रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

देणे समाजाचे!



“कठीण परिस्थितीशी सामना कसा करायचा याचा निर्णय नेहमीच आपल्या हातात असतो.” हे कितीही खरे असले तरी आव्हानात्मक परिस्थिती अचानक समोर आली की त्यावेळी मनात प्रभावी असलेल्या भावनांच्या आहारी आपण जातो. आपल्यापैकी काही जण मात्र याच भावनांची उर्जा वापरून स्वतःसाठी आणि इतरांसाठी आश्वासक पर्याय शोधू शकतात. आयुष्यातल्या संकटकाळात स्वतःला सावरून इतरांचा विचार करणे सगळ्यांनाच कुठे जमते?  पण ज्यांना जमते ते सगळे लोक मुळातच असामान्य असतात का? तेही आपल्यासारखेच असतात. त्यांनाही भावना असतात. मग नेमक्या कोणत्या क्षणी ते दु:खाच्या क्षणांवर मात करून पुढे जातात? असे काय घडते की ते इतर सगळ्यांसारखे न वागता काहीतरी वेगळे वागून असामान्य ठरतात?
यासाठी एक गोष्ट सांगते, वीणाची. एक साधी मुलगी. सर्वसामान्य लहानपण आणि तरुणपण अनुभवलेली. एक साधी गृहिणी आपल्या घरावर,संसारावर आणि माणसांवर मनापासून प्रेम करणारी. दिलीपने सुरु करून दिलेला ‘गिरीसागर टूर्स’चा पर्यटनव्यवसाय सक्षमतेने सांभाळणारी प्रेमळ पत्नी. बाळ होण्याची वाट बघणं, हाच काय तो त्यांच्या आयुष्याचा संघर्ष. वयाच्या तिसाव्या वर्षी वीणाला दोन जुळ्या मुली झाल्या. पूरवी आणि सावनी. कौतुकाचे आणि आईपणाच्या नव्या नवलाईचे आठच दिवस संपत नाही तोच या कुटुंबावर एक संकट कोसळले. पूरवीला फणफणून ताप आला. बघताबघता तो मेंदूपर्यंत पोहोचला. ‘मेनिंजायटिस’ निदान होऊन त्या छोट्याशा बाळाला कायमचं मानसिक आणि  शारिरीक मतिमंदत्व आलं.
बाळाला जराही काही झालं की आईचा जीव अगदी कासावीस होऊन जातो पण ती काही ते दुखणं आणि आजार वाटून घेऊ शकत नाही. पूरवीला सतत फिट्स येत असत. एकेका दिवसात सत्तर ते ऐंशीवेळादेखील फिट्स येत. ते नुसतं बघणंही कठीण होई. इथूनपुढच्या प्रवासाच्या,बाळाच्या काळजीने वीणा हबकून गेली. बाळ काहीच दिवसांचे सोबती आहे,असे डॉक्टरांनी सांगितल्यावर तर तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला. मानसोपचारांची मदत घ्यावी लागली.  पण ती लवकरच सावरली. मुलींना सांभाळण्यासाठी त्यांची सगळी शक्ती पणाला लागली. पूरवीसाठी योग्य मार्गदर्शन घेण्याची आणि सावनीच्या जगण्यावर, वाढण्यावर घरातल्या वातावरणाचा कोणताही प्रभाव न पडता तिच्यातल्या नैसर्गिक हुशारीला आपल्याला पूर्ण न्याय देता येण्याची गरज त्यांच्या लक्षात आली. रोजचा दिवस एक वेगळे आव्हान होते. कोणाची मदत मिळेल? शोध सुरु झाला.
त्यादृष्टीने काम करणाऱ्या सामाजिक संस्था आहेत का म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातातल्या अनेक सामाजिक संस्थाना भेटी दिल्या गेल्या. वेगवेगळ्या संस्थांच्या भेटींमधून अनेक अनुभव त्यांना आले.काही चांगली लोकं,संस्था भेटल्या त्यांची मदतही झाली. तर कधीकधी पैसा, वेळ वाया गेला आणि वर मनस्ताप वाट्याला आला. त्यातल्याच काही संस्था अशा होत्या की कोणत्याही बाह्य मदतीशिवाय त्यांचे खरोखरच चांगले काम स्वनिर्मित फंड॒सच्या तुटपुंज्या मिळकतीवर कासवाच्या गतीने का होईना पुढे नेत होत्या. त्यांचे प्रामाणिक काम समाजासमोर येण्याची गरज दिलीपना जाणवली. कारण समाजातील अनेकांना चांगले काम करणाऱ्या लोकांना,संस्थांना मदत करण्याची प्रामाणिक इच्छा असते, पण मग असे दाते आणि खरे गरजू यांची सांगड,भेट योग्यवेळी व्हायला हवी, त्याचा अनेकांना खरंच उपयोग होईल. प्रत्यक्ष अनुभव घेऊन दिलीपचे मन स्वस्थ बसेना,त्यांना याबद्दल खूप कळकळ वाटू लागली.
                                 

               
                              
दिलीप आणि वीणा दोघांच्याही सामाजिक जाणिवा प्रगल्भ होत्या. समाजातील अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याच दरम्यान दिलीप एक प्रदर्शन बघण्यासाठी गेले आणि त्यांच्या मनात अशा संस्थांचे कार्य समाजासमोर येण्याचा ‘प्रदर्शन’ हा सगळ्यात चांगला मार्ग असू शकतो, हा विचार आला. त्यांनी मांडलेली ही कल्पना वीणालादेखील खूप आवडली. दोघांचे त्यावर विचारमंथन झाले. निर्णय घेतले गेले आणि मग दोघांनी आपली ही कल्पना अनेकांना ऐकवली. ओळखीच्या लोकांनी,मित्र-मंडळींनी ती उचलून धरली. अनेकांनी जमतील तसे पैसेही देऊ केले त्यात काही पदरचे पैसे घालून 2005 साली असे अनोखे प्रदर्शन पुण्यात भरवले गेले. संस्थांनी त्यांची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे लोकांना सांगायची, कार्याचे फोटो आणि माहिती यांचे प्रदर्शन असे केवळ त्याचे स्वरूप होते. लोकांचे,लोकांसाठी असलेले काम लोकांपर्यंत केवळ पोहोचवायचे. कोणतीही मागणी नाही. खरेदी-विक्री नाही. ज्यांना मदत करावीशी वाटेल त्यांनी थेट त्या संस्थेला संपर्क करायचा. असे आगळेवेगळे प्रदर्शन लोकांनी पहिल्यांदा बघितले. उस्फुर्तपणे मदत केली. यात अनाथ,अपंग मुलांसाठी,वंचीत समाजघटकांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था होत्या.   
या प्रदर्शनाचे नाव ठेवले “देणे समाजाचे” यात खरोखरच समाजाचे ऋण त्याला परत करण्याचा सच्चा हेतू होता. असे प्रदर्शन एकदाच भरावून त्याचा फायदा नाही तर दरवर्षी हे घडून यायला हवे याची प्रेरणा मिळाली. उत्साह वाढला. दोघांनी प्रत्यक्ष फिरून अशा गरजू संस्था वर्षभरात शोधून काढून प्रदर्शनासाठी त्यांची निवड करण्याचे काही निकष ठरवले गेले.       
पूरवीसाठी त्यातील काही संस्थांमुळे खरंच मदत झाली. वेगळी समज,दृष्टीकोन विकसित होत गेले. निर्णयांमध्ये सुलभपणा आला. पण अनेक गोष्टींची घडी नीट बसतेय तोच अचानक वीणाला अंतर्बाह्य हलवून टाकणारा एक मोठा धक्का बसला. 2008 सालच्या प्रदर्शनाची दोघेही जोरात तयारी करत होते, केवळ पंधरा दिवस बाकी होते आणि ऐके दिवशी रात्री झोपेतच दिलीप अचानक हे जग सोडून गेले. नियतीचा हा घाव निश्चितच मोठा होता. छोटेसे घर या वादळात उन्मळून पडले. वीणाच्या दु:खावर कोणी काय समजूत घालावी?
दु:खाने सैरभैर झालेल्या वीणाने ठामपणे यावर्षीचे प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला. हाच तो क्षण ज्या क्षणी इतर कोणीही हातपाय गाळून दु:खात बुडून जाईल त्या क्षणी आपल्या भावनांवर मात करून वीणा वेगळं वागली. निर्णय भावनांनी नाही तर बुद्धीने घेतला आणि त्यानंतर तिचे आयुष्यच बदलून गेले. दोघांनी एकत्र बघितलेले स्वप्न पुढे नेण्याच्या निश्चयाने तिने उभारी धरली,कुटुंबातील इतर सदस्यही मदतीसाठी पुढे आले आणि त्यावर्षीचे प्रदर्शन ठरल्याप्रमाणे पार पडले.
सगळ्या जबाबदाऱ्या वीणाने संपूर्ण ताकदीने सांभाळायला सुरवात केली. यात शरीरापेक्षा मनाची ताकद जास्त मोलाची ठरली. एकीकडे पूरवी आणि सावनी मोठ्या होत होत्या. महाराष्ट्रभर दौरे करून संस्थांना भेटी देणं,लोकांच्या संपर्कात राहणं हा सगळा वाढलेला व्याप सांभाळणं तसं कठीण होतं पण इथेही तिने आपल्या बुद्धीचा कौल मानला. खऱ्या सामाजिक कामाचा आव आणता येत नाही, त्यासाठी दिवसरात्र एक करावे लागतात. अनेक व्यक्तिगत गोष्टी दूर साराव्या लागतात. इथे तर घर आणि व्यवसाय दोन्ही तारेवरची कसरत होती. दोन्ही पातळ्यांवर ती प्रत्यक्ष हजर असण्याची गरज होती. तरीही “देणे समाजाचे” कार्यक्रम पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेणे खूप जास्त आव्हानात्मक होते. ‘झेपेल तितकेच कर’, ‘आधी घर सांभाळ,लष्कराच्या भाकऱ्या आता नको” यासारखे सल्ले मिळाले नसतील तिला, असे कसे होईल? अडचणी येत गेल्या आणि मार्गही निघत गेले. संकटं येत गेली पण निश्चयाचे बळ कमी पडले नाही. अनेक लोकं या चळवळीला जोडली जात होती. 2010मध्ये या सगळ्या कामामागची प्रेरणा असलेली पूरवी हे जग सोडून गेली. पण आता वीणाचं ‘आईपण’ अधिक व्यापक झालं होतं. सामाजिक मातृत्व स्वीकारलं होतं, थांबणं शक्य नव्हतं आणि तिला थांबायचं नव्हतंही. काम सुरूच राहिलं.
ह्यावर्षी पंधरावे वर्ष आहे ‘देणे समाजाचे’प्रदर्शन पुण्यात येत्या २० तारखेला भरते आहे. आता ते केवळ प्रदर्शन नाही तर एक  ‘चळवळ’ झाली आहे. यावर्षीपासून हे प्रदर्शन मुंबईतसुद्धा आयोजित केले गेले. यातून आजपर्यंत एकशेपासष्ठपेक्षा जास्त सामाजिक संस्थाचे कार्य समाजासमोर आले आहे. अनेक दात्यांनी यथाशक्ती त्यांना मदत केली आहे. काहींनी श्रमदानसुद्धा केले आहे. करोडो रुपयांची मदत आजपर्यंत थेट उपलब्ध झाली आहे. वीणा गोखले आजही सामाजिक संस्था आणि समाज यांच्यातील केवळ एक दुवा म्हणून काम करतात. आजही ती आपल्या सगळ्यांसारखीच एक साधी स्त्री आहे. एक प्रेमळ आई आहे, एक कर्तबगार व्यावसाईक आहे आणि समाजभान असलेली अत्यंत पारदर्शी,प्रामाणिक व्यक्तीदेखील आहे.  “देणे समाजाचे” असले तरी आपणही याच समाजाचा एक भाग आहोत, म्हणून आपलेही आहेच की!
वीणाचे प्रेरणादायी आयुष्य आपल्याला इतकी प्रेरणा तर नक्कीच देतेय!
  © डॉ. अंजली अनन्या 
   
         

रविवार, १५ सप्टेंबर, २०१९

जगायचं कशासाठी?




घरात जाण्यासाठी वळले तर पायापाशी एक छोटंसं मनीप्लॅन्टचं पान, थोड्या देठावर,कसंबसं तग धरून. हिरवा रंग पण थोडसं मलूल. तिथे कधीपासून होतं,माहीत नाही. तसा त्याचा वेल होता,आजूबाजूला जिकडेतिकडे पसरलेला. हे मात्र सगळ्यांपासून तुटून जमिनीवर..नशीब अजून कोणी त्याच्यावर पाय नव्हता दिलेला. पटकन उचललं. घरात एका ग्लासभर पाण्यात ठेवलं. किचनच्या खिडकीत, मला दिसेल असं. दोन दिवस जगेल की नाही, वाटत होतं. पण हळूहळू ते तरारलं. त्याला स्पर्श केला की कळायचं,आतून जगण्याची जिद्द होती त्याच्यात. काही दिवसातच त्याच्या तुटलेल्या भागाला पांढरट मुळं फुटलेली दिसली. कमाल वाटली मला त्याची. छोटासा जीव किती चिवट इच्छाशक्ती धरून होता! शब्दही न बोलता मला त्याची जगण्याची धडपड समजत होती. त्याच्या विश्वात मी होते की नाही,माहीत नाही पण माझ्या विश्वात मात्र त्याचं असणं होतं! अवघ्या काही दिवसांत देठाशी नव्या पानाचा उगम दिसायला लागला आणि मला जग जिंकल्यासारखा आनंद झाला. आता मला त्याची काळजी नव्हती. ग्लासमधलं पाणी बदलतांना त्याचा हळूवार स्पर्श मला होई. “आता उद्यापासून तू मातीत राहायचं हं..तुझं खरं घर तेच आहे. तुला आवडेल तिकडे..” मी सांगितलेलं समजलं असेल का त्याला?  दुसऱ्या दिवशी माझ्या हाताने कुंडी तयार केली. मातीत थोडे नैसर्गिक खतदेखील मिसळले. आणि अलगद बोटांनी त्याला मातीच्या कुशीत ठेवले. मातीला आणि पाण्याला त्याची काळजी घ्यायला सांगितले. तरी मला वाटत होते, नीट येईल ना मातीत? आवडेल ना त्याला हे नवीन घर? लगेच कसं समजेल? मला वाट बघायला हवी.

                                           

 हा बदलदेखील त्याला मानवला. ते कोमेजले नाही. किती वेळ लागला त्याला तिथे जुळवून घ्यायला. पाणी जास्त व्हायला नको,कमी पडायला नको. ऊन कडक नको, उजेड मात्र भरपूर हवा, हवा खेळती असावी. माझं बारीक लक्ष होतं. “बस,मरना नहीं..” मनावर उमटलेलं मूव्हीतलं हे वाक्य त्यालाच किती वेळा म्हटलं मी. ऐकलं असेल का त्याने?  ऐके दिवशी त्याच्या देठावर हिरवट पिवळा उंचवटा दिसला..इथून कोंब फुटणार..आता मला खात्री झाली आणि अगदी हळूहळू त्यातून नवे पान उगवले.. ..किती सावकाश झाले सगळे. त्याला कसलीही घाई नव्हती. मात्र घाई होती माझ्याच मनात. त्याने त्याचा वेळ घेतला. मग मला अपोआप समजलं, सगळ्या गोष्टींची वेळ ठरलेली आहे! त्याच्या त्या वेगाशी जुळवून घेणं मग एकदम जमूनच गेलं मला. आणि आवडलंही. पटापट एका विचारावरून दुसऱ्यावर धावणारं माझं मन आपोआप सैलावलं..घाई करून एखादं काम लवकर होईल फारतर. त्याने असा काय फरक पडतो? मला “स्लो डाऊन” होण्यातली मजा समजली. आता त्याच्याकडे अनेकदा  बघूनही प्रत्येकवेळी नवेच काहीतरी दिसत होते. दिवसागणिक वाढणारा त्याचा ताजेपणा लक्षात येत होता. ऐकाका पानाचा प्रवास उमगत होता. सावकाश एका पानाची पाच-सहा पाने झाली होती.  त्याच्याशी माझी जवळिक वाढली होती, खरंतर जवळिक वाढली होती माझी माझ्याशीही.       
इतक्यादिवस मला वाटे की मी त्याच्या सोबत आहे! पण मग लक्षात आलं की अरे, हे तर नेमकं याच्या उलट आहे की! त्याला माझी नाही तर मला त्याची सोबत आहे! मी असले नसले तरी त्याच्या असण्यात फरक पडणार नाहीये काही..पण माझ्यात मात्र हळूहळू खूप काही बदलतेय.  माझ्या जगण्याच्या चौकटीतून मी त्याच्या जगण्याचा अर्थ शोधत होते, कसं शक्य आहे हे? माझ्या चौकटीत असलेले अनुभवांचे अर्थ अपूरे,माझ्या नजरेतून असू शकतील. त्यापलीकडे असलेलं त्याचं जग समजायचं असेल तर आधी मला माझ्या चौकटीतून बाहेर पडलं पाहिजे. अर्थ शोधायला न जाता त्याचं फक्त जगणं समजून घ्यावं लागेल. आणि मग मला समजलं,कशाला हवा आहे,प्रत्येक गोष्टीला अर्थ? नुसतं जगणं, नुसतंच असणंदेखील पुरेसं असतं. अनुभवतेय की मी ते त्याच्या सोबतीने. त्याच्याकडे बघतांना माझ्या मनात आपोआप जे उमटेल तेच आहेत त्याचे जगण्याचे बोल. ते पोहोचण्यासाठी कोणतेच शब्द लागत नाही. त्याशिवायच भाव पोहोचतो.  आपल्या मरणासन्न अवस्थेबद्दल तरी त्याची तक्रार कुठे होती? त्याने कधी कोणाची तक्रार केली की गाऱ्हाणे मांडले? मी उचलले नसते तर ते तितक्याच शांतपणे नाहीसेही झाले असते जगातून. त्याने अपेक्षा केली नव्हतीच,नंतर मात्र मी दिलेला मदतीचा हात घेऊन मन:पूर्वक जगण्याचा प्रयत्न केला. त्याने फक्त जे घडेल त्याची वास्तविकता स्वीकारली. त्या त्या प्रत्येक क्षणी. पाण्यातून मातीत आणून ठेवलं तरी. त्याची सगळी शक्ती फक्त टिकून राहण्यात एकवटली. त्याला माहीत होतं, जगणं महत्त्वाचं आहे,वाढ तर आपोआपच होणार आहे. 
                                     

शून्यापासून सुरवात करून पुन्हा शून्यापर्यंत जाण्याचं नाव आहे नाही का, आयुष्य म्हणजे! या दोन शून्यांच्या दरम्यान जे काही आहे, तेच तर आहे प्रत्येकाचं जगणं..मग हेच करतांना आपण माणसं किती घाई करतो..? एकमेकांशी स्पर्धा करतो. पण खरंतर प्रवास किती वेगवेगळा आहे आपल्या प्रत्येकाचाच शून्यापर्यंत जाण्याचा. त्यात कितीतरी वेगवेगळे अनुभव आहेत. मग तुम्ही कोणीही असा, तुम्हाला आयुष्याचे काय अनुभव येतात, कोणत्या परिस्थितीत येतात आणि त्यातून नेमके काय घेऊन तुम्ही वाढत असता..हे प्रत्येकासाठी वेगळेच आहे ना..?  कोणतेही झाड असे कुठे म्हणते कधी की, मला ना..त्या दुसऱ्या झाडासारखं जगायचं आहे, मला का नाही त्याच्यासारखं उंच होता येत? मला का नाही अमूक रंगाची फुलं येत? माझ्या फुलांना दुसऱ्या फुलांसारखा वास का नाही? इतरांसारख्या माझ्याकडे प्राणी-पक्षी, मधमाश्या का नाही येत? ते ना कधी कोणाशी तुलना करत,ना स्पर्धा करत. ते स्वतः जगते आणि दुसऱ्यांना जगायला मदत करते. आजूबाजूच्या सगळ्याशी स्वतःला जोडून घेते. आपल्या आजूबाजूला असलेल्या जगाशी असलेलं नातं प्रत्येक झाडाला अंतर्यामी माहीत असतं. “माझ्या जगण्याचा हेतू काय?” असले प्रश्न त्याला कधीच पडत नसावेत. आपला प्रवास तन्मयतेने करणे, हेच असतं त्याचं जगणं. तो प्रवास करतांना मातीशी, तिच्यातल्या वेगवेगळ्या घटकांशी, कृमी-किटकांशी, हवेशी, वातावरणाशी, या प्रत्येकाशी जोडले गेलेले त्याचे जगण्याचे हेतू. म्हणजे झाडांचा प्रवास आतून बाहेर आहे आणि माणूस म्हणून आपला प्रवास बाहेरून स्वतःकडे जाणारा,स्व-केंद्रित! प्रत्येकाचे वेगळेपण स्वीकारत,सामावून घेत,जोडून घेत, देवाण-घेवाण करत एकमेकांशी पूरक होत जाणारं आहे यांचं आयुष्य आणि आपण मात्र ‘मी’,’माझं’,’माझ्यापुरतं’ बघून स्वतःला मर्यादित करत,चौकटीत बांधत जगत रहातो. आणि म्हणूनच याच निसर्गात राहूनही आपण त्याचाच एक भाग होऊ शकत नाही. सगळ्यांमध्ये असूनही ‘वेगळे’ आहोत. ते वेगळेपण मिरवणं आवडतं आपल्याला. कधीकधी तर ते सर्वश्रेष्ठही वाटतं!   ही आपली वाटचाल नैसर्गिक नाही, निसर्गाशी पूरक नाही, जोडून घेणारी तर नाहीच नाही. विचार करायला हवा,नाही का? निसर्गापासून दूर जातांनाच आपण आपल्या विचार,भावना आणि वागण्यातला समतोल गमावून बसलो. निसर्गावर अतिक्रमण करून आपण यश,प्रसिद्धी,पैसा आणि लोकप्रियता तर मिळवली आणि आता मनस्वास्थ्य बिघडले आणि शरीरस्वास्थ्य बिघडले म्हणून आपण अस्वस्थ आहोत.  मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या निरोगी, निरामय आणि सशक्त आयुष्य जगणे आणि इतरांना त्यासाठी मदत करणे, हे माझे ध्येय आहे असे  असे आता मनापासून वाटते आहे. माझ्या विचारांमधला हा बदल काही माझी स्वतःची समज आहे? सर्वांगाने मनापासून वाढणाऱ्या या माझ्या लाडक्या छोट्याशा रोपट्याने सहज, कसलाही आव न आणता समजावलेले हे जगण्याचे गुपित आहे!

© डॉ अंजली अनन्या
 # कॅलिडोस्कोप   

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९

एकरूप





पावसाच्या थेंबानी अतोनात उमललेली, फुललेली सृष्टी आजूबाजूला. सवयीच्या 'मी','माझं' या अस्तित्वखुणा मग हलकेच विरघळतात. मन स्वच्छ,निरभ्र होत जातं. विचार,भावना हळूहळू निवायला लागतात. हिरव्या रंगाची जादू मनावर गारुड करते. हलके हलके वाहणाऱ्या वाऱ्यात शरीराचे भान कधी विसरते, कळत नाही. त्याचाच एक भाग झालो की उलगडते एक अनोखे विश्व..विविध आकारांचे, नादांचे, रंगांचे,वासांचे आणि स्पर्शाचे. जाणिवेचा अनोखा प्रवास सुरु होतो.

परस्परांत मिसळणारे, एकमेकांना पूरक असणारे जग...डोंगर,नद्या,झरे,दगड,माती, कितीतरी वनस्पती,फुलं,झाडं,पक्षी आणि या सगळ्यांना कवेत घेणारी असते आभाळाची सोबत.. चिमुकल्या रान फुलापानांचे, कृमीकीटकांचे,प्राण्यांचे जगणे समजू लागते. बरोबर असलेलं कोणी त्यांची नावं सांगत असतात..माझ्या काही ती फारशी लक्षात रहात नाहीत. त्यांच्या जगण्यातली उर्जा मात्र मला स्पर्श करते. त्याचं असणं मला आश्वासक वाटतं. अंतर्मुख व्हायला होते. दृष्टी विस्तारते. मातीच्या रंगाने आणि गंधाने मला वेढून घेतलेले असते.मातीच्या कणाकणात फुलणारे जीवन बघितले की माती मला नदीसारखी ‘प्रवाही’ वाटते. जीवन उमलण्यातले आणि विलीन होण्यातले सातत्य. या प्रवाहाशी आपलंही नातं आहे ना?

   डोंगरकड्यावरून आवेगाने झेपावणारे पाणी अवनीच्या कुशीत शिरते आणि ती नखशिखांत बहरून जाते. कणाकणात प्रेम रुजतं. हिरव्यागार गवताची मृदू,मुलायम लोभस थरथर मातीच्या रोमरोमात उमटते. जगण्याचा नुसता उत्सव सुरु असतो अवघ्या आसमंतात! निसर्गाचे आर्जव मनात उमटणार नाही असे कसे होईल? जंगलवाटांची अतोनात ओढ लागते. आवेगाने वाहणाऱ्या शुभ्र पाण्याच्या गारव्याची, ओल्या वाऱ्याच्या मनमोकळ्या स्पर्शाची आस लागते. मग पाय शोधत जातात कितीतरी अस्पर्शित निसर्गवाटा आणि मी समर्पित..त्या क्षणांना संपूर्ण शरण जाते.   

   निसर्गातला प्रत्येक क्षण एक वेगळा अनुभव असतो. आपण केवळ साक्षी असतो. इथे काहीही आपण बघण्यासाठी घडत नसतं. उघड्या डोळ्यांनी आणि मनाने आपण त्याचा भाग झालो की आजूबाजूला असलेल्या कितीतरी गोष्टी दिसतात,जाणवतात. साद,प्रतिसादांची सृष्टीची भाषा समजत जाते. आपल्या दृष्टीचा,मनाचा,जाणीवेचा परीघ आपोआप विशाल होतो..सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आनंद घ्यायला शिकतो, अनपेक्षित क्षणाचा अनुभव असा याचक होऊन घेतल्यावर मग समजतं ‘घेणं’ किती सुंदर असू शकतं ना?

सौंदर्याचं माप आपल्या ओंजळीत पडतांना त्यातल्या चैतन्याचा असा काही लखलखीत स्पर्श आपल्याला होतो की त्यातल्या उर्जेने आपण अंतर्बाह्य बदलून जातो. मनाचा डोह शांत, तृप्त, समृद्ध होत जातो. जे माझ्यात आहे तेच या चराचरात सामावलंय या अनुभूतीचा सहजभाव मनोमन उमगतो आणि मग जाणवते निसर्गाची लय माझ्याही अंतरंगात आहे. माझ्या श्वासात आहे,रक्तातून वाहते आहे, या श्वासाने तर मी आजूबाजूच्या अनंताशी जोडलेली आहे हे जाणवून कमालीचं मुक्त वाटतं आणि निसर्गनियमांशी असलेली जगण्याची बांधिलकी उमजत जाते. विलक्षण आहे हे वाटणं! तृप्त,कृतार्थ..आयुष्याबद्दल,प्रवाहाबद्दल आणि सहज वाहण्याबद्दल कमालीचा आपलेपणा वाटतो.

परवा अशाच एका वाटेवर कसलीतरी अनामिक ओढ वाटून पावलं रेंगाळली.  पक्षांची नादमधुर किलबिल, झाडांच्या पानांचा वाहणाऱ्या वाऱ्यामुळे होणारा आवाज यातूनही अगदी जवळ असलेल्या झाडीत हलचाल जाणवली. एक देखणा मोर समोर. आपल्याच नादात मग्न. त्याच्यापासून थोड्या अंतरावर जराशा मोकळ्या जागेत गेलो. आता आम्ही त्याच्यापासून दहा बारा पावलं दूर. निसर्गाने कसली किमया केलीये ना त्याला बनवून? मानेवरचा निळा रंग, डोक्यावरचा सुंदर तुरा आणि काळेभोर डोळे. असं वाटलं तो आणखी पुढे येणार नाही, पण तो आमच्या दिशेने हळूहळू चालत पुढे आला आणि तिथेच असलेल्या एका उंच खडकावर बसला. आता त्याचा पिसारापण दिसत होता. त्याने आम्हाला नक्कीच बघितलं. प्राणी,पक्षी धोका लगेच ओळखतात. शक्यतो माणसांपासून दूर राहतात. त्याला आम्ही काही करणार नाही हा विश्वास वाटला असावा. किती विलक्षण सुंदर होता तो! क्षणभरच त्याचा उमललेला पिसारा बघण्याची इच्छा मनात उमटली. आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणात आम्हाला तो अद्भुत क्षण अनुभवता आला. आपला लावण्यपिसारा फुलवून तो त्याचा तो मोहक नाच! प्रियेची आराधना,तिला घातलेली साद..पापणीही न हलवता ते सुंदर क्षण आम्ही वेचत होतो. निसर्गाचा तो चमत्कार नजरेसमोर साक्षात साकार होत होता.
                               


निसर्गातला प्रत्येक क्षण वेगळा आणि काहीतरी देणारा असतो. आमचं त्या नेमक्या क्षणाला तिथे असणं त्याने सहजतेने स्वीकारलं आणि त्या सुंदर क्षणांचं दान घेऊन मन नतमस्तक झालं. पाच-सहा मिनटात पिसारा मिटवून तो नुसताच इकडे-तिकडे फिरत होता. त्याला तसं बघणंही विलोभनीय होतं. ते जग त्याचं होतं, त्याच्या विविध अदा बघतांना आमचं मन भरणार नव्हतंच. आम्ही तिघे ओल्या जमिनीवर सरळ मांडी घालून बसलो होतो. 
        


आता निघूया असं एकमेकांना खुणावलं तितक्यात त्याने पुन्हा एकवार प्रियेला साद घातली आणि निमिषार्धात पुन्हा एकदा पिसारा संपूर्ण फुलवून त्याची पावलं थिरकायला लागली. हा क्षण अगदीच अनपेक्षित होता. ते अप्रतिम दृश्य, ती वेळ..निसर्ग मुक्तहस्ते सुंदर क्षण देत होता! लांडोर नक्की झाडीत असणार आणि त्याचा नाच बघत असणार. तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याचं असं रोमरोम  फुलूवून नाचणं,खरंच कमाल वाटली. डोळे भरून त्याला मनात साठवलं आणि त्याची प्रणयसाधना परिपूर्ण होऊ दे,अशी मनात इच्छा करून त्याचा निरोप घेतला.
मन भावविभोर झालं होतं. ही भावसमाधी मोडूच नये,असं वाटत होतं. आज मिळालेलं निसर्गाचं हे दान इतकं परिपूर्ण होतं की चराचराबद्दल,आयुष्याबद्दल कृतज्ञतेने मन भरून आलं..आंतरिक आनंदाची लय निसर्गाशी जोडलेली असण्यातल्या अनुभवात ‘माणूस’ असण्यातला अहंकार कधीच विलीन होऊन गेला.
© डॉ अंजली अनन्या 
# कॅलिडोस्कोप
(फोटो सौजन्य :सतीश कुलकर्णी )