एक वेध... मनात उमटणाऱ्या स्पंदनांचा! मनातल्या प्रेमाचा,उत्कटतेचा, उमलत्या,फुलत्या जाणिवांचा मनात दाटून येणाऱ्या कारुण्याचा, श्रद्धेचा,अंधश्रद्धेचा, गुणांचा,दुर्गुणांचा, मनातल्या भीतीचा,अस्वस्थतेचा, दुर्बलतेचा आणि शक्तीच्या अनाम स्त्रोताचा हा एक वेध...!
गुरुवार, २९ एप्रिल, २०२१
# मानसआरोग्य डायरी 6
बुधवार, २८ एप्रिल, २०२१
# मानसआरोग्य डायरी 5
रविवार, २५ एप्रिल, २०२१
# मानसआरोग्य डायरी 4
# मानसआरोग्य डायरी 3
गुरुवार, २२ एप्रिल, २०२१
# मानसआरोग्य डायरी पान 2
बुधवार, २१ एप्रिल, २०२१
# मानसआरोग्य डायरी 1
मंगळवार, ६ एप्रिल, २०२१
मुलांना झालंय तरी काय?
मुलांचा साधारण वयोगट बारा ते बावीस मानला तर काय असतात पालकांच्या तक्रारी?
आक्रमकता, उद्धटपणा, कोणतीही गोष्ट ऐकून न घेणं, स्वतःचं म्हणणं खरं करणं, खोटं बोलणं,वागणं.. कोणतीच गोष्ट शेअर न करणं, स्वतःचा अभ्यास, भविष्य करिअर याबाबतीत बेफिकिरीने वागणं, मित्र,मोबाईल आणि मजा यातच मश्गूल असणं, घरापेक्षा घराबाहेर रमणं, बाहेरच खाणं,अस्थिरता, काही व्यसन आहे का असा संशय किंवा व्यसनांच्या आहारी जाणं. आपली मुलं आयुष्याबाबत आणि भविष्याबाबत कमालीची निष्काळजी आहेत आणि पुढे त्यांचं कसं होणार याविषयी पालक कमालीचे चिंताग्रस्त.
पालकांच्या तक्रारी नेमकं काय दाखवतात?
वर्तमानात जाणवणारा दृश्य परिणाम.
कशाचा?
मुलांच्या वय वर्षे एक पासून वय वर्षे बावीस,तेवीसपर्यंत येण्याच्या प्रवासात त्यांनी आपल्या आजूबाजूच्या जगाचे जे अनुभव घेतले, जे काही बघितले, ऐकले त्यातून त्यांनी स्वतःच्या अस्तित्वरक्षण आणि घडणीसाठी जे काही उचलले, घेतले, शिकले आणि स्वीकारले त्याचा.
मग तो योग्य आहे का?
तर योग्य आणि अयोग्य असा निवडा करण्याऐवजी पालक म्हणून आपल्याला आधी काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. पालकांचं म्हणणं असतं, आम्हाला समजलंच नाही तो किंवा ती इतके कधी आणि कसे बदलले!
हो असं होऊ शकतं.. कारण मुलांना जन्म दिला की ती आपोआप वाढतील तशी वाढू द्यावीत त्यांना घडवण्यासाठी वेगळे काही प्रयत्न करण्याची काय गरज आहे? हा प्रश्न एका उच्चशिक्षित पालकाचा आहे.
अशी तर आपण आपल्या बागेतली झाडंपण नाही वाढू देत. त्यांची काळजी घेतो. जरा दुर्लक्ष केलं की झाडांच्या बरोबरीने वाढलेले तण दिसले तर आपण ते निसर्गाचे रक्षण करूया म्ह्णून तसेच ठेवतो का? कारण आपल्याला माहीत असते ते मूळ झाडाला उपद्रव देणारे आहे.
मग मुलांच्या विचारांमध्ये होणारे बदल आपल्याला आधी का जाणवत नाहीत? कारण कोणताच बदल एका रात्रीत होत नाही. ते जाणवत नाहीत कारण मुलांच्या मानसिक जडणघडणीच्या काळात पालकांच्या अतिव्यस्ततेमुळे त्यांच्यातला परस्पर संवाद कमी झालेला असतो. जिथे तो असतो तिथे वेळीच गोष्टी लक्षात येतात आणि त्यावर मार्ग, पर्याय शोधता येतात पण काही घरांमध्ये पालकांच्या लक्षात समस्या येते तोपर्यंत मुलांच्या मनातल्या तणांचे वेडेवाकडे फोफावणारे साम्राज्य झालेले असते. एकमेकांमध्ये अडकलेल्या फांद्यांचे जाळे पसरलेले असते. तिथे ना प्रकाश पोहोचू शकत ना आवाज. शिकण्याच्या टप्प्यावर कधी त्याचे त्यालाच हे उमगले तर तो हे सगळे पार करून आपला मार्ग शोधू शकतो, मात्र सगळ्यांनाच असे जमत नाही. काही त्या अंधारात हरवतात. तर काहींना बाहेर येण्यासाठी मदत लागते. मुलांची गरज वेळेत ओळखणे आणि ती स्वीकारण्याची मानसिकता तयार करणे हा त्यादृष्टीने पालकांचा पहिला प्रयत्न असू शकतो.
मग लक्षात येते आधी स्वतःलाच बदलायला हवे आहे आणि तसे ते सोपे नाही. पालक म्ह्णून असलेला निसर्गतः मिळालेला वरचा दर्जा आता मुलं अजिबातच जुमानत नाहीत म्ह्णून होणारा आपला तिळपापड कंट्रोल करता येत नाही मग आपण जाता येता मुलाला शाब्दिक शेरेबाजी करतो,वाट्टेल ते बोलतो हे 'मान्य'करणाऱ्या पालकांनी संवादाच्या दिशेने पाहिले पाऊल तरी टाकलेले असते.
आक्रमकता,बेफिकिरी,उद्धटपणा ही समस्येची केवळ दृश्य लक्षणे आहेत. प्रत्यक्ष संवादात त्याच्या मुळाशी काय काय सापडले माहीत आहे?
कमालीची असुरक्षितता,अनिश्चित भविष्याची भीती, आपली तसेच कुटुंबातल्या लोकांची टोकाची काळजी,रोजच्या त्याच त्या आयुष्याचा कंटाळा, परिस्थितीबद्दलची हतबलता, घरातल्या लोकांच्या प्रतिक्रियांचा राग, स्वतःच्या भावना समजण्यात आणि हाताळण्यात आलेले अपयश, काहीच नको अशी टोकाची निरिच्छ उदासीनता..
आक्रमकतेच्या मुळाशी भीती असू शकेल, बेफिकिर वागण्यामागे घाबरणारे,कमकुवत मन आहे हे समजल्यावर पालकांना खजील वाटले पण आपली योग्य भूमिका काय असायला हवी यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा तर त्यातून मिळाली.
कुंभार मातीचे मडके मोठ्या कौशल्याने घडवतो, बाहेरून थापट्या मारल्या तरी आतला हात हळुवारपणे आधार देत असतो. त्याच्याकडे समज आहे, सजगता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी लागणारे कौशल्य त्याच्याकडे निर्विवाद आहे. एक लक्षात आलं का?
याच्या बरोब्बर उलटे आपण करतो!
मुलांच्या सर्वांगीण वाढीमध्ये त्यांच्या मनाची सुदृढ,निकोप वाढ व्हायला हवी असेल तर आपल्या वागण्या बोलण्यातून आणि प्रत्यक्ष सहवासातून त्यांची ती गरज वेळेत भागवली जावी.
पालकांकडे शिक्षण आहे,समज आहे,कौशल्यही भरपूर आहे पण संवादाकरता लागणारा पुरेसा वेळ मात्र नाही.
म्हणून मग आपल्या मुलांना कधीही काहीही कमी पडू नये यासाठी पालक आपल्या जीवाचे रान करतात. मुलांचे मागण्या,हट्ट त्याने न मागताच तत्परतेने पुरवले जातात. आपले असे वागणे म्हणजेच प्रेम, कर्तव्य समजणारे पालक कमी नाहीत. आपण बाह्य आधार, प्रेम पुरवतो आणि आतून मात्र थापट्या मारत बसतो.
पालक असणे नैसर्गिक देणगी असलीतरी ती एक जबाबदारी सुद्धा आहे. एकमेकांमधल्या घट्ट नात्यांची, प्रेमाची वीण दुहेरी असेल तर कदाचित ती आयुष्यातल्या कठीण प्रसंगातही सहजी उसवणार नाही आणि त्यातून निसटणाऱ्या आनंदाला ना पालक पारखे होतील ना मुलं.
आपण पुरेसे संवेदनशील आणि जागरूक असू तर मुलांच्या भावनिक,मानसिक विश्वाची दारे आपल्यासाठी आनंदाने उघडायला मुलंही नक्की तयार होतील.
अनुभव घेऊन बघा,अजूनही वेळ गेलेली नाही.
© डॉ अंजली औटी.
(Photo Source: Google)