मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

समतोल




“मला जराही मोकळा श्वास घ्यायला वेळ नाही मिळालाय ग! सतत काहीतरी मानेवर असतंच. एक पूर्ण होत नाही तोवर दुसरं काहीतरी तातडीने करायलाच हवं असं समोर असतं..असं वाटतंय मी कुठल्या रेसमध्ये आहे आणि जीवाच्या आकांताने नाही पळाले तर सगळं जग माझ्या पुढे निघून जाईल आणि मी मागेच..सगळ्यांच्या मागे! जगाच्या मागे! मला तर कल्पनाही नाही सहन होतेय..”
धरित्री कसनुसा चेहरा करत म्हणाली. एकीकडे आईच्या हातचा गरम गरम पराठा ती उभ्यानेच भराभरा खात होती. अद्वैतला आजीकडे नीट राहण्याबद्दल आणि शाळेतल्या कुठल्याशा स्पर्धेबद्दल ती काहीबाही सांगत होती. अरुणा तिच्याकडे बघत राहिली. एका कॉफरन्ससाठी ती निघाली होती. आपल्या कर्तुत्ववान मुलीचा अभिमान वाटायला हवा की तिला क्षणाचीही उसंत नाही म्हणून खंत,याची चुटपूट नेहमीप्रमाणे अरुणाच्या मनात उमटली. आपल्या विश्वात ती खुश आहे,अशी स्वतःच्या मनाची समजूत घालणारी अरुणा आपल्या मुलीचं बोलणं ऐकून,चेहरा बघून आतून हलून गेली. तिच्याशी काही बोलण्याचे,काही नाही तर तिला नुसतेच जवळ घेण्याचेही घाईघाईत राहून गेले,अर्धवट खाऊन आणि बोलून धरित्री निघूनही गेली होती.

अभ्यासात, वागण्या-बोलण्यात हुशार असलेल्या धरित्रीकडून नेहमी सगळ्या गोष्टी परफेक्ट असण्याचीच अपेक्षा होती. अनेक विषयात तिचं नैपुण्य वाखाणण्याजोगे होते, जी गोष्ट आत्मसात करायला इतर कोणाला सहा महिने लागतील ती गोष्ट धरित्री अगदी लीलया करे. लहान वयापासून मिळालेल्या अशा कौतुकाने, अपेक्षांनी तिचाही स्वभाव तसाच बनत गेला,जणू काही एकाचवेळी अनेक गोष्टी तिने नाही साध्य केल्या तर त्यात तिचा कमीपणा आहे. बाबांनीही धरित्रीला सतत प्रोत्साहन दिले. तिला लागणारी प्रत्येक गोष्ट जागच्याजागी देण्यासाठी ते तत्पर असत. अभ्यास असो नाहीतर इतर गोष्टी,कोणत्यावेळी काय करायचं याचं दोघांचं वेळापत्रक तयार असे. बाकी घरातल्या सगळ्यांनी त्यांचा विचार करूनच आपपले कार्यक्रम आखायचे. घरातले सणवार, नातेवाईक, लग्नकार्ये या कशातच तिला फार रमता येत नसे,तितका वेळच नसे. सात वर्षांनी तिच्यापेक्षा लहान असलेल्या धनंजयबरोबर काय खेळायचे हा तिला प्रश्न पडे. समवयस्क सोबत तिला नव्हती,मित्र-मैत्रिणी शाळेपुरत्या, मोजक्याच होत्या.
हौस,मजा,हट्ट,वेड्यासारखं वागणं,भांडणं,रडणं,रुसून बसणं..हे तिच्या गावीही नव्हतं. तिच्या गरजा निर्माण होण्यापूर्वीच त्या तत्परतेने पुरवल्या जात असत. घरात बाबा तिच्यासाठी आणि आई धनंजयसाठी हे जणू अलिखितपणे ठरूनच गेलेले होते. तिचं संपूर्ण शिक्षण,उच्चपदस्थ नोकरी,लग्न, नवरा आणि तिला झालेला मुलगा सगळं आयुष्यच आखीवरेखीव, ठरवल्यासारखं.
सगळं असं असूनही माझी मुलगी ‘सुखी’ आहे का ? असे आपले अरुणालाच सतत वाटत राही त्यात धरित्रीच्या बोलण्यामुळे अरुणा आणखीनच काळजीत पडली.
पण त्यानंतर तीन दिवसांनी धरित्री घरी परतली, ती जणू कोणी दुसरीच व्यक्ती आहे,अशी. पहिल्यांदा तिने स्वतःच्या घरी परतायची कसलीही घाई केली नाही. अरुणाला म्हणाली, “अगं जातांना आमच्या विमानाने टेक ऑफ केलं आणि जरा वेळ होतोय तोवर विमानात एकदम गडबड सुरु झाली. प्रवाशांपैकी एका बाईच्या लक्षात आलं की तिचं बाळ खालीच एअरपोर्टवर राहून गेलंय..तिने जी रडारड सुरु केली..खूप गोंधळ झाला. नेमकं काय झालंय समजल्यावर कोणालाच काही सुचेना. एअरहोस्टेसने तिला धीर दिला,बाकीच्या प्रवाशांनीपण. पायलटने खूप फोनाफोनी करून मग  शेवटी विमान पुन्हा माघारी वळवलं. बाळापर्यंत पोहोचेपर्यंत आणि विमान पुन्हा निघेपर्यंत तासभर वेळ गेला,सगळ्यांचाच. पण कोणीही काही म्हणालं नाही. एका आईला आपलं बाळ सुखरूप परत मिळालं,यातच सगळ्यांनी समाधान मानलं.
“काय आई म्हणावं की काय म्हणावं या बाईला? असं कसं आई आपलं बाळ घ्यायचं साफ विसरू शकते?” अरुणाच्याच छातीतच धस्स झालं सगळं ऐकून...
“हो ना, अगं अगदी हाच प्रश्न तिथे असलेल्या प्रत्येकाच्या मनात आला असेल पण कोणीही तिला असं काही म्हणून आणखी खजील केलं नाही. ती विसरली इतकंच खरं..का? कशी? या प्रश्नांना त्या क्षणी महत्त्व नव्हतंच. सिक्यूरिटी चेक झाल्यावर तिने गाढ झोपलेल्या बाळाला बेबीसीटरमध्ये ठेवलं आणि लॅपटॉपवर काम करण्यात गढून गेली आणि त्याच नादात विमानात बसली असावी..आणि अगं, ते गोडुलं बाळ.. नंतर त्याला विमानात घेऊन आले,तरीही झोपलेलंच होतं,तितकंच गाढ..आपली आई आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही या विश्वासाने..

                                           
आम्ही नाही का आदिला शाळेतून आणायचं एकदा विसरून गेलो होतो..शाळा लवकर सुटणार आहे,हे ना माझ्या लक्षात राहिलं,ना अनीलच्या..तोच प्रसंग आठवला मला.. आदि सात वर्षांचा होता, शाळा सुटून सगळे घरी गेले तरी आपल्याला घ्यायला कोणी कसं आलं नाही, म्हणून रडवेला झाला होता. तुला माहितीये? त्यानंतर त्याला ती सवय लागली, झोपतांना माझा गाऊन जवळ घेऊन झोपायची. मी जवळ असो किंवा नसो,त्याला तो लागायचाच,अजूनही लागतो. या प्रसंगाचं त्यावेळी इतकं काही मला वाटलं नव्हतं पण विमानातल्या या अनुभवाने मीच हादरून गेले. माझं नंतर कशातच लक्ष नाही लागलं. कधी परत येते असं झालं मला. 
आई, ‘जगण्यासाठी काम’ की ‘कामासाठी जगणं’ या प्रश्नाचं उत्तरच मिळालं बघ मला. गेले काही दिवस ना, मन अस्वस्थ होतं माझं, आपलं काहीतरी चुकतंय असं वाटत रहायचं. इतरांनी हेवा करावा असं आयुष्य आहे माझं. माझ्यासमोर एकापेक्षा अनेक चांगल्या संधी आल्या सतत. त्यातलं एक स्वतःसाठी निवडून मी शांत नसायचे,मला सगळंच हवं असायचं. आणि मग ते मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा. माझा ‘वेळ’ कायम माझ्यापुढे धावायचा. आणि मी सगळं जमवण्यासाठी सगळ्यात आधी तडजोड करायचे ते स्वतःशीच. वेळ नाही ना,मग झोप कमी. वेळ जातो म्हणून कोणी मैत्रिणी नाहीत. इतक्या आवडीने बंगला बांधला, सजवला..पण त्यात राहण्याचं सुख अनुभवण्यासाठी मीच घरी नाही. आदिचं बाळपण तर माझ्या हातून निसटलंच आहे..आणि इतकं करून मी जे मिळवलं, त्यातलं सुख अनुभवण्यासाठीसुद्धा थोड्यावेळपण थांबायची तयारी नाही माझी. आपलं बाळ विसारणाऱ्या त्या आईमध्ये आणि माझ्यात काय फरक आहे मग? तिला काहीही म्हणण्याचा आणि नावं ठेवण्याचा मला काही अधिकार नाही. अगं, समोर असलेल्या क्षणात मी जागेवर नसतेच,माझं मन कायम भविष्यकाळात. असं धावून मला समजलं की आपण कुठेच पोहोचत नाही. यश मिळवण्याची आणि पुढे जाण्याची मर्यादा नाही समजून घेतली तर तेसुद्धा एक व्यसनच आहे, आपलं विश्व पोखरण्याची क्षमता असलेलं. जगाच्या मागे राहण्याची मला भीती वाटायची.. आता वाटतंय ‘मी’ आहे म्हणून ‘माझं जग’ आहे. जगाच्या पुढे जाण्यात माझी जिवलग माणसं दिसेनाशी झाली,त्याचं काय?

त्या निरागस बाळाचा आश्वस्त चेहरा माझ्या मनावर कायमचा कोरला गेला..अगदी लख्ख समजलं मला काय नेमकं हवंय ते! आईला वेळ नाही म्हणून तिच्या गाऊनकडून ऊब,सुरक्षितता,आश्वासन मिळवणारा माझ्या आदिला आज,आत्ता,या क्षणातली ‘आई’ हवी आहे..आणि मला हवा आहे समतोल. जगण्यची लय सांभाळणारा. मी एकाचवेळी अनेक नाही मिळवलं तरी चालेल पण एकातला आनंद पुरेपूर उपभोगायला शिकवणारा..मला स्थैर्य देणारा. मला थोडं थांबायची,उसंत घेण्याची गरज आहे. माझी कोणाशीच स्पर्धा नाही, हे शहाणपण ज्या क्षणांनी दिलं ते क्षण नीट समजून घेण्याची गरज आहे. हा अनुभव आपल्या लेकीला ‘माणूस’म्हणून समृद्ध करून गेलाय, हे अरुणाच्या लक्षात आलं. पंखात बळ आहे म्हणून आकाशात भरारी घेणाऱ्या तिच्या पिल्लाला उडण्यासाठी आता निश्चित दिशा सापडली होती.
© डॉ अनन्या अंजली 
# कॅलिडोस्कोप
फोटो सौजन्य गुगल