किती सुंदर आहे!
तुझ्या आणि माझ्यात
असलेल्या अवकाशात
आहेत काही माझे रंग
आहेत काही तुझेही
तुझे आणि माझे रंग
मिसळून
जन्म घेणाऱ्या नव्या
रंगाचं अस्तित्व
किती स्वाभाविक आहे ना!
समागम नसतो फक्त शारीरिक
मर्यादेत
विचार,भावना,जाणीवा
एकरूप होत जातात
एकमेकांमधून
संवेदना अंगभर असतात
तशाच मनभर देखील
स्पर्श वर्तुळांची
मर्यादा आहे शरीर
पण मनभर उमटणारी अर्थ
वर्तुळं
त्यांनी कधी कोणती
मर्यादा मानलीय?
आपले
रंग,आकार,सामर्थ्य घेऊन
तसा तर प्रत्येकजणच
असतो
आपापल्या परीने
परिपूर्ण
पण तरीही
एकमेकांमधल्या अवकाशात
असतातच ना
अनंत शक्यता
सहजीवनाच्या
असू देत न माझे “मी”पण
आणि
तुझे “मी”पण
आपापल्या जागी अभंग
पहिल्या टिंबापासून
पूर्णविरामा पर्यंत
सोबत असणारच आहे ते
तरीही मधल्या
प्रवासातली
तुझ्या माझ्यातली
समजूत
किती सुंदर आहे तिचं
आपल्या दोघांत असणं!
mast....doghanch nat nemk kas asav he dakhvun denar likhan...khup aavadal
उत्तर द्याहटवा