मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

प्रेमाचे रंग हजार
                                                   
शर्थीचे प्रयत्न करून डॉक्टरांनी त्याला वाचवले. जवळजवळ अठरा तासांनी तो शुद्धीवर आला आणि त्याने पुन्हा डोळे उघडले. प्रेमभंगाचे दु:ख सहन न होऊन त्याने निकराचा आत्महत्येचा प्रयत्न केला होता..वय होते केवळ २६.
शुद्धीवर आला पण आता निसर्गाने त्याची चालण्याची क्षमता हिरावून घेतली होती. या अपघातात त्याने त्याचे दोन्ही पाय गमावले होते!
आई,बाबा,त्याच्या दोन्ही बहिणी यांनी दिवसरात्र एक करून त्यानंतर पाच महिने त्याची जीवापाड काळजी घेतली.
शरीराच्या वरवरच्या,खोलवरच्या सगळ्या जखमा बऱ्या झाल्या. पण मन?
मन अजूनही अंधारलेल्या खोल दरीत जगण्याचा एकतरी धागा हाती लागतोय का हे शोधण्यासाठी धडपडत होतं.
संवेदनशील तर तो होताच. घरातल्या आणि त्याला भेटायला येणाऱ्या सगळ्या जवळच्या लोकांच्या चेहऱ्यामागचे प्रश्न त्याला त्यांच्या डोळ्यांमधून अगदी स्पष्ट वाचता येत होते.
त्याच्याशी सतत संपर्क साधून असलेल्या आणि त्याच्यावर नियमित उपचार करणाऱ्या डॉक्टर अस्मिताने त्याला अनेक विषयांवर अत्यंत हळूहळू बोलते केले होते.
संपूर्ण अंधारकोठडीत असलेल्या मनाला हळूहळू पुन्हा नेहमीच्या जगापर्यंत घेऊन येणं वाटतं तितकं सोपं नाही..ना परिस्थितीत अडकलेल्यासाठी आणि ना त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी धडपडत असलेल्यांसाठी.
एखादी घटना एकदाच घडते. पण तिचे परिणाम संबंधित सगळ्यांच्या आयुष्यावर दूरपर्यंत परिणाम करतात.
काही परिणाम तर संपूर्ण आयुष्य प्रभावित करतात आणि न बदलता येण्यासारखे कदाचित कायमचे होऊन बसतात,
जसे या घटनेनंतर स्वराजचे पाय गेले.
सापशिडीच्या खेळासारखं आयुष्य झालं..उच्च शिक्षण घेऊन, कॅम्पस इंटरव्ह्यूमधून एका नावाजलेल्या कंपनीत नोकरीसाठी निवड झालेला तो..एका अविचाराच्या मानसिक अवस्थेत पुन्हा शून्यापर्यंत, एकदम तळाशी येऊन पोहोचला होता.
एखादी महत्वाची गोष्ट आपण गमावतो ना त्यानंतरच लक्षात येतं, अगदी पूर्णपणे, की त्या गोष्टीचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व होतं!
पश्चातापाच्या आगीतून होरपळून घ्यावं लागतं स्वत:ला. जे प्रश्न मनाशी बोलायला सुद्धा टाळत असतो त्यांचा सामना करावाच लागतो,मग इच्छा असो किंवा नसो तुमची.
स्वराजलादेखील यातलं काहीही चुकलं नाही. वेळ घेत, त्याच्या कलाकलाने अस्मिताने त्याला एकेक करून सगळ्या नकोशा प्रश्नांचा सामना करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार केलं.
कॉलेजला असल्यापासून अवंती सोबत होती त्याच्या. पहिल्याच वर्षी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये त्याचं प्रेम आणखी आणखी घट्ट होत गेलं..मिळून कितीतरी स्वप्न बघितली. मनं एकजीव झाली.
त्याला पुढे अजून शिकायचं होतं पण तिला आता कमावण्याचे वेध लागले होते. संपूर्ण कॉलेजमध्ये अगदी शिक्षकांच्यापण लक्षात त्यांची जोडी आली होती. डिग्री पूर्ण झाल्यानंतर अवंतीने लगेच नोकरी करायला सुरवात केली आणि स्वराज आणखी शिकण्यासाठी सिंगापूरला गेला.
या दोन वर्षातच सगळं बदललं. अवंती दूर दूर जायला लागली. स्वराज सैरभैर झाला. त्याने हरतऱ्हेने प्रयत्न करूनही त्याला त्याचं नातं पुन्हा सावरणं शक्य झालं नाही.
एकीकडे लौकिकदृष्ट्या यशाच्या शिखराकडे जाणारा तो मनातून मात्र अधोगतीच्या रस्त्याने चालायला लागला.
चांगली नोकरी मिळवून पुन्हा भारतात परतलेला तो उत्साहात आणि आनंदात तिला भेटायला गेला आणि त्या भेटीतच त्याला अवंतीने झिडकारलं. अपमान आणि संतापाच्या कडेलोटातून त्याने संपूर्ण आंधळेपणाने आत्मघाताचा पर्याय निवडला.
अविचाराचा हाच एक क्षण, ज्यावेळी व्यक्तीमधली बुद्धीमत्ता आणि अंगातलं, अनुभवातलं सगळं शहाणपण माणसाला सोडून जाऊ शकते. संस्कार,शिक्षण आणि यशदेखील मागे खेचू शकत नाहीत. 
त्या क्षणाकडे डॉ. अस्मिताने त्याला नीट बघायला सांगितले. तो “क्षण” ज्याचा सामना करण्याचे टाळण्यासाठी त्याने स्वतःच्या आयुष्याची किंमत मोजायचा पर्याय निवडला.
पण आयुष्यात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा सामना माणसाला कधी न कधी करावाच लागतो. आपले नेमके काय चुकले, आणि का चुकले हे नीट समजून घेतल्याशिवाय तुम्हाला पुन्हा पुढची वाट चालणे अशक्य होते.
आणि एखाद्याने तसा प्रयत्न केलाच तर तो आयुष्यात पुन्हा पुन्हा तीच ती चूक सातत्याने करत राहतो.
अवंती भेटण्याच्या आधी त्याच्या आयुष्याचा जो काही रस्ता होता, त्यातले टप्पे होते ते त्याचे आयुष्य सुद्धा अनेक घटनांचे आणि जवळच्या नात्यातील लोकांनी केलेल्या प्रेमाच्या अनेक घटनांनी बनलेले होते.
प्रत्येकाचे त्याच्या आयुष्यात एक वेगळे स्थान होते,महत्व होते. या सगळ्याचा पुन्हा विचार करावा लागला.
त्याच्या एका निर्णयाने हे सगळे महत्व आणि सगळे प्रेम एका क्षणात मातीमोल ठरवले होते. हे त्यांच्या सगळ्यांवर अन्याय करण्यासारखे होते! एखाद्या व्यक्तीचा फक्त काही वर्षांचा सहवास एखाद्याला आपल्या स्वतःच्या आयुष्यापेक्षा मोठा वाटतो, या त्याच्या विचारांचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे अत्यंत गरजेचे होते.
आजही सावरण्याच्या प्रत्येक क्षणात त्याच्या खऱ्या जवळची नाती शब्दही न बोलता त्याच्या मनाची संपूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न करत होती.
अवंतीवर केलेलं प्रेम आणि त्याचे इतर आयुष्य...काहीवेळा तुलना अपरिहार्य असते आणि ती केली की एरवी मनाला न समजणारा फरक ती अत्यंत परखडपणे दाखवून देते.
आयुष्य प्रत्येकवेळी सहज,सुंदर नसते..आपण चुकीचे निर्णय घेतले की आपल्याला जागेवर पुन्हा परत आणण्यासाठी ते अशी जोरदार थप्पड मारण्याची क्षमता देखील ठेऊन असते.
आणि मग कुठे तो फरक आपल्याला अगदी स्वच्छ दिसायला,जाणवायला लागतो!....मगच दृष्टिकोन बदलतो!!
प्रेम त्यालाच समजते जो आधी स्वतःवर प्रेम करतो..प्रेमातला हा गुणात्मक फरक जाणवला आणि स्वराज मनातून कमालीचा खजील झाला. अस्मिताने त्याच्या लक्षात आणून दिले की तो स्वतःवर देखील प्रेम करत नव्हता.
अवंती केवळ स्वतःवरच आंधळे प्रेम करत होती म्हणून तिने कोणताही मागचापुढचा विचार न करता नाते संपवण्याचा निर्णय क्रूरपणे स्वराजला ऐकवला. आपण ‘प्रेम’ कसे करतो,’नकार’ कसा देतो हे देखील त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. आपापल्या व्यक्तिगत मर्यादांनुसार माणसे वेगवेगळ्या प्रकारे दुसऱ्यांशी वागू शकतात.
‘अवंतीचे प्रेम म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वस्व आहे’ ‘तिच्याशिवाय मी आयुष्य जगू शकत नाही’ असे विचार करणारा स्वराज स्वतःला अत्यंत कमी समजला होता.
स्वतःची लायकी अवंतीच्या समोर अत्यंत कवडीमोल आहे,असे समजला होता!
तिच्याशिवाय जगणे असह्य होऊन त्याने जवळजवळ स्वतःला संपवले होते..
आणि त्याला अजूनही असे वाटत होते की मी अवंतीवर अत्यंत मनापासून “प्रेम” केले.
पण खरेतर स्वराजला मुळात “प्रेम” म्हणजे काय? याची अजूनही समज अजिबात नव्हती.
“प्रेम” ही केवळ एक भावना आहे! सिनेमात दाखवतात तशी ती एकरंगी, एकसुरी बिलकूल नाही.
“राग” “काळजी””लोभ””वात्सल्य” ”मत्सर””खंत””दु:ख” या मानवी नैसर्गिक भावनेइतकी ती स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे.
अत्यंत राग आला की आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे तो व्यक्त करतो. राग येणे स्वाभाविक पण तो व्यक्त करण्याच्या पद्धती तो अनुभवणाऱ्या माणसांच्या मानसिकतेवर, आयुष्य अनुभवण्याच्या मूळ वृत्तीवर ठरतात.
रागात एखाद्याला, स्वतःला नुकसान पोहोचवणारा राग हा “अनैसर्गिक राग” आहे!
प्रेमदेखील अशीच केवळ एक भावना!
प्रेम व्यक्त करणे प्रेमभावना अनुभवणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.
आत्यंतिक प्रेमासाठी एखादी व्यक्ती स्वतःचे आणि दुसऱ्याचे नुकसान करत असेल तर प्रेम अनुभवण्याची, व्यक्त करण्याची  त्या व्यक्तीची मानसिक क्षमता “रोगट”आहे.
स्वराजचे आणि अवंतीचे स्वतःवरील आणि एकमेकांवरील प्रेमदेखील असेच “रोगट” होते!
पुस्तकी अभ्यासात हुशार असणे वेगळे आणि प्रत्यक्ष जीवन जगतांना लागणारी भावनिक आणि मानसिक साक्षरता सुदृढ होईल असे शिक्षण आज आपल्या मुलांना देण्यात आपण कमी पडतो आहोत या वास्तवाचा हा परिणाम आहे.
स्वराजला पहिल्यांदाच आरोग्यदायी, निरामय “प्रेम” उदाहरणासहित समजले.
अवंतीने “नाही” सांगितल्यानंतर काही काळ वाईट वाटणे, हे स्वाभाविक होते. आपल्या आयुष्यातून माणूस निघून गेल्यानंतर स्वाभाविकपणे वाटणारे दु:ख हे नैसर्गिक आहे.
पण ते दु:ख अनुभवतांना आपला वागण्याचा तोल जाणं आणि त्यातून काही स्वतःला आणि इतरांना कमीअधिक नुकसान पोहोचवणारे निर्णय घेणे ही “दु:ख” सहन करण्याची “रोगी” पद्धत झाली.
प्रेमात अचानक कोणी “नाही” म्हणणं ही त्या नाही म्हणणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वातला,मानसिकतेला,समजेला अनुसरून असते. ‘नकार’ स्वीकारणे देखील असेच समजेवर अवलंबून असते.
आयुष्य जगतांना कोणतेही नाते परस्परांवर अवलंबून असावे पण संपूर्णपणे ‘परावलंबी’ नसावे.
प्रेमभावना किती व्यापक आहे! प्रेम कोणावरही असू शकते, कशावरही असू शकते. प्रेम करण्याची प्रचंड क्षमता माणसात आहे!
ते केवळ व्यक्तीवरच असते असे नाही तर एखाद्या ध्येयावर असू शकते, स्वप्नावर असू शकते, निसर्गावर असू शकते, प्राण्यांवर असू शकते..पुस्तकांवर असू शकते..कलेवर असू शकते..नुसत्या चांगले जगण्यावर देखील असू शकते.
अशी प्रेमात भारावलेली कितीतरी माणसे आपण आपल्या आजूबाजूला बघतोदेखील. अस्मिताने कितीतरी उदाहरणे दिली.
स्वराजला अस्मिताचे म्हणणे संपूर्णपणे पटले.“प्रेम” म्हणजे नेमके काय हे आता कुठे समजले पण त्यासाठी किती मोठी किंमत चुकती केली.
आता आपल्याकडे काय नाही यापेक्षा ‘काय आहे’ तिथून आपण आयुष्याची पुन्हा एक नवी सुरवात करू शकतो हे त्याच्या लक्षात आले.
नोकरी अजूनही हातात होती..भविष्यात अनेक ऑपरेशन करून त्याला कदाचित चालता देखील येणार होते. जवळची,खरी जिवलग सगळी नाती त्याच्याजवळ होती..या संकटकाळात टिकून असलेले अनेक मित्र,त्यांची मैत्री देखील त्याच्या सदैव सोबतच होती आणि आता संपूर्णपणे बदलेल्या दृष्टीकोनातून जगता येईल असे आयुष्य देखील त्याच्या जवळ होते..
स्वराजने मन:पूर्वक अस्मिताला नमस्कार केला. त्याचे डोळे पाण्याने तुडुंब भरून आले.
त्याच्या हातावर हलकेसे थोपटून अस्मिताने त्याचा निरोप घेतला. आता तिला खात्री होती शारीरिकदृष्ट्या आज स्वराजच्या पायात शक्ती नसेलही पण त्याच्यात आता खरेखुरे चालण्याचे बळ नक्कीच आले आहे!   
© डॉ. अंजली/अनन्या औटी.
# आरसा
mindmatteraa@gmail.com