बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

आम्ही सारे भारतीय...!






बऱ्याच वेळा आपण इतरांना सोईस्कर ठरेल अशाच बेतानं वागत असतो.आपले योग्य-अयोग्य बद्दल असलेले मत,समज, आपल्या धारणा,विश्वास आणि कल्पना ओलांडून आपण ‘लोकांना काय वाटेल’ म्हणून सामाजिक समारंभात सहभागी होत असतो. असं वागण्याची खरंच गरज असते का? की आपण केवळ वेळ साजरी करतो?
बरं, या ‘इतर’ लोकांचा आपल्या दैनंदिन जगण्याशी,आपल्या भावविश्वाशी संबंध असतोच,असं नाही. आपल्याला त्यांच्याबद्दल  खूप काही प्रेम वाटत असतं, त्यांच्या कार्यक्रमांविषयी आस्था असते, किंवा त्या समारंभात आपण खूप काही आनंदात असतो,असेही नाही. मग त्यांच्याशी जुळवून घेण्याचा इतका अट्टाहास आपण कशासाठी करतो? आणि वर पुन्हा स्वतःच स्वतःला स्पष्टीकरण देत बसतो? का?
आपल्या आनंदाशी जोडलेले सण,समारंभ,उत्सव साजरे करतांना त्यातले आपल्याला पटेल,रुचेल,पेलवेल आणि परवडेल ते ठामपणे स्वीकारण्यास आणि त्याप्रमाणे वागण्यास काय हरकत आहे? हास्यास्पद, कालबाह्य सण-समारंभ केवळ दुसऱ्यांसाठी म्हणून साजरे करणे आता सोडून द्यायला हवे.
आनंद असो वा दु:ख, आपल्याला वेळ ‘साजरी’ करण्याची सवय लागलीये. उत्सव साजरा करण्यासाठी आपल्याला केवळ एक निमित्त हवे!  
आपण उत्सवप्रिय आहोत, मान्य. सगळ्यांनी मिळून एकत्र येणे.मजा,गंमत करणे,एकत्र खाणे-पिणे हे ही समजण्यासारखे. पण त्या पलिकडे जाऊन उत्सव म्हणजे आता केवळ एक ‘फॅड’ झाले आहे, असे नाही वाटत?
आपला आनंद, दु:ख  ‘प्रदर्शनीयच’ असावे का? आणि अशा प्रदर्शनात आपणही केवळ जनरित म्हणून सहभागी व्हावं?  साजरं करण्यात वाईट काही नाहीये, पण ते ज्या पद्धतीने केलं जातंय ते मात्र वाईट आहे.
त्यापेक्षा स्वत:च्या मनाला आवडेल ते करणं..आणि वेळेत ‘नाही’म्हणायला शिकणं..हेदेखील जमायला हवं,नाही का?
एका लग्नाला गेले होते, वातावरणात उत्साह,’उन्माद’ वाटेल या पातळीवर होता. प्रत्येक गोष्टीत वेड्यासारखा खर्च केलेला दिसत होता. लग्नाचा हेतू काय आणि त्यासाठी आपण करतो काय, याचे यजमानांचे आणि पाहुण्यांचे भान सुटलेले दिसत होते. लग्न लागले, डोळे दिपवून टाकणारी आतषबाजी झाली. वातावरणात खमंग अन्नाचा आणि फटाक्यांचा संमिश्र वास भरून राहिला. आजूबाजूला खाण्याचे विविध स्टॉल्स आणि त्यात डोळ्यांना खुणावणारे अगणित पदार्थ दिसत होते. अशा गर्दीत आपल्याला माणसांच्या विविध तऱ्हा,मनोवृत्ती दिसतात. काही लोकं लग्नाला म्हणून येतात की केवळ चवीने खाण्यासाठी,असा प्रश्न पडतो. तिथेही अनेक लोक असे होते की ज्यांना प्रत्येक पदार्थ चाखायचाच होता. रांगा लावून लोकांनी आवर्जून सूप प्यायले. आपापली डिश घेतली आणि जागा मिळेल तसे बसायला सुरवात केली. आता आजूबाजूला अस्ताव्यस्त खाणाऱ्या लोकांची नुसती धांदल.
काही वेळापूर्वी स्वच्छ, सुबक,सुंदर वाटणारी सजावट, व्यवस्था अगदी काही वेळातच अस्ताव्यस्त झाली. लोकांनी खाणे कमी आणि टाकणे,भिरकावणे जास्त अशी परिस्थिती होती. आपल्या पोटाला किती लागते आणि किती ताटात वाढून घ्यावे याचे तारतम्य सुटलेली लोके बघून जेवण्याची इच्छाच गेली.
इतक्यात रांगेत उभ्या असलेल्या एका बारा-तेरा वर्षाच्या मुलाला एका माणसाने खसकन ओढून बाजूला केले..इतक्या जोरात की तो मुलगा खाली पडला. त्याच्या हातातली डिश खाली पडली..अन्न विखुरले. इतका त्या माणसाला कशाचा राग आला? तर  झालं होतं असं की, एकदा पळवून लावूनही तो अनाहूत पाहुणा, चांगल्या जेवणाच्या आशेने दुसऱ्या बाजूच्या रांगेत घुसलेला होता..तो काही आमंत्रित लोकांच्या मुलांसारखा दिसत नव्हता म्हणून त्याला बरोबर वेचून बाजूला काढता आला.  
मुलगा अर्थातच शरमला होता. तिथेच काम करणाऱ्या कोणा कर्मचाऱ्याचा तो मुलगा होता. त्यादिवशी वडिलांबरोबर आलेल्या त्याला भूक लागली होती आणि पदार्थांच्या वासाने अस्वस्थ होऊन तो जेवण्याच्या रांगेत गेला होता कोणीतरी त्याला ओळखले आणि त्याला पुन्हा जेवण्याच्या रांगेत उभे केले गेले..पण त्याचे इवलेसे मन आता नाराज झाले असावे. त्याने हळूच रांगेतून काढता पाय घेतला, न जेवताच..आणि थोड्याच वेळात दिसेनासा झाला.
                 


जेवण झाल्यावर खरकट्या डिश गोळा करण्यासाठी ठेवलेले मोठे मोठे टब वाया गेलेल्या अन्नाने थोड्याच वेळात ओसंडून गेले..लोकांनी कितीतरी अन्न ताटात वाढून घेऊन टाकून दिलेले होते.
किती विरोधाभास आहे, ना आयुष्य?  माणसं सुसंस्कृत आहेत असे का म्हणयचे?
याच कार्यक्रमात आनंद साजरे करणारे अनेक चेहरे होते आणि त्यांना आनंद साजरा करता यावा, त्यामागची मेहनत करणारे देखील अनेक चेहरे होते..दोन्ही चेहऱ्यांच्या मागच्या भावनांमध्ये किती जमीन अस्मानाचे अंतर होते, खरंच!
हे आपण प्रत्येक साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवात बघतो. ‘आनंद’ जरूर साजरा करावा पण तो करतांना त्यासाठी कष्ट घेणाऱ्या लोकांकडे आपण किमान “माणूस’ म्हणून तरी बघतो का याचा विचार देखील जरूर करावा.
जग बदलले,पिढ्या बदलल्या पण अजूनही श्रम आणि पैसा आणि सत्ता यांचे गणित व्यस्तच आहे की...आणि गरीब हा केवळ आर्थिक परिस्थितीने गरीब असतो..त्याला जात-पात,धर्म आणि इतर रंग आपण केवळ आपल्या सोयीसाठी देतो. कारण आपल्याला त्याची गरिबी काहीतरी हेतूने वापरायची असते. कारण आपल्याला मोल आहे ते फक्त पैशाचे!
‘शारीरिक श्रम’ आपल्यासाठी कायम दुय्यम,दुर्लक्षित.
आपला आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडतांना प्रत्येकाने हा विचार जरूर करावा की आपला तो आनंद, आपण ‘माणूसपणाच्या पातळीवर’ तरी घेतोय का?
हॉटेलमधले वेटर्स, वॉचमन, ड्रायव्हर, रस्त्यावरचे फेरीवाले,भाजीवाले,छोटे दुकानदार, लहान विक्रेते, रिक्षा आणि इतर वाहनचालक, घरकाम,बागकाम करणारी माणसे..अनेक छोटी मोठी श्रमाची कामे अगदी थोड्या मोबदल्यात करणारी माणसे..आपल्या क्षणभराच्या आनंदासाठी, आपल्याला सुख मिळावे म्हणून दिवसभर राबत असतात.
आपण थोड्या पैशांच्या मोबदल्यात तो आनंद,सुख,आराम, सेवा विकत घेत असतो,इथपर्यंत ठीक आहे..पण मग त्या लोकांशी वागण्याच्या पातळीवर तरी आपण ‘माणूस’म्हणून वागतो का?
त्यांची जाणीव ठेवतो का? त्यांच्या शारीरिक श्रमाबद्दल आपल्याला आदर वाटतो का?  
साजरे करणे म्हणजे आपल्याजवळचे दुसऱ्याला देणे..हे देतांना, आणि ‘आपले-परके’..अशा चौकटी आखतांना आपण सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत वागतो आहोत का?
‘आमंत्रित’ लहान मूल तेवढे प्रतिष्ठित आणि बिनाआमंत्रण आलेले तेवढेच मूल मात्र अप्रतिष्ठित?
परवा एका भाजीवालीने घासाघीस करणाऱ्या एका सद्गृहस्थांना माझ्यासमोर अगदी चपखल उत्तर दिलं..
“भाऊ, तुम्हाला सातवा वेतन आयोग पाहिजे आणि तरीही भाजीचा भाव मात्र जुनाच पाहिजे,नाही का? आम्ही कुठं जायचं मग संप करायला?”
हा प्रश्न व्यवस्थेने ‘माणसातल्या माणुसकीला’ विचारलेला प्रश्न आहे.. आपल्याकडे खरंच आहे का याचे उत्तर?
© डॉ.अंजली/अनन्या
mindmatteraa@gmail.com
(फोटो सौजन्य गुगल)



शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

फिरुनी नवी जन्मेन मी!


शौनक डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. हॉस्पिटलच्या कॉरिडोरमध्ये एका बाजूला, कोपऱ्यात बसलेल्या त्याच्याकडे आजूबाजूने अखंड वाहणाऱ्या गर्दीचं अजिबात लक्ष नव्हतं. थंडीचे दिवस आणि खालची थंडगार फरशी. त्याला फक्त इतकं समजलं होतं की थोड्यावेळात ती अॅम्ब्युलन्स येणार. त्याच्या आईला बसवलं जाणारं हार्ट कदाचित त्यातून येईल.. उजव्या बाजूला असलेल्या मोठ्या गेटमधून कोणालाच आत सोडत नव्हते. मान वाकडी करून कळ लागली.
गेल्या महिनाभर त्याचं इवलंसं मन हवालदिल झालं होतं. आई हॉस्पिटलमध्ये. ती आपल्याला सोडून निघून तर जाणार नाही ना, या विचारांनी त्याला झोप पण नीट लागत नसे. देव असलाच तर त्याने ऐकायला पाहिजे म्हणून तो सतत एक प्रार्थना म्हणे..आईनेच शिकवली होती त्याला.
पंधरा दिवसांपूर्वी त्याने मामाला विचारलं होतं की आईला झालंय काय? त्यावेळी त्याने सगळं सांगितलं त्याला. जितकं समजेल तितकं त्याने लक्षात ठेवलं होतं. जीवाचा कान करून ऐकलेल्या मोठ्यांच्या गप्पांमधून ‘आईचं मोठं ऑपरेशन झाल्यावर ती मग कायमची बरी होणार आहे हे वाक्य ऐकून त्याला खूप आनंद झाला होता. कोणी आईला भेटू देत नव्हते त्याला. आपली कोणाला अडचण होऊ नये असा तो एका कोपऱ्यात गुपचूप बसून रहात असे. त्याला तिथे थांबायला कोणी अडवू नये याची काळजी कशी घ्यायची हे त्याने लवकरच शिकून घेतले होते.
अॅम्ब्युलन्स आली. लोकांच्या गर्दीत त्याला काहीही दिसलं नाही. थोड्यावेळाने ती निघून गेली तरी शौनक जागचा हलला नाही. सकाळपासून त्याने काहीही खाल्लेले नव्हते. भूक लागली होती पण आता त्याला कशाचीच पर्वा वाटत नव्हती. रात्रीपर्यंत थांबून मामा त्याला घरी सोडायला निघाला. “आईचं ऑपरेशन नीट झालं,लवकरच तुला तिला लांबून बघता येईल” मामा म्हणाला पण जोपर्यंत तिला बघत नाही तोपर्यंत शौनकचा विश्वास कोणाच्याच सांगण्यावर बसणार नव्हता. “मामा,आईला दुसऱ्या कोणाचं तरी हार्ट बसवलं, मग तिचं कुठे गेलं?”
“तिचं काढून तर दुसरं बसवलं” तरीही त्याच्या मनात अनंत प्रश्न होते.
“मग आई मला विसरून तर जाणार नाही ना?” त्याने त्याला  सगळ्यात जास्त छळणारा प्रश्न विचारला..
“ नाही रे ते मेंदूचं काम असतं..!” मामा म्हणाला आणि शौनकला हायसं वाटलं. त्यावेळी असेल तो अकरा-बारा वर्षांचा.
आज एखाद्या पिक्चरसारखं त्याला सगळं आठवलं. काळानं जणू आपलं एक आवर्तन पूर्ण केलं होतं. आजही तो पुन्हा तशाच एका भव्य हॉस्पिटलच्या आवारात होता. पोटात तीच कालवाकालव होत होती. मनात असंख्य प्रश्न होते पण यावेळी निर्णय घेण्याची वेळ त्याच्यावर आली होती. सगळ्यांच्या नजर त्याच्यावर होत्या आणि त्याच्या नजरेसमोर मात्र जसाच्या तसा होता भूतकाळात त्याने अनुभवलेला तो प्रसंग...
आज अनुभव परिपक्व आहेत. मन महत्वाच्या,सूक्ष्म गोष्टींचा अंदाज लावू शकते आहे,पण भावना सांभाळणं मात्र आजही तितकंच कठीण झालं आहे. कारण..कारण आज माझी मृणा..,माझ्या काळजाचा तुकडा त्या जागेवर आहे.  मिटलेल्या डोळ्यांसमोर सारखी तिची हसरी,खेळकर मूर्ती येते आहे. तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये चैतन्याचं,आनंदाचं कारंजं उसळत असायचं कायम. प्रत्येक गोष्टीत तिचा उत्साह नुसता उतू जायचा.. बोलका स्वभाव,त्यामुळे घरी-दारी सगळीकडेच लाडकी, हवीहवीशी असलेली मृणा.
पण त्या काळाकुट्ट दिवशी सगळं होत्याचं नव्हतं होऊन गेलं..  मागून येणाऱ्या ट्रकने तिच्या गाडीला जोरात धडक दिली. मृण्मयी इतक्या जोरात फेकली गेली ती खाली जमिनीवर पडली ते शुद्ध हरपूनच. कोणीतरी ताबडतोब तिला हॉस्पिटलला नेले..आम्हाला फोन आला.. आम्ही जीवाच्या आकांताने धावलो. त्या ट्रकवाल्याला लोकांनी थांबवले होते आणि भरपूर चोप दिला होता..त्याला म्हणे ही रस्त्यात दिसलीच नव्हती..आता काय आणि कसे याला काही अर्थ उरला नव्हता..पुढे काय इतकेच फक्त महत्वाचे उरले होते.
अठरा तास झाले आमचं बाळ मृत्यूशी झुंज देते होते. अजूनही शुद्ध नव्हती.
नातेवाईक,मित्र धावत आले. मृण्मयीचा चार महिन्यांपूर्वी साखरपुडा झालेला. संकेत बेंगलोरला एका सेमिनारसाठी गेलेला होता. लगेचच्या फ्लाईटने तो पुण्यात पोहोचला. मृण्मयीला अशा अवस्थेत बघून त्याला स्वतःला सावरणे जमेना..नेमके काय झालेय..तिला कुठे लागले आहे याचे काही रिपोर्ट येणे अजून बाकी होते. शरीरावर अनेक ठिकाणी लागल्याचे दिसत होते.. हाताचे,पायाचे हाड फ्रॅक्चर झालेले होते. बघवत नव्हते काहीच..मन एक क्षण देखील शांत नव्हते..
अनेक तपासण्या केल्या गेल्या. एकमेकांना धीर देत, अस्वस्थ मनस्थितीत सगळ्यांचे डोळे फक्त रिपोर्टकडे लागलेले होते. जीव मृण्मयीकडे एकवटला होता....
आणि अखेर डॉक्टरांनी सांगितले की मृण्मयी जवळजवळ या जगातून गेलेलीच आहे...सपोर्ट सिस्टीम काढून घेतली तर तिला तिचा स्वतंत्र श्वास घेणे शक्य होणार नाही आणि सगळे संपेल..
ते काय सांगतायेत हे शब्द फक्त डोक्यात शिरत होते पण ते समजत नव्हते कोणालाच..एक शून्य अवस्था...नि:शब्द..बधीर  जीवघेणी अस्वस्थता..एकमेकांच्या हृदयाचे ठोके एकमेकांना ऐकू येत होते इतकी शांतता. माझ्या पायातलं त्राण निघून गेलं..सगळं संपलं होतं..एक हसतं-खेळतं अस्तित्व..जगणं सुरु होण्याआधीच..संपून गेलं.आता पुढचा निर्णय घ्यायचा होता..आणि तो होता चालू असलेली सगळी ट्रीटमेंट थांबवण्याचा.
मृण्मयीच्या शरीरातले सगळे महत्वाचे बाकी अवयव शाबूत होते..त्यांना कुठेही काहीही धक्का बसलेला नव्हता..तरुण वय आणि ‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तगट..तिचे जास्तीतजास्त अवयव दुसऱ्या कोणा गरजू व्यक्तीच्या उपयोगात येऊ शकतील..त्यांना जीवनदान मिळू शकेल..
एकदा कॉलेजमध्ये ‘मरणोत्तर देहदान’ विषयावर एक वादविवाद स्पर्धा होती..त्यावेळी आजीचा अनुभव शौनकने तिला सांगितला होता. आपण सगळेच हा फॉर्म नक्की भरू,असे मृण्मयी म्हणाली सुद्धा होती..अजून काही दिवसातच या गोष्टीवर खरोखरच विचार करावा लागणार आहे, हे कोणालाच माहीत नव्हते.
नियतीचे संकेत कोणाला कधी कळले नाही तरी सूत्रबद्ध असावेत कदाचित.
डॉक्टरांनी आणखी माहिती देऊन लवकर निर्णय घेण्याची विनंती केली. त्यावेळी अशाच कोणीतरी घेतलेल्या निर्णयामुळे माझी आई मला परत मिळाली होती. पुढे आई तिचे संपूर्ण आयुष्य आनंदात, निरोगी जगली.
त्या आनंदाच्या, कृतार्थतेच्या, समाधानाच्या क्षणांचे दान कोणा गरजू व्यक्तींच्या ओंजळीत घालण्याची वेळ आली होती. माझ्या मृणाच्या इच्छेचा आदर वाटला मला. हात थरथरत होते, डोळ्यांना अक्षरं दिसत नव्हती तरीही मी नेटाने सही केली.



हॉस्पिटलमधून परत घरी येतांना पावलं जड झालेली होती..कोणीच कोणाशी बोलत नव्हते. सगळं संपल्याची एक हताश जाणीव सरसरत मेंदूपर्यंत गेली..त्याचवेळी  मृणाचा हसरा चेहरा नजरेसमोर फ्लॅश झाला. स्व:ताला सावरले, सावरणे भाग होते.
दु:ख खूप मोठे आहे पण हवालदिल व्हायला नको. माझी लेक जवळच्या, ओळखीच्या, सगळ्यांसाठी एक आदर्श घालून गेली आहे. त्या तिच्या भावनांचा सन्मान मला करायला हवा. मला खात्री होती माझी मृणा अत्यंत समाधानाने पुढच्या प्रवासाला गेली आहे.
आज कोणाच्यातरी शरीरात तिच्या हृदयाने चैतन्याची फुंकर घातली असेल, कोणाच्यातरी डोळ्यांना तिच्यामुळे दृष्टीचे अनोखे सुख मिळेल, कोणाच्यातरी कानांना सृष्टीचे, अगम्य बोल ऐकू येऊ शकतील, कोणाची तरी त्वचा सुखाच्या संवेदनांनी झंकारून उठेल, कोणाचेतरी श्वास पुन्हा सुरु झाले असतील आणि परमेश्वराला अखंड साकडे घातलेल्या कोणा चिमण्या जीवाच्या चेहऱ्यावर आज समाधानाचे हसू असेल..त्याला सुरक्षित वाटत असेल. नाती,आयुष्य परिपूर्ण झाली असतील. जीवनाचा आनंददायी स्पर्श सगळ्यांना सुखावत असेल.
माझ्या मृणाच्या शरीराचा प्रत्येक कण कोणाच्यातरी उपयोगात आला असेल.. दुर्दैवाने तिला स्वतःचं आयुष्य नाही पूर्ण करता आलं पण  तिच्या शरीराने ही अपूर्णता किती पटीने भरून काढली. किती जगलो, ही आयुष्याची लांबी महत्वाची नसतेच मुळी.
माझी ओंजळ रिकामी नाही..रात्र जरूर आहे, पण काळीकुट्ट घाबरवणारी मुळीच नाही. कारण कृतार्थ समाधानाचे लखलखते चांदणे आज आमच्या सोबतीला आहे. आणि स्वयंप्रकाशाच्या तेजाने उजळून निघालेली माझी मृणा आज त्या उंचीवर आहे.
या लखलखीत भावनेचा स्पर्श झालेल्या शौनकने आज आपलं आयुष्य ‘मरणोत्तर देहदान’ या विषयाच्या जागृतीसाठी समर्पित केलं आहे. त्याच्या प्रत्येक शब्दामागे त्याच्या आयुष्याचा अनुभव आहे. ऐकणाऱ्याच्या हृदयात दृढ निश्चयाची एक आश्वासक ज्योत प्रज्वलित करण्याचे सामर्थ्य त्यात नक्की आहे.
आयुष्यात वेळ,काळ,परिस्थिती कोणालाही सांगून येत नाही. ती कोणावर कधीही, कोणत्याही रुपात येऊ शकते.
माणुसकीच्या या सद्भावनेचा आपण सगळेच सन्मान करूया..आज मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प करूया!

© डॉ. अंजली/अनन्या औटी.
mindmatteraa@gmail.com

(फोटो सौजन्य: गुगल)