अनाम रस्त्यावरून
तुझा हात हातात घेऊन
चालायचंय
एखादी कविता
सांगायची
एक ओळ गुणगुणायची..
टक लाऊन बघायचीय
आभाळात दूर दूर
जाणारी
मला वेढून घेतलेल्या
तुझ्या हाताच्या
उबेत,
हळूहळू विरघळणारी
मनातली एक एक वेदना
कापसा सारखी हलकी
होऊन
ढगांबरोबर दूर
जातांना
बघायचीय मला..
डोंगराच्या टोकाशी
जाऊन
खालच्या एखाद्या दरीत
खोल खोल डोकावायचंय
पोटातल्या अनामिक भीतीला
तू माझ्या सोबत
असलेल्या
एखाद्या क्षणाचं अप्रूप
सांगायचंय..
सूर्योदय होतांनाचे
आभाळाचे रंग सारे
दिवस एखादा उगवतांना
तुझ्या सोबत बघायचे
आहेत..
असे खूप खूप एखादे राहिलेय,
जगता जगता जगायचेच
राहून गेलेय..
आता निदान एखादा
सूर्यास्त तरी
आयुष्याच्या उतरणीला
तुझ्या खांद्यावर डोके
टेकवून
मन भरून बघायचाय...!
-अनन्या.