शनिवार, ७ जुलै, २०१८

माझी झाशीची राणी!


                                          माझी झाशीची राणी!                                                                  

नवीन घरात राहायला गेलो. कोणीतरी कामाला पाठवलं म्हणून माझ्यासमोर येऊन उभी राहिलेली ‘ती’
एकदम सडपातळ,उंच,तरतरीत चेहरा..त्यावर जराशी मोठी कुंकवाची लालभडक टिकली.
आणि स्वच्छ नऊवारी साडी एकदम नीटनेटकी नेसलेली. तिला बघितलं आणि क्षणार्धात मला आठवलं, मैत्रिणीने सांगितलं होतं.. “एक बाई पाठवते तुझ्याकडे..पैसे जास्त मागेल ती..पण एकही सुट्टी घेत नाही,काम एकदम स्वच्छ आणि वेळेची एकदम पक्की. थोडी फटकळ सुद्धा आहे..पण तुला नक्की आवडेल ती.”
खरोखरच मला ती बघताक्षणीच आवडली. तिचं नाव लक्ष्मी..नावाप्रमाणेच दिसत होती ती. माझ्याकडे कामासाठी यायला लागली.
सकाळच्यावेळी मीही किचनमध्ये काम करत असतांना तिच्याशी गप्पा होत.

                                           



नवऱ्याशिवाय तीन मुलांना लहानाचे मोठे केले होते तिने..मोठा मुलगा बारावीनंतर त्याच्या वडिलांकडे राहायला गेला आणि आता तिच्यासोबत आठवीत शिकणारा अजून एक मुलगा आणि बारावी चांगल्या मार्कांनी पास होऊन कॉलेजला जाणारी एक मुलगी.
या मुलीने खूप शिकावे आणि शिकता शिकता एखादी छोटी मोठी नोकरी पण करावी यासाठी तिची धडपड. शेवटी एका साड्यांच्या दुकानात साड्यांच्या घड्या घालण्याची नोकरी मुलीला मिळाली. तितकाच तिघांच्या संसाराला हातभार आणि मुलांना त्यामुळे पैशांची किंमत समजते..हा तिचा विचार..
सहावीत असतांना मुलगा धावण्याच्या स्पर्धेत शाळेत पहिला आला. तो ज्या पद्धतीने धावला ते बघून शिक्षकांनी त्याला रोज धावण्याची प्रक्टिस करायला शाळेत बोलावलं..त्याच्या खाण्याकडे जास्त लक्ष द्यायला सांगायला त्याच्या घरी निरोप पाठवला.
लक्ष्मी सरांना भेटायला गेली. त्याचं म्हणणं तिने नीट समजून घेतलं आणि दोन आणखी घरांची काम स्वीकारून तिने त्याच्या आहाराकडे लक्ष दिले. वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घेऊन तो मुलगा सध्या अनेक धावण्याच्या स्पर्धा जिंकतो आहे. पुढे तो नक्कीच उत्तम धावपटू होईल.
मुलांसाठी इतकी धडपड करणारी आई म्हणून मला तिचं खूप कौतुक वाटे.
एकदा मला म्हणाली की.. अनेक घरची कामे आहेत, मला चालत सगळीकडे जायला खूप लवकर निघावं लागतं घरून..एखादी गाडी घ्यायचा विचार करतेय..शोधते आहे,कोणाची मिळेल का जुनी विकत?
तिच्या या बोलण्यावरून मला वाटलं की तिला गाडी चालवता येत असावी.. विचारलं,तर तिला सायकलदेखील चालवता येत नव्हती..!
मला खूप आश्चर्य वाटलं तिचं..पण तिचा उत्साह आणि चेहरा बघून विचार केला काय काय करता येईल बरं..? ती म्हणाली मी गाडी शिकायचा क्लास लावते.. आमच्या वस्तीत एक बाई शिकवते..मग तिच्याकडे चौकशी करायला तिला सांगितले..
दुसऱ्याच दिवशी ती सगळी चौकशी करून आली..”गाडी त्या शिकवणाऱ्या बाईची असेल..म्हणून क्लासची फी थोडी जास्त आहे ..पण गाडी चालवायला येईपर्यंत शिकवणार आहे ती..”
लक्ष्मी म्हणाली, आता मी पैसे साचवते क्लासचे..तिने पैसे मागितले नाहीत मला..पण तिचा तो निश्चय आणि जगावेगळा विचार ऐकूनच मला इतकं छान वाटलं त्यापुढे पैसे काय महत्त्वाचे?
मग ठरलं आमच्या दोघींचं...”सायकल चालवता येत नाही ..म्हणजे मग बॅलन्स करायला पण शिकावे लागणार..नऊवारी साडीत कसं जमणार तुला हे?”  
“उद्यापासून पाचवारी नेसते मग मी!” ती एका पायावर तयार!
“मग आजपर्यंत का नाही नेसलीस ग कधी?” तर म्हणाली की गरजच नाही वाटली कधी..लहान असतांना जशी साडी नेसायला लागली ती नऊवारीच..
गरज वाटली त्या त्या वेळी ती ती गोष्ट करून टाकायची..हे तिच्या स्वभावातच होतं..
लोकं काय म्हणतील..घरातले इतर काय म्हणतील..याचा विचारदेखील तिने केला नाही..कोणीतरी कधीतरी तिला दिलेल्या काही पाचवारी साड्या तिच्याकडे होत्या.
दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पाचवारी साडीत घरी आली..छानच दिसत होती..आणि इतके सहज भाव तिच्या चेहऱ्यावर होते की मलाच प्रश्न पडला..कालपर्यंत नऊवारी साडी नेसणारी हीच का ती?
आपल्याला एखादा बदल करायची वेळ आली की किती अवघडल्यासारखे होते आपल्याला..कोण काय म्हणेल..या विचारानेच कसंनुसं होतं..लाज वाटत असते..पण आयुष्यात पहिल्यांदा अशी साडी नेसूनही लक्ष्मी इतक्या सहज वावरत होती.
“तुझ्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना तुला बघून आश्चर्य वाटलं असेल आज”मीच म्हणाले तिला..तर म्हणाली..”वाटेना..मला काय घेणं लोकांशी? मी माझी सोय बघू की कोणाला काय वाटतं ते बघू?”
तिची ही मुद्रा..चमक..तडफ..मला सगळ्याचं कौतुक होतं..
एक जगावेगळी स्त्री मी खूप जवळून अनुभवत होते!
लक्ष्मीचा क्लास सुरु झाला..तिचं वय असेल ३७-३८..पण उत्साह १८-१९ वर्षाच्या मुलीचा.
रोज आली की काल गाडी शिकताना काय काय घडलं या आमच्या गप्पा..पहिले काही दिवस तर गाडी सुरु करून दोन्ही पाय जमनीवर ठेऊनच थोडं थोडं अंतर चालवण्यात गेले.. तिचे दोन्ही पाय व्यवस्थित जमिनीला टेकत त्यामुळे गाडी शिकतांना ती खाली कधीच पडली नाही..आणि तिला भीतीही वाटली नाही.  
ज्या दिवशी ती गाडी व्यवस्थित बॅलन्स करून एकदम दोन्ही पाय वर घ्यायला शिकली..तो दिवस आमच्या दोघींचा celebration चा होता..आम्ही एकत्र बसून आनंदाने पोहे खाल्ले!
दीड महिन्यात लक्ष्मी छान गाडी चालवायला शिकली..
तोपर्यंत आम्ही जुनी गाडी शोधत होतोच..पण मग एके दिवशी तीच म्हणाली की नवीन गाडी घेतली तर? जुनी गाडी वारंवार बिघडून तिच्यावर खर्च करत बसावे लागेल..काय करता येईल?
तिची अनेक कामे चांगली होती, जुनी होती....प्रत्येकाकडून काही पैसे घेऊन कदाचित काही होऊ शकते..
कामातून वळते करून घेण्याच्या बोलीवर तिला प्रत्येकाने उचल दिली..ती शब्दाची पक्की आहे हे सगळ्यांना माहीत होतेच.. आणि शेवटी दोन महिन्यात गाडीचे पैसे जमले..!!
दसऱ्याला आपल्या नव्या गाडीवर लक्ष्मीबाई दिमाखदार ‘गतीने’ कामाला आल्या..
तिच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता आणि अभिमानाचे तेज उमललेले हसू ..!!
ती येतांना पेढे घेऊनच आली होती.. आता गाडीचे,पेट्रोलचे पैसे निघावेत आणि लोकांचे पैसेही लवकर देता यावेत म्हणून रोज सकाळी दोन तास भाजी विकायचे काम करते असा नवाच विचार येतांना घेऊन आली..आणि त्याप्रमाणे वागलीसुद्धा..
                                   


स्वतःच्याच दु:खात चूर रडणाऱ्या..नवऱ्याशी पटले नाही तरी आयुष्यभर कुढत संसार करणाऱ्या, जगाशी भांडणाऱ्या..वाद घालणाऱ्या..निराश,परिस्थितीला शरण गेलेल्या अनेक स्त्रिया आजूबाजूला बघतांना मला लक्ष्मीचे वेगळेपण उठून दिसले.   
नवऱ्याशी पटत नाही म्हणून आपल्या तिन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडलेली..तिन्ही मुलांनी व्यवस्थित शिकावे म्हणून जीवाचे रान करणारी..मुलांना परिस्थितीची जाणीव असावी म्हणून सतर्क असलेली..मुलांच्या अंगी असलेल्या वेगळ्या गुणांची जोपासना करणारी..एक समर्थ आई, जगावेगळी पालक..
स्वतःच्या कामाशी प्रामाणिक, वेळेची किंमत ओळखणारी, आपल्या शब्दाला अतिशय पक्की असलेली..काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून घेण्याची तयारी असलेली..कुटुंबासाठी नवे नवे मार्ग शोधणारी अतिशय समर्थ स्त्री..
विचारांनी लवचिक, आधुनिक,अत्यंत धीट, स्पष्टवक्ती आणि स्वाभिमानाने जगणारी..कर्तुत्ववान स्त्री लक्ष्मी..
माझ्यासाठी तर तीच झाशीची राणी होती!
© डॉ. अंजली 
# कॅलिडोस्कोप  
(फोटो सौजन्य: गूगल)





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा