बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

“काहीही अशक्य नाही..काहीही शक्य आहे!”

खरं सौंदर्य कशात आहे जाणून घ्यायचं आहे तुम्हाला?
ते आहे आपल्या नजरेत,
आपल्या स्वतःकडे आणि आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनात.
या प्रवासातला पहिला पैलू आहे


राजिंदर सिंह रहेलू...!

माझ्याबद्दल माझ्या नशिबाने नाही ठरवायचं!
माझ्याबद्दल ठरवणार मी स्वतः...!
किती जणांना जमतं असं ठाम उभं राहून स्वतःला घडवणं?
आणि आपल्या पायावर ठाम उभे राहण्यासाठी पण कष्ट घ्यावे लागले तर?

पण राजिंदरने हे मनात ठरवलं आणि मग आज ते ज्या ठिकाणी जाऊन पोहोचले आहेत ते वाचून आणि बघून आपल्यालाही ठरवता येईल की शरीराचा आकार नाही ठरवत व्यक्तिमत्वाची उंची...

जे काही आपल्याला मिळालं आहे त्यातून आपल्या शरीर आणि मनाशी मैत्री केली तर जे काही आपण करू शकतो ते अनुभवणं हा राजिंदरचा आजपर्यंतचा प्रवास आहे.
Infantile Paralysis   ने गाठलेल्या राजिंदर ना ते आठ महिन्यांचे असतांना पोलिओ झाला आणि आपल्या आयुष्यात त्यांना स्वतःच्या पायावर कधीही चालता आले नाही. 

पंजाब मधील जालंधर शहरात राहणाऱ्या परिस्थितीने गरीब असलेल्या  कुटुंबातला राजिंदर पाच बहीणभावांमध्ये सगळ्यात लहान मुलगा. त्यांचे वडील Bandmaster आणि आई इतरांच्या घरात मोलकरणीचे काम करणार अशा वातावरणात त्याचं लहानपण गेलं. पोलिओ वर उपचार होऊ शकतील अशी अशा त्यांच्या मनात वयाच्या २१ व्या वर्षांपर्यंत होती पण त्यानंतर त्यांनी वस्तुस्थितीचा स्वीकार केला.

बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर शालेय शिक्षणापेक्षा स्वतःसाठी त्यांनी वेगळा पर्याय शोधला.
पॉवर लिफ्टिंग सारखं क्षेत्र आपण करिअर म्हणून निवडू शकतो हा विचार त्यांच्या मनात देखील येणं यावर विचार करून बघा.

त्यावेळी ज्या ज्या कोणी तो ऐकला त्यातल्या बहुतांश लोकांनी त्यांना त्यासाठी विरोध केला.
पण त्यांनी आपल्या मनाचं ऐकायचं ठरवलं.



                

मर्यादा शरीराला होती, मनाला नव्हती.

स्वतःच्या स्वप्नाचं भान आलं त्यानंतर ज्या जिद्दीने आणि प्रयत्नांनी त्यांनी स्वतःला घडवलं, सोपा थोडीच असणार आहे प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी?

वेटलिफ्टिंग ची आपली प्रक्टिस करण्यासाठी ते आपल्या अपंगांसाठी असलेल्या तीन चाकांच्या सायकलवर जात असत आणि ज्या भागात सायकलवर जाणे शक्य नसेल त्या भागाचे अंतर ते आपल्या हातांनी चालून पार करत असत. आपले हात बळकट होण्याचे श्रेय ते आपल्या या सायकलीला देतात.

एकदाही त्यांनी आपल्या परिस्थितीसाठी नियतीला दोषी ठरवले नाही आणि नशिबाला बोल लावले नाहीत.
माझ्याकडे काय नाही हे सत्य तर समोर दिसत होतंच की त्यांना पण त्यांनी ते नाकारलं नाही, तर स्वीकारलं..एका शब्दानेही कधी तक्रार केली नाही कोणाकडे.
आणि आपल्याजवळ जे आहे ते त्यांनी आपल्या स्वप्नपूर्ती साठी वाढवलं..

मनाचा निश्चय असेल ना तर शरीरही आपल्या शक्ती त्यादृष्टीने वळवतं, हे त्यांच्या बळकट हातांकडे बघून सिद्ध होतं!

अनेक अडचणींवर मात करत ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचले आणि अनेक स्पर्धांमधून यशस्वी होत राष्ट्रीय पातळीवर त्यांनी आपली ओळख निर्माण केली.
आपल्या वयाच्या ४० व्या वर्षी २०१४ च्या पैरालाम्पिक कॉमन वेल्थ गेम्स मध्ये हेव्ही वेट पॉवर लिफ्टिंग मध्ये १८५ किलोग्राम वजन उचलून त्यांनी भारतासाठी रोप्य पदक मिळवले. त्या आधी २०१२ साली झालेल्या स्पर्धेत त्यांनी १७५ किलो वजन उचलण्याचा तीन वेळा प्रयत्न केला होता पण त्यांना त्यात यश आले नव्हते.
पण पॉवर लिफ्टर असलेल्या त्यांच्या जवळच्या मित्राच्या प्रेरणेने त्यांनी हे त्यापुढील स्पर्धेत शक्य करून दाखवले.

त्यांनी भारतासाठी अनेक स्पर्धांमध्ये विविध पदके मिळवली आहेत.
२००६ मध्ये त्यांना खेळातील सर्वोच्च अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आज ते प्रामुख्याने शारीरिक अपंगत्व असलेल्या मुलांसाठी प्रशिक्षक म्हणून काम करतात. आपल्या अकॅडेमी तून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला योग्य ती संधी मिळावी म्हणून ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या हाताखाली शिकलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अनेक स्पर्धांमधून विविध मेडल्स जिंकून आणली आहेत. त्यात सहा गोल्ड मेडल्स आहेत.

खेळाडू म्हणून ते चांगले आहेतच पण एक माणूस म्हणून सुद्धा त्यांच्याबद्दल चांगलं बोललं जातं.

त्यांना साथ आणि प्रोत्साहन देणाऱ्या पत्नीचं नाव आहे जसविंदर कौर आणि त्यांच्या सात वर्षाच्या गोड मुलीचं नाव आहे रिधिमा.

अत्यंत गरिबीतून पुढे आलेल्या आणि आपल्या शारीरिक मर्यादे वर मात केलेल्या व्यक्तीला तुम्ही अपंग म्हणू शकाल?
त्याच्या आयुष्यातील एकवेळ अशी होती की त्यांच्यासारखी व्यक्ती म्हणजे कुटुंबावर असलेला सगळ्यात मोठा भार आहे असे त्यांचे जवळचे नातेवाईक सुद्धा म्हणत असत आणि उघडपणे त्यांच्या आईला विचारात असत की तुझ्यानंतर याची काळजी पुढे कोण घेईल?
आज तोच आपला मुलगा आपल्या संपूर्ण कुटुंबाचा तारणहार झालेला बघतांना त्या आईचा ऊर अभिमानाने भरून येतो.
आज आपला मुलगा भार नाही तर अनेकांचा पोशिंदा आहे याचा अभिमान तिला वाटतो.

आयुष्यात जिंकणं महत्वाचं नाही तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लढणं हेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे असं राजिंदर म्हणतात त्यावेळी ते केवळ शब्द उरत नाहीत तर तो असतो एक अनुभव. एका संपूर्ण प्रवासाचा..

त्यांच्या आयुष्याचे ब्रीद काय आहे माहीत आहे?

“काहीही अशक्य नाही..काहीही शक्य आहे!”




1 टिप्पणी: