शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

नवीन वर्षी ‘नवे’ होऊया!

आपल्या दोन नातवंडांबरोबर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका आजीची गोष्ट. खिडकीजवळ बसलेल्या आजीने आपल्याजवळची एक कापडी पिशवी बाहेर काढली आणि त्यात असलेल्या वेगवेगळ्या बीया ती खिडकीतून बाहेर टाकू लागली. छोट्यांना उत्सुकता.
“पण आजी इथे का टाकायच्या आपल्याजवळच्या बीया? आपल्या बागेत टाकूया”
“आपल्या बागेत खूप झाडं आहेत. त्यांच्या या बीया इथे टाकायच्या कारण वाऱ्यामुळे त्या दूरपर्यंत जातील. पावसापाण्यात त्यातल्या काही रुजतील. मग त्यांची झाडे तयार होतील”
“इथे येणाऱ्या झाडांचा, आपल्याला काय उपयोग?”
“आपल्याला नाही, पण या झाडांना फुलं येतील,त्यांच्या मधूर वासाने फुलपाखरू,कृमी,कीटक त्याकडे आकर्षित होतील, फळं येतील,प्राणी-पक्षी,माणसे ते खाऊन तृप्त होतील.झाडाच्या सावलीत विसावा घेतील,घरटी बांधतील. पक्षांना प्राण्यांना पिल्लं होतील. त्यांच्या जगात या झाडांचं किती महत्त्व असेल!
आता मात्र आजीसोबतची दोन चिमणी पाखरं हरखून गेली. त्यांच्या डोळ्यांसमोर भविष्यातल्या त्या झाडांचं अतिशय सुंदर, देखणं,आश्वासक चित्र उभं राहिलं.
आजीने खिडकीबाहेर टाकलेलं बीज रुजेल,न रुजेल पण आजीच्या छोट्याशा कृतीने इवल्याशा नातवंडांच्या मनाच्या मातीची योग्य मशागत होऊन अनेक सुंदर विचारांच्या वृक्षाचं बीज याप्रसंगाने  रुजलं, हे नक्की.
माझ्यासाठी पुरेसं झाल्यानंतर मग इतरांचा विचार करावा,याचं बीज. माझी कृती आज महत्त्वाची नसेलही पण भविष्यात तिचा फायदा नक्कीच कोणालातरी होईल,या विचाराचे बीज. चांगल्या कृतीमागच्या ठाम विश्वासाचं बीज. इतरांसाठी केलेल्या कामाबद्दल कोणताही ‘ममत्त्वभाव’ माझ्यात न उरण्याचं बीज. भविष्यातल्या अनुकूल परिस्थितीत यातला एखादा विचार नक्की रुजेल. फुलेल,फळेल आणि त्याचा कल्पवृक्ष होईल, याची किती खात्री असेल त्या आजीला. 
                                      


ही आजी मला त्या श्रावणमासातल्या कहाणीच्या पुस्तकातील ‘खुलभर दुधाच्या गोष्टीतल्या” आजीची नातेवाईक वाटते. आठवते? शिवाच्या मंदिराचा गाभारा दूधाने संपूर्ण भरला तर त्यांचे राज्य सुजलाम-सुफलाम होणार असते. राजाच्या आज्ञेप्रमाणे सगळ्या घरांमधले दूध गाभाऱ्यात आणून टाकलं तरी तो भरत नाही. राजा काळजीत पडतो. इतक्यात ही आजी मंदिरात पोहोचते आणि आपल्याकडचं एक छोटं भांडंभर दूध देवाला वहाते. आतामात्र गाभारा या खुलभर दुधाने तुडुंब भरतो. कारण घरातली वासरं, लहानमुलं,आजारी माणसं यांना नेहमीप्रमाणे दूध देऊन,सगळ्यांना तृप्त,शांत करून मगच उरलेलं दूध आजी देवासाठी आणते. देव गाभाऱ्यात नाही तर आपल्या लोकांसाठी केलेल्या कामात,विचारात आहे,हे कुटुंबभान,समाजभान आजीकडे आहे. हे जीवनमूल्य सर्वसामान्य लोकांच्या मनात रुजावं, यासाठी खरंतर ही कथा,आजदेखील कालबाह्य झालेली नाही. दुर्दैवाने लोकांनी यातलं कर्मकांड तितकं घेतलं, मूल्य त्यांना समजलंच नाही.
या दोन्ही आजींसारखं जाणतं, तृप्त समाधानी म्हातारपण आपल्यालाही आवडेल,नाही? पण ते काही अचानक मिळणार नाही. भविष्यकाळात फळ हवं असेल तर आजच त्याचं बीज मला माझ्यात लावायला हवं ना? माझ्या आयुष्यातल्या लहानमोठ्या निर्णयात, मी केलेल्या निवडीमध्ये शहाण्या समजूतीचं हे बीज आपोआप रुजेल. मग आयुष्यातल्या सुखाचाही आणि दु:खांचाही सजगपणे स्वीकार करता येईल. छोट्या छोट्या क्षणांमधला निखळ आनंदाचा झरा सापडेल. त्यासाठी मन आजीसारखे निरपेक्ष, निर्हेतुक हवे.
सगळ्यात आधी हे करायचे कोणासाठी? तर मलाच माझ्यासाठी. त्यासाठी आपलं वागणं आपल्यालाच आवडायला हवं. प्रत्येकवेळी निवड करतांना माझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याची समज आपल्या प्रत्येकात नक्की असते. आपण त्याविरुद्ध वागलो तर आपल्याच आतून आपल्याला कोणीतरी त्या वागण्यापासून परावृत्त करत असतं. स्वतःचाच तो ‘आतला आवाज’ ऐकण्यासाठी आपल्याकडे कान हवा आणि वेळदेखील. अनेकदा त्या नैसर्गिक ‘मी’ला डावलून आपण निर्णय घेतो. कारण आपल्याला सुखही रेडीमेड,सहज हवं असतं. प्रवास करण्यातल्या तडजोडी मान्य नसतात.  मग वर्षांमागून वर्ष नुसतीच निघून जातात. बघा ना, संपलाच याही वर्षाचा प्रवास. आजतरी थोडे थांबून स्वतःला भेटायला हवे.
सकाळी जाग येण्याच्या पहिल्या क्षणापासून मनात विचार सुरु होतात आपल्या. आपण बेडवरच असतो आणि मन कुठल्याकुठे निघून जातं. शरीर सवयीनुसार यांत्रिकपणे आपली कामं करत रहातं, मन मात्र विचारांच्या मागे दिवसभर भरकटत असतं. तरीही अचानक येणारी वाऱ्याची थंडगार झुळूक मनाला सुखावते, दूरवरून येणारी आवडत्या गाण्याची एकच ओळ दिवसभर ओठांवर राहते, ऑफिसमधल्या कामाच्या धावपळीत क्षणभर दिसलेला आभाळाचा चतकोर निळा तुकडा अचानक काही सुचवून जातो. दिवसभरातले काही क्षण असे असतात की तिथे धावणारा काळही आपल्यासाठी क्षणभर थांबतो. मन आणि शरीराची एकरूपता अनुभवून आपण उत्साहाने भरून जातो. उरलेल्या आपल्या आयुष्यातले कितीतरी क्षण काहीही महत्त्व नसलेल्या गोष्टींनी,लोकांनी आणि प्रसंगांनी व्यापलेले आहेतच की,निवड आपली आपणच करतो! बहुतेकांनी आयुष्यातला सगळा वेळ मोबाईलला देऊन टाकलेला आहे. सकाळी डोळे उघडायच्या आधी हात मोबाईलकडे जातो. बाथरूममध्ये असलेला वेळ सत्कारणी लावण्यासाठी व्हिडिओ किंवा पोस्ट वाचल्या जातात. घरातली मॉर्निंग भले  कशीही असो, इतरांच्या ‘गुडमॉर्निंग’ची काळजी असते. क्षणभराचा विरंगुळाही मोबाईलमधेच शोधला जातो. मनाचं आणि मोबाईलचंच घट्ट मैत्र झालंय,मन आणि शरीराच्याऐवजी. हे नैसर्गिक जगणं नाही,आपला मुखवटा आहे,कोणीतरी सांगतंय ना आतून?
मी,माझं कुटुंब,माझं खरं जग यापेक्षाही मला दुसऱ्या माणसांचे माझ्याबद्दल असलेले विचार, मते महत्वाची वाटतात. त्यांच्यापुढे माझी प्रतिमा चांगली राहण्यासाठी वाटेल ते केले जाते. जगन्मित्र व्हावेसे वाटते,पण स्वतःच्या विचारांशी,भावनांशी तडजोडी करून, कधीकधी मन मारून. खरंतर शरीराकडे अशा मनाला ठिकाणावर आणण्याची क्षमता आहे, सहज घेतोय तो श्वास जरी काही कारणांनी पुरेसा घेता आला नाही तर बाकीचं सगळं एका क्षणातच बिनमहत्त्वाचे होऊन जाईल. इतक्या महत्त्वाच्या असलेल्या आपल्या शरीरावर खरं प्रेम करतो आपण? बहुतेक नाही. कारण दुसऱ्यांना ते वरवर आकर्षक,सुंदर दिसणे याला जास्त महत्त्व आहे! अंतरंगापेक्षा बाह्यरंग,दिखावूपणा या निकषांवर सगळ्याची निवड केली जाते. सौंदर्याचा मापदंड शारीरिक,मानसिक स्वास्थ्य नाही. म्हणून मन,भावना,विचार,कृती यापेक्षाही व्यक्तीचे असणे,दिसणे,रहाणे आणि कमावणे महत्त्वाचे ठरते.
आपण जे सगळ्यात जास्त गृहीत धरलंय, ते सुंदर शरीर किती अद्भुत भेट आहे निसर्गाने आपल्या प्रत्येकालाच दिलेली. जगाचा अनुभव घेण्यासाठी एक माध्यम आहे आपलं शरीर. त्याला काही झालं तर ‘मी’ काहीही करू शकत नाही,जागचं हलूदेखील शकत नाही. एखादा सुंदर अनुभव,अनुभूती आपल्यापर्यंत पोहोचवली म्हणून आपल्या शरीराचे तुम्ही आभार मानलेत कधी? स्वतःलाच कडकडून मिठी मारली आहे? नाही ना? मग आजतरी नक्की भेटूया स्वतःला. आपल्यातल्या नैसर्गिक जाणीवेला. पंचमहाभूतांचे माझ्यात असलेले अस्तित्व समजून घेऊन,सन्मान करूया त्यांचा. माणसाचा सगळ्यात मोठा धर्म जर कोणता असेल तर तो आहे शरीरधर्म. शरीराबद्दल कृतज्ञ होऊया. हळूहळू जे आपल्यात आहे तेच इतरांमध्येसुद्धा आहे,याची जाणीव होईल. आपल्यातल्या ‘माणूस’पणाची यापातळीवर ओळख करून घेतली तर लक्षात येईल मला ज्याने त्रास होतो,दुखतं त्याच गोष्टींचा दुसऱ्यांनादेखील त्रासच होतो. माझ्यासोबत जसं कोणी वागू नये असं मला वाटतं, तसं आधी मी कोणासोबत वागायला नकोय ही जाणीव मनात निर्माण होणं म्हणजेच शरीर आणि मनाचं एकमेकांशी असलेलं दृढ नातं. आधी आपली आपल्याशी मैत्री असेल तर आणि तरच आपण दुसऱ्या कोणाशी मैत्री करू शकतो. कारण आपल्याकडे जे आहे,तेच आपण दुसऱ्यांना देऊ शकतो.  इतक्या वर्षात आपल्या मनाची आणि शरीराची तरी एकमेकांमध्ये मैत्री झाली आहे, असे वाटते तुम्हाला? एकदा ती झाली की वागण्यात त्याचे प्रतिबिंब आपोआप उमटेल.
आजनंतर उद्या आपल्यासाठी असणारच आहे,हेदेखील असंच गृहीत धरलंय आपण. आपल्या आजूबाजूला असलेलं कोणी अचानक दुरावलं तर त्याच्या निघून जाण्याने जगाचं पुढे चाललेलं चाक क्षणभरदेखील थांबत नाही, अनुभवतो ना आपण? तरीही सकाळी उठल्यापासून रात्री झोपायच्या क्षणापर्यंत आपण फक्त धावतो. दिवसाला चोवीस ऐवजी आणखी काही तास असले असते तर बरं झालं असतं,असंही वाटतं ना कधीकधी? वर्षांमागून वर्ष नुसतीच संपतात. आयुष्य संपत येतं आणि वाटायला लागतं की या सगळ्यात आपलं जगायचंच राहून गेलंय की! असं अनेकांचं होतं, आपलंदेखील होण्याची आपल्याला वाट बघायची आहे?
खरंतर प्रत्येक दिवस उगवलेला असतो आपल्याला काही देण्यासाठी! आपलीच झोळी दुबळी आहे,फाटकी आहे किंवा आपण ती हरवली तरी आहे, असे नको ना व्हायला? जगतांना प्रत्येकवेळेस सगळंच माझ्या मनासारखं असेल असं नाही, सुखात,दु:खात, आयुष्याच्या वेगवेगळ्या अनुभवांमध्ये मन,हृदय आणि शरीराने एकरूप असलो तर ‘मी’ इतर कोणाहीसारखा नाही, वेगळा/वेगळी आहे याचाच निर्मळ आनंद होईल, माझा प्रवास स्वतंत्र आहे, यातले नाविन्य आणि कुतूहल दोन्ही इथूनपुढच्या आयुष्याला बळ देईल. स्वतःबरोबर असलेलं नातं समजूतीचं असेल तर इतरांबरोबर असलेल्या नात्यांचे नवे आयाम लक्षात येतील. अपेक्षांचे टोचणारे हट्टी काटे न बनता एकमेकांसाठी करायच्या निरपेक्ष छोट्या छोट्या कृती सहजवृत्तीने दिसतील. मग एकमेकांना प्रत्यक्ष वेळ न देताही एकमेकांची सोबत करता येते, यातली सहृदयता समजेल.
अनेक अंगानी बहरून येणारं बीज आपल्यापैकी प्रत्येकात आहेच. मनाचा गाभारा तृप्तीने भरायचा असेल तर स्वतःसाठी फक्त खुलभर ‘सौजन्य’ पुरे आहे, म्हणजे मग दुसऱ्यांना देता देता आपलंच माप समृद्धीनं शिगोशीग भरते आहे,या जाणिवेने आयुष्याबद्दल मन कृतज्ञतेने भरून येईल.
मग काय विचार आहे,नव्या वर्षी आपण सगळेच पुन्हा नवे होऊया?
©डॉ.अनन्या /अंजली 

mindmatteraa@gmail.com