मंगळवार, १४ एप्रिल, २०१५

ताडोबा: मनात रुजलेले जंगल!

चंद्रपूरहून ताडोबाकडे जातांना शहरी लोकवस्तीच्या खुणा मागे पडत गेल्या.जंगलाच्या मोठ्या दरवाज्यातून आत जातांना मन उगीचच सावध, सतर्क झालं! छोट्याशा गावातून, लाल मातीच्या रस्त्यावरून गाडीने आम्हाला आम्ही राहणार होतो त्या ठिकाणापाशी सोडलं. जंगल सफारीसाठी आम्हाला घेऊन जाणाऱ्या जिप्सी येण्याआधीच आम्ही सगळे आवरून तयार होतो. एका गाडीत सहाजण अशा आमच्या पाच गाड्या ताडोबा बफर झोनमध्ये शिरल्या. दुपारचे ऊन चटका देणारे आणि आम्ही जय्यत तयारीत गाडीत बसलेलो. डोळ्यासमोर उलगडत जाणारा रानातला रस्ता. आजूबाजूचा वेध घेणारी शोधक नजर. इतक्या उन्हामध्ये जवळच असलेल्या पाण्याच्या एका छोट्या स्त्रोताकडे ड्रायव्हर गाडी घेऊन निघालेला. सोबत लोकल गाईड. आमच्या गाडीत वन्य जीव अभ्यासक प्रमोददादा. तिथे जाऊन पोहोचतो तर काय आमच्या आधीच दोन-तीन गाड्या तिथे हजर. न बोलता त्यांनी केवळ हाताने खुण केली. त्या दिशेने नजर टाकली तर काहीच दिसेना. मनात कमालीची उत्सुकता. त्याच वेळी लालसर पिवळ्या गवताच्या मागे काही हालचाल जाणवली. आणि काही कळायच्या आत वाघोबाच्या तोंडाचा आकार गवतावर उमटला. क्षणभर हृदयातला ठोकाही थांबल्यासारखा झाला. घेतलेला श्वासही ऐकू येईना इतकी नजर एकवटली. तो होता वाघडोह, ताडोबातला सगळ्यात मोठा वाघ. दहा पंधरा फुटांवर. आजूबाजूला इतक्या जवळ असलेल्या गाड्या आणि फोटो काढण्याचे आवाज याचे काहीही सोयरसुतक नसल्यासारखी बेफिकिरी त्याच्या चेहऱ्यावर. गवतापाठीमागून तो आला आणि दमदार धीमी पावलं टाकत आमच्या समोरून पाण्यात उतरला. आता तो संपूर्ण दिसला. केवढा होता तो! त्याने जर मनात आणलं असतं तर क्षणात आमचं होत्याचं नव्हतं करण्याचं सामर्थ्य त्याच्यात होतं पण आत्ता कडक उन्हाने त्याच्या जीवाची घालमेल होत असावी. त्यानंतर तो पाण्यात बसून होता आणि आम्ही तळपत्या उन्हाची पर्वा न करता त्याच्याकडे बघत होतो. तसा तो बेपर्वा. आपल्यातच मग्न. अंगावर बसणाऱ्या माशांचा त्याला त्रास होत असावा. अधून मधून त्याची थंड हिरवी नजर आमच्याकडेही वळत होती. आता गाड्याही वाढल्या आणि आवाजही. तरीही तो शांत..असा तासभर तरी निघून गेला आणि अचानक वातावरणात बदल झाला. ढग गडगडायला लागले. बघता बघता पावसाचे टपोरे थेंब अंगावर पडायला लागले. त्याच्यावरची नजर हटवावी असे वाटत नव्हते. त्या पावसातही तो तसाच बसलेला. विजा चमकत होत्या. पावसाच्या थेंबांचे फटकारे वाढले तसे तिथून निघणे भाग पडले. डोळे भरून वाघडोहकडे बघून आम्ही निघालो. निघावेसे मुळीच वाटत नव्हते तरीही. समोरून पावसाचे थेंब जोरात लागत होते. विजांच्या कडकडाटात जंगलातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडणेच योग्य म्हणून आमची गाडी वेगात निघाली. बफर झोन च्या बाहेर आलो आणि पाऊस जवळजवळ थांबलाच. स्वच्छ गार हवा. आभाळ काळ्या निळ्या रंगात डूबलेले. लाल लाल पाऊलवाटा जंगलभर विखुरलेल्या. डोळ्यासमोरचा गाडी रस्ताही लांबवर काळा कुळकुळीत..अंघोळ केल्यासारखा! 
रस्त्यात काही पक्षी दिसत होते पण प्राणी एकही दिसला नाही. जणू हा दिवस फक्त वाघोबांसाठीचा राखीव होता! परतल्यावर प्रत्येकजण हेच बोलत होता. आमच्या सोबत अतुलदादा (अतुल धामणकर),प्रमोददादाही राहणार होते. स्लाईडशोची तयारी होत आली आणि पुन्हा जोरदार वारावादळ, पाऊस. रात्री डोळे मिटतांना कानावर दूरवरून येणारे जंगलातले आवाज लाईट आल्यावर कुलरच्या आवाजात गुडूप झाले आणि मिटल्या पापण्यांआड वाघाचे राजबिंडे रूप पुन्हा जागे झाले.





दुसऱ्या दिवशी पहाटे पाचलाच तयार होऊन गाडीत बसलो. आज आमची गाडी पुन्हा बफर झोन कडेच वळली. हवेत पावसाळी पहाटेचा सुखद ओला गारवा. रात्रीचा अंधार पांघरून आपल्यातच मिटून गेलेले जंगल विविध पक्ष्या प्राण्यांच्या आवाजाने नुकतेच कुठे जागे होत होते. पहाटेच्या त्या वातावरणात मन अलिप्त होत गेले आणि शरीराच्या प्रत्येक संवेदनेला डोळ्यांचे संवेदन मिळाले. किती डोळ्यांनी बघावे? निसर्ग आपल्या देखण्या रुपात साक्षात सामोरा. अशावेळी हातात काय उरते? सर्वांगाने त्याचाच एक भाग होणे! नि:शब्द शांतता. वातावरणात आणि मनातही तिचे झिरपणे. कालच्या पावसाचा ओलसर वास..जंगलाचा रंग तपकिरी करडा लालसर. काही झाडे पोपटी कोवळ्या पालवीने बहरलेली. जंगलातून वाट काढणारी लाल लाल मातीची अग्निरेखा. बाजूला गळून पडलेल्या मोठमोठ्या साग पानांचा थर..जमीन कुठे दिसतच नव्हती. आजही आमच्यासोबत प्रमोददादा. जंगलाबद्दल वाटणारी आत्मीयता त्याच्या प्रत्येक शब्दात.
उष्ण कटिबंधीय पानगळ प्रकारात मोडणाऱ्या ताडोबा जंगलाचे ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य असे दोन भाग पडतात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील हा सगळ्यात मोठा प्रकल्प. घनदाट जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांचा तारू किंवा ताडोबा नावाचा देव. त्यावरून या जंगलाचे नाव ताडोबा पडले. याचा सुमारे ८५% भाग हा अतिसुरक्षित आहे. साग,बांबूची आणि मोहाची झाडे नजर जाईल तिकडे सगळीकडे दिसत होती. मोहाच्या फुलांचा गोडसर वास आसमंतात. पक्षांचे जग जागे झालेले. त्यांचे वेगवेगळे आवाज आणि रंग. आज सगळ्यात आधी दिसला तो रानकोंबडा..आपल्या कोंबड्यापेक्षा कितीतरी मोठा. त्याचा रंग तोच पण आवाज खूप वेगळा. रंग, गंध आणि नादाचे जग आजूबाजूला जागे होत होते. अधूनमधून कैऱ्यांनी भरगच्च लगडलेले आंब्याचे झाड दिसत होते. धावडा,ऐन,काटेसावर,हिरडा ही झाडे तर होतीच शिवाय पळसाच्या लाल नारंगी फुलांनी आणि अमलताशच्या पिवळ्याधमक फुलांनी जंगल खुलून दिसत होते. एका झाडावर बसलेला मोर आणि त्याचा भला मोठा पिसारा दुरूनच दिसला. जवळ गाडी जाते तोच त्याने हवेत मारलेला झोकदार सूर आणि त्याचे इतक्या उंचावरून सहजतेने उडणे आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदाच बघितले. अनेक मोर दिसले आणि लांडोरीही. एक मोर तर आपला संपूर्ण पिसारा फुलवून उभा असलेला दिसला पण आमची चाहूल लागताच त्याने इतक्या पटकन पिसारा मिटून घेतला की एका क्षणभरातच ते सौंदर्य नजरेआड झाले. जंगलातून फिरतांना संपूर्ण जंगल आपल्याशी बोलत असते. इथे प्रत्येक क्षणाचा अनुभव फक्त आणि फक्त एकदाच घेता येतो. जंगलातले चैतन्य हा सर्वांगाने घेण्याचा अनुभव आहे. म्हणून सतत सावध असणे आणि सावधपणे त्या समोरच्या क्षणाचे साक्षी होणे ते ही अतिशय अलिप्तपणे, हे पण खरंच जंगलाकडूनच शिकायला मिळते.
जंगलात आणखी आत शिरतांना बाजूने वेढलेली घनदाट झाडी आणि उलगडत जाणारा गाडी रस्ता. सारे काही थेट मनाला आत येऊन भिडते. कालच्या वादळी पावसाच्या खूणा जागोजागी. झाडाच्या फांद्या तुटून पडलेल्या तर काही ठिकाणी संपूर्ण झाडेही. गाडीला रस्ता बदलावा लागत होता, नवीन तयार करावा लागत होता तर काही ठिकाणी गाईड आणि ड्रायवर मिळून फांद्या बाजूला करून मार्ग मोकळा करत होते. विविध पक्षी दिसत होते आणि त्यांची माहिती लगेच समजत होती. पाण्याच्या तलावाजवळ जाऊन पोहोचलो तर कितीतरी पाणपक्षी रंग,रूप आकाराचे.
उघड्या चोचीचा करकोचा बघून तर निसर्गातल्या जैवसाखळीची कमाल वाटली. निसर्गाने प्रत्येकालाच काही न काही दिलेलं आहे. आपल्याला मिळालेल्या वैशिष्ट्याचा वापर जगण्यासाठी करून घेण्याची बुद्धीही. तसं तर निसर्गाने आपल्यालाही ते वैशिष्ट्य दिलंय. पण आपणच ते हरवलंय. कारण आपण सोडून बाकी सर्व सजीव अजूनही निसर्गाशीच प्रामाणिक आहेत म्हणून ते निसर्गाच्या जवळ आहेत आणि आपल्याला आज गाडीतून निसर्ग बघावा लागतोय.
बाजूच्या झाडीतल्या गवतात आकार उमटल्याचा भास तर सारखा होत होता. कधी त्यातून एखादा नर सांबर सामोरे येई तर कधी चितळ,चौशिंगा आपला कळप सांभाळत. कान टवकारून आमच्याकडे बघून पुन्हा जंगलात पसार.लंगूर माकडे तर जागोजागी. आम्हाला तर मादी लंगुरांचा ग्रूपच भेटला पोटाशी आणि आजूबाजूला बागडणाऱ्या पिल्लांसाहित. काळ्या तुकतुकीत चेहऱ्यावर कुतूहल संभ्रम आणि पोटाशी चिकटलेले पिल्लू तर चक्क हसत असलेले!





त्या दिवशीची दुपार अशीच उलघाल उन्हाची. आता आमची गाडी निघाली ताडोबाच्या कोअर जंगलात. लांबलचक रस्ते आणि दुतर्फा बांबूची अनेक झाडे,एकमेकात गुंतलेली. जंगलाच्या अस्तित्वाचे अनेक रंग आणि अनेक छटा. बाजूच्या कुरणात रानगवे दिसले चरतांना..आपल्याच मस्तीत. अवाढव्य आकार आणि बेदरकार नजर. मनात आणलं तर क्षणात परिसर उलटापालटा करण्याची ताकद अंगात. पण कोणताही प्राणी अगदी वाघसुद्धा आपल्याच नादात, विश्वात मग्न असतो. आपल्या गरजेपलीकडे दुसऱ्या कोणात त्यांची कधीही लुडबुड नसते. 
उन्ह सावलीची जाळी अंगावर झेलत आम्ही जंगलातल्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेत होतो. सांबर, चितळ, नीलगाय अधून मधून दिसतच होते. एका पाणवठ्याजवळ सकाळी एका गटाने वाघ बघितला होता. तो आत्ताही तिथेच असल्याचे संकेत इतर प्राण्यांच्या कॉल्सवरून मिळतही होते.
खरंतर हे सगळं जंगलातलं एक नाट्यच आहे. नुसत्या आवाजानेही जंगल आतून किती सतर्क आहे याची जाणीव करून देणारं. आपणच या सगळ्यात उपरे,त्रयस्थ. असे असले तरी जंगल आणि हे सगळे प्राणी अबाधित राहिले तरच माणूस टिकून राहील हे ही तितकेच सत्य आहे.
त्या दिवशी पुन्हा वाघ दिसला नाही. संध्याकाळी ठरलेल्या वेळी मागे परतावेच लागले. मावळतीचा सूर्य जंगलातल्या पाना फुलांना हलकेच स्पर्श करत जमिनीवर उतरलेल्या सावल्यांना
आणखी गडद करत होता.
अतुलदादाचे अनुभव ऐकणे आणि त्याने काढलेले फोटो बघणे हा एक वेगळाच अनुभव आहे. जंगल माणसाला किती आणि काय देऊ शकते याची कल्पना येते. वाघ टिकला तर माणूस टिकेल हे त्याचे म्हणणे त्याच्या बोलण्यातून उलगडत जाते. त्याच्या बोलण्यातून आणि त्याने टिपलेल्या क्षण चित्रांमधून निसर्गाचे एक वेगळेच रूप आपल्याला भेटायला येते.
आपली समज आणि आपली दृष्टी विस्तारण्याचे श्रेय या वन्यजीव अभ्यासाकांचेच!
पुढच्या दिवसाची पहाट. ह्या ट्रीपमधली ही शेवटची सफारी. कोलसारेंज मधल्या कोअर जंगलात.
सगळ्या वातावरणात जंगलाचा नाद. जणू सारे जंगलच आपल्यासोबत निघालेले. झाडं, पानं, ढग आणि वाराही. जंगलाचा गंध लपेटून आपण एकाग्र. मंत्रमुग्ध. मनाचा टीपकागद नकळत अनेक गोष्टी टिपून घेतो. स्वच्छ मोकळ्या हवेतला ताजा श्वास. खोल खोल देहात झिरपत जाणारा गारवा. वाऱ्यावर लहरत जाणारे पानच होऊन जातो आपण! इतके हलके होत जंगलाचा एक भाग होऊन जावं इतरांसारखंच आपणही, असं वाटायला लागतं आतून.
अनेक पक्षी दिसतात. काही आता ओळखू यायला लागले आहेत. दूरवरून टकाचोर साद घालतोय.
उंच झाडांच्या बेचक्यातून सूर्याचा तांबूस लाल गोळा हलकेच वर आला. थोड्याच वेळात सगळा आसमंत लालसर पिवळ्या सोनसळी रंगात न्हाहून निघाला. निलपंख आणि मोर तर आज जागोजागी दिसत होते. भरारी घेतांना निळ्या पंखांचे अद्भुत लावण्य क्षणभर दिसे. पक्षांची, फुलपाखरांची एक वेगळीच दुनिया आहे. प्रत्येक सजीवाचं अस्तित्व एकदुसऱ्यावर अवलंबून. म्हणून त्याचं असणं आणि टिकून राहणं महत्वाचं. सांबर, चितळ, नीलगायी, रानगवे कळपाकळपाने तर कधी एकटेदुकटेही दिसत होते. जराशा उतारावरून जातांना समोरचा दुतर्फा झाडांचा रस्ता बघून कुणा चित्रकाराने काढलेल्या चित्रात नकळत सदेह शिरल्याचा भास व्हावा.


जणू कॅनव्हासवर जिवंत झालेला निसर्ग! झाडांच्या पाठीमागून झिरपणाऱ्या सूर्यप्रकाशाने सोनसळी झळाळून गेलेला रस्ता. रम्य, आनंदी आपल्यावरच लुब्ध होऊन दोन्ही हात पसरून आपले  स्वागत करणारे जंगल समोर. मन हरखून गेले..इतक्यात दूरवर एक गाडी रस्त्यात थांबलेली दिसली म्हणून आम्ही घाईत तिथे पोहोचलो तर समोरच एक जंगली कुत्रा होता. आजूबाजूला बघितले तर बाजूच्या झुडूपांमधून सहा सात आणखी आकार उमटले. आम्ही सर्व अगदी शांत, स्तब्ध. सगळी मंडळी रस्त्यावर आली. थोड्यावेळ रेंगाळून हळूहळू पुन्हा झुडूपात दिसेनाशी झाली.

पुन्हा एका पाणवठ्याजवळ चार पाच गाड्या उभ्या होत्या तिथे येऊन थांबलो. छोटंसं तळं. बाजूने झाडी. वाघोबांची वाट बघितली पण त्यापेक्षाही समोर दिसणारं दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं इतकं सुंदर होतं. अनेक पक्षी ये-जा करत होते. इतकं शांत आणि प्रसन्न वाटत होतं की तो क्षण संपूच नये. पण परतावं तर लागणारंच.
आम्ही परतलो. निसर्गाचे जमतील तेव्हढे विभ्रम डोळ्यांच्या आणि कॅमेऱ्याच्या चौकटीत आम्ही पकडले खरे. पण निसर्गाची हाक आता थेट हृदयातच रुजली आहे! ती वेळोवेळी साद घालेल, हिरवाईच्या अनेक छटा लेवून गवताची पाती मनावर उमलून येतील आणि पावलांना लाल मातीच्या रंगाचा मोह पडेल.