Tuesday, 18 September 2018

प्रेमाचे रंग हजार
                                                   
शर्थीचे प्रयत्न करून डॉक्टरांनी त्याला वाचवले. जवळजवळ अठरा तासांनी तो शुद्धीवर आला आणि त्याने पुन्हा डोळे उघडले. प्रेमभंगाचे दु:ख सहन न होऊन त्याने निकराचा आत्महत्येचा प्रयत्न केला होता..वय होते केवळ २६.
शुद्धीवर आला पण आता निसर्गाने त्याची चालण्याची क्षमता हिरावून घेतली होती. या अपघातात त्याने त्याचे दोन्ही पाय गमावले होते!
आई,बाबा,त्याच्या दोन्ही बहिणी यांनी दिवसरात्र एक करून त्यानंतर पाच महिने त्याची जीवापाड काळजी घेतली.
शरीराच्या वरवरच्या,खोलवरच्या सगळ्या जखमा बऱ्या झाल्या. पण मन?
मन अजूनही अंधारलेल्या खोल दरीत जगण्याचा एकतरी धागा हाती लागतोय का हे शोधण्यासाठी धडपडत होतं.
संवेदनशील तर तो होताच. घरातल्या आणि त्याला भेटायला येणाऱ्या सगळ्या जवळच्या लोकांच्या चेहऱ्यामागचे प्रश्न त्याला त्यांच्या डोळ्यांमधून अगदी स्पष्ट वाचता येत होते.
त्याच्याशी सतत संपर्क साधून असलेल्या आणि त्याच्यावर नियमित उपचार करणाऱ्या डॉक्टर अस्मिताने त्याला अनेक विषयांवर अत्यंत हळूहळू बोलते केले होते.
संपूर्ण अंधारकोठडीत असलेल्या मनाला हळूहळू पुन्हा नेहमीच्या जगापर्यंत घेऊन येणं वाटतं तितकं सोपं नाही..ना परिस्थितीत अडकलेल्यासाठी आणि ना त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी धडपडत असलेल्यांसाठी.
एखादी घटना एकदाच घडते. पण तिचे परिणाम संबंधित सगळ्यांच्या आयुष्यावर दूरपर्यंत परिणाम करतात.
काही परिणाम तर संपूर्ण आयुष्य प्रभावित करतात आणि न बदलता येण्यासारखे कदाचित कायमचे होऊन बसतात,
जसे या घटनेनंतर स्वराजचे पाय गेले.
सापशिडीच्या खेळासारखं आयुष्य झालं..उच्च शिक्षण घेऊन, कॅम्पस इंटरव्ह्यूमधून एका नावाजलेल्या कंपनीत नोकरीसाठी निवड झालेला तो..एका अविचाराच्या मानसिक अवस्थेत पुन्हा शून्यापर्यंत, एकदम तळाशी येऊन पोहोचला होता.
एखादी महत्वाची गोष्ट आपण गमावतो ना त्यानंतरच लक्षात येतं, अगदी पूर्णपणे, की त्या गोष्टीचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व होतं!
पश्चातापाच्या आगीतून होरपळून घ्यावं लागतं स्वत:ला. जे प्रश्न मनाशी बोलायला सुद्धा टाळत असतो त्यांचा सामना करावाच लागतो,मग इच्छा असो किंवा नसो तुमची.
स्वराजलादेखील यातलं काहीही चुकलं नाही. वेळ घेत, त्याच्या कलाकलाने अस्मिताने त्याला एकेक करून सगळ्या नकोशा प्रश्नांचा सामना करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार केलं.
कॉलेजला असल्यापासून अवंती सोबत होती त्याच्या. पहिल्याच वर्षी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये त्याचं प्रेम आणखी आणखी घट्ट होत गेलं..मिळून कितीतरी स्वप्न बघितली. मनं एकजीव झाली.
त्याला पुढे अजून शिकायचं होतं पण तिला आता कमावण्याचे वेध लागले होते. संपूर्ण कॉलेजमध्ये अगदी शिक्षकांच्यापण लक्षात त्यांची जोडी आली होती. डिग्री पूर्ण झाल्यानंतर अवंतीने लगेच नोकरी करायला सुरवात केली आणि स्वराज आणखी शिकण्यासाठी सिंगापूरला गेला.
या दोन वर्षातच सगळं बदललं. अवंती दूर दूर जायला लागली. स्वराज सैरभैर झाला. त्याने हरतऱ्हेने प्रयत्न करूनही त्याला त्याचं नातं पुन्हा सावरणं शक्य झालं नाही.
एकीकडे लौकिकदृष्ट्या यशाच्या शिखराकडे जाणारा तो मनातून मात्र अधोगतीच्या रस्त्याने चालायला लागला.
चांगली नोकरी मिळवून पुन्हा भारतात परतलेला तो उत्साहात आणि आनंदात तिला भेटायला गेला आणि त्या भेटीतच त्याला अवंतीने झिडकारलं. अपमान आणि संतापाच्या कडेलोटातून त्याने संपूर्ण आंधळेपणाने आत्मघाताचा पर्याय निवडला.
अविचाराचा हाच एक क्षण, ज्यावेळी व्यक्तीमधली बुद्धीमत्ता आणि अंगातलं, अनुभवातलं सगळं शहाणपण माणसाला सोडून जाऊ शकते. संस्कार,शिक्षण आणि यशदेखील मागे खेचू शकत नाहीत. 
त्या क्षणाकडे डॉ. अस्मिताने त्याला नीट बघायला सांगितले. तो “क्षण” ज्याचा सामना करण्याचे टाळण्यासाठी त्याने स्वतःच्या आयुष्याची किंमत मोजायचा पर्याय निवडला.
पण आयुष्यात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा सामना माणसाला कधी न कधी करावाच लागतो. आपले नेमके काय चुकले, आणि का चुकले हे नीट समजून घेतल्याशिवाय तुम्हाला पुन्हा पुढची वाट चालणे अशक्य होते.
आणि एखाद्याने तसा प्रयत्न केलाच तर तो आयुष्यात पुन्हा पुन्हा तीच ती चूक सातत्याने करत राहतो.
अवंती भेटण्याच्या आधी त्याच्या आयुष्याचा जो काही रस्ता होता, त्यातले टप्पे होते ते त्याचे आयुष्य सुद्धा अनेक घटनांचे आणि जवळच्या नात्यातील लोकांनी केलेल्या प्रेमाच्या अनेक घटनांनी बनलेले होते.
प्रत्येकाचे त्याच्या आयुष्यात एक वेगळे स्थान होते,महत्व होते. या सगळ्याचा पुन्हा विचार करावा लागला.
त्याच्या एका निर्णयाने हे सगळे महत्व आणि सगळे प्रेम एका क्षणात मातीमोल ठरवले होते. हे त्यांच्या सगळ्यांवर अन्याय करण्यासारखे होते! एखाद्या व्यक्तीचा फक्त काही वर्षांचा सहवास एखाद्याला आपल्या स्वतःच्या आयुष्यापेक्षा मोठा वाटतो, या त्याच्या विचारांचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे अत्यंत गरजेचे होते.
आजही सावरण्याच्या प्रत्येक क्षणात त्याच्या खऱ्या जवळची नाती शब्दही न बोलता त्याच्या मनाची संपूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न करत होती.
अवंतीवर केलेलं प्रेम आणि त्याचे इतर आयुष्य...काहीवेळा तुलना अपरिहार्य असते आणि ती केली की एरवी मनाला न समजणारा फरक ती अत्यंत परखडपणे दाखवून देते.
आयुष्य प्रत्येकवेळी सहज,सुंदर नसते..आपण चुकीचे निर्णय घेतले की आपल्याला जागेवर पुन्हा परत आणण्यासाठी ते अशी जोरदार थप्पड मारण्याची क्षमता देखील ठेऊन असते.
आणि मग कुठे तो फरक आपल्याला अगदी स्वच्छ दिसायला,जाणवायला लागतो!....मगच दृष्टिकोन बदलतो!!
प्रेम त्यालाच समजते जो आधी स्वतःवर प्रेम करतो..प्रेमातला हा गुणात्मक फरक जाणवला आणि स्वराज मनातून कमालीचा खजील झाला. अस्मिताने त्याच्या लक्षात आणून दिले की तो स्वतःवर देखील प्रेम करत नव्हता.
अवंती केवळ स्वतःवरच आंधळे प्रेम करत होती म्हणून तिने कोणताही मागचापुढचा विचार न करता नाते संपवण्याचा निर्णय क्रूरपणे स्वराजला ऐकवला. आपण ‘प्रेम’ कसे करतो,’नकार’ कसा देतो हे देखील त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. आपापल्या व्यक्तिगत मर्यादांनुसार माणसे वेगवेगळ्या प्रकारे दुसऱ्यांशी वागू शकतात.
‘अवंतीचे प्रेम म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वस्व आहे’ ‘तिच्याशिवाय मी आयुष्य जगू शकत नाही’ असे विचार करणारा स्वराज स्वतःला अत्यंत कमी समजला होता.
स्वतःची लायकी अवंतीच्या समोर अत्यंत कवडीमोल आहे,असे समजला होता!
तिच्याशिवाय जगणे असह्य होऊन त्याने जवळजवळ स्वतःला संपवले होते..
आणि त्याला अजूनही असे वाटत होते की मी अवंतीवर अत्यंत मनापासून “प्रेम” केले.
पण खरेतर स्वराजला मुळात “प्रेम” म्हणजे काय? याची अजूनही समज अजिबात नव्हती.
“प्रेम” ही केवळ एक भावना आहे! सिनेमात दाखवतात तशी ती एकरंगी, एकसुरी बिलकूल नाही.
“राग” “काळजी””लोभ””वात्सल्य” ”मत्सर””खंत””दु:ख” या मानवी नैसर्गिक भावनेइतकी ती स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे.
अत्यंत राग आला की आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे तो व्यक्त करतो. राग येणे स्वाभाविक पण तो व्यक्त करण्याच्या पद्धती तो अनुभवणाऱ्या माणसांच्या मानसिकतेवर, आयुष्य अनुभवण्याच्या मूळ वृत्तीवर ठरतात.
रागात एखाद्याला, स्वतःला नुकसान पोहोचवणारा राग हा “अनैसर्गिक राग” आहे!
प्रेमदेखील अशीच केवळ एक भावना!
प्रेम व्यक्त करणे प्रेमभावना अनुभवणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.
आत्यंतिक प्रेमासाठी एखादी व्यक्ती स्वतःचे आणि दुसऱ्याचे नुकसान करत असेल तर प्रेम अनुभवण्याची, व्यक्त करण्याची  त्या व्यक्तीची मानसिक क्षमता “रोगट”आहे.
स्वराजचे आणि अवंतीचे स्वतःवरील आणि एकमेकांवरील प्रेमदेखील असेच “रोगट” होते!
पुस्तकी अभ्यासात हुशार असणे वेगळे आणि प्रत्यक्ष जीवन जगतांना लागणारी भावनिक आणि मानसिक साक्षरता सुदृढ होईल असे शिक्षण आज आपल्या मुलांना देण्यात आपण कमी पडतो आहोत या वास्तवाचा हा परिणाम आहे.
स्वराजला पहिल्यांदाच आरोग्यदायी, निरामय “प्रेम” उदाहरणासहित समजले.
अवंतीने “नाही” सांगितल्यानंतर काही काळ वाईट वाटणे, हे स्वाभाविक होते. आपल्या आयुष्यातून माणूस निघून गेल्यानंतर स्वाभाविकपणे वाटणारे दु:ख हे नैसर्गिक आहे.
पण ते दु:ख अनुभवतांना आपला वागण्याचा तोल जाणं आणि त्यातून काही स्वतःला आणि इतरांना कमीअधिक नुकसान पोहोचवणारे निर्णय घेणे ही “दु:ख” सहन करण्याची “रोगी” पद्धत झाली.
प्रेमात अचानक कोणी “नाही” म्हणणं ही त्या नाही म्हणणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वातला,मानसिकतेला,समजेला अनुसरून असते. ‘नकार’ स्वीकारणे देखील असेच समजेवर अवलंबून असते.
आयुष्य जगतांना कोणतेही नाते परस्परांवर अवलंबून असावे पण संपूर्णपणे ‘परावलंबी’ नसावे.
प्रेमभावना किती व्यापक आहे! प्रेम कोणावरही असू शकते, कशावरही असू शकते. प्रेम करण्याची प्रचंड क्षमता माणसात आहे!
ते केवळ व्यक्तीवरच असते असे नाही तर एखाद्या ध्येयावर असू शकते, स्वप्नावर असू शकते, निसर्गावर असू शकते, प्राण्यांवर असू शकते..पुस्तकांवर असू शकते..कलेवर असू शकते..नुसत्या चांगले जगण्यावर देखील असू शकते.
अशी प्रेमात भारावलेली कितीतरी माणसे आपण आपल्या आजूबाजूला बघतोदेखील. अस्मिताने कितीतरी उदाहरणे दिली.
स्वराजला अस्मिताचे म्हणणे संपूर्णपणे पटले.“प्रेम” म्हणजे नेमके काय हे आता कुठे समजले पण त्यासाठी किती मोठी किंमत चुकती केली.
आता आपल्याकडे काय नाही यापेक्षा ‘काय आहे’ तिथून आपण आयुष्याची पुन्हा एक नवी सुरवात करू शकतो हे त्याच्या लक्षात आले.
नोकरी अजूनही हातात होती..भविष्यात अनेक ऑपरेशन करून त्याला कदाचित चालता देखील येणार होते. जवळची,खरी जिवलग सगळी नाती त्याच्याजवळ होती..या संकटकाळात टिकून असलेले अनेक मित्र,त्यांची मैत्री देखील त्याच्या सदैव सोबतच होती आणि आता संपूर्णपणे बदलेल्या दृष्टीकोनातून जगता येईल असे आयुष्य देखील त्याच्या जवळ होते..
स्वराजने मन:पूर्वक अस्मिताला नमस्कार केला. त्याचे डोळे पाण्याने तुडुंब भरून आले.
त्याच्या हातावर हलकेसे थोपटून अस्मिताने त्याचा निरोप घेतला. आता तिला खात्री होती शारीरिकदृष्ट्या आज स्वराजच्या पायात शक्ती नसेलही पण त्याच्यात आता खरेखुरे चालण्याचे बळ नक्कीच आले आहे!   
© डॉ. अंजली/अनन्या औटी.
# आरसा
mindmatteraa@gmail.com

     

  

Tuesday, 21 August 2018

देव नाही देव्हाऱ्यात
“बरं असं करूया आता की आपण दोघींनी एकमेकींचं म्हणणं ऐकून घेऊ आणि मग दोघी मिळून ठरवू काय करायचं ते!”
प्रतिभा म्हणाली, “नीट सांग मला प्राची,काय म्हणणं आहे तुझं?”
दोन दिवस धुसफूस होऊन आज सकाळीच दोघींनी सकाळचा चहा एकत्र घेतला होता..एकत्र राहतांना या गोष्टी चालायच्याच. लगेच काही मनात अंतर पडायला नको म्हणून.
महिनाच झाला होता प्रतिभाला प्राची आणि सुमेधच्या बडोद्याच्या घरी येऊन.
“आई, काळ किती बदललाय, लोकं बदलली आणि संदर्भपण बदलले आपल्या सगळ्यांच्या जगण्याचे.
मला नाही वेळ मिळत रोज पूजा वगैरे काही करायला. सुमेधचा तर विश्वासच नाही देवावरच. गेल्या चार महिन्यांपासून पूजा केलीच नाहीये मी पण..त्याने काय फरक पडतो आणि? मनात आलं कधी, तर करतेही मी..आता धूळ खात पडले देव देवघरात..चांदीची समई चांदीचीच आहे का ओळखूही येत नाहीये..दिसतंय मला पण ते..
                                              


तुम्ही काहीही न बोलता पूजा केली आणि शिरा पण केला नैवेद्याला..अबीर किती खुश झाला ते बघून..हे असं रोज का नसतं आई आपल्या घरात, असं म्हणाला तो..मला मनातून अपराधी वाटतच होतं..त्यात अबीरचं ऐकून कसंतरीच झालं मला..आणि मला समजलंच नाही की मला राग कसला आला ते नेमका..मी दिवसभर चिडचिड केली आणि प्रसाद पण खाल्ला नाही..तुमच्याशी बोलले नाही..हे असं नको होतं मी वागायला..
पण आई, त्यापेक्षा घरात देवघर नसलं तरच बरं होईल..म्हणजे हे असे काही विचार मनात येऊन अपराधी तर वाटणार नाही..”
प्रतिभाला हे असं काही कारण असेल तिच्या चिडण्याचं हे मनात पण आलं नव्हतं..तिला वाटलं त्या दिवशी तिला काय करायचं हे न विचारता स्वयंपाक केला आणि त्या दिवशी सगळ्यांनी बाहेर जेवायला जायचं ठरलं होतं..ते त्या साफ विसरून गेल्या म्हणून ती रागावली..
प्रतिभा सुशिक्षित होती आणि सुजाणही. मुलांना आपली गरज असेल त्यावेळी मदत करून अत्यंत अलिप्त राहून ती दोन्ही मुलांच्या संसारिक गोष्टींपासून जाणीवपूर्वक अंतर राखून होती.
“आता तुम्ही सांगा आई..” प्राची म्हणाली...
“प्राची, मला सांग तुला आवडतं आहे का आता असं देवघर बघायला? नेमकं काय वाटतं सांगशील मला?”
अबीरलाच काय प्राचीला पण मनात कुठेतरी छान वाटलंच होतं..शिवाय त्या दिवशी सुमेधनेदेखील घरातल्या त्या कोपऱ्याकडे अनेकवेळा बघितलं होतं..कदाचित त्याचाच तर तिला राग आला होता..त्या छान वाटण्याचाच..
कारण छान वाटलं की त्याची जबाबदारी येऊन पडते मग..प्रयत्न करावे लागतात ते छानपण टिकवण्यासाठी आणि त्यासाठी लागणारं सातत्य आणि उत्साह तिच्याकडे अजिबात नव्हता..शिवाय त्यापेक्षा आणखी कितीतरी चांगले, constructive उद्योग आहेत की तिला करता येण्यासारखे..आधीच कितीतरी मनात असलेल्या गोष्टीना न्याय देऊ शकत नाही पुरेशा वेळाअभावी..
यांना काय एकदा ‘हो’ म्हटलं की जिंकल्याच की मग त्या..स्वतःच्या मुलाला पटवा मग आधी..देव असतो ते..ते तर शक्य नाही आणि मला सांगतायेत...
मनात हे सगळे विचार ऐका क्षणात येऊन गेले तरी प्रत्यक्षात खोटं बोलून “नाही” सांगणं तिला काही जमलं नाही..
ती कबूल करून मोकळी झाली की मला तर खूप प्रसन्न वाटलं..
आताही तिचे डोळे अभावितपणे तिकडे वळलेच..सगळे देव लखलखीत दिसत होते आणि शांत तेवणाऱ्या समईचा उजेड त्यांच्या चेहऱ्यावर चमकून आणखीच देखणे दिसत होते.
“प्राची..घर तुझं आहे! तू काय केलं पाहिजेस आणि नाही, हे मी तुला कधीच नाही सांगणार. मी मला काय वाटतं ते सांगते हं..
आपलं घर म्हणजे काही फक्त चार भिंती नसतात..घरात राहणाऱ्या माणसांच्या विचार आणि भावनांचे प्रतिध्वनी घरातल्या कणाकणात वसत असतात. संपूर्ण सामावून घेतं आपल्याला आपलं घर..म्हणून तिथे सगळ्यात जास्त विसावा मिळतो आपल्याला..अगदी आठवडाभर वेगळ्या विसाव्यासाठी घराबाहेर जाऊन राहिलात तरी परत घरी यायची ओढ वाटत नाही..असा माणूस कदाचित जगात नाही..’सुख’ साजरे करायला आपण घराबाहेर जातो पण ‘दु:ख’ सहन करण्याची ताकद मिळवण्यासाठी आपण घरीच परततो..कितीही ताण असो,वेदना असो, व्यथा असो..अवघड प्रसंग असो..आपल्याला शांतता मिळतेच.
हे होतं कारण आपल्या घरात आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा, चांगले विचार यांचा वास असतो. घराला घरपण येतं ते खरंतर घरातल्या माणसांमुळे..वस्तूंमुळे नाही.
देव आहे की नाही मलाही नक्की माहीत नाही. आणि समजा असलाच तरी त्याला तुम्ही पूजा करा किंवा नका करू..नैवेद्य दाखवा किंवा नका दाखवू..त्याची गरज नाही..त्यावरून तो काही तुमची ग्रेड नाही ठरवणार.
देव कोणी व्यक्ती नाही ग ती वृत्ती आहे..आणि ती असते माणसांमध्येच. आपल्या सगळ्यांमध्ये ती आहे. पण आपल्या व्यस्त, धावपळीच्या आयुष्यात ती काळवंडून गेली आहे..तिच्यावर प्रदूषणाची काजळी जमा झाली आहे.
घराचा एक कोपरा रोज असा प्रसन्न आणि शांत असेल तर घरात आल्याआल्या आपल्याला त्याची जाणीव नक्की होईल.
देवघरच असावे असे नाही म्हणणर मी..आपापल्या आवडीप्रमाणे काहीही असावे..ज्याने ती ‘भावना’ आपल्या मनात जागी होईल.
एक क्षण असा घरात शांत,प्रसन्न मिळाला ना की उरलेल्या चोवीस तास मनातली ही स्निग्ध ज्योत मनाच्या एका कोपऱ्यात आपोआप तेवत राहते..आणि मग ती मनात उमटणाऱ्या नकारात्मक विचारांचा अंधार दूर करते..
असे मन दुसऱ्या कोणासाठी वाईट चिंतत असेल तर या प्रकाशात त्याला स्वतःची चूक नक्की दिसू शकते, असे मला वाटते.
शिवाय मुलांनादेखील ही सवय लागते..मुलांचे सैरभैर विचार आपोआप जरा स्थिरावतात..
आणि “मी नास्तिक आहे, मी नाही मानत देव..”  असे नुसतेच म्हणण्याआधी मनाची मशागत होईल असा सक्षम पर्याय तुम्ही कोणी आपल्यापुरता तरी शोधला आहे का?
म्हणजे तो वारसा बघत, आचरणात आणत आपली पुढची पिढी विचार आणि भावनांनी समृद्ध घडेल..?
काहीतरी तर असं हवं ना तुमच्याकडे की त्याने त्यांच्या मनाच्या जमिनीची निकोप मशागत होऊन त्यात योग्य ते बीज पडेल..
आणि सर्वसामान्य माणसांकडे काय वेगळं,नवीन असणार ग..म्हणून पूर्वीच्या जुन्या लोकांनी हा पर्याय आचरण्यास अगदी सोपा वाटला म्हणून स्वीकारला असेल..पण ज्यांच्याकडे कला होती..काहीतरी ध्यास होता..आयुष्य जगण्याचे उदिष्ट्य होते किंवा अगदीच काही नसेल तर एखादे समाज उपयोगी काम त्यांनी हातात घेतले होते..अशा लोकांच्या पुढच्या पिढीनेही तो वारसा त्यांच्याकडून नक्की घेतला आहे..त्यात आपले कष्ट आणि सातत्य घालून काही यशस्वी झाले तर काही काठावर देखील राहिले..
म्हणजे त्यांनी “देवत्व” नावाची सकारात्मक वृत्ती आपापल्या मार्गांनी शोधण्याचा प्रयत्न तरी केला..
आपण आपल्या आजूबाजूला विस्कटलेली,भरकटलेली आणि असमाधानी,अस्वस्थ माणसे बघतो..
त्यांच्या मनाचे प्रतिबिंब त्यांच्या वागण्यात, कृतीत दिसते..माणसे काय एकेकटी असतात? नाही..त्यांच्यामागे त्यांचे संपूर्ण घर असते...माणसे आपल्या संपूर्ण घराचे प्रेझेन्टेशन करत असतात समाजात..
अशी माणसे देखील उठून दिसतात आपल्याला आजूबाजूला..सुवास असो किंवा कुवास कितीही प्रयत्न केला तरी झाकून राहतो का?
प्राची भारावल्यासारखी आपल्या सासूकडे बघतच बसली..एक छोटीशी कृती..तिच्यामागे इतका खोल विचार आणि अर्थ असेल हे तिच्या कधीही लक्षात नसते आले..
आणि त्या म्हणत होत्या त्यात न पटण्यासारखे तरी काय होते?
उलट आज तिला खऱ्या अर्थाने ‘देव’ ही संकल्पना समग्र समजली..
देव मूर्तीत नक्की नाही..पण जगात ‘देवत्त्व’ मात्र नक्की अस्तित्वात आहे..ते सांभाळायचे ते मात्र पुढच्या पिढीसाठी याबद्दल तिच्या मनाची खात्री पटली..
आता अबीरची आई म्हणून आपण आणखी जाणत्या झालो आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा..असे तिला वाटले..
तिच्यातल्या देव तत्वाला प्रतिभाने जागे केले होते..मनातल्या गाठी-निरगाठींचा गुंता हलक्या, हळूवार हातांनी सोडवला होता आणि आता मात्र तिच्या मनाच्या गाभाऱ्यात तिच्या आयुष्यभर समई मंद तेवत राहिल..असा विश्वास त्यांना वाटला..
एका आईने अजून काय आपल्या पुढच्या पिढीला द्यायचे असते?

 © डॉ. अंजली औटी.
 mindmatteraa@gmail.com

Friday, 27 July 2018

जीवनगाणे गातच जावे...
आजी जिंदाबाद!”...”आजी जिंदाबाद!”..
जेवता जेवताच मुलांनी म्हणायला सुरवात केली. आनंदाचं कारंजं उमटत होतं त्यांच्या हावभावातून,डोळ्यांमधून.
माणसाच्या मनाचा,हृदयाचा रस्ता माणसाच्या पोटातून जातो..हे अक्षरश: साकार होत होतं समोर..ही गोष्ट वेगळी की काही कृतघ्न माणसं खाल्ल्या अन्नालादेखील जागत नाहीत जगतांना..कारण त्यांच्या मनाकडे कुठलाच रस्ता जात नाही. म्हणून प्रेमाची साद कशीही घातली तरी त्यांच्यापर्यंत कधी पोहोचतच नाही.
पण लहान मुलं खरोखरच निसर्गातली निरागस फुलं असतात. माझ्यासामोरची ही मुलं तर रानफुलं आहेत..शहरातल्या वाऱ्याची अजून ओळख नाही त्यांना. म्हणून त्यांचा हा आनंद देखील अगदी नैसर्गिक,सहज व्यक्त होत होता.
आजीने बनवलेल्या स्वयंपाकावर जाम खुश झाली होती सगळी वानरसेना. खिरीच्या वाट्यांवर वाट्या फस्त होत होत्या.
मुलांच्या डोळ्यांच्या दिशेने बघितलं तर मला दिसलं एक मूर्तिमंत काव्य.जगण्यातली सुरेल कविता!
स्वतःच्या जगण्यावर आणि जगावर खुश असलेली. जो आनंद मुलांच्या चेहऱ्यावर तोच आनंद आजीच्या चेहऱ्यावर.
आजीने मन जिंकून घेतलं होतं, तिच्या हातचं खाणाऱ्या प्रत्येकाचं.
ज्या वयात आपल्या मुला-नातवंडांमध्ये सुखाने राहायचं, त्या वयात 76 वर्षाचं वय असलेल्या पेंडसेआजी आपल्या घरादारापासून दूर दुर्गम भागातील आदिवासी पाड्यावरून, गावांमधून शिक्षणासाठी एकत्र आलेल्या मुलांमध्ये रमल्या होत्या.
या मुलांमध्ये, त्यांच्याबरोबर राहून काम करण्याची ईच्छा त्यांनी दाखवली, त्यावेळी साहजिकच त्यांच्या वयाकडे बघून सगळे विचारात पडले. पण या वयातसुद्धा आजी स्वतःला सांभाळून काम करण्याइतक्या मनाने सक्षम आणि शरीराने काटक होत्या.
माझी काही काळजी करू नका, मरण्यासाठी मी नक्की घरी येईन..पण तोपर्यंत मला जे करायचं आहे ते करू द्या..”
असे आपल्या मुलांना सांगणारी एक कर्तबगार आई,आपल्या जिवलगांना हे पटवून देण्यात यशस्वी झाली की..
तुम्हाला कोणालाही माझी गरज असेल ना..त्यावेळी मी चोवीस तासात तुमच्याजवळ येऊन पोहोचेन
जिथे त्या आल्या तिथेदेखील त्यांनी सांगितले की मला काम करू द्या..आणि मग जर तुम्हाला वाटले माझी मदत होण्याऐवजी तुम्हाला त्रास होत आहे, तर मग मीच इथे राहता परत निघून जाईन..
पण इथल्या लोकांची काळजी वेगळीच होती, इतका पाऊस, थंडी..या वयात सोसली पाहिजे आजीला..त्रास नको व्हायला काही..
    पण शेवटी हो, नाही करत आजी राहिल्या. आज आजींना मुलांसोबत काम करायला लागून आठ-नऊ महिने झाले..
इथल्या वातावरणात त्या नुसत्याच राहिल्या नाहीत तर लहान-मोठ्या सगळ्यांच्या जीवाच्या नातेवाईक झाल्या.
नातं काय फक्त रक्ताचं असतं? नाहीच मुळी...नातं हृदयाचं हृदयाशी असतं..ते जुळलं की मनाच्या भिंती सहज मोडून पडतात.
रक्त,धर्म,जात,पात अशी माणसांना माणसांपासून दूर करणारी आजच्या काळातली हत्यारं हृदयाच्या या नात्यापुढे अगदी केविलवाणी ठरतात.
आजीने पडेल ते काम करायला सुरवात केली. कोणी हे कर, ते कर..असे म्हणणारे नव्हतेच. मुलांचा अभ्यास घेणे हे महत्वाचे काम होतेच. ते करत असतांना कधीतरी प्रेमाने मुलांसाठी काही वेगळे खायला  बनवत असतांना हळूहळू किचनचा संपूर्ण ताबा आजीकडे कधी आला त्याचं त्यानाही समजलं नाही.
गायीचे दूध भरपूर असे, मग निगुतीने त्याचं दही लावणं, ताक करणं, लोणी काढून तूप बनवणं या कामात त्यांनी लक्ष घातलं.
आधी मुलांना पिण्यासाठी फक्त भरपूर दूध असे..पण आता कधी दही, कधी ताक,कढी, कधी लोणी,श्रीखंड, खवा,गुलाबजाम,खीर, तर कधी चांगल्या तुपातील शिरा, लाडू..मुलांची तर खाण्याची चंगळच झाली..
रोजच्या साध्या वरणालासुद्धा आजीच्या हातची एक फोडणी बसली की मुलं खुश..नावडत्या भाज्या पण पोटात गुडूप!
त्या आधी मुलांच्या जेवण्याच्या खूप तक्रारी होत्या..मुलंच ती..हे आवडत नाही..आणि ते आवडत नाही..करत पोटभर जेवायचीच नाहीत आणि आपल्या आईवडीलांपासून दूर राहून शिकणाऱ्या मुलांना रोज कोण प्रत्येकाकडे लक्ष देऊन जेऊ घालणार..? 
अन्न वाया जाऊ द्यायचं नाही हा नियम असल्यामुळे  मुलं त्यातल्यात्यात आवडेल तेच जास्त खाऊन घ्यायची.
मुलांच्या तब्येतीच्या,पोटाच्या तक्रारी जास्त असत. सकस, चौरस आहार मुलांना मिळायला हवा म्हणून आजीचे स्वयंपाकघरात प्रयोग सुरु झाले

  


आता किचनच्या बाहेर येणाऱ्या वासावरून आज काय बनवलंय याचे अंदाज मुलांमध्ये बांधले जाऊ लागले.
मुलंच काय..येणारे जाणारे पाहुणेदेखील जेवण्याच्या प्रेमात पडले.
बाहेरून कोणीही येवो..मग भलेही तो काही कामानिमित्त आलेला एखादा बाहेरचा टेम्पोड्रायव्हर असेल..आजी त्याला कमीतकमी चहा तर देणारच..दोन गोड शब्द त्याच्याशी बोलणार.
रोजच्या कामात या अनपेक्षित अनुभवचा आणि आजीच्या मायेचा असा स्पर्श त्याच्या आयुष्यातल्या त्या क्षणाला झाला की तो निघतांना...”आई, येतो..हं.. म्हणणार..
प्रेम कळते प्रेमळाला..प्रेम त्याची कसोटी..आजीचं वागणं हा प्रेमाचा परीस आहे मूर्तिमंत..ज्याला ज्याला स्पर्श होईल..त्याचा क्षण सोन्याचा!
एक मुलगा आणि दोन मुली आपापल्या संसारात स्थिरावल्यावर आजी आणि त्यांचा नवरा कोकणात, आपल्या खेड्यात राहायला गेले. तोपर्यंत त्याचं आयुष्य इतर संसारी स्त्रियांसारखं सरळमार्गी. तिथे काही वर्ष गावातल्या लोकांशी जोडून घेऊन दोघं एकमेकांसोबत सुखात रहिले...आयुष्याचा जोडीदार निघून गेल्यावर आजीने सगळ्यात आधी काय केलं तर आपलं रहातं घर एका गरजू, घटस्फोटीत मुलांच्या एकट्या आईला त्यातल्या सामानासहित देऊन टाकलं.
संसार, वस्तू जमवणं एक वेळ सोपं आहे पण  संसार आवरणंएकदम कठीण.
कारण घरातल्या वस्तूदेखील नुसत्या वस्तू नसतात..तर त्यांच्या भोवती अनेक आठवणी जमा झालेल्या असतात..आणि माणूस गुंतून पडतो.
त्यातून सहज सुटणे हेच तर मनाचे खरे वैराग्य..त्यासाठी भगवे कपडे अंगावर घालायची पण गरज नसते!
आजी सहज घराबाहेर पडल्या आणि भावाला गरज आहे म्हणून त्याच्याकडे गेल्या..
त्याने कोकणात एक छोटा डोंगर विकत घेतला होता..दोघांनी मिळून त्या डोंगरावर आंब्याची पाच हजार झाडे लावली..
काही दिवस त्याच्या सोबत राहून, त्या शोधतच होत्या की आणखी काय करता येईल?
ज्याच्या पावलांवर चक्र आहे तो माणूस म्हणे खूप प्रवास करतो..आजीच्या मनात चक्र होते..जे तिला स्वस्थ एका जागेवर बसू देता काहीनकाही करण्यासाठी प्रेरणा देत होते!
शोधणाऱ्याला देव पण सापडतो..आजींना पण सापडला..या मुलांच्या रुपात..!
आणि या देवाच्या मुखी जाणारा रोजचा घास मग प्रसाद बनला! आश्रमशाळेला मंदिराचे पावित्र्य आले!
तिथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर या माऊलीच्या प्रेमाची स्निग्ध साय जमा झाली. तिने सगळ्यांना एक, केले..एका सूत्रात बांधले.
कोण म्हणतं की म्हातारपण हा आयुष्याचा शेवट असतो?
नाही..ती तर एक सुरुवात असते..आपल्याला जे काही आजपर्यंत मिळालंय ते निसर्गाला परत करण्याची.
मग आयुष्यात जे काही मिळालेलं असू दे..काही फुलं असतील आपल्या ओंजळीत तर काही काटेही असतील पायात टोचलेले..जगण्यातलं शहाणपण तर फुलांनी जितकं दिलं त्याहीपेक्षा जास्त काट्यांनी दिलेलं असतं..
मग हे शहाणपण ज्यांच्या आयुष्याची अजून सुरुवात आहे त्या मुलांना देता आलं तर किती छान आहे.
आजींची स्वतःची नातवंडं आहेतच..बाहेर उजेड पडण्यासाठी घरातल्या दिव्याखाली अंधार नाहीये हे मुद्दाम सांगतेय..सगळ्यांना हवीहवीशी आहे आजी..आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत आणि मग ज्यांना गरज आहे त्याचं बालपण सुखाचं व्हावं म्हणून वाटणारी कळकळ मनात आहे.
इतकं समृद्ध म्हातारपण की आयुष्यानेही हेवा करावा जगण्याचा!
मलाअसामान्य वाटतात आजी, मलासंत वाटतात आजी..कारणसंतही कुठलीही पदवी नाही तर वृत्ती आहे!
कारण मी प्रत्यक्ष अनुभवते आहे त्यांना या गोकुळात रमलेलं..
आज आपल्या आजूबाजूला इतकं अराजक बघतो आहोत आपण..माणसाशी माणसाला हृदयशून्य वागणूक देतांना बघतो आहोत..आपापल्या जाती,धर्म आणि पंथांसाठी कुपमंडूक वृत्तीने दुसऱ्याला सहज संपवताना अनुभवतो आहोत..
कुटुंबांमधून म्हाताऱ्या माणसांची हेळसांड बघतो आहोत..त्याच म्हाताऱ्या माणसांना आपल्या मुलांसमोर लाचार,एकाकी आपल्या शेवटाची वाट बघतांना बघतो आहोत..
त्या सगळ्यात स्वतः सन्मानाने जगून दुसऱ्यांचे आयुष्य निर्लेप मनाने सोपे करणाऱ्या या म्हाताऱ्या व्यक्तीला माझा,तुमचा आपल्या सगळ्यांचा सलाम नको?
मार्ग शोधणाऱ्याला मार्ग नक्की मिळतो..आपल्यातच आहेत हीदेखील उदाहरणे जी बघून जगण्याची उमेद पक्की होते,आयुष्य सुंदर आहे यावर विश्वास बसतो..तुम्हाला नाही वाटत असं?

© डॉ. अंजली/अनन्या 
# कॅलिडोस्कोप