Thursday, 23 March 2017

राधा..


राधा..
तरल जाणिवेचा स्वर आहे राधा
जगण्यातल्या चैतन्याचं स्पंदन राधा!

कणाकणाने रसरसून उमलण्यातली उत्कटता आहे तिचं असणं.
आणि त्या प्रत्येक कणातलं सौंदर्य मनसोक्त उधळून देण्यातली तिची सहजता,

स्वतःमधल्या बेभान एकतानतेचं नाव आहे राधा!

पण नुसत ‘राधा!’ या मनाला झालेल्या जाणिवेत खरंच एकटी ‘राधा’ आहे?
नाही ना?
तिच्या एकटीचं नाव येतच नाही ओठावर आपल्या.

कारण एकटी ‘राधा’ अपूर्ण आहे!
आणि तरीही या अपूर्णतेमध्येच किती सौंदर्य आहे.
पूर्णतेकडे घेऊन जाणाऱ्या एका सहज सुंदर प्रवासाचा माग आहे!

त्या परिपूर्णतेत विलिन झाल्यानंतर देखील मागे उरलेली तिची स्वतःची परिपूर्ण वेगळी ओळख आहे!

‘मृण्मयी’...राधेचं दुसरं नाव!                      
याच मातीतली..याच जगातली..म्हणून आहे ती मृण्मय.
पण असं आहे खरंच?
नाही!

कारण ती तर जाणिवेने जगणाऱ्या प्रत्येक संवेदनशील स्त्री च्या मनात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर तिला भेटते!

या अर्थाने ती चिन्मय आहे!
तिचं अस्तित्व,तिचं असणं सगळं इथल्या मातीत रुजलेलं..

याच मातीत, जमिनीवर रुणझुणती आहेत अजूनही तिची पावलं.

मातीच्या या पावलांना सदैव लागलेली ओढ मात्र आहे नीलवर्ण आकाशाची.
तिच्या रक्तातूनच वाहतोय प्रेमाचा आदिम प्रवाह अखंडपणे.

म्हणून स्वतःचा स्वीकार ती रूढ पारंपारिक बंधनापलिकडे जाऊन करू शकते वेळोवेळी.

दोन व्यक्तींमध्ये असलेल्या अवकाशाचं भान आहे उत्कटतेने एकमेकांवर असलेल्या प्रेमात. आणि याच अवकाशात त्यांना एकमेकांबद्दल वाटणारी अनिवार ओढ ही आहे.  

प्रेम भावनेचा कोणताही विभ्रम व्यर्ज नाही त्यांच्या या अलौकिक नात्यासाठी.

काळ आणि अवकाशाच्या परिघात घडणारे सगळे अविष्कार जणू त्यांच्या एकरूप होण्यासाठीच घडत असावेत युगानुयुगे.

तिची लोभस आकाशाचं निळेपण सामावून घेणारी स्वप्नं..
मेघरंगात रंगलेली. मातीच्या हिरव्या लवलव अन्कुरातून व्यक्त होणारी.

आपल्या अनंत डोळ्यांनी कान्हाच्या प्रत्यक्ष भेटीची आस ठेऊन असलेली,  युगानूयुगे त्याची वाट बघणारी राधा!

तिची आठवण म्हणून का आहे लवलवणारं एक स्वप्नाळू मोरपीस त्याच्याही डोक्यावर?
तिचं हे वाट बघणं कदाचित संपेल..न संपेल..

तिच्या अस्तित्वातच आहे कमालीचा सोशिक संयम.
संपूर्ण आपलेपणा आणि क्षणात सर्वस्व उधळून देण्याची मन:पूर्वकता..

तिच्या बंद ओठाआड असलेलं मौन चराचरातल्या थेंबा
थेंबातून बोलकं होतं..त्यावेळी राधा असते आपल्या प्रियतमाला भेटण्यासाठी असलेली अधीर,उत्सूक प्रियतमा.

खरंतर राधा आहे एक प्रतीक,
पृथ्वीचं..!! धरेचं..!

आणि कान्हा आहे असीम,अखंड घननीळ आकाश!
तिला संपूर्ण वेढून असलेलं!

या जमिनीवर असलेल्या सजीव आणि निर्जीव सृष्टीतल्या असंख्य साद प्रतिसादाचं विश्व म्हणूनच तिच्यात सामावलेलं आहे.

सृष्टीच्या अनेक अविष्कारांचं खरेपण आहे तिची जगण्याची प्रेरणा.
तिचा कान्हा तिचा सोबती आहे, सखा आहे, सहचर, सर्वस्व आहे.
त्याच्या असण्यात तिचे अस्तित्व पूर्ण होते.

तो आहे म्हणून ती आहे..
आणि ती आहे म्हणून तर तो देखील आहे.

तिचा घननीळ..मिलनाच्या ओढीनं सर्वांगानं तिला सामावून घेण्यासाठी आवेगाने झेपावलेला तिचा प्रियकर.
सरींवर सरी तो बरसत राहतो बेधूंद आणि ती चिंब भिजता भिजता
उमलून येते आतून असोशीने.

तो उतरतो अलगद नदीच्या झुळूझुळूणाऱ्या पाण्यात
त्यावेळी पावलाखालच्या मऊ मऊ गवताच्या पात्यावर अलगद उतरतात
त्याच्या बासरीचे सूर.

तिला शोधत वारा निघतो रानोमाळ त्या क्षणी देखील ती तिथेच असते.
त्याच्याकडे बघत, अनिमिष नजरेने, पापणीदेखील न लवता..
कणाकणाने त्याच्या अस्तित्वात समर्पित, कृष्णरंगात
एकरूप त्याची सखी! 

या मिलनाचे रंग आकाशभर उमटतात तेव्हा कान्हा आणि राधा वेगळे कुठे असतात?
राधाच्या मृण्मय पावलांनी कृष्णवर्ण आकाशात चांदण्यांची रांगोळी उमटते आणि कान्हाच्या सप्तसूरांनी राधेच्या कणाकणात सृजनाचे बीज रुजते!

राधेचं फुलणं..राधेचं वारेमाप सर्वस्व उधळून प्रेम करणं..

राधेचा प्रत्येक ऋतू त्याच्या परिचयाचा!

रूढ बंधनांचे पाश ओलांडून तिची मनस्वी ओढ त्याला पुन्हा पुन्हा खेचून आणते तिच्याकडे!

कल्पन्ताचे आणि युगानुयुगांचे अंतर पार करून! 

Monday, 26 September 2016

नुसतं प्रेम कर!


बाल्कनीत काही झाडं आहेत आमच्याकडे..बरीच आवडती झाडे खाली सोसायटीच्या कॉमन जागेत लावली आहेत.
गुलाबाची आहेत आणि एक पामचं पण आहे.

खास मला आवडतं म्हणून एक जाईचं रोप आम्ही आणलं.
छानशा मोठ्या कुंडीत ते लावलं. हळूहळू ते मोठं झालं..पूर्वी नाजूक वाटणारा वेल इतका विस्तारला की आमच्या बाल्कनीतून तो शेजारच्या घराच्या बाल्कनीत विसावला.
वेळच्या वेळी त्याला पाणी घालणं आणि घरीच तयार केलेलं खत त्याच्या मुळांशी मशागत करून घालणं हे फार मनापासून करायचे मी.

बाल्कनीतल्या त्या कोपऱ्यापासून आमच्या दिशेने वळवलं तरी त्याच्या फांद्या शेजारच्या बाल्कनीकडेच वळायच्या..त्याचा नैसर्गिक कल तो असावा कदाचित..हळूहळू त्याला फुलं यायला लागली..अर्थातच त्याचा सगळा विस्तार शेजारच्या बाल्कनीत असल्यामुळे हात जिथपर्यंत पोहोचेल तितकीच फुले मला काढता येत असत..शेजारच्या घरात मात्र फुलंच फुलं..जाईच्या फुलांचा घमघमाट असायचा शेजारच्या बाल्कनीत!
कधीतरी पूजेला जास्त फुलं हवी असतील तर ती आम्हाला आमच्या शेजारच्यांना मागावी लागत..
त्यांच्या बायकोच्या केसात जाईचाहातभार लांब गजरा असे!!
आणि गजऱ्यासाठी फुलं हवी असतील तर मला मात्र त्यांना ती मागावी लागत..
एकूण काय तर बहर त्यांच्या घरात आणि "काय हा तुमच्या वेला चा कचरा" म्हणून गाऱ्हाणी आमच्या दारात..
शिवाय अधून मधून वेड्यावाकड्या पद्धतीने त्यांनी वेलाची कटिंग केली तरी मला त्याच्या किती वेदना होतात..
त्याची फुलं दुरुनही मला आनंद देत..रोज आठवणीनं पाणी घालणं हे ही माझ्याकडून सहजपणे होत असे.
हळूहळू फुलांसाठी तो वेल शेजाऱ्यांचा आणि पाणी, खत..देखभाल यासाठी आमचा असं एक रुटीन ठरून गेलं..

कधीतरी कातर संध्याकाळी टपोऱ्या कळ्यांनी भरलेल्या त्याच्या रुपाकडे नजर जायची..अर्धवट उमललेल्या त्या फुलांचा मोहक गंध वातावरणात भरून राहिलेला असायचा..असं वाटे की त्या कळ्यांना हळुवार स्पर्श करावा..तो गंध डोळे मिटून अनुभवावा..
पण मध्ये एक भिंत..
काही केल्या मला ती पार करता येणे शक्य नव्हते.
केवळ बघून समाधान मानणं कधी कधी शक्य होत नाही.
तू अपेक्षा करू नकोस..तू फक्त देत रहा..
करत रहा..
म्हणणं किती सोपं आहे नाही?
त्याचं अस्तित्व..माझ्या इतक्या जवळ आहे आणि त्याचा बहर.. उमलणं..फूलणं मात्र लांब..
मी एक आयुष्यावर भरभरून प्रेम करणारी साधी व्यक्ती..

माझा आनंद दुसऱ्या कोणी मला ओंजळभर देईल यासाठी मी वाट का बघायची? आणि किती?
कारण आहे या परिस्थितीत बदल तर घडून येण्याची शक्यता तर नाहीच.
आता कधी या गोष्टीचा त्रास पण होतो..
मला आता हा नकोच म्हणून त्याला मुळापासून उपटून काढून टाकता येत..ना त्याची जागा बदलता येत..

आता मला हवाच म्हणून मोठ्या प्रेमानं वाढवलेल्या, जोपासलेल्या या वेलानं मला आयुष्याच्या मूलभूत प्रश्नापाशी आणून सोडलंय..

प्रेम कर पण अपेक्षा मात्र करू नकोस...अध्यात्मिक मार्गावरची साधक असते तर सोपं झालं असतं, नाही? 


          असंच होतं..
आयुष्यातले अगदी साधे वाटणारे आनंद देखील इतके प्रश्न निर्माण करतात मनात.
काय म्हणणं असतं तसं बघायला गेलो तर आपलं?
अगदी साधं.. शिवाय आपल्या हक्काचं असलेलंच हवं असतं की आपल्याला.
लोकांचं काही तर त्यांनी स्वतः हून दिलं तरी आपण पटकन घेणार नाही.
असे असतांना अगदी सध्या वाटणाऱ्या गोष्टी देखील विचार करायला लावणारे प्रश्न घेऊन सामोऱ्या येतात.
आणि गंमत म्हणजे 'साधू' वर्गातल्या अपेक्षा अपल्याकडूनच व्यक्त केल्या जातात.
कसला वैताग येतो माहितीये?
चिडचीड होते अगदी.
अशी परिस्थिती समोर उभी राहते..वारंवार..
पण प्रत्येकवेळी एकाच पद्धतीने react होतो आपण..सवयीने!
पण आजकाल ना एक मजेशीर खेळ खेळते मी मनातल्या मनात.
त्याला नाव पण दिलंय मी!

कॅलिडोस्कोप.

आठवतोय?
...हो तोच!
जरा दिशा बदलली हाताची की आत दिसणारी नक्षी वेगळी!
जरा दिशा बदलली मनातल्या विचारांची की वेगळी शक्यता आपल्या वागण्याची.
लहानपणाचा खेळ पण आता वेगळ्या स्वरूपात खेळायला काय हरकत आहे?
याने होतं काय माहितीये?
आपण कसे वागू शकतो याचे वेगवेगळे पर्याय आपल्या लक्षात यायला लागतात हळूहळू.
आणि वेगळा पर्याय म्हणजे वेगळा परिणाम.
असे केल्याने चिडचिडीच्या जागेवर विचार केला जातो आणि जगण्यातली गम्मत लक्षात यायला लागते.
मग मला माझ्या आणि शेजाऱ्यांमध्ये भिंत दिसते पण माझ्याकाडून जाईच्या वेलाच्या रूपात मैत्रीचा हात पुढे केलाय मी हे पण जाणवतं!

माझ्या या प्रयत्नांमुळे मग मलाच छान वाटतं आणि मी नव्या उत्साहाने वेलाच्या मुळाशी असलेल्या मातीत हलक्या हाताने खत मिसळते!Thursday, 21 July 2016

प्रार्थना

प्रार्थना

पाण्याच्या थेंबातली
तहान मला समजू दे
अन्नाच्या कणातली
भूक जाणवू दे

डोळ्यातल्या पाण्यातली
वेदना मला कळू दे
हातावरच्या रेषांमधले
कष्ट उमजू दे

समजू दे मनामनातून
बांधायची असते एक वाट
आपले-परके,माझे-तुझे
विसरून जायचे असते क्षणात

जागे असू दे भान माझे
जगण्यातल्या आपुलकीचे
सुखासोबत दु:खदेखील
हळूच आहे कुरवाळायचे

अर्थाशिवाय शब्द नुसते
पोकळ आहेत समजू दे
देव नको आधी मला
'माणूस'होणेच जमू दे!Saturday, 19 December 2015

अनाम रस्त्यावरून..

अनाम रस्त्यावरून
तुझा हात हातात घेऊन चालायचंय

एखादी कविता सांगायची
एक ओळ गुणगुणायची..

टक लाऊन बघायचीय
आभाळात दूर दूर जाणारी
एखादी बगळ्यांची माळ..

मला वेढून घेतलेल्या
तुझ्या हाताच्या उबेत,

हळूहळू विरघळणारी
मनातली एक एक वेदना

कापसा सारखी हलकी होऊन
ढगांबरोबर दूर जातांना
बघायचीय मला..

डोंगराच्या टोकाशी जाऊन
खालच्या एखाद्या दरीत
खोल खोल डोकावायचंय

पोटातल्या अनामिक भीतीला
तू माझ्या सोबत असलेल्या
एखाद्या क्षणाचं अप्रूप सांगायचंय.. 

सूर्योदय होतांनाचे
आभाळाचे रंग सारे

दिवस एखादा उगवतांना
तुझ्या सोबत बघायचे आहेत..

असे खूप खूप एखादे राहिलेय,
जगता जगता जगायचेच राहून गेलेय..

आता निदान एखादा सूर्यास्त तरी
आयुष्याच्या उतरणीला
तुझ्या खांद्यावर डोके टेकवून
मन भरून बघायचाय...!

-अनन्या.


Monday, 7 September 2015

‘अहल्या’

रामायणातल्या अहिल्येची कथा मला कायम विचार करायला भाग पाडते. जाणत्या वयात जेव्हा ही कथा प्रथम ऐकली तेव्हाच अहिल्येबद्दल मनात फार कुतूहल दाटून आले. या कथेचा आशय फक्त ‘अहिल्या’ या एकाच व्यक्तीभोवती मर्यादित नाही तर तो आपल्याला तिच्या काळातील समाजापर्यंत नेऊन पोहोचवतो. आपण जसा विचार करत जाऊ तसे तसे या गोष्टीचे अनेक पैलू उलगडत जातात. रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचे असे विशेष आहे की ती प्रत्येक व्यक्तीला आपापल्या व्यक्तिगत कुवतीनुसार अथवा आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर असलेल्या त्या व्यक्तीच्या क्षमतेनुसार समजतात. त्यांचे संदर्भ वेगवेगळे अर्थ घेऊन सामोरे येतात आणि दर वेळी वाटतं की, अरेच्चा हे असे आहे होय!

या गोष्टीचा सगळ्यात पहिला अर्थ आहे तो गौतमऋषींची पत्नी अहिल्येला ते आश्रमात उपस्थित नसताना गौतमाचेच रूप घेऊन आलेला इंद्र फसवतो. आणि त्या दोघांना एकांतात बघून परत घरी परतलेले गौतम ॠषी इंद्राला आणि अहिल्येला शाप देतात. अहिल्येचे रुपांतर एका जड अशा शिळेत होते. त्यानंतर पुढे अनेक वर्षांनी श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्या पुन्हा जिवंत होते आणि तिचा उद्धार होतो.


न कळत्या वयात ही गोष्ट ऐकली तेव्हा अहिल्येचे असे दगड होऊन जाणे याबद्दल मनात एकदम भीतीच वाटलेली..म्हणजे कोणीतरी फक्त शाप देते आणि माणसाचा दगड होऊन जाऊ शकतो तर! इंद्राने फसवले म्हणजे नेमके काय केले हे समजले नाही तरी इंद्र आणि गौतम ॠषी दोघांचाही आलेला राग आणि अहिल्येबद्दल वाटलेली कणव,भीती,सहानुभूती यातून ती एकदम लक्षातच राहून गेली.शापामुळे एखाद्या व्यक्तीचे रुपांतर असे दगडात होऊन जाणे मुळीच शक्य नाही याची खात्री ज्या वयात पटली त्यावेळी ही कथा अर्थाचा आणखी एक संदर्भ समजावून गेली.

गौतम ॠषीची पत्नी अहिल्या अत्यंत रूपवान होती. तिच्या सौंदर्याचा मोह देवांच्या राजाला, इंद्रला पडला. आपल्या मनातली अभिलाषा त्याने चंद्राला सांगितली, चंद्राने कोंबड्याचे रूप घेऊन पहाट होण्यापूर्वीच बांग दिली. ती ऐकून नित्य नियमाप्रमाणे गौतम ॠषी गंगेवर स्नानसंध्येसाठी निघून गेले. ते गेल्यानंतर इंद्र गौतमांचे रूप घेऊन अहिल्येच्या पर्णकुटीत ला. तो गौतम नसून देवराज इंद्र आहे, हे अहिल्येला कळले नाही. स्वामी, आज आपण लवकर परतलात?’ असे तिने गौतम असलेल्या इंद्राला विचारले देखील. पर्णकुटीत अंधार असल्यामुळे अहिल्येला ते समजले नसावे कदाचित पण तरी त्यानंतरदेखील तिला गौतम आणि इंद्र यांच्यातील फरक कळला नसेल, हे काही पटले नाही मनाला.

पण तिनेही कुठे इंद्राला अडवलेले दिसत नाही. गौतम ॠषी परतल्यानंतर आणि सगळा प्रसंग लक्षात आल्यावर त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी अहिल्येचा त्याग करणे हे समजू शकते..आणि नवऱ्याने त्याग केल्यानंतर त्या काळातल्या सामाजिक परीस्थितीनुसार एखाद्या स्त्रीची अवस्था अत्यंत हलाखीची,दैन्यवाणी होऊ शकते हे ही समजण्यासारखे.

मग मनाला या गोष्टीचा नवा अर्थ जाणवला. की शीळा हे एक त्या अवस्थेचे आणि सामाजिक, मानसिक,शारीरिक हलाखीचे रूपक आहे तर. दगडासारखे कठीण आयुष्य तिच्या वाट्याला आले. तिच्यावर अनेक संकटे ओढवली आणि सगळ्यांमध्ये असून समाजातल्या कोणीही तिला थारा दिला नाही. ती एकटी, एकाकी परिस्थितीचा सामना करत जीवंत राहिली.

पण तरीही अहिल्येबद्दल इतकाच विचार करून मनाचे समाधान होईना. मोहाचा एकच क्षण तिच्या आयुष्यात आला आणि तिचे आयुष्य होत्याचे नव्हते झाले?

रामाने तिचा उद्धार केला. एक पुरुष असूनदेखील त्यालाही गौतम ऋषींसारखेच या प्रसंगात तिचीच चूक आहे असे का नाही वाटले? याउलट त्याने तर तिचा उद्धार केला, म्हणजे रामाने नेमके काय केले असावे? तर  रामासारख्या सम्यक् दृष्टीने विचार करणाऱ्या व्यक्तीने तिचे दु:ख समजून घेतले तिच्यावर झालेला अन्याय दूर करून त्याने तिला पुन्हा समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. रामाला प्रतिप्रश्न विचारण्याची हिंमत अहिल्येला दुर्लक्षित केलेल्या समाजात नव्हती. इतके दिवस दगडासारखे शून्य अस्तित्व असलेली तिची स्थिती त्या दिवसानंतर बदलली. इतकेच नव्हे तर त्या दिवसानंतर आपल्या दिवसाची सुरुवात करतांना ज्या पंचकन्यांचे आजही नित्यस्मरण सर्वांकडून केले जाते त्या पाच कन्यांमध्ये तिचे नाव पहिल्यांदा घेतले जाते.
श्लोक असा आहे

अहल्या, द्रौपदी, कुंती, तारा, मंदोदरी तथा I
पंचकन्या
स्मरे नित्यं, महापातक नाशनम् II

किंवा काही जण

अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा I
पंचकन्या
स्मरे नित्यं, महापातक नाशनम् II असेही म्हणतात.

‘कन्या’ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे परम पवित्र असलेली स्त्री. मग एकदा मोहाला शरण गेलेली स्त्री रामाने उद्धार केल्यानंतर लगेच परम पवित्र कशी काय झाली? असे काय घडले असावे नेमके? आता मात्र अहिल्येबद्दलचे कुतूहल स्वस्थ बसू देईना.

कोणत्याही लेखकाच्या किंवा कवीच्या लिहिण्यात ते जगत असलेल्या काळाचे सामाजिक संदर्भ असतातच,अर्थात ते काही साध्या,सरळ भाषेत लिहिलेले असतील असे नाही. लेखक,कवी प्रत्येकाची आपली अशी एक शैली असते. कवीची प्रतिभा आणि त्याच्या समोर असलेले वास्तव यातून त्याची कलाकृती जन्म घेते.

मग अहिल्येची कथासुद्धा आपल्या काळाचा संदर्भ जतन केलेली एखादी रूपक कथाच तर नाही?

अहिल्या या नावाचा काय अर्थ आहे? तर मूळ शब्द आहे, अहल्या..हल्य म्हणजे निंद्य..जी निंद्य नाही अशी ती अहल्या म्हणजे दोषरहित असलेली आणि अहिल्याचा अर्थ ‘कधीही न नांगरलेली गेलेली जमीनअसादेखील आहे. ब्रह्मा जवळ अशी दोषरहित असलेली अशी अहल्या (जमीन) होती. त्या काळातल्या वैदिक देवतांमध्ये सर्वात प्रमुख देव होता तो इंद्र! 

इंद्राला ती जमीन देण्याचे ब्रह्माने कबूल केले होते परंतु त्यानंतर त्याने ती गौतम ऋषींना सुरक्षित राखण्यासाठी, सांभाळ करण्यास म्हणून दिली. त्यांनी ती अत्यंत प्रामाणिकपणे सांभाळली आणि ठरलेल्या योग्य वेळी ब्रह्माला परत केली. गौतम ऋषींनी तिचा अत्यंत मेहनतीने सांभाळ केला म्हणून ती लागवडीसाठी योग्य, उपजाऊ अशी झाली. ब्रह्माने खूष होऊन ती त्यांना दान केली. इंद्राला ज्या वेळी हे समजले त्यावेळी ही अत्यंत सुपीक अशी असलेली अहल्या गौतमा सारख्या ऋषींना काय उपयोगाची,असे वाटून ती आपल्यालाच मिळावी या प्रयत्नांना तो लागला. आणि त्याने ती चतूरपणे मिळवली देखील.
ण गौतमांना या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी ती जमीन इंद्रालाही तिचा उपभोग घेता येऊ नये, म्हणून नापीक करून टाकली. पुढे ती जमीन राम त्या भागात येईपर्यंत नापीक आणि म्हणून दुर्लक्षित अशीच राहिली.
या गोष्टीचा असा अर्थ बुद्धीला पटला.

रामाचा कालखंड हा शेती करणाऱ्या कृषिप्रधान आर्य संस्कृतीचा होता. आर्य लोकसमूह स्वत:जवळ पशूधन सुद्धा बाळगून होते. नापीक असलेल्या जमिनी सुजलाम सुफलाम करण्याचे तंत्र त्यांना माहीत होते. राम येईपर्यंत कितीतरी काळ अहल्या नापीक जमिनीचे प्राक्तन भोगत होती.  

रामासारखी सामर्थ्यवान व्यक्ती ज्या प्रदेशातून जाते, तो प्रदेश पुन्हा लागवडीखाली येणार, हे सहज शक्य आहे. प्राचीन काळात लोकवस्ती अशीच वाढली. पुरूष जंगलात दुर्गम भागात गेले त्यांनी तिथल्या भटक्या अनार्य लोकांवर,प्रदेशांवर वर्चस्व स्थापन केले मग तेथे वस्ती झाली आणि मग जमिनी लागवडीखाली आल्याया अर्थानेही रामाचे पाय जेथे लागले त्या त्या सगळ्या प्रदेशांचा उद्धार झाला.

मग अहिल्येची जी गोष्ट सांगितली जाते ती तशी का रूढ झाली असावी?
अहल्या ही जमीन असो किंवा स्त्री. तिला शापरुपी वेदना का भोगावी लागली?

तर त्या वेळेसच्या समाज व्यवस्थेत धर्म आणि त्याचे नियम यांनी समाज बांधला गेलेला होता. त्याचे नियम धर्मग्रंथात सांगितलेले होतेच पण त्यानंतर सर्वसामान्य जनतेला ते समजण्यासाठी वेगवेगळ्या कथा, मिथके यांचा आधार घेऊन नियमांचे महत्त्व पिढ्यानुपिढ्या ठसवले गेले. त्यात समाजरचना पुरुषप्रधान. या समाज चौकटीत स्त्रीवर जास्त बंधने असणे स्वाभाविक होते. त्यांच्या वागण्यावर चाकोरीचा प्रभाव ठसला पाहिजे याकरता अनेक कथा त्या काळात प्रचलित होत्या. पुरुषाने मर्यादा तोडली तरी त्याला मिळणारी शिक्षा आणि स्त्री ला मिळणारी शिक्षा यात फार तफावत होती. म्हणूनच इंद्राला मिळालेला शाप आणि अहिल्येला मिळालेला शाप यात अहिल्येची मानहानी जास्त झाली, तिला जास्त वेदना भोगाव्या लागल्या. अर्थात आता काळ कितीही बदलला तरी या कथा आणि अशी मानसिकता दोन्ही टिकून आहेत.

रूढ असलेल्या परंपरा मोडून..घालून दिलेली चौकट तोडून तुम्ही काहीही नियमबाह्य वागलात तर समाज कसे मान्य करणार? कारण अशा परंपरांचा संबंध पाप पुण्याशी जोडला गेलेला होता आणि आजही आहे. या पंचकन्या प्रसंगी समाजाच्या पाप पुण्याची चौकट सुद्धा ओलांडतात आणि त्या वागण्यासाठी परंपरेने दिलेली शिक्षा ही भोगतात.

ज्या पंचकन्या स्मरणीय आहेत त्यातल्या सगळ्या जणींनी रूढ असलेल्या परंपरांना प्रश्न विचारण्याचे आणि प्रसंगी त्या तोडण्याचे धाडस केले आहे. इतर स्त्रियांसारखे धोपट मार्गावरून जाण्याचे नाकारले आहे. त्या धाडसी होत्या. बंडखोर होत्या. परंपरा मोडून आपल्या मनाप्रमाणे वेगळा मार्ग निवडतांना त्या संकटांसमोर कणखरपणे उभ्या राहिल्या. आपली वेगळी वाट निवडल्याचे परिणाम त्या सहजपणे सहन करून गेल्या. आणि म्हणूनच आजही त्या स्मरणीय आहेत!

आता अहिल्येबद्दल नुसताच आदर नाही तर मनात ममत्वदेखील वाटते आहे!