शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

रुजवू नवी दृष्टी...

 



रुजवू नवी दृष्टी...


नवरात्र आलंय आणि माझी पाळी नेमकी त्याच काळात आहे. सासूबाई म्हणतायेत गोळी घे, काय करू?” आमचं बोलणं संपल्यावर तिने अचानक विचारलं. “तुला काय वाटतं?” मी विचारलं. “नाहीच घेणार,पण खरंचआली तर?” तिच्या ‘नाही घेणार’ म्हणण्यातला मानसिक दबाव मला जाणवला. आजच्या,उच्चशिक्षित मुलीला स्वत:साठी योग्य काय हे माहीत आहेच तरीही नव्या नात्यांमध्ये सुरवातीलाच ताण नको अशी स्पष्टता तिला विचारांमध्ये हवी होती. अशी अतार्किक अपेक्षा करणारी व्यक्ती बऱ्याचदा स्त्रीच असली तरी तिच्याही संपूर्ण आयुष्यावर असलेला परंपरांचा पगडाच त्यामागे असतो. त्यामुळे सगळा राग तिच्यावरच काढता येईल, इतकी ती दोषी नाही. न पटणाऱ्या परंपरा, त्रासदायक आहेत, व्यक्ती नाही. कोणत्याही परिस्थितीत उत्तरांच्या एकापेक्षा अनेक शक्यता असतात. विरोधासाठी दुराग्रह,हट्ट,भांडण हे पर्याय सगळ्यात आधी आणि नेहमीच वापरले जातात. त्याने मुद्दा साध्य झाला तरी माणसं मात्र मनाने दुरावतात. आपलं शिक्षण, शहाणपण वापरून यापेक्षा वेगळं काय करता येईल? परंपरांबद्दल आपली मते, ग्रह,पूर्वग्रह बदलण्याचा विचार लोकंही सामंजस्याने करतील,असे काही पर्याय निघू शकतील का? हा विचार करतांना परंपरा बदलायच्या की त्यामागे असलेल्या बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी बदलण्याची, आग्रही भूमिका बदलण्याची गरज आहे? आपल्याच मनाला पटलेल्या गोष्टी आपण इतरांनाही सहज पटवून देऊ शकतो. म्हणून आधी त्यामागची स्पष्टता स्वत:लाच येणे गरजेचे आहे. मग जुन्या आणि नव्याची सांगड घालणे सहज शक्य होते.   

पूर्वीपेक्षा अनेक आघाड्यांवर आज सामाजिक, सांस्कृतिक वास्तव बदलले आहे. स्त्रियांना आपली जीवनपद्धती निवडण्याचे सामाजिक,आर्थिक स्वातंत्र्य आहे. आपल्या आयुष्याच्या विकासाचे मार्ग शोधण्याची आत्मनिर्भरता,स्वत्त्वाची जाणीव तिच्यात बऱ्याच प्रमाणात आहे. पण यापाठीमागे अनेक स्त्रियांच्या आयुष्यभराचा मोठा संघर्ष आणि सातत्याचा वारसाआहे. केवळ म्हणूनच आज अनेक शहरी, ग्रामीण स्त्रिया सक्षमपणे जगू शकतात. स्वत:बरोबरच समाजबदलासाठीही हातभार लावू शकतात.
आजच्या युगाचे हे खरे आव्हान समाज,कुटुंब आणि व्यक्ती यांच्या मानसिक बदलाचे आहे. स्त्रीचे व्यक्तिगत अवकाश जितके व्यापक तितका त्या आपल्या आजूबाजूचा परिसर समृद्ध करू शकतात. म्हणून "पुरुष विरुद्ध स्त्री" असा असलेला आजवरचा समज बदलून "पुरुष आणि स्त्री”यांच्या परस्परपूरक नात्याची गरज आजच्या युगाची आव्हाने पार पडण्यासाठी कुटुंबाला आहे. त्यांनी एकमेकांचा स्वीकार समानतेच्या पातळीवर करणे अपेक्षित असेल तर त्याची सुरवातही कुटुंबातूनच होऊ शकेल. कारण मुलगी आणि मुलगा दोघेही आपल्या कुटुंबातून जे मिळवतील त्यातूनच पुढे त्यांच्या भविष्यातल्या व्यक्त होण्याच्या पद्धती तयार होणार आहेत. स्त्री आपल्यापेक्षा दुय्यम आहे हे मुलांना आपल्याच घरातला अनुभव शिकवतो. आजूबाजूला हेच बघत,जाणवत मुलं मोठे होतात. जोपर्यंत पुरुष आणि त्याच्या सर्वार्थाने बरोबर असलेली स्त्री दोन्ही माणूसच आहेत,असे शिक्षण,संस्कार त्याला घरातूनच मिळत नाही तोपर्यंत तो तिला दुय्यमच समजत राहणार. आजही अनेक सुशिक्षित घरांमध्येदेखील मुलाला आणि मुलीला जाणीवपूर्वक वेगळ्या प्रकारे वाढवले जाते. “स्त्री"ची माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून स्वतंत्र गणना, बरोबरी समाजात मान्य होईल या पातळीवरचा मानसिक बदल कुटुंबात होणे आज अपेक्षित आहे. कारण तिला ‘माणूस’ म्हणून मान्य करायला समाज अजूनही तयार नाही. तिच्यासाठी जगण्याचे निकषच वेगळे आहेत. ती ज्या कुटुंबात जन्माला येते त्यातल्या मान्यतांप्रमाणे आणि पद्धतींप्रमाणे ते आहेत. पालकांकडूनच असा फरक केला जातो. याचे कारण स्त्री निसर्गतःच वेगळी आहे असे सांगितले जाते. पण स्त्रीमधले नैसर्गिक स्त्रीत्त्व हीचतर तिची ताकद आहे. या वेगळेपणातच तिच्या  सगळ्या क्षमता आहेत. केवळ ती ‘स्त्री’ आहे म्हणून असलेल्या मर्यादा नाहीत. पुरुषही निसर्गतः वेगळाच आहे पण ‘पुरुष’ असणे ही काही त्याची ‘गुणवत्ता’,‘दर्जा’ नाही. शरीरे वेगळी आहेत म्हणून त्यांच्या केवळ शारीरिक क्षमता वेगळ्या आहेत. या कारणासाठी स्त्रीच्या सर्वांगीण वाढीच्या संधी का मर्यादित असाव्यात? मानसिक,वैचारिक, बौद्धिक, तार्किक अशा अनेक बाजूंनी तर ती पुरुषांइतकीच सक्षम आहे. तिच्या जगण्याच्या नीतीमूल्यांबाबत परंपरेने बनवलेल्या फुटपट्टीनुसार वागायची फक्त तिच्यावरच  सक्ती का? इतरांच्या अपेक्षांच्या चौकटीत,ओझ्याखाली फक्त तिनेच का राहावे? स्वतःच्या क्षमता सिद्ध करण्यासाठी,स्वतःचे अनुभव स्वतः घेण्यासाठी स्त्री पुरुषाइतकीच सक्षम आहे. पण काय योग्य काय अयोग्य हे तिच्या मनावर इतके बिंबवलेले असते की हे ओझे झटकून टाकून आपले अस्तित्व टिकवण्यासाठीच तिला संघर्ष करावा लागतो. आपल्याला भविष्यातली इमारत पक्की हवी असेल तर कुटुंबातल्या व्यक्तींच्या मनात एकमेकांच्या क्षमतांचा,कौशल्यांचा आणि एकमेकांवरच्या विश्वासाचा पायाच मजबूत हवा. कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले नाते सुसंवादी आणि एकमेकांना सांभाळून घेणारे असेल तर मग कुटुंबातील आणि समाजातील पूर्वापार चालत आलेल्या अविवेकी धारणा, समजूती यांना पुरून उरण्याचे मानसिक धैर्य स्त्रीला मिळेल. या तकलादू चौकटी ओलांडून, आपण घेतलेले निर्णय स्वत: निभावून नेले तर तिला जगण्याचे समाधान मिळेल. कोणतीही चाकोरी मोडणे तसे सोपे कधीच नसते त्यासाठी खूप मोठे आत्मिक बळ लागते. म्हणूनच पूर्वी किंवा आजही आगळेवेगळे कर्तुत्त्व गाजवलेली स्त्री इतरांसाठी लगेच पूजनीय, जणू देवीच होऊन जाते. त्यावेळी तिच्या प्रवासातला सुरवातीचा टप्पा तिच्या हेतूंवर जहरी टीका करण्याचा,शंका घेण्याचा,तिचे पाय जमतील तसे आखडून ठेवण्याचाच होता हे सगळे सोयीस्करपणे विसरले जाते. एकतर अबला म्हणून तिला दाबून ठेवा नाहीतर सबला म्हणून तिची थेट पूजाच करा,अशी सवय आजवर समाजाला लागलेलीआहे. आपल्यावरील समाज संकेतांचे दडपलेपण दूर करण्यासाठी आपल्यापरीने धडपडणाऱ्या मध्यम मनोवृत्तीच्या इतर सगळ्या स्त्रियांना मग स्वतःच स्वतःसाठी उभे रहायला हवे. त्यांना एकमेकींचे अनुकरण करून जगण्याची गरज नाही. त्यांना आपले मत आहे,आवाज आहे. मुखवट्यांशिवाय असलेला खरा चेहरा आहे. स्वतःच्या समस्या नेमक्या समजून घेण्यासाठी त्यांना आपले विचार,संवेदना,भावना आणि जाणिवा स्पष्टपणे व्यक्त करता आल्या तर आपली मानसिक उर्जा एकमेकीना जोडण्यासाठी, संवाद, मंथन घडवून आणण्यासाठी त्या वापरू शकतील. सर्वसामान्य स्त्रीला विश्वासाने जगण्यासाठी स्वातंत्र्याचे मुक्त अवकाश जेव्हा तिच्या स्वत:च्या कुटुंबात आणि समाजात मिळेल तेव्हा खऱ्याअर्थाने स्त्रीशक्तीचा उत्सव साजरे करण्याची मानसिक,सामाजिक गरज संपेल,असे वाटते.

© डॉ.अंजली औटी


--