खरंतर फक्त तुमच्यासाठी
मनातले सगळे प्रश्न बाजूला सारून
का करायचं बाबा ‘लग्न’ मी
सगळ्याच मुलींना करावं लागतं, फक्त म्हणून?
लग्न म्हणजे सहजीवन असं तुम्ही म्हणता ना?
‘सह’ काय आहे यात मला जरा सांगा तर
माझी माणसं, माझं जग
सगळंच काही मला दुरावणार असेल जर?
युगानुयुगे असंच होतंय, म्हणून का ते योग्य?
‘जे करशील ते मनापासून’ ही तुमचीच ना शिकवण
या बाबतीत का मग अयोग्य?
माझं नाव बदलायचं मी,
आडनावही बदलायचं,
घर बदलायचं एका दिवसात...
माझ्या माणसांनाही सहज सोडून जायचं?
‘आई’,’बाबा’, नवीन नाती मिळणार असं म्हणता?
नव्या नात्यात आपलेपणही मीच आणायचं म्हणता!
पण मग माझ्यासाठीच काय म्हणून असा न्याय बाबा?
बदल सारे माझ्यासाठी.. केवळ लग्नाकरता?
त्यालाही येऊन बघू दे ना माझ्यासारखा सासरी
आपली सारी पाळंमूळं तोडून नव्या नात्यांकरता!
प्रेम विश्वासाच्या पायावरच ना, खरं नातं रुजतं?
समान असेल संधी, या मूल्यावर एका बंधनात टिकतं!
माझ्या क्षमता, माझी बुद्धी आहेच यांची मला खात्री
रुपापेक्षाही देखणी वाटते मला माझ्यातली
निर्णयक्षम निर्भय वृत्ती,
समजेल हे ज्याला बाबा, ते घर माझे
नात्यांचे धागे गुंफण्यासाठी
सर्वांचेच मन असावे, स्वच्छ मोकळे.
लग्न म्हणजे नव्हे ना,
आखून दिलेल्या चौकटीतला घुसमटता श्वास
स्वतंत्र आहे मी,
मलाही हवा मुक्त, आनंदी अवकाश.
दोघांच्याही निर्णयाची असेल जिथे किंमत
विचार भिन्न असू दे आमचे
दोघांतही हवी ते आहेत तसे स्वीकारायची हिंमत.
दृष्टीकोन,कर्तव्ये यांची जाण असावी
त्याच्यासाठी,माझ्यासाठी यात वेगळी सीमा नसावी.
साध्याच आहेत अपेक्षा माझ्या
स्पष्ट असल्या तरी
आचरणात विवेक हवा बाबा
तरच चढेन सहजीवनाची पायरी.
आयुष्य म्हणजे जर प्रवास असेल ना बाबा,
साथीदार माझा मला माझ्या मनासारखा हवा!
-अनन्या
खुप सुरेख कविता अनन्या. मनापासून आवडली.
उत्तर द्याहटवालिहिण्याचा प्रयत्न करतेय,पावतीबद्दल धन्यवाद!
हटवाएखाद्या मुलीच्या मनातले भाव अचूक टिपलेत तुम्ही या कवितेत ..
उत्तर द्याहटवा