सोमवार, २९ डिसेंबर, २०१४

खूप वाटतं कधी कधी

खूप वाटतं कधी कधी
की वाचता याव्यात शब्दांमधल्या मोकळ्या जागा
शब्द वाचता येतात तितक्या सहजतेने
अव्यक्त मौनाचे पदर उलगडावेत  
पण खरंतर शब्दही असतात का सहजपणे कळणारे?
मनातल्या भावनेला खोल स्पर्श करणारे?
सगळीच नाती शब्दांनी बांधली गेलेली,शब्दात बांधली गेलेली.
आणि मधल्या मोकळ्या जागेत विशाल आकाश आपले दोन्ही हात मुक्त पसरून..
म्हटलं तर सामावून घेण्यासाठी आणि म्हटलं तर सर्वांगानं बरसण्यासाठी.

पाडिव्याची चंद्ररेखा     

निरुती दावावया शाखा
दाविजे तेवीं औपाधिका
बोली इया

आकाशातली बारीक चंद्रकोर झाडाच्या फांदीच्या ढोबळ आधाराने चटकन दिसते.
तसे आपल्याला बघायचे असते अनंत अर्थाचे आकाश आणि झाडाची फांदी होतात शब्द.
मोकळ्या जागेत सामावलेली बारीक चंद्रकोर नेहमीच जाणवेल असे तर होत नाही.
शब्दापलीकडे असलेल्या मोकळ्या अवकाशात सर्वार्थानं विविधता आहे
मोहक आव्हान आहे..सजग शोध आहे
मनस्वी मोकळीक आहे
सर्जनशील आकाशाचे चंद्रकोरीइतके आकर्षक स्वप्न आहे.

नव्या वर्षी नवे होऊया..
पूर्वसंस्कारांचे ओझे हळूच बाजूला ठेऊन नवजात नव्या जाणिवेने भवतालाचे स्वागत करण्यासाठी!!   


सोमवार, ८ डिसेंबर, २०१४



अनुनभवी नजरेला
खुणावतो आसमंत चारही दिशांनी अन्
कुतूहल झेप घेते सर्वांगाने तेव्हा
खरंतर अधांतरीच असते अस्तित्व कल्पनेचे
आधारासाठी धरलेली नाजूक बोटांची पकड
सुटली तर?
होतोच ना कासावीस जीव 
तान्हुलंपण जपण्यासाठी
झुकणारा तोल सावरण्यासाठी?
जाणती, अश्वासक सोबत

हवीशी वाटणं

हाच तर निसर्ग आहे!