प्रश्नांना उत्तरेही असतात
“तुला
काय सांगू, दिवसाचे सोळा सोळा तास ड्युटी करून घरी आले तर घरातल्या
लोकांची तोंडं वाकडी. तुला माहितीये ना नोकरी करण्यावरून झालेलं
महाभारत? आता तर घरात कोणाला करोना झाला तर तो माझ्याचमुळे होणार
आहे, कारण मीच एकटी बाहेर जाते ना.” मैत्रिणीच्या
बोलण्यातला वैताग,राग पोहोचत होताच, शिवाय
तिच्या घरातले वातावरण, प्रत्येकाच्या मनावर आलेला ताण तोही समजत
होता. “माणसं मुळातून वाईट नाहीयेत ग, पण
संधी आहे तर आत्ताच राजीनामा दे म्हणून मागे लागले आहेत, काय
करू?” अर्थात काय करायला हवंय हे तिचं तिलाही समजत होतंच पण बाहेर
आणि घरात परिस्थितीमुळे निर्माण झालेला ताण ह्याक्षणीतरी तिला असह्य झाला होता.
सध्याच्या परिस्थितीत जुन्या प्रश्नाने उचल घेतली होती. एका जबाबदारीच्या पोस्टवर काम करणाऱ्या आपल्या जवळच्या व्यक्तीला मनात निर्माण
झालेल्या भीतीचा आधार घेऊन ऐन मोक्याच्या क्षणी घरातल्या लोकांनीच कॉर्नर केल्यावर
तिने काय करायचं?
आठ वर्षांपासून
एका सोसायटीत राहणारे आजी-आजोबा, कोणाशी कधी बोलले नाहीत. कोणाकडे कधी गेले नाहीत. त्यांच्याकडे येणारी फक्त त्यांची
मुलगी आणि जावई. अचानक चेअरमनला फोन करून रडत सांगतात
“आमच्याकडे बघायला कोणी नाही, आम्ही खूप जास्त
आजारी आहोत, आमची मुलगी येत नाही, आता आम्हाला
फक्त आत्महत्याच पर्याय दिसतोय” सगळी सोसायटी हादरते.
करायचं काय? आजारी आहेत म्हणजे करोना तर नाही?
मुलगीही येत नाही म्हणजे तसे असण्याची शक्यता. मुलगी का येत नाही तर म्हणे जावई तिला आता येऊ देत नाही. मुलगी वारंवार केलेले फोन कट करत राहते, करोनाचा संशय
आणखी वाढतो. त्यांना धीर दिला जातो, काय
करता येईल यावर विचार-विनिमय होतो. शेवटी
जावयाच्या फोनवर मेसेज करून निरोप ठेवला जातो की “ आम्हाला आलेल्या
फोनमुळे आणि तुम्ही फोन उचलत नसल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला हलवण्यापूर्वी आम्ही पोलिसांची
मदत घेण्याचा विचार करतोय आणि तुमचे नंबर पोलिसांना नाईलाजाने द्यावे लागत आहेत”
पुढच्या पाच मिनिटात जावयाचा फोन येतो आणि पुढची सूत्र पटापट हलतात.
आजोबा म्हातारपणामुळे आजारी असतात आणि आजी त्यांचं एकटीने करून दमल्यामुळे
त्रासलेल्या असतात. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झालेला
ताण त्यांना या टोकाकडे घेऊन आलेला असतो.
आजूबाजूच्या
बदलत्या परिस्थितीतून निर्माण झालेले अनेक लहान-मोठे प्रश्न,समस्या,ताण आणि त्यावर मार्ग शोधण्याची प्रत्येकाची आपल्यापरीने चाललेली धडपड असे
सध्याचे सामाजिक,कौटुंबिक चित्र समजण्यासाठी ही दोन उदाहरणे प्रातिनिधिक
आहेत. अनेकांच्या आयुष्यात आधीचेच अनुत्तरित प्रश्न आहेत. गेल्या पाच-सहा महिन्यांमध्ये आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनेक
लहानमोठ्या घडामोडी,बदल वेगाने घडत आहेत.आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीचा सामना करतांना आपण ना तिच्यापासून
पळून जाऊ शकत, ना तिचा संपूर्ण प्रतिकार करणे आपल्या हातात आहे.
मग हातात काय आहे? तर परिस्थितीशी जुळवून घेऊन आपल्या कुवतीप्रमाणे, जवळ असलेल्या कौशल्यांचा योग्य वापर करून मार्ग काढणे.
प्रत्येकासमोरची आव्हाने,समस्या वेगळ्या असल्या तरी त्यासाठी आपल्या प्रत्येकाकडे असलेल्या आर्थिक,सामाजिक,व्यक्तिगत क्षमताही वेगवेगळ्या
आहेत, मानसिकता वेगवेगळ्या आहेत. सगळ्या बाजूंनी निर्माण झालेला परिस्थितीमुळे
असलेला हा अनिश्चिततेचा ताण हाताळण्यासाठी नेमके काय करायचे याच्या
जैविक,आदिमप्रेरणा आपल्या मेंदूत नक्कीच
आहेत.
सुरवातीची घाबरण्याची, अतिकाळजीची, जीव एकवटून गोळा केलेल्या उत्साहाने आणि शोधलेल्या कल्पक मार्गांनी एकमेकांना
धीर देण्याची आणि घेण्याची जागा आता प्रत्यक्ष जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीने
घेतली आहे. तरीही काहीजण अजूनही स्तंभित आहेत काही हतबल,अगतिक,असहाय होऊन टोकाची पावलं उचलत आहेत. आपण आणि आपल्या जवळच्या
नात्यांचा विचार करणे, त्यांना प्राथमिकता देणे काहीवेळा स्वार्थाकडेही
झुकल्यासारखे वाटतेय. तर अनेकजण स्वतःबरोबरच इतरांना मदत करण्यासाठी
धडपडत आहेत. प्रत्येक दिवसाचे नव्याने व्यवस्थापन करतांना प्रत्येकाला
वेगवेळ्या आघाड्यांवर काम करावे लागते आहे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भावनिक,मानसिक,शारीरिक आव्हानांचे प्रश्न आता खऱ्याअर्थाने सामोरे
आलेले आहेत. ते कोणा एकट्याचे नाहीत तर आपल्या सगळ्यांचे,
संपूर्ण समाजाचे आहेत.
एकाच कुटुंबातल्या व्यक्ती सोडल्या तर एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवणं,स्पेस जपणं हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे, पण सतत एकमेकांसोबत राहून त्यांच्या मानसिक स्पेसवर तर आपल्याकडून अतिक्रमण
होत नाहीये ना? हेदेखील समजून घ्यायला हवंय. कोणतीही गोष्ट ‘अति’झाली की येणारं नकोसेपण, परिस्थितीबद्दलची हताशा,
अपरिहार्यता शेअर करण्यासाठी सध्या एकमेकांच्या प्रत्यक्ष समोर आहेत
फक्त घरातली लोकं, मग मनात साचलेल्या गोष्टींचा निचरा करतांना
होणारी भांडणं, कुरबुरी,ताणली गेलेली नाती, एकूणच आलेला उबग,कंटाळा,ताण,घुसमट याचं नेमकं काय
करायचं हे न समजल्यामुळे शाब्दिक,मानसिक आणि काही ठिकाणी शारीरिक तोलही सुटतो आहे. आक्रमकता,हिंसा वाढते आहे. मनात उमटणाऱ्या अशा अस्वस्थतेची योग्य ती दखल वेळीच घेतली नाही तर मनावरचा
ताण असह्य होऊन वागण्यावारचे नियंत्रण गमावून स्त्रियांवर, मुलांवर,वृद्ध व्यक्तींवर, काही ठिकाणी पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांच्या
अनेक घटना सध्या समोर येत आहेत. परिस्थितीवर तर राग काढता येत
नाहीये मग तो व्यक्तींवर, वस्तूंवर आणि अगदी स्वतःवरदेखील काढला
जातोय. हा ताण कमी करण्यासाठी नेमके
काय करायला हवे, हे समजून घेता येईल.आपल्या प्रत्येकाचे मन आणि शरीर निर्माण झालेल्या परिस्थितीशी अनुकूल
राहण्यासाठी प्रयत्न करत असते.
त्यासाठी मनावर काहीप्रमाणात असलेला ताण हा मदत करणाराही असतो,मार्ग काढणारा आणि आवश्यक असणारा असतो. मग अतिरिक्त असलेला आणि अनावश्यक ताण वाढतो कसा? तर तो आपणच केलेल्या अतिविचारांनी
वाढत जातो. ‘अनावश्यक ताण’ आहे हे कसे ओळखायचे? तर त्यामुळे आपल्याला कोणताही त्रास जाणवत असेल तर.
वर सांगितलेल्या मैत्रिणीच्या घरातल्या लोकांना “आपल्याला करोना होईल” अशी भीती वाटली तर तो आवश्यक ताण
असेल कारण त्यामुळे करोना होऊ नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली जाईल, पण त्यांना “तिच्यामुळे करोना होणारच आहे” असे वाटून त्यांच्याकडून तिच्यावर काही निर्णय घेण्यासाठी दबाव आणला जात आहे
तिथे तो ‘अनावश्यक’ ताण तयार झाला.
आजी-आजोबांच्या केसमध्ये त्यांना करोना झालाय या
भीतीमुळे त्यांचा जावई ऐन त्यांच्या आजारपणात त्यांच्या मुलीला स्वतःच्या घरी जायला
अडवतो आहे,हे वागणे अनावश्यक ताणाच्या प्रभावाखाली आहे.
तर या प्रसंगामुळे कोणाला “म्हातारे झाल्यावर आपली
मुलं आपल्याशी अशी तर वागणार नाहीत ना?” असा मनात सतत उगीचच येणारा
विचार अनावश्यक ताण आणि समस्या वाढवणारा असतो. अशावेळी मनातले विचार आणि भावना वेळीच तपासल्या नाहीत तर आपल्या वागण्यातून त्याचे प्रतिबिंब
दिसायला लागते. प्रसंगानुरूप
वेगवेगळे विचार मनात येणे स्वाभाविक आहे आणि त्यांना अनुसरून वाटणाऱ्या आणि एरवी आपण
ज्यांना नकारात्मक समजतो त्या भावनादेखील नैसर्गिक आहेत. पण त्यांचं
अधिक काळ मनात रेंगाळणं,आणखी भर घालून आपलं त्या जास्त काळ चघळणं
यातून येणारा ताण हा त्या व्यक्तीचे आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या माणसांचे नुकसान
करणारा असतो, नातेसंबंध बिघडवून आयुष्यातला आनंद घालवून टाकणारा
असतो. व्यक्तीच्या सवयी,स्वभाव आणि व्यक्त
होण्याचे मार्ग आणि दृष्टीकोन आपल्याबाजूने ताणात भर टाकत असतात. लहानपणापासून ज्या वातावरणात आपण वाढलो त्याचे, कुटुंब,समाज,शाळा,व्यवसाय अशा घटकांमधील
विविध अनुभव,व्यक्तींचे प्रभाव त्यावर असतात. ते इतके सवयीचे होतात की त्यातून घडणारा तोच ‘आपला मूळ
स्वभाव’ असा समज करून घेऊन आपण ते स्वीकारलेले असतात.
पण आता लक्षात आलेच असेल की कोणाचाही स्वभाव,वृत्ती
या जन्मजात नसतात. मनावरच्या अनावश्यक ताणाचे 'नियमन' करता येते त्यासाठी स्वतःला प्रतिप्रश्न विचारून
तो त्रासदायक का आहे हे समजून घेता येते, स्वतःचे स्वतःला करणे
अशक्य होत असेल तर प्रत्येक पावलावर आपल्याला मदत उपलब्ध असते. घटनांचे,प्रसंगांचे आणि व्यक्तींचे मूल्यमापन करण्याचे
अनेक विवेकी पर्याय, पद्धती उपलब्ध आहेत. त्रासदायक ताणातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणं ही एकदाच करून भागेल अशी गोष्ट
नाही. तो आपल्या स्वभावातील सातत्याचा आणि सरावाचा भाग बनायला
हवा. तर सवयी बदलतील आणि स्वभावही बदलेल. कारण आत्ता आपल्यासमोर असलेल्या परिस्थितीत जगण्याची आव्हाने कितीही कठीण आणि
प्रखर असली आणि संकटांमुळे पुढचा रस्ता कितीही अंधुक,धूसर दिसत
असला तरी आपल्याच अंतर्विश्वात
स्वतःमध्ये त्यासाठी अनुकूल बदल घडवून आणण्याच्या असंख्य क्षमतादेखील आहेत,
हे विसरून कसे चालेल?
© डॉ अंजली औटी
(फोटो : गुगल)
लेख : दै. म टा 'मैफल पुरवणी'