गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०१७

“व्यस्त रहो, मस्त रहो”....

छत्तीसगढ मधील रायपूर जिल्ह्यातील साधना ढंढ.
एक मनस्वी कलाकार व्यक्तिमत्व.

सुंदर चित्र रेखाटत असतांना त्यांना प्रत्यक्ष बघणं हा बघणाऱ्यासाठीच एक अनोखा अनुभव असतो.

Osteogenesis imperfecta (OI) नावाचा आजार सोबत घेऊन नव्या दिवसाला सुरवात करतांना साधनाजींच्या मनात रोज नवीन रंग असतात.
जगण्याची सुंदर सुंदर स्वप्न असतात.

यातले कुठले रंग कधी कागदावर उतरतील, कधी ग्लास वर तर कधी मातीच्या विविध आकाराच्या भांड्यांवर आणि बघता बघता एक रंग रेषांची मैफिल सजेल..
अशाप्रकारे रोजच एक नवीन दिवस येतो त्यांच्यासाठी.

त्यांना असलेल्या या आजारात शरीरातील हाडे इतकी ठिसूळ असतात की शरीराला बसलेल्या हलक्याशा धक्क्याने पण हाड तुटू शकते.
त्या आज ५७ वर्षे वयाच्या आहेत आणि मोजून ८० वेळा त्यांच्या शरीरातील वेगवेगळी हाडे मोडलेली आहेत.
साहजिकच आहे त्यांच्या दैनंदिन हालचालींवर खूप बंधनं आहेत. अत्यंत काळजीपूर्वक त्यांना आपली रोजची कामे करावी लागतात.

वयाच्या बाराव्या वर्षी ऐकू येण्याची त्यांच्या कानाची ताकद हळूहळू कमी होऊन पूर्णपणे गेली.

                     


त्यांची सखी,सोबती,पहिला मार्गदर्शक आणि गुरु होती त्यांची आई..राजकुमारी ढंढ.
त्यांच्या आयुष्याचे सुरवातीचे दिवस अवघड होतेच आणि आजही काही सोपे नाहीत पण एखादी गोष्ट रोजचीच झाली की त्याची सवय होते तसं झालं दुखण्याबाबतीत साधनाजींचं.

आपल्या शरीराच्या बाबतीत जे नैसर्गिकपणे आपल्याला मिळालंय ते तुमची इच्छा असो वा नसो तुम्हाला स्वीकारावं हे लागतंच. आणि मग जर स्वीकार करायचा असेल तर तो अशा पद्धतीने करावा की शरीराच्या मर्यादेलाही प्रश्न पडावा की आता मी जाणार तरी कुठे?

इतर कोणाहीसारखं लहानपण अनुभवणं त्यांना शक्य नव्हतं. त्यांची सगळ्यात जवळची मैत्रीण होती त्यांची आई.
मनातलं जे काही बोलायचं ते आईजवळ. इच्छा, आकांक्षा, स्वप्नं हळूहळू आकार घेत गेली.

नातेवाईक,समाज,मित्रमैत्रिणी यांच्यातील खूप थोडे लोक असे होते की त्यांना यांच्याबद्दल स्वाभाविक जाणीव वाटेल.
पण इतर अनुभव, लोकांच्या नको त्या चौकशा आणि वेध घेणाऱ्या भोचक आणि कधी तर कीव करणाऱ्या नजरा.
लोकं डोळ्यांनी,बघण्यातून बोलण्यापेक्षा जास्त व्यक्त करून जातात.
प्रोत्साहन देण्यापेक्षा मागे खेचणारे जास्त लोक असतात.
आणि संवेदनशील मन सगळं काही टिपत राहतं.
आयुष्याचा चांगुलपणा, अर्थ समजून घेण्यासाठी प्रयत्न करत राहतं.

अशावेळी हवी असते एक प्रेमळ,समजदार आणि खंबीर सोबत.
ती सोबत साधनाजींच्या आईने त्यांना समजून उमजून दिली.
मुलीबरोबर आई पण तर आयुष्यातल्या अनेक गोष्टी अनुभवातूनच शिकली.    
आपल्या मुलीच्या शरीराची काळजी घेणं हे तर सहज, स्वाभाविक झालं हळूहळू राजकुमारीर्जीना पण मुलीचं संवेदनशील मन जपणं आणि त्या मनाची निरोगी मशागत करून त्यात कलेचं बीज जाणीवपूर्वक जोपासायचं काम त्या जागरूक आईने अत्यंत सुजाणपणे आणि तितक्याच सावधपणे केलं.

शालेय शिक्षणानंतर साधनाजींनी फाईन आर्ट्स मधून शिकायचं हा निर्णय घेण्यात आईने पुढाकार घेतला.
आणि साधनाजींना जगण्यासाठी एक मनासारखं ध्येय मिळालं.
त्या घराबाहेर जाऊ शकत नसल्या तरी बाहेरचं विश्व त्यांच्या रंग रेषांमधून त्यांच्या सोबत आलं.

त्यांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा होती पण मन मात्र कल्पनेच्या वेगवेगळ्या आविष्कारातून स्वतःला व्यक्त करण्याची संधी शोधत होतं..अवघ्या विश्वाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतं.

हळूहळू कागदापेक्षा वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर पेंटिंग करण्यात त्यांना रस निर्माण झाला. या कलेत माध्यमांचे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वीपणे करून बघितले.
फोटोग्राफी मधून त्यांनी कलेकडे बघण्याची वेगळी, रसिक दृष्टी मिळवली.
निसर्गाशी एकरूप होणाऱ्या त्यांच्या वृत्ती..निसर्गाच्या अविष्कारात कलाआकार शोधून त्यांना प्रत्यक्षात उतरवायची.

काहीशा अबोल,आपल्या विश्वात रममाण साधनाजी कधी आपली शारीरिक मर्यादा ओलांडून पुढे गेल्या आणि कलेच्या विश्वात त्यांनी हळूहळू आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली त्याचं त्यांनादेखील समजलं नाही.

त्यांना असलेल्या व्याधीमध्ये शरीरातल्या हाडांची वाढ निकोप होऊ शकत नाही त्यामुळे शारीरिक वाढ होण्यात अडथळे येतात परिणामी शरीराची वाढ खुंटते, हालचाली करायला बंधनं येतात.
आपल्या वाट्याला जे जे आलं ते त्यांनी हसतमुखाने स्वीकारलं, जे नाही त्यापेक्षा जे आहे त्याकडे लक्ष केंद्रित केलं.
थांबल्या नाहीत, रडल्या नाहीत, हरल्या नाहीत.
प्रत्येकवेळी आयुष्य आव्हान देत गेलं आणि त्या जगण्याचा नवा नवा पर्याय शोधत गेल्या.                                            

साधनाजी आपल्यासाठी खास बनवून घेतलेली व्हीलचेअर वापरतात.
त्यांना आपल्या काही कामांसाठी दुसऱ्यांची मदत लागली तरी आपली बरीचशी कामे त्या स्वतः करतात.
त्याचं क्रियाशील मन त्यांना वेगवेगळे उपक्रम करत राहण्यासाठी प्रेरणा देतं आणि त्या स्वतःला विसरून त्यात रमून जातात.

वेगवेगळी फुलं, झाडाची पाने आणि फळांपासून त्यांनी तयार केलेल्या १०० पेक्षा जास्त गणेशमूर्तीच्या फोटोचं प्रदर्शन लोकांना विशेष आवडले.
या गणेशमूर्ती आपल्याला एक वेगळीच प्रेरणा देतात आणि स्वतःसाठी शक्तीचा एक स्त्रोत आहेत हा भाव साधनाजींच्या मनात आहे.
आपल्या आयुष्यातल्या कठीण क्षणांचा सामना करण्याचं बळ त्यांना त्यांच्या कलेने दिलं.

आपल्या घरी वेगवेगळ्या प्रजातीच्या २०० बोन्सायचा सुंदर संग्रह त्यांनी केला आहे.
त्यांची देखभाल आणि त्यांचे फोटो या गोष्टीत त्या मनापासून रमून जातात.
दिवस कधी उगवतो आणि संपतो हे देखील कळू नये इतक्या त्या आपल्या कलासाधनेत व्यस्त असतात.

त्यांच्या हाताखाली आजपर्यंत १२००० मुलामुलींनी कलेच्या वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण घेतलेले आहे. आपल्या गुरूबद्दल त्यांच्या मनात नितांत आदरभाव आहे.

जयपूर,भुवनेश्वर,भोपाळ,दिल्ली,नागपूर,पुणे या शहरांमध्ये त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन रसिकांनी उस्फूर्तपणे नावाजलेले आहे.

पेंटिंग,ग्लास पेंटिंग,सिरामिक पेंटिंग, शिल्पकला,फ्लॉवर डेकोरेशन, बेस्ट टेरेस, बोन्साय गार्डन, फोटोग्राफी, स्त्री-शक्ती, महिला शक्ती सन्मान, सृजनशक्ती या विविध क्षेत्रांमधील प्रतिष्ठित पुरस्कारांनी आजवर त्यांना सन्मानित केले गेलेले आहे.

सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाकडून त्यांना २०१२ साली राष्ट्रीय पातळीवर रोलमॉडेल पुरस्कार दिला गेला.

इतके पुरस्कार मिळूनही प्रसिद्धीपासून दूर, स्वतःच्या कार्यात मग्न आणि विनम्र साधनाजी आपल्या आयुष्याबद्दल बोलायचं झालंच तर फक्त दोन शब्दात सांगून मोकळ्या होतात..

“व्यस्त रहो, मस्त रहो”....






३ टिप्पण्या:

  1. अनन्या
    कालच्या लिहिलेल्या पोस्ट वर प्रतिक्रिया देत असतांना तुझी आजची नवीन पोस्ट आली.
    दोन्ही व्यक्ती मला माहित नव्हत्या. साधनाजी वाचतांना तर मन अभिमानाने भरून आले.
    कालच रहेलूजी बद्दल वाचून भारावून गेले होते.
    सौंदर्य माणसाच्या दिसण्यात नाही. कार्तुत्वात आहे!
    लिहित रहा. मला खूप आवडतं तू लिहिलेलं वाचायला.
    thanks,

    उत्तर द्याहटवा
  2. Ananya.. Ag kaay sundar lihites.. Sadhanajincha atatparyantacha pravaas 'kinara tula paamarala' asa mhananarya columbus sarakha ahe ..ani to tuzyamule itkya prabhavipne amchyaparyant pohochatoy.. Aj dar daha vyaktinmage ek vyaakti depression chi shikaar ah asa WHO mhanatay.. Asha kalaat sadhanajinsarkhya vyakti deepstammbh ahet... Hats off to sadhanaji .. Ani tu ha vishay nivadlyabddl tuz mnapasun abhinandan

    उत्तर द्याहटवा
  3. Jeva vyakti swatha kade je nahiye tyavar nirash honyapeksha je ahe tyavar adhipatya milavun jeevan vyatit karate. That's positive thinking and inspiration for others.

    उत्तर द्याहटवा