“बरं असं करूया आता की आपण दोघींनी एकमेकींचं म्हणणं ऐकून घेऊ आणि मग दोघी
मिळून ठरवू काय करायचं ते!”
प्रतिभा म्हणाली, “नीट सांग मला प्राची,काय म्हणणं आहे तुझं?”
दोन दिवस धुसफूस होऊन आज सकाळीच दोघींनी सकाळचा चहा एकत्र घेतला होता..एकत्र राहतांना
या गोष्टी चालायच्याच. लगेच काही मनात अंतर पडायला नको म्हणून.
महिनाच झाला होता प्रतिभाला प्राची आणि सुमेधच्या बडोद्याच्या घरी येऊन.
“आई, काळ किती बदललाय, लोकं बदलली आणि संदर्भपण बदलले आपल्या सगळ्यांच्या
जगण्याचे.
मला नाही वेळ मिळत रोज पूजा वगैरे काही करायला. सुमेधचा तर विश्वासच नाही
देवावरच. गेल्या चार महिन्यांपासून पूजा केलीच नाहीये मी पण..त्याने काय फरक पडतो
आणि? मनात आलं कधी, तर करतेही मी..आता धूळ खात पडले देव देवघरात..चांदीची समई
चांदीचीच आहे का ओळखूही येत नाहीये..दिसतंय मला पण ते..
तुम्ही काहीही न बोलता पूजा केली आणि शिरा पण केला नैवेद्याला..अबीर किती खुश
झाला ते बघून..हे असं रोज का नसतं आई आपल्या घरात, असं म्हणाला तो..मला मनातून
अपराधी वाटतच होतं..त्यात अबीरचं ऐकून कसंतरीच झालं मला..आणि मला समजलंच नाही की
मला राग कसला आला ते नेमका..मी दिवसभर चिडचिड केली आणि प्रसाद पण खाल्ला
नाही..तुमच्याशी बोलले नाही..हे असं नको होतं मी वागायला..
पण आई, त्यापेक्षा घरात देवघर नसलं तरच बरं होईल..म्हणजे हे असे काही विचार
मनात येऊन अपराधी तर वाटणार नाही..”
प्रतिभाला हे असं काही कारण असेल तिच्या चिडण्याचं हे मनात पण आलं
नव्हतं..तिला वाटलं त्या दिवशी तिला काय करायचं हे न विचारता स्वयंपाक केला आणि
त्या दिवशी सगळ्यांनी बाहेर जेवायला जायचं ठरलं होतं..ते त्या साफ विसरून गेल्या
म्हणून ती रागावली..
प्रतिभा सुशिक्षित होती आणि सुजाणही. मुलांना आपली गरज असेल त्यावेळी मदत करून
अत्यंत अलिप्त राहून ती दोन्ही मुलांच्या संसारिक गोष्टींपासून जाणीवपूर्वक अंतर
राखून होती.
“आता तुम्ही सांगा आई..” प्राची म्हणाली...
“प्राची, मला सांग तुला आवडतं आहे का आता असं देवघर बघायला? नेमकं काय वाटतं
सांगशील मला?”
अबीरलाच काय प्राचीला पण मनात कुठेतरी छान वाटलंच होतं..शिवाय त्या दिवशी
सुमेधनेदेखील घरातल्या त्या कोपऱ्याकडे अनेकवेळा बघितलं होतं..कदाचित त्याचाच तर
तिला राग आला होता..त्या छान वाटण्याचाच..
कारण छान वाटलं की त्याची जबाबदारी येऊन पडते मग..प्रयत्न करावे लागतात ते
छानपण टिकवण्यासाठी आणि त्यासाठी लागणारं सातत्य आणि उत्साह तिच्याकडे अजिबात नव्हता..शिवाय
त्यापेक्षा आणखी कितीतरी चांगले, constructive उद्योग आहेत की तिला करता येण्यासारखे..आधीच कितीतरी
मनात असलेल्या गोष्टीना न्याय देऊ शकत नाही पुरेशा वेळाअभावी..
यांना काय एकदा ‘हो’ म्हटलं की जिंकल्याच की मग त्या..स्वतःच्या मुलाला पटवा
मग आधी..देव असतो ते..ते तर शक्य नाही आणि मला सांगतायेत...
मनात हे सगळे विचार ऐका क्षणात येऊन गेले तरी प्रत्यक्षात खोटं बोलून “नाही”
सांगणं तिला काही जमलं नाही..
ती कबूल करून मोकळी झाली की मला तर खूप प्रसन्न वाटलं..
आताही तिचे डोळे अभावितपणे तिकडे वळलेच..सगळे देव लखलखीत दिसत होते आणि शांत
तेवणाऱ्या समईचा उजेड त्यांच्या चेहऱ्यावर चमकून आणखीच देखणे दिसत होते.
“प्राची..घर तुझं आहे! तू काय केलं पाहिजेस आणि नाही, हे मी तुला कधीच नाही
सांगणार. मी मला काय वाटतं ते सांगते हं..
आपलं घर म्हणजे काही फक्त चार भिंती नसतात..घरात राहणाऱ्या माणसांच्या विचार
आणि भावनांचे प्रतिध्वनी घरातल्या कणाकणात वसत असतात. संपूर्ण सामावून घेतं
आपल्याला आपलं घर..म्हणून तिथे सगळ्यात जास्त विसावा मिळतो आपल्याला..अगदी आठवडाभर
वेगळ्या विसाव्यासाठी घराबाहेर जाऊन राहिलात तरी परत घरी यायची ओढ वाटत नाही..असा
माणूस कदाचित जगात नाही..’सुख’ साजरे करायला आपण घराबाहेर जातो पण ‘दु:ख’ सहन
करण्याची ताकद मिळवण्यासाठी आपण घरीच परततो..कितीही ताण असो,वेदना असो, व्यथा
असो..अवघड प्रसंग असो..आपल्याला शांतता मिळतेच.
हे होतं कारण आपल्या घरात आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा, चांगले विचार यांचा वास
असतो. घराला घरपण येतं ते खरंतर घरातल्या माणसांमुळे..वस्तूंमुळे नाही.
देव आहे की नाही मलाही नक्की माहीत नाही. आणि समजा असलाच तरी त्याला तुम्ही
पूजा करा किंवा नका करू..नैवेद्य दाखवा किंवा नका दाखवू..त्याची गरज नाही..त्यावरून
तो काही तुमची ग्रेड नाही ठरवणार.
देव कोणी व्यक्ती नाही ग ती वृत्ती आहे..आणि ती असते माणसांमध्येच. आपल्या
सगळ्यांमध्ये ती आहे. पण आपल्या व्यस्त, धावपळीच्या आयुष्यात ती काळवंडून गेली
आहे..तिच्यावर प्रदूषणाची काजळी जमा झाली आहे.
घराचा एक कोपरा रोज असा प्रसन्न आणि शांत असेल तर घरात आल्याआल्या आपल्याला
त्याची जाणीव नक्की होईल.
देवघरच असावे असे नाही म्हणणर मी..आपापल्या आवडीप्रमाणे काहीही असावे..ज्याने
ती ‘भावना’ आपल्या मनात जागी होईल.
एक क्षण असा घरात शांत,प्रसन्न मिळाला ना की उरलेल्या चोवीस तास मनातली ही
स्निग्ध ज्योत मनाच्या एका कोपऱ्यात आपोआप तेवत राहते..आणि मग ती मनात उमटणाऱ्या
नकारात्मक विचारांचा अंधार दूर करते..
असे मन दुसऱ्या कोणासाठी वाईट चिंतत असेल तर या प्रकाशात त्याला स्वतःची चूक
नक्की दिसू शकते, असे मला वाटते.
शिवाय मुलांनादेखील ही सवय लागते..मुलांचे सैरभैर विचार आपोआप जरा
स्थिरावतात..
आणि “मी नास्तिक आहे, मी नाही मानत देव..”
असे नुसतेच म्हणण्याआधी मनाची मशागत होईल असा सक्षम पर्याय तुम्ही कोणी
आपल्यापुरता तरी शोधला आहे का?
म्हणजे तो वारसा बघत, आचरणात आणत आपली पुढची पिढी विचार आणि भावनांनी समृद्ध
घडेल..?
काहीतरी तर असं हवं ना तुमच्याकडे की त्याने त्यांच्या मनाच्या जमिनीची निकोप
मशागत होऊन त्यात योग्य ते बीज पडेल..
आणि सर्वसामान्य माणसांकडे काय वेगळं,नवीन असणार ग..म्हणून पूर्वीच्या जुन्या
लोकांनी हा पर्याय आचरण्यास अगदी सोपा वाटला म्हणून स्वीकारला असेल..पण
ज्यांच्याकडे कला होती..काहीतरी ध्यास होता..आयुष्य जगण्याचे उदिष्ट्य होते किंवा
अगदीच काही नसेल तर एखादे समाज उपयोगी काम त्यांनी हातात घेतले होते..अशा
लोकांच्या पुढच्या पिढीनेही तो वारसा त्यांच्याकडून नक्की घेतला आहे..त्यात आपले
कष्ट आणि सातत्य घालून काही यशस्वी झाले तर काही काठावर देखील राहिले..
म्हणजे त्यांनी “देवत्व” नावाची सकारात्मक वृत्ती आपापल्या मार्गांनी
शोधण्याचा प्रयत्न तरी केला..
आपण आपल्या आजूबाजूला विस्कटलेली,भरकटलेली आणि असमाधानी,अस्वस्थ माणसे बघतो..
त्यांच्या मनाचे प्रतिबिंब त्यांच्या वागण्यात, कृतीत दिसते..माणसे काय एकेकटी
असतात? नाही..त्यांच्यामागे त्यांचे संपूर्ण घर असते...माणसे आपल्या संपूर्ण घराचे
प्रेझेन्टेशन करत असतात समाजात..
अशी माणसे देखील उठून दिसतात आपल्याला आजूबाजूला..सुवास असो किंवा कुवास
कितीही प्रयत्न केला तरी झाकून राहतो का?
प्राची भारावल्यासारखी आपल्या सासूकडे बघतच बसली..एक छोटीशी कृती..तिच्यामागे
इतका खोल विचार आणि अर्थ असेल हे तिच्या कधीही लक्षात नसते आले..
आणि त्या म्हणत होत्या त्यात न पटण्यासारखे तरी काय होते?
उलट आज तिला खऱ्या अर्थाने ‘देव’ ही संकल्पना समग्र समजली..
देव मूर्तीत नक्की नाही..पण जगात ‘देवत्त्व’ मात्र नक्की अस्तित्वात आहे..ते
सांभाळायचे ते मात्र पुढच्या पिढीसाठी याबद्दल तिच्या मनाची खात्री पटली..
आता अबीरची आई म्हणून आपण आणखी जाणत्या झालो आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा..असे
तिला वाटले..
तिच्यातल्या देव तत्वाला प्रतिभाने जागे केले होते..मनातल्या गाठी-निरगाठींचा
गुंता हलक्या, हळूवार हातांनी सोडवला होता आणि आता मात्र तिच्या मनाच्या गाभाऱ्यात
तिच्या आयुष्यभर समई मंद तेवत राहिल..असा विश्वास त्यांना वाटला..
एका आईने अजून काय आपल्या पुढच्या पिढीला द्यायचे असते?
© डॉ. अंजली औटी.
mindmatteraa@gmail.com