मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

बोलूया स्वतःविषयी!

  
आरशात जी मुलगी मला दिसतेय तशी मी नाही.
मी जशी आहे तशी आरशात दिसत नाही.
मी काय अशी दिसते?
इतकी जाड?
बेढब?

आरसा बदलून बघितला पण मी स्वतःला तशीच दिसतेय.
मला काय झालंय?

मैत्रीणीना, आईबाबांना मी कशी वेगळी दिसते मग?
त्या तर म्हणतात की मुळीच नाहीस तू जाड.

आई बाबा पण म्हणतात नसती उपासमार करून आजारी पडशील.

आणि ना मला आता आरसा बघायलाच भीती वाटू लागलीये.
कारण ती मुलगी मी नाही.

हे सगळे प्रश्न पडले होते १५ वर्षाच्या एका मुलीला जी तिच्या वयाच्या इतर मुलींसारखीच होती.

आणि आरसा बघायला नको असे म्हणता म्हणता तिचा सगळा वेळ स्वतःकडे बघण्यात आणि स्वतःचे आवरण्यातच जात होता.

विचार करतांना वाटलं की खरंच किती महत्वाचं असू शकतं ना आपण कसे दिसतो हे एखाद्या व्यक्तीसाठी?


आणि तसं बघायला गेलं तर आपल्यापैकी अनेकजण स्वतःच्या दिसण्याबद्दल खूप जागरूक आहेत असं दिसेल आपल्याला आपल्या आजूबाजूला.

आपणही आपल्या स्वतःचा विचार कसा करतो?
आपल्या स्वतः बद्दल आपल्याला काय माहीत आहे?
माझे दिसणे, वागणे, माझ्या भावना याबद्दल मला काय वाटते? त्या आपण कशा व्यक्त करतो?

मी म्हणजे माझे शरीर.


माझे दिसणे, माझे बोलणे, माझे वागणे आणि माझे संपूर्ण व्यक्तिमत्व.

माझ्या बाह्य शरीराबद्दल मला काय काय वाटते?
आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या शरीराचा विचार करत असतो.

दिवसातून एकदा तरी आरशात स्वतःचे संपूर्ण प्रतिबिंब बघत असतो.

आपल्या स्वतःबद्दल आणि शरीराबद्दल आपल्या मनात अनेक विचार असतात.

आपले शरीर जसे प्रत्यक्षात आहे तसे दिसते का आपल्याला?
की आरशात ते वेगळे दिसते?

दुसऱ्यांना किंवा आपल्याला बघणाऱ्या इतर लोकांना ते कसे दिसतेय याबद्दल आपण सतत विचार करत असतो.

माझ्यात काय चांगले आहे हे बघण्यासाठी खरं तर आरसा असतो.
पण प्रत्यक्षात तो बघितला जातो माझ्यात काय चांगलं नाहीये हे लपवण्यात किंवा दुरुस्त करण्यात. 

सुंदरातल्या सुंदर समजल्या जाणाऱ्या व्यक्ती देखील हेच बघतात.
याला अपवाद फक्त एक असतो..प्रेमात पडल्यावर!
कारण फक्त त्याच वेळी आपल्या प्रतिबिंबावर सुद्धा आपण खुश असतो.
सगळे जगच सुंदर दिसत असते.

असे होते कारण आपल्या डोळ्यावर प्रेमाचा चष्मा असतो.

आणि त्याची काच सुंदर असते!
इतक्या दिवस आपल्या दिसण्यातल्या आपल्याला नकोशा असलेल्या गोष्टी देखील या काचेतून मोहक दिसतात.

आकर्षक आणि सुंदर दिसण्याबद्दलच्या सामाजिक दृष्टिकोनाचा प्रभाव आपल्यावर अगदी लहानपणापासून असतो.

त्या ठराविक साचेबद्ध,आदर्श पण काल्पनिक प्रतिमेमध्ये आपण स्वतःला बघत असतो आणि तुलना करत असतो.

त्या प्रतिमेच्यापेक्षा जास्त आपल्यात काही असेल तर आभाळ दोन बोट असते आपल्यासाठी.

त्या प्रतिमेच्या जवळपास पोहोचणारे लोक देखील त्या खालोखाल आभाळातच वास्तव्यास असतात.
अगदी कुरूप ही देखील एक काल्पनिक प्रतिमाच आहे!

अशा अगदी कुरूप आणि अगदी सुंदर या दोन टोकांच्या मध्ये असलेल्या लोकसंख्येमध्ये बहुसंख्य प्रजा असते!

आणि ती बहुसंख्य प्रजा स्वतःबद्दल काय काय विचार करते हे फार फार महत्त्वाचे आहे.

आरशात आपण कसे दिसतो याची जाणीव आता अगदी लहान वयात मुलांना होते आहे.

या दिसण्यात सगळ्यात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे माणसाचा रंग!

अजूनही गोरा रंग, सौंदर्याचं प्रतीक समजला जातो. बहुतेकांच्या मनात हा बिलिफ खोलवर रुजलेला आहे.

या गोरेपणाच्या वेगवेगळ्या छटा असलेले लोकसुद्धा वेगवेगळ्या कारणाने आपल्या रंगाबाबतीत समाधानी नसतात.

गोऱ्या रंगाबाबत चे हे आकर्षण मग मेडिकल दुकानातल्या फेअरनेस क्रीम चा खप वाढवते.

उंचीबाबत पण असेच. कोणाला अति उंच आहे म्हणून प्रोब्लेम..म्हणून उगीचच पाठीत वाकून कोणी चालेल तर कोणाला बुटकेपणाचा त्रास होईल, आपल्या वयाला आणि पावलांना न पेलवणारे उंच टाचांचे शूज घालून उंची वाढवण्याचा उगीच प्रयत्न केला जाईल.

शरीराच्या आकाराबद्दल तर सगळ्याच वयांच्या लोकांचा प्रोब्लेम.

एखाद्याचे सगळे त्याच्या दृष्टीने व्यवस्थित असले तरी त्याला आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांबद्दल मनात भयगंड असू शकतो. त्यांना आपल्या अवयवांचे लहान मोठे आकार अस्वस्थ करतात.

एकंदर काय तर प्रत्येकाने तपासावे की मी जसा आहे तसा किंवा तशी, मला स्वतःला आवडतो/ आवडते आहे का?

बॉडी शेप अमूक एक असा असायला हवा म्हणजे चांगला..ठरवले कोणी हे?

आपल्याच शरीराबद्दल किती हे अवास्तव चित्र आपल्या मनात?

माझ्या स्वतःबद्दल मीच असमाधानी, नाखूष.

पण एकदा करून तर बघा स्वतःचा आपण जसे आहोत तसाच स्वीकार..
माझं शरीर जसं आहे तसच मला खूप आवडतं, असा विचार करा.

असतील आकाराबाबत माझ्यात काही उणीवा..मग काय?

माझ्या परीने त्या दूर करेन मी.

पण माझी उंची, रंग, शरीराच्या इतर अवयवांचा आकार..या काही माझ्या उणीवा नाही होऊ शकत.

मीच त्यांच्याकडे भिंगातून बघत राहिलो तर मला इतर काही न दिसता फक्त तेच आहे असे दिसेल माझ्यात.

पण मी म्हणजे काही माझी फक्त ‘उंची’ आहे?

की नाकाचा,ओठांचा आकार म्हणजे आहे ‘मी’?

माझा रंग म्हणजे ‘मी’ आहे का?

की माझी ‘जाडी’ आहे माझी संपूर्ण ओळख?

नाही ना?

माझी खरी ताकद आहे मी माझ्या स्वतःचा मी जसा/जशी  आहे तसा केलेला स्वीकार.
माझ्याकडे जे आहे त्याची समज आणि जाणीव ही आहे माझ्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख.

हे एकदा समजून घेतलेत ना, तर ती आहे तुमच्या स्वतःकडे बघण्याची निरोगी दृष्टी. 

तुमच्या स्वतःच्या शरीराची खरीखुरी निरोगी,निकोप ओळख.

तुमच्यातल्या या काही नैसर्गिक गोष्टींवरून जे तुम्हाला चिडवतात त्यांना स्वतःलाच त्यांच्या शरीराबद्दल काहीतरी न्यूनगंड असतो याची खात्री बाळगा.
तुम्हाला चिडवून ते स्वतःसाठी रोगट आत्मविश्वास मिळवत असतात.

म्हणून आज आधी स्वतःच्या शरीराला ओळखा.
त्याच्याशी मैत्री करा.

आणि मग बघा ते तुमच्यासाठी कोणत्या कोणत्या सुखांचा खजिना घेऊन येते ते!





1 टिप्पणी: