चौकटीबाहेरची ऑनलाईन नाती...
फेसबुकवरच्या ओळखीतून सुरवात होऊन आता आम्हाला एकमेकांविषयी इतकी ओढ वाटतेय की गेल्या दोन महिन्यांपासून त्याने अचानक माझ्याशी बोलणं थांबवलंय याचा मला आता प्रचंड त्रास होतोय. तो ऑनलाईन इतरांशी बोलतोय हे जाणवते मग माझ्याशीच का नाही? माझं सगळंच बिघडलंय,खूप दडपण,भीती वाटतेय. या अस्वस्थतेचं उत्तर त्याच्याकडे नाही, तुझ्याचकडे आहे हे लक्षात येण्यासाठी तिच्या अस्वस्थ मनाला किती वेळ लागेल?
तिच्यासारखीच अजून एक, प्रत्यक्ष एकदाही न भेटलेल्या आपल्या व्हर्चुअल मित्राला त्याने पाठवलेल्या व्यक्तीजवळ एक लाख रुपये कॅश सहजतेने देते आणि यात तिला रिस्क नाही तर निरपेक्ष प्रेमाची खात्री वाटते.
यासारख्या समस्यांमधल्या स्त्रिया भाबड्या,अनुनभवी,अशिक्षित असतात का? अजिबातच नाहीत. पण तरीही जाणता-अजाणता अनेकींच्या आयुष्यात डोकावणारी व्हर्चुअल नात्यांमुळे त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यातला ताण वाढतांना दिसतोय.
भरपूर वेळ,श्रम आणि परीक्षा बघणाऱ्या खऱ्या नात्यांना न्याय देतांना मनात साचत गेलेले नकोसेपण,हतबलता,नकार,अवहेलना, भावनिक- मानसिक पोकळी या व्हर्चुअल नात्यांनी भरून निघते.
कधी केवळ वेळ चांगला जावा,विरंगुळा,चेंज मिळावा असेही अनेकींना वाटते.
वैचारिक देवाणघेवाण,मैत्रीचा हा ऑनलाईन अनुभव हवासा वाटतो. खऱ्या जगण्याला समांतर चालणारे आभासी जग आणि इतरांसोबत असलेले नातेसंबंध याचा मानसिक आधार वाटतो.
संवादाची सुरवात वैचारिक पातळीवर झाली तरी अनेकींच्या बाबतीत अशी नातीही आदिम शारीर प्रेरणांपर्यंतच येऊन पोहोचलेली दिसतात.
आभासी जगातल्या स्त्री-पुरुषांच्या मनातल्या मूळ गरजा, इच्छा,आकांक्षा,वासना स्वप्नं,प्रेरणा खऱ्या असतात. सामाजिक दडपणातून किंवा हिंमत नसल्यामुळे लपवलेल्या,दाबून ठेवलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली की हमखास वर येतात. एकमेकांचे खाजगीपण जपण्याची हमी मिळाली की अत्यंत उत्कटतेने,मोकळेपणाने व्यक्त होणाऱ्या या भावनांमध्ये गैर काय? असाही युक्तिवाद लोक करतात.
अनेकदा असे जाणवते की बहुतेक स्त्रियांची गरज मुख्यत्त्वे मोकळ्या मैत्रीची,सोबतीची असते. मैत्रिणींपेक्षा एखादा छानसा मित्रच तिला अधिक भावतो. कारण तो तिला उगीचच जज करत नाही, पावलोपावली टोकत, लेबल्स लावत नाही, तुलना,स्पर्धा यापलीकडे जाऊन तिला समजून घेऊ शकतो. स्त्रिया मनमोकळेपणाने असे नाते स्वीकारतांना दिसतात.
मनाचा ताबा घेणारी प्रेमासारखी प्रभावी भावना व्हर्चुअल जगात अधिक मोकळेपणाने व्यक्त केली जाते. जगण्याच्या संघर्षात 'प्रेम'अनुभवण्याचे निसटून गेलेल्या अनेकांना
आयुष्यात स्थैर्य आलं की एरवी लक्षातही न येणाऱ्या पोकळ्या जाणवायला लागतात. प्रेम ही मानवी मनाची अत्यंत मूलभूत गरज. आपल्यावर कोणीतरी प्रेम करावे किंवा आपण कोणावरतरी प्रेम करावे असे वाटण्यात वय हा मुद्दाच गौण ठरतो.
कोणत्याही वयात प्रेमात पडल्यावर व्यक्तीला सोळाव्या वर्षात आहोत असेच वाटते. प्रेमात फसण्यासाठी, अविवेकी वागण्यासाठीही वयाची अट नाही. एरवी अनुभवी, परिपक्व वाटणाऱ्या व्यक्तीही स्वतःच्या मनातल्या भावना ओळखण्यात,हाताळण्यात फसू,चुकू शकतात.
"दमलीस?" या एकाच शब्दावर अनेकींची सपशेल विकेट पडते. अजूनही आपण सुंदर,आकर्षक दिसतो, या सुखवणाऱ्या भावनेतही अडकायला होते. मनावर फिरलेले प्रेमाचे मोरपीस जगणे सुंदर,रंगीबेरंगी करून टाकते. त्यासाठी आभासी माध्यमांचा अत्यंत कल्पक वापर अनेकांकडून केला जातो. वयाच्या पस्तिशीनंतर काही कारणांनी मनातून एकट्या पडलेल्या स्त्रिया या भूल-भुलैय्यात जोरदार अडकतात.
नवख्या,अनुनभवी स्त्रियांना तर हे संपूर्ण जगच मोहात पाडते. यातली मजा आणि थ्रिल अनुभवण्यासाठी पुढे जाण्याचा निर्णय मात्र त्यांचाच असतो.
सोशलमाध्यमांपासून सुरू झालेली मैत्री खाजगी होऊन आपली माहिती,नंबर,फोटो,व्हिडीओ यांचीही देवाणघेवाण होते. एरवी शारीरिक गरजेचा उच्चार, स्वीकार आणि उघड अपेक्षा करणे यासाठी समाज आणि परंपरांची बंधने व्यक्तींवर असतात. समाज म्हणून ती गरजेचीही आहेत परंतु बंधने, नियम जितके कठोर तितक्याच पळवाटाही मग शोधल्या जातात. आपल्या सामाजिक धारणेनुसार पकडला गेलेलाच गुन्हेगार ठरतो,आणि काही उघडकीस येत नाहीत तोपर्यंत सगळेच साव असतात,सगळीच कृत्ये नैतिक असतात.
एकमेकांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न केले जातात. अनेक दावे, छातीठोक विधाने केली जातात. मग या नाही तर त्या निमित्ताने बोलण्यातले वैचारिक विषय वैषयिक होत जातात. सेक्सविषयीच्या व्यक्तिगत आवडीनिवडींबद्दलही बोलले जाते.
सेक्सटिंगचा अनुभवही एकदम वेगळा,उत्तेजक वाटतो.
एकमेकांवरच्या विश्वासाची हमी कायम टिकली तर गुपचूप आणि स्वखुशीने इथे अनेक ऑनलाईन मनोव्यापार चालतात.
प्रत्यक्षात काही करत नसल्यामुळे यात कोणाची फसवणूक,प्रतारणा नाही,असा मनाचा समज असतो.
कोणी आनंद कशातून मिळवावा, ही प्रत्येकाची अत्यंत वैयक्तिक गोष्ट. जोपर्यंत मर्यादा ओलांडली जाऊन कोणाला त्रास झाला नाही तर तो टिकतो सुद्धा. पण अनेक केसेसमध्ये ही मर्यादा ओलांडली जाते आणि व्हर्चुअल नात्यांमुळे प्रत्यक्ष आयुष्यात गोंधळ,
भांडणे,गुंतागुंत,समस्या निर्माण होतात.
आभासी जगातील दुःख,वेदना तर काही आभासी नसतात, खऱ्याखुऱ्या असतात. तोंड दाबून सहन कराव्या लागतात. प्रत्यक्ष आणि आभासी मधला तोल सावरण्यापलिकडे गेला की मनाचा बांध वेडावाकडा फुटतो. त्यामुळे आत्यंतिक मानसिक,शारीरिक ताणाला सामोरे जावे लागून अनेकांना त्यातून सावरण्यासाठी वैद्यकीय मदत घ्यावी लागते.
अनुभवी, शहाणी माणसे मोठ्या वयातही का फसतात? याची कारणेही वेगवेगळी असतात.
एकच कारण मात्र सगळ्यांमध्ये समान दिसते ते म्हणजे करतांना सगळे कळत असले तरी वेळेवर ते वळत अजिबात नाही. म्हणून आपण फसलो असे कितीही म्हटले तरी तीदेखील स्वतःच स्वतःसाठी केलेली निवड होती,याचा विसर पडतो.
एखाद्याच्या मैत्रीआड असलेले छुपे हेतू अनेकींच्या लक्षात फसल्यावरच येतात.
असे फसणे केवळ शारीरिकच नसते तर अनेक प्रकरणांमध्ये स्त्रिया स्वतःचे फार मानसिक अवमूल्यन करून घेतात.
यातल्या प्रत्येक टप्प्यावर सावध राहणे आणि मागे फिरणे शक्य असते पण 'आभासी'मधली जबरदस्त किक मोहात पाडते. माणूस आपल्याच सवयींच्या जाळ्यात अडकतो,आवड व्यसनात बदलते.
प्रत्येकवेळी समोरच्या व्यक्तीचे हेतू वाईट,फसवण्याचेच असतात असेही नसते.
मन भरल्यांनंतर त्यांनी फक्त सहजतेने गीअर चेंज केलेला असू शकतो. मूळ गरजच नात्यांचे वैविध्य असू शकते. कोणी आपल्याशी सतत बोलायलाच हवे यात अवास्तव मागणी आहे,हट्ट आहे.
अनेकांच्या आयुष्यात अनेक संघर्ष,वेदना असू शकतात. त्यांच्या गरजा त्याप्रमाणे बदलत जातात. म्हणून अमूक एक 'चांगले म्हणून नैतिक आणि अमूक एक 'वाईट' म्हणून अनैतिक असा ठोकळेबंद विचार ना लोकांच्या बाबतीत करता येत ना त्यांच्या वागण्याच्या बाबतीत करता येत.
सगळे वाईट अनुभव फक्त स्त्रियांनाच येतात, असेही अजिबातच नाही. पण स्त्रिया यासारख्या अनुभवांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त भरडल्या जातात. स्त्रियांसाठी असलेली पारंपरिक सामाजिक चौकट अजूनही आखीव, पुरुषधार्जिणी आहे.
काही घडले तर पुरुष सहज सुटका करून घेतात आणि त्यातला दोष बऱ्याचदा स्त्रियांकडे येतो. स्त्रियांचे वागणे,बोलणे, दिसणे,कपडे घालणे यावर लगेचच टीकात्मक बोलले जाते. स्त्रियांचा अपमान,नुकसान झाले अशा प्रसंगातही दोष,वाभाडे अनेकदा तिचेच काढले जातात.
खरंतर मुद्दा स्त्री आणि पुरुष किंवा स्त्री विरुद्ध पुरुष असा नसतोच,नाहीही.
मुद्दा आहे आपल्याच मनातल्या भावनांचे आणि विचारांचे योग्य नियोजन करू न शकण्याचा. विचार आणि कृती यांचे भान येण्यासाठी मनातला विवेक जागा हवा.
स्वतःच्याच भावनांची योग्य जाण आणि भानही हवे. त्यांची पूर्तता करण्याचे रास्त पर्याय ओळखायला हवेत.
कारण आपली समज, बुद्धी वाढवणारे आणि अनुभवांच्या कक्षा विस्तारणारे अनुभव येथेही येऊ शकतात. आभासी जगही खऱ्या माणसांच्याच भावभावनांवर स्पंदणारे आहे. कधी इथे जीवलग मित्र-मैत्रिणी मिळतात तर कधी कोणतेही नाव नसलेले पण मैत्रीपलीकडचे भाव मनात उमलवणारे सुंदर,उस्फुर्त नातेही जोडले जाते. एकमेकांची स्पेस सांभाळून आधार,आनंद देण्याइतके ते समंजस आणि शहाणेही असू शकते. वैचारिक,भावनिक आणि मानसिक पोषण करण्याइतकी निरोगी, एकमेकांची वाढ करणाऱ्या चर्चा,संवाद त्यात घडू शकतो. मनाची माती सुदृढ,सुपीक, सक्षम बनत जाते.
अशा नात्यांना मुद्दाम इतरांपासून लपून राहण्याची,खाजगीपण सांभाळण्याची गरज नसते आणि मुद्दाम स्वतःची जाहिरात करत मिरवण्याचीही गरज नसते. असं मैत्र,प्रेम असलेलं कोणी असणं आणि मिळणं हा आयुष्याकडून मिळालेला सगळ्यात अनमोल खजिना असू शकतो, पण तो मिळाला नाही तरी आपल्या आजूबाजूचे प्रत्यक्ष किंवा आभासी जग आणि त्यातली वेगवेगळ्या चेहऱ्या-मुखवट्यांनी वावरणारी माणसे ओळखण्याइतकी आधी आपण आपल्या स्वतःशीच मैत्री तरी नक्कीच करू शकतो?
© डॉ अंजली औटी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा