गुरुवार, ७ जून, २०१८

आजानुबाहू


आजानुबाहू

आजानुबाहू झाड बनावे..
मातीखाली मूळं पसरून
खोल खोल जगणे शोधावे!
मी,आजानुबाहू झाड बनावे!
सर्वांगाने उमलून यावे
उंच आभाळी झेपवावे
आभाळ सामावून कणाकणाने    
मातीखालून घट्ट रुजावे
मी,आजानुबाहू झाड बनावे!
पानपानातून फुलाफुलातून
ऋतूंचे कोमल सूर फिरावे  
उन्हापावसात,वादळवाऱ्यात                      
सावरून मी उंच झुलावे
फांदीफांदीवर पाखरांनी
गोड किलबिल गाणी गावीत
आनंदाने पंख पसरून
उंच आभाळझेप त्यांनी घ्यावी!
काडी काडी वेचून बांधावी
इवली घरटी फांदीवरती
पानांची ओंजळ करून भोवती
जपावी मी ही क्षणोक्षणी ती
पालवीच्या लालस ओठी                                   

नाविन्याची लगबग न्यारी
आनंदाच्या सोहोळ्याची
साक्षी केवळ सृष्टी अवघी
असे जगावे,असे जगावे
तृप्ततेने मी भरून यावे..
हलकेच सुटून देठापासून
मातीत निरामय रुजून जावे..
युगानुयुगे सृष्टीसाठी
पुन्हा पुन्हा मी पालवावे
मातीसाठी मातीखालून
चैतन्याने बहरून यावे..
नवा कोवळा अंकुर व्हावे...
पुन्हा-पुन्हा मी झाड बनावे..
आजानुबाहू झाड बनावे!
©डॉ. अंजली औटी.
# मनोगती
फोटो: श्रेयस बारपांडे




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा