मंगळवार, २७ मे, २०१४

एकदातरी!

माझ्यातून उगवते पुन्हा एक नवे वर्तुळ
प्रसरण पावते, छेद देत माझ्यातल्या ‘मी’ला
नवे उमाळे फुटतात, स्थिरावतात           

भरतीच्या लाटा आवेगाने पुढे झेपावतात
किनाऱ्याची आस नकोशी वाटते
मुक्त,बेबंद झेप आवरेनाशी होते
वर्तुळाचा वेगही अनावर होतो
माझ्यातल्या मला एक वेगळी जाणीव देतो
अमूर्त एक क्षितीज मला सारखे साद घालते
बंध माझ्याभोवतीचे
पाऊल माझे मागे खेचते
एकदाच,
ओसंडून जावू दे ना हा आवेग
एकदाच,
पण अनुभवू दे ना
नाविन्याचा हा उन्मेष
इंद्रधनू रेखू दे ना मला माझ्या आभाळावर
एकदाच

घनभर निळाईचा रंग मला लेवू दे! 

-अनन्या 

सोमवार, १९ मे, २०१४

जाणीव

कळलेच नाही मला
कधी मी हात सारे सोडले
माणसांसहित गाव माझे
वेगात मागे टाकले
धावतांना असे मी
श्वास मोजून आणले
काळजाचे भाग काही
दूर दूर राहिले.

सोडले जे हात त्यांचे
स्पर्श झाले बोलके
टोचले वाटेत काही
हलकेच त्यांनी काढले
पडत,चुकत चाललो मी,
विश्व नवे घडविले
सोबतीने आज त्यांच्या
पाऊल माझे पडले पुढे.

जरी आज मी आकाशी
उंच उंच विहरतो
दोर हाती घेऊन त्यांचा
जल्लोष मलाही दिसतो
स्वप्न माझे पूर्ण करण्या
स्वत:स ही ते विसरले
काचलेले हात त्यांचे
मी मनाने जाणले.

द्यायचे ते देऊन सारे
दूर उभे कृतार्थ ते
मागणी काहीच नाही,
हिशोब नाही कुठले
परतून आज मागे
त्यांच्यात पुन्हा मी नव्याने
कष्ट्लेले हात त्यांचे
हळू कुरवाळूनी सन्मानिले.

-अनन्या

गुरुवार, १५ मे, २०१४

मनाच्या मनातून..



मुक्त कवडसे मनी दाटले, अलगद उत्कट
स्मरता अवखळ रंगीत काही, काही अस्फूट

मन रमते सहज जरासे मागे मागे
नीतळ अनामिक सुख-दु:खांचे हळवे धागे  


शोधत जाता खोलखोलवर मागोव्यावर
पाऊलखुणांची चाहूल रेषा, उगीच वरवर

मनाच्या मनातून..
वाटते आपलेसे माझे कोणी
असते सोबत माझ्यासाठी, आश्वासक कोणी  


मी वळून बघता कसे अचानक अदृश्य होई
कोणा न कळे, गुपित आमचे तसेच राही              

कसे जुळले हे, ओढ अनामिक अतूट नाते.
कुठली जवळीक, प्रकाश-छाया खेळ मांडते

अवचित येते समोर आणि मी सावध नसते,
समजत नाही कसे कधी पण मर्म गवसते

सुखावते मन, नवजात उमलते कविता त्यातून!

मनाच्या मनातून..
असे ऋतू आणि असे ऋतूंचे बहर सोहळे
निळ्यासावळ्या आकाशी फुलले अगणित रंगांचे जाळे

स्वप्नपागोळ्या थेंब बरसले, रिमझिम रिमझिम
शब्द वहाते अमृत सरिता, झरझर झरझर  

क्षण खुलले, मनी खुलते आस नवी
मनी मानसी जाग येते अशीच खरी!


-अनन्या 



रविवार, ११ मे, २०१४

माऊली

जन्म तान्हुल्याचा
पान्हा माऊलीचा
मन माऊलीचे झाले
शब्दातीत                  

अवघा जीवनरस
पाझरे क्षणात
स्वत्व धावले
हृदयाकडे


मांगल्य सारे
उरात दाटले
स्तन जडावले
बाळासाठी


चैतन्य चोखून     
शांत तृप्त झाले
थेंब अमृताचे
बाळमुखी


सुख सोहोळ्याची
सांगता झाली
झाला जन्म माऊलीचा
कृतार्थ, धन्य!

-अनन्या 

शुक्रवार, ९ मे, २०१४

स्वप्न

विसावू दे जरासे  
तुझ्या बाहुपाशी
सख्या रे नीज दाटलेली  
पापण्यांत कधीची

व्यथा वेदना पार तळाशी
नीतळ मन होई
गारव्याची लहर मुलायम
जवळ तुझ्या नेई

अंधार हवासा वेढलेला
असाच राहू दे
श्वासाची लय हलके हलके
तुझ्यात मिसळू दे

पीस सुखाचे मऊ मखमली
अशी झोप यावी
नक्षत्रांची भरून ओंजळ
स्वप्न उभे दारी


-अनन्या 

शनिवार, ३ मे, २०१४

स्पर्श



खरा खराच वाटतो
क्षण सुखाचा स्पर्श असा
क्षणभरातच संपतो   
मागे उरतो केवळ, 
आठववर्ख फसवा  

नश्वर अवघी स्पंदने तरी    
लागले हवे हवे चे पिसे
जाळ्यातून सुटतांनाही
श्वास मागेच खेचतो    

वर्तमान स्त्रवतो अविरत
अटळ जाणिवांचा आवेग  
एकरूप शरीरांचा
आलेख मार्ग शोधतो.

गाढ गहिऱ्या वासनेचे
रुजते ऋण ओळखीचे
स्पर्श चैतन्याचा पेशीत
कोण जागतो, जागवितो?

-अनन्या