रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

एक मृत्यू!

एक मृत्यू!

शेवटी कमलेश गेला. वयाच्या केवळ ३६ व्या वर्षी!
गेल्या आठ दिवस सुरु असलेला जगण्या मरण्यातला संघर्ष अखेर संपला.

पण हे सगळं सुरु झालं ते कमलेश वीस वर्षांचा असतांना. आई-वडील दोघेही नोकरी करणारे. आजच्या काळात दोघांनी मिळून पैसे कमावले तर आपल्या मुलांना आपण चांगलं शिक्षण देऊ शकू म्हणून दोघेही दिवसभर कष्ट करत होते. चांगल्या शाळा-कॉलेजातला प्रवेश म्हणजे भरपूर फी आणि फक्त तेवढेच नाही तर त्याबरोबर असलेले इतर खर्च मग आपल्या मुलांसाठी आपण कष्ट नाही केले तर कोण करणार अशी त्यांची भावना.

कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असलेला कमलेश एके दिवशी घरी आला तो भरपूर दारू प्यालेल्या अवस्थेत, धड चालताही येऊ नये असा. त्याच्या दोन मित्रांनी धरून त्याला घरी पोहोचवले.
वडील भयंकर चिडले, पण आईने कसेबसे उद्या सकाळी आपण त्याच्याशी बोलू म्हणून त्यांना शांत केले.
त्या रात्री आई-वडील दोघांना झोप नाही.




सकाळी उठल्यावर कमलेशला दोघांनी समोर बसवून विचारले. त्यालाही आपल्या वागण्याची लाज वाटत होती.
पुन्हा असे कधीही करणार नाही असे त्याने कबूल केले. आई-वडिलांनी विषय फार ताणला नाही.

कसेबसे आठ दिवस नीट गेले आणि परत एकदा कमलेश तसाच घरी आला.
आता मात्र वडिलांचा संयम सुटला. त्यांनी त्याला जोरदार फटका ठेऊन दिला..पण त्या फटक्याने कोलमडून पडलेल्या कमलेशला आपल्या जागेवरून उठता देखील आले नाही, इतका तो शुद्धीवर नव्हताच. 

वडील संताप करत आणि आई रडत रात्रभर पुन्हा जागे.
दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी त्याला जागं केलं ते त्याचं बखोट धरूनच.
पुन्हा- चुकलो, असं करणार नाही परत..मित्रांनी पाजली..अनेक बोलाचाली आणि गोंधळ होऊन एकदाचा आई वडिलांची शपथ घेऊन तो दिवस सगळ्या कुटुंबाचा पार पडला.

वडील कमलेशच्या मित्रांना भेटले. असे वागू नका..तुमच्या आयुष्याची सुरवात आहे, आयुष्याचे नुकसान होईल, तुम्हाला प्यायची तर प्या पण कमलेश ला तुमच्या बरोबर नेऊ नका असे म्हणून त्यांनी मित्रांची समजूत घातली, त्यांना विनंती केली.
परस्पर वडील मित्रांना का भेटले या गोष्टीचा राग येऊन कमलेश वडिलांशी जोरदार भांडला. नाही नाही ते बोलला.

आणि त्याच दिवशी रात्री पुन्हा दारू पिऊन घरी आला. यावेळी घरातल्या कोणीही त्याला दार उघडले नाही.
रात्रभर तो बाहेरून जोरजोरात बडबडत दार वाजवत राहिला पण तरीही वडिलांनी कोणाला त्याच्यासाठी दार उघडू दिले नाही.
त्याच्यापेक्षा लहान असलेला त्याचा भाऊ घाबरून गेला.

इतक्या दिवस घरापुरती असलेली ही गोष्ट आता आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना समजली.
कोणी उघडपणे काही म्हणाले नाही पण आई-वडिलांच्या अस्वस्थपणात भर पडली.
आजवर कधीही कोणी आपल्याकडे बोटदेखील न दाखवलेल्या आई-वडिलांच्या स्वाभिमानी आणि प्रामाणिक मनाला जबरदस्त धक्का बसला.
चौकोनी कुटुंबात वादळ पाऊल न वाजवता घुसलं होतं.

हळूहळू कमलेश रोज दारू प्यायला लागला. अभ्यासातलं त्याचं लक्ष कधीच उडालं होतं.
कॉलेजच्या शेवटच्या वर्षात त्याचे सगळे विषय राहिले. आता फक्त दारूने भागेना..सिगारेट,गांजा आणि आणखी काय काय अशी व्यसनं वाढत गेली.
हे सगळं मिळवण्यासाठी त्याला पैसेच देऊ नका म्हणजे तो हे करणार नाही असा सल्ला नातेवाईक-आजूबाजूला राहणारे लोकं पण वाटेत उभं राहून घरातल्या सगळ्यांना द्यायला लागली.

पण या गोष्टींसाठी त्याला कोणीही घरातून पैसे देत नव्हतं. त्याचा हातखर्चासाठी दिले जाणारे पैसे बंद करूनही त्याचा खर्च तो कसा करतो हे एक गूढ होतं. इतके पैसे रोज मित्र तरी कसे खर्च करतील.
आई-वडिलांना या गोष्टीची पण काळजी वाटली.
आता तर त्याच्याशी संभाषण पूर्ण बंद होतं. आई स्वयंपाक करून ठेवे आणि तो मनाला वाटेल त्या वेळी जेवत असे किंवा नसे. हळूहळू तो रात्री आणि दिवसाही घरी येईनासा झाला.

वडिलांनी डोक्यात राग धरला आणि ते अबोल होत गेले.
लहान भाऊ दिवसभर अभ्यासाची पुस्तकं घेऊन बसे आणि आई तिच्या ऑफिस व्यतिरिक्त उपास आणि पारायणं करत बसे.
घरातला एकमेकांमधला संवाद संपला. वातावरण बिघडलं. नातेवाईक आणि शेजारीपाजारी घरी येईनासे झाले.

दोन-तीन वर्ष अशी गेली. शेवटी कोणाच्यातरी सांगण्यावरून त्याला पुण्यातल्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं.
वर्षातून दोनदा तीन महिने तिथे राहून पुन्हा घरी आलेला कमलेश आता अनुभवातून शहाणा झाल्यासारखा वागत होता.
आई आणि भाऊ त्याच्याशी व्यवस्थित बोलत असले तरी वडील आणि त्याचे संबंध ताणलेलेच राहिले.

त्याने पुढच्या दोन वर्षात आपली डिग्री परिक्षा दिली आणि त्याला लगेच एका औषध कंपनीत एम. आर. ची नोकरी पण मिळाली. सुरुवातीच्या काम शिकण्याच्या वर्षात त्याने चांगले काम केले. त्याने घालवलेले गुडवील त्याने परत एकदा कष्टाने मिळवले.

एक चांगली मुलगी बघून त्याचं लग्न लावून दिलं घरच्यांनी आणि त्याला ओळखणाऱ्या सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. त्याच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरवात झाली. बायकोबरोबर त्याचं चांगलं जमलं. वर्षभरात त्यांना एक छोटं बाळ पण झालं.

कमलेशचा कामाचा व्याप वाढला, जबाबदाऱ्या वाढल्या. कामानिमित्त फिरतांना त्याला अनेकांना भेटावे लागे, स्पर्धा होती आणि कामाचे प्रेशर पण होते.

एके दिवशी रात्री ऑफिसच्या सिनिअर लोकां बरोबर बाहेर जेवतांना सगळ्यांनी त्याला ड्रिंक घ्यायचा खूप आग्रह केला एरवी निग्रहाने नाही म्हणणारा कमलेश त्या दिवशी आपल्या बॉसला नाही म्हणू शकला नाही आणि तिथे पुन्हा गडबड झाली. हळूहळू त्याचे प्रमाण वाढत गेले आणि तो सुरवातीचा एक दिवस पुन्हा परत पूर्वीचे सगळे दिवस घेऊन आला.

बघता बघता त्याचे व्यसन हाताबाहेर गेले. त्याने कष्टाने कमावलेले पैसे संपायला सुरवात झाली. बायको बरोबर भांडणं व्हायला लागली. आणि आता निवृत्त होत असलेल्या वडिलांना या मुलाला कसे सांभाळावे, समजवावे हेच  समजेना.
लहान भाऊ घरातल्या सगळ्या वातावरणाला कंटाळून कायमचा दुसऱ्या शहरात राहायला गेला. पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात ठेवण्याचा पर्याय वापरला गेला. पण त्यानंतर काही दिवसांत तो आपल्या जुन्या मार्गाकडे वळे. 

आता तर व्यसनमुक्ती केंद्रातून आल्यावर लवकरच तो पुन्हा प्यायला सुरवात करत असे.
हळूहळू त्याची तब्येत बिघडली, आणि दिवसेंदिवस बिघडतच गेली. एकेक दिवस काढणे आई,वडील, बायको आणि त्याला स्वतःलाही अशक्य झाले.

महागडे उपचार आणि औषधं या सगळ्यात आईच्या रडण्यापुढे आणि त्याच्या बायको-मुलाकडे बघून नाईलाजाने वडील खर्च करत असत. पण मनातून त्यांचा धीर खचून गेला होता.

त्याला समजावण्याचे सगळे उपाय थकले आणि एक दिवस वडील आणि त्याच्यात 
जोरदार भांडण झाले.
त्याने वडिलांना ढकलून दिले. त्यांनी याला “असे जगण्यापेक्षा तू मेलेला चांगला” असे म्हणून घराबाहेर काढले.

तिरीमिरीत घराबाहेर पडलेल्या कमलेशने त्या दिवशी शक्य होईल तितकी दारू प्यायली आणि कसाबसा ऑफिसला गेला. त्या दिवशी त्याच्याकडून राजीनामा लिहून घेण्यात आला आणि त्याला घरी आणून सोडण्यात आले.



कमलेश जवळजवळ बेशुद्ध होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले.
आठ दिवस त्याची तब्येत जास्त जास्त बिघडत गेली आणि तशी तशी त्याला जाणीव झाली आपण आपल्या आयुष्याचे हे काय करून घेतले..त्याला पश्चाताप झाला. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. त्याला जो कोणी भेटेल डॉक्टर, नर्स सगळ्यांना तो मला वाचवा, अशी मनापासून विनंती करत असे. घरातल्या सगळ्यांची माफी मागत असे आणि देवाकडे सतत ‘एक संधी’ मागत असे. आता मी चांगलं वागेल, मला फक्त एक संधी द्या..त्याचा आक्रोश चाले. त्याच्याकडे बघून सगळ्यांना वाईट वाटायला लागले. एका चांगल्या घरातल्या मुलावर ही काय वेळ आली असे वाटत असे. 
पण त्याच्या व्यसनाने पोखरल्या गेलेल्या शरीराने त्याची साथ देण्याचे नाकारले. 

इतक्या दिवस त्याने एकदाही शरीराची हाक ऐकली नाही आणि आज शरीराने त्याची ऐकली नाही!  
शेवटी आज तो गेला. एक आयुष्य संपलं.

आणि त्याबरोबर भरडल्या गेलेल्या आई-वडिलांच्या आयुष्यातला संघर्ष देखील आज संपला.

तू आम्हाला मेलेला बरा असं म्हणण्या इतपत त्याने स्वतःचं आयुष्य त्याच्या जवळच्या माणसांसाठी नकोसं केलं होतं.

आज तो गेला आणि सगळे फक्त शांत झाले. बायको,आई-वडील,भाऊ कोणाच्याही डोळ्यात पाणी आले नाही.
म्हणजे त्यांना वाईट वाटले नाही असे नसेल..वाईट तर नक्कीच वाटले..

त्याचे संपूर्ण आयुष्य एक प्रवास होता.

जन्माची तारीख आणि मृत्यूच्या तारखे पर्यंतचा!
आपल्या प्रत्येकाचा ही प्रवासच असतो, पण वेगवेगळा.

एखादी घटना आपल्याबाबतीत घडत असते त्यावेळी आपण स्वतःदेखील त्या घटनेचा एक भाग असतो त्यामुळे घडणाऱ्या घटनेतील भावनिक चढ-उतार, आपले आणि दुसऱ्यांचे देखील अनुभवतांना आपण त्या क्षणात, क्षणाबरोबर वाहून जात असतो. जसे 

कमलेश बरोबर त्याच्या आयुष्याशी जोडले गेलेल्या घरातल्या इतरांची आयुष्य देखील बदलत गेली. त्यांना ते बदल आवडत असो नाहीतर नसो पण त्यांना ते स्वीकारावे लागले.

घडत असलेले सगळे घटना,प्रसंग स्वीकारावे लागले.
घटना एखाद्या प्रवाहा सारखी असते. वेळेचा प्रवाह.

आपल्याला उलटे पोहता येत नाही. थांबता पण येत नाही. पुढच्या दिशेने जावे लागते.
हे खरे असले तरी पण या प्रवासात केवळ घटना आणि प्रसंग असतात असे नाही तर काही मुक्काम असतात, विसावे असतात.

आयुष्य म्हणजे काही नाटक नाही एकामागोमाग एक फक्त प्रसंग घडत जायला.
मध्ये मध्ये विश्रांती मिळते. स्वतःचा खास आणि खाजगी वेळ मिळतो.

त्यावेळी घडलेल्या प्रसंगातल्या आपले आणि इतरांचे वागणे, प्रतिक्रिया तटस्थपणे आणि दुरून न्याहाळता आणि बघता येतात. यावेळी आपली भूमिका प्रसंगातल्या कर्त्याची नसते तर फक्त बघ्याची असते.

म्हणून ‘कर्त्याला’ जी दिसू शकली नाही अशी प्रसंगातली तिसरी मिती ‘बघ्याच्या’ डोळ्यांना दिसते.
आणि घडून गेलेल्या प्रसंगाचे जास्त सजक, जाणते आकलन होऊ शकते.

हा विश्रांतीचा आणि मुक्कामाचा वेळ विचार करण्याचा असतो, भान येण्याचा असतो.
प्रत्येकाच्या आयुष्यात असे विश्रांतीचे क्षण येतात. भरपूर संख्येने येतात. हे ‘बघण्याची दृष्टी मिळण्यासाठी नजर व्यापक केली पाहिजे.


आणि त्यांची जाणीव झाली की ते क्षण आपण आपले स्वतःचे आणि जमले तर इतरांचे आयुष्य सावरण्यासाठी वापरू शकतो.

असे विश्रांतीचे क्षण कमलेश आणि त्याच्या घरातल्या लोकांच्या आयुष्यात आले नाहीत असे नाही..आले असतील पण त्यांना त्याकडे बघण्याची दृष्टी दुर्दैवाने मिळाली नाही.
कमलेशच्या आयुष्यात जे घडलं त्याला सर्वस्वी तो जबाबदार, हे सत्य तर आहेच आणि असं म्हणणं सोपं देखील आहे.

पण खरंच तो एकटाच जबाबदार आहे का?


  

    
   




रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७

प्रेमस्वरूप ‘आई’



परवा सगळे मित्र-मैत्रिणी जमलो होतो एकत्र. समीरचं फार्महाउस फार छान आहे म्हणून सगळ्यांनी तिथेच भेटूया यावेळी असं ठरवलं आणि तसं समीरला सांगितलं, त्याला आनंद झाला. समीर स्वभावानं अबोल आहे पण सगळ्यांनी एकत्र जमायचं ठरवलं की तो सगळ्या गोष्टी बाजूला ठेऊन आवर्जून येतो.
त्या रात्रीही इतर सगळे पत्ते खेळायला बसले आणि बघता बघता त्यांचा डाव रंगला. समीर दुसऱ्या दिवशीच्या कामाच्या सूचना देत होता मागच्या अंगणात लोकांना आणि मी रातराणीच्या सुगंधात अडकून तिथेच खुर्चीवर बसले होते..
काम आटोपून तो माझ्याजवळ येऊन बसला आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या. विषय निघाला आमच्या लहानपणाबद्दल..

त्याच्या लहानपणाची पहिली आठवण आहे ती सकाळी उठतांना अंगावरून पांघरूण खसकन जोरात ओढून आईने झोपेतून उठवण्याची.आता कोणाच्या इतर काही आठवणी असू शकतात, पण याला कायम हीच आठवते.
बोलता बोलता समीरचा आवाज हळूवार झाला, मी आणि माझी बहीण..मी लहान, माझ्यापेक्षा चार वर्षाने मोठी बहीण.  
आमचा दिवस सुरु व्हायचा तो तिचा रुद्रावतार बघूनच.          

कळायचंच नाही, की तिला रोज इतका राग कशाचा येत असे.
बाबांचं ऑफिस दहा वाजता, ते पंधरा मिनिट आधी घराबाहेर पडत.
आमची शाळा दुपारची असे.
तरी उन्ह असो की थंडी, आम्ही साडे सहाला उठलोच पाहिजे, अशी तिची शिस्त.

सकाळी तिला घरातल्या सगळ्या कामांमध्ये मदत लागे.
आणि आम्ही उठून ती करत असलो तरी तिचा तोंडाचा पट्टा सुरूच असे.
“हजार वेळा सांगितलं की सकाळी अंथरुणात लोळत पडायचं नाही...” या वाक्या नंतरची इतर सगळी वाक्य रोज थोड्याफार फरकाने सारखीच असत.

तिच्या मनाप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करून, एकत्र अभ्यास करायचा आहे हे निमित्त सांगून रोज सकाळी मी माझ्या घराजवळच राहणाऱ्या मित्राकडे जाई. अभ्यास हा बहाणा असे खरंतर..मला त्यांच्या घरातलं सकाळचं वातावरण फार आवडे. छोटं घर होतं त्याचं..फक्त दोन रूम्स..आणि त्या घरात माणसे रहात सहा. मित्र, त्याच्या दोन बहिणी. आई-बाबा आणि त्यांची आजी. पण सकाळी त्यांच्या घरी सगळे एकत्र गप्पा मारत असत..

मी आणि मित्र एका कोपऱ्यात अभ्यास करत असू पण माझं मन त्या गप्पांमध्ये असे.
त्याची आई खूप प्रेमळ होती. ती घरातली कामे करतांना घरातल्या इतरांशी बोलत असे..विषय साधेसेच असत पण माझ्या लक्षात राहिलाय तो तिचा हसरा, प्रेमळ चेहरा..आणि तिचे काम करणारे हात.
कधी ती आम्हाला चहा देई, कधी काही खाऊ समोर ठेवे..
आम्ही काय अभ्यास करतोय, याकडे पण तिचं लक्ष असे अधूनमधून.
कधी त्याच्या दोन बहिणी आईशी काही बोलत असत आणि आई त्यांना त्यांनी काय केलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करत असे. कधी आजी तिच्याजवळ बसून तिला आपल्याला काय होतंय, हे सांगत असे आणि आई तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकून घेत असे..
कधी बाबा आणि ती एकमेकांशी घरातल्या काही गोष्टींवरून गप्पा मारत असत.
आणि यापैकी काही करत नसेल ना त्यावेळी ती हसतमुख, प्रसन्न आणि शांत चेहऱ्याने काम करत असे.

मी एकदाही त्यांच्या घरात मोठ्याने आवाज ऐकला नाही. मला खूप आवडायचं ते वातावरण.
मला कोणी माझ्या मनावर मोरपीस फिरवत आहे असे वाटे.. हळूहळू माझं मन शांत होत जाई..
लहानपणाचा विचार मनात आला ना की सकाळच्या वेळी त्यांच्या घरात असलेल्या त्या वातावरणातून मिळालेली स्निघ ऊब अजूनही मला आतून उर्जा देते!  
कसं ना प्रत्येकाच्या आत अशा इवल्या इवल्या प्रकाशाच्या पणत्या अखंड तेवत असतात!
आणि त्यांचं असणं आपल्यासाठी किती अश्वासक असतं आपल्या आयुष्यात.
आईने रोज सकाळी झोपेतून उठवणं...म्हटलं तर अगदी साधीशी गोष्ट.
पण किती जवळची असते मुलांच्या भावविश्वाशी.
  


मित्राच्या घरातल्या वातावरणातून स्वतःसाठी शांततेचे परागकण वेचणारा समीर..आता मला आपलेपणा वाटायला लागला त्याच्याबद्दल.
कारण ‘त्याच्या घरी आहे ते माझ्या घरी का नाही’..असा विचार जरी त्याच्या मनात आला असता तर?
परिस्थिती आपल्या हातात नसते पण तिच्यातून स्वतःसाठी काय निवडायचं हे मात्र नक्कीच आपल्या हातात असतं!

याचा अर्थ समीरची आई चांगलं वागत नव्हती असं नाही, तिचा स्वतःचा दिवस असा सुरु होत असेल तर ती स्वतः किती त्रासात असू शकेल...काय माहीत तिला कसला त्रास होत असे ते.
कदाचित तिला त्यावेळी मदतीची गरज असेल..हे कोणाला कधी कळलंच नाही!
असं माझ्या मनात येतंय तोच समीर म्हणाला, अगं तिचा स्वभावच तसा होता. सहनशक्ती कमी होती तिच्याकडे.

फार पट्कन राग यायचा तिला. अर्थात नंतर नंतर वयोमानाप्रमाणे फरक पडला तिच्यात बराच. आता तर ती एक प्रेमळ आजी आहे..असं म्हणून समीर हसला..
आणि लगेच पुढे म्हणाला..  
पण आमचं लहानपण तर निघून गेलं तोपर्यंत...
तुला माहितीये? मी आणि माझी बहीण दोघांनीही त्याचवेळी ठरवलं की आपल्या मुलांशी असं वागायचं नाही कधी.

कोणी मनातलं काही सांगायला लागलं की तो जे बोलतोय त्यापेक्षा त्याचे डोळे,आवाज आणि हावभाव जास्त बोलके असतात.
मलाही अंदाज आला की फक्त झोपेतून उठवण्यापुरतेच मर्यादित लहानपणाचे अनुभव नसावेत.

कोणीतरी हाक मारली म्हणून आम्ही दोघेही उठून ग्रुपमध्ये जाऊन बसलो.
आमच्या दोघांमधला मैत्रीचा एक धागा आणखी घट्ट झालेला जाणवला.

“आई” मुलांच्या भावविश्वाशी जोडलं गेलेलं सगळ्यात जवळचं नातं..
या नात्यातला अनुभव ठरवतो मुलांच्या आयुष्यातला भावनांचा प्रवास.

म्हणून मुलांना जन्म देण्या आधीच प्रत्येकीने विचार करायला हवा की आई होण्यासाठी माझ्या मनाची मशागत पूर्ण झाली आहे का?

कारण मुलांना जन्म देणं वेगळं आणि “आई” होणं वेगळं..
जन्म देणं ही केवळ साधी नैसर्गिक घटना आहे. त्या अर्थाने आई कोणालाही होता येतं.

पण जन्म दिल्यानंतर सुरु होतो तो एक प्रवास आहे.
त्यातून ‘आईपण’ घडत जातं. त्या अर्थाने ‘आई’ हा शब्द म्हणजे केवळ व्यक्ती नाही.
तर ‘वृत्ती’ आहे..

हे एकदा समजलं ना तर “आई” कोणालाही होता येतं..
‘आई’ ला आणि ‘बाबां’ना देखील!