आपली चूक एखादी गोष्ट नीट समजून न घेतल्यामुळे होते. ‘अधात्म’ सुद्धा आपण चुकीच्या पद्धतीने समजून घेतो. परिणाम असा होतो की येणारे क्षण तर थांबवता येत नाहीत आणि मन मात्र अपराधीपणाच्या ओझ्याखाली दबून जाते. महाभारतातल्या, रामायणातल्या गोष्टींवरून काय समजते? कारण ते महाकाव्य म्हणजे इतिहासातील माणसांची आणि घटनांची मौखिक परंपरेतून आलेली बीजे आपल्या कल्पनाशक्तीने फुलवणारी कवी कल्पनाच होती. प्रत्येक गोष्टीतून,माणसांच्या जगण्यातून व्यक्त होणारे जगण्यातले विविध भाव आणि त्यांना स्पर्श करणारे वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तींच्या लोकांचे जीवन. रामायण,महाभारतातली वेगवेगळी पात्रं आपल्या आजूबाजूला आजही वावरतांना दिसतात! रामाची गोष्ट आपल्याला आवडते पण तरीही कृष्ण आपल्याला जास्त जवळचा वाटतो कारण पाप आणि पुण्य या नैतिक कल्पनांच्या समाजमान्य चौकटी पलीकडे जाऊन पोहोचणारे त्याचे चरित्र!  

अध्यात्म म्हणजे आयुष्याकडे,जगण्याकडे पाठ फिरवणं नाही तर जगण्यातल्या प्रत्येक अनुभवला निर्लेप मनानं सामोरं जाणं, म्हणजे कोणत्याही पूर्वग्रहांशिवाय तो स्वीकारणं मग तो अनुभव कोणा व्यक्तीबद्दलचा असो की परिस्थितीबद्दलचा. सजग राहून आपल्याला फक्त वर्तमानातला तो क्षण, तो अनुभव घेता यायला पाहिजे. तो घ्यावा कसा? यासाठी लोकांना रस्ता विचारणं यात काही चूक नाही पण केवळ परंपरेने घालून दिलेले आहेत म्हणून असे संकेत कोणताही प्रश्न मनात निर्माण न होता मान्य करणे हे स्वत:वरच अन्याय करण्यासारखं नाही का?
डोळसपणे आयुष्याकडे बघणे आणि मनातल्या प्रश्नांचा पाठपुरावा करतांना नको असलेल्या गोष्टींचं ओझं फेकून देण्याची हिंमत स्वत:मध्ये येणे हेच तर आपल्या ध्येयापर्यंत जाता जाता खरं शिकणं! चुकत,पडत,धडपडत, स्वत:ला जखमी करून घेत शिकण्यातून जे शहाणपण मिळतं ते माणसाला खऱ्या अर्थाने जगण्याचं समाधान देतं. आपल्या मनातल्या रूढ समजुतींना थेट तपासून घेण्याचं शहाणपण. आपल्या प्रश्नांची आपली आपण उत्तरं शोधण्याचं बळ या शिकण्यातून मिळते. आज आपल्या आजुबाजूचं जग इतकं मायावीपणे बदलत असतांना, माणसांच्या मनाचा,विचारांचा थांग शोधतांना आपल्यालाही थोडा चौकटी बाहेरचा विचार करता यायला हवाय. स्वत:बरोबरच इतरांचा देखील निर्लेपपणे विचार करता यायला हवाय. आपण फक्त स्वत:च्या जगण्याचा विचार करतो,आनंदाचे मार्ग केवळ स्वत:कडे वळवून घेतो. आपलं चुकतं ते इथेच! कारण आनंदाचा उगम आपल्या आत असतो तो अनेक अंगाने वाटांने विस्तारत खूप दूरवर जाऊन पोहोचला तर तो आनंद कितीतरी पटीत वाढतो. त्याला अनेक वाटा,उपवाटा फुटायला हव्यात. असे सहजतेने देता घेता येणारे आनंदाचे क्षण म्हणजे खरे अध्यात्म.

कबीराचे दोहे वाचता वाचता मनात असे असंख्य विचार आले.

वाचल्यानंतर काही आपल्याला समजतं,आवडतं, पटतं..आणि काही गोष्टी कधी कधी पहिल्यांदा वाचतांना समजतदेखील नाहीत.विचार सुरु होतात मात्र. कबीर जेव्हा वागण्यात, जगण्यात उतरेल तेव्हा पुन्हा नव्याने भेटेल कदाचित. अखंड चालणारा प्रवास आहे हा...!