कालपासून ‘माझ्या मातीचे
गायन’ या कवी कुसुमाग्रजांच्या कवितेमध्येच अडकून पडलेय! त्यांनी जेव्हा ही कविता
लिहिली त्यावेळी नेमकी कशी असेल बरं त्यांची भावस्थिती?
‘मराठी माती’ या काव्य
संग्रहातली आहे ही कविता. पूर्वी देखील वाचली होती पण आज यातले शब्द मनात काही
वेगळेच भाव जागवून गेले.
कवीचे स्वत:चे अनुभव विश्व,
त्याचे चिंतन..कवीचा हा प्रवास कविता वाचणाऱ्याला समजण्याचे काही कारण नाही. पण
काही वेळा काही लेखक किंवा कवी असे काही लिहून जातात की त्या साहित्यकृतीच्या केवळ
वाचनातून वाचकाच्या मनात विलक्षण संवेदना उमटतात. लेखक किंवा कवीचे भाव विश्व
वाचणाऱ्याच्या मन:पटलावर साकार होते आणि एकरूपतेची एक वेगळीच अनुभूती मिळते.
आज असेच काहीसे झाले. विचार
करतेय की शब्द हा तर केवळ शब्द असतो..अक्षरांनी बनलेला..पार्थिव. पण तो जेव्हा
कोणाच्यातरी कल्पनेतून विशिष्ट आकार घेतो त्यावेळी त्याला अर्थ प्राप्त होतो का?
त्याच्या रचनेतून, रूपातून?
की त्या शब्दातून निर्माण
होणारा भाव, रस.. तो देतो त्या शब्दाला अर्थ.. प्राण..? शब्दातला तो भाव आपल्या
मनात निर्माण झाला म्हणजेच त्याचा अर्थ आपल्याला संपूर्ण समजला!
काही कविता नुसते शब्द
असतात..कालांतराने आपण त्या विसरून देखील जातो. पण काही कविता या मनात असा काही रस
निर्माण करतात की अर्थाचा गोडवा आपण पुन्हा कधीच विसरू शकत नाही.
काही कविता..काही कथा..काही
कादंबऱ्या..काही चित्रपट आपल्या अधिक जिव्हाळ्याचे असतात! ते आपल्या आतला स्वर
त्यांच्याशी सुसंवादी असतो म्हणून!
शब्दांशी संपूर्ण एकरूपता
साधली की अर्थाचे अमृत हळू हळू मनात पाझरायला सुरवात होते.
तर सध्या मनावर गरुड आहे ते
या कवितेचे!
माझ्या मातीचे गायन
तुझ्या आकाश
श्रुतीने
जरा कानोसा देऊन
कधी ऐकशील का रे
माझ्या धुळीतील
चित्रे,
तुझ्या प्रकाश
नेत्रांनी
जरा पापणी खोलून,
कधी पाहशील का रे
वर्ख लावून कागदी
माझे नाचते बाहुले
कधी कराया कौतुक
खाली वाकशील का रे?
माझ्या जहाजाचे पंख,
मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनाऱ्यास दिवा,
कधी लावशील का रे
माझा रांगडा अंधार,
मेघा-मेघात साचला
तुझ्या उषेच्या ओठांनी,
कधी टिपशील का रे..
भव्य दिव्यतेची ओढ हा तर कवी कुसुमाग्रजांच्या कवितेचा गाभा.
कविता वाचताना आपल्या मनाच्या पटलावर एक कॅनव्हास उभा राहतो..
आणि कवीच्या शब्दागणिक नानाविध आकारांची नि रंगाचे विश्व आपल्यासमोर उलगडत
जाते..यातील प्रत्येक रेष न रेष बोलते आपल्याशी.
भाव मनात झिरपत राहतात खोलवर..
आर्त, आर्त भाव ताबा घेतात भावनांचा आणि हृदयाचा ठाव घेत शब्दांची आवर्तने
मन व्याकूळ करत जातात.
यात ‘मी’ माती असल्याची जाणीव आहे.
म्हटलं तर यत्किंचित, कोणीही नसणारी माती..हे माझं रूप!
पण मला ध्यास आहे त्या भव्य,दिव्य शक्तीचा.
माझ्या मर्यादे पलीकडे कुठेतरी तिचे अस्तित्व आहे..मी ते मान्य करो किंवा
नाही.
कोणत्या न कोणत्या रुपात ती शक्ती आहे..कारण तिची स्पंदने मला माझ्यात जाणवत
आहेत.
माझ्या आवाक्यात असलेली धडपड करून मी तिची आळवणी करतो आहे..
माझी स्वप्नं, माझे ध्यास मला इतरांपेक्षा वेगळ्या उंचीवर घेऊन गेले तरीही
माझ्या आणि तुझ्यातले अंतर मला जाणवतच राहते..
माझे गायन तुझ्यापर्यंत कसे पोहोचेल?
माझ्यापरीने जे सर्वश्रेष्ठ..ते तर तुझ्या दृष्टीक्षेपातही नाहीये खरेतर..
तुझे आकाशाएवढे मन मला जाणवते..तुझ्या त्या आकाश व्यापणाऱ्या श्रुतींनी तू जरा
जरी कानोसा घेतलास तर तुझ्यापर्यंत माझा आवाज येऊन पोहोचेल..पण मातीचे माझे गाणे
आकाशापर्यंत कसे पोहोचावे?
एक अनिश्चितता..
एक व्याकुळता..
एक आर्जव..
एक ध्यास..
ज्ञात जगात राहून कवीला अज्ञाताची ओढ अस्वस्थ करते आहे.
सत्य,शिव आणि सुंदर.. मानवी जीवनाची शाश्वत मूल्ये..
कवीचे मन त्यांच्या शोधात निघाले आहे.
माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा खरंच रे काय अर्थ आहे या सगळ्याला?
न संपणारे हे चित्र आहे..
माझ हा हव्यास ही धूळ आहे आणि मी तिच्यावर वेड्यासारखे चित्र काढतो आहे, एक
पुसले गेले की दुसरे..सतत.. माझ्या आयुष्याचे अपूर्णपण मला जाणवते अरे.. पण मला
याशिवाय दुसरे काही कसे शक्य आहे?
माझी धूळचित्रे बघण्यासाठी तुझ्याकडे प्रकाशाचे डोळे आहेत ना?..मग एकदा बघ
तरी..
कदाचित तुझ्या एका दृष्टीक्षेपाने त्यावरची धूळ निघून जाऊन खाली नुसते चित्र
उरेल..तुझ्या प्रकाश इतके स्वच्छ आणि सुंदर! आणि मलाही मग मी सापडून जाईल!
केवळ माझे कर्तुत्व असे काय आणि कुठले अरे?
हा तर सगळा वर्ख आहे..वरवरचा..
पण मला पूर्ण जाणीव आहे नियतीच्या तालावर नाचणारे कागदी बाहुले आहे आमचे
सगळ्यांचे अस्तित्व म्हणजे..
पण तरीही ते आहे ना रे..
आमच्या वाट्याला आलेले आयुष्य आम्हाला जगावेच लागते! त्यापासून सुटका कुठे
आहे..?
जगतोच आहोत आम्ही सगळे आपापल्या परीने..चांगल्याची इच्छा मनात बाळगत..
तुला कधीतरी वाटत असेल का आमचे कौतूक? असे दूरवरून आमच्याकडे बघतांना?
कवीला त्या अलौकिकाचे कमालीचे आकर्षण वाटते आहे, त्याच्या मनाची उत्कटता आता
समेवर पोहोचली आहे..
आम्हा माणसांच्या जगण्यात फक्त अनिश्चितता..जगण्याचे संघर्ष, आमच्या
प्रत्येकाची जगत राहण्याची केविलवाणी धडपड..आजूबाजूचे सगळे वातावरण मध्यरात्रीच्या
अंधाराइतके गडद आहे रे.. अंगावर येणारे..भिवविणारे..मला काळात नाहीये मी कोणावर
विश्वास ठेवावा? कोणत्या चांगल्या मूल्यांबद्दल श्रद्धा बाळगावी?
कोणावर भरभरून प्रेम करावं असे काही वाटतच नाही रे आतून..माणसांची गर्दी आहे
रे भोवती पण ना त्या गर्दीतही माझे जहाज मला एकाकी..निराशेच्या गर्तेत असल्या
सारखे वाटते आहे. माझ्या पंखातले बळ हरवल्यासारखे.. मला ना खूप उदासवाणे वाटते
आहे..पण तुला सांगू? तरीही..तरीही माझ्या मनातला आतला आवाज मला सांगतोय..माझी
सहनशक्ती जिथे संपणार आहे त्या टोकाला तू माझ्यासाठी दिवा घेऊन उभा आहेस.. पण खरंच
तू तिथे असशील ना रे?
माझ्या भोवतीचा हा अंधार निश्चित संपेल..तुझा
अदभूत स्पर्श मला होईल..ती माझ्या आयुष्याची खरी पहाट असेल..
कविता वाचतांना कवीची प्रत्येक प्रतिमा शब्दातून अर्थाच्या पायघड्या
उलगडत मनाला एका तरल विश्वात घेऊन
जाते..
अशाश्वताने शाश्वताशी व्याकूळ भावनेने केलेला हा संवाद किती विलक्षण रसरशीत
आणि बोलका आहे, अनुभवून बघाच.
‘वारसा लक्ष्मीचा’ या जुन्या मराठी चित्रपटात श्रीधर फडकेंनी संगीतबद्ध केलेलं
हे भावगीत अनुराधा पौडवाल यांच्या मधूर आवाजात आहे.
पद्मजा फेणाणी यांनी देखील ते अप्रतिम गायलं आहे.