खरंतर तिला लव्हमॅरेज करायचं होतं पण तिला तशी संधीच नाही मिळाली.
आणि शर्वरीचं लग्न ठरलं..मुलगा एकदम तिच्या मनासारखा.
सगळं मनासारखं जुळून आलं म्हणून मग लगेच साखरपुडा पण झाला दोघांचा.
शर्वरी पुण्यात नोकरी करत होती आणि अभिजित मुंबईत.
दोघांचे फोनवर बोलणे सुरु झाले एकमेकांशी.
शर्वरी एकदम बडबडी, दिलखुलास..भरभरून बोले. बोलतच राही.
स्वतःबद्दल, मैत्रिणींबद्दल, ऑफिसबद्दल, घरातल्या कितीतरी गोष्टी..तिच्या आवडी-निवडी..बोलायला विषयांची काही कमी नाही..अगदी संपूर्ण तपशील सांगे,जराही काही सुटणार नाही वर्णनातून.
शनिवारी, रविवारी प्रत्यक्ष भेटल्यावरदेखील तेच.
अभिजित एकदम शांत, काहीसा अबोलच होता स्वभावाने..तो सावकाश बोले..पण ते ऐकायला तिला धीर उरत नसे..
मग त्याचं बोलणं अर्धवट तोडून ती बोलत राही शिवाय त्याचं बोलणं फार काही महत्वाचं वाटत नसे तिला..त्याला आणखी काही बोलण्याचा अवधी देतच नसे ती....
अभिजित ने एक दोनदा विषय बदलण्याचा, तिला थांबवण्याचा प्रयत्न करून बघितला..पण तिचा उत्साहच इतका असे की त्या भरात तिला तो नेमके काय म्हणाला हे पण समजत नसे.
साखरपुडा होऊन दोन महिने झाले आणि लग्नाला अजून काही महिने होते.
आणि एक दिवस अभिजितच्या बाबांनी शर्वरीच्या बाबांना फोन करून सांगितले की “काही कारणाने आपण या लग्नाबाबतीत पुढे जाऊ शकत नाही..अभिजीतची तशी इच्छा आहे.”
दोन्ही घरातल्या लोकांना या निर्णयाचा धक्काच बसला. सगळ्यांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी त्याने शांतपणे सांगितले..”शर्वरी वाईट नाही..एक अत्यंत चांगली मुलगी आहे पण आमच्या दोघांचे स्वभाव अत्यंत वेगवेगळे आहेत. एकमेकांपासून अगदीच भिन्न..आणि इतक्या अखंड बोलणाऱ्या बायकोबरोबर मी आयुष्यभर राहू शकणार नाही..मला माझी मर्यादा माहीत आहे. तुम्ही साखरपुड्याला घाई केली.. आता तरी माझं ऐका..आम्ही लग्न करून एकमेकांसोबत सुखी होणार नाही”
अत्यंत सभ्यपणे आणि संयमाने त्याने झालेल्या मनस्तापाबद्दल सगळ्यांची माफी मागितली.
एकदा त्याच्या मनात असे आल्यावर मग आता काही कारणाने त्याला लग्न करायला भाग पाडले तर दोघेही सुखी राहू शकणार नाही, हे सगळ्यांच्या लक्षात आले.
माझ्यासारख्या मुलीला एखादा मुलगा ‘नाही’म्हणू शकतो, हा शर्वरीसाठी मात्र मोठा धक्का होता..
दिसायला सुंदर, इतकी चांगली नोकरी, चांगला स्वभाव...आणि मला नाही म्हणाला? हिम्मतच कशी त्याची?
संतापाला सीमा राहिली नाही तिच्या, एकदम अपमान वाटला तिला तिचा हा.
काही दिवस या संतापात गेले. घरातल्यांनी समजूत घालायचा प्रयत्न केला आणि सगळ्यांनी तो विषय एकदम बंद करून टाकला.
एक दिवस दुसऱ्याच कशावरून तरी आई तिला म्हणाली की “नेहमी तुझंच ऐकायचं इतरांनी ..दुसऱ्याचं पण काही म्हणणं आहे याचा नको विचार करायला?”
या वाक्याने शर्वरीचा बांध फुटला.. खूप रडली..
या मधल्या काळात ती पूर्णपणे बदलून गेली होती. उत्साहाचा धबधबा असलेली आणि अखंड बडबड करणारी शर्वरी एकदम शांत होऊन गेली.
मनाच्या या शांत अवस्थेत तिला विचार करायला वेळ मिळाला,आपल्या वागण्याचा.स्वभावातल्या कमतरता समजल्या.
तिच्या स्वभावात आणखी पण एक भाग होता, संकटकाळात टिकून राहण्याची जिद्द.
आपल्यात असलेल्या थोड्या बेपर्वा, अहंकारी वृत्तीची देखील ओळख तिला झाली.
या सगळ्या प्रसंगात आपण स्वतःशी काय बोलतो आहोत (self talk) हे तिने नीट तपासले, आलेला ताण तिला न्यूनगंडाकडे घेऊन चालला आहे हे तिच्या लक्षात आले.
घडलेली घटना फक्त एक घटना आहे आपले संपूर्ण आयुष्य नाही हे समजून घेऊन शर्वरी हळूहळू सावरली.
आता तिच्या स्वभावात दुसऱ्याचे म्हणणे पण ऐकून घेण्याचा संयम आला.
बोलण्या इतकेच दुसऱ्याचे ऐकून घेणे पण महत्वाचे असते, हे समजले.
अति उत्साहाला आवर घालणे जमले. एक शहाणी समजूत अंगात आली.
एखादी घटना घडते त्यावेळी आपल्याला ती कितीही वाईट वाटली तरी थोडे मनाने स्थिरावल्यावर घडलेल्या घटनेच्या काही वेगळ्या बाजूदेखील आपल्या लक्षात येतात. आपल्यासाठी योग्य असे त्यातून नक्की शोधता येते.
आयुष्यात सगळेच आपल्या मनासारखे घडत नाही, हे एक मोठे सत्य शर्वरीला उघड्या डोळ्यांनी आणि मनाने स्वीकारावे लागले.
आपल्या आयुष्यात वाईट घडले तर माणूस सगळ्यात आधी दुसऱ्याला दोष देतो, मग परिस्थितीला दोष देतो, मग नशिबाला आणि सगळ्यात शेवटी स्वतःला दोष देतो..
असे काहीही करण्याची गरज नसते.
माणसाचे मन सुदृढ आणि निरोगी असेल तर ते काही काळाने आपल्याला जो अनुभव येतो त्या अनुभवांचा पुन्हा विचार करून त्यातून योग्य ते शिकते आणि मार्ग काढते,इतके ते लवचिक असते.
आपल्या भूमिका आणि दृष्टीकोन ही नाण्याची फक्त एक बाजू असते.
आनंदी,उत्साही असणे हा शर्वरीचा मूळ स्वभाव, असा स्वभाव असणे मुळीच वाईट नव्हते पण त्यापायी दुसऱ्याचे व्यक्तिमत्व पार झाकोळून टाकता सुद्धा कामा नये..
कोणत्याही जवळच्या नात्यात दुसऱ्या व्यक्तीचा स्वभाव जसा आहे तसा स्वीकारता येणे पण गरजेचे असते, हे जगण्याचे मर्म या घटनेतून शिकून शर्वरीने पुन्हा नव्याने सुरवात करायचे ठरवले.
आज शर्वरीला वाटतेय..की जे झाले ते किती चांगले झाले!!..हिरा तर मी होतेच पण या प्रसंगामुळे आजवर मलाच अनोळखी असलेले माझे वेगवेगळे पैलू मला समजले !
आणि या सगळ्याचे श्रेय खरेतर अभिजीतलाच द्यायला हवेत!..नाहीतर माझ्यातल्या या शर्वरीची ओळख मला आयुष्यभर झाली नसती कदाचित.
मग शर्वरीने अभिजीतला मेसेज लिहिला...”जे घडलं त्यात आपल्या दोघांची चूक अशी काहीही नाही. मला समजलं, माझ्याकडे सगळं काही असलं तरी नेमकं तुला जे हवं आहे ते माझ्याकडे त्या वेळी नव्हतं..पण त्यामुळे मला मात्र खूप काही शिकायला मिळालं..मनापासून थॅक्स अभिजित! भावी आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा!!”
हिरा आता संपूर्ण तेजाने आणि सगळ्या पैलूंनी लखलखत होता!!!
© डॉ. अंजली/अनन्या.
# आरसा
mindmatteraa@gmail.com
(फोटो सौजन्य गूगल)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा