रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७

‘ध’ चा ‘मा’

                      


आपल्या बाह्य व्यक्तिमत्वावर नाही तर आपल्या आंतरिक व्यक्तिमत्वावर अवलंबून असते आपण किती देखणे आहोत. 

रोजच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगात आपण काय विचार करतो, त्यावर कशी प्रतिक्रिया देतो,आपले वागणे स्वतःशी आणि इतरांशीही कसे आहे. 
एखाद्या अचानक ओढवलेल्या प्रसंगात आपण माणूस म्हणून कसे वागून जातो, यातून आपल्या वृत्ती,प्रवृत्ती,स्वभाव आणि संस्कार दिसून येतात. आपल्या विचारांची दिशा समजते.

परिपूर्ण कोणीच नसतो पण किमान माणूसपणाच्या पातळीवर आपला सहवास इतरांसाठी निकोप, निरोगी आणि
आनंददायी असायला काय हरकत आहे?

आपल्या बाह्य दिसण्याची आपण जितकी काळजी घेतो तितकी काळजी मनात वेळोवेळी उमटत असलेल्या विचारांचे प्रतिबिंब, आपल्या वागण्यातून दिसते आहे याची घेतो का?

गौरीचा आदित्य, लहानपणापासून एक अभ्यासात अत्यंत हुशार असलेला मुलगा.
अगदी आखीव,रेखीव पद्धतशीरपणे आणि नियमित अभ्यास करणारा.

त्याला चौथी-पाचवी पासूनच समजायला लागलं की आपल्याला मोठं होऊन नेमकं काय करायचं आहे ते!
काही मुलांची समजच वेगळी असते. आपोआप त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा तो वेगळा उठून दिसत असे.
त्याला एक लहान बहीण, कामानिमित्त कायम फिरतीवर असलेले बाबा आणि घरात आजी आजोबा. 

गौरी आपली बँकेची नोकरी करता करता आदित्यच्या सगळ्या वेळा व्यवस्थित सांभाळून त्याला सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी पुणे,मुंबई, बंगलोर अशी फिरत असे.
जसा जसा वरच्या वर्गात जायला लागला तसा तसा आदित्य आपल्या हुशारीमुळे विविध स्पर्धा परीक्षांमधून चमकायला लागला.

गौरीच्या घरातल्या सगळ्यांचेच पाय जमिनीवर.
आदित्य खरंच हुशार आहे आणि अभ्यास करणे त्याला मनापासून आवडते म्हणून आपण फक्त त्याच्या सोबत आहोत हे घरातल्या सगळ्यांना माहीत होते.

त्याच्या वयाची इतर मुले आणि त्यांचे पालक मार्कांसाठी आणि एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी वाटेल त्या क्लुप्त्या शोधत असत तिथे आदित्य शांतपणे त्याला आवडणाऱ्या इतर गोष्टी, त्याचे छंद पूर्ण करण्यासाठी मिळालेला मोकळा वेळ वापरत असे.

आपण आय. आय. टी. प्रवेश परिक्षा द्यायची हे त्याने सहावी, सातवीत असतांनाच ठरवले होते.
दहावीपर्यंत आदित्यला शाळेव्यतिरिक्त वेगळा कोचिंग क्लास कधीच लागला नाही.
पण त्यानंतर या प्रवेश परिक्षेसाठी तयारी करायची असेल तर त्यादृष्टीने लागणाऱ्या अभ्यासाची तयारी करण्यासाठी म्हणून आदित्यने मुंबईतील सर्वोकृष्ट क्लास चा पर्याय निवडला.

तो एकटाच मुंबईत मावशीकडे राहण्यासाठी गेला.
गौरी आणि बाबांनी आपल्या नोकरीतून जमेल तसा वेळ काढून आदित्यला वेळोवेळी मानसिक आणि भावनिक आधार दिला.

भारतातल्या नावाजलेल्या इंजिनिअरिंग कॉलेज मधून शिकण्यासाठी म्हणून ही प्रवेश परिक्षा असते.
पण औरंगाबाद सारख्या, तुलनेने खेड्यातून मुंबईतल्या मोठ्या शैक्षणिक तळ्यात गेलेल्या आदित्य आणि त्याच्या आईवडिलांना इथल्या जीवघेण्या स्पर्धात्मक वातावरणाचा अंदाज जरा उशिरा आला.

तोपर्यंत आपण कोणाचे काही वाकडे केले नाही तर कोणी आपले वाकडे का आणि कशासाठी करेल असाच भाबडा त्यांचा जगावरचा विश्वास होता.

पण स्पर्धेत आपलं मूल ज्या मुलांच्या बरोबरीचे त्या सगळ्यांचे आणि त्यांच्या हितचिंतकांचे आपोआपच आपण शत्रू होतो हे लक्षात येण्यासाठी त्यांना मुंबईतल्या शैक्षणिक राजकारणाचे बरेच अनुभव घ्यावे लागले.

तरीही आपण आपली चांगली वृत्ती का सोडायची अशी शिकवण आदित्यला घरातून, म्हणून आपल्या अभ्यासाच्या वेळा सांभाळून तो इतर मित्रांची अभ्यासात मदत करत असे.

तो इतका हुशार आणि एकपाठी होता की त्याच्या क्लासमधूनच काय त्यावर्षी या परीक्षेची तयारी करणाऱ्या भारतभरातील संपूर्ण मुलांमधून तो पहिल्या शंभर मुलांमध्ये होता.
क्लास मध्ये अर्थातच त्याच्याकडे सगळ्यांचे विशेष लक्ष होते. तोही आपला जास्तीतजास्त वेळ क्लास मध्ये घालवत असे.

अभ्यासात थोडी वेगळ्या पद्धतीची गणितं सोडवणं आणि त्याच्यापेक्षा लहान वर्गातल्या मुलांच्या शंकांचं निरसन करणं इतका विरंगुळा त्याला पुरत असे.
परिक्षा महिन्याभरावर आली तशी गौरी पण त्याच्या सोबत राहण्यासाठी म्हणून रजा काढून मुंबईला गेली.

तोपर्यंत आपण भले आणि आपलं काम भले या विचाराने आदित्य राहत असे.
तरीही तो मनात कुठेतरी अस्वस्थ आहे हे गौरीच्या लक्षात आले.
काहीतरी बिनसले आहे पण कुठे, हे काही तिच्या लक्षात येईना.
घरात तर सगळे व्यवस्थित होते. आणि एक दिवस अचानक तिला उलगडा झाला 
त्या दिवशी फिजिक्स ऑलिम्पियाड परीक्षेचा पेपर होता. आदित्यचा सगळ्यात आवडता पेपर.पेपर संपला आणि आदित्य बाहेर आला तो त्याचा चेहरा पडलेला, डोळे पाण्याने भरून आलेले.
गौरीने त्यावेळी त्याला काहीच विचारले नाही. असेच घरी जायला नको हे तिच्या लक्षात आले.
तिने एका हॉटेलजवळ रिक्षा थांबवली. आदित्यचा आवडता मसाला डोसा मागवला आणि इतर गप्पा मारता मारता हळूच त्याला विचारलं की काही सांगायचं आहे का तुला?
घरी मावशीसमोर त्याला आपल्याशी बोलता येत नसेल हा तिचा अंदाज खरा ठरला.
पेपर त्याच्या अपेक्षेप्रमाणे गेला नव्हता आणि त्याचं कारण अवघड होता असं नव्हतं तर प्रश्न सोडवण्याचा त्याचा स्पीड कमी पडला हे होतं.

होतं असं कधी कधी, तू फार विचार करू नकोस..प्रयत्न करूनही प्रत्येकवेळी यश मिळतंच असं नाही,
गौरीने समजावण्याचा प्रयत्न केला. पण स्पीड कमी पडण्याचं कारण पेपर मध्ये नसून आदित्यचं मन विचलित झालं होतं हे त्याने सांगितल्यावर तिला आश्चर्य वाटले.
गेले काही दिवस त्याला चोरून पोर्न फिल्म्स बघण्याची सवय लागली होती.
क्लास शेजारच्या गल्लीतल्या दुकानात अशा फिल्म्स बघायला मिळतात हा शोध त्याच्या बरोबरीच्या मित्रांनी लावला होता.
चार-पाच दिवसांत त्याला तिथे नेणारे मित्र तर सटकले पण हा इतर मुलांबरोबर जातच राहिला.
आपल्या अभ्यासावर याचा परिणाम होणार नाही अशी त्यावेळी त्याला खात्री वाटलेली होती.
पण आज पेपर सोडवतांना मनात तसे विचार आले त्यावेळी आपण चुकलो हे त्याच्या लक्षात आले.

क्लासमध्ये पेपर बद्दल चर्चा झाली. आदित्यला पेपर चांगला गेला नाही सगळ्यांना समजले.
त्याच्या बरोबरच्या मित्रांना अर्थात पेपर चांगला गेला होता.
ज्या मुलांनी त्याला तिथे नेलं होतं त्यांचा हेतू साध्य झाला होता. मुंबईतल्या मुलांच्या वागण्याचा फटका त्याला बसला होता.

या संपूर्ण प्रसंगात आदित्यने आपली जबाबदारी स्वीकारली आणि इतर कोणालाही दोष न देता आपण सावध राहून आपला रस्ता कसा सोडायचा नाही हे त्याला समजलं.
आई-बाबा सोबत होतेच. त्यांनीदेखील या विषयात सगळी परिस्थिती संयमाने आणि त्याच्यावर विश्वास ठेवत हताळली.

त्याचं एक स्वप्न अपूर्ण राहिलं पण मागे बघत बसायला उसंत नव्हती. त्यानंतर त्याने संपूर्ण अभ्यास घरून केला.
बोर्डाची परिक्षा छानच झाली आणि प्रवेश परीक्षेचा पहिला टप्पा पण अपेक्षेप्रमाणे चांगला पूर्ण झाला.

आता अजून काही दिवसांत ती परिक्षा ज्याची तो वाट बघत होता.
अभ्यास व्यवस्थित होता आणि इतर गोष्टीपण सुस्थितीत होत्या.
त्या परीक्षेचा त्याचा आणि त्याच्या ग्रुप मधल्या त्याच्या मित्रांचा नंबर दादरला एका शाळेत आला. आई आणि  बाबा दोघेही त्याच्यासोबत होते. पहिल्या पेपर नंतर तासाभराने दुसरं पेपर होता.

पहिल्या पेपरला आदित्य आत गेला आणि थोड्यावेळाने तिच्या बहिणीचा रडतरडत फोन आला, तिच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे, त्यांना खूप लागलंय आणि दादरमधल्याच एका हॉस्पिटल मध्ये नेलंय.

गौरी आणि तिचा नवरा आदित्यच्या मित्राच्या आईवडिलांना झाला प्रकार सांगून तिथून निघाले.
आदित्य पेपर मधून यायच्या आत परत येतो असे म्हणाली त्यांना गौरी.

पण नंतर ती धावतपळत पुन्हा येईपर्यंत आदित्य दुसरा पेपर देण्यासाठी परत हॉल मध्ये गेलेला देखील होता.
त्याच्या मित्राच्या पालकांनी तिला सांगितले की आदित्यला त्यांनी व्यवस्थित काही न कळू देता दुसऱ्या पेपरसाठी पाठवलं आहे.

ते तीन तास कसे गेले तिचे तिला माहीत. नेमक्या महत्वाच्या वेळेला संकट आलं याची चुटपूट मनाला लागून राहिली तिच्या.
बहिणीच्या नवऱ्याला बरंच लागलं होतं म्हणून ती एकटीच आदित्यला घ्यायला आली होती. आता मन शांत ठेवण्यापेक्षा आणि प्रार्थना करण्यापलिकडे काय होतं तिच्या हातात.

आदित्य पेपरमधून वेळेआधीच बाहेर आला. आणि गौरीला बघून रडायलाच लागला.
बाबा कसे आहेत आणि कुठे आहेत हा त्याचा पहिला प्रश्न होता.

बाबा?...गौरी गोंधळली.

आणि मग आदित्यने जे सांगितले ते ऐकून तुम्हीच सांगा काय तिने काय प्रतिक्रिया द्यावी ते.

आदित्यला त्याच्या मित्राच्या आईने तुझ्या बाबांचा अपघात झालाय म्हणून आई त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली आहे, असे सांगितले.

अर्थात आदित्यला ती परिक्षा पुढच्या वर्षी पुन्हा द्यावी लागली.
वेळ आपल्या वेगाने पुढे सरकला.

संकट बरोबर वेळेला आलं आणि निघून पण गेलं.
                        


पण निसर्गनिर्मित संकटापेक्षा माणूस निर्मित संकटाने जास्त नुकसान झालं.
या प्रसंगातून अनुभवाला आलेली मानवी वृत्ती किती भयानक आहे याचा सगळ्यांना धक्का बसला.

लोकांनी चर्चा केली काही दिवस आणि विसरले सुद्धा.
आदित्य वर्षभर उशिरा आय आय टी दिल्ली ला गेला.

पण ज्या आईने ज्या कोणत्या कारणासाठी ‘ध चा मा’ केला होता तिने काय मिळवलं?
दिसायला सुंदर असलेली ती एक आई ‘आधुनिक आनंदीबाई’चीच वंशज म्हणावी लागेल!






शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

जगणं आनंदाचं!

“पंतप्रधान मोदींनी आमच्यासाठी शब्द ठरवला, दिव्यांग म्हणे!
कोणतं असं दिव्य अंग मिळालं आहे आम्हाला?

हा शब्द वापरण्या आधी आमच्या सारख्या कोणा व्यक्तीला विचारलं गेलं होतं?
आम्ही अपंग आहोत आणि आहोतच.
असे शब्द वापरून आमच्या शरीरातली कमतरता भरून निघणार नाही.
आपल्या देशात अजूनही आम्हाला दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे करता यावेत म्हणून सोयी सुविधा उपलब्ध नाहीत.

सार्वजनिक जागांवर तरी किमान आमचे जाणे-येणे सुलभ व्हावे, पण नाही.
बँका, ATMs, हॉस्पिटल्स, वेगवेगळी सरकारी,खाजगी ऑफिसेस, गार्डन्स, हॉटेल्स, नाट्यगृह, चित्रपटगृह इतकंच काय रस्त्यातली स्वच्छतागृहे सुद्धा आमचा विचार करून बांधली गेलेली नाहीत.

रस्त्यावरून स्वतंत्रपणे फिरणे आम्हाला शक्य नाही.
पावलोपावली आम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहून जगायचं..
आणि मग कुठले दिव्यांग?   

त्यापेक्षा ‘अपंग’ म्हणा, निदान लोकांच्या ओळखीचा तरी शब्द आहे!”
असे परखडपणे आपले मत मांडणारी “भावना” एक मनस्वी आणि स्वाभिमानी, सर्वार्थाने सुंदर व्यक्तिमत्व आहे.

२२ वर्षांची नुकतीच इंजिनिअर झालेली, एका छोट्या बाळाची आई असलेली ही तरुणी आपल्या करिअरची सुरुवात करण्यासाठी बाहेर पडते. आणि दुपारी बाराच्या सुमारास शहरबस ची वाट बघणाऱ्या आणि बसथांब्यावर उभ्या असलेल्या तिला, तिच्या काही लक्षात येण्याआधीच भरघाव वेगात आलेली बस, थांब्यावर थांबण्याऐवजी जोरदार धक्का देते.

एक अपघात.. तो घडतो, त्यात तिची काहीही चूक नसतांना.
अपघातानंतर दहा दिवसांनी सर्वार्थाने भानावर येते, त्यावेळी तिला सगळ्यात पहिली जाणीव होते की आपल्या दोन्ही पायात संवेदना नाहीत. मज्जारज्जूला कधीही भरून न येणारी इजा पोहोचली आहे आणि कायमस्वरूपी अपंगत्व हे आता इथून पुढच्या आयुष्याचं सत्य आहे..

आयुष्यात सगळ्यात महत्वाचं काय असेल प्रत्येकासाठी तर आपलं स्वतःचं अस्तित्व.
आणि तरीही आपण सगळ्यात जास्त गृहीत धरतो ते.
तरीही कधी कधी अनपेक्षितपणे असे काही क्षण येतात आपल्या आयुष्यात की आपलं आयुष्य बदलवून टाकतात.
आणि हा बदल आपली इच्छा असो वा नसो स्वीकारावा हा लागतोच.

अपंगत्व मनाने स्वीकारण्यासाठी वेळ लागतो..भावना सांगते, कारण ती एक कैद असते.
आपण आपलेच कैदी असतो, ना एका अंगावर वळता येत,ना उठून बसता येत..चालणं,फिरणं तर अशक्यच. संकट संपूर्ण घेरून असतं आपल्याला आणि आपण जखमी, एकाकी, हतबल होऊन जातो त्या क्षणी.

आपल्या नेहमीच्या सहज वाटणाऱ्या क्रिया ज्या इतक्या दिवस आपण सहजतेने करत आलेलो असतो त्या आता कधीच करणं शक्य होणार नसतं...
आणि मनाला हे काही केल्या पटत नसतं.
उलटसुलट विचारांचा गोंधळ मनात असतो. जखमी शरीराच्या कैदेत एक अस्वस्थ आणि त्याहून जखमी मन असतं.

एक अपघात, आपली आणि आपल्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची सगळी स्वप्नं धुळीला मिळवतो.
फक्त एक आयुष्य बदलतं,असं नाही...तर कुटुंबातील जवळच्या सगळ्या जिवलगांची आयुष्य अचानक बदलतात. त्यांनाही हे अनपेक्षित असतं..कुठून कसं सावरायचं कळत नाही.
आपली व्यक्ती जीवंत आहे आणि आपल्यात आहे हाच विचार फक्त बळ देतो त्यांना.
करण्यासारखं काहीच नसतं आणि तरीही श्वास सुरु असतात.
मरणप्राय म्हणजे नेमकं काय हे या हरवलेल्या संवेदना सांगत असतात मनाला.
मन झगडत असतं, काहीही स्वीकारायला तयार नसतं.
आपल्या जवळच्या व्यक्तींना आपली घालमेल समजत असते आणि त्यांची मनस्थिती पण थोडीफार तशीच असते. सगळे एकमेकांना फक्त घट्ट धरून असतात.

आपण आपल्या या मानसिक अवस्थेत स्वतःलाही नको असतो अशा वेळी आपल्याला आणि घरातल्या लोकांना भेटायला अनेकजण येत असतात.
येणारा प्रत्येकजण आपलेपणानेच येत असतो, त्यांचे हेतू प्रामाणिक असतात.
पण आपला हेतू कसा पोहोचवायचा याची साक्षरता त्यांच्यात नसते म्हणून त्या काळात जे काही संवाद आपल्या समोर घडतात त्याने सहनशक्तीचा अंत होण्याची वेळ येते.

“अरेरे..अजून पूर्ण आयुष्य जायचंय!”.... “आता कसं होणार पुढे हीचं”

“आता या छोट्या बाळाचं कसं होणार?”  

“आता अविनाशचं काय?” ..... “दुसरं लग्न करतील का ते आता?”

असं बोलायचं असतं का पेशंट समोर?
प्रत्यक्ष विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या मागेसुद्धा अनेक प्रश्न दडलेले असतात, ते समोर विचारण्याची हिंमत नसते म्हणून..पण डोळ्यातून विचारलेच जातात एकमेकांना.

हे सगळं भावना आज पोटतिडकीने आणि प्रामाणिक, परखडपणे बोलते, कारण तिला वाटत असतं असे प्रसंग ज्याच्यावर येतात त्या व्यक्तीला आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींना त्यावेळी काय वाटत असते याचा अंदाज निदान आत्ता हे वाचून तरी इतर लोकांना यावा आणि अशा परिस्थितीत बोलण्याचे, वागण्याचे भान त्यांना यावे. मला अशा गोष्टींचा सामना करावा लागला पण निदान या परिस्थितीत असलेल्या इतर कोणाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष माझी मदत होऊ शकेल.

“त्या काळात माझ्या अंगावर उलटा अडकवलेला एक पांढरा शर्ट असे कारण पाठीला कापडाचा स्पर्श देखील मला सहन होत नसे, माझ्या नैसर्गिक विधींवरचं नियंत्रण गेलेलं,म्हणून त्यादृष्टीने काळजी घेण्यासाठी म्हणून आणि इतर कुठलीही अजून मेडिकल गुंतागुंत होऊ नये म्हणून माझ्या अंगावर पोटापासून एक पांघरून टाकून बाकी भाग केवळ झाकलेला असे...येणारे सहृद “नेमकं झालंय तरी काय हिच्या पायांना” ह्या उत्सुकतेने अंगावरच्या त्या पांघरुणाला डायरेक्ट हात घालत. घरातल्या लोकांना त्यांच्या या कुतुहलाला आवर घालण्यासाठी लक्ष ठेऊन बसावे लागे.
काही लोक तरीही आपला हट्ट न सोडता स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याची आपली उत्सुकता पूर्ण करत असत.”

कुतूहल वाटणं स्वाभाविक आहे पण कशाचं आणि कोणत्या मर्यादेपर्यंत याची जाणीव असायला नको?
आपल्या कुतूहलासाठी आपण कोणाची व्यक्तिगत स्पेस ओलांडतो आहोत याचे माणूस पातळीवर भान नसण्याइतके काही लोक असंवेदनशील वागतात.

त्याचं प्रबोधन कोणी कसं करायचं?

परिस्थितीची जाणीव झाली त्या दिवसापासून भावनाचं परावलंबी आयुष्य सुरु झालं. स्वाभिमानी मन वेळोवेळी जखमी झालं.
लोकांची उत्सुकता ओसरली आणि त्यांच्यासाठी नेहमीचं झालं की त्याचं येणं कमी कमी होत जातं आणि खरे सखे-सोबती केवळ आपल्या सोबत उरतात, ज्यांना काय झालं यापेक्षा कसं सावरायचं यात रस असतो.

हळव्या आवाजात भावना आणखी एक अनुभव सांगते,
“अशाच एका संध्याकाळच्या कातर वेळी,निराशेच्या क्षणी मनात कालवाकालव होत असतांना अविनाश, माझ्या बेड जवळ बसले आणि त्यांनी हार्मोनियमच्या साथीने एक अभंग गायला सुरुवात केली..
"आवडीने भावे हरीनाम घेशी..तुझी चिंता त्यासी सर्व आहे..!”

अभंगाचे बोल आणि अविनाशच्या मधुर आश्वासक आवाजातील शब्द मनाच्या गाभाऱ्यात खोलवर उतरले आणि हळूहळू मनाचा गाभारा स्निग्ध प्रकाशाने भरून गेला.
अंधार संपत होता आणि मनात एक नवी ज्योत प्रकाशमान होत होती.”
जागृतीचा तो क्षण तिच्या मनात आजही ताजा आहे. प्रसंगातून सावरण्याची ती सुरुवात आजही ताजी आहे तिच्या मनात.  
                 


अविनाश तिच्या संपूर्ण आयुष्याचा आधार आहेत. खरा जोडीदार कसा असावा आणि साथ कशी द्यावी हे याचं त्यांनी एक उदाहरण घालून दिलं आहे.
आज ती ४७ वर्षांची आहे त्यावेळेस पासून ते आजपर्यंत तिचं आयुष्य हा तिचा प्रवास सकारात्मक आयुष्याचा वस्तूपाठ आहे.

अपघातानंतरची अनेक वर्षे स्वतःला सावरण्यात आणि स्वतःपुरते स्वावलंबी होण्यात गेली.
त्यावेळी बाळाची आणि घराची जबाबदारी प्रामुख्याने तिच्या सासूबाईंनी घेतली.
भावनाच्यादेखील आई झाल्या त्या, आज तितक्याच खंबीरपणे भावना त्यांच्यासोबत आहे. भावनाचे आई-वडील, काही जवळचे नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी या त्यावेळी तिचा मोठा मानसिक आधार होता.

त्या काळात मदतीला आलेल्या प्रत्येकाचे स्मरण आणि जाणीव तिला आहे.
या प्रवासात तिला येणाऱ्या अनुभवातून तिला आज प्रामाणिकपणे वाटतं हे की आपल्या समाजामध्ये अपंगत्वा बाबत साक्षरता येणं खरंच खूप गरजेचं आहे!
कारण अनेक बाबतीत आपण फक्त शिकलेले आहोत,सुशिक्षित..साक्षर नाही.
आपल्या समाजात अपंगत्वाबद्दल पुरेसा सजग दृष्टीकोन नाही.

शरीराने अपंग व्यक्तीबद्दल आपल्याला कीव वाटते, अनाठायी सहानुभूती वाटते..
आणि अशा प्रकारे समाजातल्या दहा पैकी आठ व्यक्ती मानसिक, वैचारिक आणि भावनिक दृष्ट्या अपंग आहेत.
आणि आपल्या या दरिद्रीपणाची त्यांना जाणीव देखील नाही! आणि लाजही.

आपल्याला शिकण्याची गरज आहे. सजग,साक्षर होण्याची गरज आहे.

आयुष्यातला प्रत्येक वाईट अनुभव मला थेट येईल असे नाही, यायलादेखील नको.
पण मग दुसऱ्याच्या अनुभवातून शहाणपण शिकण्याचे भान मला यायला हवे.
आपल्या आयुष्यात फक्त आनंदाचे  आणि सुखाचे  हवासे वाटणारे अनुभवच सगळ्यांना हवे असतात.
त्यातून जगण्यातलं शहाणपण मिळण्याची काहीच शक्यता नसली तरी.
लोकं सुखाच्या क्षणांचा हव्यास करतात.
आणि नकोसे वाटायला लावणारे क्षण टाळण्याकडे,लपवण्याकडे लोकांचा कल आपोआप जातो.
पण खरेतर हे असे नकोसे वाटणारे क्षण आपले असो किंवा इतर कोणी अनुभवलेले सहसंवेदनेची भावना मनात रुजलेली असेल ना तर असे क्षण आपल्याही मनाला आतून लख्ख उजळून टाकणारे असतात.
जगण्यातली समज घडवणारे आणि माणुसकीला स्पर्श करणारे असतात.

भावना,                 


आपल्या वाट्याला जे काही आलं ते तिने आपलसं केलं..असं सत्य आपलसं करून घेणं प्रत्येकालाच जमतं असं नाही.
तिच्या ‘कमी’ ला तिने आपली ताकद बनवलं.
प्रत्येक व्यक्ती लौकिकदृष्ट्या यशाच्या शिखरावर गेला कीच केवळ त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं असं समजायचं असं थोडीच आहे?
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी राहण्यासाठी जे करता येईल ते तिने आपल्या आयुष्यात केलंच.

प्रत्येकाला नेत्रदीपक यश आणि सार्वजनिक पुरस्कार मिळत नसतात.
पण म्हणून काही त्यांच्या आयुष्याची लढाई ही खरी लढाई नसते असं थोडीच आहे?
भावना एक सुजाण, कमालीचं साधं, रसिक आणि कलात्मक आणि तरीही कणखर व्यक्तिमत्व आहे.

आपल्या मुलीला चांगली व्यक्ती आणि उत्कृष्ठ डॉक्टर बनवण्याचं श्रेय तिचं आहे. अनेकांचं सामाजिक मातृत्व देखील ती साधेपणाने निभावते आहे.

ती अतिशय प्रेमळ आणि खंबीर बायको आहे.
आवडती सून आहे, नातेवाईकांमध्ये लोकप्रिय आहे.
मित्र-मैत्रिणीच्या हक्काचा विसावा आहे.
आणि समाजातल्या अनेक तिच्यासारख्या लोकांची मार्गदर्शक,मैत्रीण ती आहे.
त्यांच्यासाठी सतत लहानमोठे उपक्रम करण्यात ती मग्न असते.

आम्ही आमच्या सोयी आणि सुविधेनुसार आम्हाला दैनंदिन जीवनात उपयोगी येतील असे काही तांत्रिक आणि सोपे बदल केलेले असतात. ते समजून घेऊन कुटुंबात आणि समाजात आमचे वावरणे सहज व्हावे अशी आणि इतकीच मदत आम्हाला हवी असते, यापेक्षा सहानुभूती म्हणून कोणी अधिक मदत करण्याची गरज नाही, हे ती आवर्जून सांगते. 

अपंग व्यक्तींनी देखील जबाबदार व्यक्तीसारखे आणि स्व-सन्मानाने वागायला हवे, अपंग असणे ही केवळ शरीराची स्थिती आहे मनाची नाही. आपल्याला नको त्या सोयी-सुविधांचा लाभ मिळण्याची अपेक्षा करू नये आणि त्यामुळे अशा व्यक्तींच्या सोबत असणाऱ्यांनी देखील त्यांना अति लाडावून ठेऊ नये असे तिला प्रामाणिकपणे वाटते. त्यासाठी ती आवर्जून जाहीरपणे आपली मते मांडते.

अनेक सामाजिक कामात सहभागी होते आणि अत्यंत मनापासून आयुष्य जगते आहे.

तिचा सहवास सगळ्यांना हवाहवासा वाटतो.
तिच्याबरोबरचा प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी देऊन जातो.
आपापल्या कुवतीप्रमाणे ज्याने त्याने त्यातून घ्यावं.

आयुष्यात काय घडावं हे आपल्या हातात नसतं, आपल्या हातात असतो तो आयुष्य जगण्याचा दृष्टीकोन. एक कुटुंब एकत्र बळ एकवटून उभं राहिलं तर कितीही मोठं संकट कोणाही सदस्यावर येऊ दे..मिळून मार्ग शोधला जातो. एक शक्ती जाते पण दुसऱ्या अनेक सोबत करतात आणि प्रवास आनंदाचा होतो.

प्रवास कष्टाचा असेल तर मिळणारे समाधान मनात तृप्त भाव जागवणारे असते.