भासले वरवर शांत तरीही
आतून उसळून येते काहीसे
फसवे मायाजाल भोवती
वाटते परि खरेच सगळे
खरीच नाती, स्पर्श, शब्दही,
आभासाचा भासच केवळ?
गोड वागणे, शब्द तळाशी,
अर्थ वाटतो का मग पोकळ?
जपते तरीही जीवापाड मी,
वीण उसवली कुठे जराशी
बेमालूम जोडते काठही,
फाटले जरी वस्त्र तळाशी
दखल जरी ना कोणी घेतली,
जाते तरीही पुढेच केवळ
क्षणा पाठल्या क्षणात उरते
कल्पांता इतके कठीण अंतर
फसवे तरीही अखंड सनातन,
व्यापून आहे सर्व चराचर
शोधत राहते अंतर्यामी
खरे का ते तरी माझे असलेपण?
-अनन्या
४ थ्या कडव्यात 'दाखल' ह शब्द तुम्ही वापरलाय, तो 'दखल' असा असेल ना?... कविता छानेय... "गोड वागणे, शब्द तळाशी, अर्थ वाटतो का मग पोकळ?" - मस्तच!
उत्तर द्याहटवाहोय...दाखल चुकून झालंय. आता दुरुस्त केलंय, सांगितल्याबद्दल आभार.
हटवा